विचारे मना (Vichare Mana)

“देवाने आपल्याला मेंदू देऊन चूकच केलीय.” गजबलेल्या रस्त्यावरून चालता चालता तो स्वतःशीच विचार करत होता.

“ह्या मेंदूमुळे माणसाचं आयुष्य अवघड होऊ बसलय. बरं दिला तो दिला, पोटापुरता द्यायचा ना. कशाला हे विचार बिचार करायची भानगड ठेवायची. ह्या कुत्र्या-मांजराचं कसं सोपं आहे. भूक लागली कि मिळेल ते खायचं. इच्छा झाली की गरजा पूर्ण करून घ्यायचा. पण माणसाने मात्र विचार करायचा. तो हातगाडीवाला काय विचार करत असेल, ‘सोडून द्यावा हा धंदा. जावं दूर कुठेतरी निघून..’ असं काहीसं चाललं असेल त्याच्या डोक्यात. पण मग त्याला घरात असलेलं तान्हं बाळ आठवत असेल, बायको आठवत असेल आणि मग तो विचार बदलेल. त्याच्या उलट हा भिकारी, त्याला फक्त आजचा वडापाव मिळतोय काय ह्याची चिंता असेल. प्रत्येकाला कसली ना कसली चिंता आहेच. मुलीला घेऊन त्या साडीच्या दुकानात घुसणाऱ्या बापाला पैश्यांची चिंता. मुलीला, नवरा चांगला असेल का नाही ह्याची चिंता. कुणाला नोकरी मिळत नाही- कुणाला नोकरी मानवत नाही. सगळ्यांनी फक्त कसली तरी चिंता करत राहायचं. माणसाचा जन्मच त्यासाठी झालाय बहुतेक. आम्ही सगळ्यांनी मागच्या जन्मी नक्कीच काही पापं केली असणार म्हणून माणसाच्या जन्माला आलोय.”

रस्ता ओलांडता-ओलांडता, पॅन्टला लावलेलं ID कार्ड पडलं ते उचलायला तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कर्कश हॉर्न वाजला.

-“ए मुर्ख… कडेला हो ना” कार मधला माणूस ओरडला.

“काय संडासला लागलय काय तुम्हाला? एवढ्या जोरात चाललाय… हॅ हॅ हॅ…” स्वतःच्याच विनोदावर सिगरेट पिऊन पिवळे झालेले दात काढून तो हसला.

-“फालतू… मध्येच थांबलाय आणि वर मलाच बोलतोय… कशाला असली माणसं…” त्या गाडीवाल्याचं वाक्य पूर्ण ऐकू येण्याआधी तो वळून निघून गेला

“हा माणूस नक्की पुढच्या जन्मी भिकाऱ्याच्या जन्माला जाणार” पुढे गेलेल्या कारकडे बघून तो मनात म्हणाला.

“मागचा जन्म, पुढचा जन्म… बापरे माणसानं काय काय कल्पना करून ठेवल्या आहेत. ह्या जन्मात चांगलं कार्य करायचं म्हणजे पुढचा जन्म सुखात जातो म्हणे. कुणी ठरवलं चांगलं काय, वाईट काय? देवाने? देव तरी कुणी बनवला? आम्हीच की. मग आम्ही म्हणू तेच बरोबर. आज बसून त्रास होईपर्यंत दारू प्यायची हे बरोबर. पैसा पाण्यासारखा उधळायचा हे पण बरोबर. ड्रग्स करायचे, रेप करायचा, चोरी करायची. तशी पण इथे कुणाची कुणाला पडलेली असते. माझी तर कुणाला पडलीय.”

वाटेतल्या गणपतीच्या देवळासमोरून जाता जाता त्याने डोक्याला आणि छातीला हात लावून नमस्काराचा सोपस्कार केला.

“प्रत्येक जण विचार करतो आणि तो स्वतःचाच करतो. आपला फायदा कशात आहे, हे पाहिल्याशिवाय माणूस कुठलीच गोष्ट करत नाही. मग मी तरी स्वतःचा विचार केला तर कुठे चुकलं? शरीर दिलंय तर त्याच्याबरोबरच्या गरजा पण आल्याच. आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंतच तर करायचंय. हेच तर वय असतं म्हणतात ना, काहीतरी थ्रिल करायचं? शिवाय ह्या वस्त्या कशाला बनवल्या असत्या माणसानं? ओठांना भडक लिपस्टिक लावून, परकर ब्लॉऊज घालून बसतातच कि त्या. माझ्याकडे पैसा आहे आणि त्यांच्याकडे शरीर. दोघांचा पण फायदा!”

तो कॉर्नरला एका माडीवर जायला वळणार तेवढ्यात त्याची नजर एका बाईवर गेली. बाहेरच दूध पाजत बसली होती.

“कुणाचं असेल ते बाळ? कोणीतरी आला असेल आपली हवस शांत करायला, कसल्यातरी डिप्रेशन मधून बाहेर पडायला किंवा ब्रेकअप मधून सावरायला. किंवा नुसतंच थ्रिल म्हणून. माझ्यासारखं. त्याच्या या थ्रिलच्या नादात एका जीवाला जन्म घातला त्याने. बिचारं बाळ. त्याला बापाचं तोंडदेखील माहित नाही. काय करेल ते त्याला कळायला लागल्यावर?”

“मी तरी काय केलं होतं? माझा बाप आईला सोडून गेला तेव्हा मी तरी काय केलं होतं? चड्डीत मुतण्याशिवाय दुसरं येत तरी काय होतं मला? पण काही करावंच लागलं नाही. आईनेच केलं सगळं. चड्डी बदलली, घर बदललं, नोकऱ्या बदलल्या, स्वतःला बदललं आणि सोबत मला पण बदललं. देवाने आईला तयार करून एक बरं केलंय. सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या आहेत. सगळ्या अडचणी, सगळ्या दुःखावर तिच्याकडे कसं काय औषध असतं काय माहित. सोपं आहे माझं आयुष्य तसं. इतके वर्षं खपून तिने ते केलंय माझ्यासाठी.”

“तिला आत्ता दिसत असेन का मी? रात्रीचं आभाळातनं बघतात म्हणे ते. ती बघत असेल तर तिला वाईट वाटत असेल नई. रडेल पण कदाचित, माझ्या बाबतीत हळवी आहे.”

माडीवर चढून तो त्या जाड्या बाईकडे गेला. बाळाला घेऊन बसलेल्या बाईची किंमत विचारली. घृणा आल्याचं तोंड करून बाईने जास्तीचे भाव लावले. तिच्यासमोर पैसे टाकून तो आत गेला. बाळाला कडेला ठेऊन ती बाई उठली. दाराची कडी लावून बेडवर येऊन बसली. तिच्याकडे ना बघता तो त्या शांत झोपलेल्या बाळाकडे गेला. खालचा ओठ बाहेर काढून निश्चिन्त पडलेल्या त्या छोट्या पोराला पाहून का कोण जाणे, त्याला तो पिवळट पडलेला फोटो आठवला. तरुण आई, तरुण बाबा आणि मध्ये चेहराभर तीट लावलेला एक गटटू. तो स्वतःशीच हसला. तिच्याकडे वळून त्याने तिला इतकंच विचारलं,

–“ह्याला माझ्याबरोबर घेऊन जायचं असेल तर कुणाला विचारायचं?”

Leave A Comment