Posts tagged Good marathi moral story

मनकवडी (Manakavadi)

ऑफिसला जात असताना काल एक छोटा मुलगा गाडीपाशी आला. एका हातात लाकडी खेळणं नाचवत दुसऱ्या हाताने काच ठोठावू लागला. काच खाली करून विचारलं, “काय रे?”

“सर… ये ले लो ना गाडी मे लगाने के लिये… बस ५० रु. मे है!” डूगुडूगु कंबर हलवणारी एक लाकडी बाहुली दाखवत तो म्हणाला.

“क्युं, क्या है इसमे खास?” सरळ नको न म्हणता मी उगाच वाकडा प्रश्न केला.

एक क्षणासाठी थांबून तो ३.५ फूट उंचीचा मुलगा म्हणाला, “सर, ये जादूकी गुडिया है”

“हां?? क्या जादू करती है?” अजून बरीच मोठी लाईन होती म्हणून मग मी पण त्याच्या गोष्टीत भाग घेतला.

“ये आपके मन की बात समझती है और जो मांगे वो देती है! अभी देखो, आप मांगोगे ना — ये सिग्नल छुटे — तो देखो १ मिनिट मी छुटेगा”

छोट्याने जी शक्कल लढवली त्याचं कौतुक वाटलं आणि ती बाहुली मी घेतली. Dashboard वर ठेवली. अगदीच वाईट नव्हती ती दिसायला. सिग्नल मधून बाहेर पडलो आणि फोन वाजू लागला. Mohit calling. “Shit, हा आता review चे updates मागणार गेल्या गेल्या. आज review meeting मध्ये मोहित नसायला हवा यार… माझ्या बाजूने बोलायचं सोडून मलाच तोंडघशी पाडतो साX” फोन न उचलता manager च्या नावाने मुक्ताफळं उधळत निघालो.

ऑफिस मध्ये शिरून फटाफट laptop उघडला. Review चा ppt उघडला. मोहितच्या डेस्कवर updates साठी जाणार तेवढ्यात mail चं notification आलं,

‘I am out of office. Not well. Sorry for short notice

Regards,

Mohit’

हे वाचून मी खुर्चीतच एक छोटी उडी मारली. अचानक त्या पोराचे शब्द आठवले, “ये जादूकी गुडिया है”

अरे… खरंच ऐकली की काय तिने माझी इच्छा?

दुपारचा Review पण आरामात झाला. Approval पण मिळालं. संध्याकाळी खुशीत निघालो. बाहुलीच्या फ्रॉकला टिचकी मारली. कंबर हलवत ती डुलू लागली. वाटलं, जणू म्हणतेय “सांग सांग, अजून काय पाहिजे?” स्वतःशीच हसत घरी निघालो. आज traffic पण नेहमीपेक्षा कमी वाटत होतं. जाता जाता करीमची बिर्याणी घेऊन जावी असा विचार आला. पण बायको ओरडणार ह्याची खात्री असल्यामुळे नुसताच मूग गिळून पुढे गेलो.

घरी येउन दार उघडतोय तोवर खमंग वास आला. हातातली bag न ठेवताच स्वैपाकघराकडे गेलो.

“Wow! चिकन बिर्याणी… तुला कसं कळलं?”

“रविवारी केली नाही तर केवढा मूड ऑफ झालेला तुझा… आज मीटिंग नव्हती ना, मग लवकर आले, म्हणलं बनवू आज” मी मनातल्या मनात बाहुलीला thank you म्हणलं. बायकोला सांगितलं नाही, तिने वेड्यात काढलं असतं. मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारून, रात्री दुपारच्या match चे highlights बघून ढाराढूर झोपलो.

रात्री मधेच दारावर ठकठक ऐकू आली. एवढ्या रात्रीचं कोण असेल? बाहेरच्या खोलीत जाऊन “कोण आहे?” असं जोरात ओरडलो.

तेवढ्यात एकदम झगमगाट झाला आणि… साधारण पन्नाशीकडे झुकलेल्या, घोळदार फ्रॉक घातलेल्या, हातात छडी घेतलेल्या ३ बायका बंद दरवाज्यातून गप्पकन आत आल्या. मी एकदम बावरलो.

घाबरत घाबरत विचारलं, “क- कोण तुम्ही?”

“आम्ही तुझी ती बाहुली न्यायला आलोय” तिघी एका सुरात बोलल्या.

“क-का?… कोण आहात तुम्ही?

“आम्ही फेअरी गॉडमदर्स आहोत!” जराशी स्थूल असलेली मधली बोलली

“काय्य्य?” मी किंचाळलो.

“अरे तू इतका ‘ढ’ आहेस का? दिसतेय न ही छडी, हा टियारा?” एक सडपातळ बांधा ती काठी डोळ्यासमोर नाचवत म्हणाली.

“पण तुम्ही इथे का आलाय?”

“आम्ही तुझी बाहुली न्यायला आलोय. ती मनातलं ओळखते आणि आपल्या wishes पूर्ण करते” तिसरी बोलली.

“पण तुम्ही Fairy Godmothers आहात ना? तुम्ही सगळ्यांच्या wishes पूर्ण करता ना? तुम्हाला कशाला हवीय बाहुली?” मी आता धीटपणाने बोललो.

“ हः…सगळ्यांच्या इच्छा आम्ही पूर्ण करायच्या आमच्या कोण करणार? आणि तसं पण तुझ्याकडे आहे न अजून एक बाहुली. तुला हि कशाला हवीय?” स्थूल.

“हो. दे आम्हाला.” मध्यम

“जादूकी गुडिया!” सडपातळ.

“अहो नाहीये दुसरी माझ्याकडे, आजच सकाळी घेतलीय मी विकत. मी नाहीये देणार.” मी ठणकावून सांगितलं. तिघींनी डोळे मोठ्ठे केले.

“बघूच कसा देत नाही, पकडा गं ह्याला” स्थूल ओरडली.

मी बाहुली घेऊन पळू लागलो. अचानकच आमची लिविंग रूम मोठ्ठी झाल्यासारखी वाटली. एकीने कांडी फिरवली, मी खाली वाकून ती चुकवली. किचन मध्ये गेलो. lighter घेतला आणि त्यांना भीती दाखवू लागलो. सडपातळ ने सरळ कांडी फिरवली आणि lighter ची काकडी झाली. एकीने नुसता हात घुमवला आणि बर्फाच्या बाहुल्या भोवतीने तयार झाल्या. त्यातली एक बाहुली फोडून बाहेर पडलो. बेडरूम च्या दारावर धडका मारल्या. “ऋता… ऋता दार उघड” पण बायको दार उघडत नव्हती. त्या मागून आल्या.

“बास. खूप पाहिले ह्याचे नखरे.” स्थूल म्हणाली. तिने एकदा कांडी फिरवली. माझे पाय दोरखंडानी आवळले गेले. मी आडवा पडलो. इतक्यात हात पण आवळले गेले. ती बाहुली उडून सडपातळ च्या हातात पडली.

आणि झुप्प करून त्या गायब झाल्या.

आणि मी दचकून जागा झालो. अलार्म वाजत होता.

“Shit, स्वप्न होतं!” मी डोळे चोळले. “काय weird स्वप्न होतं यार. हे ऋताबरोबर Disney कार्टून बघणं बंद केलं पाहिजे.”

तोंड धुवून सरळ अंघोळीलाच गेलो. ‘असं का स्वप्न पडलं असेल?’ असा विचार करत अंघोळ संपली आणि लक्षात आलं टॉवेल न घेताच आलो. ऋताला हाक मारणार तेवढ्यात बाथरूम च्या दारावर ठकठक झाली.

“अहो गोकुळराव, टॉवेल विसरलात तुम्ही. घ्या.”

आवरून टेबलवर बसलो. काल सगळी बिर्याणी संपवून पण आज जाम भूक लागली होती.

गरमागरम चहा आणि पोहे बायकोने समोर ठेवले. “मला मगाशी भूक लागली होती. मग मी खाऊन घेतलं” चहा प्यायला टेबलवर बसत ती म्हणाली.

“ए ऋता, तू मला उगाच त्या कार्टून फिल्म्स बघायला जबरदस्ती करत जाऊ नकोस हं!”

“आं, हे काय मधेच? कार्टून फिल्म्स! आणि तुला अजिबातच नाही आवडत का कार्टून्स? हुः नको बघत जाऊ उद्यापासून.” puppy face करत ती म्हणाली. चहा संपला तसं उठून बाहेर गेली.

“ऋतू… पेप…” मी वाक्य पूर्ण करणार इतक्यात आत आली

“काय बाई ह्या हेडलाईन्स. सकाळी सकाळी depression येतं. तूच वाच हे” माझ्या हातात पेपर देत ती म्हणाली. मी पटकन तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिने नजरेनेच “काय?” विचारलं.

पेपर चाळून, चहा पिउन उठलो. कुठला शर्ट घालायचा म्हणून कपाट उघडलं.

“तुझा शर्ट ठेवलाय बघ इकडे बाहेर. कालचा शर्ट किती मळवलायस रे? ऑफिसला जातोस कि रस्ता बांधायला?” स्वतःच्या ड्रेसला इस्त्री करून ठेवत बाहेरच्या खोलीतून ती बोलली.

एकदम तिच्यापाशी गेलो. तिला जवळ ओढलं. कुशीत घेतलं. तिच्या गालावर हात ठेवला. “Sorry…” तोंडातून एकच शब्द बाहेर पडला.

डोळे मोठ्ठे मोठ्ठे करून, भुवया उंचावून तिने विचारलं, “काय रे काय झालं? इतकं काही नाही. लौंड्रीला देईन फारतर.”

“नाही, त्यासाठी नाही. माहित नाही कशा-कशासाठी.… काल इतकी छान बिर्याणी बनवली होतीस तर मी साधं Thank you पण म्हणलो नाही. सकाळपासून किती काय काय करतेयस न सांगता. तुला कितीतरी गोष्टी न बोलता कळतात. आणि ते मला कळलं नाही त्यासाठी.

आत्ता मला कळलं, त्या काय म्हणत होत्या. माझ्याकडे already एक बाहुली आहे. आणि मला कळलंच नाही.
तू आहेस माझी ‘मनकवडी बाहुली’!”

“कोण त्या? बाहुली कसली?” कपाळावर प्रश्नचिन्ह ठेऊन ती विचारत होती.

तिच्याकडं नुसतंच कौतुकानं बघितलं आणि मिठी अजून घट्ट केली.

विचारे मना (Vichare Mana)

“देवाने आपल्याला मेंदू देऊन चूकच केलीय.” गजबलेल्या रस्त्यावरून चालता चालता तो स्वतःशीच विचार करत होता.

“ह्या मेंदूमुळे माणसाचं आयुष्य अवघड होऊ बसलय. बरं दिला तो दिला, पोटापुरता द्यायचा ना. कशाला हे विचार बिचार करायची भानगड ठेवायची. ह्या कुत्र्या-मांजराचं कसं सोपं आहे. भूक लागली कि मिळेल ते खायचं. इच्छा झाली की गरजा पूर्ण करून घ्यायचा. पण माणसाने मात्र विचार करायचा. तो हातगाडीवाला काय विचार करत असेल, ‘सोडून द्यावा हा धंदा. जावं दूर कुठेतरी निघून..’ असं काहीसं चाललं असेल त्याच्या डोक्यात. पण मग त्याला घरात असलेलं तान्हं बाळ आठवत असेल, बायको आठवत असेल आणि मग तो विचार बदलेल. त्याच्या उलट हा भिकारी, त्याला फक्त आजचा वडापाव मिळतोय काय ह्याची चिंता असेल. प्रत्येकाला कसली ना कसली चिंता आहेच. मुलीला घेऊन त्या साडीच्या दुकानात घुसणाऱ्या बापाला पैश्यांची चिंता. मुलीला, नवरा चांगला असेल का नाही ह्याची चिंता. कुणाला नोकरी मिळत नाही- कुणाला नोकरी मानवत नाही. सगळ्यांनी फक्त कसली तरी चिंता करत राहायचं. माणसाचा जन्मच त्यासाठी झालाय बहुतेक. आम्ही सगळ्यांनी मागच्या जन्मी नक्कीच काही पापं केली असणार म्हणून माणसाच्या जन्माला आलोय.”

रस्ता ओलांडता-ओलांडता, पॅन्टला लावलेलं ID कार्ड पडलं ते उचलायला तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कर्कश हॉर्न वाजला.

-“ए मुर्ख… कडेला हो ना” कार मधला माणूस ओरडला.

“काय संडासला लागलय काय तुम्हाला? एवढ्या जोरात चाललाय… हॅ हॅ हॅ…” स्वतःच्याच विनोदावर सिगरेट पिऊन पिवळे झालेले दात काढून तो हसला.

-“फालतू… मध्येच थांबलाय आणि वर मलाच बोलतोय… कशाला असली माणसं…” त्या गाडीवाल्याचं वाक्य पूर्ण ऐकू येण्याआधी तो वळून निघून गेला

“हा माणूस नक्की पुढच्या जन्मी भिकाऱ्याच्या जन्माला जाणार” पुढे गेलेल्या कारकडे बघून तो मनात म्हणाला.

“मागचा जन्म, पुढचा जन्म… बापरे माणसानं काय काय कल्पना करून ठेवल्या आहेत. ह्या जन्मात चांगलं कार्य करायचं म्हणजे पुढचा जन्म सुखात जातो म्हणे. कुणी ठरवलं चांगलं काय, वाईट काय? देवाने? देव तरी कुणी बनवला? आम्हीच की. मग आम्ही म्हणू तेच बरोबर. आज बसून त्रास होईपर्यंत दारू प्यायची हे बरोबर. पैसा पाण्यासारखा उधळायचा हे पण बरोबर. ड्रग्स करायचे, रेप करायचा, चोरी करायची. तशी पण इथे कुणाची कुणाला पडलेली असते. माझी तर कुणाला पडलीय.”

वाटेतल्या गणपतीच्या देवळासमोरून जाता जाता त्याने डोक्याला आणि छातीला हात लावून नमस्काराचा सोपस्कार केला.

“प्रत्येक जण विचार करतो आणि तो स्वतःचाच करतो. आपला फायदा कशात आहे, हे पाहिल्याशिवाय माणूस कुठलीच गोष्ट करत नाही. मग मी तरी स्वतःचा विचार केला तर कुठे चुकलं? शरीर दिलंय तर त्याच्याबरोबरच्या गरजा पण आल्याच. आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंतच तर करायचंय. हेच तर वय असतं म्हणतात ना, काहीतरी थ्रिल करायचं? शिवाय ह्या वस्त्या कशाला बनवल्या असत्या माणसानं? ओठांना भडक लिपस्टिक लावून, परकर ब्लॉऊज घालून बसतातच कि त्या. माझ्याकडे पैसा आहे आणि त्यांच्याकडे शरीर. दोघांचा पण फायदा!”

तो कॉर्नरला एका माडीवर जायला वळणार तेवढ्यात त्याची नजर एका बाईवर गेली. बाहेरच दूध पाजत बसली होती.

“कुणाचं असेल ते बाळ? कोणीतरी आला असेल आपली हवस शांत करायला, कसल्यातरी डिप्रेशन मधून बाहेर पडायला किंवा ब्रेकअप मधून सावरायला. किंवा नुसतंच थ्रिल म्हणून. माझ्यासारखं. त्याच्या या थ्रिलच्या नादात एका जीवाला जन्म घातला त्याने. बिचारं बाळ. त्याला बापाचं तोंडदेखील माहित नाही. काय करेल ते त्याला कळायला लागल्यावर?”

“मी तरी काय केलं होतं? माझा बाप आईला सोडून गेला तेव्हा मी तरी काय केलं होतं? चड्डीत मुतण्याशिवाय दुसरं येत तरी काय होतं मला? पण काही करावंच लागलं नाही. आईनेच केलं सगळं. चड्डी बदलली, घर बदललं, नोकऱ्या बदलल्या, स्वतःला बदललं आणि सोबत मला पण बदललं. देवाने आईला तयार करून एक बरं केलंय. सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या आहेत. सगळ्या अडचणी, सगळ्या दुःखावर तिच्याकडे कसं काय औषध असतं काय माहित. सोपं आहे माझं आयुष्य तसं. इतके वर्षं खपून तिने ते केलंय माझ्यासाठी.”

“तिला आत्ता दिसत असेन का मी? रात्रीचं आभाळातनं बघतात म्हणे ते. ती बघत असेल तर तिला वाईट वाटत असेल नई. रडेल पण कदाचित, माझ्या बाबतीत हळवी आहे.”

माडीवर चढून तो त्या जाड्या बाईकडे गेला. बाळाला घेऊन बसलेल्या बाईची किंमत विचारली. घृणा आल्याचं तोंड करून बाईने जास्तीचे भाव लावले. तिच्यासमोर पैसे टाकून तो आत गेला. बाळाला कडेला ठेऊन ती बाई उठली. दाराची कडी लावून बेडवर येऊन बसली. तिच्याकडे ना बघता तो त्या शांत झोपलेल्या बाळाकडे गेला. खालचा ओठ बाहेर काढून निश्चिन्त पडलेल्या त्या छोट्या पोराला पाहून का कोण जाणे, त्याला तो पिवळट पडलेला फोटो आठवला. तरुण आई, तरुण बाबा आणि मध्ये चेहराभर तीट लावलेला एक गटटू. तो स्वतःशीच हसला. तिच्याकडे वळून त्याने तिला इतकंच विचारलं,

–“ह्याला माझ्याबरोबर घेऊन जायचं असेल तर कुणाला विचारायचं?”

टायर (Tyre)

वर्तमानपत्राची हेडलाईन आणि खाली बंड्याचा फोटो पाहून मी स्तब्ध झालो. डोळ्यासमोर गावातलं मैदान चमकलं. उतारावरून वेगात घरंगळत आलेली ती टायर. सपसप धूळ उडवत पुढे निघून गेली. मी अजून माझ्या टायरीला एका लाईन मध्ये आणायचा प्रयत्न करत होतो. आणि दूर चढावर पाहिलं तर कमरेवर हात ठेऊन बंड्या कौतुकाने आपल्या टायरीकडे बघत होता. टायर बरीच पुढे जाऊन पडली तसा बंड्या धपधप पाय टाकत माझ्याजवळ आला. आणि पाठीत एक गुद्दा हाणून म्हणाला, “काय लेका… अजून तुझी सरळ उभी बी राहीना व्हय? आन हिकडं सरळ करतो तिला”

बंड्या ऊर्फ संजय – माझा लंगोटीयार! बेधडक, निडर, धिप्पाड आणि दणकट. माझ्या बरोब्बर उलट. पण तरी माझा जिगरी दोस्त. स्वभाव, बुद्धिमत्ता, अंगकाठी सगळंच वेगळं असताना सुद्धा आपलं झक्कास पटायचं. मला खरंतर बंड्याचा आधार वाटायचा. मी नेहमी त्याच्यासोबतच शाळेला जायचो. पाटील वस्तीतल्या रंग्या पाटलाची मला जाम भीती वाटायची. रंग्या उगीच सगळ्यांच्या खोड्या काढायचा. एकदा माझ्या शर्टावर शाईची बाटली ओतून हसत बसला होता. तेव्हापासून तो कुठेही दिसला कि मी रस्ता बदलून जायचो. बंड्या सोबत असला कि मात्र मी “कुणाच्या बापाची भीती हाय काय?” अशा अविर्भावात चालायचो.

माझं घर रझाक मोहल्ल्यात आणि बंड्याचं निमकर आळीत. तशी आमची ‘अण्णासाहेब रावसाहेब खोपडे-पाटील प्रशाला’ माझ्या घरापासून जवळ होती पण मी लवकर आवरून बंड्याच्या घरी जायचो. बंड्या बऱ्याचदा दात घासत असायचा. मला बघून “आलो रे आलो मोश्या…” म्हणत मोरीत पळायचा. एकाच मिनटात अंघोळ करून बाहेर यायचा. बंड्याच्या आईनं चहा-चपाती तयार ठेवलेली असायची. बका-बका तोंडात कोंबत बंड्या १० ओळी शुद्धलेखन पूर्ण करायचा. अर्थात ते कधीच शुद्ध नसायचं आणि चहा, आमटी असे डाग पडून वही पण शुद्ध राहिलेली नसायची. “मोश्या मर्दा… आज बी बाई हाणत्या बग… टॉय काय सापडणा…” असं म्हणत शर्ट चड्डीत अर्धवट खोचून बंड्या माझ्याबरोबर चालू लागायचा.

दर शनिवारी न चुकता छडी खायचो. सुरुवातीला मला रडू यायचं पण बंड्यानेच शिकवलं कोडगं व्हायला. बंड्या तरी छड्या खाण्यात expert होता. नुसत्या छड्याच नाही तर कोंबडा होणे, अंगठे धरणे, ग्राउंडच्या १० चकरा मारणे, सगळं अगदी मन लावून करायचा.

तरीदेखील बंड्या मला भारी वाटायचा. मला त्याच्यासारखं व्हावसं वाटे. कशाचीच चिंता नाही, सगळ्यांना मदत करायला पुढे, आमच्या घरचं दळण तोच आणून देई, अब्बांना S. T. stand ला सायकलीवर सोडायला तोच जाई.

अम्मीच्या हातचं मटण आणि ईदची खीर त्याला प्रचंड आवडायचे. ईदच्या दिवशी सकाळी सातलाच हजर असायचा घरी. पठ्ठ्या शनिवारच्या शाळेला कधी उठला नाही लवकर. अम्मी – आपाला जमेल ती सगळी मदत करायचा. मग खीर तयार झाली की वाडगाभर पिऊन आणि किटलीभर घरी घेऊन जायचा. बंड्याची आईदेखील दिवाळीला डब्बाभर चकल्या आणि बेसनाचे लाडू पाठवायची. आमच्या अम्मीला लाडू कधी जमलेच नाहीत. अगदी माझ्या वहीवर रेसिपी लिहून आणून सुद्धा!

शाळा सुटल्या सुटल्या आम्ही दप्तरं टाकायचो ते थेट मैदानावर टायरी घेऊन पळायचो. खूप खूप टायरी फिरवायचो. माझी टायर फिरवण्यापेक्षा बंड्या आणि त्याच्या टायरीच्या मागे पळण्यातच माझा व्यायाम व्हायचा. त्याच्या हातात जादू असावी. “हे बघ, अस्स धरायचं काठीला आनी अस्सा रप्पाटा हाणायचा त्या टायरीवर… आरं… तसं न्हवं मर्दा… आरं लाव की जरा जोर… मोश्या लेका खाऊन येत जा कि जरा” तो मला लाख शिकवायचा प्रयत्न करे आणि मग शेवटी कंटाळून ” बघ आता मी कसं मारतो ते” असं म्हणून अख्खं मैदान पालथं करे.

असा हा रेड्याच्या डोक्याचा माझा मित्र, कधी प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं. पण गीता पिसे होतीच तशी सुंदर! सातवीत शाळेच्या ग्यादरिंग ला ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’ वर तिने डान्स केला होता. तेव्हापासून बंड्या पागल झाला होता. मग काय? गाड्याबरोबर नळ्याची यात्रा! वर्गातला सर्वात sincere विद्यार्थी असून सुद्धा गीताच्या नोटस मागायला जायचो, ह्याला तिची एक झलक पाहायला मिळावी म्हणून. शेवटी मनाचा हिय्या करून ‘वैलेन्टाइन्स डे’ दिवशी बंड्याने तिला विचारलंच. पण तिच्या तोंडून “वंगाळ” शब्द ऐकून बंड्या पुरता सपाट झाला. मला तरातरा ओढत मारुतीच्या मंदिरात घेऊन गेला.

“जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली… मारुतराया ह्या मोश्याच्या साक्षीनं शपथ घेतो. पुन्यांदा कुठल्या पोरीकड वळून पण बघनार न्हाई” असा शपथविधी पण झाला. मग मारुती च्या देवळातून आम्ही थेट टायरी घेऊन मैदानावर गेलो होतो. आज बंड्याची टायर अजूनच वेगात पळत होती.

जशी दहावी जवळ आली तशी माझ्या चाकाला गती मिळाली. आणि बंड्याची टायर मैदानावरच राहिली. बोर्डाचा अभ्यास करता करता माझं मैदान सुटलं आणि टायरदेखील. त्यावर्षी “मोहसीन बागवान बोर्डात पाचवा आला होता” आणि पासांच्या लिस्ट मध्ये बंड्याचं नावही नव्हतं. त्यानंतर मी शहरात आलो ते कायमचाच. स्कॉलरशीप मिळवत मिळवत मी engineering ला admission घेतली. आणि वेग-वेगळे मार्ग धुंडाळून भरकटलेल्या बंड्याने अखेर ‘झेंडा’ हाती घेतला.

ह्या सगळ्या प्रवासात बंड्या माझी कमी पूर्ण करत होता. आपाच्या लग्नात माझी परीक्षा चालू होती. आमचं घर हलवताना मला जास्त दिवस सुट्टी मिळत नव्हती. बंड्या मात्र सगळं त्याचंच समजून करत राहिला. इकडे येताना अम्मी बंड्याला धरून सर्वात जास्त रडली होती.

टेम्पोच्या मागे सामानात बसलेलो असताना डोळ्यातला पाण्याचा थेंब परत पाठवणारा बंड्या, मला आज मोठ्या मथळ्याखालच्या फोटोत दिसत होता. तोच बेदरकारपणा, तेच बेफिकीर डोळे, दाढी-मिश्या वाढलेल्या.

“रझाक मोहल्ला जाळून स्वतःला ‘सैनिक’ म्हणवून घेणाऱ्या संजय मिटकरीला तीन साथीदारांसह अटक झाली होती.” एकच प्रश्न डोक्यात घुमत होता, ‘मी तिथे असतो तर… तरीपण बंड्यानं हेच केलं असतं का?”

आणि मग राहून राहून ती धूळ उडवत येणारी टायर दिसत होती आणि कमरेवर हात ठेवलेला बंड्या!