Posts tagged Marathi Katha

उतू नकोस मातू नकोस (Utu Nakos Matu Nakos)

“मम्मा, उतू-मातू म्हणजे काय?” ईशानने फरशीवर गाडी फिरवत फिरवत विचारलं.

“काय्य?” मी केस विंचरताना थबकले.

“तू नाहीस का काल म्हणत होतीस, उतू नको, मातू नको…” त्याने मग माझ्याकडे पाहिलं.

“oh… ते… उं… उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस.”

“हां, म्हणजे काय?”

आता काय सांगायचं ह्याला? इंग्लिश शाळेत शिकणारी ही मुलं. काय अर्थ सांगावा? तसा मला तरी कुठे उतू-मातूचा इंग्लिश शब्द माहित आहे म्हणा…!
तसं फार काही व्रतं-वैकल्य मला जमत नाहीत. पण लॉक-डाऊन मध्ये घरी राहिल्याने, सोसायटीतल्या शेजारणींच्या नादाने मीदेखील सण-वारात इंटरेस्ट घेऊ लागलेय. मग सासूबाईंच्या virtual देखरेखीखाली पूजा मांडतेय ‘महालक्ष्मी’ची. काल दुसरा गुरुवार झाला. लहानपणी ही कथा वाचायला नेहमी मी पुढे असायचे. चांगले आवाजातले चढउतार घेऊन.

आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शुर व प्रजादक्ष होता. देवा-ब्राम्हणांना, साधुसंतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवर्‍याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या, लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला; पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऎश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी.
देवीनं म्हातारीचं रुप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली – “अरे, आहे कां घरात कुणी ? कुणी घास देईल का ?” दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, “कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय ? गाव कोणतं ? तुला हवयं कायं ?” मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “माझं नाव कमला. द्वारकेहून आलेय गं ! राणीला भेटायचंय ! कुठं आहे गं राणी?

सुरतचंद्रिका दासीचा निरोप ऐकून बाहेर आली. ती तावातावाने म्हणाली, “कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ?”

हे ऐकून म्हातारी संतापली. “सुरतचंद्रिके, तुला तुझ्या संपत्तीचा गर्व झाला आहे, तुला तुझ्या भूतकाळाचा विसर पडला आहे. तू जा म्हणण्याआधीच मी निघाले.” असे म्हणून म्हातारी काठी टेकीत चरफडत निघाली. वाटेत तिला राजाची कन्या शामबाला दिसली….

हि गोष्ट वाचता वाचता मला ती म्हातारी दिसायची. सुरतचंद्रिका म्हणजे एखाद्या जुन्या हिंदी सिनेमातील vamp वाटायची. वाचताना कधी असा विचार वगैरे केला नव्हता. कि ह्याचा अर्थ काय? खरंतर कालही वाचताना केला नव्हता.

पण कुठे ना कुठे ती गोष्ट मनात होती. आजकालच्या मुलांसारखं ‘Value education’ वगैरे मिळत नव्हतं आम्हाला शाळेत. ‘मुलांचे संगोपन’ ह्या विषयावर आईनं तरी कधी पुस्तक वाचल्याचं आठवत नाही.

एके काळी कष्टात दिवस काढलेली आम्ही भावंडं आता सामाजिक अर्थाने चांगली सेटल्ड आहोत. पण माझ्या आणि माझ्या भावंडांच्याही मनात कुठेतरी जाणीव आहे, की हे दिवस कुणाच्या तरी कष्टामुळे आलेयत. आणि तेच कष्ट आपणही केले तर कुठे चांगले दिवस टिकून राहतील आणि मुलांच्या वाट्यालाही तेच सुख राहील.

हाच असावा त्या गोष्टीचा अर्थ. व्रत, पूजा, उपास ही सगळी निमित्त आहेत. वडिलधाऱ्यांकडून घेतलेला कष्टाचा वसा टाकून नाही द्यायचा, आणि अहंकाराला बाजूला ठेवायचं.

“मम्मा… मी थोडी कणिक घेऊ खेळायला?” ईशानचा किचनमधून आवाज आला.

“अरे! हा तिकडे कधी गेला” मी बेडवर बसून जो विचार करत होते त्यातून जागी झाले. आणि किचनकडे गेले. त्याने already थोडी कणिक घेऊन त्याचा हत्ती तयार करायला सुरुवात केली होती. उतू-मातू बद्दल तो विसरला होता.

जाऊ दे. काय सांगायचं त्याला. त्याच्या कानावर पडेल गोष्ट आणि कळेल अर्थ जेव्हा कळायचा!

बंद गेटच्या मागे (Band Gatechya Mage)

बंद गेटच्या मागे असलेल्या बंद बंगल्यात नेमकं झालंय काय? पहिली-पासून ह्या शाळेत येते, आता सहावी आली, कद्धीच हा बंगला उघडला नाही आणि गेटपण उघडलं नाही. कोणी म्हणतं भूतबंगला हाय, पण म्याडम म्हणती भूत-बीत काय नसतं. वर्गातल्या ‘शितली’नं कुठंतर ऐकलं होतं की “करणी” केल्या कुणीतरी मग हिथं कोण ठरतच नाही, येईल त्यात कोण ना कोण मरतं. मग आता कोण येत नाही. बंद गेटच्या मागे बसलेल्या बंद बंगल्याचं गौडबंगाल काही तिला समजत नव्हतं.

शाळेतनं घरी जाताना पाठीवरची “सॅग” सांभाळत, ‘खुशी’ त्या गेटजवळ रेंगाळे.  तिच्या उंचीपेक्षा मोठं गेट. त्यावर चढून वाळलेल्या वेली, गेटच्या कुंपणावर आडव्या-तिडव्या पसरल्या होत्या- दारू पिऊन ‘पप्पा’ पसरत्यात तसं… घरी पोचून दप्तर टाकलं की ‘आंजी’ खेळायला बोलवायची. खरं आधी आईला भांडी घासून द्यायची, मग सरांनी गणितं सोडवून आणायला सांगितली होतीत, ती काय येत नाहीत… उद्या ‘सुप्री’ची वही घेऊन पावणे-बाराच्या सुट्टीत लिहायला लागणार. सगळी कामं आटपून आई झोपायला आली की खुशी तिला बिलगून झोपायची. आणि डोळ्यासमोर तो बंद गेटच्या मागे थकलेला बंद बंगला तरळायचा.

“किती पैशे लागत असतील गं?” खुशीने आईच्या पाठमोऱ्या आकृतीला विचारलं. बुधवारच्या बाजारला आई सकाळी निघायची बुट्टी घेऊन आणि तिच्या मागं खुशी पिशव्या घेऊन. चालताना तो वाटेत लागयचाच. “चाल पटपट” आई म्हणाली. ‘अभिजित’ तिसरीत होता, तो लहान आहे म्हणून त्याला बाजारला न्यायचं नाही. काल आई-पप्पांची भांडणं झालीत मग आई सकाळी वेळानं उठली. तिची कंबर दुखत होती म्हणून मग ‘खुशी’नंच चहा केला. पप्पा चहा पिऊन कप तिथंच ठेऊन गेले – कामावर. आज आईनं अभिजीतला थोडे पैसे दिले दुपारच्या सुट्टीत खायला. “सांग की गं आई…” तिच्यामागं चालायचं म्हणजे खुशीला पळावं लागे. “किती पैशे लागत असतील एवढ्या बंगल्याला?” आईनं प्रश्नाकडं केव्हाच दुर्लक्ष केलं होतं.

बंद गेटच्या मागे फसलेला बंद बंगला मोठा होता. आत किती खोल्या असतील? न्हाणी कसली असेल? चैत्रालीच्या घरी बघितलेला तसा किचनकट्टा असेल… केवढा मोठा बंगला आहे. किती माणसं राहतील? हातात रुपया घेऊन वारकेच्या दुकानात जात असताना तिच्या डोक्यात तो बंगलाच घुमत होता. रुपया काउंटर वर टेकवून तिने क्लिनिक प्लस चा शाम्पू मागितला. दुकानदारानं १ पुडी दिली. मागं केस कापायला शिंदेबाईकडं गेली होती तेव्हा ‘निरम्या’नं केस धुतले म्हणून शिंदेबाई रागावली होती. भुरकट झालेल्या डोक्यात खसाखसा खाजवत ती घरी परतली आणि अंघोळ करताना ती हाच विचार करत होती कि बंगल्यातली न्हाणी ह्यापेक्षा ४पट मोठी असेल.

बंद गेटच्या मागे धसलेल्या बंद बंगल्याने खुशीच्या डोक्यात मोठं घर केलं होतं. त्या घरात तो बंगला आता निवांत राहू लागला होता. विज्ञानाच्या म्याडम कायतर हवेच्या वजनाबद्दल आणि पाण्याच्या शीतबिंदूबद्दल सांगू लागल्या कि तो बंगला घरात यायचा. त्या घरातल्या कोपऱ्यातल्या चुलीवरचं गरम जेवण जेवायचा, शहाबादी फरशीवर जमखाना घालून झोपायचा, अंकांच्या ओळीतला लसावि-मसावि काढताना ‘खुशी’ची फजिती बघून हसायचा.

एक दिवस खुशीनं दुपारच्या सुट्टीत सॅग पाठीला लावली. वर्गातनं हळूच बाहेर पडली, एका ठिकाणी दोन वर्गाच्या मध्ये बोळ होता त्यात घुसली. पोरी बाहेर लंगडी-पळती, चिपरी च्या खेळात गुंगल्या होत्या. सुट्टी संपल्याची घंटा झाली मग सगळ्यांचा वर्गात जायला गलका झाला. थोडा वेळ जाऊ दिला आणि सगळीकडे सामसूम झाल्यावर ती बोळातनं बाहेर पडली. आणि तर्राट गेटकडं सुटली.  शिपाईमामा नुकतेच जेवून-खाऊन गेटजवळ जात होते, ते “ए थांब, थांब” म्हणतायत तोवर ती गेटवरून पार झाली आणि रस्त्याला लागली. धापा टाकत बंद गेटजवळ आली.

बंद गेटच्या मागे रुसलेला बंद बंगला तिने खूप वेळ न्याहाळला. वेली-झुडुपात लपलेल्या कुंपणाभोवती फिरून पारखला. डोक्यात बरीचशी गणितं केली, आज सगळ्यांची उत्तरं मिळाली. मग गेटजवळ जाऊन, इकडे-तिकडे पाहून, आपलं दप्तर उडी मारून गेटच्या आत टाकलं. पाचोळ्यात ते फस्सकन पडलं. मग वेलींचा हात पकडून ती कशी-बशी वर चढली, घाणेरीच्या झुडपाने तरी हाताला थोडं ओरबाडलंच. कुंपणावर उकिडवं बसून तिने दप्तराच्या बाजूला उडी मारली. तीसुद्धा पाचोळ्यात फस्सकन पडली. उठून उभी राहत तिने भुरट्या केसातून हात फिरवला, शाळेचा फ्रॉक झाडला, “सॅग” पाठीला लावून ती दरवाज्याजवळ गेली. बंद गेटच्या मागच्या बंगला बंद होता.  मोठं ‘टाळं’ ठोकून मुका बसला होता. मग खुशीनं फेरा घालायला सुरुवात केली. तिला वाटलं होतं तसंच झालं. बंगल्याच्या एका खिडकीची काच फुटली होती. त्यातून हात घालून तिने खिडकी चाचपली. लहानशी कडी तिने लहानशा हातांनी दात खाऊन उचकटली. खिडकीला गज फॅन्सी प्रकारातले होते त्यातून खुशीचं अंग सहज आत सरकलं. खिडकीतून ती आत उतरली आणि दबक्या पावलानं घर बघू लागली. न्हाणी जवळच्या बोळातल्या खिडकीतून ती उतरली होती, त्यामुळं जवळ दिसलेलं पहिलंच दार तिनं हळूच उघडलं तर ती न्हाणीचं होती. फट्टकन एक पाल खाली पडली आणि वळवळत कोपऱ्याला गेली. न्हाणी मोठी होती. खरंच ४पट मोठी होती, कदाचित ५पट पण असेल. आरश्याचा पारा उडला होता तर तिला आपला एक डोळा आणि अर्धा गालच नीट दिसला. तिने दार झाकलं आणि वळली तर फिस्सकन एक मांजर ओरडलं, जागच्या जागी जोरात उडी मारून गुरगुरत पळालं. मांजराच्या अचानक ओरडण्यानं जरा खुशी घाबरली पण मग तिला स्वैपाकघर दिसलं.  लई मोठा किचन-कट्टा होता, गॅस पण होता. ती मग दिवाणखान्यात आली. तिने मान वर केली, उंचच उंच भिंत गेली होती. मान वर करून तिने वरच्या गोल-गोल डिझाईनबरोबर गिरक्या घेतल्या. मनातल्या मनात “गाऱ्या-गाऱ्या भिंगोऱ्या” म्हणत, गरगरायला लागेपर्यंत. ती थांबली आणि अचानक कसला तरी बारीकसा ‘खसखस’ आवाज तिच्या कानावर आला. जणू कोण हसतंय. ती सावध झाली. परत जावं पट्कन असा विचार तिच्या मनाला शिवून खिडकीच्या गजांतून बाहेर सटकला. पण ती मात्र आवाजाच्या दिशेनं चालू लागली.

हॉलमधेच पायऱ्या होत्या. कंबर वाकवून वर गेल्या होत्या. एक-एक पायरी चढल तसा आवाज पण वाढत होता. पायऱ्या संपल्या आणि एक बंद दार गपकन आडवं आलं. दाराला कान लावला तर ‘खसखस’ अजून जोरात ऐकू येऊ लागली. धडधडत्या छातीनं तिनं त्या दरवाज्याला बाहेरून लावलेली कडी आवाज न करता उघडली. आणि दरवाजा ढकलला. जसा दरवाजा करर्कन उघडला तसा वाऱ्याचा बेफ़ाम झोत तिथून सुटला आणि… आणि… आणि… एक बाईचं मुंडकं खुशीच्या पायात फट्टकन पडलं. ते बघून खुशीची बोबडी वळाली. तिच्या घशातनं आवाजही फुटला नाही. भिंतीला धरून उलट्या पावलानं मागं परतली. पायऱ्या लागताच त्यावरून ती धपाधप पळू लागली. ती घाबरली, गांगरली, मध्येच एक पायरी चुकल्यानं घरंगळली, खाली येताच दाराकडं धावली. दार बंद होतं. तिला वाटू लागलं पायऱ्यांवरून कोणीतरी चालत येतंय. ती न्हाणीजवळच्या बोळाकडं पळाली. तो खसखस आवाज अजूनही येत होता, तिला वाटू लागलं कि तो आता जवळून येऊ लागलाय. ती त्या खिडकीपाशी गेली. त्या खिडकीतून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली पण तिला जाता येईना. जणू तिचा फ्रॉक कोणी पकडून ठेवलाय. पाठीवरची सॅग तिनं बाहेर फेकली. मग तिला त्या खिडकीतून बाहेर पडता आलं. बाहेर निघाल्यावर फसफस्स पाचोळ्यात चालताना तिला वाटलं कि अजून एक तसाच आवाज येतोय. पुन्हा एकदा खरचटून घेऊन ती कशीबशी कुंपणावर चढली. तिथून खाली उडी मारताना नेमकी उडी चुकली आणि ती रस्त्यावर पडली ती बेशुद्धच.

शाळेत गणिताच्या मास्तरांनी हजेरीमध्ये लाल शेरा लावला. इतिहासाच्या सरांनी लाल शेरा लावला. चार ची सुट्टीदेखील झाली. आणि मग शाळेचा फ्रॉक बघून एक भला माणूस तिला उचलून शाळेच्या गेटवर घेऊन आला. सरांनी रिक्षा बोलावली आणि सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. इंजेक्शन देऊन डॉक्टरांनी तिला शुद्धीत आणलं तोवर आई-पप्पा येऊन बसले होते. X-ray बघत डॉक्टरनी सांगितलं, पायाला प्लॅस्टर करावं लागणार. गोळ्या-औषधांची लिस्ट लिहून पप्पांच्या हातात दिली. आईचा हात धरून पप्पांनी तिला जवळ-जवळ बाहेर ओढतच आणलं. “कितीदा सांगितलं होतं लक्ष ठेवत जा पोरीकडं. शाळेतनं पळून गेल्ती. आणि रस्त्यावर सापडली. हे घे” म्हणून आईचा हात जोरात दाबून तिच्या हातावर त्यांनी गोळ्यांचा कागद आपटला. “आन माहेरास्न पैशे!” म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरत गुटख्याची पुडी खोलली. आई पायरीवर मट्कन बसली.

इकडे रात्री गणपतीमंडळाची पोरं आलीत. बंद गेटच्या मागे हसलेल्या बंद बंगल्याच मागचं फाटक आणि मागचं दार त्यांनी किल्लिनीशी उघडलं. वर जाऊन सुरज्या खाली बघत ओरडला “पव्या लेका… हे असंच टाकून गेलायस व्हय. कसं पसरलंय. ये वर” त्यानं ते मुंडकं हातात उचललं. भिंतीला टेकवलेल्या तिच्या धडाला ते बसवलं. वाऱ्यानं थोडं अस्ताव्यस्त झालेलं सामान दोघांनी नीट लावलं. वरच्या फुटक्या खिडकीला एक बोळा लावला. दार नीट बंद केलं.

पायऱ्या उतरत सुरज्या म्हणाला, “पव्या… ह्या वेळेस देखावा स्पर्धेत आपला ‘हुंडाबळी’च पहिला येणार बघ. फक्त आयत्या वेळी पक्यानं घाण करू नये.” दोघं खाली उतरत्यात तोवर बाहेर एक-दोन गाड्या थांबल्याचा आवाज आला. बाकीची पोरं आत आलीत आणि तालीम सुरु झाली.

गोलमेज (Golmej)

 

एक माणूस त्याच्या आयुष्यात अनेक चर्चांमधून जातो. कट्ट्यावरच्या चर्चा, घरातल्या चर्चा, राजकारणाच्या चर्चा, क्रिकेटच्या गेमवर चर्चा, Interview मधले ग्रुप डिस्कशन्स, लग्नाच्या याद्या वगैरे वगैरे… कॉर्पोरेट ऑफिसमधल्या मिटींग्स, त्यानंतरची कॅन्टीनमधली गॉसिप ते बॉलीवूडच्या “ऍक्टर्स-राऊंडटेबल”पर्यंत सगळ्या चर्चा एकसारख्याच. त्या गोलमेजसारख्या गोल गोल, endless!

 

 

अशा अनेक चर्चांचं आपल्याभोवती आयुष्यभर जाळं विणलं जात असतं. नाईलाजाने का होईना आपण त्यांचा भाग असतो. माझ्यासारख्या काही जणांना ह्या चर्चांचा वीट येतो, एखाद्या गोष्टीचा कीस पाडत बसणं जीवावर येतं. काही लोकांना चर्चेत नुसतंच आपलं मत नोंदवायला आवडतं आणि माझ्यासारख्यांना त्यातून पळ काढावासा वाटतो. ह्या दोन्ही मध्ये संवाद साधण्याचा विसर कधी पडतो, लक्षात येत नाही. आणि संवाद हरवला की वेगळाच गुंता निर्माण होतो. त्याच गुंत्यातून स्वतःला सोडवून घेण्याचा मी प्रयत्न करतेय…

 

सत्र-पहिले

 

“तुम्हाला एक लहान भाऊ आहे आणि तुमची आज्जी त्याला वंशाचा दिवा समजते, पण तुम्हीही बंडखोर आहात आणि तिची खोड काढण्यासाठीच्या आयडिया शोधत असता, असा तुम्हाला अनुभव आहे? नाही? जाऊ दे, Only 90’s kids will get that! हीहीही…” गेले दोन सेशन्स काहीतरी तुटक उत्तरं देऊन झाल्यावर आज ‘शोभा’ने वेगळाच विषय काढला होता. त्यामुळे मीही एक फालतू जोक मारून दिला. तेवढंच टेन्शन “ease” करायला. पण जोक शोभाला फार आवडला नाही बहुतेक.

 

“Was that a joke Anjali?” ‘शोभा’ने माझ्याकडे थंड चेहऱ्याने पाहिलं.

 

मी सोफ्यावर थोडी पसरून बसले होते ती सरळ बसले. “ahem… सॉरी”

 

“It’s okay… जोक हा बऱ्याचदा defence mechanism असतो. मी तुला तुझ्या लहानपणाबद्दल विचारत होते. So, तुझं आणि तुझ्या आजीचं पटत नव्हतं?” शोभा जजमेंटल लुक देऊन म्हणाली. किंवा मला तसं वाटलं.

 

मला खरंतर असलं ‘counselling -बिनसेलिंग’ काही करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीए. ही तिसरी बाई कोण मला शिकवणार…

 

पण आता ‘पाणी गळ्याशी वगैरे’ म्हणतात तसं झालं होतं. मला खूप इच्छा होत असताना सुद्धा, मी निर्णय नाही घेणार आहे. कारण परत परत मला पश्चाताप नाही करत बसायचा. म्हणून मग महिन्याभरापूर्वी मी त्याला- म्हणजे माझ्या नवऱ्याला- सांगितलं, “की नाहीए आता हे शक्य होत आणि तू निर्णय घे आता.”
तर त्याने मला ह्या बाईकडे चिकटवलं. हे असले counselingचे ८-१० सेशन्स करून खरंच काय फायदा होणार आहे माहित नाही. मला तर इथं आल्याचा पण रिग्रेट वाटतोय आता. पण त्याने sort of डील केलीय, की हे सेशन्स करून जर काहीच बदललं नाही तर तो निर्णय घेईल.  माझ्यासारखाच तोही येतोय ‘शोभा’कडे, पण वेगळ्या वेळी. पैसे असे नको तिथे वाया घालवायची सवयच आहे म्हणा… जाऊ दे!

 

“So, तुझं आणि तुझ्या आजीचं पटत नव्हतं?” मी नुसतीच शून्यात बघत असलेली पाहून शोभाने पुन्हा विचारलं.

 

“अं… नाही म्हणजे तसं पटत नाही वगैरे नाही… पण ती माझ्या भावाला नेहमी favour करते. करायची I mean… आता तसा काही फार कॉन्टॅक्ट नाही… पण अगदी माझ्या जन्मापासूनच थोडासा प्रॉब्लेम आहेच. पण सध्या माझा प्रॉब्लेम तो नाहीच आहे, इन फॅक्ट तेव्हाही नव्हता… माझा प्रॉब्लेम हा आहे कि ह्या सगळ्याची चर्चा करणे.  होता प्रॉब्लेम मान्य करा आणि पुढे जा. म्हणूनच मी लहानपणीच residential school ला जायचा निर्णय घेतला होता.
घरी माझी आणि माझ्या लहान भावाची सतत भांडणं व्हायची, आणि आज्जी नेहमी त्याची बाजू घ्यायची. बाबा मलाच समजवायचे कि मी मोठी आहे, मी सांभाळून घेतलं पाहिजे. आई कधी-मध्ये एखादा धपाटा द्यायची भावाला, पण घरातल्या चर्चेचं टारगेट नेहमी मीच असायचे.” मी खांदे उडवत म्हणाले.

 

“तुझ्या जन्मापासून प्रॉब्लेम होता म्हणजे?” शोभाने तरीही पुढचा प्रश्न विचारला.

 

“म्हणजे…” मी बोलू की नको ह्यावर थोडावेळ विचार केला, पण जाऊ दे बोलून टाकू असं स्वतःशी म्हणत पुढे म्हणाले, “म्हणजे आता माझ्या बारश्याची गोष्ट बघा –”

 

“आल्या होत्या का त्या दवाखान्यात बघायला? मग कशाला आता एवढा मानपान करायचा?” चाळिशीला आलेली एक स्त्री तावातावाने बोलत होती.

 

 

“ह्या तुमच्या असल्या वागण्यामुळंच तिकडची माणसं चिडून आहेत.” तेवढ्याच तावाने पंचविशीतली एक स्त्री उलटून बोलली.

 

 

“काय चुकीचं वागलो आम्ही? काय नेसूचं फेडून द्यायचं होतं मग? चांगली शिकली-सवरली दुभती गाय दिली आहे.”

 

 

“अप्पा… तुम्ही काही बोलत का नाही? किती वेळा तेच तेच. तिकडं जाऊन मलाच तोंड द्यावं लागतं ह्या सगळ्याच्या परिणामांना” पंचविशीतल्या स्त्रीने साधारण ४५ वयाच्या पुरुषाकडे केविलवाणे पाहिलं.

 

 

“आता मी काय बोलणार? तुझ्या बाजूनं काय बोलायचं म्हणलं की  सारखं मी शेपूट घालून बसलो म्हणून ऐकायला मोकळा” ४५ वयाचे गृहस्थ हातातलं मासिक बाजूला ठेऊन म्हणाले.

 

 

“म्हणजे मलाच पापी ठरवा. सगळ्यांची ढुंगणं धुण्यातच आयुष्य गेलं आहे… आता तरी काय वेगळं करायचंय.” पुन्हा चाळिशीतली स्त्री.

 

 

आता ह्या चर्चेमध्ये चाळीशीची स्त्री म्हणजे मालती, माझी आज्जी. केविलवाणी स्त्री- माझी आई वनिता, आणि गृहस्थ माझे आजोबा. आणि ह्यांची हि तापलेली चर्चा ऐकत, दोन्ही हाताच्या मुठी वळून, दोन्ही पायांचा साधारण त्रिकोण करून, वर लावलेल्या घुंगुरवाळ्याकडे बघत पाळण्यात पडलेली मी. माझ्या आयुष्यात पुढे घडणार असलेल्या अनेक चर्चांपैकी एका चर्चेला अशारितीने सुरुवात झाली होती. मी जन्मल्यानंतर माझी आज्जी म्हणजे बाबांची आई, मला बघायला आली नव्हती. आता कारणं काहीही असोत, पण सगळ्यांनी माझं ‘मुलगी’ असणं हेच असणार, असं पक्कं केलं होतं. माझ्या आजोळी-म्हणजे आईच्या माहेरी, खूप वर्षांनी घरात लहान मूल जन्माला आल्याचा आनंद होताच, पण आता सासरकडच्यांना “दाखवायचं” म्हणून माझं बारसं खाजगी न ठेवता, कार्यक्रम करायचा ठरला होता. पण त्यामध्ये माई- मालती आज्जी-ला, माझ्या आज्जीचा मानपान – म्हणजेच आहेर करणे, एखादी वस्तू भेट देणे वगैरे, करायची अजिबात इच्छा नव्हती. घरातल्या काही लोकांचा ह्या गोष्टीला पाठिंबा होता, जसं कि माझा मामा. पण माऊ-म्हणजे माझी मावशी, ती मध्ये पडली.

 

 

“अगं आई, कशाला त्रागा करून घेतेयस? वर्षा-काकूने मागे नेसवलेली साडी देऊ आपण ओटीत.”

 

 

“हं… कल्पना, तुला काय वाटतं तेवढ्यावर भागणार ह्यांचं? आणि वर असलीच साडी दिली, तसलीच दिली म्हणून मापं काढायला बरं!”

 

 

“पण काहीच नाही दिलं तर कसं वाटेल ते सगळ्यांसमोर?” माऊने परत समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

 

 

“रिकाम्या हाती कुठं, ब्लाऊजपीस आणि नारळ देणार की ओटीत. सगळ्या बायकांना तेच करणार.”

 

 

“बघितलंस कल्पे… नको तिथं असा हात मागं घ्यायचा.” आई म्हणाली

 

 

“पण मी काय म्हणतो…” आजोबांनी मध्ये काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण ही चर्चा अशीच लांबणार हे मला कळलं, आणि सगळ्यांची तोंडं थोडावेळ तरी गप्प व्हावीत ह्या हेतूने मी बेंबीच्या देठापासून टाहो फोडला. फायनली सगळे गप्प झाले, माई माझ्याकडे आली, तिने मला उचललं. “काय झालं माझ्या राणूला? उगी उगी…” म्हणत माझं ढुंगण चेक केलं, आणि गरम पाण्यात फडकं बुडवून ते पुसायला घेतलं.

 

 

अखेर बारशाचा दिवस उजाडला.

 

 

बाबा लवकर आले आणि त्यांनी आनंदाने मला उचलून घेतलं, मग मी शुभ-शकुन म्हणून त्यांना अभिषेक घातला आणि ट्ट्यां करून भोंगा पसरला.

 

 

“अगं, बाप आहे मी तुझा… काही खाणार नाही तुला” असं म्हणत त्यांनी मला आईकडे दिलं.

 

 

“हुशार आहे पोर तुमची जावईबापू… आत्तापासूनच ओळखायला लागलीय ती आपली माणसं” माईने स्वयंपाकघरातून उगाच टोला हाणला.

 

 

“ही असली हुशारी तिच्या आईकडून आली असणार” बाबाही मागे हटणाऱ्यातले नव्हते.

 

 

“असलं काही नाही.. भूक लागली असेल म्हणून रडत असेल” आईने विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

 

 

हळू-हळू करून शेजार-पाजारच्या बायका जमू लागल्या. घरातले पुरुष एका खोलीत ऑकवर्ड होऊन बसले.

 

 

बाहेरच्या खोलीत बसून मला मांडीवर घेऊन बसलेली आई, येणाऱ्या बायकांना माझं मुख-दर्शन करवत होती, “सासू आली नाही होय गं?” ह्या हळूच विचारलेल्या प्रश्नाला “येतायत कि. येतीलच इतक्यात” अशी उत्तरं देत होती. आजूबाजूला होणाऱ्या गप्पा ऐकत होती. पण डोक्यात सतत कसला विचार करत होती. मी हात मारून तिचं मंगळसूत्र हातात पकडलं त्यामुळं तिचं  लक्ष माझ्याकडे गेलं. तिने आपल्या थकलेल्या डोळ्यांनी माझ्याकडं बघितलं, श्वासातच हसली, आणि हळूच म्हणाली, “तुला नाही बाई ह्या सगळ्यातून जाऊ देणार”

 

 

त्या सगळ्यांतून म्हणजे काय हे वयानुसार नंतर कळत गेलं, आणि तिनेदेखील आपला शब्द जपायचा पुरेपूर प्रयत्न केला., पण आता मात्र नुसतंच बोळकं पसरून मी हसले.

 

 

थोड्यावेळाने आज्जी आणि काकू आल्या, आत्यादेखील आली. आई मला पाळण्यात ठेऊन सासूबाईंच्या पाय पडायला गेली. सोपस्कार झाल्यावर आत्या कौतुकाने मला बघायला आली. ” अगं…  कसलं गोड आहे… चेहरा अगदी दादाच्या वळणावर गेलाय नई!”

 

 

माई आणि माऊ बाहेर आल्या. सगळ्यांनी खोटं-खोटं हसून एकमेकांना भेटून आनंद व्यक्त केला. शेवटी आज्जीला नवीन साडी नेसवली गेली, काकू आणि आत्यालाही आहेर करण्यात आला, जावईबापूंचा देखील यथासांग मानपान झाला. आणि इतके दिवस त्यांच्या नावाने खडे फोडणाऱ्या माईनेच पुढे होऊन हे सगळं केलं. कार्यक्रम सुरु झाला. मग पाळणा कुठला म्हणायचा, वरवंटा कापडात गुंडाळायचा कि साडीत, गोंविंद घ्या-गोपाळ घ्या म्हणताना उजवीकडून डावीकडे कि, पूवेकडून पश्चिमेकडे वरवंटा पाळण्यावरून कसा फिरवायचा, अशा अनेक चर्चा झाल्या. मला एकच भीती होती कि तो वरवंटा बहुतेक माझ्या डोक्यात पडणार, पण कुणाचं त्यावर दुमत न होता मला पाळण्या-बाहेर ठेवून रिकाम्या पाळण्यात हा प्रकार केला हे माझं नशीब.  शेवटी आत्त्याने कानात कुर्र्रर्र करून नाव ठेवलं – अंजली!

 

 

माझ्या नावाबद्दल अजून थोडी चर्चा केली असती तर चाललं असतं!”

 

“Anjali is not a bad name!” इतकं सगळं ऐकून शोभा तितक्याच थंड चेहऱ्याने म्हणाली. 

 

“तुम्ही ते गाणं ऐकलं असेलच ‘अंजली अंजली अंजली… प्यारी अंजली अंजली अंजली…  गल्लीतल्या पोरांचा मला चिडवण्याचा तो सोर्स होता”

 

“माझ्या एका मैत्रिणीचं नाव ‘फॅनीव्हेनेला निमगड्डा’ आहे” शोभा म्हणाली.

 

“व्हॉट! हाहाहाहा” मी फारच हसले. आता परत हि म्हणेल ‘defence mechanism’!

 

“पण तुला हे सगळं कसं आठवतं? म्हणजे पाळण्यातलं वगैरे?” शोभाने विचारलं

 

“छे, आठवत नाही… पण मी आजोळी गेल्यानंतर ह्या किस्स्याची पारायणं ऐकलेली आहेत. आणि बघा ना… माझ्या आज्जीने, घरातल्यांनी इतकी चर्चा केली आणि पुढे काय झालं, शेवटी त्यांचीच सरबराई केली ना…”

 

शोभाने मधेच मला तोडत विचारलं, “म्हणजे, तुझ्या आजोळच्या लोकांनी असं सांगितलं की ‘तू मुलगी आहेस म्हणून’, आज्जी बघायला आली नाही… तू विचारलंस कधी आज्जीला?”

 

“Umm..” एकदम कोणीतरी चपराक मारल्यासारखी मी बंद पडले.

 

मी काही बोलत नाही हे बघून शोभाने परत प्रश्न केला, “And when you went to the Boarding school, do you think it solved the problem between you and her?”

 

“I don’t know. Interaction कमी झाल्यामुळे नक्कीच थोडाफार कमी झाला, पण मी माझ्यासमोर प्रॉब्लेम वाढवून ठेवला होता.”

 

“म्हणजे?”

 

“जितक्या उत्साहाने मी बोर्डिंग शाळेत गेले तो सगळा उत्साह दुसऱ्या दिवशीच मावळला.”

 

“का?”

 

“तिथे स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतात!” मी पुन्हा एक फालतू जोक मारला. ‘Tension ease!!’

 

“हाहा…” शोभा थोडकं हसली.

 

(Phew!) पण ती पुढे काही बोलणार इतक्यात मी घाईने बोलले, “वेळ संपली वाटतं… ६.१५ झाले.” 

 

“Ok…” एवढंच म्हणून शोभाने वही बंद केली.

 


मी उठून खोलीबाहेर आले. नेक्स्ट appointment आता पुढच्या शनिवारी. परत इथे. थंड चेहऱ्याच्या शोभासमोर!

 

सत्र-दुसरे

 

“रिक्षावाल्यांच्या संप आहे कि काय?” फोन सोफ्यावर टाकून आणि माझ्या अन-मॅनेजेबल केसांत अडकलेला कंगवा काढायचा प्रयत्न करत मी म्हणाले.

 

“कॅब पण नाही मिळत आहे का?” त्याने पुस्तकातून डोकं काढून विचारलं.

 

“मला कॅबमधे मळमळ होते.”

 

“कार घेऊन जा मग.” त्याने चष्मा नीट करून पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. एवढं काय वाचत असतो काय माहित!

 

“अं… नको”

 

“का? भरलंय मी पेट्रोल, आणि हवा पण परवाच चेक केलीय”

 

“नाही… नको!”

 

“काय झालंय? Oh! ही माझी कार आहे, मी emi भरून घेतलीय तर आता तू ती चालवायची नाहीस असं काहीतरी ठरवलं आहेस का?” त्याने चष्म्यातून माझ्याकडे बघत विचारलं.

 

“कशाला वाकड्यात शिरतोयस? मी म्हणाले का तसं तुला?”

 

“सॉरी…! घेऊन जा… १५ दिवसांपूर्वीच सर्व्हिसिंग केलंय.”

 

“मला नाही जायचं तुझ्या त्या मूर्ख बाईकडे” मी थोडीशी वैतागून म्हणाले.

 

“अंजली… किती वेळा आपण ह्यावर बोलणार आहोत. ह्यातून काहीतरी बरोबर मार्ग सापडेल म्हणून करतोय ना आपण हे…”

 

ह्यावर मी काहीच बोलले नाही. तो उठून Key-holder जवळ गेला आणि गाडीची किल्ली आणून माझ्या समोर कॉफी-टेबल वर ठेवली. आणि परत आपल्या ठिकाणी जाऊन पुस्तक हातात घेतलं. काही सेकंद दोघांपैकी कोणीच बोललं नाही.

 

“मला आजकाल जरा anxious होतंय कार चालवताना.” मी तोंडातल्या तोंडात बोलले. काही सेकंद पुन्हा कोणी काही बोललं नाही.

 

तो उठला, “मी सोडतो. माझी अपॉइंटमेंट शिफ्ट करून घेता येतेय का बघतो.”

 

त्याने आत जाऊन आवरलं आणि शोभाकडे पोहचेपर्यंत दोघांनीही तोंडातून एक शब्द नाही काढला. हे असंच होतं निर्णय चुकतात तेव्हा…

 

“हे असंच होतं, निर्णय चुकतात तेव्हा.” मी गेल्या गेल्या लगेच हा इन्सिडन्स शोभाला सांगून मोकळी झाले (अर्थात,तिला मूर्ख म्हणल्याचं मी वगळलं). “आता कार, emi वगैरे काढायची काही गरज होती का?”

 

“बरोबर आहे. नको काढायला पाहिजे होता तो विषय. पण लगेच निर्णय चुकतात असं होत नाही. बऱ्याचदा आपण काही गोष्टी बघत नाही, म्हणून तसं वाटत.” शोभाने डोस दिला.

 

हे असलं ज्ञान आम्हीही पाजळत असतो, आमच्या एम्प्लॉईज समोर. कुणाला इन्क्रिमेंट मध्ये प्रॉब्लेम असतो, कुणाला प्रमोशन हवं असतं, कुणाचं कुणाच्या बॉसशी पटत नाही… ह्यावर एकच ठोकून द्यायचं, Look at bigger picture. HR च्या नावाने उगाच शिव्या नाहीत घालत लोक, आत्ता मला कळतंय हे. आणि तरीही मी देखील एखाद्या एम्प्लॉयी सारखं पुढे बरळले, “पण कधी कधी असं वाटतं की माझ्याकडे चान्स होता आणि मी तो ब्लो केला.”

 

“म्हणजे?”

 

मी MBA करत असताना घरी लग्नाचं टुमणं सुरु झालं होतं. दरवेळेस माझी बाजू घेणारी आई पण बाकीच्यांमध्ये सामील झाली होती.

 

 

“अनू, किती चांगली स्थळं येतायत. उगाच नाही म्हणून काय सांगायचं? आपल्याला विचारणारी लोकं भरपूर आहेत माहितीय ना. आणि सगळं बाजूला ठेवलं तरी तुझं वय होत चाललंय.” कोथिंबीर निवडता निवडता आई म्हणाली.

 

 

“अगं आई, वयाचा काय प्रश्न आहे? माझ्या पेक्षा मोठ्या मुलींची पण लग्नं व्हायची आहेत अजून.” मी कांदा कापून देत होते.

 

 

“दुसऱ्यांशी आता तुलना केलेली चालते तुला? इथं गावातल्या तुझ्या वयाच्या मुलींना पोरं झालीत.” बेसनाचं पीठ कालवता-कालवता मधेच थांबून आई हात हलवत म्हणाली.

 

 

“आई जाऊ दे ना नको चर्चा. बघू आपण. कधी करायचा कार्यक्रम? मी आता सुट्टी घेतलीच आहे तर बघा ह्या वेळेत जमतंय का?”

 

 

“एवढं जुलमाचा राम-राम करायची काही गरज नाही.” आईने कढईत चरचरित भजी सोडली. एका पातेल्यात कोथिंबीर आणि दुसऱ्यात कांदा मिसळला होता. मला आवडतात म्हणून कोथिंबिरीच्या वड्या आणि ‘इन्या’ला म्हणजे माझा भाऊ ‘इंद्रजित’ला आवडतात म्हणून कांदाभजी. मला स्वतःच्या नावापेक्षा त्याच्या नावाबद्दल जास्त embarrassment वाटते. असो.

 

 

“दोन्ही बाजूने काय बोलतेस?” मी वैतागून विचारलं.

 

 

“काय गं वनिता काय झालं?” आज्जी आलीच आतमध्ये. आता पुन्हा चर्चेला तोंड फुटणार.

 

 

“काही नाही… होतायत भजी आणि वड्या.” आईने सावरून घेतलं.

 

 

“अगं, अगं… कोथिंबिरीचं पीठ किती पातळ केलंस? आता खुसखुशीत व्हायच्या नाहीत वड्या… सोडा घातलास का?”

 

 

उसासा सोडून आई म्हणाली, “हो”

 

 

“चिमूटभरच घालायचा होता, नाहीतर घातला असशील चमचा घेऊन” भांड्यात बघत आज्जी म्हणाली. मग तिने माझ्याकडे मोर्चा वळवला, “नुसतं बसून कसं व्हायचं, शिकून घ्यायचं. लवकरच करावं लागणार सगळं. उद्या नवऱ्याने मागितली कांदाभजी तर येईल का करता?”

 

 

“त्याला करायला येत असेल तरच मी लग्न करेन. आधी विचारूनच घेऊ आपण”

 

 

“हं, असलं उलटं बोलण्यात तर तू पटाईतच… सासूला छळू नकोस अशी म्हणजे झालं!” आज्जी आता डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत म्हणाली.

 

 

“कोणीतरी सासूला छळणारं पाहिजे की… सूनांनी किती दिवस सहन करायचं?” मीही टोला हाणला. ही character trait बहुतेक माई कडून आलीय.

 

 

“हे असलं उलटून बोलणं आमच्यावेळी नव्हतं बाई… डोळे वर करून बघितलं तरी मार बसायचा. म्हणूनच सांगितलं होतं, पोरगीला बाहेर ठेऊ नका.  घरात राहिली असती तर चार चांगले संस्कार झाले असते. वृंदाच्या पोरी बघ कशा ऑल-राऊंडर आहेत. थोरली अमृता तरी असला स्वैपाक मस्त करते, तुझ्यापेक्षा लहान आहे ती . मागे गेले होते तेव्हा असलं मस्त भरलं वांगं केलं होतं. ‘वनिता’ला सुद्धा जमत नाही. वनिताकडून मीठ एकतर जास्त होतं नाहीतर मसाला इतका बरबटून टाकायचा की… पण वृंदाच्या पोरी घरी राहून आईच्या हाताखाली शिकल्या. इथे आईनंच जबाबदारी झटकली म्हणल्यावर आम्ही काय बोलणार. बापाला पण लेकीच्या हुशारीचं कौतुक. आता डोक्यावर मिरे वाटतेय ते बघा.”

 

 

“अहो आई! लग्नाची झाली ती आता. हॉस्टेलचा विषय होऊन १५ वर्षं झाली असतील” आई न राहवून म्हणाली.

 

 

“हो बाई… मला काय करायचं… माय-लेकी गोंधळ घाला… ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं! मला काय कळतंय म्हणा… माझं झालं जुनेरं… कोण कशाला विचारतंय मला…”

 

 

“आता कुठला विषय कुठे घेऊन जातेयस आज्जी?” मी डोक्याला हात लावून म्हणाले.

 

 

“काय दिदीला दाखवले का फोटो?” ‘इन्या’ आत येत म्हणाला.

 

 

“अगं बाई राहिलंच ते… विजूचा फोन आण रे इंद्रू” आज्जी हरखून म्हणाली. तिचा अचानक मूड बदलला.

 

 

“कसले फोटो?” मी आईकडे बघत विचारलं.

 

 

आईने माझ्यासमोर कोथिंबिरीच्या वड्यांची प्लेट ठेवली. “स्थळ पाठवलंय. माईने चौकशी केलीय. काल बायोडेटा आणि फोटो पाठवलेयत बाबांच्या मोबाईलवर.”

 

 

“बापरे! असा बायोडेटा वगैरे बघून वगैरे लग्न करायचंय का?” मी तावाने उठले. बाहेरच्या खोलीत बाबा बसले होते. “हा काय प्रकार आहे बाबा… कुठल्या जमान्यात राहतोय आपण?”

 

 

“काय झालं?” बाबांनी एकदम धक्का बसल्यासारखं पाहून विचारलं. पण मी पुढचं बोलायला थांबलेच नाही. सरळ गच्चीवर गेले. मी मला बॉयफ्रेंड असल्याचं घरी सांगितलं नव्हतं.

 

 

आदित्य मेसेजवर मेसेजेस करत होता. त्याला काळजी लागली होती कि मी सांगितल्यानंतर घरचे काय रिऍक्ट करतील. कास्ट वेगळी होती, त्यामुळं रीतसरपणे घरी स्थळ पाठवून काहीतरी जुगाड करता येणार नव्हतं, जसा ‘पल्ली’ने (माझी गल्लीतली मैत्रीण) केला होता. काय माहित.. थोडं अजून डोकं लढवलं असतं तर काही झालं पण असतं कदाचित.

 

 

पण माझ्याच मनात शंका होत्या. कोणी जवळ नाही हे बघून मी त्याला कॉल लावला.

 

 

“अगं काय मेसेज वर रिप्लाय तरी करत जा… काय झालं? काय म्हणाले?” आदित्यने विचारलं.

 

 

“काही नाही… मी सांगितलं नाहीए अजून.”

 

 

“का? ठरलं होतं ना आपलं की तू ह्यावेळेस सांगशील… काय प्रॉब्लेम होतोय?”

 

 

“काय प्रॉब्लेम होतोय म्हणजे काय? तुझ्या घरच्यांसारखं सोपं नाहीए. घरातला लाडका एकुलता एक आहेस तू. तू जे म्हणशील, तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत तुझ्या हातात मिळालं आहे. माझ्यासारखं सतत वाद-चर्चा कराव्या नाही लागत तुला”

 

 

“मला पण बरंच समजवावं लागलंय माझ्या आई-बाबांना”

 

 

“एवढं समजवावं लागलं असेल तर कशाला करायचं मग त्यांच्या मनाविरुद्ध? राहू दे अरे!”

 

 

“मी काय बोलतोय अंजली, तू कुठे विषय घेऊन जातेयस? मी तुला सांगतोय कि ऐकतील तुझ्या पण घरचे.. पण सांगावं लागेल. तुला माहितीय मी किती प्लॅन करतोय. आपण इकडे घर पण घेणार आहोत…”

 

 

“सगळे प्लॅन्स तूच कर आदित्य! माझी होती ती नोकरी सोडून MBA कर… का कारण शहरात एकत्र राहता येईल. घाईनं स्वतःच्या घरच्यांना सांगितलंस… मी रेडी नसताना…”

 

 

“तू रेडी नसताना म्हणजे? तू.. तू भेटलीयस माझ्या घरच्यांना.. माझी गर्लफ्रेंड म्हणून… ते पण मी जबरदस्ती घेऊन आलो होतो का तुला? काय बोलतेयस तू हे आता?”

 

 

“हो नव्हते मी ready. तुला बरं वाटावं म्हणून आले होते मी. “

 

 

“काय? का असलं बोलतेयस तू? तुला काहीच वाटत नव्हतं जेव्हा तू माझ्या घरच्यांना भेटलीस? मी.. मी तुला विचारलं होतं.. तुला खरंच यायचं आहे का म्हणून… कारण मला खूप इच्छा होती त्यांनी तुला भेटावं.. आईची इच्छा होती इन फॅक्ट! असं बोलू नकोस आता”

 

 

मी गप्प बसले.

 

 

“अंजली… मी एकट्याने नाही प्लॅन केलंय हे सगळं. आपण दोघांनी केलंय ना… मग आता काय झालंय तुला? हे बघ… आता सांगितलंस तर अजून थोडा वेळ घेतील ते समजून घ्यायला… आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी होतील… आपण हे पुढं ढकलत राहिलो तर…” तो पुन्हा तेच सांगू लागला

 

 

“मला खाली जायचंय आदित्य. मी नाही सांगू शकत आत्ता. मला थोडा वेळ लागेल.” मी फोन ठेवला.

 

 

आदित्यशी सारखीच भांडणं होत होती. आधी Long-distance होतो, तर त्यावरून खटके. नंतर मी MBA साठी शिकायला गेले म्हणून एका शहरात आलो, तर थोडे दिवस चांगलं चाललं, पण ह्याचं लग्नाचं टुमणं सुरु झालं. मला नव्हतं लग्न करायचं एवढ्या लवकर. अजून नोकरी करायची होती. थोडं इंडिपेन्डन्ट जगायचं होतं. किंवा माहित नाही मला काय करायचं होतं. रिलेशनशिप मध्ये असून सुद्धा एकटं वाटू लागलं होतं.

 

 

आई हाक मारतच होती. मी खाली आले तोवर ताटं मांडलीच होती. कोथिंबीर वड्या तयार झाल्या होत्या. पुरणपोळ्या पण तयार झाल्या होत्या. आज्जीने तिची खास येळवणीची आमटी केली होती. तिचा कधी कधी मूड झाला कि करायची. पुण्याला गेल्यापासून खूप वर्षं झाली खाल्ली नव्हती. सगळे एकत्र जेवायला बसलो होतो.

 

 

बाबांनी डोक्यावर थोपटून विचारलं, “वनिता म्हणाली मला.. तू तयार आहेस म्हणून… नक्की ना? कि कुणी आहे मनात… असलं तर सांगून टाक!”

 

 

“होय… आपल्या जातीतला किंवा अगदी पोटजातीतला देखील चालेल की… शेवटी संसार दोघांना करायचा” आज्जी म्हणाली.

 

 

मी पाण्याचा घोट घेतला आणि सांगितलं, “नाहीए तसं कोणी.”

 

 

सगळ्यांच्याच चेहऱ्यावर मला आनंद दिसत होता. जेवण झाल्यावर सगळे काचा-कवड्यांचा खेळ मांडून बसले. आईने खुशीत माईला फोन केला. माईने सुचवलेल्या स्थळांपैकी ‘समीर बेळगावे’ सगळयांनाच पसंद पडला होता. माझाच होकार बाकी होता. एकदा त्याच्याशी स्वतंत्रपणे भेटते असं सांगून मी विषय थांबावला.

 

 

पुण्याला आल्यानंतर मी आदित्यला आमच्या नेहमीच्या गार्डन मध्ये बोलावलं.

 

 

“नाही होणार माझ्याकडून हे आदित्य.”

 

 

“काय?”

 

 

“नाही सांगितलं मी घरी. आणि, कारण हे नाहीए- कि मला घरच्यांची भीती वाटतेय.. मला गरज नाही वाटत आहे, त्यांना सगळ्या वाद-विवाद आणि त्रासातून नेण्याची. Especially माझ्या आईला. कारण… कारण… मला नाही वाटत, मला तुझ्याशी जुळवून घेणं जमेल. ना हि तुझ्या घरच्यांशी. आत्ताच जाणवतं कि त्यांच्या खूप अपेक्षा आहेत त्यांच्या सुनेकडून.” मी खाली बघूनच बोलत होते.

 

 

“काय म्हणाले ते? माझी आई काही बोलली का तुला?” त्याने शांतपणे विचारलं.

 

 

“नाही… पण मला जाणवतं, ज्या प्रकारे त्या तुला घेऊन possessive आहेत.”

 

 

ह्यावर तो काहीच बोलला नाही.

 

 

“हे बघ असं सगळं निगेटिव्ह वाटत असताना काय अर्थ आहे हे रिलेशन ठेवण्यात? आणि.. आणि..” मला शब्द सापडत नव्हते, “मला एक स्थळ आलंय. चांगला आहे तो मुलगा… घरी आवडलाय सगळ्यांना.” मी डोकं दोन्ही हातात धरून पायाच्या बोटांकडे बघून बोलत होते.

 

 

त्याने माझे हात बाजूला केले. माझे गाल त्याच्या दोन्ही हातात धरले. मला वाटलं कि तो एकदम निर्विकारपणे माझ्याकडे बघतोय.

 

 

त्याच्या तोंडून एवढंच बाहेर पडलं, “ठीक आहे.” त्याने माझा चेहरा जवळ ओढून kiss केलं, आणि तो तिथून उठून मागेही वळून न बघता निघून गेला. मला वाटत होतं कि त्या रात्री त्याचा फोन येईल. पण नाही आला.

 

 

मी दुसऱ्या दिवशी सकाळीच आईला फोन लावला आणि सांगितलं, “मी तयार आहे. त्याला भेटायची काही गरज नाही. तुम्ही घरचेच भेटायचा कार्यक्रम ठरवा.”

 

 

अशाप्रकारे माझी ‘समीर’शी एंगेजमेंट ठरली… पण…”

 

“अंजली…” शोभाने मला थांबवलं. “आपली वेळ संपतेय… पण मला एक प्रश्न विचारायचा आहे… So, you said की तुला आईला दुखवायचं नव्हतं, आणि आदित्यच्या आईशी तुला issues होते, but were you not in love with him anymore?”

 

“I didn’t know at that time…” मी तिला सांगितलं. वेळ संपली होती त्यामुळे बाहेर निघाले. तो निघून गेला होता, मला मेसेज आला होता, ‘Couldn’t get my appointment rescheduled, please come by auto.’

 

मी घरी जाण्यासाठी रिक्षात बसले पण रिक्षा त्या गार्डनकडे घेऊन गेले.

 

ब्रेकअपच्या सगळ्या आठवणी परत येत होत्या. स्वतःचाच राग येत होता. का असं करते मी? त्या दिवशी मी त्याला खूप दुखावलं होतं. त्याच्या घरच्यांना फक्त एकदाच भेटून मी त्यांच्याबद्दल मतं बनवली होती. मला शोभाचा प्रश्न आठवत होता. खरंच, मला घरच्यांना त्रास नव्हता द्यायचा की माझ्याच मनात नव्हतं आदित्यशी लग्न करायचं?

 

गार्डनमध्ये चालता चालता, मला ते आमचं झाड दिसलं. अचानक आठवलं, काही वर्षांपूर्वी कसे आम्ही कसे त्या झाडाचा आडोसा घेऊन फास्ट kiss करायचो! Heh! शी! फारच बावळट होतो. मी आणि आदित्य इथे खूप गप्पा मारायचो, भांडायचो, चिझी स्वप्नं रंगवायचो. लहान होतो.

 

सूर्य मावळतीला आला होता. खरंतर मावळतीला मन थोडं हळवं होतंच, म्हणून की काय पण त्या पार्कमध्ये आदित्यला बोलवावंसं वाटल. त्याला ते सगळं सांगावसं वाटलं.
त्या झाडाचा मी फोटो घेतला आणि आदित्यला पाठवण्यासाठी WhatsApp उघडलं. पण अचानक काहीतरी वाटून  attach केलेला फोटो delete केला. आणि मेसेज टाईप करून सेंड केला,
“I have left from Shobha, will reach home in an hour.”

 

सत्र-तिसरे

 

“ए टवळे… बाहेर ये… ऐश्वर्या राय पण इतका वेळ घेत नाही अंघोळीला… ” मीनल-“दिदी”ने बाथरूमचा दरवाजा जोरजोरात खटखटावला.

तिला एक काय प्रॉब्लेम होता माझ्याशी काय कळलं नाही. पण उगीच कुजकटपणे वागायची. मी सातवीला आणि ती नववीला. आमच्या हॉस्टेलमध्ये एकाच डॉर्ममध्ये आम्ही राहायचो. शाळेची होस्टेल्स फॅन्सी नसतात… एक मोठा हॉल त्यातच कप्पे पाडलेल्या रूम्स. लाकडाच्या मोठ्या फळ्याने सेपरेट केलेल्या. माझ्या पलीकडच्या कप्प्यात ती राहायची. चिनू – माझी रूममेट, नमू- माझी बंकबेड-मेट, आणि मी आम्हाला तिघींना हसायला फार आवडायचं. चिनू फालतू जोक्स करायची आणि मग आम्ही खिदळायचो. तर अर्थात मीनल’दिदी’ ला त्रास व्हायचा. आमच्या कप्प्यात येऊन तणतण करून जायची.  कधी वॉर्डनबाईंकडे तक्रार करायची. पण चिनूचं किंवा नमूचं नाव न सांगता नेहमी माझं नाव सांगायची.

आम्ही ज्युनिअर मुली तशा लवकर झोपायचो. सिनिअर्स अभ्यासाच्या नावाखाली कुजबुजत असायच्या. एके रात्री मात्र त्यांच्या गप्पा मला कानावर आल्या. म्हणजे मीच कान देऊन त्या ऐकल्या.

“दिल चाहता है मध्ये ‘प्रीती’ कसली छान दिसते… मला पण गालावर खळी पाहिजे होती” नेत्रादिदी म्हणाली.

“पण मला तर ती नवीन ‘दिया मिर्झा’ जास्त आवडते… RHTDM बघितलास? आर. माधवन पण आवडतो मला… असं पाहिजे कोणीतरी… खऱ्या आयुष्यात पण!” मीनल स्वप्न बघत असल्यासारखी म्हणाली.

(Yuck! मी मनात)

“आदित्यचं काय झालं… ” नेत्रादिदीने अचानक एक नाव घेतलं तसे मी कान टवकारले.

“आदि… अगं फारच भाव खातो तो… काल annual function साठी बोलायला गेले तर बघत पण नव्हता माझ्याकडं.”

“अगं लाजत असेल तुला बघून… तो तसा फार बोलतच नाही कुणाशी.” नेत्रा उगाच मीनलला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होती.

“हम्म… पण तुझं चांगलं चालू आहे स्वप्नील बरोबर…” मीनल चिडवण्याच्या स्वरात म्हणाली, “म्हणजे तुमचं मागच्या ऑफ-पिरियडला ‘कहींपे निगाहें, कहींपे निशाना’ चालू होतं ते सगळ्यांना कळलं बरं का!” 

नेत्राने मीनलला ‘श्श्श!’ केलं आणि दोघी खिदळत झोपल्या.

“शी! कसल्या मूर्ख आहेत ह्या…”मी मनाशी विचार केला, “सारखं आपलं मुलांबद्दल बोलत असतात… काही होणार नाही ह्यांचं! मी कद्धीच अशी होणार नाही!” असा मी निश्चय केला.

दुसऱ्या दिवशी रात्री जेवण करून आल्यानंतर, मी आणि चिनू काहीतरी नॉन्सेन्स गप्पा मारत कॉरिडॉर मधून चाल्लो होतो, जसजसा मीनलचा कप्पा जवळ आला तसा मी विषय बदलला आणि दुपारच्या ‘व्हॉलीबॉल’ च्या match चा विषय काढला. आणि तिच्या जवळून जाताना मुद्दाम “आदित्यने कसला मस्त उचलला बॉल! खूपच भारी खेळतो ‘आदित्य’!” असं जोरजोराने म्हणलं. मला अपेक्षित होतं तेच झालं.

“ए टवळे! थांब!” मीनलने  मला थांबवलं, “आदित्य कोणाला म्हणतेस गं? काय पाव्हणा आहे काय तुझा? दादा म्हणायचं!”

“पण मी कशाला दादा म्हणू? त्याने मला सांगितलंय दादा म्हणून नकोस म्हणून!” मी साळसूदपणाचा आव आणला होता.

“काय!!??” मीनलचे डोळे विस्फारले. “तो तुझ्याशी बोलला? कधी बोलला? आणि तुला सांगितलं असं? तू कधी गेली होतीस त्याच्याकडे बोलायला. निर्लज्जच आहेस कि?”

तिच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या, पण मी दीडशहाणपणा केला, आणि माझ्या दप्तरातून एक कागद काढून आणून तो तिच्यासमोर नाचवला.

“ही चिट्ठी त्याने दिली मला आज सकाळी.” त्या चिट्ठीवर ‘मला तू आवडतेस’ असं एक वाक्य कागदावर रखडलं होतं आणि खाली ‘आदित्य कारखानीस’ असं पूर्ण नाव पण लिहलं होतं. शेजारी उभी असलेली चिनू डोळे फाडून बघत होती.

मीनलने तो कागद माझ्या हातातून हिसकावून घेतला आणि “थांब तुला दाखवते” असं म्हणून तरातरा चालत सुटली. चिनू डोक्याला हात लावून बसली होती पण मला मीनलला डिवचल्याचा आनंद होत होता.

मीनलची जिरवल्याच्या आनंदात मी दुसऱ्या दिवशी माझा बॉबकट छान विंचरून त्यावर मस्त बेल्ट लावून, पिनाफोर च्या प्लिट्स सारख्या करून, खुशीत रेडी होऊन डॉर्मच्या बाहेर निघाले तेवढ्यात, समोर मेट्रन-बाई आल्या आणि त्यांनी माझा कान पिळला. मला आमच्या टीचर्सच्या रूम मध्ये नेण्यात आलं. काहीच मिनिटात आदित्य पण आला. आम्ही दोघे दाराजवळ थांबलो. माझ्या क्लास-टीचर ‘शिंत्रे मॅडम’ आल्या

“काय थेरं चालवलीयत ही  ‘कारखानीस’?” असं त्या ओरडल्या. “नावाजलेला गुरु… अरे तुझं उदाहरण देतो आम्ही खालच्या वर्गांना… आणि तू हे असले प्रकार..”

“काय झालं मॅडम… मला कळत नाहीए तुम्ही कशाबद्दल बोलताय…” आदित्यने प्रश्न केला.

“ह्या कसल्या चिठ्ठया पाठवतोस लहान मुलींना? लाज नाही वाटत?”

आदित्य दचकला, त्याने कागदाकडे निरखून पाहिलं आणि माझ्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. “मी नाही लिहलं हे मॅडम, हे माझं अक्षर नाहीए.”

“खोटं बोलतोस?” मॅडम अजूनच रागावल्या.

“अहो मॅडम मी खरं सांगतोय… कोणीतरी मुद्दाम केलंय..”

तो कबुल करत नाही म्हणल्यावर मॅडमनी त्याच्या कानशिलात वाजवली.  हे दृश्य बघून मी घाबरले आणि सरळ रडायला लागले.

“मॅडम… त्याची काही चूक नाहीए. मी… मी मुद्दाम… मीनलदीदीला चिडवायला म्हणून… म्हणून मी खोटी खोटी चिट्ठी ब-बनवली… सॉरी मॅडम…”

मॅडमनी मग माझ्याकडे मोर्चा वळवला. पण आदित्यला मारून त्यांचा हात बहुतेक दुखला असावा म्हणून, “तोंड वर करून सांगतेस हे सगळं? थांब तुला छडीने मार दिल्याशिवाय तुला समजणार नाही.” असं म्हणत मॅडम छडी आणायला वळल्या.

सगळे टीचर्स हा तमाशा आपापल्या खुर्चीवरून बघत होते

“काय ह्या आजकालच्या पोरी… भीती म्हणून नाही कशाची… आमच्यावेळी नव्हतं बाई असं…”असं म्हणत त्या आपल्या खुर्चीकडे गेल्या.

“तुमच्या वेळी कबुतरं पाठवायचा काय ओ मग शिंत्रे मॅडम” नाळे बाईंनी डोळे मिचकावत विचारलं.

“म्हणजे?”

“एकाच कॉलेजला होता ना तुम्ही आणि सर… ऐकलंय आम्ही” नाळे बाई चिडवण्याच्या सुरात म्हणाल्या.

“अहो कसलं काय?” शिंत्रे मॅडम थोड्याश्या खुलल्या, “नुसत्या चिठ्ठया चपाट्यांनी लग्नं होतात होय… ह्यांची काय हिंमत होती का अप्पांसमोर बोलायची. गपचूप स्थळ पाठवलं होतं घरी…”

“हं… भारीच छुप्या रुस्तम निघाला की तुम्ही” मराठीच्या मेंगाणे बाई बोलल्या.

“अहो, घरी बघायला आले तेव्हा पण काही बोलले नाहीत हे.”

“तुमच्या मातोश्री कुणाला बोलायची संधी देतात का कधी?” शिंत्रे सर उगाच रजिस्टर चाळत म्हणाले.

“हो… तुमच्या जणू काय सती अनसूयाच!” शिंत्रे मॅडम सरांवर डाफरल्या.

“जाऊ द्या हो मॅडम… काय घरोघरी मातीच्या चुली…” देसाई सर उगाच कायपण बोलले.

“पण तुमचं तर तेव्हा तरुणपणी जुळलं ओ… ते एक समजू शकतो! पण आपल्या राजा-राणींचं कसं काय जुळलं?” नाळे मॅडमनी अजून काहीतरी उकरून काढलं.

“कोण?”

“आपल्या ‘कळमकर’ बाई आणि माननीय प्रिन्सिपॉल सरांचं ओ… मागं २-३ वर्षांपूर्वी झालं नव्हे त्यांचं लग्न?” नाळे-बाई खुसफुसत बोलल्या. पण त्यांचं खुसफूसणंही इतकं मोठं होतं की स्टाफरूममधले सगळेच हसले. प्रिन्सिपॉल आणि कळमकर बाईंची कॅबिन वेगळीकडे होती.

शिंत्रे बाई त्यावर म्हणाल्या, “नाहीतर काय, आता ह्या वयात काय स्थळ सांगून, कुंडल्या बघून लग्नं होतात की काय?”

ह्यावर नाळे बाई फिदीफिदी हसल्या.

“आणि लगेच मागच्या वर्षी ते M.Phil करून Vice प्रिंसिपल साठीचा नंबर पण लावून घेतला. हे असले नियम आम्हाला सांगितले असते तर आम्हाला काय अवघड होतं का करायला.” देसाई सर सगळ्यांकडे दाद मागत म्हणाले.

“हो… मी मॅथ्स मध्ये M. Ed केलेलं आहे. आणि सिनियॉरिटी वगैरे काही प्रकार ठेवला नाही का? बरोबर नियम बदलले तेव्हा ह्यांची सगळी तयारी होती.” माने सरांनी खंत व्यक्त केली.

“नाहीतर काय? म्हणजे ह्यांनी पोळ्या भाजून घेतल्याचं वर तूपही ओढून घेतलं” मराठीच्या मेंगाणे बाई म्हणाल्या.

“त्यांची पोरं आहेत ना आधीच्या लग्नाची?” पाटील सरांनी विचारलं.

“माहेरी असतात त्यांच्या. त्यांचं माहेर म्हणजे आमचंच गाव. चांगलं नाव होतं त्यांच्या वडिलांचं.” शिंदे सर म्हणाले.

“सासर सोडून आल्या होत्या म्हणे…” नाळे बाई.

आमच्या शिक्षकांचं काहीतरी वेगळंच सुरु झालं होतो. मी आणि आदित्य ऑकवर्डली उभे होतो आणि टीचर्सकडे बघत होतो. रडल्यामुळे नाकातून आलेलं पाणी मी माझ्या शाळेच्या फ्रॉकच्या बाहीला पुसलं. नेमकं ते आदित्यने बघितलं. आधीच भेकडासारखं रडून आणि आता हे करून  त्याच्यासमोर मी माझा पार पचका करून घेतला होता.

तिकडे शिक्षकांच्या गोलमेज परिषदेत गप्पा रंगल्या होत्या…. अचानक शिंत्रे बाईंना लक्षात आलं कि आम्ही दोघे तिथेच उभे आहोत. त्या एकदम बावरल्यासारख्या झाल्या.

“ए निघा इथून… निर्लाज्जासारखे उभे आहेत.” असं जोरात ओरडून त्यांनी हकललं.

 

माझ्या छोट्या आणि त्यानंतरच्या मोठ्या आयुष्यातली ही  पहिली चर्चा होती जिने मला वाचवलं. आम्ही दोघे तिथून पटकन निघालो. मी गपचूप खाली बघून चालत होते इतक्यात आदित्य म्हणाला,, “जरा डोक्यावर पडल्यायेत वाटतं मॅडम! मुलींना असं मारतात. तुला लागलं नाही ना?”

आदित्य पुढे चालत होता आणि मी मागे… मला त्याला बोलावून सॉरी म्हणावसं वाटत होतं पण धाडस होत नव्हतं. चालता चालता मान मागे वाळवून त्याने माझ्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि पुढे निघून गेला.

शाळेच्या कॉरिडॉरमधून जाताना मीनल दिसली… ती माझ्याकडे बघून कुत्सित हसत होती. दिवसभर तो चर्चेचा विषय झाला होता. मला कशासाठी फेमस व्हायचं होतं आणि मी शाळेत कशासाठी चर्चेत आले होते!! लंचच्या वेळी ‘मेस’ मध्ये गेल्यावर असं वाटत होतं की सगळे त्याबद्दलच बोलतायत आणि माझ्यावर हसतायत. मीनल आणि तिच्या मैत्रिणी तर नक्कीच. मी गपागपा गिळून ५ मिनिटात जेवण संपवलं आणि निघाले. मी फक्त प्रार्थना करत होते कि हे प्रकरण मेट्रन किंवा शिंत्रे मॅडमनी घरी नको सांगायला. मला आदित्यबद्दल पण वाईट वाटत होतं. माझ्यामुळे तो पण ह्या फालतू प्रकरणात आला. मला त्याला एकदा नीट सॉरी म्हणावसं वाटत होतं.

डिनरच्या वेळेपर्यंत थोडंसं वातावरण निवळल्यासारखं वाटत होतं. मी हातात प्लेट घेऊन मेसभर नजर फिरवली, आदित्य कुठे दिसतोय बघायला. मग माझ्या लक्षात आलं कि आपण मीनलला आधी शोधू, तिच्या आसपासच आदित्य आणि त्याच्या मित्रांची जागा असणार. आणि तसंच झालं. मुलींच्या लाईन मध्ये जिथे मीनलची गॅंग होती त्याच्या opposite आदित्य आणि मित्र बसले होते.

मी, चिनू आणि नमु थोड्या लांब जाऊन बसलो पण अशारितीने कि आदित्य प्लेट ठेवायला उठला कि काही सेकंदांनी मला उठता आलं असतं आणि मग मधल्या रस्त्यात त्याला गाठून मला सॉरी म्हणता आलं असतं.

माझी बुद्धी तेव्हा लहान होती त्यामुळे ‘मी त्याला त्याच्या मित्रांसमोर हाक मारणे– त्यानंतर त्याने थांबणे— मित्रांनी पुढे जाणे— मग मी त्याला सॉरी म्हणणे— त्यानंतर मित्रांनी त्याला अजून चिडवायला सुरु करणे’ हा बॉलिवूड scene आहे हे मला तेव्हा जाणवलं नव्हतं.

तो उठल्यानंतर ठरवल्याप्रमाणे जेवण अर्ध्यात टाकून मी त्याच्या मागे गेले.  थोडं अंतर मागे चालून मी ऑकवर्डली ‘आदित्यदादा’ अशी हाक मारली. तो थांबला. त्याचे मित्र आपापल्यात इशारे करून पुढे गेले. मी थोडीशी पळतच त्याच्यापाशी गेले.

“आदित्यदादा सॉरी… माझ्यामुळे तुम्हाला उगाच… म्हणजे मी तुमचं नाकच कापलं. असं काही मला करायचं नव्हतं… चुकून झालं..” मी खाली बघत सांगितलं.

“अगं असू दे असू दे… मला कोणी काही बोललं नाही…” तो म्हणाला.

“खरंच?” मी वर मान करून त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. तेव्हा तो नुसताच हसला. ते बघून मला बरं वाटलं पण थोडंसं संकोचल्यासारखं पण वाटलं.

“काळजी करू नकोस…” असं म्हणून तो २ पावलं मागे सरकला “आणि मला दादा म्हणू नकोस… आदित्यच म्हण.” असं म्हणून गालाच्या कोपऱ्यात हसला आणि मागे वळून चालता झाला.

माझ्या दोन दिवसांपूर्वी  ‘मी कद्धीच अशी होणार नाही!’ ह्या केलेल्या निश्चयावर पाणी फिरलं होतं!

अशारितीने आमच्या “प्रेमाची” सुरुवात झाली होती… Now that I think of it… It was just a childish prank. माझं रिलेशन एका ‘जोक’च्या आधारावर सुरु झालं होतं. काय कळतं इतक्या लहानपणी. पण तरी मी आणि त्यानेही ते खेचत आणलं इथपर्यंत. तेव्हा अक्कल नव्हती… पण मोठं झाल्यावरही कसं  कळलं नाही. आमचं सगळंच वेगळं. खाण्याच्या सवयीपासून ते beliefs पर्यंत… त्याचं त्याच्या घरच्यांशी फारच जवळ असणं, माझं जवळ असतानाही स्वतःच्या स्पेस मध्ये राहणं… गावी गेल्यावर देवाचे रीतिरिवाज असे पाळतो कि एखाद्या देवळात पुजारी म्हणून शोभेल. मी ‘खूप वर्षं घराबाहेरच राहिले’ असं कारण लावून कधी त्यात रस घेतलाच नाही.

ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लग्नाआधी बोललो होतो का? आठवतही नाही आता.

 

बापरे… ह्या शोभाने माझ्या डोक्यात एक भुंगा सोडलाय. काहीतरी प्रश्न विचारते दरवेळी आणि मी हे असे विचार करत राहते. मला खरंतर स्वतःशी सुद्धा इतकी चर्चा करायला आवडत नाही.

दारावरची बेल वाजली. बाल्कनीत उभी राहून एवढा विचार करत संध्याकाळ कधी होऊन गेली कळलं नाही. आज त्याची ‘अपॉइंटमेंट’ होती. ती संपवून तो आला होता. मी दार उघडलं तसं त्याने एक वर्तमानपत्राचा पुडा हातात दिला. उघडून बघितलं तर निशिगंधाची फुलं. त्यात नाक खुपसून खोलवर वास घेतला. एका बौल मध्ये पाणी घेऊन त्यात ती फुलं सोडली. मेंदू म्हणत होता गप्प बस्स… पण तोंडाने काही ऐकलं नाही,

“डॉक्टर शोभाने सांगितलं का फुलं द्यायला?” मी उगाच कळ काढली. चर्चा, वाद वगैरे आवडत नसले तरी ते उकरायची माझ्यात फार खुमखुमी आहे.

“काय बोलू आता?” असं म्हणत तो आवरायला आत गेला.

थोडयावेळाने मीच बोलले, “जेवणाचं काय? मी पिझ्झा ऑर्डर करतेय… तुला बघ काय हवंय. फारतर माझ्याच app  मधून दोन्ही ऑर्डर्स करून टाकीन.”

“मला पण पिझ्झा चालेल. तुला जो ऑर्डर करशील तसलाच मला कर.”

“तुला आवडत नाही ना पण पिझ्झा!”

“चालेल मला आज.”

मी भुवया उंचावून त्याच्याकडे बघितलं पण तो मोबाईल मध्ये बघत होता.

“कायतरी लाव TV वर…” त्याने वर बघून मला सांगितलं.

“मला ते न्यूज वगैरे नाहीए बघायचं.”

“हो.. तुला हवं ते लाव.”

“मी माझ्या लॅपटॉप वर बघते…”

“नको… इथेच लाव ना.”

“मी FRIENDS लावणारेय…”

“हां चालेल… ” तो म्हणाला.

बापरे आज आमची anniversary वगैरे आहे कि काय? नाहीए पण… काय झालंय ह्याला? शोभाने संमोहन उपचार वगैरे करून पाठवलंय कि काय?

थोड्यावेळाने पिझ्झा आला आणि खाऊन संपला. दोघेही FRIENDS बघत होतो. आज थोडं वेगळंच वाटत होतं. चांगलं वाटत होतं. एका सीन मध्ये Joeyच्या मूर्खपणावर मी खूपच हसत होते. तेव्हा त्याने अचानक माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, “खूप दिवसांनी तुझ्या हसण्याचा आवाज ऐकला!”

त्याच्याकडे बघून मला त्याच्या कुशीत शिरावंसं वाटलं, पण मी गेले नाही आणि त्यानेही घेतलं नाही. मला अचानक जाणवलं दोन उशांचं अंतर मध्ये ठेऊन आम्ही बसलो होतो. हे अंतर कधी वाढलं ते कळलं नाही आणि पुन्हा कधी कमी होईल का तेही माहित नाही.

 

सत्र चौथे

“अंजली… Ok, now I am going to ask you a blunt question — तुझ्या करिअरसाठी तू आदित्यला अजूनही blame करतेस का?”

“Blame? What blame… नाही! मी कशाला ब्लेम करू… अर्थात त्याने माझ्याशी बोलण्याआधी आमच्या future चं प्लॅनिंग करून ठेवलं होतं… मला MBA कर म्हणून तोच मागे लागला होता… पण ठीक आहे…  मग केलं मी पण MBA… But I am not complaining”

“नो.. it seems you didn’t have much say in choosing your career… तू त्यावेळेस त्याचं ऐकण्यामागे काय कारण होतं? तू pressure मध्ये येऊन करिअर चेंज करण्याचा निर्णय घेतलास का? की तुला clarity नव्हती and you just went with the flow… मला हे जाणून घ्यायचं आहे की, आदित्य नेहमी तुमच्या दोघांचे डिसिजन्स एकटा घेतो का?”

शोभाच्या अचानक प्रश्नांच्या सरबत्तीमुळे मला उत्तर द्यायचं सुचत नव्हतं… आता पहिल्यासारखं मी प्रश्न अव्हॉइड पण करू शकत नव्हते. म्हणजे असं असतं ना एखादा माणूस तुमच्या ओळखीचा झाला की त्याने काहीही बोललं तरी तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करता. हिला उत्तर द्यायचं माझ्यावर काहीच प्रेशर नव्हतं, पण तरी उगाच एक बंधन वाटत होतं.

“अं… म्हणजे… असं..”

माझं तत्-पप होताना बघून तिने पुढचा प्रश्न विचारला, “ओके… तुझा ह्याआधीचा जॉब काय होता exactly?”

“मी बँक मध्ये होते… असिस्टंट मॅनेजर म्हणून…”

“मग तिथून इथे HR मध्ये कशी काय… I mean, तुला दोन्हीपैकी कुठला जॉब प्रेफेरबल होता… I am assuming की तू हा आत्ताचा जॉब आदित्यमुळे घेतलास… is it so? पण हे असं transition…”

“OK… मी खरंतर सिव्हिल सर्व्हिसेस साठी prepare करत होते. आणि त्यासाठी classes वगैरे चालू होते… आणि तेव्हा आदित्य नुकताच जॉबला लागला होता. सो मग आम्ही भेटायचो, किंवा बाहेर जायचो तर तो नेहमी सगळीकडे खर्च करायचा. आणि ह्या सगळ्यात २ वर्षं गेली. पण माझे results काही चांगले येत नव्हते. आणि मला त्याच्याकडून सारखं खर्च करवून घेणं चांगलं वाटत नव्हतं. नंतर नंतर मला असं वाटू लागलं की तो खर्च करतोय म्हणून मग तो म्हणेल त्याच गोष्टी आम्ही करायचो. मी माझं स्वतःचं फार मत व्यक्त करणं हळू हळू कमी केलं होतं. म्हणजे कुठे जेवायचं, कुठला पिक्चर बघायचा, अगदी काय खायचं इथपर्यंत सगळं त्यानेच ठरवायचं. आणि आदित्यला हे कळत नव्हतं. उलट नंतर नंतर तर त्याने मला मत विचारायचंच बंद केलं होतं. Weekdays मध्ये त्याच्याकडे फार वेळ नसायचा, आणि मग वीकएंडला तो काहीतरी प्लॅन करून ठेवायचा. आणि मग त्यानुसार ट्रेकला जायचं तर मी ६ ला उठायचं, किंवा त्याचं Fridayला काम असलं की शनिवारी डायरेक्ट लंच ला भेटायचं… मी खूपच डिपेन्डन्ट झाले होते. आणि त्याचा मला त्रास होत होता. सतत वाटायचं कि माझा निर्णय चुकला, मी देखील इतरांसारखं इंजिनीरिंग करून जॉब घ्यायला हवा होता. मिळाला असता मला. केवळ १०-१२ वी मध्ये काहीतरी खूळ डोक्यात घेऊन ह्यामध्ये पडले होते. वाईट ह्याबद्दल वाटायचं की आदित्यला ह्या गोष्टी बोलण्यात इंटरेस्ट नसायचा. म्हणजे मी माझं रडगाणं सुरु केलं की तो एकतर सोडून MBA कर म्हणायचा, नाहीतर “जमेल तुला तू करशील” असं काहीसं pep-talk देऊन रिकामं व्हायचा…”

“तू बोलली होतीस ह्याबद्दल?”

“काय बोलणार, दोघेही वेगळ्या जगात होतो. त्याला नवीन जॉब होता. ऑफिसमध्ये कूल फ्रेंड्स होते, पार्ट्या असायच्या, टीमचे Outings असायचे…. मला नव्हतं वाटत की तेव्हा तो समजून घेऊ शकत होता, इन फॅक्ट मला तरी काय बोलायचं काय माहित होतं? त्यामुळं मी त्याच्यापासून थोडी लांब राहू लागले… त्याने कुठे जायचा विषय काढला की मी अभ्यासाचं कारण सांगायचे… अभ्यास तरी काही व्हायचा नाही… मग एक दिवस मी ठरवलं की जॉब शोधायचा. वेगवेगळ्या परीक्षा द्यायला सुरु केलं आणि त्यातून हा जॉब लागला. पोस्टिंग एका छोट्या शहरात झालं होतं, मला आता इथून बाहेर पडायचं होतं, आदित्यापासून लांब जावं लागणार होतं. But I was happy की मला जॉब लागला होता आणि good thing was ते छोटं शहर ‘माई’च्या गावापासून जवळ होतं. सो मग वीकएंडला तिच्याकडे जायचे. पहिले काही दिवस माईने खूप कौतुकही केलं. actually मला ते घर आणि गाव फार आवडतं. उन्हाळा, दिवाळीच्या सुट्ट्या फार एन्जॉय केल्या आहेत तिथे लहानपणी. माईच्या हातच्या गरम-गरम पुरणपोळ्या म्हणजे सुख! सणावारांना माझी चंगळ झाली होती…”

“But…?” शोभाने तिथे एक किंतु-पंरतु आहे हे ओळखलं.

“If you don’t mind Shobha… can I ask you something?”

अचानक मी प्रश्न विचारणार म्हणल्यावर शोभा थोडीशी मागे सरकली. “Sure, go ahead!”

“I assume that you like you job… so what do you do in a typical day of your job?”

“Sure, हो मला माझं काम आवडतं, मी जनरली १० वाजता Clinic उघडते, आणि दिवसभर I listen to my counselees आणि शक्य होईल तशी त्यांना मी हेल्प करते. काही वेळा काही guests फार stubborn असतात. तेव्हा थोडा मलाही त्रास होतो… पण मोस्टली ते cooperating असतात…. but… how is this relevant if I may ask?”

“तुमचं ऑफिस छान आहे. nice comfortable chairs, decor, AC वगैरे! माझं तिथल्या ऑफिस मध्ये Gray मोझॅक टाईल्स होत्या. भिंतींना पिवळा डिस्टेम्पर लावला होता. हाहा… माझं जे ऑफिस होतं, तिथे waiting साठी एक बेंच टाकला होता, बिचाऱ्या कस्टमर्स च्या शर्टांना, कपड्यांना तो डिस्टेम्पर नेहमी लागायचा. तिथे आमचे मॅनेजर होते नाईक सर. ते ४९ वर्षांचे होते. माझे colleagues – निशांत सर, जाधव सर… निशांत साधारण आदित्यच्या वयाचा होता, पण आम्ही सगळेच एकमेकांना ‘मॅडम आणि सर’ म्हणायचो, वयानुसार. Teller आणि अकाउंटन्सी मधल्या म्हात्रे मॅडम आणि इंदूरकर मॅडम मात्र मला एकेरी बोलवायच्या.

मी सकाळी १० वाजता ऑफिसमध्ये जायचे तिथे पांडुमामा बसलेले असायचे, त्यांच्याजवळच्या मस्टरवर सही करायची. मग कॅबिनमध्ये जायचं, बॅग ठेवायची, आणि हो.. आमचा ड्रेसकोड होता हं! सो NO Western Wear, ओन्ली सलवार- कुर्ता आणि ओढणी.”

“हाहा… मी एक दिवस कुर्ता आणि खाली जीन्स घालून गेले होते,

High-neck कुर्ता असल्यामुळं मी ओढणी घेतली नव्हती. पांडुमामांनी एकदा चोरून वरून खालपर्यंत नजर फिरवली. मी माझ्या केबिन मध्ये जाऊन बसेपर्यंत मला पाहून म्हात्रे आणि इंदूरकर बाईंमध्ये काहीतरी खुसफूस झाल्याचं मला जाणवलं.

निशांतचं क्युबिकल माझ्याच पलीकडे होतं, तिकडे जाता-जाता तो थांबला आणि म्हणाला, “आज बर्थडे वगैरे नाही ना?”

“नाही.. का?”

“सहजच विचारलं, मला आठवत होतं की आता रिसेंटलीच झाला.. म्हणलं एवढ्यात वर्ष संपलं?”

“नाही… अजून संपायचं आहे. मार्च-एन्ड नाही आलाय अजून आपला” मला त्याच्या बोलण्याचा रोख कळला होता पण मी दुर्लक्ष केलं.

पण तरीही त्याने विषय सोडला नाही, “आज नवीन ड्रेस घातलाय म्हणून विचारलं…” असं म्हणून तो थोडीशी बत्तीशी दाखवून हसला.  हे बोलायच्या आधी त्याने आसपास कोणी आहे का ह्याची खात्री केली होती हेहि मी पाहिलं होतं.

“नाही.. सहजच.” असं म्हणून समोरच्या फाईल मध्ये मान घातली. असा का आहे हा? माझ्याच वयातला. पण बोलायला बिचकणारा. पुण्या-मुंबईत असतो तर कदाचित मित्र असतो आम्ही.  इथे अगदीच घरगुती आहे सगळं. कोणी मित्र म्हणून बोलावं असं नाही. मी फाईलमध्ये नुसतीच बघत होते पण डोक्यात हे असं काहीतरी चालू होतं. तितक्यात एक किनरा आवाज कानावर आला.

“म्याडम, झालं का ओ ते आमच्या सुजयचं काम?”

“काय?” मी एकदम दचकले.

“सुजयचं काम झालं का?” बाईंनी अजून एकदा विचारलं.

“कोण सुजय?”

“सुजय.. सुजय व्हनाळे”

“कसलं काम होतं त्यांचं?”

“कर्जाचं होतं ना ओ? तुम्हालाच म्हाईत नाई होय?”

“बसा तुम्ही… फाईल बघते मी.”

“आता बसायला कुटं वेळ हाय… बाजारला आले होते. मग आले विचारायला. बरं बघा. बसते जरावेळ.” असं म्हणून त्या बाकड्यावर बसल्या. मंगळवारच्या बाजारातून फ्रेश मासे घेऊन आल्या होत्या तर त्या छोट्याशा खोलीत “सुगंध” दरवळत होता.

मी घाई-घाईने फाईल्स चाळल्या. मला फाईल काही मिळेना. तो वास आता सहन होत नव्हता.  मी त्यांना सांगितलं, “नाही दिसत आहे फाईल, मी बघून सांगते.”

“होय बघा की. ए मंजू….!” बाई एकदम दाराकडे बघून मोठ्या आवाजात ओरडल्या. दोन क्षण मला छातीत धडधडलं. “ये बाई आतच. ह्या बघतायत फाईल का काय ते.” असं त्यांनी म्हणल्यानंतर अजून एक बाई आली, त्या बेंचवर बसली.

“बाई… आता सासू कोकलत्या बघ माझी. वेळ का केलीस म्हणून.” इति मंजू.

“असू दे गं. बघत्यात ह्या मॅडम फाईल. बस. काय जीव जातोय का तिचा.” इति सुजयच्या मातोश्री.

“कसला जातोय… बरं ते ऐकलंस का… देसायांच्या गल्लीतली बोंब?”

“काय?” सुजयच्या आईचे कान टवकारले.

“अगं ती सुतारांची सून नाही का? त्या बहिणी बहिणी दिल्यात बघ एकाच घरात… तिघी-जणी…”

“होय… एक हिथं असत्या. दुसऱ्या दोघी मुंबईला का पुण्याला हैत न्हवे?”

“हां.. ती थोरली आली न्हवे पर्वा… गाडी घुमवत. धाकटीला दारातनं ओरडून बोलवायला लागली. लई आवाज करायला लागली म्हणून धाकटी बाहेर आली तर हिनं धरल्या तिच्या झिंज्या!”

“आता गं! मग?”

“आणि काय काय बोलायला लागली तिला. तू वाट लावलीस असं कायतर म्हणत होती… गल्ली गोळा झाली आपापल्या दारातनं सगळी बघत होती म्हणे.. मला सुषमी म्हणाली… धाकटी काय बोलत नव्हती. तिची सासू ओरडत होती खिडकीतनंच ‘ए.. सोड तिला… कशाला आलीस…’ थोरलीनं तिला पण दोन शिव्या हासडल्या…!”

“तमाशाच की.. म्हणून म्हणत्यात बघ… एका घरात ३ बहिणी देऊ नयेत. दोघी दिल्या तर चालत्यात पण ३ देऊ नयेत… तीन तिघाडा अन काम बिघाडा…”

जरी हे conversation इंटरेस्टिंग वाटत असलं तरी त्यावेळेस तो वास, त्या दोघींचा आजूबाजूला कोण आहे हे ना पाहता लागलेला टिपेचा स्वर… ह्या सगळ्याने डोकं भणभणायला लागलं होतं. उलटी होईल असं वाटून मी तिथून पटकन उठले आणि लेडीज रूम कडे तरातरा चालत गेले.

मी वॉशरूम मध्ये असतानाच बाहेरचा आवाज आला.

“काय हो अनिता मॅडम… काय म्हणत होता मगाशी?” म्हात्रे बाईंनी इंदूरकर बाईंना विचारलं. (मला सोडून अजून दोनच बायका होत्या.)

“मला वाटतंय ते खरंच आहे असं मला वाटतंय.” (What!)

“काय? निशांतचं का?”

“ह्हा! मगाशी तिच्या नवीन ड्रेसचं कौतुक करत होता, ऐकलंस ना?” (शीट! हि बाई तर माझ्या बद्दल बोलतेय. आणि हिने कधी ऐकलं हे? हिचे कान आहेत कि व्हॉइस बग्स?)

“नाही ओ… काय म्हणे?”

“म्हणे नवीन ड्रेस घातलाय आज… काय विशेष?” (स्वतःचा मसाला?)

“मग… घातला असेल त्याच्याचसाठी! हीहीही…” (शी! ह्या तर माझी जोडी जुळवतायत.)

“बरोबर आहे… आता एवढा सगळा ड्रेसकोड सांगितलाय आपण, मग त्यातून सुद्धा असले कपडे का घालतो माणूस… चर्चा व्हावी… लक्ष वेधून घ्यावं… ह्यासाठीच ना?” (What the F!! चायला ही चाळिशीला आलेली बाई Sleeveless ब्लॉऊज घालून मोठाले दंड दाखवत फिरते तेव्हा? कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं असतं? नाईक सरांचं?)

मला आता ती फालतू चर्चा ऐकायची नव्हती. मी जोरात दार उघडून बाहेर आले तर दोघी एकदम चपापल्या. एकदम चिडीचूप झाल्या. मी त्यांच्याकडे न बघता हात धुवून बाहेर आले. घाईनं माझ्या क्युबिकल मध्ये जाऊन माझ्या बॅगमधून माझा कळकटलेला स्टोल काढला आणि तो दोन्ही खांद्यावर टाकून धुसमुसत खुर्चीवर बसले. थोडावेळ काहीच सुचत नव्हतं मला. खरंतर एवढं काही मनाला लावून घेण्यासारखं नव्हतं कदाचित, पण मला खूप राग-राग होत होता. त्या दोन बायका निघून गेल्या होत्या, पण तरी तो वास पूर्णपणे गेला नव्हता. मला अचानक ते cubical छोटं वाटू लागलं. भिंतीला लावलेल्या त्या tubes चा कोंदट प्रकाश, डिस्टेम्पर लावलेल्या त्या अंगावर येणाऱ्या भिंती… नको वाटू लागलं. कसंतरी वाटत होतं. मी फोन घेऊन बाहेर गेले आणि आदित्यला फोन लावला. त्याने फोन कट केला आणि त्याचा मेसेज आला “In a meeting.” मी सुस्कारा सोडून पुन्हा आत गेले. दोन्ही बायकांनी माझ्याकडे चोरून बघितल्याचं मला लक्षात आलं.

थोड्या वेळाने निशांत जेवणासाठी बोलवायला आला, मी सांगितलं माझं डोकं दुखतंय.

सगळे जेवायला गेले आणि मी तिथेच टेबलवर डबा उघडून दोन घास कोंबले आणि कोणी नव्हतं तर कॉम्प्युटरवर फेसबूक उघडलं. पहिलाच फोटो तोंडासमोर आला त्यात आदित्य, त्याला चिकटून असलेली एक पार्टीवेअर घातलेली मुलगी, तिच्या पलीकडे अजून २ तशाच मुली आणि त्यांच्या पलीकडे अजून २ मुलं. सगळे कॅमेरा बघून मोठी स्माईल देत होते. मागे रंगीबेरंगी lights होते, थोड्या दूर लोकं नाचतायत. चिकटून उभ्या असलेल्या ताईंच्या हातात वाईनचा ग्लास आहे आणि त्या उंचावून दाखवतायत कि “They are having fun!” मी फोटो टाकल्याची वेळ-काळ बघितली. टॅग केलेल्या पोरींची नावं बघितली. मी actually बराच वेळ तो फोटो पाहिला. बारकाईने पाहिला. मग whatsapp उघडून त्याला मेसेज केला – “रात्री पार्टी सकाळी मिटिंग. छान चालू आहे की.” Sad म्हणजे तो मेसेज त्या क्षणाला गेलाही नाही कारण मी जिथे बसायचे तिथे नेटवर्क चा प्रॉब्लेम होता. तो मेसेज त्याला जावा म्हणून मी उठून बाहेर जाऊन उभं राहिले. मेसेज सेंड झाल्यावर, आत येऊन फोन स्विच-ऑफ करून बॅग मध्ये ठेऊन दिला.

थोड्याच वेळात निशांत आणि जाधव सर आले. निशांतने पुन्हा चौकशी केली, “बरं वाटतंय का आता?”

मी “हम्म” असं उत्तर देऊन समोरच्या एक्सेल-फाईल मध्ये बघत बसले. मी शून्यात नजर लावून बसले होते. पांडुमामा सगळ्यांना दुपारचा चहा घेऊन आले. थोड्या वेळात मागे जोरजोरात हसण्याचा आवाज आला – ‘जनता माफ नही करेगी’ वरचे जोक्स एकमेकांना दाखवून निशांत, जाधव सर आणि पांडुमामा हसत होते. थोड्याचवेळात जोक्सनी चर्चेचं रूप घेतलं. मग कुणी कसं देशाचं नुकसान केलंय, कुणी कसं महाराष्ट्राला वाळीत टाकलंय, कुणी किती ह्या शहरासाठी झटलंय असे बरेच विषय बाहेर आले. अर्थात मला त्यात इंटरेस्ट नव्हता आणि मला कोणी त्यात सहभागी करून घेणारेही नव्हते. मी फोन काढला आणि स्विच-ऑन केला. थोड्या वेळात नेटवर्क आल्यावर आदित्यचे स्वतःला एक्सप्लेन करणारे ३-४ मेसेजेस आले होते. मी वाचून रिप्लाय न करता फोन डेस्कवर ठेवला. तेवढ्यात ‘माई’चा फोन आला. माई मला शुक्रवारच्या पूजेला तिच्याकडे बोलवत होती, तिसऱ्या शनिवारची सुट्टी धरून ये म्हणत होती. मी “बघते” म्हणून फोन ठेवला.

सुरुवातीला जितकं कौतुक होतं तितकं राहिलं नव्हतं आता. ह्याआधी कशावर बंधन न घालणारी माई मला थोड्या ‘वळण लावण्याच्या’ गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत होती. मला आता कसं सगळं जेवण जमलं पाहिजे, कसं सगळ्या गोष्टींचं शास्त्र माहित असलं पाहिजे, आमच्याकडे कुठले सण कशा पद्धतीने करतात, कुठला उपवास धरायचा, अगदी पुराणपोळ्या कशा लाटायच्या वगैरे… अर्थात त्यामागे तिची मायाच होती. पण त्या वेळेला ते कळत नसतं.

फोन ठेवल्यानंतर मला अजूनच एकटं वाटू लागलं. काम तर आवडण्यासारखं काही नव्हतंच, कि त्यात मन गुंतवून घ्यावं. घड्याळात ५ कधी वाचतायत ह्याची वाट मी बघत बसले.

And this was just another Thursday!

“Oh! Interesting…” शोभा माझी रामकहाणी ऐकून म्हणाली. “So, from what I understand तुला तिथलं काम आणि लोकं आवडत नव्हती… तू त्या सगळ्या premiseला bore झाली होतीस… right?”

“Yes… Sort of!”

“Hmm… I see… अंजली… तू ना बोलता बोलता एक म्हणालीस, something like  तुझ्या माईंच्या तसं वागण्यामागे… अं… त्यांची माया होती.. पण त्यावेळेस ती कळली नाही… right?”

“हो. पण त्या त्या वेळेत वाटणाऱ्या स्ट्रॉंग फीलिंग्स पण महत्वाच्या नाहीत का?” तिच्या प्रश्नाचा रोख समजून मी म्हणाले.

“नक्कीच आहेत. पण मला असं वाटतंय की हि करिअर change ची गोष्ट केवळ त्या वेळापुरती राहिली नाहीए. You are still carrying those feelings towards Aditya. थोड्याफार प्रमाणात! You vividly remember how you felt alone, आदित्य कसा त्याच्या आयुष्यात रमला होता etc… मग आताच्या कसल्याही inconvenience मध्ये तुला त्या feelings परत जाणवतात…”

“हं.”

“तुझं माईंबरोबर आता कसं पटतं?”

“म्हणजे?”

“म्हणजे… तुमचं रिलेशन आता आधी सारखं आहे? का अजूनही तुला त्यांच्याकडे जायला नको वाटतं?”

“नाही नाही… उलट आता आमच्या फोनवर पण मस्त गप्पा होतात… ते त्या थोड्या काळापुरतंच होतं…”

“Exactly… So, तुझ्याकडे लक्ष न देणं, तुला एकटं वाटवून देणं, तुला नीट समजून न घेणं… हे देखील थोड्या काळापुरतंच होतं ना?” वही बंद करत शोभा म्हणाली.

मी खिडकीकडे बघत नुसतीच मान हलवली.

सत्र पाचवे

रात्रीचे ११.०० वाजले होते, आमच्या कंपनीतल्या एका टीमच्या मॅनेजरचा – ‘प्रवीण’चा अर्जंट कॉल आला, HR ला येणारे कॉल तसे अर्जंटच असतात. अर्जंट काही नसलं की आम्ही अस्तित्वात आहोत की नाही ह्याने फार फरक पडत नाही… रांगोळीचा जोक मारायला मोकळे! (HR Rangoli Memes असं सर्च करून बघा.)
तर ‘प्रवीण’ना त्यांच्या असोसिएटचा अचानक resignation चा email आला होता. आता लगेच कसं करायचं, प्रोजेक्ट प्रायॉरिटीज कशा manage करणार, तो मुलगा आधीपासूनच cooperating नव्हता, त्यांचं कसं चुकलं नाही हे त्यातून आडा-आडाने सांगायचा ते प्रयत्न करत होते. मीदेखील जॉबमध्ये तशी नवीनच होते. हा एम्प्लॉयी मागे एकदा माझ्याशी भांडायला आला होता, त्याच्या ‘Year-end परफॉर्मन्स रेटिंग’ वरून, ते मला आठवलं. पण त्यावर मी काय actions घेतल्या होत्या त्याच आठवेनात. काही सुधरेना म्हणून मी त्यांना ‘सकाळी बोलू’ असं सांगून फोन ठेवला.  एवढया रात्री फोन आला म्हणून घरातले सगळेच माझ्या तोंडाकडे बघत होते. आदित्यकडे बघून मी थोड्या टेन्शन मधेच सगळं कॉन्व्हर्सेशन सांगितलं. त्याने मला सोफ्यावर बसवून नीट समजावलं… There is no shame in getting help from a Senior… वगैरे सांगितलं. — ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट.

तेच मागच्या वर्षी जेव्हा appraisal च्या काळात फार थांबावं लागत होतं. वेळी-अवेळी फोन चालत होते, तेव्हा मी इर्रिटेट झाल्यावर तो म्हणाला होता. “It’s your job!” मग त्यावरून कडाक्याचं भांडण झालं होतं रात्री १२ वाजता. ३ वाजेपर्यंत ना काम झालं ना झोप. दोन दिवस रुसून फुगून काढल्यावर तिसऱ्या दिवशी सॉरी वर गाडी घसरली होती…

काल मी १.३० वाजेपर्यंत कॉल मध्ये बसले होते. एक मॅनेजर ऑन-साईट गेला होता तर त्याच्या सगळ्या टीमची वाताहातच झाली होती. appraisal च्या वेळी आम्हाला फारच तर होत होता. कारण तो नॉर्मल वेळच्या मिटींग्सना नसायचा. आणि मग आता त्याच्या वेळेनुसार मला adjust करावं लागत होतं. अर्थात ही काही complaint करण्याची गोष्ट नाहीए. It IS my job! पण खटकलं ते त्याचं दार लावून आत झोपून टाकणं. माझ्या अश्या अचानक लेट थांबण्याबद्दल concern तर नव्हताच, पण आता तर भांडण्यासाठी सुद्धा संवाद करायची गरज वाटत नव्हती त्याला.

“शोभा, I don’t think it’s working out! ‘तो’ पूर्णच चेंज झालाय असं वाटतंय मला. असं कसं शक्य आहे continue करणं. उगाच ओढून ताणून दिवसातून ४ शब्द बोलून कसं निघू शकतं आयुष्य?? It’s not… It’s not going to…”

मी डोकं हातात धरून म्हणाले.

“अंजली… calm down… it’s OK …” तिने माझ्यासमोर पाण्याचा ग्लास पुढे केला. “Don’t over-analyze it. कदाचित त्याला तुला डिस्टर्ब करायचं नसेल. तू बोललीस का त्याच्याशी कि तुला कामाचा त्रास होतोय?”

“मी काय बोलणार? माझं काम वर्षातून २-३ वेळा जास्त असतं. त्याचं काम नेहमीच जास्त असतं. पुन्हा इट्स युअर जॉब वगैरे कशाला?”

“पण तू बोलली असतीस तर आपल्याला त्याचा रिस्पॉन्स कळाला असता… तू assume का केलास?”

“ते नाही होत माझ्याकडून… पण म्हणून त्याने काहीच कसा काय कन्सर्न नाही दाखवयचा?? गेले तीन-चार महिने तर तो फारच असा विचित्र वागतोय… कधी कधी अचानक चांगला वागतो आणि कधी कधी काहीच फरक पडत नसल्यासारखा. आणि मला नाही माहित काय करायचं ह्यावर… “

“त्याचं पण काहीतरी confusion चालू असेल डोक्यात… पण, आपण मागे बोललो होतो, की कॉन्व्हर्सेशन तुही सुरु केलं पाहिजेस….”

मी दुसरीकडे बघत काहीच बोलले नाही.

“तुम्ही थोडंसं ‘distancing’ ट्राय करून बघू शकता का? म्हणजे I can see कि तुम्ही खूप दिवस सतत एकत्र आहात… थोडंसं वेगळ्या लोकांशी भेटून त्यांच्यात राहून तुला स्वतःला पण better वाटेल.”

“मग काय? माझ्या घरी जाऊ? माहेरी? की awkward solo ट्रिप?”

“तुझ्या घरी? किंवा माईंकडे?”

“नाही जाऊ शकत.”

“May I ask why?”

“काय करू जाऊन? काय सांगू? आमची भांडणं होतायत, आम्हाला एकत्र राहायचं नाही?”

“ते सांगायची काही गरज नाहीए ना… you can just visit your parents. I think so…”

“मी तुम्हाला सांगितलं होतं ना… घरातल्या सर्वांना पसंत असलेल्या, माझ्या लक्ष्मीला नारायण शोभून दिसेल अशा ‘समीर बेळगावे’ बरोबर माझी एंगेजमेंट झाली होती…”

“तू ठरली होती असं सांगितलं होतंस… I think so…”

“झाली होती.”

“oh…”

एंगेजमेंट झाल्यानंतर काही दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींना – २-कॉलेजच्या आणि शाळेतल्या दोघी अजूनही close friends आहेत – त्यांना बोलावलं होतं. एकमेकींना भेटून खूप दिवस झाले होते आणि मी announcement म्हणून “I said Yes!” चा अचानक फोटो टाकला तेव्हा सगळ्या उतावळ्या झाल्या. ब्रेक-अप बद्दल त्यांना माहित होतं. सो ही गोष्ट सेलिब्रेट करायची म्हणून सगळ्याजणी एकत्र आल्या होत्या… नाईट-आऊट की स्लीप-ओव्हर ठरला. केक वगैरे घेऊन आल्या होत्या… congratulations वाला!

नमूचं लग्न झालं होतं, कॉलेजवाल्या सायली, निकिता, इशा ह्यांचे बॉयफ्रेंड्स होते.. लवकरच लग्नाचा विचारही होता… चिनू आमची नर्डू-बाई राहिली… मग माझं आणि माझ्या “fiancé” चं कौतुक करून झालं… मग हळू हळू सगळ्या कंफर्टेबल झाल्या… आणि १-ग्लास झाल्यानंतर चिनू मात्र जरा पेटलीच.

यार… तुमचं भारी आहे सगळ्यांचं… माझे आई-बाबा मला कसलेही Bio-data आणून देतात. म्हणजे हिचं तर बघा… ब्रेक-अप झालं नाही तोवर अजून भारी मुलगा मिळाला… नशीब आहे हं तुझं अन्ने!”

मी काहीच बोलले नाही, मग ‘नमू’ने तिच्याकडे डोळे वटारून पाहिलं आणि म्हणाली, “चिने… तुला ना कुठं न्यायला नको बघ…”

सगळेच शांत झाले आणि awkwardly आपापल्या ग्लास मधून सिप घेतला.

“Hey!” शांततेत निकिता एकदम ओरडली. “मी एक गेम प्लॅन केलाय… आणि ‘सायी’ने पण… पण आपण आधी माझा खेळू… Never have I ever!”

गेम तसा boreअसतो. पण काहीतरी विषय काढून गप्पा होतात. इतरवेळेस चर्चेला उबगलेल्या मला आज मात्र गप्पा मारायच्या होत्या, काहीही फालतू विषयावर… गेले सहा महिने मी कुणाशी काय बोललेय हे आठवत नव्हतं.

चला!” म्हणून गेम सुरु झाला आणि चिनुने पहिलीच सोंगटी टाकली, “I have never kissed a boy.” (बिचारी!) आणि तिला माहीतच होतं की we all have…  मग ‘किस्से’ सांगा म्हणून मागे लागली.

आणि ना… त्याचा प्लॅन ठरला होता मित्र-मैत्रिणींचा लोणावळ्याला जायचा. मग मी अंकिताला माझ्या तेव्हाच्या रूममेटला पटवून ठेऊन गेले होते. घरचा फोन आला तर काय सांगायचं वगैरे…” नमू आपला किस्सा अगदी रंगवून सांगत होती.

पण तुमची एंगेजमेंट तर झाली होती ना तेव्हा…” सायलीने प्रश्न केला.

हो… पण तू आमच्या पप्पांना भेटली नाहीयेस. लग्नाआधी असं आम्ही भेटतो वगैरे कळालं असतं तर झालंच असतं… मग तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे कसं मुलींना एक रूम घेतली होती आणि मुलांना एक, जास्त नव्हतो मुली आणि मुलं! मग मुली-मुली गेलो रूम मध्ये आवरायला आणि मी बाथरूम मधून बाहेर आले तर रूम मध्ये सगळा अंधार! मी त्यांना हाक मारतेय.. मग चाचपडत light लावली तर स्वप्नील तिथे. ह्या सगळ्यांना बाहेर पाठवून बसला होता. मग पुढचं समजून घ्या आता…” शेवटच्या वाक्याला नमू अगदीच लाजली!

मग एक एक करून निकिताचं कॉलेजच्या फेअरवेल पार्टीनंतर, सायलीचं कोणी घरी नसताना, इशा तर एकटीच फ्लॅटमध्ये राहायची… असे सगळ्यांचे लाजत-बीजत किस्से सांगून झाले. मग सगळ्या माझ्या तोंडाकडे बघू लागल्या.

तुमचं सगळ्यांचं छान छान रोमँटिक आहे गं… मी तर रडत होते!” मी सांगितलं.

काय?” सगळ्यांनीच एकदम आश्चर्याने विचारलं.

तो जाणार होता, आणि अजून वर्षभर तरी आमची भेट होणार नव्हती. खूप कष्ट करून बिल्डिंगच्या मागच्या झाडांमध्ये भेटलो. त्याने माझ्यासाठी छोटा टेडी-बेअर आणला होता. तो बघून मी रडायलाच लागले. कधी भेटणार आपण! म्हणून… हाहा… त्याआधी जणू काय रोज भेटत होतो! पण जवळ होतो हे माहीत होतं. मी रडताना बघून तो जवळ आला आणि माझे डोळे पुसले. हळूच एक kiss करून बाजूला झाला. मी थोडावेळ हँग झाले. “अजून एकच वर्ष मग.. आपलं ठरलंय, हो ना?” मी मान डोलावली. मग कुठून तरी कुणाच्यातरी चालण्याचा आवाज आला तर आम्ही चट्कन तिकडून पळालो… तो टेडी बेअर बरेच वर्षं होता माझ्याकडे… कुठे हरवला नंतर… खूप ठिकाणं बदलली राहण्याची…”

बरेच वर्षं? कुणाबद्दल बोलतेयस तू?” निकिता म्हणाली.

आदित्यबद्दल!”

“oh… अं… आम्ही तुला समीरचं विचारत होतो.” ईशा म्हणाली.

“Oh! … नाही… we haven’t kissed…”

अच्छा…” पुन्हा सगळे awkward silence मध्ये गेले.

अगं म्हणजे आम्ही फार भेटलोच नाही आहोत. ” मी उठून रूम मध्येच चालायला लागले.

का?” नमू

का…? असंच.” मी तिच्याकडे बघताच सांगितलं.

तो इथेच राहतो ना.. म्हणजे पुण्यातच ना…?” नमू

मग काय भेटणं गरजेचं आहे का दर वीकेंडला?” मी थोडीशी इर्रिटेट होऊन म्हणाले.

ऐक ना अनू… तू का करतेयस लग्न?” चिनुने विचारलं.

का करतेस म्हणजे? करायचं असतं म्हणून करतेय?”

हे बघ अन्ने… इतके वर्षं सगळं मनाचं करत आली आहेस ना? मग हि गोष्ट अशी का करतेयस?” तिने आपला ग्लास खाली ठेऊन एकदम सिरियस चेहरा करून विचारलं.

का? तूच म्हणत होतीस ना मगाशी मी किती lucky आहे वगैरे… लगेच इतका भारी मुलगा मिळाला…”

मी गम्मत करत होते.”

मी पण गंमत म्हणूनच लग्न करणारेय मग!”

“Don’t be Silly Anjali…” ईशा म्हणाली, “This is a lifetime decision.”

“SO? नमू… तू केलंस ना arranged मॅरेज? तू झालीस की settle.  चिने तू पण तेच करणारेस…”

हो पण आम्ही आधीपासूनच त्या गोष्टीसाठी रेडी होतो ना… तुझं तसं नाहीए…” नमू म्हणाली.

हो… म्हणजे we know, it’s not out place to say anything… पण तू एकदा विचार कर.” सायली म्हणाली, “Actually आम्ही गाडीतून येताना हेच बोलत होतो की किती चांगलं झालं की, you moved on so early… which is good… पण असं नाहीए वाटत. Don’t do something like this out of spite.”

काय करू मग?” मी एकदम खाली बसले. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्या बोलत होत्या ते सगळंच खरं होतं. मला नव्हतं माहित मी हे का करतेय. रडत रडत मी त्यांना आदित्यबरोबरच्या abrupt ब्रेकअप बद्दल  सांगितलं. मी घरी काहीच कल्पना दिली नव्हती आणि सरळ हो म्हणाले हे सांगितलं.. त्यांनीही मला मुर्खात काढता मला समजावलं. माझा डिसीजन काहीही असला तरी त्या कधीच judge करणार नाहीत वगैरे सांगितलं.

थोड्या वेळाने शांत होऊन मी मोबाईल हातात घेतला. आदित्यचा नंबर type केला, आणि save केला. सरळ SMS केला. “Hi, कसा आहेस?” रात्रीचे वाजले होते. उद्या सकाळी रिप्लाय येईल म्हणून फोन बाजूला ठेवला तर थोड्याच वेळात रिप्लाय आला. “hi, तू कशी आहेस?”

मी… मी मूर्ख आहे.” मी रिप्लाय केला. तर त्याचा अचानक कॉलच आला.

मी उचलून बेडरूम मध्ये गेले. तासभर बडबड करून झाल्यावर मी बाहेर आले तर जणी पेंगत होत्या. बाकी आपापल्या मोबाईल वर होत्या. मी चिनूला खेटून बसले आणि म्हणाले, “चिने… घरी तमाशा होणारेय बघ!”

का?” तिने डोळे मोट्ठे करून विचारलं.

मी आदित्यला प्रपोज केलं…”

“Whaatttt!!” म्हणून चिनू ओरडली तेव्हा सगळ्याच टक्क जाग्या झाल्या.

“He said yes!” असं म्हणताच सगळ्यांनी एकच गलका केला.

मगाशी औपचारिकपणे खाऊन उरलेला केक नमू घेऊन आली. “आत्ता खरं congratulations!!” असं तिने म्हणताच सगळ्यांनी केकवर सरळ आडवा हात मारला.

तोबरा भरून चिनू म्हणाली, ” मगाशी उगाच खोटं खोटं कौतुक केलं मी त्या समीर-फिमीरचं… तसा मला आदित्यच आवडतो!”

मग त्यानंतर घरच्यांची बरीच बोलणी खाल्ली. पुढचे ६ महिने त्यांना convince करण्यात गेले.  माई रडली, आई रडली, आज्जी रुसली, बाबा रागावले… शेवटी आदित्यच्या आई-बाबांनी मध्ये पडून माझ्या घरच्यांना समजावलं. तरी बरं माझी आणि समीरची एंगेजमेंट फार गाजावाजा करून केली नव्हती. पण ते सहा महिने घरातल्यांना फारच त्रास झाला माझ्यामुळं.

मग आता कशी जाऊ एकटी? मला मी आनंदी आहे हे दाखवलंच पाहिजे. आणि ते समोरासमोर नाही जमणार. फोनवर खोटं बोलू शकते… समोर नाही.”

शोभाने वहीत काहीतरी लिहून घेतलं.

पुन्हा थोड्यावेळाने मीच म्हणाले, “मी म्हणलं होतं ना… निर्णय चुकले की असं होतं? आणि मला अशी घाण सवयच लागली आहे. घाईत काहीतरी ठरवून टाकायचं, करून टाकायचं आणि नंतर पश्चाताप करायचा.

कधी कधी वाटतं, तो चान्स घ्यायला हवा होता. समीरशी लग्न करायला हवं होतं. आज माझं घरच्यांशी चांगलं असतं. सांभाळायचं तर आदित्यच्या पण घरच्यांना होतं, so तेही काही वेगळं नव्हतं. पण इथं आधीच सगळं माहित होतं.  तिथे एकप्रकारचं नावीन्य असलं असतं. त्या रात्री मी तो फोन केला तो माझा मूर्खपणा होता.”

हलकीशी मान डोलावून शोभा म्हणाली, “So अंजली, तू आत्ता मला जे सांगितलंस त्यावरून I could see that, त्या काही महिन्यांमध्ये तू त्याला विसरली नव्हतीस, थोडा वेळ गेल्यानंतर तुला तुमच्या चांगल्या आठवणी येत होत्या. तोदेखील तुला विसरला नव्हता, move on झाला नव्हता. And what happened that night was a moment of clarity for both of you. पण त्यानंतर ते आत्ता ह्या मोमेन्टला तुला त्यावर परत question करावं वाटतंय. I think we should take some more time to discuss it.”

सेशनची वेळ संपली होती.

तिथून परत जाताना रिक्षात बसून मला का कोण जाणे रडू फुटत होतं. काही वर्षांपूर्वी मी इतकं विचित्र, मूर्खासारखं वागूनही तो माझ्यावर प्रेम करत होता, आता काय झालंय नेमकं की सगळं संपतंय असं वाटतंय?

सत्र सहावे

“तू Visa साठी अप्लाय केलंयस?” बाहेरच्या खोलीत येत मी विचारलं.

‘गरम-पेया’चा ग्लास हातात घेऊन, लॅपटॉपला हेडफोन्स लावून काहीतरी बघण्यात तो मग्न होता.

मी प्रश्न विचारल्याचं त्याला कळलंही नव्हतं. मी सोफ्याजवळ जाऊन त्याचा खांदा हलवला. मग त्याने हेडफोन्स काढले आणि माझ्याकडे बघितलं.

“अजून गेले नाहीए मी… दुःखात एकट्याने दारू पीत बसायला!” मला विचारायचं होतं एक, पण जीभेला आधी टोमणा मारून घ्यायचा होता.

“आहे ते दुःख पचवायला म्हणून पितोय.” तोदेखील शिकला होता आता. माझ्याच संगतीचा परिणाम!

“एवढंच दुःख होतंय ना…? म्हणून तर सांगितलं होतं, decision घेऊन टाक. वेगळे झालो असतो, तर आता तुला पिताना थांबवणारंही कोणी नसतं आणि कुठे चाल्लायस वगैरे विचारणारंही कोणी नसतं.”

“ऐक ना… तुझं झालं असलं तर मी माझं सिरीयल बघू का?” त्याने माझ्याकडे थंड चेहऱ्याने बघितलं.

“का? इतर वेळेस तर कॉन्व्हर्सेशन महत्वाचं असतं की तुझ्यासाठी.”

“बोलायचं आहे का तुला… चल बोलूया.” त्याने गळ्यातले हेडफोन्स खेचून काढले आणि लॅपटॉप ढकलून तो माझ्याकडे बघत म्हणाला. त्याच्या टोनवरून तो चिडलाय हे मला कळलं होतं. पण मलाही आता पडती बाजू घेऊन गप्प बसायचं नव्हतं… काय व्हायचं ते होऊ दे!

“तू visa ला अप्लाय केलंयस? चांगलं आहे की… स्वतःची सगळी जोडणा करून घेतोयस तू, आणि मी मुर्खासारखी त्या “सेशन्स”ना जात बसलीय. स्वतःच्या करिअरची तर मी वाट आधीच लावून घेतली आहे.”

“कुणी सांगितलं तुला?”

“माझ्या बाबांनी! आणि हो! हेही छान आहे तुझं. मला सांगणं गरजेचं नाहीए. माझ्या घरच्यांना सांगून मोकळा झालास.  हे पुढचं पण सांगितलंस का? कि आपण ‘वेगळे’ होणार आहोत? oh…! नाही नाही… आत्ता मला कळालं. हा पण प्लॅन तू आधीच करून ठेवलायस. मला अचानक सांगायचं कि आता मी चाललो USला आणि मग माझं करिअर धाब्यावर बसवून मी यायचं तुझ्यामागे. पण तसं असेल ना तर तो तुझा गैरसमज आहे. मी नाहीए येणार कुठेही.”

“मी नाही चाललोय.” तो उठला आणि किचन मध्ये गेला.

“काय?” मी अर्धवट ऐकल्यासारखं विचारलं आणि त्याच्या मागोमाग गेले.

“मला तिकडचा एक प्रोजेक्ट मिळाला आहे आणि ६ महिन्यांसाठी तिकडे जायचं होतं. पण मी नाही म्हणून सांगितलं.”

“का?”

“नाही माहित मला” त्याने ग्लास मधली व्हिस्की सरळ सिंक मध्ये ओतली.

“का?”

“मला नव्हतं जायचं.” असं म्हणून त्याने नळ चालू करून ग्लास मध्ये फस्सकन पाणी सोडलं ते त्याच्या शर्टावर उडालं. चिडून एक तोंडातल्या तोंडात एक ‘Fuck!’ म्हणून तो बाहेर गेला.

मी मागे मागे जात विचारलं, “तुझ्यासाठी हे वर्ष महत्वाचं होतं ना पण… मॅनेजर व्हायचं. मग? माझ्यासाठी? आपल्या रिलेशनसाठी? एवढे उपकार केलेस तू?” माझा राग काही उतरत नव्हता.

“नाही. तुझ्यासाठी नाही. स्वतःला एवढी राणी समजू नकोस, कि सगळं तुझ्यासाठी करतील लोक.” नॅपकिन घेऊन त्याने ते शर्टावरचं पाणी पुसायचा प्रयत्न केला पण ते अजूनच पसरत होतं. इर्रिटेट होऊन त्याने तो नॅपकिन खाली फेकला आणि तसाच ओला शर्ट घेऊन सोफ्यावर बसला, आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, “आणि तुला ही गोष्ट नाही सांगितल्याचा राग येतोय? तुला?? तू अजिबात काही लपवत नाहीस ना माझ्यापासून. सगळं खरं खरं चालू असतं तुझं. नाही का?”

“काय लपवलंय तुझ्यापासून मी? मला असले उद्योग करायची काही एक गरज नाहीए”

“एवढा परका झालोय मी? काय केलंय काय गं मी असं?? की तू अशी वागतेस माझ्याशी? मी visaचं सांगितलं नाही म्हणून विचारतेस मला? साधं आपल्याला बाळ हवंय की नाही ह्यावर माझं मत पण नको आहे तुला?”

“काय?? बाळाचा विषय कुठून आला मध्येच?”

“का? तू नव्हतीस गेली अबॉर्शन करायला?”

मी डोळे फाकून त्याच्याकडे थोडावेळ बघत राहिले. “कसलं अबॉर्शन? What the f**k are you accusing me of?”

“तू 3 महिन्यांपूर्वी gynae कडे का गेली होतीस मग?”

मी डोकं चोळत म्हणाले, “तुला कसं कळालं?”

“त्या हॉस्पिटल मध्ये माझा ई-मेल id आहे. इतकं सगळं चोरून करायचं होतं तर ती पण काळजी घ्यायची ना अंजली”

“मी काही चोरून करत नव्हते. माझे पिरीयड्स लेट झाले होते, आणि I was sure की असं काही नाहीए, पण कुठल्या गोळ्या घेण्याआधी I just wanted to confirm.”

“आणि ही गोष्ट मला सांगण्याच्या लायकीची नाहीए? की तू फार इंडिपेन्डन्ट आहेस आता तर माझी गरज नाही?”

“हे बघ आपल्यात आधीच खूप प्रॉब्लेम्स चालू होते… हे आणि नवीन त्यात add करायचं नव्हतं मला?”

“प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स…  तुझं हे असलं वागणं प्रोब्लेमचं रूट आहे असं नाही वाटत तुला?” तो सोफ्यावरून ताड्कन उठला आणि रागात त्याने अंगातला ओला शर्ट काढून फेकला टीपॉयवर फेकला.

“कसलं वागणं, आदित्य? नाही मला पण कळू देत, कशी काय हि सगळी चूक माझीच आहे” मी एकाच ठिकाणी, कमरेवर हात ठेऊन उभी होते.

कसलासा विचार करत तो त्या फेकलेल्या शर्टकडे बघत होता. माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याने मलाच प्रश्न केला, “जर त्या दिवशी तुला कळालं असतं की बाळ आहे तर काय केलं असतंस?”

“नाही माहित मला!” मी चिडूनच बोलले.

तो अजून खालीच बघत होता, “म्हणजे तुला नको होतं… हो ना?”

“तो विषयच नाहीए चालू आता….”

“मग कशावर बोलायचं अंजली?” आता त्याने माझ्याकडे बघितलं, “काय खुपतंय त्यावर बोलायचंच नाही म्हणून इतके दिवस गप्प बसलोय ना. तुला अजूनही असंच वाटतंय ना की मी माझ्या हातात steering ठेऊन आपलं सगळं चालवतोय?”

“हो वाटतं मला तसं…”

“पण नाहीए तसं… कारण मला दोष देणं सोपं आहे. तोंडावर, मनातल्या मनात… आणि स्वतःच्या गोष्टींना काणाडोळा करून तू खुश आहेस”

“मी खुश आहे… मला हे सगळं आवडतंय… वाह! म्हणजे तुझ्या आयुष्यातली डायन आहे म्हण की मी”

“कशाला तिरके शब्द वापरतेस…”

“मी तिरके शब्द वापरतेय? तू मला दोन महिने हि गोष्ट पोटात ठेऊन आज विचारतोयस, मला accuse करतोयस की मी अबॉर्शन करायला गेले होते, माझ्या चुका मला दिसत नाहीत आणि मी फक्त तुला दोष देऊन खुश राहते… आणि तुझं काय आहे? तू मला कशासाठीच दोष देत नाहीस?”

“नाही… कारण सगळ्या चुका माझ्याच असतात ना अंजली… मी तुला करिअर बदल म्हणलं ही चूक, का कारण मला वाटत होतं की आपल्याला एकत्र राहता येईल. मी इथे घर घेतलं हि चूक, आई-बाबांना इथे आणलं ही चूक…

“आणि त्यांना इथून घालवलं ही माझी चूक!”

तो डोकं हातात धरून बसला आणि म्हणाला, “कधी कधी वाटतंय हे लग्न करून चूक केली!!”

“बोललास ना मनातलं… थँक्स!”

“तुला जो विचार करायचा तो कर… मला नाही अजून विनवण्या करायच्या” तो पुन्हा लॅपटॉप कडे वळला.

मी बेडरूम मध्ये गेले आणि दरवाजा खाड्कन लावून आतून कडी लावली.  झोप तर लागणार नव्हतीच. पण तोंड नव्हतं बघायचं एकमेकांचं. झोपेल तो गेस्ट बेडरूम मध्ये.

ठकठक! दरवाज्यावर त्याने बोट आपटलं. “अनु… उघड दरवाजा. मला बाथरूमला जायचंय.”

“दुसऱ्या बाथरूम मध्ये जा.”

“माझा साबण त्या बाथरूम मध्ये आहे.”

“दुसरा साबण वापर मग…”

“जोरात आलीय मला… उघड प्लिज!”

मी दरवाजा उघडला आणि न बघता बेडकडे जाऊ लागले तेवढ्यात त्याने तसंच मला मागे खेचलं. मागूनच मिठीत घेतलं, मी सोडवायचा प्रयत्न केला पण तशी ताकद जास्त आहे त्याला. माझ्या खांद्यावर हनुवटी टेकवून तो म्हणाला “सॉरी!”

“मग तसं का म्हणालास मला?”

“मला पण राग आला… तू कधी कधी फार तिरकं बोलतेस…”

“Hmm… सॉरी!” माझा पारा देखील वितळला आणि मी उलट फिरून त्याच्या कुशीत शिरले.

मागे कधीतरी झालेल्या भांडणाचं aftermath मला आठवत होतं.

आज मी परत दाराकडे बघत बसले. पण काही हालचाल झाली नाही. थोड्यावेळाने उठून मीच दरवाज्याची कडी काढली. पण बराच वेळ तो आला नाही. तासाभराने उठून, मधल्या खोलीत मी डोकावून पाहिलं. तो तिथे झोपला होता.

नव्हता फरक पडत आता त्यालाही… कितीही भांडलो तरी रात्री एकमेकांना जवळ घेऊन झोपायचं हा नियम बनवला होता आम्ही लग्नानंतर काही दिवसांनी. घरात त्याचे आई-बाबा असल्यामुळं नीट भांडता यायचं नाही. बाहेर फिरायला जायचं निमित्त करून वाद घालून परत यायचो. पण रात्री एकमेकांच्या जवळ गेल्याशिवाय चुकल्यासारखं वाटायचं. म्हणून असा नियम केला होता. वीकएंडला दोघांना आवडतील अशा काही गोष्टी आठवणीने करायच्या, असाही नियम बनवला होता. हे सगळे नियम कधीच विसरून गेले, विरून गेले. आज दुसऱ्या खोलीत झोपायला त्यालाही काही वाटत नाही. आणि मलाही माघार घेऊन त्याला जाऊन चिकटायची इच्छा होत नाही.

का असं घाण विस्कटून ठेवलंय आम्ही सगळं.

लग्नानंतरचे सहा महिने नीट गेले. पण माझ्या डोक्यातले पूर्वग्रह अधे-मध्ये डोकं वर काढत असायचे. कदाचित आदित्यच्या आईचंदेखील तसंच होत असेल. मुलावरच्या प्रेमापोटी त्यांनी लग्नात मदत केली होती. पण त्याला त्या आधी वर्षभर दुखावल्याचं दुःख त्यांनाही सलत असेल, त्याने ब्रेकअप नंतर काय सांगितलं होतं माहित नाही. पण मला त्यांच्या मुलावरच्या अति-प्रेमाबद्दल जरा रागच होता. त्यामुळं असेल कदाचित, पण मला वाटायचं की माझी घुसमट होतेय. ‘स्पष्ट पण सौम्य’ शब्दांत बोलणं जमायचं नाही तेव्हा. (Huh! आणि माझं प्रोफेशन HR आहे!) मग नुसतेच डोक्यात विचार आणि मग जास्त झालं की खट्कन तोंडातून काहीतरी निघून जायचं.

साधारण वर्षभर चाललं हे असं, मग एक दिवशी त्याच्या आई-बाबांनी “एक गोष्ट बोलायची आहे…” असं म्हणून आम्हाला बोलावलं आणि ‘ते गावी राहायला जातायत’ असं सांगितलं. आदित्यने फार विनवण्या केल्या. मी कदाचित तितक्या केल्या नाहीत. करायला हव्या होत्या का?

कदाचित त्यांच्याशी हक्काने बोलले असते तर… सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून…  तो हक्क दाखवण्यासारखं आपण सासरच्यांना जवळचं का मानत नाही कुणास ठाऊक. कदाचित लहानपणापासून घरी तेच बघितलेलं असतं. सासूच्या सासूने देखील तेच केलेलं असतं.
वेळ उलटून गेली होती. डोक्यावरुन पाणी की काय म्हणतात तो प्रकार होता आता.

झोप लागलीच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी बॅग भरली. जेवण बनवत असताना आदित्यच्या बाबांचा फोन येत होता. मी उचलला नाही. हा अजून उठलाच नव्हता. मी मधल्या खोलीत जाऊन ओरडून सांगितलं, “तुझ्या घरच्यांचा फोन येतोय!” तसा तो खडबडून उठला. तोंड खळबळून येऊन सोफ्यावर बसत त्याने घरी फोन लावला.

“हो… जरा लेट झाला झोपायला…”

“ती काहीतरी कामात आहे…”

“अं… हो त्याबद्दल तुम्हाला सांगायचं राहिलं पप्पा… नाही जमणारेय आम्हाला यायला.”

अचानक मला आठवलं, उद्या माझ्या ‘in-laws’ ची anniversary होती, गेल्या आठवड्यातच फोन करून त्यांनी सुट्टी काढून या म्हणून सांगितलं होतं. आदित्यदेखील एक्सायटेड होता. कालचं भांडण झालं नसतं तर कदाचित जाऊन खोटं-खोटं नाटक करून आलो असतो कि आम्ही कसे खुश आहोत.

पण आज त्यानेच नाही म्हणून सांगितलं.

“नाही… माझंच जरा अर्जंट काम आलंय. त्यामुळं जमणार नाही यायला.तुम्ही करून घ्या सगळं नीट, जमल्यास बघतो पुढच्या आठवड्यात येऊन जाईन मी.”

त्याने तुटक सांगून फोन बंद केला.

मी किचन-कट्टा आवरून जेवण टेबलवर ठेऊन, आत कपडे बदलायला गेले. तो अचानक बेडरूम मध्ये शिरला, माझ्याकडे न बघताच बाथरूम मध्ये जाऊन त्याने स्वतःचा ब्रश आणला आणि बेडरूमचं दार लावून बाहेर गेला.

मी आरशात स्वतःला बघितलं. एक निसटतं हसू स्वतःवरच्याच दयेच्या रूपात सुटलं. आधी मी कपडे बदलायला आले, की मुद्दाम काही कारण काढून आतमध्ये यायचा. बरोबर कुर्ता, किंवा टॉप काढत असतानाची वेळ त्याला कशी कळायची नाही माहित. माझं तोंड आणि हात विचित्र अडकलेले असताना ह्याला मस्ती करायची संधी चांगलीच मिळायची. आधी घरचे इकडे होते तेव्हा तर नीट तोंड उघडून मला हसताही यायचं नाही. आणि साळसूदपणे दाराबाहेर जाऊन ‘कितीवेळ लावतेयस आवरायला?’ असं म्हणून चिडवायला त्याला मजा यायची.

मी कपडे आवरले, बॅग घेतली आणि बाहेर गेले. तो सोफ्यावर बसला होता.

“जेवण ठेवलंय टेबलवर, मी गावी चाललीय. आठवड्याभराची सुट्टी घेतलीय… परत येताना फोन करेन.” एवढं सांगून मी निघाले. त्याने काहीच reaction दिली नाही. मी दरवाज्याजवळ २ क्षण थांबून वाट पाहिली कि तो काही बोलेल. मागे वळून बघितलं तर कोऱ्या चेहऱ्याने तो माझ्याकडे बघत होता. जश्या कोऱ्या चेहऱ्याने मागे ब्रेक-अप झाल्यानंतर उठून गेला होता. माझं डोकं भणभणत होतं. मी निघाले.

बस-स्टॅण्डवर एकटीनेच ती बॅग ओढत नेताना, कुठली बस कुठे लागते हे बघताना, मला जाणवत होतं की गेल्या २-३ वर्षांत मी हे असले खटाटोप विसरून गेलीय. कशीबशी तिकीट काढून मी बसमध्ये बसले. त्याचा कोरा चेहराच डोळ्यांसमोर दिसत होता. सगळं पुन्हा पाहिल्यासारखं होईल असं अजिबात वाटत नव्हतं. कदाचित ते होतच नसतं, आपण सतत बदलत राहतो, आपलं जवळच्या माणसांसोबतचं नातंदेखील बदलत राहतं. काहीवेळा ते अजून घट्ट बनतं आणि काही वेळा नुसतंच आहे म्हणून मानायचं. माझं आणि आदित्यचं असं व्हायला नको होतं. कळत नाही कसं सावरायचं सगळं. बाहेरच्या माणसाचे कितीही उपदेश घ्या. जोपर्यंत मनातलं निघून जात नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. शोभाकडे अजून कितीही भेटी दिल्या असत्या तरी कालच्या भांडणात जे निघून आलं ते कदाचित आलं नसतं. त्याच्या मनात आत माझ्यासाठी एक बारीकसा द्वेष आहे, प्रेमापोटी तो लपवायचा प्रयत्न करत होता. असं करून काही उपयोग नाही ना. खुपणारे काटे उखडून काढलेच पाहिजेत. आणि मी एक काटाच आहे त्याच्या आयुष्यातला!

डोकं जड झालं होतं, खिडकीशेजारी बसून वाऱ्यात मला झोप लागली, ते जेव्हा गाव आलं तेव्हाच उघडली.

दरवाजात मला एकटीला बघून पप्पा थोडे दचकलेच. थोडा-वेळ कोणीच काही बोललं नाही. मीच किचनमध्ये जाऊन डब्यातलं जेवण गरम करून पोटात ढकललं.

मग मीच विषय काढला. मम्मी आणि मी खूप बोललो. मी त्या दोघांना माझ्या चुका सांगितल्या. आदित्यचं आणि माझं बिनसलेलं सांगितलं. दोघांनीही शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी देखील सांगितलं की काही गोष्टी त्यांनाही खटकल्या होत्या, पण नंतर सगळं ठीक होईल असं त्यांना वाटत होतं. त्यांनी म्हणूनच मध्ये-मध्ये लुडबूड केली नाही. खूप दिवसांनी मनातलं बोलून आम्हा तिघांनाही बरं वाटत होतं. माझी हक्काची माणसं आहेत अजूनही हे पाहून मला सतत गहिवरून येत होतं.

“आदित्य नाही आला म्हणून काय झालं? लेकीचं कौतुक करायचं नाही असं थोडीच आहे” असं म्हणून रात्री मम्मीनी पुरण-पोळीचा घाट घातला.

जेवून झाल्यानंतर पप्पांनी आदित्यला फोन लावला, “मम्मीची तब्येत बिघडलीय आणि उद्या सकाळी ताबडतोब ये” असा निरोप दिला.

बिचारा रात्रभर काळजी करेल, पण त्याशिवाय तो देखील जागचा हलायचा नाही, हे पप्पांनाही माहित होतं. सकाळी आठलाच बेल वाजली आणि मी दार उघडलं तर आदित्य दोन मिनिटं तिथेच उभा राहिला.

“मीच आहे, अजून भूत नाही झालंय माझं…” मी दार उघडं ठेऊन आत येत म्हणाले.

“तू… मम्मी कुठाय?” मागोमाग आत येत त्याने विचारलं. त्या आपल्या सोफ्यावर चष्मा लावून निवांत पेपर वाचत बसल्या होत्या.

तो त्यांच्याजवळ जाऊन बसला आणि थोड्याश्या impatient स्वरात त्याने विचारलं, “काय झालं मम्मी तुला?”

“काय? अरे आलास तू? मला कुठे काय झालंय?”

“मग पप्पांनी असा काय फोन केला? पप्पा…” त्याने हाक मारली. “रात्री मला पप्पांचा फोन आला… तुझी तब्येत… पप्पा…?”

“आलो, आलो…” पप्पा पूजा संपवून बाहेर आले.

“हा काय प्रकार आहे पप्पा… तुम्ही खोटं काय सांगितलंत?”

“मग… त्याशिवाय तू आला असतास का?” पप्पा शांत स्वरात म्हणाले.

“मी काल रात्रभर काळजीत…” आदित्य चिडला होता. “आणि ही… तू इकडे कधी आलीस?” त्याने माझ्याकडे पाहून विचारलं. “हिला पण असंच काही सांगून बोलावलं नाही ना?” हा प्रश्न पप्पांना उद्देशून होता.

“नाही, काल रात्री फोन लावताना मी इथेच होते.” मी हाताची घडी घालून उभी राहिले.

“का आली आहेस इथे?” तो थोडासा चिडला

“अरे आदित्य… तिचं घर आहे हे…” मम्मी म्हणाल्या.

“मम्मी मला हे असलं अजिबात नाही पटलंय. का असं करताय तुम्ही? मी तुमच्याकडे लक्ष देत नाही असं म्हणायचंय काय तुम्हाला?” आदित्य मम्मीकडे बघून म्हणाला.

“असं काही नाही वाटत आम्हाला ‘आदू’… काल गमतीत पप्पांनी केला तुला फोन…  बरं बाबा चुकलं आमचं… पण तुला त्रास व्हावा म्हणून नाही करत रे आम्ही हे सगळं. तिकडून निघून आलो तेही आम्हाला एकांत हवा होता म्हणून. तुला दुखवायचं म्हणून नाही… बघ मी ह्यांच्या आईची फार सेवा केली, तुझ्या मामीने माझ्या आईचं सगळं बघितलं…  पण म्हणून आमच्या सुनेनं तेच करावं असं नाही ना. उलट आता दोघं निवांत आहोत इथं. आणि हात-पाय ओट्यात येतील तेव्हा आहोतच की तुमच्या अंगावर ओझं… आतापासूनच कशाला…”

मम्मीचं बोलणं ऐकून, आदित्य अचानक उठून माझ्यापाशी आला, मला खांद्याला पकडून त्याने थोडं बाजूला खेचलं, “काय बोलतेय मम्मी? काय सांगितलंस त्यांना?? तू इकडे का आलीस? तू घरी जाणार होतीस ना? “

मी माझा हात सोडवून घेतला, “घरी जाणार म्हणाले होते, तू विचारलं नाहीस कुणाच्या ते. आणि त्यांना मी सगळं खरं सांगितलंय. “

“काय? आपण वेगळे होणार आहोत ते?”

“आपण वेगळे होणार आहोत? हे कोण म्हणालं?”

“what!! तूच तर म्हणत हो… what did you tell them?”

“की आपली भांडणं होतायत आणि आपण ते सायकॉलॉजिस्टचे सेशन्सही केले… मग आम्ही थोडा वेळ तुला नावंही ठेवलीत. की तूदेखील कसा कुढत राहतोस लहानपणापासून, एखादी गोष्ट बोलायला चांगलाच वेळ घेतोस, मीही सांगितलं की मला खरोखर तुझ्या फीलिंग्स सांगायला तू ३-४ वर्षं घेतली होतीस शाळेत. मज्जा आली तुझ्याबद्दल गॉसिप करायला, मम्मी आणि मी आधीच हे सगळं का बोललो नाही काय माहित.”

माझ्याकडे इर्रिटेटेड नजरेने बघून डोकं हलवत तो बाहेर गेला.

थोड्यावेळाने मी प्लेटमध्ये गरम पोळीवर तूप घालून घेऊन बाहेर गेले. पोर्चमधल्या झोपाळयावर हातात डोकं धरून तो बसला होता. मी पलीकडे जाऊन बसले.

“काय करतेयस तू नेमकं? मम्मी-पप्पांसमोर खोटं नाटक करायचं आहे का? कारण मला आता जमणार नाहीए हे.” डोकं हातातच ठेऊन तो म्हणाला.

“नाटक करायचं असतं तर सगळं सांगितलं नसतं ना मी… पण तू अजूनही सगळं सांगत नाहीएस मला…”

“काय सांगायचं आहे मी?”

“की तुला मम्मी-पप्पा इकडे येऊन राहिले ते आवडलं नव्हतं. आणि त्याचं कारण मी आहे असं तुला वाटतंय…”

“काय फरक पडतो ते सांगितल्याने, ते आलेच ना इकडे, आणि काय फायदा झाला? तुझ्या-माझ्यातला प्रॉब्लेम संपेल असं वाटत होतं, तो तर अजूनच वाढला ना?”

“हो बरोबर आहे… I am sorry…”

त्याने माझ्याकडे बघितलं.

“I am sorry, की मी मुर्खासारखी वागले. मी मम्मी-पपांना पण काल सांगितलं की मी जे फटकळपणे वागत होते, ते सगळं ह्यामुळं होतं की मला माझं सगळं आयुष्य तू ड्राईव्ह करतोयस, असं वाटत राहिलं, लग्नाआधीपासूनच. मीही सांगितल्या नाहीत बऱ्याच गोष्टी. कारण मीही स्वतःशी भांडत होते, माझ्या मनाप्रमाणे लग्न केलंय तर आता हे सगळं ऍडजस्ट करावं लागेल. आणि संवाद साधायला जायचं माझ्या जीवावर येतं, माहीतच आहे तुला… आपले आई-बाबा आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात हे मला तेव्हा कळलं जेव्हा त्यांनी इकडे यायचा निर्णय घेतला. पण कुठेतरी मलाही वाटत होतं की ही मिळालेली स्पेस आपल्यातले issues संपवेल. पण त्यानंतर तू अडून बसलास, बोलून न दाखवता मनात कुढत बसलास…”

“hmm… काय करायचं मग आता… पूर्वीसारखं तरी काही होणार नाही सगळं. मला खूप जाणवतंय हे.”

“म्हणजे… do you not love me anymore?”

“I do. म्हणून तर मी हा सगळा खटाटोप करत होतो. मी तुझ्यावर कितीही चिडून असलो तरी तू नसलीस तर नाही इंटरेस्ट वाटत कशात.”

“मग झालं तर… पूर्वीसारखं नकोच आहे आपल्याला. काय होतं धड? भांडतच होतो सतत…” मी झोपाळ्यावरून उठून त्याच्यासमोर उभी राहिले.

“तू करतेस माझ्यावर प्रेम?” त्याने माझ्याकडे बघत विचारलं.

“इथे का आले मग? आणि विशेष म्हणजे दोन वाजेपर्यंत मम्मी-पप्पांशी ह्या विषयावर चर्चाही केली… बघ ना किती सोपं होतं… हक्काने इथे घरी येऊन बोलले असते तेव्हाच तर… पण ते समजायलाच वेळ लागला. काही म्हण हां… ‘शोभा’मुळे माझं डोकं थोडं ठिकाणावर यायला मदत झाली. पण तू माझ्यापेक्षा सव्वाशेर निघालास. खूप खोदून विचारलं तरी शोभा तू तिला काय सांगतोयस हे सांगायची नाही… मला आधी वाटलं कि ते काय ते Patient-doctor privilege मुळे असेल. पण नंतर कळालं की तू माझ्यापेक्षा हट्टी निघालास आणि तिला काहीच नीटसं सांगितलं नाहीस.”

” काय सांगणार होतो… माझ्या बायकोला माझ्यावर विश्वास नाही?” त्याने माझ्या डोळ्यांत बघितलं.

” हं…” मी त्याच्या डोळ्यांत बघून म्हणाले, “अं… ते मी actually… Gynaeबद्दल मी सांगितलं नव्हतं, कारण कुठेतरी मला एक पुसटशी आशा होती… टेस्ट positive आली असती तर मी तुला सरप्राईझ द्यायचा विचार केला होता… पण तसं काही नव्हतं, जस्ट stress मुळे पिरियड्स…”

त्याने झटकन उठून मला मिठीत घेतलं. खूप दिवसांनी ती ऊब जाणवली. दाराकडे लक्ष गेलं, तर मम्मी लगबगीनं आत जाताना दिसल्या.

थोडावेळ झोपाळयावर एकमेकांच्या कुशीत शांतपणे बसलो. आणि तो म्हणाला, “आठवतंय का… काय काय नियम बनवायचीस आपल्यात?”

“हो.. आठवतंय ना…”

“मग एक नियम बनवायचा आज?”

“काय?”

“कसलीही साधी किंवा कितीही मोठी गोष्ट असेल आणि टोचत असेल तर ती एकमेकांना सांगायची… अगदी तुला माझा कधी कंटाळा जरी आला तरी तो सांग… मी  जाईन थोडावेळ लांब… जोपर्यंत तुला यावंसं वाटत नाही”

“Deal!” म्हणून मी हात पुढे केला.

काहीवेळाने दोघे आत गेलो. पप्पांनी सुगंधी अगरबत्त्या लावल्या होत्या, त्याचा सुवास दरवळत होता, मम्मी आतल्या आत खुश होत्या, पप्पा समाधानाने न्यूज बघत होते. उगाचच ते घर असं स्माईल करतंय असं वाटत होतं.

लेकासाठी म्हणून मम्मीनी काहीही घाई-घाईने स्पेशल बनवलं नाही. दुपारच्या जेवणाला काल रात्रीच्या पुरणपोळ्या मस्त गरम करून तूप ओढून संपवल्या.

पुराणपोळ्यांची एक निराळी मजा आहे नई? ताज्या असतात त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी मुरलेल्या जास्त चांगल्या लागतात, आणि उन्हात वाळवून करकरीत झालेल्या त्याहून बेस्ट! रिलेशन्सचंही तसंच असतं.

——————————————–The End—————————————————-

चिंगी (Chingi)

“आणि खूप मोठ्ठा पाळणा होता विनूमामा… तू आहेस बघ… तुझ्या तिब्बल मोठ्ठा. ” चिंगी आपले छोटे हात उंचावून उंचावून आपल्या किनऱ्या आवाजात सांगत होती.

“चिंगे… हात धर बघू… ते बघ रिक्षा आली.”

“तू असतास तर तू घाबरून रडलाच असतास… खरं मी नै घाबरले…” माझ्या कमरेपर्यंत पण उंची नसलेली पोरगी मला भित्रा ठरवून मोकळी झाली होती. तसा मी त्या giant wheelला घाबरतोच म्हणा. वरून खाली येत असताना पोटातले जठर, यकृत जे काही असेल ते अन्न-नलिकेतून बाहेर येईल असा वाटतं.

“अगं ए… थांब…” मी किंचाळलो. चिंगी एकटीच रस्ता क्रॉस करू पाहत होती. मी धावत जाऊन तिला मागे ओढलं. “चिंगे… हात धर म्हणलं ना? का देऊ दोन फटके? तुझी आई मला जिवंत ठेवायची नाही तुला काय झालं तर.” तिला मी कडेवर घेऊ पाहत होतो पण ती येत नव्हती. शेवटी तिचा हात घट्ट धरला आणि मी रस्ता क्रॉस करू लागलो.

“मला काई नाई होत.”

“मोठ्ठी आली… मला काई नाई होत”

“माझा हात सोड…” रस्ता क्रॉस झाला न झाला तोवर पळायची घाई.

ह्या चिंगीच्या घरी जाणं म्हणजे एक टेन्शनच. आमच्या घरातलं कोणीही दिसलं कि मागे लागायची ‘घरी घेऊन चल’. २ वर्षांची असल्यापासून. अगदी लहान होती तेव्हा पासूनच एकदम हरवाळ. एका ठिकाणी थांबायला तिला अजिबात जमत नाही आणि सांभाळता सांभाळता आम्हाला नाकीनऊ येतं. आमच्या घराच्या इथून ट्रेन्स दिसतात, त्याचं तिला फार कौतुक. शिवाय माझ्या आईची लाडकी! गोंडस चेहऱ्याची चिंगी आमच्या घरातल्यांचं एंटरटेनमेंट. तिच्या गोष्टी, तिची सगळ्या कामात पुढे पुढे करायची घाई, सगळंच एकदम गोड.

“पळू नकोस गं बाई… मी नाही बघ उचलणार पडलीस तर. तुझा समोरचा एक दात आधीच पडलाय. अजून एखादा पडला तर बस रडत”

“मी नैच पडत.” तिने पुन्हा एकदा मला धुडकावलं. “विनूमामा… मी तुला जोक सांगूss ?” आपला गुलाबी फ्रॉक हातात धरून डोलत ती म्हणाली.

“सांssग ?” ती पुढे गेल्यामुळं ओरडून बोलावं लागत होतं. तसंही रस्त्यात कोणी नव्हतं, त्यामुळे मलाही तिच्या जोक मध्ये भाग घ्यायला मजा येत होती.

“दोन हत्ती पोहत असतात काय… पण एक हत्ती जातो मग दुसरा बाहेर येतो… दुसरा जातो मग पहिला बाहेर येतो. “

“मगss ?”

“मग त्यांना एक मुंगी विचारतेss… तुम्ही दोघं एकत्र का जात नाई?”

“मगss ?”

“मग… हीहीही… मग तो हत्ती म्हणतो… हीहीही… “तोंडापुढे हात धरून ती आपलं हसू कंट्रोल करू पाहत होती. ते बघून आता मला हसू येऊ लागलं होतं.

“काय म्हणतो हत्ती?” मी पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखं विचारलं.

“तो म्हणतो… आमच्या दोघांच्यात एकच चड्डी आहे…. हीहीहीही…” ती परत पुढे पळू लागली.

प्लॅटफॉर्म जवळ आला तसं मी तिला म्हणालो, “चिंगे… थांब आपल्याला पुढून जायचंय.”

“नक्को विनूमामा… वरून जाऊन प्लिज प्लिज.”

आता हिच्यासाठी रुळावरच्या ब्रिजवरून जावं लागणार. मला अजिबात इच्छा नव्हती ते ३ मजले चढून उतरायची. आमच्या गावचा हा प्लॅटफॉर्म म्हणजे ऐतिहासिक नमुना होता. ब्रिजवर चढून जायच्या पायऱ्यांची शाश्वती नव्हती. ब्रिजवर ३ पेक्षा जास्त माणसं असली तर ब्रिज कोसळेल की काय अशी अवस्था होती, त्यामुळे जास्त कुणी इथून जात नसे. थोडंसं पुढून पायवाट होती तिकडूनच सगळे जायचे. पण ह्या बयोपायी आता हा इंग्रजकालीन ब्रिज चढावा लागणार. “ठीक आहे… पण माझा हात धरून चल. पुढे पळू नको. तिकडे वर कठडा नाहीए. चिंगे…” पण एवढं ऐकायला ती थांबतेय कुठे, ती पळू लागली. तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली देखील.

मला आता तिच्यामागे पळण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला मागून पळत येताना बघून तिने तिचा स्पीड दुप्पट केला.

“फ*!!” मी वेगात पायऱ्या चढायला सुरुवात केली. “थांब गं ए…”

“हीहीही…” ती खिदळत पळत होती.

१ मजला पळत चढूनच मी दमलो. “चिंगे… हळू पळ… मी नाहीए तुझ्यामागे येत.” पण हे ऐकायला ती माझ्या नजरेच्या कक्षात पण नव्हती. थोडासा श्वास घेऊन मी परत पायऱ्या चढू लागलो ,उरलेले दोन मजले चढून मी फायनली वर पोचलो. कठडा नसलेल्या कोपऱ्यालगत ती उभी होती. माझ्याकडे बघून थोडं guilty हसली आणि माझ्याजवळ आली.

“अगं… केवढं पळवलंस मला.” मी धापा टाकत म्हणालो.

“सॉरी सॉरी… मी कोकरू येऊ?”

“बरं… चल बस.” मी खाली बसलो, तिला कोकरू घेतलं आणि ब्रिजवरून चालू लागलो. अंधारून आल्यामुळे पुलावरचे २ मिचमिचे दिवे लागले होते. वारा सुटला होता. मी सावकाशच चालत होतो, “चिंगे… तुझ्या आईला मी तुझं नाव सांगणार आहे. तुला फटके दिले ना तर तुला कळेल मोट्ठ्यांचं ऐकायचं.”

ती एकदम गप्प झाली. “आणि आता घरी गेल्यावर TV वर ते फालतू छोटा भीम बघू देणार नाहीए मी तुला. match आहे आज”

“हां…”

“वाह… आज चक्क हां म्हणालीस? आईला नाव सांगणार म्हणल्याबरोबर?” मी तिला घेऊन ब्रिजच्या खाली उतरलो. “उतरतेस का खाली?”

“नको. तिथे ती बाई आहे”

ब्रिजच्या खालच्या दगडी कमानीत एक म्हातारी राहते. इथून न जाण्याचं अजून एक कारण. दगडी-पांढरे, सोडलेले केस. चेहऱ्यावर आलेले मोठे फोड,पडके दात ह्यामुळे ती जरा भीतीदायकच वाटते. मी तिला कधीच कुणाशी बोलताना बघितलं नाही. रात्री तिथून कोणी जाऊ लागलं कि ती दगड मारते, त्यामुळे रात्री कोणी जात नाही. म्हातारी आपल्या गाठोड्याजवळ मांडीत डोकं खुपसून बसली होती . माझी जरा फाटलीच होती. दगडी कमानीत एकच पिवळा दिवा होता. मी माझ्या मोबाईलचा लाईट लावायचा विचार केला पण त्याने म्हातारी जागी होईल असा विचार करून मोबाईल परत खिशात टाकला आणि सावकाशीने चालू लागलो. पण चालता चालता वाटेत पडलेल्या पत्र्याच्या छोटया कॅन वर माझा पाय पडलाच. तिने झर्र्कन डोकं वर काढलं.

आईचा घो! मी तिचा चेहरा इतक्या जवळून कधीच पाहिला नव्हता. तिची आणि माझी नजरा-नजर झाली. माझ्या छातीत धस्स झालं. मी जरा पटापट चालू लागलो. तेवढ्यात घोगऱ्या आवाजात ती ओरडू लागली.

“ए… कुणाला घिऊन चाल्लास. सोड तिला. लांब सोड. अबाबाबा….” तिने तोंडावर हात ठेऊन बोंबलायला सुरुवात केली. माझी चांगलीच टरकली होती. मी तिथून जोरात पळू लागलो. बराच लांब येऊन मी श्वास घेतला. चिंगीने चिक्कार शब्द काढला नव्हता तोंडातून.

“चिंगे… घाबरलीस काय गं?”

“होय… मला वाटलं तू मला सोडून जाशील.”

“असा कसा सोडून जाईन. पण डेंजरस आहे हं ती म्हातारी…तुला म्हणलेलं ना आपण पुढून जाऊ. तू ऐकत नाहीस, म्हणून असं होतं.”

“मी तुझं सगळं ऐकीन.”

“बरं उतर आता खाली.”

“नको… मी तुला आवडते ना?”

“हो…! आवडतेस तू मला.”

“मला आईकडं घेऊन चल विनूमामा”

“आँ… अचानक काय झालं तुला? आता नाही… आता अंधार झालाय ,गपचूप घरी चल आमच्या. तिकडेच जेऊन मग बाबांना फोन करू तुझ्या. “

ती एकदम गप्प झाली. “काय? जायचं ना घरी”

“हां..” म्हणून चिंगी मला अजून चिकटली.

“चिंगे जोक सांग की…” ती गप्पच होती.

काय झालं हिला? इतरवेळेस हातसुद्धा धरत नाही कधी आणि आता अंगावरून खाली येईना. तोंडाचा पट्टा कधी बंद नसतो आणि आता एकदम गप्प गप्प.

“काय झालं गं? गप्प का बसलीस?”

“विनूमामा… मी छान दिसते ना?”

“होय चिंगे… असं का विचा…” मी प्रश्न विचारता विचारता तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. डोळ्यांच्या खोबण्या मोठ्या वाटत होत्या. माझ्या गळ्याभोवतीचे तिचे हात पण कोरडे पडले होते. अचानक मला वाटलं कि मगाशीची म्हातारी अजून पण मागून बोंबलतेय.

मी आवंढा गिळला आणि तिला विचारलं, “चिंगे… मगाशी पायऱ्या चढून पळत गेलीस तेव्हा काय झालं? तू तिथे कठड्यालगत थांबलीस ना?”

“नाही विनूमामा मी खाली पडले.” ती उत्तरली.

कासव (Kasav)

“कसं काय आलं असेल हे आत?”

“एवढ्या पायऱ्या चढून येणं कसं शक्य आहे? केवढंसं आहे आणि! वितभर!”

“पण नेमकं कधी आलं?”

हॉलमध्ये टेबलाखाली बसलेल्या कासवाकडे बघून सगळ्यांची चर्चा चालू होती.

‘What do turtles eat’ असं मोबाईलवर search करत होतो तितक्यात छोट्या भावाने लहान टबमधे पाणी आणलं. त्याला उचलून त्यात ठेवलं. त्याच्यासमोर पालकाची पानं टाकली. आणि त्याने लगेच खायला पण सुरुवात केली.

तेवढ्यात शिंगाडे आज्जी त्यांच्या बागेतली मेथीची जुडी द्यायला आल्या.

“ह्या आशूला काय करावं? कशाला रे बिचाऱ्या कासवाला घरात घेऊन आलास?” टबमधल्या कासवाकडे बघून आज्जीनी सरळ भावाकडे मोर्चा वळवला.

“अहो नाही आज्जी, ते आपोआप आलाय. आम्ही बघितलं तेव्हा टेबलाखाली बसलं होतं!”

“आपोआप आलं? अरे पण इथं आसपास पाण्याचं डबकं सुद्धा नाही.” आज्जी आश्चर्याने बोलल्या.

“तेच म्हणतोय आम्ही पण. आणि ह्या बाहेरच्या पायऱ्या चढून कसं आलं काय माहित. बाकी कुठल्या बाजूनं घरात यायचा मार्गच नाही.” मी म्हणालो.

आज्जीनी इकडं तिकडं बघितलं. बाहेरच्या पायऱ्या बघितल्या.पटकन टबाजवळ येउन बसत म्हणाल्या, 
“पोरांनो… तुमची आई आली तुम्हाला भेटायला!”

त्यांच्या या वाक्यावर सगळेच फक्त शांत झालो.

“तुमच्या आईची पुण्याईच तेवढी होती. ती काय कुत्र्या-मांजराच्या जन्माला जाणार नाही. कासव होऊन तिच्या पोरांना भेटायला आली. बघा की, जवळपास पाणी नाही, घर एवढं उंचीवर. आणि दुसऱ्या कुणाच्या दाराला न जाता ते इकडंच आलं.”

बोलता बोलता त्यांनी मेथीची पानं खुडून त्याच्यासमोर टाकली.

डोळ्यातलं पाणी लपवायचा सगळ्यांनीच प्रयत्न केला.

आशुने पटकन टब उचलला. “भैय्या चल, विहिरीत सोडून येऊया ह्याला.”

“का? आपण सांभाळू की. मी बघतो काय काय लागतंय कासव पाळण्यासाठी. आपण आणूया ते ते सगळं” मी आवेगाने म्हणालो.

“नको. कासव असं बाहेरच्या पाण्यात जास्त दिवस राहत नाही. चल.” रस्त्यावर मिळालेलं कसलंही कुत्र्या-मांजराचं पिलू घरी घेऊन येणारा माझा लहानगा भाऊ शांतपणे कासवाला सोडून येऊया म्हणून सांगत होता.

दोघे विहिरीकडे गेलो. खालीपर्यंत उतरलो आणि त्याला शेवटच्या पायरीवर ठेवलं. त्याच्या डोक्यावरून बोट फिरवलं. दोघं तिथेच बसलो. पण ते पाण्यात जात नव्हतं.

“जा, जा पाण्यात…” असं म्हणून आशुने त्याला थोडं पाण्यात ढकललं. पण ते परत चालत पायरीवर येऊ लागलं.

आशुने माझ्याकडे बघितलं. मग त्याच्याकडे बघत म्हणाला, “आहे आम्ही व्यवस्थित, जमतंय हळू हळू आता सगळं करायला. तू काळजी नको करू. आम्ही आहोत ठीक” बोलता बोलता त्याचा आवाज जड झाला. मी त्याच्या पाठीवर हात टाकला. दोघांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.

त्या कासवाला खरंच त्याचे शब्द समजले की काय, ते हळू हळू पाण्यात परत गेलं. कि नुसताच योगायोग?

दोन दिवसांनी परत पुण्याला यायला निघालो. निघायच्या आधी एकटाच विहिरीकडे गेलो. डोकावून बघितलं, कासव कुठे दिसत नव्हतं. दोन मिनिटं थांबलो. थोडं इकडे तिकडे फिरून बघितलं. जायला निघणार तेवढ्यात खालच्या पायरीवर एक छोटं डोकं दिसलं.

ते माझ्याकडे बघत होतं आणि मी त्याच्याकडे. मनोमन नमस्कार करून पाणावलेल्या डोळ्यांनी मागे फिरलो.

टेक्नोलॉजीच्या जगातली माणसं मला खुशाल हसू देत. मला माहितीय माझी आई मला बघायला आली होती. मला “सुखी राहा” म्हणून सांगायला आली होती.

मनकवडी (Manakavadi)

ऑफिसला जात असताना काल एक छोटा मुलगा गाडीपाशी आला. एका हातात लाकडी खेळणं नाचवत दुसऱ्या हाताने काच ठोठावू लागला. काच खाली करून विचारलं, “काय रे?”

“सर… ये ले लो ना गाडी मे लगाने के लिये… बस ५० रु. मे है!” डूगुडूगु कंबर हलवणारी एक लाकडी बाहुली दाखवत तो म्हणाला.

“क्युं, क्या है इसमे खास?” सरळ नको न म्हणता मी उगाच वाकडा प्रश्न केला.

एक क्षणासाठी थांबून तो ३.५ फूट उंचीचा मुलगा म्हणाला, “सर, ये जादूकी गुडिया है”

“हां?? क्या जादू करती है?” अजून बरीच मोठी लाईन होती म्हणून मग मी पण त्याच्या गोष्टीत भाग घेतला.

“ये आपके मन की बात समझती है और जो मांगे वो देती है! अभी देखो, आप मांगोगे ना — ये सिग्नल छुटे — तो देखो १ मिनिट मी छुटेगा”

छोट्याने जी शक्कल लढवली त्याचं कौतुक वाटलं आणि ती बाहुली मी घेतली. Dashboard वर ठेवली. अगदीच वाईट नव्हती ती दिसायला. सिग्नल मधून बाहेर पडलो आणि फोन वाजू लागला. Mohit calling. “Shit, हा आता review चे updates मागणार गेल्या गेल्या. आज review meeting मध्ये मोहित नसायला हवा यार… माझ्या बाजूने बोलायचं सोडून मलाच तोंडघशी पाडतो साX” फोन न उचलता manager च्या नावाने मुक्ताफळं उधळत निघालो.

ऑफिस मध्ये शिरून फटाफट laptop उघडला. Review चा ppt उघडला. मोहितच्या डेस्कवर updates साठी जाणार तेवढ्यात mail चं notification आलं,

‘I am out of office. Not well. Sorry for short notice

Regards,

Mohit’

हे वाचून मी खुर्चीतच एक छोटी उडी मारली. अचानक त्या पोराचे शब्द आठवले, “ये जादूकी गुडिया है”

अरे… खरंच ऐकली की काय तिने माझी इच्छा?

दुपारचा Review पण आरामात झाला. Approval पण मिळालं. संध्याकाळी खुशीत निघालो. बाहुलीच्या फ्रॉकला टिचकी मारली. कंबर हलवत ती डुलू लागली. वाटलं, जणू म्हणतेय “सांग सांग, अजून काय पाहिजे?” स्वतःशीच हसत घरी निघालो. आज traffic पण नेहमीपेक्षा कमी वाटत होतं. जाता जाता करीमची बिर्याणी घेऊन जावी असा विचार आला. पण बायको ओरडणार ह्याची खात्री असल्यामुळे नुसताच मूग गिळून पुढे गेलो.

घरी येउन दार उघडतोय तोवर खमंग वास आला. हातातली bag न ठेवताच स्वैपाकघराकडे गेलो.

“Wow! चिकन बिर्याणी… तुला कसं कळलं?”

“रविवारी केली नाही तर केवढा मूड ऑफ झालेला तुझा… आज मीटिंग नव्हती ना, मग लवकर आले, म्हणलं बनवू आज” मी मनातल्या मनात बाहुलीला thank you म्हणलं. बायकोला सांगितलं नाही, तिने वेड्यात काढलं असतं. मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारून, रात्री दुपारच्या match चे highlights बघून ढाराढूर झोपलो.

रात्री मधेच दारावर ठकठक ऐकू आली. एवढ्या रात्रीचं कोण असेल? बाहेरच्या खोलीत जाऊन “कोण आहे?” असं जोरात ओरडलो.

तेवढ्यात एकदम झगमगाट झाला आणि… साधारण पन्नाशीकडे झुकलेल्या, घोळदार फ्रॉक घातलेल्या, हातात छडी घेतलेल्या ३ बायका बंद दरवाज्यातून गप्पकन आत आल्या. मी एकदम बावरलो.

घाबरत घाबरत विचारलं, “क- कोण तुम्ही?”

“आम्ही तुझी ती बाहुली न्यायला आलोय” तिघी एका सुरात बोलल्या.

“क-का?… कोण आहात तुम्ही?

“आम्ही फेअरी गॉडमदर्स आहोत!” जराशी स्थूल असलेली मधली बोलली

“काय्य्य?” मी किंचाळलो.

“अरे तू इतका ‘ढ’ आहेस का? दिसतेय न ही छडी, हा टियारा?” एक सडपातळ बांधा ती काठी डोळ्यासमोर नाचवत म्हणाली.

“पण तुम्ही इथे का आलाय?”

“आम्ही तुझी बाहुली न्यायला आलोय. ती मनातलं ओळखते आणि आपल्या wishes पूर्ण करते” तिसरी बोलली.

“पण तुम्ही Fairy Godmothers आहात ना? तुम्ही सगळ्यांच्या wishes पूर्ण करता ना? तुम्हाला कशाला हवीय बाहुली?” मी आता धीटपणाने बोललो.

“ हः…सगळ्यांच्या इच्छा आम्ही पूर्ण करायच्या आमच्या कोण करणार? आणि तसं पण तुझ्याकडे आहे न अजून एक बाहुली. तुला हि कशाला हवीय?” स्थूल.

“हो. दे आम्हाला.” मध्यम

“जादूकी गुडिया!” सडपातळ.

“अहो नाहीये दुसरी माझ्याकडे, आजच सकाळी घेतलीय मी विकत. मी नाहीये देणार.” मी ठणकावून सांगितलं. तिघींनी डोळे मोठ्ठे केले.

“बघूच कसा देत नाही, पकडा गं ह्याला” स्थूल ओरडली.

मी बाहुली घेऊन पळू लागलो. अचानकच आमची लिविंग रूम मोठ्ठी झाल्यासारखी वाटली. एकीने कांडी फिरवली, मी खाली वाकून ती चुकवली. किचन मध्ये गेलो. lighter घेतला आणि त्यांना भीती दाखवू लागलो. सडपातळ ने सरळ कांडी फिरवली आणि lighter ची काकडी झाली. एकीने नुसता हात घुमवला आणि बर्फाच्या बाहुल्या भोवतीने तयार झाल्या. त्यातली एक बाहुली फोडून बाहेर पडलो. बेडरूम च्या दारावर धडका मारल्या. “ऋता… ऋता दार उघड” पण बायको दार उघडत नव्हती. त्या मागून आल्या.

“बास. खूप पाहिले ह्याचे नखरे.” स्थूल म्हणाली. तिने एकदा कांडी फिरवली. माझे पाय दोरखंडानी आवळले गेले. मी आडवा पडलो. इतक्यात हात पण आवळले गेले. ती बाहुली उडून सडपातळ च्या हातात पडली.

आणि झुप्प करून त्या गायब झाल्या.

आणि मी दचकून जागा झालो. अलार्म वाजत होता.

“Shit, स्वप्न होतं!” मी डोळे चोळले. “काय weird स्वप्न होतं यार. हे ऋताबरोबर Disney कार्टून बघणं बंद केलं पाहिजे.”

तोंड धुवून सरळ अंघोळीलाच गेलो. ‘असं का स्वप्न पडलं असेल?’ असा विचार करत अंघोळ संपली आणि लक्षात आलं टॉवेल न घेताच आलो. ऋताला हाक मारणार तेवढ्यात बाथरूम च्या दारावर ठकठक झाली.

“अहो गोकुळराव, टॉवेल विसरलात तुम्ही. घ्या.”

आवरून टेबलवर बसलो. काल सगळी बिर्याणी संपवून पण आज जाम भूक लागली होती.

गरमागरम चहा आणि पोहे बायकोने समोर ठेवले. “मला मगाशी भूक लागली होती. मग मी खाऊन घेतलं” चहा प्यायला टेबलवर बसत ती म्हणाली.

“ए ऋता, तू मला उगाच त्या कार्टून फिल्म्स बघायला जबरदस्ती करत जाऊ नकोस हं!”

“आं, हे काय मधेच? कार्टून फिल्म्स! आणि तुला अजिबातच नाही आवडत का कार्टून्स? हुः नको बघत जाऊ उद्यापासून.” puppy face करत ती म्हणाली. चहा संपला तसं उठून बाहेर गेली.

“ऋतू… पेप…” मी वाक्य पूर्ण करणार इतक्यात आत आली

“काय बाई ह्या हेडलाईन्स. सकाळी सकाळी depression येतं. तूच वाच हे” माझ्या हातात पेपर देत ती म्हणाली. मी पटकन तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिने नजरेनेच “काय?” विचारलं.

पेपर चाळून, चहा पिउन उठलो. कुठला शर्ट घालायचा म्हणून कपाट उघडलं.

“तुझा शर्ट ठेवलाय बघ इकडे बाहेर. कालचा शर्ट किती मळवलायस रे? ऑफिसला जातोस कि रस्ता बांधायला?” स्वतःच्या ड्रेसला इस्त्री करून ठेवत बाहेरच्या खोलीतून ती बोलली.

एकदम तिच्यापाशी गेलो. तिला जवळ ओढलं. कुशीत घेतलं. तिच्या गालावर हात ठेवला. “Sorry…” तोंडातून एकच शब्द बाहेर पडला.

डोळे मोठ्ठे मोठ्ठे करून, भुवया उंचावून तिने विचारलं, “काय रे काय झालं? इतकं काही नाही. लौंड्रीला देईन फारतर.”

“नाही, त्यासाठी नाही. माहित नाही कशा-कशासाठी.… काल इतकी छान बिर्याणी बनवली होतीस तर मी साधं Thank you पण म्हणलो नाही. सकाळपासून किती काय काय करतेयस न सांगता. तुला कितीतरी गोष्टी न बोलता कळतात. आणि ते मला कळलं नाही त्यासाठी.

आत्ता मला कळलं, त्या काय म्हणत होत्या. माझ्याकडे already एक बाहुली आहे. आणि मला कळलंच नाही.
तू आहेस माझी ‘मनकवडी बाहुली’!”

“कोण त्या? बाहुली कसली?” कपाळावर प्रश्नचिन्ह ठेऊन ती विचारत होती.

तिच्याकडं नुसतंच कौतुकानं बघितलं आणि मिठी अजून घट्ट केली.

चित्तरणी (Chittarani)

“फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बरं पोरांनो,” नातू आज्जी आपल्या व्हील-चेअर वर बसून समोर मांडून बसलेल्या ‘चिल्ड्रेन्स वॉर्ड’ मधल्या पोरांना सांगत होत्या. नातू आज्जींची नुकतीच जॉईंट-बायोप्सी झाली होती. आता results येईपर्यंत त्या दवाखान्यातच होत्या. म्हणजे मुलानेच ठेवलं होतं. घरी कोणी बघणारं नाही म्हणून. आता इचलकरंजी सारख्या छोट्या शहरातलं हॉस्पिटल म्हणजे काही पुण्या-मुंबईच्या बड्या रुग्णालयांसारखं नसलं तरी मूलभूत सुविधा सगळ्या होत्या. पण मोठ्या शहरातल्या ‘विभक्तपणा’चा शिरकाव मात्र छोट्या शहरात झपाट्याने झाला होता.

पण आज्जी उगाच एखाद्या दुःखाला कुरुवाळत बसणाऱ्यांपैकी नव्हत्या. ‘आपलं नशीब, दुसऱ्या कुणाला कशाला दोष द्या’ असं म्हणून त्या विषय सोडून द्यायच्या. नर्सने त्यांच्या अंगात चढवलेल्या हिरव्या गाउन मध्ये तशा त्या cute च दिसत होत्या, शिवाय हॉस्पिटल मध्ये येताच त्यांनी मुलांशी गट्टी जमवली होती. सध्या काविळीची साथ चालू होती त्यामुळं लहान मुलांची वर्दळ वाढली होती.

“महानंदनगरी राज्याच्या राजासमोर एक भलामोठा प्रश्न पडला होता.” त्यांनी आपले हात आणि डोळे हलवत पुढे सांगायला सुरुवात केली. “महानंदनगरी एका घनदाट जंगलाच्या शेजारी वसली होती… त्या राज्यातून दुसऱ्या राज्यांना जोडणारा एकच रस्ता होता आणि तो त्या जंगलातून जायचा. मग ह्या राज्यातल्या लोकांना समजा व्यापार करायचा असेल, किंवा लेकी-बाळींना माहेरी जायचं असेल तर त्याच जंगलातून जावं लागायचं. आता तुम्ही पोरं म्हणाल, ‘मग काय त्यात, जायचं की जंगलातून!’ पण ते तितकं सोप्प असतं तर राजासमोर भलामोठा प्रश्न पडला असता का? नाही. का? तर, त्या जंगलात एक मोठी समस्या होती.”

“समस्या म्हणजे काय रे?” एका कार्टीने तिथल्याच एका मित्राला प्रश्न केला.

“समस्या म्हणजे प्रॉब्लेम, प्रॉब्लेम”, आज्जींनी स्पष्टीकरण दिलं, “तर प्रॉब्लेम असा होता कि त्या जंगलातून लोकं जेव्हा यायची किंवा जायची तर परत आल्यानंतर ती वेगळंच वागू लागायची. म्हणजे त्यांच्यावर कसलाच फरक पडत नसे… ती लोकं काही बोलायची नाहीत. काही करायची नाहीत. त्यांचे चेहरे पांढरे फट्ट पडलेले असायचे. आणि ते चालायचे नाहीत, तर रांगायला लागायचे. जेवण सुद्धा अधाशासारखं खायचे. आणि हा सगळा वेडेपणा काहीच दिवस चालायचा कारण थोड्याच दिवसात कुठेतरी परसदारी, कुणी उकिरड्यावर, कुणी विहिरीत अशी त्यांची प्रेतं सापडायची.” हे सांगताना आज्जींचा आवाज आपोआपच हळू झाला.

“ओ आज्जी… काय पोरांना गोळा करून बसलाय इथं!?” मागून एक खरबरीत पण वरच्या पट्टीतला आवाज आला.  “ए सरका रे पोरांनो. ए जिया, तुझी आई शोधाल्या बघ तुला.” अंजनाबाई हातात तो मोठ्ठा मॉप घेऊन त्यांच्याजवळ येऊन ओरडल्या. अंजनाबाई तिथल्या ‘स्वच्छता-सेवक’, त्यामुळे सतत वैतागलेल्या. त्यांना पाठीला जरा कुबड होतं, आणि एक डोळा ‘ललिता पवार’ सारखा त्यामुळं लहान मुलं जरा बिचकूनच असायची. त्यामुळे त्या अंगावर वसकून आल्यानंतर पोरं जिकडे-तिकडे पांगली. मग त्यांनी स्वतःशीच बडबड सुरु केली, “जिकडं-तिकडं नुसता पसारा, घाण… तिकडं १०६ मध्ये त्या म्हाताऱ्यानं वकून ठेवलेलं, ते बी मीच साफ करायचं. ती छमक-छल्लो नुसती डॉक्टर समोर गोड गोड वागती.”

आता हि छम्मक-छल्लो म्हणजे आरती नर्स. आरती नर्स तशी मनमोकळ्या स्वभावाची आणि सगळ्यांशी हसून-मिळून राहणारी. दिसायलाही नाकेली आणि गोरी. त्यामुळं अंजनाबाईंना थोडी “समस्या” होणं साहजिक होतं. अंजनाबाई शिकता शिकता राहिल्या, नाहीतर त्यांनापण नर्स व्हायचं होतं. जगभराला शिव्या देत देत त्या खोली झाडत असतानाच अचानक दुसऱ्या खोलीतून कुणीतरी हंबरडा फोडला. नातू आज्जी गचकन दचकल्या. त्यांच्याच खोलीतील दुसऱ्या बेडवरच्या एक बाई देखील कावऱ्या-बावऱ्या होऊन दरवाजाकडे पाहू लागल्या. अंजनाबाई हातातला झाडू फेकून दरवाज्याकडं पळाल्या. त्या खोलीकडे आधीच बरेच लोक धावले होते, त्यामुळे दाराबाहेर गर्दी झाली होती. अंजनाबाई दारातूनच परतल्या “१०६ मधलं म्हातारं गेलं” एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी त्या खोलीतल्या २ बायकांना माहिती पुरवली. आणि पुन्हा कामाला लागल्या. नातू आज्जी व्हीलचेअर वरून कशा-बशा बेडवर बसल्या होत्या, आता पुन्हा व्हीलचेअर वर बसून बाहेर काय गोंधळ चालू आहे ते बघण्याची ताकद नव्हती. “जरा चौकशी करून येताय का? कशामुळं झालं?” अशी बारीक आवाजात त्यांनी अंजनाबाईंना विनंती केली.

‘अवो कशामुळं काय… वेळ आली की माणूस जायचंच.” हे बोलून अंजनाबाई स्वतःवरच खूश झाल्यासारख्या लहानसं हसल्या. थोड्यावेळाने बाहेरचा गोंधळ कमी झाला. अंजनाबाई त्याच खोलीच्या दाराशी कुणाची तरी वाट बघत असल्या सारख्या उभ्या होत्या. तेवढ्यात किरण कंपौंडर तिथे आला.

“म्हातारं पांढरं फटक पडलं होतं बघ” असं काहीसं त्याने अंजनाबाईंना सांगितलं.

“रंभा होती का?”

“होती… म्हाताऱ्याच्या पोरीनं हंबरडा फोडला तेव्हा धीर द्यायला होती बसली तिथंच.”

“हं… नाटकं माराय नकोत होय लोकांसमोर…”

किरण कंपौंडर आणि अंजनाबाईंचं पटायचं. एक कारण ‘आरती नर्स’ असावी. आरती नर्स जॉईन झाल्यापासून किरण तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करायचा. आरतीही नवीन असल्याने त्याच्याशी गोडच बोलायची, पण एके दिवशी धीर करून त्याने प्रेमाची कबुली दिली तेव्हा मात्र तिने खूप मोठ्यांदा हसून त्यावर पाणी टाकलं. तेव्हापासून ‘मिळत नसलेली गोष्ट एकतर माणूस मिळवायचा प्रयत्न करतो किंवा तिला नावं ठेवतो’, त्यातला प्रकार झाला होता.

आज्जी कान देऊन पुढचं बोलणं ऐकत होत्या पण ते दोघे तिथून निघून गेले. आज्जींनी ‘नारायणा…’ म्हणून सिलिंग कडे बघून नमस्कार केला आणि जेवणची वेळ व्हायची वाट बघत बसल्या.

दुसऱ्या दिवशी परत २-४ टाळकी आज्जींकडे येऊन बसली. मग आज्जींनी पुढे सांगायला सुरुवात केली, “हां… तर बरेच दिवस कुणाला काही कळेचना कि हे असं सगळं कशामुळं चालू झालंय. लोकांनी वैद्य-दवापाणी करून पाहिलं, मंत्र-तंत्र करून पाहिलं पण ती लोकं काही सुधारत नव्हती आणि जगत ही नव्हती. पण एवढं मात्र कळालं होतं की त्या जंगलातूनच येता-जाता काहीतरी होत आहे. लोक त्या जंगलातून प्रवास करायला घाबरू लागले. वेग-वेगळे अंदाज बांधू लागले, जंगलात भूत पछाडत असेल, किंवा कसला तरी विषारी साप चावत असेल… एक ना दोन…! राजाने हैराण होऊन एक योजना केली, त्याने विचार केला कि आपण १०-१५ लोकांचे गट बनवू. ह्या लोकांना जंगलात पाठवायचं, आणि बघायचं काय होतंय. दुसऱ्या दिवशी राज्यात दवंडी पिटली, “ऐका हो एका…. १००० सुर्वणमुद्रा मिळवण्याची संधी… जंगलात जाण्यासाठी १०० शूरवीर तरुणांची निवड करण्यात येईल. त्यांच्या कुटुंबाला १००० सुवर्णमुद्रा देण्यात येतील… ऐका हो ऐका…”

मग काय सगळ्यांच्या घरी चर्चा सुरु झाल्या. लोक घाबरले होते पण पैशांचं लालूच दिसत होतं.

प्रत्येक घरातून एक मुलगा निघाला, पुढे परीक्षा देऊन त्यांना निवडणार होते. तिथल्या एक लहान गावात एक छोटंसं घर होतं आणि तिथे दोघं बहीण-भाऊ राहायचे. हरीश आणि हरिचंदना. आई-वडील काही वर्षांपूर्वी वारले होते त्यामुळं दोघा भावंडांनीच एकमेकांचा सांभाळ केला होता. आता हरिचंदना वयात आली होती. सुंदर दिसू लागली होती. तिचं लग्न आता लवकरात लवकर करणंच इष्ट होतं आणि लग्नासाठी पैसे साठवावे लागणार होते. त्यामुळं हरिचंदना नको म्हणून कितीही विनंती करत असली तरी हरीश त्या जंगलात जाण्यासाठी तयार झाला. हरीश आणि गावातले काही मित्र त्या १०० जणांच्या संघात सामील झाले आणि त्यांची तयारी सुरु झाली. तलवारीचे प्रशिक्षण, भाला आणि धनुष्य चालवायचे प्रशिक्षण, तिथे असताना दिसलेल्या गोष्टी टिपून कशा घ्यायच्या… अशी सगळी तयारी झाली. अखेर पहिल्या ३ गटांचा जाण्याचा दिवस उजाडला. त्या गटातल्या तरुणांचे आई-वडील, नातेवाईक त्यांना अलविदा करायला तिथे जमले होते. हरिचंदना देखील आली होती. ती आपल्या भावाला धरून ढसाढसा रडत होती, त्याला जाऊ नको म्हणून विनवत होती. पण सेनापतीची आज्ञा झाली आणि हरीश बहिणीचा हात सोडवून संघाबरोबर निघाला. १५-२० दिवसांचा प्रवास असणार होता. आणि त्यानंतर हे ३ संघ परत आले कि पुढचे ३ जाणार असं ठरलं होतं. पहिल्या ३ गटांमधले काही तरुण परतले, काही लागण झाल्यासारखे करत होते, काही जंगलातच मेले होते. तर काही गायब झाल्यासारखे कुणाला सापडलेच नव्हते. राज्यात सगळीकडे मरणकळा पसरली होती.”

“मरणकळा म्हणजे?” एका कार्टीने आज्जीला प्रश्न केला.

“म्हणजे असं दुःखाचं वातावरण झालं होतं. हरिचंदना आपल्या भावाची वाट बघत रोज देवाकडे प्रार्थना करत होती. ह्या मोहिमेचा राजाला मात्र फायदा झाला. त्या जंगलात नेमकं चालू काय आहे ह्याचा छडा हळू हळू लागत होता. जे लोक त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेत परतले होते, ते तिथल्या कहाण्या सांगत होते. एक जण राजाला म्हणाला, “महाराज आम्ही ४-५ जण शेकोटी पेटवून बसलो होतो, आणि आमच्यातला ‘मालोजी’ सतत एका दिशेने अचानक पाहू लागला. आम्ही त्याला विचारलं, काय रे काय बघतोस? तो म्हणाला ते बघ तिथे एक मुलगी दिसतेय. आम्ही त्याला वेड्यात काढलं आणि म्हणलं इथे कशी असेल मुलगी. पण तो ऐकत नव्हता. आम्ही बघायला लागलो कि तो म्हणायचा, आता नाही दिसत आहे. आम्ही सगळ्यांनीच थंडीपासून वाचायला थोडी थोडी मदिरा घेतली होती.”

“मदिरा म्हणजे?” मगाशीचीच कार्टी.

“म्हणजे तुझं नाक. गप्प ऐका.” आज्जीनी तिला गप्प केलं.

“हो आज्जी… ए तन्वी, गप्प बस गं” गोष्टीत रंगलेला एक मुलगा म्हणाला.

“तर त्याने पुढे सांगायला सुरु केलं, “महाराज… आम्ही मदिरा घेतल्यामुळे, मालोजीला असे भास होत असतील म्हणून त्याची खिल्ली उडवली. पण मालोजी आमचं काही ऐकेना. तो उठून त्या मुलीच्या मागे मागे जाऊ लागला. आम्ही थकलो असल्यामुळं आम्ही कोणीच गेलो नाही, आणि आम्हाला खात्री होती कि थोड्यावेळात परत येईल. आम्हाला झोप लागली. आणि सकाळी बघतो तर मालोजी अजून परतलाच नव्हता. आम्ही ३ दिवस जंगलात शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याचं प्रेत सापडलं.” असं म्हणून तो तरुण घाबरून रडू लागला. असं करत करत बऱ्याच गोष्टी राजाला कळत होत्या. कोणी शिकारीसाठी हरिणामागे पळालं. कोणी हिरे-माणके दिसतायत म्हणून जंगलात आत गेलं. कोणाला सुंदर मुलींचा घोळका दिसला तर गटातले सगळेच तिकडे गायब झाले. असं करत करत सगळे संघ संपले. पण तोपर्यंत राजाला ह्या प्रकरणाचा अंदाज आला होता. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर,तुम्ही सांगा बघू काय असेल त्या जंगलात?” आज्जींनी प्रश्न केला.

सगळी मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. मग आज्जीच पुढे म्हणाल्या, “त्या जंगलात एक चेटकीण होती…”

“हॉ… म्हणजे Witch ना?” जिया आ वासून म्हणाली.

“हा… तर त्या जंगलात एक भयानक चेटकीण राहायची… तिला असं कुणाचंही रूप घेता येत असे. एखाद्या लग्न न जमणाऱ्या मुलाला ती सुंदर तरुणी म्हणून दिसत असे, एखाद्या बाईला तान्हं मूल रडताना दिसेल, एखाद्या लालची म्हाताऱ्याला खजाना दिसेल. असं करून ती त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असे.”

“आणि मग?” आता मुलांना फार उत्सुकता लागली होती.

“हे काय चालू आहे इथे? नर्स… सगळ्या मुलांना जागेवर पाठवा.” कॉरिडॉर मध्ये मुलांचा घोळका आणि आज्जीना बघून डॉक्टर रागावले. मागून २ नर्सेस आल्या आणि मुलांना घेऊन गेल्या. “आज्जी तुम्ही देखील रूम मध्ये जा.” डॉक्टरनी नातू आज्जीना सांगितलं.

“काय झालं डॉक्टर, मी तर फक्त गोष्ट सांगत होते…”

“काही नाही… तुम्ही जा आत. हे असं बाहेर फिरू नका फार…”

“बरं…” म्हणून आज्जी आपली व्हीलचेअर फिरवू लागल्या. तेवढ्यात तिथे आरती नर्स आली. “डॉक्टर, तुम्ही बोलावलंत?”

“आरती… हे काय झालं ११ व्या वॉर्ड मध्ये. ह्या महिन्यातली ही तिसरी case आहे.”

नातू आज्जी अगदी हळू हळू पुढे सरकत कान देऊन ऐकू लागल्या.

“हो डॉक्टर… मला तरी काही कळेनाच झालंय. सकाळीच मी पेशंटला जेवण दिलं तर कधी नव्हे ते आज पेशंटने स्वतःच्या हाताने जेवण सगळं संपवलं, म्हणाली अजून भूक लागलीय. मी प्लेट भरून घेऊन जात होते तर मला अंजनाबाई तिथून बादली आणि पोछा घेऊन येताना दिसल्या. त्यांना विचारलं तर काहीच न बोलता फणकारात निघून गेल्या. आणि मी आज जाते तोवर पेशंटचा चेहरा हात-पाय पांढरे-फटक पडले होते.”

“सगळ्यांना चांगलं फैलावर घेतलं पाहिजे. आपल्या हॉस्पिटलचं नाव खराब होतंय आरती.”

“हो डॉक्टर…” आरती रडवेल्या आवाजात म्हणाली, “मला तर पेशंटच्या घरच्यांचं दुःख बघवत नाही… तुम्हाला माहितीय माझ्या आईचं सुद्धा…”

“आरती… सावर स्वतःला… झालं गेलं… तू म्हणूनच नर्स झालियस ना… तू आता नीट काळजी घे ह्या पेशंट्सची… माझं नाव खराब होतंय. आता पोस्ट मार्टम साठी पोलीस येतील… मी तिकडे बघतो.”

“हो डॉक्टर…” आरती नर्स गेली. आज्जी तिला पाठमोरी बघत होत्या. समोरून किरण कंपौंडर येत होता. तो आरतीकडे एकटक बघत होता. आरतीने मान खाली घातली आणि झपाझप निघून गेली.

किरणने आजींना बघितलं आणि म्हणाला, “काय आज्जी… पोचवू का?”

“काय?” आज्जी थोड्या घुश्श्यात म्हणाल्या.

“रूमवर? येतेय ना गाडी चालवायला? कि काही मदत हवीय.”

“काही नको… जमतंय माझं मला”

‘डॉक्टर म्हणाले ह्या महिन्यातली ही तिसरी केस, म्हणजे कालच्या म्हाताऱ्याच्या आधी देखील, कोणीतरी असंच गेलंय.’ आज्जी आपल्या बेडवर पडून विचार करत होत्या. ‘जरा आपण सावध राहिलं पाहिजे. प्रवीणला फोन करून बोलावून घेते. म्हणते, ने बाबा लवकर घरी. निशा असती तर तिनेच काळजी केली असती माझी. बिचारीच्या अडचणीच्या काळात मी लक्ष घातलं नाही… ह्यांची ढुंगणं धूत बसले. माझा मुलगा, माझा नातू करत बसले, हकनाक गेली माझी पोर.’ आजींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्यांची थोरली मुलगी कॅन्सर मध्ये वारली. तिच्या आठवणीने त्यांचं मन हळवं झालं.

“मिसेस निर्मला नातू कोण आहे इथे?” एक नर्स आतमध्ये येऊन म्हणाली.

“मी.” आज्जी बेडवरुन कष्टाने उठत म्हणाल्या.

“उद्या तुमच्या घरच्यांना बोलावून घ्या. रिझल्ट्स आले आहेत. तुमच्या जॉईंटचं ऑपेरेशन करावं लागणार आहे. उद्या त्यांची सही लागेल. सही झाली कि परवा दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळेल. वेळ करू नका म्हणून सांगा.”

आज्जीनी वर सिलिंग कडे बघून हात जोडले, देवा परमेश्वरा… लवकर सोडव रे बाबा ह्यातून.

संध्याकाळ झाली तशी आज्जींना कसली तरी अनामिक भीती वाटू लागली.  त्यांनी प्रवीणला- त्यांच्या मुलाला फोन करून उद्या यायची २-३ वेळा आठवण केली होती. आता पुन्हा एकदा फोन लावत होत्या पण प्रवीणने उचलला नाही. पलीकडच्या बाईंची मदत घेऊन त्या व्हीलचेअर वर बसल्या आणि कॉरिडॉर मध्ये फेऱ्या मारायला गेल्या. अंजनाबाई आणि किरण परत कोपऱ्यात उभे राहून काहीतरी कुजबुजत होते. आजींना उगाच वाटलं कि ते दोघे त्यांच्याच बद्दल बोलतायत. त्या दुसऱ्या बाजूला वळल्या आणि पुढे पुढे जाऊ लागल्या. लहान मुलांच्या खोली जवळ जाऊन त्यांनी आत बघितलं. त्यांना पाहून मुलांनी एकच गलका केला. ‘आज्जी गोष्ट पूर्ण करा ना… yayy आज्जी आल्या…’ लहान मुलांना खूश झालेलं पाहून आज्जींच्या मनावरचं मळभ दूर झालं.

“हो हो सांगते… कुठपर्यंत आलो होतो आपण?”

“जादूगारीण…” एक मुलगा ओरडला

“जादूगारीण न्हवे रे… चेटकीण! त्या जंगलात चेटकीण होती…” चौकस तन्वीने त्याला गप्प केलं.

“हा… तर त्या जंगलात एक भयानक चेटकीण राहायची… तिला असं कुणाचंही रूप घेता येत असे आणि ती लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असे. आणि त्यांना संमोहित करून त्यांच्यावर मंत्र म्हणून त्यांचा आत्मा काढून घेत असे आणि त्याचं दगडात रूपांतर करत असे. आत्मा काढून घेतल्यामुळं माणूस माणूस राहतच नसे. त्याची वागणूक जनावरासारखी किंवा त्याहीपेक्षा वाईट होत असे. त्या घनदाट जंगलाच्या मधोमध तिची हवेली होती. असं म्हणतात कि ती हवेली तिने अशाच आत्म्यांच्या दगडातून बांधली होती. चेटकीण वेगळं रूप घ्यायची, एखाद्याला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करायची. तिच्यात इतकी ताकद होती कि कोणीही तिच्या त्या स्वरूपाला आकर्षित होतच असे. आणि जे लोक असे एखाद्या अमिषाला भाळतात त्यांच्यावर आपला पूर्ण अधिकार आहे असे ती समजायची.  इकडे राजाला आता हा सगळा प्रकार कळला होता पण लोक घडलेल्या प्रकारामुळं खूप घाबरले होते. आता त्या चेटकीशी लढाईला जायला कोणी तयार होत नव्हते. त्या जंगलातून येणं जाणं पूर्ण बंद झालं. हळू-हळू त्या जंगलाचं नाव पडलं, ‘चित्तरणी’चं जंगल. राजाने आपल्या राज्याच्या वेशीभोवती मोठी भिंत बांधून घेतली.

इकडे हरिचंदना भावाची वाट पाहतच होती. तिचं लग्नाचं वय वाढत चाललं होतं, शिवाय कन्यादान करायला कोणी नव्हतं, त्यामुळं ती एकटीच आपलं घरदार सांभाळत होती. तिला राजाचा, लोकांचा आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्या चेटकिणीचा राग आला होता. शेवटी एक दिवस तिने स्वतःचीच निश्चय केला आणि ठरवलं की आपल्या भावाला शोधून आणायचं, जर तो नाही मिळाला तर एक तर त्या चेटकिणीला संपवून यायचं नाही तर स्वतःचा जीव द्यायचा. तिने तंत्र-विद्या शिकायला सुरुवात केली. तिथल्याच एका माणसाकडून ती गुप्ती चालवायला शिकली. एके रात्री कुणाला कळू न देता ती घरातून निघाली, तिने स्वतःबरोबर थोडं अन्न, हत्यार आणि तंत्रविद्या करून बनवलेलं एक द्रव्य घेतलं. तिने कुणालाही कळू न देता भिंतीखालून भुयार खोदून ठेवले होते. त्यातून ती बाहेर पडली.

ती जंगलात आत आत शिरली… अचानक तिला कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला. ती आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तिला दूर एका झाडाच्या पायथ्याशी कुणीतरी तरुण जखमी होऊन पडल्यासारखा दिसला. ती आपलं हत्यार बाहेर काढून त्याच्या दिशेने जाऊ लागली. तिला थोडं पुढे गेल्यावर तो चेहरा ओळखीचा वाटला, तो दुसरा कोणी नसून हरीशच होता. “हरीश!” ती आनंदमिश्रित आश्चर्याने ओरडली आणि त्याच्या दिशेने पळू लागली. ती त्याच्या जवळ पोहचली आणि ती त्याला हात लावणार एवढ्यात तिला काहीतरी गडबड जाणवली. ती मागे सरकली, आणि तिथूनच त्याला हाक मारली. “हरिचंदना….” अशी त्याने क्षीण आवाजात तिला हाक मारली. मग मात्र तिची खात्री पटली, कारण हरीश नेहमी तिला ‘चंदा’ म्हणून हाक मारत असे. तिने तिथे उभे राहून जोरजोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्राचा प्रभाव होऊन हरीशचे रूप घेतलेली चेटकीण तिच्या स्वतःच्या रूपात आली. तिचे पांढरे-राखाडी पिंजारलेले केस, छोट्या-मोठ्या टेंगुळांनी भरलेला चेहरा पाहून हरिचंदना किंचाळली, पण तिने स्वतःला सावरलं.
ती चेटकिणीला स्वतःच्या जवळ येऊ देत नव्हती. चेटकीण जवळ येण्याचा प्रयत्न करू लागताच ती चपळाईने दूर पळत होती. चेटकीण आता चिडली होती, तिने देखील जोरजोरात मंत्र ओरडायला सुरुवात केली, पण हरिचंदना देखील आपला मंत्र पुटपुटत राहिली. अखेर चेटकीण तिच्या चेहऱ्याजवळ येऊन तिला आपल्या पंजात पकडणार तितक्यात तिने आपल्या-जवळचं द्रव्य ‘चित्तरणी’च्या चेहऱ्यावर फेकलं. ती जोरजोरात ओरडू लागली कारण तिचा चेहरा भाजून निघत होता. मग हरिचंदनाने संधी बघून त्या द्रव्यात तिच्याजवळची गुप्ती बुडवली आणि तिच्या पोटात खुपसली. त्या नंतर मात्र चेटकीचं पूर्ण अंग जळू लागलं आणि थोड्याच वेळात ती राख होऊन खाली पडली. ”

“हॉ… ” पोरांच्या तोंडातून एकच उद्गार बाहेर पडला.

“मग हरिचंदनाने जंगलभर शोध घेतला, एके ठिकाणी तिला आपल्या भावाचं पांढरं-फटक शरीर निपचित पडलेलं दिसलं. डोळ्यातले अश्रू पुसत तिने त्याची चिता पेटवली. आणि मग एका पुरचुंडीमध्ये स्वतःच्या भावाची राख आणि दुसऱ्या कापडात चेटकिणीची राख घेऊन ती आपल्या राज्यात परतली. आपल्याच्या विजयाची गाथा तिने राजासमोर सांगितली. गावकऱ्यांनी तिचा जयजयकार केला. राजाने खूश होऊन तिला शहरात एक छोटा महाल बांधून दिला आणि स्वखर्चाने तिचं लग्न लावून दिलं…. आणि हळू हळू जंगलाचे रस्ते सगळ्यांना मोकळे झाले.”

“आई…” मागून एक राग-मिश्रित हाक आली. आज्जीनी मागे वळून पाहिलं. त्यांचा मुलगा आणि सून उभे होते. “कुठे कुठे शोधतोय आम्ही तुला…!” मुलगा रागावला होता.

“अरे काही नाही.. थोडा विरंगुळा म्हणून… पण काय झालं, तू तर उद्या येणार होतास ना?”

“हो, पण मी डॉक्टरना फोन केला, डॉक्टर उद्यादेखील available आहेत. मग आज डॉक्युमेंट वर सही झाली आणि पेमेन्ट झालं की उद्या सर्जरी होऊन जाईल.”

“हो का… बरं झालं बाबा… लवकर सोडवलंस रे परमेश्वरा…”

“आई तुमचं जेवण व्हायचं असेल ना? मी डबा आणलाय. तुम्ही खाऊन घ्या. आम्ही ते कागपत्रांचं काय ते बघून येतो. नर्स, ह्यांना कुठे जेवायला द्यायचं आहे.” सुनेनं नर्सला बोलावलं. आरती नर्स तिथे आली. “मी देते त्यांना जेवण… तुम्हाला डॉक्टर बोलावतायत.”

आरतीने आज्जींना जेवण दिलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या. आज्जीनी तिला अंजनाबाई आणि किरण बद्दल सावध केलं.

“फार आगाऊ आहे हं ती बाई, मला तर वाटतं हे दवाखान्यात काही-बाही चालू आहे त्या मागे त्या दोघांचाच हात आहे.

“मलाही तशी शंका येतेय हो आज्जी” आरती म्हणाली

“तू सावध राहा बाई… तुलाच अडकवायचे नाही तर”

“आजी, कावळ्याच्या शापाने चेटकीण थोडीच मरते…”

“तुला गाय म्हणायचंय का?”

“हाहा… तुम्ही त्या पोरांना चेटकिणीच्या गोष्टी सांगता ना, ती पोरं मला सांगतात सगळं.”

“हो गं… तेवढाच विरंगुळा… पोरांनाही मजा येते. पण खरंतर गोष्ट पूर्ण झालीच नाही…”

“म्हणजे…”

“म्हणजे, त्या हरिचंदनाने सगळ्या गावकऱ्यांना वाचवलेलं तर असतं… आणि लोक आता ये-जा पण करू लागले असतात जंगलातून. पण एक दिवस राजा जंगलात शिकारीला जातो… आणि २ दिवसांनी घोड्यावरून त्याचं प्रेत परत येतं!”

“बापरे…” आरती दचकते.

“असं म्हणतात की अजूनही चित्तरणी मेली नाही… तिने फक्त वेष बदलला आणि हरिचंदना म्हणून गावात फिरू लागली.”

“पण आज्जी हि गोष्ट जरा वेगळीच आहे… मी तरी कधी ऐकली नाही कुणाकडून. तुम्हाला कुठून मिळाली?”

“माझ्या आजीकडून मी ऐकली, तिने तिच्या आज्जीकडून… अशी परंपरेने आली आहे म्हणलीस तरी चालेल..” आज्जी स्वतःशीच हसल्या, “माझ्या आज्जीची तरी ठाम समजूत होती… कि आमचे पूर्वज त्या महानंदनगरी मधेच राहायचे…”

“हाहा… चांगलंय… बरं आज्जी,  पोट भरलं ना?… उद्या ऑपेरेशन आहे. आज निवांत विश्रांती घ्या.”आरती तिथून आवरून निघून गेली.

आजी लवकरच निघायचं ह्या खुशीतच आपल्या बेडवर आडव्या झाल्या. मुलगा आणि सून जाता-जाता भेटून गेले. आपण आपल्या घरी जाऊन आता काय काय करायचं ह्याचा विचार करत त्यांना झोप लागली.

दुसरा दिवस सर्जरीच्या गडबडीत गेला. पण सर्जरी नीट पार पडली. आजी पूर्ण दिवस anesthesia इफेक्ट मधेच होत्या. पण रात्री त्यांना बरं वाटत होतं डॉक्टरनी सांगितलं होतं कि अजून ४-५ दिवसात म्हणजे आज्जी घरी जाऊ शकतात. आजी शांतपणे झोपून गेल्या.

मध्यरात्री अचानक आजींना कुणाची तरी हाक ऐकू आली. आजींनी डोळे किलकिले करून पाहिलं आणि त्यांना असं वाटलं कि निशाच भेटायला आली. “निशा… “म्हणून क्षीण आवाजात त्यांनी त्या आकृतीला हाक मारली. ती आकृती अजून जवळ आली. आजींनी पूर्ण डोळे उघडले. खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात डोळे सरावायला थोडा वेळ लागला पण त्यांना तो चेहरा पूर्ण दिसला. ती निशाच होती.

“निशा… तू कशी इथे? नाही नाही… हे स्वप्न आहे… हे स्वप्न आहे…” त्यांनी स्वतःलाच समजावलं. पण तरी त्यांना आपला हात उचलून तिच्या गालाला लावला. अचानक त्यांना लक्षात आलं कि ती आरती नर्स आहे.

“आरती… तू आहेस होय.” आजी म्हणाल्या, “मला जरा पाणी दे गं… स्वप्न पडलं होतं बघ… असं वाटलं माझी निशाच आली भेटायला.”

आरती तिथे नुसतीच उभी होती. आजींनी तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि आरती पूर्ण तोंड उघडून हसली. त्या चंद्राच्या प्रकाशात तिचं ते हसू अंगावर काटा आणणारं होतं. आज्जी दातखिळी बसल्यासारखी तिच्याकडे बघत राहिल्या आणि आरती गोड आवाजात म्हणाली,

“निर्मला…  कावळ्याच्या शापाने चित्तरणी मरत नाही!”

विचारे मना (Vichare Mana)

“देवाने आपल्याला मेंदू देऊन चूकच केलीय.” गजबलेल्या रस्त्यावरून चालता चालता तो स्वतःशीच विचार करत होता.

“ह्या मेंदूमुळे माणसाचं आयुष्य अवघड होऊ बसलय. बरं दिला तो दिला, पोटापुरता द्यायचा ना. कशाला हे विचार बिचार करायची भानगड ठेवायची. ह्या कुत्र्या-मांजराचं कसं सोपं आहे. भूक लागली कि मिळेल ते खायचं. इच्छा झाली की गरजा पूर्ण करून घ्यायचा. पण माणसाने मात्र विचार करायचा. तो हातगाडीवाला काय विचार करत असेल, ‘सोडून द्यावा हा धंदा. जावं दूर कुठेतरी निघून..’ असं काहीसं चाललं असेल त्याच्या डोक्यात. पण मग त्याला घरात असलेलं तान्हं बाळ आठवत असेल, बायको आठवत असेल आणि मग तो विचार बदलेल. त्याच्या उलट हा भिकारी, त्याला फक्त आजचा वडापाव मिळतोय काय ह्याची चिंता असेल. प्रत्येकाला कसली ना कसली चिंता आहेच. मुलीला घेऊन त्या साडीच्या दुकानात घुसणाऱ्या बापाला पैश्यांची चिंता. मुलीला, नवरा चांगला असेल का नाही ह्याची चिंता. कुणाला नोकरी मिळत नाही- कुणाला नोकरी मानवत नाही. सगळ्यांनी फक्त कसली तरी चिंता करत राहायचं. माणसाचा जन्मच त्यासाठी झालाय बहुतेक. आम्ही सगळ्यांनी मागच्या जन्मी नक्कीच काही पापं केली असणार म्हणून माणसाच्या जन्माला आलोय.”

रस्ता ओलांडता-ओलांडता, पॅन्टला लावलेलं ID कार्ड पडलं ते उचलायला तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ कर्कश हॉर्न वाजला.

-“ए मुर्ख… कडेला हो ना” कार मधला माणूस ओरडला.

“काय संडासला लागलय काय तुम्हाला? एवढ्या जोरात चाललाय… हॅ हॅ हॅ…” स्वतःच्याच विनोदावर सिगरेट पिऊन पिवळे झालेले दात काढून तो हसला.

-“फालतू… मध्येच थांबलाय आणि वर मलाच बोलतोय… कशाला असली माणसं…” त्या गाडीवाल्याचं वाक्य पूर्ण ऐकू येण्याआधी तो वळून निघून गेला

“हा माणूस नक्की पुढच्या जन्मी भिकाऱ्याच्या जन्माला जाणार” पुढे गेलेल्या कारकडे बघून तो मनात म्हणाला.

“मागचा जन्म, पुढचा जन्म… बापरे माणसानं काय काय कल्पना करून ठेवल्या आहेत. ह्या जन्मात चांगलं कार्य करायचं म्हणजे पुढचा जन्म सुखात जातो म्हणे. कुणी ठरवलं चांगलं काय, वाईट काय? देवाने? देव तरी कुणी बनवला? आम्हीच की. मग आम्ही म्हणू तेच बरोबर. आज बसून त्रास होईपर्यंत दारू प्यायची हे बरोबर. पैसा पाण्यासारखा उधळायचा हे पण बरोबर. ड्रग्स करायचे, रेप करायचा, चोरी करायची. तशी पण इथे कुणाची कुणाला पडलेली असते. माझी तर कुणाला पडलीय.”

वाटेतल्या गणपतीच्या देवळासमोरून जाता जाता त्याने डोक्याला आणि छातीला हात लावून नमस्काराचा सोपस्कार केला.

“प्रत्येक जण विचार करतो आणि तो स्वतःचाच करतो. आपला फायदा कशात आहे, हे पाहिल्याशिवाय माणूस कुठलीच गोष्ट करत नाही. मग मी तरी स्वतःचा विचार केला तर कुठे चुकलं? शरीर दिलंय तर त्याच्याबरोबरच्या गरजा पण आल्याच. आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंतच तर करायचंय. हेच तर वय असतं म्हणतात ना, काहीतरी थ्रिल करायचं? शिवाय ह्या वस्त्या कशाला बनवल्या असत्या माणसानं? ओठांना भडक लिपस्टिक लावून, परकर ब्लॉऊज घालून बसतातच कि त्या. माझ्याकडे पैसा आहे आणि त्यांच्याकडे शरीर. दोघांचा पण फायदा!”

तो कॉर्नरला एका माडीवर जायला वळणार तेवढ्यात त्याची नजर एका बाईवर गेली. बाहेरच दूध पाजत बसली होती.

“कुणाचं असेल ते बाळ? कोणीतरी आला असेल आपली हवस शांत करायला, कसल्यातरी डिप्रेशन मधून बाहेर पडायला किंवा ब्रेकअप मधून सावरायला. किंवा नुसतंच थ्रिल म्हणून. माझ्यासारखं. त्याच्या या थ्रिलच्या नादात एका जीवाला जन्म घातला त्याने. बिचारं बाळ. त्याला बापाचं तोंडदेखील माहित नाही. काय करेल ते त्याला कळायला लागल्यावर?”

“मी तरी काय केलं होतं? माझा बाप आईला सोडून गेला तेव्हा मी तरी काय केलं होतं? चड्डीत मुतण्याशिवाय दुसरं येत तरी काय होतं मला? पण काही करावंच लागलं नाही. आईनेच केलं सगळं. चड्डी बदलली, घर बदललं, नोकऱ्या बदलल्या, स्वतःला बदललं आणि सोबत मला पण बदललं. देवाने आईला तयार करून एक बरं केलंय. सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकल्या आहेत. सगळ्या अडचणी, सगळ्या दुःखावर तिच्याकडे कसं काय औषध असतं काय माहित. सोपं आहे माझं आयुष्य तसं. इतके वर्षं खपून तिने ते केलंय माझ्यासाठी.”

“तिला आत्ता दिसत असेन का मी? रात्रीचं आभाळातनं बघतात म्हणे ते. ती बघत असेल तर तिला वाईट वाटत असेल नई. रडेल पण कदाचित, माझ्या बाबतीत हळवी आहे.”

माडीवर चढून तो त्या जाड्या बाईकडे गेला. बाळाला घेऊन बसलेल्या बाईची किंमत विचारली. घृणा आल्याचं तोंड करून बाईने जास्तीचे भाव लावले. तिच्यासमोर पैसे टाकून तो आत गेला. बाळाला कडेला ठेऊन ती बाई उठली. दाराची कडी लावून बेडवर येऊन बसली. तिच्याकडे ना बघता तो त्या शांत झोपलेल्या बाळाकडे गेला. खालचा ओठ बाहेर काढून निश्चिन्त पडलेल्या त्या छोट्या पोराला पाहून का कोण जाणे, त्याला तो पिवळट पडलेला फोटो आठवला. तरुण आई, तरुण बाबा आणि मध्ये चेहराभर तीट लावलेला एक गटटू. तो स्वतःशीच हसला. तिच्याकडे वळून त्याने तिला इतकंच विचारलं,

–“ह्याला माझ्याबरोबर घेऊन जायचं असेल तर कुणाला विचारायचं?”

मुग्धा (Mugdha)

मुग्धाने डोळे उघडले, आणि बेडवर उठून बसली.  जवळच्या टेबलवर ठेवलेल्या फोनमध्ये किलकिले डोळे करून बघितलं. ६.१५ झाले होते. तिने पाण्याची बाटली उचलली आणि घटाघट अर्धी केली. तिने डोळ्यांवर हात ठेवला. तिला निखिल पाठमोरा दिसला, तिच्यापासून थोड्या अंतरावर… कुठल्याश्या  टेकडीवर चालताना… आजूबाजूला उंच झाडं… तिला असं वाटत होतं की त्या झाडांतून कोणीतरी तिला बघत आहे. तिला भीती वाटली. तिने जोरजोरात निखिलला हाका मारल्या पण निखिल तिच्याकडे लक्ष न देता पुढेच चालला होता. ती घाई-घाईत पुढे चालू लागली. तिला पळावं वाटत होतं पण तिच्या पायांत शक्तीच नव्हती. “निखिल… निखिल…” तिने अजून जोरात ओरडून हाका मारल्या.  निखिलने मागे वळून बघितलं, काहीच एक्स्प्रेशन न देता परत तोंड फिरवून तो चालू लागला. तिला रडू येऊ लागलं. ती तशीच थांबली. पलीकडच्या झुडुपात हालचाल झाली आणि एक मांजर तिच्यासमोर झेपावली. मुग्धा खूप जोरात दचकली. आत्तासुद्धा!

“It was just a dream, Mugdha!”  ती स्वतःशीच म्हणाली.  तिने हातात डोकं धरलं. तिला रडावं वाटत होतं.. असं जोरजोरात.. ओरडून ओरडून… उगाच. पण तिच्या डोळ्यात धड पाणीही साठत नव्हतं.  तिने निखिलकडे बघितलं, त्याला शांतपणे गाढ झोपलेलं बघून तिला अजूनच राग राग झाला. खसकन त्याच्या अंगावरचं पांघरूण ओढून त्याला उठवावं असं तिला वाटून गेलं. तिने मोठा श्वास घेतला आणि बेडवरुन खाली उतरली. अचानक तिला गरगरल्यासारखं झालं. हँगओव्हर उतरला नव्हता. ती किचन मध्ये गेली आणि फ्रिजवरचा औषधांचा डबा उघडला, त्यात विस्कटून तिने ऍस्पिरिन शोधली, तिला पॅक सापडलं पण गोळ्या संपल्या होत्या. प्च! तिने पॅक खाली फेकलं. फ्रिज उघडून उगाच आत डोकावून बघितलं. वरच्या कप्प्यात अर्धा कापलेला लिंबू होता तो तिने घेतला. खाली पडलेलं ऍस्पिरिनचं पाकीट उचलून डस्टबिनमध्ये टाकलं. ग्लासमध्ये लिंबू पिळला आणि बाटलीतून संततधार पाणी ग्लासमध्ये ओतलं.


“नो.. नो… प्लीज.. oh.. okay!”   नको नको म्हणत असताना सुद्धा मर्लिनने मुग्धाच्या ग्लास मध्ये वाईन ओतली. “एन्जॉय…!” तिने स्वतःचा ग्लास उंचावला, मुग्धाने देखील स्वतःचा ग्लास उंचावला आणि उगाच over-friendly हसली. मर्लिन तिच्या मागून वळून Aleze  आणि Ken कडे गेली. मुग्धाने ग्लासमधे बघितलं, बापरे हे इतकं नाही संपायचं आपल्याला. तिने निखिलकडे बघितलं. हॉलमधल्या एका खिडकीजवळ उभा राहून निखिल कुठल्याश्या गोऱ्या म्हाताऱ्यासोबत हातवारे कर-करून बोलत होता. निखिलच्या टीममध्ये काम करणाऱ्या मर्लिनने काल डिनरला बोलावलं होतं. कोणाशीच ओळख नसल्यामुळं मुग्धा नुसतीच ऑकवर्ड बसली होती. शेवटी तिने ग्लास तोंडाला लावला.

“SO.. I was saying.. what’s wrong in believing in him. I believe he can make America great again!” मर्लिन आपल्या खुर्चीवर बसत म्हणाली.  

“Oh well..” आपल्या फ़्रेंच accent मध्ये आणि साखरेच्या आवाजात ‘एलिझे’ म्हणाली, “But he does all these silly talks…”

“So what… That makes him human. He doesn’t go on play pretend.”Ken मध्येच म्हणाला.

“Oh… hahah… you.. you two faced guy” ‘एलिझे’, ‘केन’ला कोपराने ढोसलत साखरेत बोलली.  

“I know right… He is human. And his wife also minds her own business. Not like Michelle. Oh.. look at me, I am so inspiring, I go on blabbering lengthy speeches… Look at my big ass..” मर्लिन हातवारे करून तोंड वेडावत म्हणाली. ह्यावर खूपच हशा पिकला. मर्लिनच्या जवळ बसलेली म्हातारी ‘कॅथरीन’ खूपच हसत होती. मुग्धाला ह्या चर्चेवर अजिबात हसू येत नव्हतं. पण तरी आपण conversationचा भाग आहोत हे दाखवण्यासाठी ती Fake स्माईल करत होती.

“No offense…”मर्लिन मुग्धाकडे बघत म्हणाली, “But someone needs to take charge right? You cannot please every-damn-body! You cannot be a kiss-ass all the time. Who is that China no no that Korean guy? That dictator… You need someone as crazy as him to oppose him.”

“Oh Marlene, Please! don’t start with that guy again… I better get off this table” असं म्हणत म्हातारी ‘कॅथरीन’ खूपच offend झाल्यासारखी उठली आणि आपला ग्लास भरायला लागली. मुग्धाला कळलंच नाही कि “No offense” म्हणताना मर्लिनने तिच्याकडे का बघितलं. तिला अजिबातच counter argue करायची इच्छा नव्हती. एकतर हि सगळी नवीन लोकं. आधीच आपल्याशी कोणी फार बोलत नाहीए. मर्लिनच्या पाणचट आणि उपरोधी बोलण्यावर तिला थोडा राग आला होता, पण व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणून तिने दुर्लक्ष केलं.  तिच्यापासून दोन खुर्च्या लांब बसलेली एक जाडी बाई उठून एका टेबलाकडे जाताना तिला दिसली. तिथे स्टार्टर्स ठेवले होते . मुग्धाने पण इकडे तिकडे बघून आपला ग्लास टेबलवर ठेवला आणि तिच्या मागोमाग जायला उठली. आपला ड्रेस तिने हाताने जरा खाली ओढला. उगाचच हा तंग ड्रेस घातला, गप्प आपलं जीन्स घालून आले असते बरं झालं असतं. सारखं आपलं मांडीवर मांडी ठेऊन बसावं लागतंय. थोडंसं नेटकं होऊन ती जाड्या बाईच्या मागे जाऊन उभी राहिली.

“Oooh! Chicken pops!” जाडी बाई स्वतःशीच बोलत, मध्येच काही गोष्टी चाखून बघत, प्लेट भरत सुटली होती. अचानक तिला तिच्या मागे असलेली मुग्धा दिसली.  “Eh.. hey… I didn’t notice you are behind me… by the way… I am Annabelle.”

डाव्या हातातली प्लेट सांभाळत तिने उजवा हात हॅन्डशेक साठी पुढे केला. हॅन्डशेक करता करता मुग्धा त्या बाईचा चेहरा न्याहाळत होती. Wow… बराच मोठा, गोल-गोल आणि फ्रेश चेहरा आहे ह्या बाईचा. ते सोनेरी केस पण बरे शोभून दिसतायत. “Your name?” तिने विचारलं.

“Uh… इट्स मुग्धा…”

“moo-a-what?”

“मुग–धा” तिने ह्यावेळेस जास्त क्लिअर सांगितलं.

“ओह.. ओके..” ऍनाबेलला अजूनही समजलेलं दिसत नव्हतं. पण तिने विषय पुढे ढकलला. “How do you know Marlene? From work?”

“No… no… my husband knows her. I mean… works with her” मुग्धा मान हलवत म्हणाली. तिचा नवरा आणि मर्लिन एका टीम मध्ये आहेत. मग तिने आम्हालाही बोलावलंय.  म्हणजे आम्ही काहीच महिने झाले इकडे शिफ्ट झालोय ना… तर मग मी जास्त कुणाला ओळखत नाही. वगैरे वगैरे… नर्व्हस होऊन बिनकामाची माहिती तिने ऍनाबेलला दिली.

त्या दोघी परत टेबलजवळ आल्या. “So, you work with Marlene too?” खुर्चीवर बसत मुग्धाने विचारलं.

“Umm… नो…” ऍनाबेलने तोंडातला घास २-३ वेळा चावून गिळला. “I live couple of blocks down the lane”

“Oh okay…”

मग ऍनाबेलने सांगितलं की तिचं जवळच एक छोटं ‘सॅलोन’ आहे . मर्लिन आणि ती खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मर्लिन तिची रेग्युलर कस्टमर आहे आणि त्यामुळे आम्ही फ्रेंड्स झालोय वगैरे वगैरे… तिने तिच्या पार्लरचं नाव आणि address मुग्धाला दिला. मुग्धासाठी ती special डिस्काउंटही देईल असं तिने सांगितलं.

“OKAY… enough about me…” असं फायनली म्हणून तिने मुग्धाला तिच्याबद्दल विचारायला सुरुवात केली.

“So, when did you get married?”

“About a year ago…”

“Was it all like they show in the movies? The dancing, the colors and all?” ह्यावर तिने बसल्या बसल्या अंग हलवून छोटासा डान्स केला.

“Yeah… some weddings are like that… ours was a little simple”

“Do you have pictures? Can you show me?”

“Yes… I have some…”

मुग्धाने आपला सॅमसंग उघडला आणि गॅलरीमधल्या ‘D-day’ नावाचा फोल्डर उघडला. त्यातले फोटोज ती स्वाईप करत ऍनाबेलला दाखवू लागली. ऍनाबेलने तिला “So, don’t you wear that red dress? And that… all that jewellery?” असं हातवारे करून विचारलं. मग मुग्धाने सांगितलं की त्यांचं लग्न ब्राह्मणी पद्धतीनं झालं, तो रेड ड्रेस म्हणजे लेहेंगा वगैरे जनरली नॉर्थ इंडियन्स घालतात.

“oh.. you look pretty in here.” तिचा नऊवारीतला मेकअप झाल्यावर पोज देऊन काढलेला फोटो बघून ऍनाबेल म्हणाली.

“हाहा.. थँक्यू!” मुग्धाला जरा छान वाटलं. ह्या ऍनाबेलमुळे तिला त्या डिनरमध्ये बसायला आता कमी ऑकवर्ड वाटत होतं. ती अजून काही आपल्या भारतीय विधींबद्दल सांगणार इतक्यात ऍनाबेल “Excuse me” म्हणून उठली. तिने मर्लिनला हाक मारून, ग्लास उंचावून अजून वाईन आहे का असं विचारलं. मर्लिन जागेवरून उठली, आणि ऍनाबेलला घेऊन एका खोलीत गेली.

मुग्धा समोरच्या चिकनचा एक तुकडा तोंडात टाकून आपलेच फोटो स्वाईप करत बसली. एक फोटो तिने थोडा झूम करून पाहिला. सासूचा चेहरा एरंडेल पिल्यागत दिसत होता. “हिला आणि काय प्रॉब्लेम झाला होता तेव्हा?” ती स्वतःशीच म्हणाली.

कशात ना कशात खोट काढायची सवयच आहे म्हणा… आमच्याकडे बाई असं, आमच्याकडे बाई तसं… अजून कुठल्या काळात राहते कुणास ठाऊक. तिच्या खांद्यावर थाप पडली. दचकून तिने फोन बंद केला आणि मागे बघितलं. निखिल होता. “हाहाहा… केवढी दचकलीस? ओके आहेस ना? ते तिकडे आमच्या कंपनीतले सिनियर आहेत त्यांच्याशी जरा गप्पा मारत होतो. तू काय घेतलंस खायला?” असं म्हणून त्याने तिच्या प्लेटमधून सुरी आणि फोर्कने एक तुकडा कापून घेतला. “Um.. हे तर गार झालंय. आणि हे काय?” तिच्या वाईनच्या भरलेल्या ग्लासकडे बघून म्हणाला, “अगं संपव  हे… झिनफंडल आहे ती.”

“काय?”

“झिनफंडल. ब्रँड आहे तो. चांगला.  मी मर्लिनच्या हातात मगाशी बाटली बघितली होती.”

“तू ह्यातलं थोडं पी ना… मी ते कॉकटेल घेते” मुग्धाने खालचा ओठ बाहेर काढला.

“ठीके ठीके… तू म्हणतेस म्हणून… पण कोणी बघायच्या आत प्यायला हवं, नाहीतर सगळे मला हावरट म्हणतील.”

“कोणी नाहीए बघत घे तू…”

निखिलने रेड वाईन चा ग्लास तोंडाला लावला.


ग्लासमधलं लिंबूपाणी तिने घशाखाली उतरवलं. त्या आंबट पाण्यामुळे तिला अजूनच मळमळू लागलं. एकदम उबळ आली तशी ती बाथरूमकडे धावली. लिंबूपाण्याबरोबर कालचं न पचलेलं चिकन, Bell paper चे तुकडे, arrabbiata sauce असं सगळंच पडलं. खूपवेळा तोंड धुतल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. अजून जरा जळजळ होती पण हलकं वाटत होतं – पोट आणि डोकंही.

नॅपकिनला तोंड आणि हात पुसत ती बाहेर आली. एवढ्या आवाजातही निखिलला घोरताना बघून तिला तो नॅपकिन त्याच्या तोंडावर भिरकावा वाटला. “बावळट कुठला” स्वतःशीच पुटपुटत ती किचनमध्ये गेली आणि साखरेच्या डब्यातून दोन चमचे साखर तोंडात टाकून घोळवत ती हॉलमध्ये गेली. खांद्यावरचा नॅपकिन सोफ्यावर फेकून तिने गॅलरीचे पडदे उघडले. छान तांबूस उजेड काचेच्या दारातून आत पसरला. तिने गॅलरीचं दार सरकवलं आणि कडकडीत थंडीचा झोत खोलीत शिरला. तिने झर्र्कन दार बंद केलं, आत जाऊन अंगावर Shrug चढवला आणि पुन्हा बाहेर गॅलरीत गेली. दूरवरच्या एका बिल्डिंगच्या मागून सूर्य डोकावत होता. खालच्या निवांत रस्त्यावरून थोड्याफार गाड्या इकडून तिकडे करत होत्या. रस्त्याच्या पलीकडचं एकटं झाड हवेबरोबर सळसळत होतं. मुग्धाचं गोल, गोरं नाक थंडीने गारठत होतं. तिच्या मोकळ्या, सरळसोट केसांना वारा उडवत सहजपणे निघून जात होता. पण काय माहित, आज तिला नव्हतं छान वाटत. बाहेरचा view डोळ्यांत साठवत , मोठा श्वास घेत तिने डोळे मिटले.

अचानक तिला आठवलं, ती स्वप्नात परीक्षेला जाण्यासाठी पेन शोधात होती आणि आई नुसतीच तिच्याकडे बघत थांबली होती नव्हती. निखिलही तिथे सोफ्यावर बसून हसत होता. तिला परीक्षेला उशीर होत होता, एकतर geographyचा पेपर होता तिने शेवटचे ५ चॅप्टर्स सोडले होते. त्यातलाच आलं म्हणजे सगळं? तिने पेनशिवायच बॅग उचलली आणि गाडीवर बसून निघाली. ती रस्ता क्रॉस करणार इतक्यात समोरून भरधाव वेगात एक कार गेली.

“पें, पें….” करत आतासुद्धा खालच्या रस्त्यावरून एक टवाळ पोरांची गाडी सुसाट गेली. त्या आवाजाने तिच्या छातीत जोरजोरात धडधडू लागलं. पण मगाशी तर स्वप्नात आपण निखिलच्या मागे कुठल्याश्या टेकडीवर धावत होतो… दोन स्वप्नं मिक्स झाली वाटतं. “जाऊ दे…” तिने फार डोक्याला ताण नाही दिला. पोटातले कावळे जागे झाल्यासारखं वाटल्यामुळं ती आत आली. एकदम कडकडीत थंडीतून ऊबदार हॉलमध्ये येऊन तिला बरं वाटलं. तिने रिमोटने अजून जरा ‘heat’ वाढवली.  किचनमध्ये जाऊन पुन्हा एकदा फ्रिज उघडून तिने आत काही खायला मिळतंय का हे बघितलं. एक apple मागच्या बाजूला पडीक होतं ते तिने उचललं, तोंडाजवळ नेऊन परत ठेवलं.


“How’s that Chicken working out for you?” मुग्धाने चिकनचा तुकडा तोंडाजवळ नेऊन परत ठेवला, तितक्यात तिथे  मर्लिनचा पार्टनर – ‘अॅलेक्स’ आला.

“Good good…”

“I cooked it you know?”

“Oh really… इट्स नाईस… हेहे…” मुग्धाला पटकन काय बोलावं कळलं नाही.

“So, you are from India?”

“Yes yes…”

“I heard it’s a nice country…  actually Marlene’s brother-in-law had visited there”

“Oh okay… So you are from here itself?” मुग्धाने उगाच आपलं काहीतरी विचारलं.  

“Yeah… well not exactly from here, there is a small town nearby… But I live here now… I kind of look German, ‘cause my father was German. But I never saw him. He left just after I born” त्याने आपल्या हातातली बॉटल उंचावून खांदे उडवले. अचानक मिळालेल्या ह्या पर्सनल इन्फॉरमेशनचं  काय करावं हे न कळल्यामुळे मुग्धा पुन्हा एकदा नुसतंच हसली.

“So you work here now?”

“No no… I don’t… But I used to work before… I and Nikhil  were in the same company…” मुग्धा अॅलेक्सशी स्मॉल टॉक करायचा प्रयत्न करत होती. पण तिची नजर सतत किचनजवळ मांडलेल्या टेबलाजवळ उभ्या असलेल्या निखिलकडे जात होती. (कारण निखिल तिकडून सतत “काय?”, “ये ना”, “पटकन ये”, “हे मस्त आहे” असे विविध हातवारे करून तिला इशारे करत होता). शेवटी ती अॅलेक्स ला “Excuse me” म्हणून निखिलपाशी गेली.

“काय होतंय तुला?” तिने जरा वैतागूनच विचारलं.

“अगं… हे prawns खूप भारी झालेयत. गरम आहेत तोपर्यंत खाऊन घे. आपण मर्लिनला रेसिपी पण विचारून घेऊया हां?” निखिल एक तुकडा मिटकावत म्हणाला.

“अरे पण मी बोलत होते ना त्या अॅलेक्सशी…”

“अगं त्याच्याशी ओळख वाढवून काय करायचंय?”

“म्हणजे??” मुग्धाला थोडासा राग आला.

“अगं तुला सांगितलेलं ना… तो electrician आहे. असल्या gathering चा फायदा करून घ्यायचाच असेल तर त्या तसल्या म्हाताऱ्यांशी बोलायचं. त्यांच्या ओळखी असतात बऱ्याच. आपल्याला कधी काही opportunity मिळेल सांगता येत नाही.”

“बरोबर आहे… तेच करायला आलोय नाही का आपण. जॉब मिळवायला. अजून hike, अजून चांगली position… तेवढंच महत्वाचं आहे. चार लोकांशी गप्पा मारून फ्रेंड्स नाही बनवायचे. कशाला येते मी असल्या ठिकाणी कुणास ठाऊक.” हे सगळं मुग्धाने मनात म्हणलं. तिने निखिलला फक्त ‘तू अवघड आहेस!’ असा look दिला आणि तिथून परत जाऊन त्या मोठ्या डायनिंग टेबलवर जाऊन बसली.  निखिल पण तिच्या मागे-मागेच आला. तिच्या जवळची खुर्ची ओढून तो बसला आणि तिच्या कानाजवळ हळूच “सॉरी” म्हणून त्याने मान तिरकी केली.मुग्धा प्लेटमधला राईस चमच्याने हलवत “असू दे सोड.” असं तोंडातल्या तोंडात पुटपुटली. निखिलने उगाच तिचा गालगुच्चा घेतला आणि समोरच्या ताटातला prawn तोंडात भरायला घेतला. एक मुलगा निखिलच्या पलीकडे येऊन बसला. त्या दोघांनी “आता उद्याचा काय प्लॅन?” ह्यावरून ऑफिसच्या कामाच्या गप्पा मारायला सुरुवात केली. त्या एका प्रोजेक्ट मध्ये कसं कस्टमरचं approval पेंडिंग आहे, पण एकदा मिळालं की नंतर कशी फाटणार आहे असा काहीतरी विषय चालू होता.

“Guys… guys…” मर्लिन आपल्या भरड्या आवाजात उंच आवाजात म्हणाली,”I hear some gutter talk from this direction. Please, Puh-lease! No work on this table. Who’s that… Neekhel… I see you.”

“सॉरी, सॉरी…” निखिल हात वर करून म्हणाला.

“Tell us about your lovely wife, how did you guys meet? Who proposed whom?”

“Oh… okay…”निखिलने खांदे उडवून बोलायला सुरुवात केली, “Well, we were in the same organization. She joined our team 2 years after me…” मुग्धाला त्याने जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा त्याला ती फारच अभ्यासू वाटली होती. एकदम sincere, सगळं काम सांगेल तसं करणारी, मीटिंग मध्ये नोट्स लिहून घेणारी… मग एकदा एका टीम outing ला गेल्यावर तिचे खरे रंग त्याला दिसले. त्या ट्रिपमध्ये तिने जो काही कल्ला केला की तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. पण मग दोन वर्षं वेगवेगळ्या प्रकारे तिला पटवण्याचा प्रयत्न करून फायनली त्याने तिला प्रपोज केलं. आणि त्यानंतर सुद्धा तिने ६ महिन्यांनी  ‘हो’ म्हणलं.

“So, you got married, let me see… umm… 3 years ago? I thought, your wedding was like a year ago…” मर्लिन बिनकामाचे तपशील आठवत म्हणाली.

“Yes… we got married about a year ago”

“Oh… so you kept him waiting 3 years after he asked you to marry him? मर्लिनने मुग्धाला डोळे मोठे मोठे करत विचारलं. “ Wow… that was risky. Here, we get married in a month or so after proposal. You never know they might change their mind…” तिने उगाच अॅलेक्स कडे बघून डोळा मारला.

“Oh that ways…” निखिलला ‘अमेरिकन प्रपोजल’ चा संदर्भ तेव्हा लागला, “ नो.. नो… that was the first time she said ‘I love you too’… After that we dated for 2 years and then got married. “

“Ohkay… anyways.. good story… good story… and many congratulations!” मर्लिनने ग्लास उंचावला. बाकीच्यांनी पण “yeah… congrats, congrats!” असा आवाज केला.

“Oh Marlene… can I use your washroom? I need to pee.” ‘एलिझे’ने गोड आवाजात विचारलं.   

“Yeah… go straight and left.” मर्लिनने directions सांगितले.

“Baby… I’ll come in a minute” असं म्हणून ती निघाली, तितक्यात Ken ने तिचा हात धरला आणि खुर्चीवर मागे रेलून ओठांचा चंबू केला. “Awww…” म्हणत ‘एलिझे’ ने त्याला kiss केला आणि ती वॉशरूमकडे गेली. मुग्धा आणि निखिलने पटकन एकमेकांकडे बघितलं. निखिलने नजरेतूनच हसत हसत ‘काही रिऍक्शन देऊ नको’ असं सांगितलं. मुग्धा खाली बघून गालात हसली. तिला जाणवलं की तिला पण शू ला जायला हवं, एलीझेच्या मागोमाग गेली तर वॉशरूम कुठेय हे पण कळेल, म्हणून ती उठली. “मी पण जाऊन आले” निखिलने तिच्याकडे पाहिलं आणि उगाच एक डोळा मिचकावला. मुग्धाने हळूच ठेंगा दाखवला आणि एलीझेच्या मागे निघाली.

निखिलला हे असं चारचौघात kissing वगैरे अजून काही जमलं नव्हतं. तिला आवडलं असतं, त्याने अशी सगळ्यांसमोर पप्पी घेतली असती तर… कदाचित ऑकवर्डदेखील झाली असती, काय माहित! पब्लिक डिस्प्ले पर्यंत पोहचायला निखिलला अजून वेळच लागेल म्हणा, पहिल्या kissच्या वेळेसच कसं ततपप झालं होतं त्याचं. 
निखिलने तिला “तुझ्यावर प्रेम करतो” हे सांगितल्यानंतर, जवळ जवळ ६ महिन्यांनी ‘तिने’ त्याला डिनर डेट वर बोलावलं होतं. थंडी होती तरी तो ‘वाईन’ कलरचा  वन-पीस घालून गेली होती. पूर्ण 3 कोर्स डिनर होईपर्यंत नुसत्याच इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या होत्या. मग बाहेर पडल्यावर, “मला पण तू आवडतोस” असं तिने सांगितलं तेव्हा निखिल तिच्यापेक्षा जास्त लाजला होता. “खरंच? खरंच?” असं तीनदा विचारून त्याने खात्री करून घेतली होती. तिच्याकडून “I love you too” म्हणून घेतल्याशिवाय त्याला चैन पडलं नव्हतं. मग बाईकवर मागे बसवून उगाच थंड हवेतून फिरवलं. “वर येशील?” म्हणून स्वतःच्या फ्लॅटखाली गाडी थांबवली. अस्ताव्यस्त पडलेल्या खोलीत घेऊन गेला आणि खोलीतला फक्त टेबल लॅम्प लावला. (डिम लाईट मध्ये रोमँटिक वगैरे वाटतं ना) आणि विचारलं, “Can I  kiss you? खूप दिवसांपासून रोखलंय मी स्वतःला… I’m sorry, म्हणजे मला तसं नाहीए म्हणायचं… म्हणजे असं पर्व्हर्ट सारखं नाही हं… I mean… तुला बघून असं जवळ घ्यावं वाटतं… आणि…” तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि डोळे मिटले.

खळ्ळ्ळ…! टॉयलेट वरून उठून ती जुन्या आठवणीतून बाहेर आली. आरशात स्वतःचा चेहरा बघत तिने बेसिनचा नळ सोडला.   


खळाखळा करून चहाचं भांडं तिने धुवून घेतलं आणि अर्धा कप पाणी, अर्धाकप दूध, १ चमचा चहापूड आणि एक चमचा साखर भांड्यात टाकून ते गॅस वर ठेवलं.  फ्रिजमधून ब्रेड आणि बटर काढलं आणि टोस्टरमध्ये ब्रेडचे २ slices टाकले. चहात आलं खिसून उकळणाऱ्या चहाकडं ती बघत थांबली. हां… निखिल एका फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये जाताना तिला दिसला होता. आता टेकडीवर कुठलं  फॅन्सी रेस्टॉरंट? स्वप्न आहे ना ते… मंद! त्यापुढे काय झालं होतं पण… आपल्याला इतका राग येण्यासारखं? मुग्धा डोळे मिटून डोक्यावर अंगठा टेकवून आठवत होती… ओह.. ओह… एका पाठमोऱ्या मुलीच्या टेबलवर जाऊन बसला तो… कोण होती bitch! ughh….!!

‘टिंग!’ ब्रेड टोस्ट होऊन बाहेर आला. मुग्धाने डोळे उघडले, तिला आता पुन्हा चिडचिड होऊ लागली. तिने चहा गाळला, ब्रेडला फसाफसा बटर फासलं आणि TV समोर जाऊन बसली. TV वर music चॅनेल लावून आवाज नको तितका वाढवला. एक टोस्ट चहात बुडूवून खाऊन संपवल्यावर तिला थोडंसं बरं वाटलं. मग तिने दुसरा टोस्ट जरा आरामात TV मधल्या गाण्याकडे बघत संपवला. उरलेला थोडा चहा पिऊन ती उठली. तिने बेडरूम मध्ये बघितलं,बाहेर TV ठणाणा करत होता तरी आपला नवरा मेल्यासारखा पडला आहे हे बघून ती बेडजवळ गेली आणि धपकन बसली. शेवटी न राहवून तिने त्याच्या अंगावरचं पांघरूण ओढलं आणि त्रासून विचारलं, “उठणार आहेस का आजच्या दिवशी??”

“Umm… नको ना… तू पण ये इकडे माझ्या जवळ…” निखिलने डोळे किलकिले करून पाहिलं आणि तिला जवळ ओढलं.

“मला नाहीए आळश्यासारखं पडून राहायचं दिवसभर. आणि आता थोड्या वेळात आईसाहेबांचा व्हिडिओ कॉल येईलच. मी नाही रिसिव्ह करणार, आधीच सांगतेय.” तिने आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला.

“बरं बाबा… उठतो उठतो… पण मग आधी मला ‘पा’ दे…”

“लाडात यायची काही एक गरज नाहीए. उठ आणि तोंड धुवून घे. आणि चहा हवा असला तर स्वतः करून घे.”

“अरे बापरे… काय झालंय सकाळी सकाळी? असा एकदम कडकलक्ष्मी अवतार का बरं?”

“मला नाही माहीत…” मुग्धा बाहेर TVच्या खोलीत निघून गेली, TVचा आवाज स्वतःलाच नकोसा होऊन तिने TV बंद केला. मोबाईलवर फेसबुक उघडलं.

>>तुलिका चंदवाणी’ is feeling crazy विथ ‘हर्षल मुलचंदानी’ हं… हे दोघं एक सारखं काही ना काही करत असतात. आणि सगळं आपलं फेसबुकवर टाकलंच पाहिजे.  
>>हे Life is beautiful पेज unlikeच करायला हवं. काहीही फालतू quotes टाकत असतात.
>>’कुणाल दिवेकर’ added new album “In the lap of Himalayas”
Wow! हा लदाखला जाऊन आला. किती जायचं होतं मला, पण तिकडे असताना कधी शक्य नाही झालं. किती फिरतो हा. वाह! कसला मस्त फोटो आलाय हा. तिने ‘Wow’वाला इमोटीकॉन प्रेस केला. अजूनच चांगला दिसायला लागलाय हा. ती त्याच्या प्रोफाइल वर गेली, त्याचे कुठले कुठले ट्रिपचे फोटो स्क्रोल करू लागली.
आपण जरा मूर्खपणाच केला, उगाच गरज नसताना त्याला सांगितलं, I had a crush on you in school.  ह्या माकडाने पण  “Same here” च्या पलीकडे काही केलं नाही. बरंच झालं म्हणा.. नाहीतर ह्याच्या मागं आपलं बॅगा उचलून इकडच्या पर्वतावर जा नाहीतर तिकडच्या समुद्रावर जा… पण आपण उगाच पोपट करवून घेतला त्यावेळेस. काहीतरी फालतू कल्पना होत्या ना त्यावेळेस आपल्या. एखादी गोष्ट छान वाटली तर लगेच एक्सप्रेस करायचं वगैरे… असो. पण आता आहे हे असं आहे. आता करा लिव्ह-लव्ह-लाफ!

“गोदू…” निखिल हॉलमध्ये आला. मुग्धाने पटकन फोन बंद केला. निखिल सोफ्यावरजवळ आला आणि त्याने तिच्या गळ्यात हात टाकले. “भूक लागलीय. खायला काय करूया?” मुग्धा वाट बघतच होती कि तो म्हणेल “खायला काय बनवणार!” आणि मग ती त्याच्यावर तापली असती. पण त्याने “करूया” असा डिप्लोमॅटिक शब्द टाकला.

“तुला काय खायचंय ते तूच ठरव…” तरीही तिने आपला गड राखून ठेवला.

“मी ना मस्त पॅनकेक्स बनवतो.”

“ओके.” म्हणून ती पुन्हा फोनकडे वळली.

“मुगु… ते ऑल-पर्पज फ्लॉअर म्हणजे काय गं? आणि मला बेकिंग सोडा… नाही, नाही… बेकिंग पावडर पाहिजे.” ५ मिनटं झाली नाहीत तोवर किचनमधून प्रश्न आले. मुग्धा डोकं हलवत उठली.

“सरक… करते मी.”

“नाही नाही. मी करतो. मला येतंय. मला फक्त हे सगळे इन्ग्रेडिएंट्स दे.” निखिलने मोबाईलवरची एक लिस्ट दाखवली.  मुग्धाने सगळं सामान एकेक करून काढून दिलं आणि तिथेच हाताची घडी घालून उभी राहिली.

हे इतकं घालू? हे इतकंच?  जरा जास्त घालू? असं करत करत finally पॅनकेकचं बॅटर त्याने बनवलं. आणि एक चमचाभर घेऊन तव्याला “जरा बटर लाव गं” म्हणून त्यावर सोडलं. मग नंतर दोघांना लक्षात आलं कि बर्नर पेटलाच नव्हता. मुग्धाने डोक्यावर हात मारला आणि गॅस ऑन केला. इतकं नको भाजायला – तितकं भाजल्याशिवाय चांगलं लागत नाही – साखर कमी पडलीय – त्यांनी तेवढीच सांगितलीय रेसिपीमध्ये- त्यांना बेचव आवडत असेल etc. चर्चा झाल्यानंतर खाण्यालायक ४ पॅनकेक बनले. मग ते घेऊन निखिल एकदम खुशीत प्लेट्स घेऊन टेबलवर बसला. ओट्यावरचा पसारा बघून मुग्धाने डोळे फिरवले आणि सुस्कारा सोडला.

टेबलजवळ येऊन ती बसली. गरम गरम पॅनकेक तोंडात घालून ‘हू.. हू..’ करून भाजलेलं तोंड शांत करणाऱ्या निखिलला बघून तिला थोडंसं हसू आलं. स्वतःच्या प्लेटमधला तुकडा ती तोंडात घालणार इतक्यात फोन वाजू लागला. मुग्धाने फोनमध्ये बघितलं आणि फोन निखिलच्या तोंडासमोर धरला.

“अगं उचल की…”

“मी तुला सांगितलेलं ना लवकर उठून तूच फोन करत जा Saturday/Sunday.”

“हो पण आता तिने केलाय ना तुला, उचल.”

“हे पॅनकेक्स तू केलेयस म्हणून सांगितलंस तर बघ… आधीच त्यांना वाटतं तुला उपाशी मारतेय मी…. हॅलो आई!” मुग्धाने लगेच चेहऱ्यावर हसू आणलं.

“हॅलो बेटा… किती उशीर केला फोन उचायलायला.”

“अं… फोन हॉलमध्ये होता ना. ब्रेकफास्टला बसलोय.”

“हं…  आज काय सुट्टीचं special?”

“पॅनकेक्स केलेयत.”

“तसलं कशाला करायचं… तिकडे कोथिंबीर वगैरे मिळते ना? येतात का तुला वड्या करायला… ती इथे सोसायटीत आहे ना जगदाळे… तिची सून बरंच काही काही करत असते. सकाळीच दिल्या थोड्या चव बघायला. ‘निऊ’ची आठवण झाली. फार आवडतं त्याला असलं चटपटीत…”

“नाई… ह ह… तोच म्हणाला करूया… थांबा हं त्याला बोलायचंय…” मुग्धाने निखिलकडे फोन देऊन टाकला आणि दात ओठ खाऊन त्याच्याकडे बघितलं. ती आपली प्लेट घेऊन उठली आणि सोफ्यावर जाऊन बसली. सारखं आपलं तेच तेच, ह्यांच्या “निऊची” तब्येत कशी हादरलीय, कमरेच्या दुखण्यामुळं आता कशी कामं होत नाहीत, मागच्या आठवड्यात काय special खायला केलं आणि हे सगळं झालं की कुणाच्या तरी नातू/नातीला बघून येणारा उमाळा, मग सगळं कसं योग्य वयात व्हायला पाहिजे. इथे inputचा पत्ता नाही, ह्यांना result पाहिजे झालाय! मागच्या वेळेस कधी केला होता? ते app च घेते, तिथे टाकत जाईन डेट्स. मुग्धा ते पॅनकेकचे मोठे तुकडे तोंडात गपागप कोंबत होती. माझी कधी काळजी करावीशी नाही वाटत का ह्यांना. त्याची कसली तब्येत हादरलीय? माझ्या आईला मारे दरवेळेस जावयाशी गप्पा मारायच्या असतात. ती पण मलाच नवीन रेसिप्या सांगते. तेवढंच आहे त्यांच्या आयुष्यात. माझं पण तेच होणारेय बहुतेक. Ack! घास लागला. ती पाणी प्यायला टेबलजवळ गेली.

“हो आई… आहे प्लॅन सगळा. आधी इकडे घर घेऊयात एक मग तुम्हीच या इकडे राहायला” निखिल बोलत होता.

फिसक्क! तिच्या तोंडातून ठसक्याबरोबर पाणी बाहेर आलं. तिला जोरजोरात खोकताना बघून निखिलने शेवटी फोन ठेऊन दिला.

“अगं, पाणी पी ना”

“पाणी.. *खक्क* पितानाच आलाय ना *खक्क*”

“बरं वर बघ थोडावेळ”

तुझ्या आईनेच शिव्या घातल्या असतील, इतक्या जोराचा ठसका आला. हे वाक्य मुग्धाच्या अगदी ओठावर आलं होतं पण तिने पाण्याबरोबर गिळलं.


ते कोरडं चिकन गिळण्यासाठी म्हणून मुग्धा मध्ये मध्ये जरा जास्तच कॉकटेलचे घोट घेत होती. तिला थोडं ‘tipsy’ वाटू लागलं होतं. केन आणि एलिझेची फर्स्ट date स्टोरी सांगून झाली होती. एलिझेला vending machine मधून कॉफी घेताना पाहून, “Careful, that’s hot. Oh.. don’t bother, you are 10 times hotter than that coffee” ह्या केनने मारलेल्या pick-up लाईनवर सगळे गरजेपेक्षा जास्त हसले होते.  मर्लिनला सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर तिने तिच्या स्टोरीला सुरुवात केली होती. 

“Well, yeah okaay… So we met in a pub…” मर्लिनच्या आवाजात दारूचा इफेक्ट जाणवत होता.  “And… I and my friend umm.. Jane.. yeah.. she was there with me… and we were like… like totally drunk. And then this guy comes out of nowhere, and he asks me if I will dance with him. I was like, umm nyo! He insisted and there were we. dancing and laughing hysterically.”

मर्लिनची ती स्टोरी ऐकता ऐकता मुग्धाला तो घराजवळचा छोटा बार आठवला, ती ‘मार्टिनी’चा एक ग्लास घेऊन एका उंच खुर्चीवर बसली होती आणि मागून आवाज आला.  

“Hi there… it’s hard to believe, a gorgeous lady is sitting here all alone. Please tell me, shall I join, or am I getting punched in the face?”

“Suit yourself. and there’s no-one to punch you” मुग्धा आपला ग्लास हलवत, भुवया उडवत म्हणाली.

“My lucky day it seems, by the way you look stunning in this red saari. And.. and.. that’s a nice blouse” पाठ केलेली वाक्यं संपल्यामुळं निखिल अडखळला.

मुग्धाला हसू आलं पण तिने character सोडलं नाही. “I know, but थँक्स. So, where are you from? India?”

“Yes. It  seems you are an Indian too. Where are you from, Maharashtra?” मग तो तिच्या कानाजवळ वाकून खुसफुसला, “मराठीत बोलू का?”

“हो.. मी महाराष्ट्रातूनच आहे.”

“oh ग्रेट…”

“Ahem! इंट्रो पुरे.” ती त्याच्या कानात खुसफुसली.

“हां… तर मी म्हणत होतो… रेड कलर रिअली सूट्स यू. एकदम आल्याच्या चहासारखी कडक दिसतेयस.”

“हाहाहा…’आल्याचा च.हा.!’…  रेड wine वगैरे पण चाललं असतं.” मुग्धा डोकं हलवून हसू लागली.

“पण आम्हाला असं कडक-कडकच आवडतं…” निखिल तिच्या एकदम जवळ येऊन आपला चेहरा तिच्याअगदी जवळ आणून म्हणाला. ती एकदम गप्प झाली आणि गालातल्या गालात हसू लागली.

“बाय द वे, मी इकडे जवळच राहतो, if you are interested in a movie night.” आता जरा निखिलचा कॉन्फिडन्स वाढला.

“कुठली मूवी आहे त्यावर डिपेन्डन्ट आहे.”

“मी एखाद्या हॉरर फिल्म चा विचार करत होतो, कारण जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा I will be there for you to hold tight”

“ahem, ahem! फ्लर्टींग जमू लागलंय चांगलंच”

“What say? You, me and Mirrors”

“चालेल, बघूया कोण लवकर घाबरतंय पिक्चर बघताना’

“पण मी पिक्चर कुठे बघणारेय. मी तर तुला बघणारेय” निखिलने तिच्या खांद्यावरून मनगटापर्यंत हलकेच हात फिरवला.तिच्या अंगावर उगाच शहारे आले.

गाडीतून घरी येईपर्यंत त्यांचा “Roleplay” चांगलाच रंगात आला होता. त्यांच्याच अपार्टमेंटचं दार उघडून तो तिला त्यांच्या छोट्याशा बाल्कनी मध्ये घेऊन गेला. त्याच जुन्या बाल्कनीमधून रस्त्यावरची तीच वर्दळ सुद्धा तिला रोमँटिक वाटत होती.  अचानक निखिल तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला,

“You have 3 seconds to slap me!”

मुग्धाला काही कळेना, एकदम काय झालं ह्याला, आत्ता तर किती छान बोलत होतो.

ती विचार करतेय तोवर त्याने तिला कमरेत हात घालून आवेगात जवळ ओढलं, आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. काही क्षणांमध्ये बाजूला होऊन हाताची घडी घालून तो समोर थांबला, आणि मोजू लागला.

“1…,2…,3… ओके संपले 3 सेकंड्स तू काही मला मारलं नाहीस, it means you liked it” असं म्हणून त्याने तिला पुन्हा जवळ ओढलं.

मुग्धाने हसत त्याला विचारलं, “Smooth हं… कुठून चोरलं?”

“असंच वाचलं होतं कुठेतरी… खूप दिवस वापरायचं होतं”

“बापरे.. खूपच तयारी…”

“Shhh…” म्हणून त्याने तिचे ओठ बंद केले.


“And next morning… he was there next to me. IN MY BED! Then we got into talking… blah blah blah… and I got to know.. he is 12 years younger than me. 12 years! I was like, get the hell out of my house!” मर्लिनचा आवाज दारूबरोबरच चढला होता. त्यामुळं काही क्षणांसाठी -लाल साडीत हरवलेली -मुग्धा, मर्लिनच्या गोष्टीत परत आली.

“In my defense, she looked younger!” अॅलेक्स खांदे उडवत म्हणाला.

“What… she looked younger to you? oh my god… hahahahaha” म्हातारी कॅथरीन खूपच हसू लागली. “Tell us something we can believe. huhuhahha” कॅथरीनच्या हसण्यामुळे सगळेच त्या गोष्टीवर हसू लागले. मुग्धाला काही फार हसू येत नव्हतं, तरी ती दात दाखवत होती.  तिने अॅलेक्सकडे बघितलं, त्याचा चेहरा थोडा पडल्यासारखा वाटला.

“I meant, she had that childlike vibe.” अॅलेक्सने उगाच सावरायचा प्रयत्न केला, पण त्यावर सुद्धा सगळ्यांनी त्याची उडवली.

“Hahaha… poor Alex, he just wanted to have fun, and now stuck for life!”

डाव्या बाजूला बसलेली ‘ऍनाबेल’ मुग्धाच्या कानाजवळ येऊन म्हणाली.

“हीही…” मुग्धाने रिस्पॉन्स दिला.

“How old are you?”ऍनाबेलने तिला विचारलं.

“Ah… 27…”

“Oh… You don’t look 27. I am 50”

“Oh… really? You don’t at all look 50. I mean you look younger.” तरी मुग्धाचं डोकं वेळेत चाललं. कधीही कुणाच्या वयावर निगेटिव्ह कमेन्ट करू नये.

“Thank you darling!” ऍनाबेलचे थँक्यू म्हणताना मिटलेले डोळे जरा pause घेऊनच उघडले. फुकट मिळतेय म्हणल्यावर तिने दारूचा ग्लास खाली ठेवलाच नव्हता. तिला चढली आहे हे कळून येत होतं. “You know, I am getting… um… getting divorced.”

“Uh… why?” मुग्धाच्या छातीत उगाच धडधडलं.

“Yeah… I am getting divorced this Tuesday. I have sent the notice. You know why? He cheated on me. I have been married to him for 25 fucking years. And he does this for me.”

“I am so sorry… “

“But, I am not. You know. I am not at all sorry. I have a young daughter. She is 17. She is in support of me… I will be fine.”

“Yes. You will be…”

“Umm.. Is, is divorce common in India?”

“Uh.. no.. I mean, not that common… I mean…”

“Ohh… I am seeing one Indian man. You know… dating… He says, he is going to get divorced soon.”

मुग्धाचं डोकं ऑलरेडी alcohol मुळं जड झालं होतं. अचानक ऍनाबेलचा असा पर्सनल प्रॉब्लेम ऐकून तिला काय बोलायचं काळात नव्हतं.

“It is embarrassing you know… to, to.. put yourself out there at this age. I am 50. fucking 50. and I have only known this man for last 25 years. I never dated anyone else. No.. nothing. And now, now I have to do this.”

“I can understand. It is hard. But, you know… It’s better to leave him if he doesn’t want you.”

“Oh no… no… he wants me back well.. But I am done with that man. He shouldn’t have gone behind my back. It’s humiliating… but I don’t care now. I am already seeing another man. He is nice. Are all Indians nice like him? He says he will be leaving his wife soon.”

“It will be okay Annabelle. Everything will be okay.” मुग्धाने जमेल त्या शब्दात तिला आधार द्यायचा प्रयत्न केला. तिच्या मनात उगाच त्या इंडियन माणसाबद्दल शंका येऊन गेली. पण नसेल तो तिचा फायदा घेत. आपल्याला काय माहित कुणाचं काय चालू आहे.त्याला पण आला असेल आपल्या बायकोचा कंटाळा. किंवा त्रास देत असेल ती त्याला.

“Thank you darling! Bless you Bless you. Come on. Let’s click a picture. No you know what. Let’s dance! Marlene darling… play some funky music please!”म्हणत जाडी ऍनाबेल खुर्चीवरून उठली.

“Oh my god, are you going to dance Anne! That’s going to be a scene worth watching. I am getting camera.” मर्लिन उठून कॅमेरा आणायला आत गेली. जाता जाता तिने music सिस्टिमचा आवाज वाढवला आणि कसलंसं upbeat गाणं लावलं. ऍनाबेल सगळ्यांच्या खुर्चीजवळ जाऊन जाऊन त्यांना नाचायला उठवत होती. मुग्धा खुर्चीवरून नर्व्हर्सपणे उठली, तिने निखिल कडे बघितलं. निखिल दुसऱ्या टेबलवर बसलेल्या त्या गोऱ्या म्हाताऱ्याकडे वळून वळून बघत होता. मुग्धाने डोळे फिरवले आणि ऍनाबेलच्याजवळ जाऊन उभी राहिली. ऍनाबेल म्हाताऱ्या कॅथरीनला उठवायचा प्रयत्न करत होती. कॅथरीन ढिम्म हलत नव्हती.

शेवटी ऍनाबेलनं नाचायला सुरुवात केली. आपलं धूड हलवत हलवत ती मध्ये मध्ये आपल्या ग्लासमधून दारु पण पीत होती. ‘पेताड’ कुठली. “The cool couple” पण जागेवरून उठले. त्यांनी आपला-आपलाच काहीतरी डान्स सुरु केला. मुग्धा उगाच जागेवरच हात आणि पाय तालात हलवायचा प्रयत्न करत होती. अॅलेक्स पण ह्या सगळ्यांना जॉईन झाला. निखिल बरोबर कामाच्या गप्पा मारणारा मुलगा पण आला. मर्लिन तिकडून कॅमेरा घेऊन आली. गळ्यात कॅमेरा अडकवून तिने ३-४ फोटो काढलेआणि तीदेखील कंबर हलवत हलवत ग्रुप मध्ये आली. निखिल सुद्धा मग जॉईन झाला. मुग्धाकडे बघून तो ‘मी काय करू आता?’ असं विचारत होता. पहिली ५ मिनिटं झाल्यावर सगळे थोडे अजून फ्री झाले. ऍनाबेल तर इतक्या जोशात नाचत होती कि असं वाटत होतं, आता पडेल कि मग पडेल. Ken आणि Alezeचा PDA सुरूच होता. निखिल मुग्धाजवळ आला. त्याने तिला हातानेच ‘free होऊन नाच’ असा इशारा केला.मुग्धा आपली संकोचून तेवढं-तेवढंच करत होती.  तिला उगाच जुनं काही काही आठवू लागलं, कॉलेजमध्ये केलेला डान्स, ऑफिसच्या ट्रिपमध्ये गाडीत मागे जाऊन केलेला कल्ला, ऑफिसमध्ये दिवाळी इव्हेंटला केलेला lyrical डान्स, बालवाडीत सगळ्यांनी ओळीत उभा राहून केलेला “चांदोबा चांदोबा भागलास का?” वर केलेला डान्स…

“OH MY GOD, OH MY GOD…”अशी एक किनऱ्या आवाजात किंकाळी आली. आणि ‘धड्ड’ मग ‘खळ्ळ’ असा आवाज झाला. ऍनाबेलचा पाय नाचता नाचता घसरला होता, तिच्या हातातलं liquid एलिझेच्या अंगावर सांडलं होतं, ऍनाबेल पार्श्वभागावर आपटली होती आणि ग्लास फुटला होता होता.

सगळ्यांचा आवाज एकदम बंद झाला. मर्लिनने गाणं बंद केलं. म्हातारी कॅथरीन खुर्चीवरून उठून ऍनाबेलला उठवायला आली, अॅलेक्स पण पुढे आला. ऍनाबेल अचानकच जोरजोरात हसू लागली. ती स्वतःच्या आपटण्यावर जोक करू पाहत होती. अॅलेक्सने तिला खुर्चीत बसवलं. मर्लिन एलिझेला घेऊन कपडे बदलायला आत घेऊन गेली. केन देखील मागोमाग गेला. निखिल आणि मुग्धा नुसतेच ऑकवर्ड उभे होते. निखिलशी गप्पा मारणारा गोरा म्हातारा उठला आणि निघू लागला. अॅलेक्स त्याला दारापर्यंत सोडायला गेला.  ऍनाबेल अजून हसतच होती, काहीतरी पुटपुटत होती. कॅथरीन तिच्या पाठीवरून “इट्स ओके” म्हणत हात फिरवत होती. अचानकच हसू थांबवून ती उठली आणि “I should go…” असं म्हणून चालू लागली. कोणीच तिला थांबवयचा प्रयत्न केला नाही. ती पार दारापाशी गेल्यावर मुग्धाला वाटलं कि तिने तिला दारापर्यंत सोडायला जायला हवं होतं. ती खुर्चीवर मटकन बसली.

“Poor Ann, she is going through a lot… She is drinking a lot lately and She doesn’t know when to stop. Her husband cheated on her.” शेवटचं वाक्य कॅथरीननं मुग्धाच्या कानात खुसफुसलं.

“But you know what… every relation has an end. The sooner you accept the better. Even Marlene has gone through the same, her husband took away their son. It’s just sad… You know, My husband died 2 years ago, and we don’t even have kids. Our relation didn’t end like them, still, here I am all alone. You see… You can’t escape that.”

मुग्धाचं डोकं जड झालं होतं आणि त्यात हि बाई अजूनच depressing काहीतरी बोलत होती. तिने निखिलला “Please जाऊया चल” म्हणून सांगितलं. निखिल “१ मिनिट, मर्लिनला सांगून आलो” म्हणून गेला.

“You know who I miss the most? My friend Carla… She was there with me in the hardest of the time. But she passed away 4 months ago.”

अरे देवा… ह्या म्हातारीच्या आयुष्यातले सगळेच का मरतायत? निखिल कुठे गेला? Uh. डोकं ठणकतंय. तिने निखिलला फोन लावला. फोन टेबलवरच वाजत होता.


‘Ting ding ding ding ting’ मैत्रेयीचा फोन होता. मुग्धाने फोन उचललाच नाही. फोन कट होऊन whatsapp वर मेसेजेस आले. ते पण तिने लगेच बघितले नाहीत, कारण मग ती फोनजवळच होती असं होईल.

तिने नुसतंच नोटिफिकेशन्स मध्ये बघितलं,

“नेक्स्ट वीकेंडला भेटायचं का?” मैत्रेयीचा मेसेज.
“नेहा, तृप्ती, जग्गू…” आणि पुढचं काय ते दिसत नव्हतं. पण मुग्धाला कळलं होतं. सगळे भेटणार असतील. कुणाच्या तरी घरी. मैत्रेयीच्याच. मला नाहीए जायचं. काय करणार तिथे जाऊन. प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी सुरु होईल, especially नेहा.  मी काय बोलणार? Bore च होईल जाऊन. काय कारण सांगू आता? मुग्धाने फोन बाजूला ठेऊन दिला. तिला उगाच guilty वाटत होतं. पण नाही होत आता तिच्याच्यानं इतक्या लोकांचं ऐकत बसायला. असं का झालंय पण, इतकी का जजमेंटल आणि माणूसघाणी झालीय मी? जाऊ दे. काहीतरी सांगते कारण थोड्या वेळानं.
Notifications bar मध्ये फेसबुकचं एक नोटिफिकेशन आलं होतं.

“Your page Frizz Bee has 2 new likes and one preview.”

ह्या जुन्या पेजला कोणी लाईक केलंय आता. हे कोण रँडम? Dave Sturgeon. Fake अकाउंट वाला असेल कोणीतरी. ती आपल्या पेजवर गेली. Doodles, Art and More… तिच्या पेजचं शॉर्ट introduction. आपलीच काढलेली चित्रं ती बघत बसली. काही काही खरंच चांगली होती. तिचं ते पोस्टर कलर्स मधलं “Holding the Universe together” छान होतं. तिला पण वाटलं नव्हतं पण पूर्ण झाल्यावर त्याला एक deep अर्थ आल्यासारखं वाटत होतं. आपल्या घरात त्याचं मोठ्ठं व्हर्जन काढून लावायची तिची कधीपासूनची इच्छा अपूर्ण होती. हे घर तिला आपलं वाटत नाही, अशी तिला अचानक जाणीव झाली. Frizz Bee बंद करून ती होम-पेजवर गेली.

 स्क्रोल करत, straight face ने दुसऱ्या मित्र-मैत्रिणींचे अपडेट्स like करत होती. एक काहीतरी फालतू Tiny Tales ची पोस्ट फीड मध्ये आली.

Guy best friends.

They don’t judge you

but won’t stop teasing you.

Tag your guy-bestie.

काय crap आहे हे. बापरे आणि किती हजारो likes. हे काय निखिलला टॅग केलंय – दीपिका मिश्रा “Miss you guys… निखिल, दिनेश, सुयोग *heart, heart*”

What the fuck!! किती चाटू आहे ही. ह्याने काय कंमेंट केलीय, “miss you too and our whole team” Whaaaaattt?? हि कधीपासून झाली ह्याची bestie?? एक मिनिट… हीच होती काय ती स्वप्नातली. जिच्याशी गळ्यात पडून आणि दात दाखवत बोलत होता हा, त्या रेस्टॉरंटमध्ये. मला ignore करून. ओह.. right! हिचेच असे लांब केस आहेत. हि ह्याची bestie आहे तर मी काय करतेय इथं. कशाला आलेय माझं सगळं जग सोडून . जाते परत, काही गरज नाहीए माझी. उगाच नाहीएत मला असली स्वप्नं पडत. मला फक्त इथं कामाला आणलंय. ह्याच्या आईकडून सकाळी सकाळी अपमान ऐकायला आणलंय मला. मीच मूर्ख आहे. मीच घाई केली सगळ्या गोष्टींची. ह्याला काही एक गरज नाहीए माझी. प्रेमाची नाटकं सगळेच करतात पहिले २ वर्षं. लग्न झाल्यावर काय… हक्काची मोलकरीण असते बायको म्हणजे. काल सुद्धा त्या पार्टीमध्ये मला किती ignore करत होता.
मुग्धाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.
बरोबर आहे. बाकीच्या मैत्रिणींकडून इतकं attention मिळतंय म्हणल्यावर मला attention द्यायची गरज नाहीए. आता तर स्वतःच्या आई-बाबांना पण इकडं घेऊन येणारेय म्हणे. मग तर झालंच. मी कोथिंबिरीच्या वड्या करायच्या, प्रेग्नन्ट व्हायचं, सासूची सेवा करायची, नवऱ्याचे वरून-खालून लाड पुरवायचे. आणि ह्याने लांब केसांच्या पोरींबरोबर गळ्यात गळे घालून हिंडायचं…

मुग्धा… अगं… काय विचार करतेयस असले. किती थर्डक्लास विचार करतेयस. तो खरंच असा वागतोय का. एखाद्या फोटोवर त्याला कुणी टॅग केलं म्हणून तू अशा थराला चाललीयस. IT WAS JUST A FUCKING DREAM!! किती overreact करतेयस छोट्याश्या गोष्टीवरून. What’s wrong with you? का असं छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन हळवी होतेस आजकाल? आपली आई तरी उद्या नीरजच्या बायकोशी काय वेगळं वागणारेय जी तू त्याच्या आईच्या बोलण्याचा इतका बाऊ करतेस. पण का नाही? नव्या generation बरोबर त्यांनी बदलायला नको? सारखं काय तेच आपलं जेवण-खाण. अगं पण त्या तिकडून कितीही ठणठण करत असतील तरी तू करतेस का इथं इतकी मरमर. मग कशाला त्रागा करतेस दरवेळी. काही एक रडायची गरज नाहीए फालतू गोष्टींसाठी. सगळ्याच गोष्टींमध्ये आपण दुःखच शोधत बसलो तर तेच मिळणारेय.

स्वतःलाच सांत्वना देऊन तिने डोळे पुसले. जड झालेलं डोकं घेऊन ती बेडरूममध्ये गेली. नुसतीच पडून भिंतीकडं बघत राहिली. तिला अजून काही काही वेगळी स्वप्नं आठवू लागली. अधे-मध्ये ते एक असं खोलीत गुदमरल्यासारखं एक स्वप्न पडतं. आणि किळसवाणे साप, आणि त्या शाळेतल्या कुजकट बाबर-बाई. घाणच काहीतरी स्वप्नं पडतायत आजकाल. पण आज पहाटेचं स्वप्न मात्र खूपच विचित्र… I had never thought कि माझ्या subconscious मध्ये असे काही विचार चालू असतील.

“रांझन दे यार बुल्लेयाsssss  सुन ले पुकार बुल्लेयाsssss  तू ही तो यार बुल्लेयाsssss “अचानकच बाहेरच्या खोलीत रणबीर कपूर TV वर जोर-जोरात बोंबलू लागला. What the fuck…. ह्या मुर्खाला एवढी साधी जाणीव पण नाहीए की मी आत रडत बसलेय. सतत कसा काय हा स्वतःच्याच विश्वात असतो. सतत आपला तो कामाचा दिखावा. आणि स्वतःपुरती ऐक ना गाणी. कशाला दुसऱ्याचं डोकं फिरवतोय. ती तरातरा हॉलमध्ये गेली आणि सरळ जाऊन TV स्विच ऑफ केला.

“का??” लॅपटॉपमधलं डोकं वर काढून निखिलने शॉकमध्ये गेल्यासारखं विचारलं.

“डोकं दुखतंय माझं.”

“तुला भूक लागली असेल अजून, जराश्या खिचडीनं कसं पोट भरेल.”

“मग तू बनवायचं होतास पंच-पक्वान्न.”

“अगं… चिडतेयस कशासाठी? मी काही चुकीचं बोललो का?”

“नाही नाही… चुकीचं कसं! बरोबरच आहे. तू आणि तुझी आई नेहमी बरोबरच असता.”

“आता आईचा काय संबंध. तिला कशाला मध्ये आणतेयस?”

“जाऊ दे. तसंही बोलण्यात काय अर्थ आहे म्हणा. जे आहे ते निस्तरायचं आता.”

“कुठली गोष्ट कुठे नेतेयस तू मुग्धा? एवढं निस्तरायला वगैरे लागण्यासारखं काय झालंय काय?”

“काय होतंय!? काही नाही. तू काम कर तुझं.” मुग्धा फणकारली.

निखिलने लॅपटॉप झाकला, “ठेवलं काम. बोल काय होतंय तुला?”

“मला नाही बोलायचं.”

“ठीक आहे. तू शांत झालीस कि सांग.” निखिलने परत लॅपटॉप उघडला.

फणफणत ती बेडरूममध्ये आली आणि बेडरूमचा दरवाजा जोरात आपटून बंद केला. काहीतरी जोरात आपटून फोडावंसं वाटत होतं. तिने नुसतीच उशी जोरात बेडवरुन खाली फेकली आणि डोकं हातात धरून बसली. आता तर तिच्या डोक्यात काही विचार पण येत नव्हते. नुसतीच भणभण. तिच्या डोळ्यात पाणी पण येत नव्हतं. दिवसभर इतका काथ्याकूट करून मेंदू थकला होता.  पाचएक मिनिटांनी निखिल दार उघडून आत आला.

“बोलणार नाही माझ्याशी?”

मुग्धा नुसतीच खाली बघत बसली. निखिल तिच्यापलीकडे जाऊन बसला. तिच्या पाठीवर हात ठेवणार इतक्यात त्याला लक्षात आलं कि अशा वेळेस हात पण लावायची सोय नसते. तो थोडंसं बाजूला सरकून बसला आणि शांतपणे विचारलं, “ काय झालंय?”

“काही नाही. जा इथून”

“सॉरी मी मगाशी rudely बोललो”

“I don’t care.” मुग्धा तोंड फिरवून म्हणाली, “मला घरी जायचंय. मी पुढच्या आठवड्याचं तिकीट काढणार आहे. डोन्ट वरी, माझ्याकडे तिकिटाचे पैसे आहेत.”

“का असं बोलतेयस?”

“बोलत नाहीए, सांगतेय तुला. मी पुढच्या आठवड्यात घरी जाणार आहे. माझ्या.”

“नको असं बोलू. प्लीज. नाही छान वाटत.”

“बरोबर आहे. तुला छान नाही वाटत… तुला इकडे यायचं होतं, तुला करिअर करायचं होतं, तुला पॅनकेक्स खायचे होते, तुला घर घायचंय. सतत फक्त तूच. आणि तूच महत्वाचा आहेस ह्या रिलेशन मध्ये.”

“सॉरी.. मला तसं नव्हतं म्हणायचं. आणि असं का वाटतंय तुला?”

“हेच. कधी विचारणार आहेस तू मला?? कि मला काय वाटतंय???” तिचा आवाज थोडासा चढला. मोठा श्वास घेऊन ती म्हणाली. “मला नाहीए चांगलं वाटत इथं. आज तर खूपच जाणवतंय. सकाळी पडलेल्या किळसवाण्या स्वप्नाला घेऊन दिवसभर नुसताच डोक्याचा भुगा करून घेतेय मी. पण प्रॉब्लेम ते स्वप्न नाहीए. खरा प्रॉब्लेम हि माझी रिऍलिटी आहे. एकटी पडलीय मी.”

“काय स्वप्न पडलं होतं?”

“नाही सांगायचं मला. अजून स्वतःबद्दल low feel करून नाही घ्यायचं.”

“पण तुला असं का वाटतंय कि तू एकटी आहेस?”

“का नाही वाटणार निखिल? कालच्या पार्टीतच बघ. किती तरी वेळ तू मला एकटीला बसवून वेगळ्याच लोकांशी बोलत होतास. ती जाडी बाई Annebell, तिचा डिवोर्स होतोय. आणि हि किती कॉमन गोष्ट झालीय आजकाल पण तरी माझ्या पोटात गोळा आला होता. आणि हे share करायला तू तिथे नव्हतास. आणि मग उगाच कुठेतरी आतमध्ये एक भीती चिकटून राहिलीय. माझं पण तसंच होईल.” बोलता बोलता तिने आवंढा गिळला.

निखिलने पटकन तिला मिठीत घेतलं, तिने सुटायचा प्रयत्न केला, त्याला दूर ढकलायचा प्रयत्न केला पण त्याने मिठी सैल केली नाही.

“मला माहित आहे मला नीट बोलता येत नाही. त्यामुळं चांगले चांगले शब्द वापरून तुला मी शांत नाही करू शकत. पण मी काल तुझ्याजवळ का नव्हतो ह्याचं कारण मी तुला आत्ता दाखवतो” निखिल मिठी सोडवत म्हणाला आणि बाहेरच्या खोलीत गेला. लगेच आपला लॅपटॉप घेऊन आला.

“हे बघ!”

“काय? त्या म्हाताऱ्याचा “appreciation mail” मेल वगैरे आहे का? मला इंटरेस्ट नाहीए”

“प्लीज बघ तरी. एकदा बघ”

मुग्धाने इर्रिटेट होऊन लॅपटॉप मांडीवर घेतला. कुठल्या तरी Dave Sturgeon चा mail होता. हे नाव कुठंतरी बघितल्यासारखं का वाटतंय!?

Hey Nikhil,

I went through your wife’s work this morning. I will review it with my design team on Monday. I personally liked her work. We will call her for an interview next week. It’ll be great if you give me her details.

Thanks,

Dave St.

Sr. Designer
MercQuirk.

“हे काय आहे?” मुग्धाच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.

“काल त्या म्हाताऱ्याबरोबर गप्पा मारत होतो ना? तो मर्लिनचा फॅमिली फ्रेंड होता. He has funded a startup. हे MerQuirk का काय ते. They are into merchandise business. T-shirts, Phone covers वगैरे. It’s a small team. And they are always looking for creative minds.” असं म्हणून त्याने तिच्याकडे हात केला. “मग मी त्याला तुझं ते Facebook चं page दाखवलं होतं. त्याने मला ह्या माणसाचा ई-मेल दिला. आणि we got you an interview!”

मुग्धाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. निखिलने तिला जवळ घेतलं. “I know” तिच्या डोक्यावर हात फिरवत तो म्हणाला. “I  know की हे तुझं काम नाहीए. हे करण्यासाठी तू इथे नाही आलीयस. आणि मला हे काही तुझ्यावर फोर्स नाहीए करायचं. पण तुझ्यातल्या आर्टिस्टला तू डांबून ठेवलंयस, त्याला बाहेर काढावंस, इतकंच मला वाटतंय.”

मुग्धाला रडू आवरत नव्हतं. पण हे त्राग्याचं, insecurityचं  किंवा स्वतःला कमी लेखण्याचं रडू नव्हतं. मोकळं होण्याचं, हलकं होण्याचं रडू होतं. थोडावेळ त्याला चिकटून रडून झाल्यावर ती हुंदके देत असताना निखिलने विचारलं, “काय स्वप्न होतं?”

“तू.. तू.. एका लांब केसाच्या, फॅन्सी कपडे घातलेल्या मुलीबरोबर..”

“हम्म?”

“एका.. रेस्टॉरंट मध्ये गळाभेट करत होतास आणि मला ignore करत होतास.”

निखिलने तिच्याकडे क्षणभर बघितलं, आणि म्हणाला.. “ohh… असे काळे, लांब आणि खाली कुरळे झालेले केस होते का तिचे?”

“हो.. तुला कसं माहित?”

“आणि आपण मागच्या वेळेस उगाच फाईन-dine च्या रेस्टॉरंटचे फोटो बघत होतो तशातलं रेस्टॉरंट होतं का?”

“What the hell… तू खरंच गेला होतास?”

“हो.. तुझ्या स्वप्नात. तुझ्याच बरोबर. हे बघ, काळे लांब केस.” त्याने तिच्या केसांना हात लावून दाखवलं. “तूच आहेस ती धोंडूबाई…” त्याने तिला एक टपली मारली. तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, “तुला म्हातारी झालेलं बघायचंय मला. आपल्या नातवंडांना गोष्टी सांगताना, वस्तूंची नावं विसरताना, माझ्या नावाने खडे फोडताना. हे सगळं बघायचं आहे. मला नको सोडून जाऊ.” मुग्धा त्याच्या कुशीत शिरली.
“मी असा म्हातारा होणार, माझे केस गळणार, असं मध्ये गोल टक्कल पडणार. तुझे पण केस पांढरे होणार म्हणा. तुझे किडके दात पडलेले असणार त्यामुळं आपल्याला तुला कवळी बसवून आणावी लागणार…” मुग्धा त्याला चिकटून ऐकत होती… बघा.. आत्ता इतकं छान बोलत होता. आता अचानक टकलावर आला. माझ्या किडक्या दातांचं mention करायचं काय गरज होती. त्याच्या कुशीतून बाहेर येऊन त्याच्या चेहऱ्याकडे ती बघू लागली.
निखिलचं आपलं चालूच होतं “तुला माहितीय… कवळी बसवल्यावर जोरात हसता येत नाही. आम्ही एकदा जेवत होतो.. आणि आज्जी आजोबा आले होते, आणि मी काहीतरी जोक मारला आणि आज्जी एकदम जोरात हसली आणि तिची कवळीच निसटून बाहेर आली.”
“Oh my god… निखिल! बंद पड!” खाली पड लेली उशी उचलून तिने त्याच्या डोक्यात मारली.