कहाणी ठमाकाकूंची(Kahani Thmakakunchi)

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.

ठमाकाकू केस-बीस विंचरून, कॉटनचा पंजाबी ड्रेस घालून, थोडीशी लिपस्टिक लावून तयार झाल्या, निघता-निघता त्यांनी तोंडावर मास्क चढवला, नाकावरून थोडा खाली ओढून लिफ्टमध्ये चढल्या.  खाली ठकुमावशी त्यांची वाट पाहत होत्या. सोसायटीमधल्या ह्या दोन मैत्रिणी नेहमी संध्याकाळी आपलं मॉर्निंग वॉक करतात. तसं त्यांनी आपलं वॉक सुरु केलं.

“अगं? पाहिलंस का त्या विराटने काय केलं?” ठमाकाकू डोळे मोठे-मोठे करत म्हणाल्या.

“काय गं?” ठकुमावशींनी विचारलं.

“अगं तिकडे मॅच सोडून भारतात परत आला. काय तर म्हणे पॅटर्निटी लिव्ह! कशाला असल्या माणसाला कॅप्टन करायचं? देशासाठी खेळायचं सोडून बायकोशी गुलुगुलु करायला आला इकडे.”

“हो का? असं अर्ध्यात सोडून आला… खरंच एवढी काय गरज होती!”

“ह्याच्यापेक्षा धोनीच बरा होता. मागे म्हणे कुठल्या तरी वर्ल्ड-कपच्या वेळी त्याला पण झाली होती मुलगी. पण तो नाही आला असं सगळं टाकून. देशासाठी खेळायचा तो. आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगला कॅप्टन होता… ” क्रिकेटर्सच्या आयुष्यावरचं आपलं अगाध ज्ञान पाजळत त्या पुढे म्हणाल्या, “थांब तुला ती पोस्ट पाठवते.”

“हो पाठव.”

“थांब आपल्या सोसायटीच्या ग्रुप वरच टाकते ना…” असं म्हणत ठमाकाकूंनी घाईने सेंड बटण दाबलं.

पॅटर्निटी लिव्ह वर खेळ सोडून आल्याबद्दल कोहलीची नाचक्की करणारे २-३ फॉर्वर्डस त्यांनी पुढे फॉरवर्ड केले.

त्यानंतर मग ‘सुनेच्या आणि सासूच्या’ सिरिअलीवर हलकी-फुलकी चर्चा केली. त्या दिवशी रविवार होता म्हणून स्पेशल मेनू बद्दल डिस्कशन केलं. बोलता बोलता निघालेल्या विषयावरुन, “अगं तिच्या रेसिप्या बघू नकोस, तू “हि” वाली बघ!”, असं म्हणून ठकुमावशींनी “चुंद्याची रेसिपी” ठमाकाकूंना फॉरवर्ड केली.

रविवारचं चमचमीत जेवून, छान झोप काढून सोमवारी सकाळी ठमाकाकू उठल्या. आज उपवास म्हणून खिचडी बनवली. देवपूजा करताना महादेवाची कथा वाचली.

कहाणी सोमवारची, खुलभर दुधाची—”

आटपाटनगराचा एक राजा होता, तो मोठा शिवभक्त होता. एके दिवशी त्याने ठरवले, येत्या सोमवारी आपल्या गावातल्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा. मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरून टाकायचा. त्याने गावात दवंडी पिटवली, ‘ज्याने त्याने आपल्या घरातील दूध आणून महादेवाला वाहायचे आहे हो sss…’

तशी नागरिक निघाले हंडे, कळश्या घेऊन… घरातलं सगळं दूध त्यांनी रिकामं केलं, गायीचं काढलेलं दूध सरळ नेऊन महादेवाला अर्पण केलं.  राजानेही आपल्याकडचं सगळं दूध देवाला वाह्यलं. पण एवढं करून मंदिराचा गाभारा काही भरेना!

राजा काळजीत पडला, देवाचा काही कोप वगैरे तर होणार नाही अशी भीती त्याला वाटू लागली.

इकडे तोवर संध्याकाळी एक म्हातारी वाटीभर दूध हातात घेऊन मंदिराजवळ आली. तिची वाटी बघून मंदिराचा पहारेकरी तिच्यावर हसला, पण त्याने तिला आत जाऊ दिलं.

म्हातारीने देवासमोर हात जोडले, बेलपत्र वाह्यलं आणि ती वाटी गाभाऱ्यात रिकामी केली. तशी गाभारा पूर्ण भरला आणि दूध बाहेर वाहू लागले. हे पाहताच पहारेकऱ्याने म्हातारीला राजासमोर नेले.

राजाने विचारले, “काय गं म्हातारे, तू काय असा चमत्कार केलास?”

“महाराज…” म्हातारी डोक्यावरचा पदर सांभाळत म्हणाली, “मी काही चमत्कार केला नाही… मी तर सकाळी माझ्या गायीचं दूध काढलं, घरी नातवंडांना दिलं, सून पोटुशी आहे तिला दिलं, नवऱ्याला थोडं काढून ठेवलं, गायीच्या बछड्याला थोडं घातलं.. एवढं करून खुलभरच दूध उरलं, ते घेऊन मी आले आणि मनोभावे देवाला वाह्यलं. तुम्ही सर्वांनी बछड्याचा हक्काचा घास काढून घेतला, तान्ह्या बाळाला उपाशी ठेवलं आणि दूध देवाला दिलं. त्याला ते कसं बरं गोड लागेल?”

राजाला स्वतःची चूक कळाली.

अशारितीने कहाणी सुफळ संपूर्ण!”

कहाणी संपवून, पूजा आटोपून ठमाकाकूंनी देवाला नैवेद्य दाखवला.

गम्मत म्हणजे, आपण काल केलेल्या फॉर्वर्डस मधला आणि आज आपल्यावर देवकृपा असावी म्हणून वाचलेल्या गोष्टीतला विरोधाभास त्यांना कळला नाही आणि कदाचित कधी कळणारही नाही.

Leave A Comment