Posts by Amrapali Mahajan

गुरु ब्रह्मा…(Guru Brahma…)

आपल्या “घडण्या”त जन्मदात्यानंतर ‘शिक्षक’ ह्या व्यक्तीचा खूप मोठा वाटा असतो. आईबाबा जेव्हा आपलं लहानगं बोट अंगणवाडी बाईंच्या (आजकाल काय नर्सरी का किंडरगार्टन म्हणतात वाटतं – शेवटी मुले ही देवाघरची फुले आहेत म्हणा, so, हरकत नाही) हातात सोडून जातात त्या दिवसापासून आपलं आणि शिक्षकांचं “लव्ह-हेट” रिलेशन सुरु होतं.

काही शिक्षक अगदी कार्यानुभव सुद्धा मनापासून शिकवतात तर काहींना “वाचिक” अभिनयात पहिला नंबर मिळू शकतो. काहींना छडी लागे छमछम प्रकार आवडतो, काहींना शाब्दिक मार पुरेसा असतो. काही शिक्षक नुसताच ढीगभर होमवर्क देतात, तर काहींना प्रयोगातून शिकवायला आवडतं. एकाच शाळेत वेगवेगळे नमुने असतात, शिक्षकांचे आणि शिकणाऱ्यांचेही. पण शिक्षक कसेही असले तरी कुठे ना कुठे आपल्या समोर बसलेल्या पोरांचं भलं व्हावं हीच एक इच्छा त्यांच्या मनात असते. सुदैवाने आमच्या मुलींच्या शाळेत, “शिकून काय करायचं तुम्हाला, नवऱ्याच्या घरी पोळ्याच लाटायच्या” असं सांगणारे कोणीही महाभाग भेटले नाहीत.

शिक्षक/ गुरु ह्या व्यक्तीने असल्या घातक विचारांपासून दूर राहिलेलंच योग्य. आणि ते तसेच असतात देखील. हे “unbiased” राहण्याचं प्रशिक्षण त्यांना कोण देतं माहित नाही. शिक्षकाला ना समोरच्या व्यक्तीचं जेन्डर दिसतं, ना जात-धर्म. त्यांचं काम फक्त शिकवायचं, समोर बसलेल्या जमावातून एखादा चमकणारा खडा शोधायचा आणि त्याला पैलू पाडायचे.

अशाच एका प्रामाणिक शिक्षिकेची लहानशी गोष्ट काही दिवसांपूर्वी पाहण्यात आली. ही छोटी documentary खरंतर एका ऐतिहासिक अशा घटनेबद्दल आहे. सहा वर्षांच्या कृष्णवर्णीय “Ruby Bridges” च्या शौर्याबद्दल आहे. पण तिच्याबरोबरच तिची सडपातळ छोटेखानी शिक्षिकादेखील भावून जाते.

१९६० मध्ये, ६ वर्षांच्या ‘आफ्रिकन-अमेरिकन’ “Ruby Bridges”ने जेव्हा पहिल्यांदा शाळेची पायरी चढली, तेव्हा अनेक विवाद झाले. U.S. Supreme Court ने “Racial segregation in public schools is unconstitutional” असं जाहीर केल्यावर काही व्हाईट लोकांना ते आवडलं नाही. अशा प्रकारच्या “एकत्रीकरणा”विरोधात काही लोकांनी निदर्शनं केली. १४ नोव्हेंबर १९६० रोजी छोट्याशी “रुबी” चार ‘फेडरल मार्शल्सच्या’ संरक्षणाखाली शाळेत गेली. काही ‘गोऱ्या पालकांनी’ आपल्या मुलांना शाळेतून काढून घेतलं. काही शिक्षकांनी तिला शिकवायला नाकारलं. आणि अशातच एक शिक्षिका पुढे आली. ‘Barbara Henry’ ने रुबीला शिकवण्याची जबाबदारी उचलली. आणि पुढचं एक वर्ष तिने ‘रुबी’ला एकटीला class मध्ये शिकवलं.

हा law पास करण्यात आला तेव्हा पॉलिटिशियन्सनी दोन्ही बाजूंनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. आणि राजकारणी हे करतच राहतील.

पण ‘बार्बरा’ने जे केलं ते फक्त एक गुरूच करू शकतो.

आपल्या शिक्षण-व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. शिक्षणपद्धती बदलल्या पाहिजेत, वगैरे खरं आहे. पण शिक्षकांची मुलांना ‘घडवण्या’ची आत्मीयता कायम राहिली पाहिजे.
आई-बापांची जबाबदारी त्यांच्या मुलांपर्यंत सीमित असते. ही समोर बसलेली मुलं खरंतर त्या शिक्षकांची कोणी नसतात. ह्या मुलांना घडवण्याचं क्रेडिट देखील त्यांना कोणी देत नसतं. तरीही निरपेक्ष हेतूने ते आपलं काम करत असतात.

फक्त पिरियॉडिक टेबल घोकून न घेता त्यातल्या शास्त्रज्ञांच्या गमती सांगणाऱ्या माझ्या बाबांना, लॉकडाऊन मध्ये पोरांनी शिकावं म्हणून ह्या वयात Powerpoint आणि Youtube विडिओ बनवायला शिकणाऱ्या माझ्या आईला, इंग्लिश सुधारावं म्हणून उन्हाळाच्या सुट्टीत आपल्या घरी बोलवून गोठ्यात काम करत माझ्या मित्राची उजळणी घेणाऱ्या त्याच्या शिक्षकांना, आणि कुठल्या-ना-कुठल्या स्वरूपात भेटून आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या अशा तमाम गुरूंना ‘गुरुपौर्णिमे’निमित्त कृतज्ञतापूर्वक प्रणाम!

टिपटिप की रिपरिप(Tiptip Ki Riprip)

रखरखीत जमिनीवर अचानक कोसळणाऱ्या पावसाबरोबर येणारा मातीचा सुगंध, आपसूकच गावाकडं घेऊन जातो. वय वीस-एक वर्षांनी कमी होतं, पाण्याबरोबर वाहणारे रस्ते आठवतात. मातीत पडणाऱ्या गारा गोळा करून खाण्यातली मजा आठवते.

दप्तर भिजू नये म्हणून ढगळा रेनकोट दप्तरावरून चढवून बागुलबुवाचा अवतार करून शाळेला जाण्यात एक वेगळीच गम्मत होती. घरी परत येताना पायाला पाणी लागू नये म्हणून घातलेल्या ‘गमबूटात’ एखाद्या डबक्याजवळ थांबून पाणी भरायचं आणि मग त्यात पाय घालून ‘पचपच’ आवाज करत चालत जायचं – ह्याला एक वेगळी बुद्धिमत्ता लागते. असो!

पावसाचा तसा त्रास कधी वाटला नाही. गावी असताना तरी नाही. पण शहरात कधी कधी पाऊस देखील ९ ते ५ करून वैतागल्या सारखा वागतो. रस्ते निसरडे करून accidents करून ठेवतो, ट्रॅफिक ला ‘जॅम’ करून ठेवतो. ‘कोरडेपणा’ची सवय झालेल्या नद्यांना कळत नाही आता पाण्याचं काय करायचं. रस्त्यांचं bladder तर लगेच फुल्ल होऊन जातं.

तरीही ह्या सगळ्या पांढरपेशी अडचणी.

मध्ये एकदा ‘नागराज मंजुळे’ ह्यांची ‘पावसाचा निबंध’ ही शॉर्टफिल्म पाहण्यात आली. धो-धो कोसळणारा पाऊस, शाळेत ‘पावसावर निबंध’ लिहून आणायला सांगितलेला मुलगा, त्याची छोटी बहीण, दारुडा बाप आणि घराला हातभार लावता लावता वैतागलेली आई ह्यांची ती गोष्ट आहे.

ती फिल्म आता पाऊस बघताना हमखास आठवते.

त्यांनतर, काही वर्षांपूर्वी जेव्हा कामवाल्या मावशींनी ‘घराचा पत्रा उडाला’ म्हणून सुट्टी मारली होती, ते सहानुभूतीने ऐकून घेतलं नव्हतं, ते आठवून लाज वाटते.

पाऊस प्रत्येकासाठी वेगळा आहे. कुणाला त्याची टिपटिप धुंद करून टाकते तर कोणी त्याच्या रिपरिपीला त्रासलेला असतो. एखाद्या प्रेमात पडलेल्याला रोमांचक तर दुसऱ्यासाठी विध्वंसक.  कुणासाठी सुंदर आठवणींचा पूर आणि कोणाला पाण्याखाली गेलेलं शेत बघताना डोळ्यातलं पाणी लपवायला आधार.

हा पाऊस एखाद्यासाठी बाष्पीभवनाची प्रक्रिया असेल, तर दुसऱ्यासाठी इंद्रदेवाची कृपा.

ज्याच्यासाठी जसा आहे तसा आहे. आपण गरम चहाचा कप हातात धरून फक्त इतकंच करू शकतो, खाली येणारा थेंब प्रत्येकासाठी सुख घेऊन येवो अशी प्रार्थना!

कहाणी ठमाकाकूंची(Kahani Thmakakunchi)

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.

ठमाकाकू केस-बीस विंचरून, कॉटनचा पंजाबी ड्रेस घालून, थोडीशी लिपस्टिक लावून तयार झाल्या, निघता-निघता त्यांनी तोंडावर मास्क चढवला, नाकावरून थोडा खाली ओढून लिफ्टमध्ये चढल्या.  खाली ठकुमावशी त्यांची वाट पाहत होत्या. सोसायटीमधल्या ह्या दोन मैत्रिणी नेहमी संध्याकाळी आपलं मॉर्निंग वॉक करतात. तसं त्यांनी आपलं वॉक सुरु केलं.

“अगं? पाहिलंस का त्या विराटने काय केलं?” ठमाकाकू डोळे मोठे-मोठे करत म्हणाल्या.

“काय गं?” ठकुमावशींनी विचारलं.

“अगं तिकडे मॅच सोडून भारतात परत आला. काय तर म्हणे पॅटर्निटी लिव्ह! कशाला असल्या माणसाला कॅप्टन करायचं? देशासाठी खेळायचं सोडून बायकोशी गुलुगुलु करायला आला इकडे.”

“हो का? असं अर्ध्यात सोडून आला… खरंच एवढी काय गरज होती!”

“ह्याच्यापेक्षा धोनीच बरा होता. मागे म्हणे कुठल्या तरी वर्ल्ड-कपच्या वेळी त्याला पण झाली होती मुलगी. पण तो नाही आला असं सगळं टाकून. देशासाठी खेळायचा तो. आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगला कॅप्टन होता… ” क्रिकेटर्सच्या आयुष्यावरचं आपलं अगाध ज्ञान पाजळत त्या पुढे म्हणाल्या, “थांब तुला ती पोस्ट पाठवते.”

“हो पाठव.”

“थांब आपल्या सोसायटीच्या ग्रुप वरच टाकते ना…” असं म्हणत ठमाकाकूंनी घाईने सेंड बटण दाबलं.

पॅटर्निटी लिव्ह वर खेळ सोडून आल्याबद्दल कोहलीची नाचक्की करणारे २-३ फॉर्वर्डस त्यांनी पुढे फॉरवर्ड केले.

त्यानंतर मग ‘सुनेच्या आणि सासूच्या’ सिरिअलीवर हलकी-फुलकी चर्चा केली. त्या दिवशी रविवार होता म्हणून स्पेशल मेनू बद्दल डिस्कशन केलं. बोलता बोलता निघालेल्या विषयावरुन, “अगं तिच्या रेसिप्या बघू नकोस, तू “हि” वाली बघ!”, असं म्हणून ठकुमावशींनी “चुंद्याची रेसिपी” ठमाकाकूंना फॉरवर्ड केली.

रविवारचं चमचमीत जेवून, छान झोप काढून सोमवारी सकाळी ठमाकाकू उठल्या. आज उपवास म्हणून खिचडी बनवली. देवपूजा करताना महादेवाची कथा वाचली.

कहाणी सोमवारची, खुलभर दुधाची—”

आटपाटनगराचा एक राजा होता, तो मोठा शिवभक्त होता. एके दिवशी त्याने ठरवले, येत्या सोमवारी आपल्या गावातल्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा. मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरून टाकायचा. त्याने गावात दवंडी पिटवली, ‘ज्याने त्याने आपल्या घरातील दूध आणून महादेवाला वाहायचे आहे हो sss…’

तशी नागरिक निघाले हंडे, कळश्या घेऊन… घरातलं सगळं दूध त्यांनी रिकामं केलं, गायीचं काढलेलं दूध सरळ नेऊन महादेवाला अर्पण केलं.  राजानेही आपल्याकडचं सगळं दूध देवाला वाह्यलं. पण एवढं करून मंदिराचा गाभारा काही भरेना!

राजा काळजीत पडला, देवाचा काही कोप वगैरे तर होणार नाही अशी भीती त्याला वाटू लागली.

इकडे तोवर संध्याकाळी एक म्हातारी वाटीभर दूध हातात घेऊन मंदिराजवळ आली. तिची वाटी बघून मंदिराचा पहारेकरी तिच्यावर हसला, पण त्याने तिला आत जाऊ दिलं.

म्हातारीने देवासमोर हात जोडले, बेलपत्र वाह्यलं आणि ती वाटी गाभाऱ्यात रिकामी केली. तशी गाभारा पूर्ण भरला आणि दूध बाहेर वाहू लागले. हे पाहताच पहारेकऱ्याने म्हातारीला राजासमोर नेले.

राजाने विचारले, “काय गं म्हातारे, तू काय असा चमत्कार केलास?”

“महाराज…” म्हातारी डोक्यावरचा पदर सांभाळत म्हणाली, “मी काही चमत्कार केला नाही… मी तर सकाळी माझ्या गायीचं दूध काढलं, घरी नातवंडांना दिलं, सून पोटुशी आहे तिला दिलं, नवऱ्याला थोडं काढून ठेवलं, गायीच्या बछड्याला थोडं घातलं.. एवढं करून खुलभरच दूध उरलं, ते घेऊन मी आले आणि मनोभावे देवाला वाह्यलं. तुम्ही सर्वांनी बछड्याचा हक्काचा घास काढून घेतला, तान्ह्या बाळाला उपाशी ठेवलं आणि दूध देवाला दिलं. त्याला ते कसं बरं गोड लागेल?”

राजाला स्वतःची चूक कळाली.

अशारितीने कहाणी सुफळ संपूर्ण!”

कहाणी संपवून, पूजा आटोपून ठमाकाकूंनी देवाला नैवेद्य दाखवला.

गम्मत म्हणजे, आपण काल केलेल्या फॉर्वर्डस मधला आणि आज आपल्यावर देवकृपा असावी म्हणून वाचलेल्या गोष्टीतला विरोधाभास त्यांना कळला नाही आणि कदाचित कधी कळणारही नाही.

नागरिकशास्त्र (Nagarikshastr)

सातवीचा वर्ग, एक तास संपून दुसरा तास सुरु व्हायची मधली वेळ. त्या वेळात वर्गात किलकिलाट सुरु. मुलींची शाळा तर साहजिकच बोलायला विषय खूप असायचे.  वर्गाची “Class Representative” असूनही मी आणि माझ्या मैत्रिणीच्या गप्पांनाच ऊत आलेला. तशा वर्गातल्या सगळ्या मुली मैत्रिणीच. पण त्यात हि माझी खास मैत्रीण. आमच्या गप्पांना खंड नसायचा. शिक्षक वर्गावर आले तरी वहीवर लिहून गप्पा continue व्हायच्या.

असा साधारण scene असताना नागरिकशास्त्राचे सर वर्गात शिरले. “Goooood Afternoooon Siiiir!” असं उठून आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि बेंचवर बसलो.  काही शिक्षकांना तुकडी अ आणि तुकडी ब ह्यांना एकत्र करून syllabus संपवायचा होता. त्यामुळे एका बेंचवर तीन मुली बसल्या होत्या.

सरांनी नवीन धडा उघडायला सांगितलं आणि ते पुढे वाचू लागले. अचानक ते थांबले. आणि आम्हाला आडनावाने हाक मारून उभं केलं.

सर म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं. तुम्ही चांगल्या घरातून येता म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना कसंही वागवायचा अधिकार आहे?”

आम्हाला दोघींना काही कळेना. मग सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. माझं आणि ह्या सरांचं फार पटायचं नाही. शाळेत असताना ‘खेळा’त सोडून सगळ्या गोष्टींत मी पुढे असायचे, तर ते त्यांना फारसं आवडायचं नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल कि माझ्यामुळे बाकीच्यांना संधी मिळत नाही. त्या दिवशी देखील ते अशाच अर्थाचं काहीतरी म्हणाले, “काय महाजन, काय वाटतं तुला? की तू नंबर काढतेस तर तू दुसऱ्यांशी कशीही वागू शकतेस?”

माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी त्यांना विचारलं, “सर काय झालं? मी काय केलं?”

सर मैत्रिणीला म्हणाले, “तू तिथेच थांब आहेस त्या ठिकाणी.” आणि मला पुढे फळ्याजवळ  बोलवलं. मग ते म्हणाले, “आता इथून बघ काय दिसतंय, ती हणबरवाडीची मुलगी, ती कुठे बसलीय, आणि तुम्ही दोघींनी किती जागा घेतली आहे.”

मी बघितलं तर ती तिसरी मुलगी बेंचच्या एका कोपऱ्यावर बसली होती, आणि आमच्या गप्पांमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणीने कधी २/३rd पेक्षा जास्त जागा घेतली होती ते आम्हाला कळलं नव्हतं.

मी डोळ्यातून गळणारं पाणी कसंबसं थांबवण्याचा प्रयत्न करून सरांना म्हणाले, “आम्ही मुद्दाम केलं नाही सर… आम्हाला कळलं नाही. तिने सांगितलं असतं तर आम्ही सरकून बसलो असतो.”

“हो… पण ती सांगणार कशी? वर्गातल्या फार शहाण्या मुली ना तुम्ही”

मी बाकावर कोपऱ्यात जाऊन बसले. तिसऱ्या मुलीला नीट जागा करून दिली आणि तो क्लास व त्यानंतरचे उरलेले क्लास खाली मान घालून नोट्स घेत संपवले.

घरी जाऊन हे सांगितलं तर आई म्हणाली, “उद्यापासून तू नीट बघून बसत जा.”

खूप वर्षांनी तो प्रसंग पुन्हा आठवला.

मला तेव्हा सरांचा राग आला होता खरा, आणि कदाचित सरांची सांगण्याची पद्धत चुकीची होती. किंवा बरोबरच असेल. काही अनुभव कडू लागल्याशिवाय मनावर कोरले जात नाहीत.

पण ते सांगत होते त्यात तथ्य होतं. आमच्या बाकावर बसलेली ती मुलगी एस.टी पकडून शाळेला येत असे. एवढंच नाही तर घरी भांडी-धुणी अशी कामं करत असे. ती स्वतःहून बहुधा आम्हाला बेंचवरच्या अडचणीबद्दल बोलली नसती.

आता लक्षात येतं की, बऱ्याचदा आपल्या bubble मध्ये राहून आपण दुसऱ्याला समजून घेण्यात कमी पडतो. स्वतःच्या जगात गुरफटून जाऊन दुसऱ्याबद्दल अनास्था कधी निर्माण होऊन जाते कळत नाही.
आणि आता त्या अनास्थेला सोशल मीडियाने छान फोडणी देऊन सजवलं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, विषयाबद्दल खोल माहिती नसताना त्यावर ‘कमेंट’ करण्याचं शस्त्र लोकांना मिळालं आहे. स्मार्टफोन व स्वस्त इंटरनेट वापरून अनेक ‘इंटरनेटवीर’ दर मिनिटाला जगाशी ‘विसंवाद’ साधत असतात. दुसऱ्याला समजून घेण्याची किंवा एखाद्या विषयाबद्दल पूर्णतः जाणून घेण्याची गरज उरली नाहीए. कुठल्याही व्यक्तीविषयी assumptions करून गरळ ओकण्याची मुभा मिळाली आहे.

दुसऱ्याला काय वाटेल ह्याचा तिळमात्र विचार न करणारी ही लोकं बघून असे काही स्वानुभव आठवतात.

असे अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतीलच असे नाही. पण दुसऱ्याच्या बूटात चालून कसं वाटतं हे आपल्याला माहित नाही, ह्याची फक्त जाणीव असणं पुरेसं आहे.
आपण बसलेल्या बाकावर स्वतः किती जागा घेऊन बसलोय हे पाहिलं तरी पुरेसं आहे.

हातावरच्या रेषा (Hatavarchya Resha)

“बाबा थोडा आवाज कमी करा.” महेश बाहेरच्या खोलीत जाऊन म्हणाला आणि उत्तराची वाट न बघता आतल्या खोलीत येऊन दार लावून बसला.

९ वाजले तरी तो बाहेर येईना म्हणल्यावर आई हळूच दार उघडून आत आली.

“काय रे? मीटिंग चालू आहे का?”

“नाही… एक काम संपवतोय.”

“जेवून परत बस.”

“तुम्ही घ्या जेवून…”

“अरे सुट्टीला आलायस. नंतर कर की.”

“आई. नंतर येतो म्हणलं ना?”

आई दार बंद करून निघून गेली. महेश १० वाजता जेवायला गेला. बाबा तेव्हा दुसऱ्या खोलीत अंथरूण घालत होते.

रात्री १२ वाजता बाहेरच्या खोलीत आई डोकावून गेली, महेश अजून लॅपटॉप घेऊन बसला होता.

.

“जास्तीचं काम आहे का?” सकाळी तिघे एकत्र चहा घेत बसले होते तेव्हा बाबांनी विचारलं.

“होय… आणि पुढं जायचं तर एवढं करावंच लागतं!”

“पुढं जायचं म्हणजे?”

“म्हणजे, माझं थर्ड year चालू आहे आता कंपनीत. आतापर्यंत माझं प्रमोशन झालं पाहिजे. मग त्यासाठी लागेल ते करायला पाहिजे.”

“असं काही नाही का? ठराविक वर्षांनी बढती मिळते…”

“तसं नसतं ओ बाबा… तुमच्यासारखं नाहीए, एका ठिकाणी नोकरी धरली की तिथेच, मग seniority प्रमाणे प्रमोशन्स होतील. इथं फार कॉम्पिटिशन आहे. झालं तर ठीक. नाही तर दुसरी कंपनी शोधा. आता आमच्याच कंपनीत बघा एका मुलीचं बघता-बघता प्रमोशन झालं. आणि सिनियर लोकं बसलीयत अजून तिथंच.”

“पण स्वतःला किती त्रास करून घ्यायचा त्या गोष्टीचा? सुट्टीसुद्धा त्यातच घालवायची?” आई पाण्याखाली कप्स विसळत म्हणाली.

“काय करू मग?” महेश थोडासा त्रस्त होऊन म्हणाला.

“अनिता… मी तुला गावातल्या शाळेतला तो किस्सा सांगितला का?” बाबांनी आईकडे बघत विषय बदलला.

“काय ओ?” आईने नॅपकिनला हात पुसत विचारलं.

बाबा महेशकडे बघत बोलू लागले,

“तर असं झालं की आमच्या चांगल्या ओळखीचे एक शिक्षक आणि त्यांची वाईफ- त्यादेखील ह्या शाळेत शिकवतात. आता ही शाळा एका धर्मादाय संस्थेने चालवली आहे. त्या मॅडम ज्या आहेत, त्यांना ह्या वर्षी बढती मिळणार होती आणि त्या मुख्याध्यापिका झाल्या असत्या. सिनिऑरिटी असल्यामुळं त्यांची ती हक्काची जागा होती.
आता ह्याच दरम्यान दुसऱ्या गावच्या एका शाळेत असं झालं, की तिकडे एक शिक्षक सरप्लस झाला. म्हणजे थोडक्यात त्याला तुमच्या भाषेत बेंचवर ठेवणे असा प्रकार! तो शिक्षक थोडा ओळख वगैरे काढून आपल्या गावच्या शाळेत आला.

आता हे चालू असताना शाळेच्या संस्थापकांनी जो 5-6 वर्षांपूर्वी मायनॉरिटीचा अर्ज गव्हर्मेंटला दिला होता. तो नेमका approve होऊन आला. एकदा ते हक्क मिळाले की संस्थेला त्यांचे निर्णय स्वतःहून घ्यायचा अधिकार मिळतो.

संस्थेच्या चालकांनी ह्या सरप्लस शिक्षकाला जो त्यांच्या कास्ट’चा आहे त्याला मुख्याध्यापक केला. ज्यांचं प्रमोशन होणार होतं त्या बाई शाळेत २० वर्षं काम करतायत.

आता ह्याला नशीब म्हणायचं, योगायोग म्हणायचा… पण सगळं आपोआप जुळून आलं.

आता तू सांग, त्या बाईंनी किती त्रास करून घेतला पाहिजे.?”

महेश शांत बसून हातातल्या फोनकडे नुसतंच बघत होता.  टिंग-डिंग वाजून फोनवर ई-मेल चा नोटिफिकेशन आलं. महेशने फोन switch-off केला आणि म्हणाला, “आज संध्याकाळी घाटावर जाऊ! खूप वर्षं झाली आपण एकत्र जाऊन. आई तुझी स्पेशल भेळ घेऊ तिकडे खायला!”

उतू नकोस मातू नकोस (Utu Nakos Matu Nakos)

“मम्मा, उतू-मातू म्हणजे काय?” ईशानने फरशीवर गाडी फिरवत फिरवत विचारलं.

“काय्य?” मी केस विंचरताना थबकले.

“तू नाहीस का काल म्हणत होतीस, उतू नको, मातू नको…” त्याने मग माझ्याकडे पाहिलं.

“oh… ते… उं… उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस.”

“हां, म्हणजे काय?”

आता काय सांगायचं ह्याला? इंग्लिश शाळेत शिकणारी ही मुलं. काय अर्थ सांगावा? तसा मला तरी कुठे उतू-मातूचा इंग्लिश शब्द माहित आहे म्हणा…!
तसं फार काही व्रतं-वैकल्य मला जमत नाहीत. पण लॉक-डाऊन मध्ये घरी राहिल्याने, सोसायटीतल्या शेजारणींच्या नादाने मीदेखील सण-वारात इंटरेस्ट घेऊ लागलेय. मग सासूबाईंच्या virtual देखरेखीखाली पूजा मांडतेय ‘महालक्ष्मी’ची. काल दुसरा गुरुवार झाला. लहानपणी ही कथा वाचायला नेहमी मी पुढे असायचे. चांगले आवाजातले चढउतार घेऊन.

आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शुर व प्रजादक्ष होता. देवा-ब्राम्हणांना, साधुसंतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवर्‍याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या, लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला; पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऎश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी.
देवीनं म्हातारीचं रुप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली – “अरे, आहे कां घरात कुणी ? कुणी घास देईल का ?” दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, “कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय ? गाव कोणतं ? तुला हवयं कायं ?” मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “माझं नाव कमला. द्वारकेहून आलेय गं ! राणीला भेटायचंय ! कुठं आहे गं राणी?

सुरतचंद्रिका दासीचा निरोप ऐकून बाहेर आली. ती तावातावाने म्हणाली, “कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ?”

हे ऐकून म्हातारी संतापली. “सुरतचंद्रिके, तुला तुझ्या संपत्तीचा गर्व झाला आहे, तुला तुझ्या भूतकाळाचा विसर पडला आहे. तू जा म्हणण्याआधीच मी निघाले.” असे म्हणून म्हातारी काठी टेकीत चरफडत निघाली. वाटेत तिला राजाची कन्या शामबाला दिसली….

हि गोष्ट वाचता वाचता मला ती म्हातारी दिसायची. सुरतचंद्रिका म्हणजे एखाद्या जुन्या हिंदी सिनेमातील vamp वाटायची. वाचताना कधी असा विचार वगैरे केला नव्हता. कि ह्याचा अर्थ काय? खरंतर कालही वाचताना केला नव्हता.

पण कुठे ना कुठे ती गोष्ट मनात होती. आजकालच्या मुलांसारखं ‘Value education’ वगैरे मिळत नव्हतं आम्हाला शाळेत. ‘मुलांचे संगोपन’ ह्या विषयावर आईनं तरी कधी पुस्तक वाचल्याचं आठवत नाही.

एके काळी कष्टात दिवस काढलेली आम्ही भावंडं आता सामाजिक अर्थाने चांगली सेटल्ड आहोत. पण माझ्या आणि माझ्या भावंडांच्याही मनात कुठेतरी जाणीव आहे, की हे दिवस कुणाच्या तरी कष्टामुळे आलेयत. आणि तेच कष्ट आपणही केले तर कुठे चांगले दिवस टिकून राहतील आणि मुलांच्या वाट्यालाही तेच सुख राहील.

हाच असावा त्या गोष्टीचा अर्थ. व्रत, पूजा, उपास ही सगळी निमित्त आहेत. वडिलधाऱ्यांकडून घेतलेला कष्टाचा वसा टाकून नाही द्यायचा, आणि अहंकाराला बाजूला ठेवायचं.

“मम्मा… मी थोडी कणिक घेऊ खेळायला?” ईशानचा किचनमधून आवाज आला.

“अरे! हा तिकडे कधी गेला” मी बेडवर बसून जो विचार करत होते त्यातून जागी झाले. आणि किचनकडे गेले. त्याने already थोडी कणिक घेऊन त्याचा हत्ती तयार करायला सुरुवात केली होती. उतू-मातू बद्दल तो विसरला होता.

जाऊ दे. काय सांगायचं त्याला. त्याच्या कानावर पडेल गोष्ट आणि कळेल अर्थ जेव्हा कळायचा!

कानोसा (Kanosa)

लेखक Neil Gaiman ह्यांचा एक किस्सा आठवतो. त्यात ते म्हणतात,”माझी एक लांबची बहीण जी आता जवळपास ९० वर्षाची आहे. ती आणि तिच्या मैत्रीणीना वर्ल्ड वॉर २ मध्ये शिवणकामचं काम दिलं होत. त्याकाळात कुणाकडे पुस्तक सापडलं तर त्याला सरळ मृत्यूची सजा व्हायची. अशा काळात हया मुलीला ‘Gone with the Winds’ पुस्तक हाती मिळालं होत. मग केवळ ४ तास झोप घेऊन उरलेल्या काही तासात ती ते पुस्तक रोज थोड वाचायची आणि काम करताना आपल्या मैत्रिणींना त्यातली गोष्ट सांगायची.ह्या मुली एका ‘स्टोरी’ साठी जीवाशी खेळत होत्या. हे ऐकून मला जाणवलं की मी करतोय ते काम खरंच महत्वाचं आहे. Because giving people stories is not a luxury, it’s actually one of the things to live and die for.”
भारतात तर कथा- कवितांना पुरातन काळापासून महत्त्व आहे. अत्यंत जटिल गोष्ट केवळ एका कथेच्या साह्याने कशी सोप्याने सांगता येते ह्याचं उत्तम उदाहरण आपली महाकाव्य आहेत.
गोष्टी खरंच प्रभावी असतात, त्या आपल्याला जाणीव करून देतात की आपण ‘एकटे’ नाही. कधी त्या आपल्याला काही खूप मोठा मतितार्थ समजावून जातात. कधी दुःखावर फुंकर घालून जातात, न बोलता उपदेश देऊन जातात. Viral झालेलं ‘मिम्स’ म्हणजे दुसर काय आहे ‘Mini stories’ च तर आहेत. आपल्यासारखचं विचार करणार, वागणार अजूनही कोणी आहे म्हणजेच ‘relatable’ वाटल्यामुळेचं तर त्यांना तुफान popularity मिळलीय.
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात छोट्या मोठ्या ‘किस्स्यांना’, लहानपणी ऐकलेल्या गोष्टींना, घरातल्या आजी किंवा आजोबांच्या अनुभवांना फार महत्त्व आहे. ‘You are what you eat’ ह्यामध्ये कानाने खाणे, डोळ्याने खाणे हे देखील आलचं.
‘कानोसा’ ह्या कॉलम मधून अशाच काही गोष्टी, किस्से, अनुभव तुमच्या भेटीला आणणार आहोत. Stay tuned!

आटपाट नगरात (Aatpat Nagarat)

“आटपाट नगरात एक सावकार राहत असे. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीचे नाव रूपवंती, नावडतीचे नाव गुणवंती. रूपवंतीला आपल्या रूपाचा गर्व होता. सावकार तिच्यावर प्रेम करी, तिला रेशमी कापडं आणून देई. गुणवंती दिसायला काळी-सावळी, माहेर गरिबीचं. दिवसभर घरकाम करी आणि रात्री आपल्या
खोपट्यात झोपी. एके दिवशी लाकडं गोळा करून आणत असता, तिला एक म्हातारी लंगडताना दिसली . तिने जवळ जाऊन विचारपूस केली. म्हातारीच्या पायातला काटा काढून चिंधी बांधली. म्हातारीनं आशीर्वाद दिला आणि म्हणाली, “४ कोसावर उजव्या बाजूस तळं आहे. त्यात ३ डुबक्या मार तुझी मनीची इच्छा पूर्ण होईल.” गुणवंती तळ्याजवळ गेली देवाचे स्मरण करून ३ डुबक्या मारल्या. बाहेर आली. तर अंगावर रेशमी लुगडे, हातात सोन्याची कांकण, गळ्यात सोनसळी हार. पाण्यात पहिले तर रूप गोरेपान. तडक घरी गेली. सावकाराला ओळख पटेना. मग ओळख पटवून दिली. सावकाराला गुणवंतीची ओळख पटली. आणि गुणवंती सावकारासंगे सुखाने नांदू लागली.”

चांगलं आहे ना… तळ्यात डुबक्या काय मारल्या, गुणवंती गोरी काय झाली आणि सावकाराची आवड बदलली. काळ्या रंगाचा इतका कसला तिरस्कार ? आणि गोऱ्या रंगाचं वर्चस्व किती normalize करून ठेवलंय ह्या अशा गोष्टींनी. काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये Tea-time वेळी एका colleague ला विचारलं , “अगं चहा नाही आवडत तुला?”
तेव्हा हसत हसत ती म्हणाली, “लहानपणी मला सांगितलं होतं चहा प्यायलं की काळं होतो, मग तेव्हापासून मी चहा पीत नाही!”
लहानपणीच तिला तिच्या गोऱ्या रंगाबद्दल अभिमान ठसवण्याचा आला आणि काळ्या रंगाची भीती. आपली ही आठवण सांगताना ती हे देखील विसरली होती कि तिला हा प्रश्न विचारणारी मैत्रीण सावळी आहे.
कदाचित म्हणूनच आवडत नसेन मी ‘ह्याला’! माझ्या समोरच्या कॉफीच्या कपवरून नजर काढून मी ‘त्याच्या’कडे वळवली. “
तो”, माझ्या new hires च्या बॅचमधला माझ्यापेक्षा बराच उजळ रंगाचा बॅचमेट! हळू हळू चांगला मित्र झाला. आता अगदी ‘बेस्ट फ्रेंड’ चं लेबलही लागलंय. त्यापलीकडे काही नाही होणार. मला कुठं मिळणार आहे तसलं तळं!? कितीही इच्छा असली तरी स्वतःहून विचारायला मन धजावत नाही. त्याने नकार तिला तर माझं मन खूप खूप तुटेल. कसल्या विचारत इकडे-तिकडे बघतोय कोण जाणे? कसल्याश्या घाईत असल्यासारखा! तो म्हणाला म्हणून ह्या महागड्या कॉफीशॉप मध्येआलो. नाहीतर मला तर चहाच बरा वाटतो. आणि आता ह्याला कसली घाई झालीय?
“अरे ऐक… तुला कुठे जायचंय का? मला हि कॉफी जाणार नाही. आपण निघू शकतो.” मी टेबलावर ठकठक करत
म्हणाले.
“Ok! Ok!” त्याने स्वतःच्या तोंडावरून हात फिरवला आणि मोठा श्वास सोडला. बॅगमध्ये हात घातला आणि म्हणाला,
“हे बघ काय स्पष्ट सांग!
Will you be my girlfriend?” आणि फटकन एक गुलाबाचं फूल समोर केलं.
रडवेले डोळे पुसून,फूल घेऊन, हो म्हणून, कॉफी तशीच टाकून जेव्हा तिथून निघालो , तेव्हा त्याला विचारलं, “तुला
आवडती बायको आणि नावडती बायकोची गोष्ट माहितीय ?

बंद गेटच्या मागे (Band Gatechya Mage)

बंद गेटच्या मागे असलेल्या बंद बंगल्यात नेमकं झालंय काय? पहिली-पासून ह्या शाळेत येते, आता सहावी आली, कद्धीच हा बंगला उघडला नाही आणि गेटपण उघडलं नाही. कोणी म्हणतं भूतबंगला हाय, पण म्याडम म्हणती भूत-बीत काय नसतं. वर्गातल्या ‘शितली’नं कुठंतर ऐकलं होतं की “करणी” केल्या कुणीतरी मग हिथं कोण ठरतच नाही, येईल त्यात कोण ना कोण मरतं. मग आता कोण येत नाही. बंद गेटच्या मागे बसलेल्या बंद बंगल्याचं गौडबंगाल काही तिला समजत नव्हतं.

शाळेतनं घरी जाताना पाठीवरची “सॅग” सांभाळत, ‘खुशी’ त्या गेटजवळ रेंगाळे.  तिच्या उंचीपेक्षा मोठं गेट. त्यावर चढून वाळलेल्या वेली, गेटच्या कुंपणावर आडव्या-तिडव्या पसरल्या होत्या- दारू पिऊन ‘पप्पा’ पसरत्यात तसं… घरी पोचून दप्तर टाकलं की ‘आंजी’ खेळायला बोलवायची. खरं आधी आईला भांडी घासून द्यायची, मग सरांनी गणितं सोडवून आणायला सांगितली होतीत, ती काय येत नाहीत… उद्या ‘सुप्री’ची वही घेऊन पावणे-बाराच्या सुट्टीत लिहायला लागणार. सगळी कामं आटपून आई झोपायला आली की खुशी तिला बिलगून झोपायची. आणि डोळ्यासमोर तो बंद गेटच्या मागे थकलेला बंद बंगला तरळायचा.

“किती पैशे लागत असतील गं?” खुशीने आईच्या पाठमोऱ्या आकृतीला विचारलं. बुधवारच्या बाजारला आई सकाळी निघायची बुट्टी घेऊन आणि तिच्या मागं खुशी पिशव्या घेऊन. चालताना तो वाटेत लागयचाच. “चाल पटपट” आई म्हणाली. ‘अभिजित’ तिसरीत होता, तो लहान आहे म्हणून त्याला बाजारला न्यायचं नाही. काल आई-पप्पांची भांडणं झालीत मग आई सकाळी वेळानं उठली. तिची कंबर दुखत होती म्हणून मग ‘खुशी’नंच चहा केला. पप्पा चहा पिऊन कप तिथंच ठेऊन गेले – कामावर. आज आईनं अभिजीतला थोडे पैसे दिले दुपारच्या सुट्टीत खायला. “सांग की गं आई…” तिच्यामागं चालायचं म्हणजे खुशीला पळावं लागे. “किती पैशे लागत असतील एवढ्या बंगल्याला?” आईनं प्रश्नाकडं केव्हाच दुर्लक्ष केलं होतं.

बंद गेटच्या मागे फसलेला बंद बंगला मोठा होता. आत किती खोल्या असतील? न्हाणी कसली असेल? चैत्रालीच्या घरी बघितलेला तसा किचनकट्टा असेल… केवढा मोठा बंगला आहे. किती माणसं राहतील? हातात रुपया घेऊन वारकेच्या दुकानात जात असताना तिच्या डोक्यात तो बंगलाच घुमत होता. रुपया काउंटर वर टेकवून तिने क्लिनिक प्लस चा शाम्पू मागितला. दुकानदारानं १ पुडी दिली. मागं केस कापायला शिंदेबाईकडं गेली होती तेव्हा ‘निरम्या’नं केस धुतले म्हणून शिंदेबाई रागावली होती. भुरकट झालेल्या डोक्यात खसाखसा खाजवत ती घरी परतली आणि अंघोळ करताना ती हाच विचार करत होती कि बंगल्यातली न्हाणी ह्यापेक्षा ४पट मोठी असेल.

बंद गेटच्या मागे धसलेल्या बंद बंगल्याने खुशीच्या डोक्यात मोठं घर केलं होतं. त्या घरात तो बंगला आता निवांत राहू लागला होता. विज्ञानाच्या म्याडम कायतर हवेच्या वजनाबद्दल आणि पाण्याच्या शीतबिंदूबद्दल सांगू लागल्या कि तो बंगला घरात यायचा. त्या घरातल्या कोपऱ्यातल्या चुलीवरचं गरम जेवण जेवायचा, शहाबादी फरशीवर जमखाना घालून झोपायचा, अंकांच्या ओळीतला लसावि-मसावि काढताना ‘खुशी’ची फजिती बघून हसायचा.

एक दिवस खुशीनं दुपारच्या सुट्टीत सॅग पाठीला लावली. वर्गातनं हळूच बाहेर पडली, एका ठिकाणी दोन वर्गाच्या मध्ये बोळ होता त्यात घुसली. पोरी बाहेर लंगडी-पळती, चिपरी च्या खेळात गुंगल्या होत्या. सुट्टी संपल्याची घंटा झाली मग सगळ्यांचा वर्गात जायला गलका झाला. थोडा वेळ जाऊ दिला आणि सगळीकडे सामसूम झाल्यावर ती बोळातनं बाहेर पडली. आणि तर्राट गेटकडं सुटली.  शिपाईमामा नुकतेच जेवून-खाऊन गेटजवळ जात होते, ते “ए थांब, थांब” म्हणतायत तोवर ती गेटवरून पार झाली आणि रस्त्याला लागली. धापा टाकत बंद गेटजवळ आली.

बंद गेटच्या मागे रुसलेला बंद बंगला तिने खूप वेळ न्याहाळला. वेली-झुडुपात लपलेल्या कुंपणाभोवती फिरून पारखला. डोक्यात बरीचशी गणितं केली, आज सगळ्यांची उत्तरं मिळाली. मग गेटजवळ जाऊन, इकडे-तिकडे पाहून, आपलं दप्तर उडी मारून गेटच्या आत टाकलं. पाचोळ्यात ते फस्सकन पडलं. मग वेलींचा हात पकडून ती कशी-बशी वर चढली, घाणेरीच्या झुडपाने तरी हाताला थोडं ओरबाडलंच. कुंपणावर उकिडवं बसून तिने दप्तराच्या बाजूला उडी मारली. तीसुद्धा पाचोळ्यात फस्सकन पडली. उठून उभी राहत तिने भुरट्या केसातून हात फिरवला, शाळेचा फ्रॉक झाडला, “सॅग” पाठीला लावून ती दरवाज्याजवळ गेली. बंद गेटच्या मागच्या बंगला बंद होता.  मोठं ‘टाळं’ ठोकून मुका बसला होता. मग खुशीनं फेरा घालायला सुरुवात केली. तिला वाटलं होतं तसंच झालं. बंगल्याच्या एका खिडकीची काच फुटली होती. त्यातून हात घालून तिने खिडकी चाचपली. लहानशी कडी तिने लहानशा हातांनी दात खाऊन उचकटली. खिडकीला गज फॅन्सी प्रकारातले होते त्यातून खुशीचं अंग सहज आत सरकलं. खिडकीतून ती आत उतरली आणि दबक्या पावलानं घर बघू लागली. न्हाणी जवळच्या बोळातल्या खिडकीतून ती उतरली होती, त्यामुळं जवळ दिसलेलं पहिलंच दार तिनं हळूच उघडलं तर ती न्हाणीचं होती. फट्टकन एक पाल खाली पडली आणि वळवळत कोपऱ्याला गेली. न्हाणी मोठी होती. खरंच ४पट मोठी होती, कदाचित ५पट पण असेल. आरश्याचा पारा उडला होता तर तिला आपला एक डोळा आणि अर्धा गालच नीट दिसला. तिने दार झाकलं आणि वळली तर फिस्सकन एक मांजर ओरडलं, जागच्या जागी जोरात उडी मारून गुरगुरत पळालं. मांजराच्या अचानक ओरडण्यानं जरा खुशी घाबरली पण मग तिला स्वैपाकघर दिसलं.  लई मोठा किचन-कट्टा होता, गॅस पण होता. ती मग दिवाणखान्यात आली. तिने मान वर केली, उंचच उंच भिंत गेली होती. मान वर करून तिने वरच्या गोल-गोल डिझाईनबरोबर गिरक्या घेतल्या. मनातल्या मनात “गाऱ्या-गाऱ्या भिंगोऱ्या” म्हणत, गरगरायला लागेपर्यंत. ती थांबली आणि अचानक कसला तरी बारीकसा ‘खसखस’ आवाज तिच्या कानावर आला. जणू कोण हसतंय. ती सावध झाली. परत जावं पट्कन असा विचार तिच्या मनाला शिवून खिडकीच्या गजांतून बाहेर सटकला. पण ती मात्र आवाजाच्या दिशेनं चालू लागली.

हॉलमधेच पायऱ्या होत्या. कंबर वाकवून वर गेल्या होत्या. एक-एक पायरी चढल तसा आवाज पण वाढत होता. पायऱ्या संपल्या आणि एक बंद दार गपकन आडवं आलं. दाराला कान लावला तर ‘खसखस’ अजून जोरात ऐकू येऊ लागली. धडधडत्या छातीनं तिनं त्या दरवाज्याला बाहेरून लावलेली कडी आवाज न करता उघडली. आणि दरवाजा ढकलला. जसा दरवाजा करर्कन उघडला तसा वाऱ्याचा बेफ़ाम झोत तिथून सुटला आणि… आणि… आणि… एक बाईचं मुंडकं खुशीच्या पायात फट्टकन पडलं. ते बघून खुशीची बोबडी वळाली. तिच्या घशातनं आवाजही फुटला नाही. भिंतीला धरून उलट्या पावलानं मागं परतली. पायऱ्या लागताच त्यावरून ती धपाधप पळू लागली. ती घाबरली, गांगरली, मध्येच एक पायरी चुकल्यानं घरंगळली, खाली येताच दाराकडं धावली. दार बंद होतं. तिला वाटू लागलं पायऱ्यांवरून कोणीतरी चालत येतंय. ती न्हाणीजवळच्या बोळाकडं पळाली. तो खसखस आवाज अजूनही येत होता, तिला वाटू लागलं कि तो आता जवळून येऊ लागलाय. ती त्या खिडकीपाशी गेली. त्या खिडकीतून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागली पण तिला जाता येईना. जणू तिचा फ्रॉक कोणी पकडून ठेवलाय. पाठीवरची सॅग तिनं बाहेर फेकली. मग तिला त्या खिडकीतून बाहेर पडता आलं. बाहेर निघाल्यावर फसफस्स पाचोळ्यात चालताना तिला वाटलं कि अजून एक तसाच आवाज येतोय. पुन्हा एकदा खरचटून घेऊन ती कशीबशी कुंपणावर चढली. तिथून खाली उडी मारताना नेमकी उडी चुकली आणि ती रस्त्यावर पडली ती बेशुद्धच.

शाळेत गणिताच्या मास्तरांनी हजेरीमध्ये लाल शेरा लावला. इतिहासाच्या सरांनी लाल शेरा लावला. चार ची सुट्टीदेखील झाली. आणि मग शाळेचा फ्रॉक बघून एक भला माणूस तिला उचलून शाळेच्या गेटवर घेऊन आला. सरांनी रिक्षा बोलावली आणि सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. इंजेक्शन देऊन डॉक्टरांनी तिला शुद्धीत आणलं तोवर आई-पप्पा येऊन बसले होते. X-ray बघत डॉक्टरनी सांगितलं, पायाला प्लॅस्टर करावं लागणार. गोळ्या-औषधांची लिस्ट लिहून पप्पांच्या हातात दिली. आईचा हात धरून पप्पांनी तिला जवळ-जवळ बाहेर ओढतच आणलं. “कितीदा सांगितलं होतं लक्ष ठेवत जा पोरीकडं. शाळेतनं पळून गेल्ती. आणि रस्त्यावर सापडली. हे घे” म्हणून आईचा हात जोरात दाबून तिच्या हातावर त्यांनी गोळ्यांचा कागद आपटला. “आन माहेरास्न पैशे!” म्हणून त्यांनी हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरत गुटख्याची पुडी खोलली. आई पायरीवर मट्कन बसली.

इकडे रात्री गणपतीमंडळाची पोरं आलीत. बंद गेटच्या मागे हसलेल्या बंद बंगल्याच मागचं फाटक आणि मागचं दार त्यांनी किल्लिनीशी उघडलं. वर जाऊन सुरज्या खाली बघत ओरडला “पव्या लेका… हे असंच टाकून गेलायस व्हय. कसं पसरलंय. ये वर” त्यानं ते मुंडकं हातात उचललं. भिंतीला टेकवलेल्या तिच्या धडाला ते बसवलं. वाऱ्यानं थोडं अस्ताव्यस्त झालेलं सामान दोघांनी नीट लावलं. वरच्या फुटक्या खिडकीला एक बोळा लावला. दार नीट बंद केलं.

पायऱ्या उतरत सुरज्या म्हणाला, “पव्या… ह्या वेळेस देखावा स्पर्धेत आपला ‘हुंडाबळी’च पहिला येणार बघ. फक्त आयत्या वेळी पक्यानं घाण करू नये.” दोघं खाली उतरत्यात तोवर बाहेर एक-दोन गाड्या थांबल्याचा आवाज आला. बाकीची पोरं आत आलीत आणि तालीम सुरु झाली.

Love

When I see people in love

It makes me smile

It gives me hope

And makes life worthwhile

When she reads his message

And tell her friends it’s so cheesy

But secretly blushes

And sends back a kissie

He looks at her fight with rage

And doesn’t know what to do

But she falls in his arms crying

And he knows he loves her too

He had met her in an arranged setting

Something clicked and they started meeting

Their parents are now poles apart

And she is becoming his life’s part

She is sitting in canteen sipping on tea

Glancing at the new guy

He sees her and smiles

Her heart rate goes up high

All these stories, some long,

Some short

Some will last forever

Some were worth a shot

And then there’s us

Running since morning

Chatting over phone,

“Remind me of telling you what happened in office today”

-“Not before I tell you how effed up was my day”

But the night comes with kisses and laughter

Though sometimes we sleep with our backs towards each other

And then I see people in love

I realize it’s a good time to be alive

I hope everyone finds their true love

And may it last for lifetime! ❤