चित्तरणी (Chittarani)

“फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बरं पोरांनो,” नातू आज्जी आपल्या व्हील-चेअर वर बसून समोर मांडून बसलेल्या ‘चिल्ड्रेन्स वॉर्ड’ मधल्या पोरांना सांगत होत्या. नातू आज्जींची नुकतीच जॉईंट-बायोप्सी झाली होती. आता results येईपर्यंत त्या दवाखान्यातच होत्या. म्हणजे मुलानेच ठेवलं होतं. घरी कोणी बघणारं नाही म्हणून. आता इचलकरंजी सारख्या छोट्या शहरातलं हॉस्पिटल म्हणजे काही पुण्या-मुंबईच्या बड्या रुग्णालयांसारखं नसलं तरी मूलभूत सुविधा सगळ्या होत्या. पण मोठ्या शहरातल्या ‘विभक्तपणा’चा शिरकाव मात्र छोट्या शहरात झपाट्याने झाला होता.

पण आज्जी उगाच एखाद्या दुःखाला कुरुवाळत बसणाऱ्यांपैकी नव्हत्या. ‘आपलं नशीब, दुसऱ्या कुणाला कशाला दोष द्या’ असं म्हणून त्या विषय सोडून द्यायच्या. नर्सने त्यांच्या अंगात चढवलेल्या हिरव्या गाउन मध्ये तशा त्या cute च दिसत होत्या, शिवाय हॉस्पिटल मध्ये येताच त्यांनी मुलांशी गट्टी जमवली होती. सध्या काविळीची साथ चालू होती त्यामुळं लहान मुलांची वर्दळ वाढली होती.

“महानंदनगरी राज्याच्या राजासमोर एक भलामोठा प्रश्न पडला होता.” त्यांनी आपले हात आणि डोळे हलवत पुढे सांगायला सुरुवात केली. “महानंदनगरी एका घनदाट जंगलाच्या शेजारी वसली होती… त्या राज्यातून दुसऱ्या राज्यांना जोडणारा एकच रस्ता होता आणि तो त्या जंगलातून जायचा. मग ह्या राज्यातल्या लोकांना समजा व्यापार करायचा असेल, किंवा लेकी-बाळींना माहेरी जायचं असेल तर त्याच जंगलातून जावं लागायचं. आता तुम्ही पोरं म्हणाल, ‘मग काय त्यात, जायचं की जंगलातून!’ पण ते तितकं सोप्प असतं तर राजासमोर भलामोठा प्रश्न पडला असता का? नाही. का? तर, त्या जंगलात एक मोठी समस्या होती.”

“समस्या म्हणजे काय रे?” एका कार्टीने तिथल्याच एका मित्राला प्रश्न केला.

“समस्या म्हणजे प्रॉब्लेम, प्रॉब्लेम”, आज्जींनी स्पष्टीकरण दिलं, “तर प्रॉब्लेम असा होता कि त्या जंगलातून लोकं जेव्हा यायची किंवा जायची तर परत आल्यानंतर ती वेगळंच वागू लागायची. म्हणजे त्यांच्यावर कसलाच फरक पडत नसे… ती लोकं काही बोलायची नाहीत. काही करायची नाहीत. त्यांचे चेहरे पांढरे फट्ट पडलेले असायचे. आणि ते चालायचे नाहीत, तर रांगायला लागायचे. जेवण सुद्धा अधाशासारखं खायचे. आणि हा सगळा वेडेपणा काहीच दिवस चालायचा कारण थोड्याच दिवसात कुठेतरी परसदारी, कुणी उकिरड्यावर, कुणी विहिरीत अशी त्यांची प्रेतं सापडायची.” हे सांगताना आज्जींचा आवाज आपोआपच हळू झाला.

“ओ आज्जी… काय पोरांना गोळा करून बसलाय इथं!?” मागून एक खरबरीत पण वरच्या पट्टीतला आवाज आला.  “ए सरका रे पोरांनो. ए जिया, तुझी आई शोधाल्या बघ तुला.” अंजनाबाई हातात तो मोठ्ठा मॉप घेऊन त्यांच्याजवळ येऊन ओरडल्या. अंजनाबाई तिथल्या ‘स्वच्छता-सेवक’, त्यामुळे सतत वैतागलेल्या. त्यांना पाठीला जरा कुबड होतं, आणि एक डोळा ‘ललिता पवार’ सारखा त्यामुळं लहान मुलं जरा बिचकूनच असायची. त्यामुळे त्या अंगावर वसकून आल्यानंतर पोरं जिकडे-तिकडे पांगली. मग त्यांनी स्वतःशीच बडबड सुरु केली, “जिकडं-तिकडं नुसता पसारा, घाण… तिकडं १०६ मध्ये त्या म्हाताऱ्यानं वकून ठेवलेलं, ते बी मीच साफ करायचं. ती छमक-छल्लो नुसती डॉक्टर समोर गोड गोड वागती.”

आता हि छम्मक-छल्लो म्हणजे आरती नर्स. आरती नर्स तशी मनमोकळ्या स्वभावाची आणि सगळ्यांशी हसून-मिळून राहणारी. दिसायलाही नाकेली आणि गोरी. त्यामुळं अंजनाबाईंना थोडी “समस्या” होणं साहजिक होतं. अंजनाबाई शिकता शिकता राहिल्या, नाहीतर त्यांनापण नर्स व्हायचं होतं. जगभराला शिव्या देत देत त्या खोली झाडत असतानाच अचानक दुसऱ्या खोलीतून कुणीतरी हंबरडा फोडला. नातू आज्जी गचकन दचकल्या. त्यांच्याच खोलीतील दुसऱ्या बेडवरच्या एक बाई देखील कावऱ्या-बावऱ्या होऊन दरवाजाकडे पाहू लागल्या. अंजनाबाई हातातला झाडू फेकून दरवाज्याकडं पळाल्या. त्या खोलीकडे आधीच बरेच लोक धावले होते, त्यामुळे दाराबाहेर गर्दी झाली होती. अंजनाबाई दारातूनच परतल्या “१०६ मधलं म्हातारं गेलं” एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी त्या खोलीतल्या २ बायकांना माहिती पुरवली. आणि पुन्हा कामाला लागल्या. नातू आज्जी व्हीलचेअर वरून कशा-बशा बेडवर बसल्या होत्या, आता पुन्हा व्हीलचेअर वर बसून बाहेर काय गोंधळ चालू आहे ते बघण्याची ताकद नव्हती. “जरा चौकशी करून येताय का? कशामुळं झालं?” अशी बारीक आवाजात त्यांनी अंजनाबाईंना विनंती केली.

‘अवो कशामुळं काय… वेळ आली की माणूस जायचंच.” हे बोलून अंजनाबाई स्वतःवरच खूश झाल्यासारख्या लहानसं हसल्या. थोड्यावेळाने बाहेरचा गोंधळ कमी झाला. अंजनाबाई त्याच खोलीच्या दाराशी कुणाची तरी वाट बघत असल्या सारख्या उभ्या होत्या. तेवढ्यात किरण कंपौंडर तिथे आला.

“म्हातारं पांढरं फटक पडलं होतं बघ” असं काहीसं त्याने अंजनाबाईंना सांगितलं.

“रंभा होती का?”

“होती… म्हाताऱ्याच्या पोरीनं हंबरडा फोडला तेव्हा धीर द्यायला होती बसली तिथंच.”

“हं… नाटकं माराय नकोत होय लोकांसमोर…”

किरण कंपौंडर आणि अंजनाबाईंचं पटायचं. एक कारण ‘आरती नर्स’ असावी. आरती नर्स जॉईन झाल्यापासून किरण तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करायचा. आरतीही नवीन असल्याने त्याच्याशी गोडच बोलायची, पण एके दिवशी धीर करून त्याने प्रेमाची कबुली दिली तेव्हा मात्र तिने खूप मोठ्यांदा हसून त्यावर पाणी टाकलं. तेव्हापासून ‘मिळत नसलेली गोष्ट एकतर माणूस मिळवायचा प्रयत्न करतो किंवा तिला नावं ठेवतो’, त्यातला प्रकार झाला होता.

आज्जी कान देऊन पुढचं बोलणं ऐकत होत्या पण ते दोघे तिथून निघून गेले. आज्जींनी ‘नारायणा…’ म्हणून सिलिंग कडे बघून नमस्कार केला आणि जेवणची वेळ व्हायची वाट बघत बसल्या.

दुसऱ्या दिवशी परत २-४ टाळकी आज्जींकडे येऊन बसली. मग आज्जींनी पुढे सांगायला सुरुवात केली, “हां… तर बरेच दिवस कुणाला काही कळेचना कि हे असं सगळं कशामुळं चालू झालंय. लोकांनी वैद्य-दवापाणी करून पाहिलं, मंत्र-तंत्र करून पाहिलं पण ती लोकं काही सुधारत नव्हती आणि जगत ही नव्हती. पण एवढं मात्र कळालं होतं की त्या जंगलातूनच येता-जाता काहीतरी होत आहे. लोक त्या जंगलातून प्रवास करायला घाबरू लागले. वेग-वेगळे अंदाज बांधू लागले, जंगलात भूत पछाडत असेल, किंवा कसला तरी विषारी साप चावत असेल… एक ना दोन…! राजाने हैराण होऊन एक योजना केली, त्याने विचार केला कि आपण १०-१५ लोकांचे गट बनवू. ह्या लोकांना जंगलात पाठवायचं, आणि बघायचं काय होतंय. दुसऱ्या दिवशी राज्यात दवंडी पिटली, “ऐका हो एका…. १००० सुर्वणमुद्रा मिळवण्याची संधी… जंगलात जाण्यासाठी १०० शूरवीर तरुणांची निवड करण्यात येईल. त्यांच्या कुटुंबाला १००० सुवर्णमुद्रा देण्यात येतील… ऐका हो ऐका…”

मग काय सगळ्यांच्या घरी चर्चा सुरु झाल्या. लोक घाबरले होते पण पैशांचं लालूच दिसत होतं.

प्रत्येक घरातून एक मुलगा निघाला, पुढे परीक्षा देऊन त्यांना निवडणार होते. तिथल्या एक लहान गावात एक छोटंसं घर होतं आणि तिथे दोघं बहीण-भाऊ राहायचे. हरीश आणि हरिचंदना. आई-वडील काही वर्षांपूर्वी वारले होते त्यामुळं दोघा भावंडांनीच एकमेकांचा सांभाळ केला होता. आता हरिचंदना वयात आली होती. सुंदर दिसू लागली होती. तिचं लग्न आता लवकरात लवकर करणंच इष्ट होतं आणि लग्नासाठी पैसे साठवावे लागणार होते. त्यामुळं हरिचंदना नको म्हणून कितीही विनंती करत असली तरी हरीश त्या जंगलात जाण्यासाठी तयार झाला. हरीश आणि गावातले काही मित्र त्या १०० जणांच्या संघात सामील झाले आणि त्यांची तयारी सुरु झाली. तलवारीचे प्रशिक्षण, भाला आणि धनुष्य चालवायचे प्रशिक्षण, तिथे असताना दिसलेल्या गोष्टी टिपून कशा घ्यायच्या… अशी सगळी तयारी झाली. अखेर पहिल्या ३ गटांचा जाण्याचा दिवस उजाडला. त्या गटातल्या तरुणांचे आई-वडील, नातेवाईक त्यांना अलविदा करायला तिथे जमले होते. हरिचंदना देखील आली होती. ती आपल्या भावाला धरून ढसाढसा रडत होती, त्याला जाऊ नको म्हणून विनवत होती. पण सेनापतीची आज्ञा झाली आणि हरीश बहिणीचा हात सोडवून संघाबरोबर निघाला. १५-२० दिवसांचा प्रवास असणार होता. आणि त्यानंतर हे ३ संघ परत आले कि पुढचे ३ जाणार असं ठरलं होतं. पहिल्या ३ गटांमधले काही तरुण परतले, काही लागण झाल्यासारखे करत होते, काही जंगलातच मेले होते. तर काही गायब झाल्यासारखे कुणाला सापडलेच नव्हते. राज्यात सगळीकडे मरणकळा पसरली होती.”

“मरणकळा म्हणजे?” एका कार्टीने आज्जीला प्रश्न केला.

“म्हणजे असं दुःखाचं वातावरण झालं होतं. हरिचंदना आपल्या भावाची वाट बघत रोज देवाकडे प्रार्थना करत होती. ह्या मोहिमेचा राजाला मात्र फायदा झाला. त्या जंगलात नेमकं चालू काय आहे ह्याचा छडा हळू हळू लागत होता. जे लोक त्यातल्या त्यात बऱ्या अवस्थेत परतले होते, ते तिथल्या कहाण्या सांगत होते. एक जण राजाला म्हणाला, “महाराज आम्ही ४-५ जण शेकोटी पेटवून बसलो होतो, आणि आमच्यातला ‘मालोजी’ सतत एका दिशेने अचानक पाहू लागला. आम्ही त्याला विचारलं, काय रे काय बघतोस? तो म्हणाला ते बघ तिथे एक मुलगी दिसतेय. आम्ही त्याला वेड्यात काढलं आणि म्हणलं इथे कशी असेल मुलगी. पण तो ऐकत नव्हता. आम्ही बघायला लागलो कि तो म्हणायचा, आता नाही दिसत आहे. आम्ही सगळ्यांनीच थंडीपासून वाचायला थोडी थोडी मदिरा घेतली होती.”

“मदिरा म्हणजे?” मगाशीचीच कार्टी.

“म्हणजे तुझं नाक. गप्प ऐका.” आज्जीनी तिला गप्प केलं.

“हो आज्जी… ए तन्वी, गप्प बस गं” गोष्टीत रंगलेला एक मुलगा म्हणाला.

“तर त्याने पुढे सांगायला सुरु केलं, “महाराज… आम्ही मदिरा घेतल्यामुळे, मालोजीला असे भास होत असतील म्हणून त्याची खिल्ली उडवली. पण मालोजी आमचं काही ऐकेना. तो उठून त्या मुलीच्या मागे मागे जाऊ लागला. आम्ही थकलो असल्यामुळं आम्ही कोणीच गेलो नाही, आणि आम्हाला खात्री होती कि थोड्यावेळात परत येईल. आम्हाला झोप लागली. आणि सकाळी बघतो तर मालोजी अजून परतलाच नव्हता. आम्ही ३ दिवस जंगलात शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याचं प्रेत सापडलं.” असं म्हणून तो तरुण घाबरून रडू लागला. असं करत करत बऱ्याच गोष्टी राजाला कळत होत्या. कोणी शिकारीसाठी हरिणामागे पळालं. कोणी हिरे-माणके दिसतायत म्हणून जंगलात आत गेलं. कोणाला सुंदर मुलींचा घोळका दिसला तर गटातले सगळेच तिकडे गायब झाले. असं करत करत सगळे संघ संपले. पण तोपर्यंत राजाला ह्या प्रकरणाचा अंदाज आला होता. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर,तुम्ही सांगा बघू काय असेल त्या जंगलात?” आज्जींनी प्रश्न केला.

सगळी मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. मग आज्जीच पुढे म्हणाल्या, “त्या जंगलात एक चेटकीण होती…”

“हॉ… म्हणजे Witch ना?” जिया आ वासून म्हणाली.

“हा… तर त्या जंगलात एक भयानक चेटकीण राहायची… तिला असं कुणाचंही रूप घेता येत असे. एखाद्या लग्न न जमणाऱ्या मुलाला ती सुंदर तरुणी म्हणून दिसत असे, एखाद्या बाईला तान्हं मूल रडताना दिसेल, एखाद्या लालची म्हाताऱ्याला खजाना दिसेल. असं करून ती त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असे.”

“आणि मग?” आता मुलांना फार उत्सुकता लागली होती.

“हे काय चालू आहे इथे? नर्स… सगळ्या मुलांना जागेवर पाठवा.” कॉरिडॉर मध्ये मुलांचा घोळका आणि आज्जीना बघून डॉक्टर रागावले. मागून २ नर्सेस आल्या आणि मुलांना घेऊन गेल्या. “आज्जी तुम्ही देखील रूम मध्ये जा.” डॉक्टरनी नातू आज्जीना सांगितलं.

“काय झालं डॉक्टर, मी तर फक्त गोष्ट सांगत होते…”

“काही नाही… तुम्ही जा आत. हे असं बाहेर फिरू नका फार…”

“बरं…” म्हणून आज्जी आपली व्हीलचेअर फिरवू लागल्या. तेवढ्यात तिथे आरती नर्स आली. “डॉक्टर, तुम्ही बोलावलंत?”

“आरती… हे काय झालं ११ व्या वॉर्ड मध्ये. ह्या महिन्यातली ही तिसरी case आहे.”

नातू आज्जी अगदी हळू हळू पुढे सरकत कान देऊन ऐकू लागल्या.

“हो डॉक्टर… मला तरी काही कळेनाच झालंय. सकाळीच मी पेशंटला जेवण दिलं तर कधी नव्हे ते आज पेशंटने स्वतःच्या हाताने जेवण सगळं संपवलं, म्हणाली अजून भूक लागलीय. मी प्लेट भरून घेऊन जात होते तर मला अंजनाबाई तिथून बादली आणि पोछा घेऊन येताना दिसल्या. त्यांना विचारलं तर काहीच न बोलता फणकारात निघून गेल्या. आणि मी आज जाते तोवर पेशंटचा चेहरा हात-पाय पांढरे-फटक पडले होते.”

“सगळ्यांना चांगलं फैलावर घेतलं पाहिजे. आपल्या हॉस्पिटलचं नाव खराब होतंय आरती.”

“हो डॉक्टर…” आरती रडवेल्या आवाजात म्हणाली, “मला तर पेशंटच्या घरच्यांचं दुःख बघवत नाही… तुम्हाला माहितीय माझ्या आईचं सुद्धा…”

“आरती… सावर स्वतःला… झालं गेलं… तू म्हणूनच नर्स झालियस ना… तू आता नीट काळजी घे ह्या पेशंट्सची… माझं नाव खराब होतंय. आता पोस्ट मार्टम साठी पोलीस येतील… मी तिकडे बघतो.”

“हो डॉक्टर…” आरती नर्स गेली. आज्जी तिला पाठमोरी बघत होत्या. समोरून किरण कंपौंडर येत होता. तो आरतीकडे एकटक बघत होता. आरतीने मान खाली घातली आणि झपाझप निघून गेली.

किरणने आजींना बघितलं आणि म्हणाला, “काय आज्जी… पोचवू का?”

“काय?” आज्जी थोड्या घुश्श्यात म्हणाल्या.

“रूमवर? येतेय ना गाडी चालवायला? कि काही मदत हवीय.”

“काही नको… जमतंय माझं मला”

‘डॉक्टर म्हणाले ह्या महिन्यातली ही तिसरी केस, म्हणजे कालच्या म्हाताऱ्याच्या आधी देखील, कोणीतरी असंच गेलंय.’ आज्जी आपल्या बेडवर पडून विचार करत होत्या. ‘जरा आपण सावध राहिलं पाहिजे. प्रवीणला फोन करून बोलावून घेते. म्हणते, ने बाबा लवकर घरी. निशा असती तर तिनेच काळजी केली असती माझी. बिचारीच्या अडचणीच्या काळात मी लक्ष घातलं नाही… ह्यांची ढुंगणं धूत बसले. माझा मुलगा, माझा नातू करत बसले, हकनाक गेली माझी पोर.’ आजींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्यांची थोरली मुलगी कॅन्सर मध्ये वारली. तिच्या आठवणीने त्यांचं मन हळवं झालं.

“मिसेस निर्मला नातू कोण आहे इथे?” एक नर्स आतमध्ये येऊन म्हणाली.

“मी.” आज्जी बेडवरुन कष्टाने उठत म्हणाल्या.

“उद्या तुमच्या घरच्यांना बोलावून घ्या. रिझल्ट्स आले आहेत. तुमच्या जॉईंटचं ऑपेरेशन करावं लागणार आहे. उद्या त्यांची सही लागेल. सही झाली कि परवा दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळेल. वेळ करू नका म्हणून सांगा.”

आज्जीनी वर सिलिंग कडे बघून हात जोडले, देवा परमेश्वरा… लवकर सोडव रे बाबा ह्यातून.

संध्याकाळ झाली तशी आज्जींना कसली तरी अनामिक भीती वाटू लागली.  त्यांनी प्रवीणला- त्यांच्या मुलाला फोन करून उद्या यायची २-३ वेळा आठवण केली होती. आता पुन्हा एकदा फोन लावत होत्या पण प्रवीणने उचलला नाही. पलीकडच्या बाईंची मदत घेऊन त्या व्हीलचेअर वर बसल्या आणि कॉरिडॉर मध्ये फेऱ्या मारायला गेल्या. अंजनाबाई आणि किरण परत कोपऱ्यात उभे राहून काहीतरी कुजबुजत होते. आजींना उगाच वाटलं कि ते दोघे त्यांच्याच बद्दल बोलतायत. त्या दुसऱ्या बाजूला वळल्या आणि पुढे पुढे जाऊ लागल्या. लहान मुलांच्या खोली जवळ जाऊन त्यांनी आत बघितलं. त्यांना पाहून मुलांनी एकच गलका केला. ‘आज्जी गोष्ट पूर्ण करा ना… yayy आज्जी आल्या…’ लहान मुलांना खूश झालेलं पाहून आज्जींच्या मनावरचं मळभ दूर झालं.

“हो हो सांगते… कुठपर्यंत आलो होतो आपण?”

“जादूगारीण…” एक मुलगा ओरडला

“जादूगारीण न्हवे रे… चेटकीण! त्या जंगलात चेटकीण होती…” चौकस तन्वीने त्याला गप्प केलं.

“हा… तर त्या जंगलात एक भयानक चेटकीण राहायची… तिला असं कुणाचंही रूप घेता येत असे आणि ती लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असे. आणि त्यांना संमोहित करून त्यांच्यावर मंत्र म्हणून त्यांचा आत्मा काढून घेत असे आणि त्याचं दगडात रूपांतर करत असे. आत्मा काढून घेतल्यामुळं माणूस माणूस राहतच नसे. त्याची वागणूक जनावरासारखी किंवा त्याहीपेक्षा वाईट होत असे. त्या घनदाट जंगलाच्या मधोमध तिची हवेली होती. असं म्हणतात कि ती हवेली तिने अशाच आत्म्यांच्या दगडातून बांधली होती. चेटकीण वेगळं रूप घ्यायची, एखाद्याला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करायची. तिच्यात इतकी ताकद होती कि कोणीही तिच्या त्या स्वरूपाला आकर्षित होतच असे. आणि जे लोक असे एखाद्या अमिषाला भाळतात त्यांच्यावर आपला पूर्ण अधिकार आहे असे ती समजायची.  इकडे राजाला आता हा सगळा प्रकार कळला होता पण लोक घडलेल्या प्रकारामुळं खूप घाबरले होते. आता त्या चेटकीशी लढाईला जायला कोणी तयार होत नव्हते. त्या जंगलातून येणं जाणं पूर्ण बंद झालं. हळू-हळू त्या जंगलाचं नाव पडलं, ‘चित्तरणी’चं जंगल. राजाने आपल्या राज्याच्या वेशीभोवती मोठी भिंत बांधून घेतली.

इकडे हरिचंदना भावाची वाट पाहतच होती. तिचं लग्नाचं वय वाढत चाललं होतं, शिवाय कन्यादान करायला कोणी नव्हतं, त्यामुळं ती एकटीच आपलं घरदार सांभाळत होती. तिला राजाचा, लोकांचा आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्या चेटकिणीचा राग आला होता. शेवटी एक दिवस तिने स्वतःचीच निश्चय केला आणि ठरवलं की आपल्या भावाला शोधून आणायचं, जर तो नाही मिळाला तर एक तर त्या चेटकिणीला संपवून यायचं नाही तर स्वतःचा जीव द्यायचा. तिने तंत्र-विद्या शिकायला सुरुवात केली. तिथल्याच एका माणसाकडून ती गुप्ती चालवायला शिकली. एके रात्री कुणाला कळू न देता ती घरातून निघाली, तिने स्वतःबरोबर थोडं अन्न, हत्यार आणि तंत्रविद्या करून बनवलेलं एक द्रव्य घेतलं. तिने कुणालाही कळू न देता भिंतीखालून भुयार खोदून ठेवले होते. त्यातून ती बाहेर पडली.

ती जंगलात आत आत शिरली… अचानक तिला कुणाच्या तरी कण्हण्याचा आवाज आला. ती आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. तिला दूर एका झाडाच्या पायथ्याशी कुणीतरी तरुण जखमी होऊन पडल्यासारखा दिसला. ती आपलं हत्यार बाहेर काढून त्याच्या दिशेने जाऊ लागली. तिला थोडं पुढे गेल्यावर तो चेहरा ओळखीचा वाटला, तो दुसरा कोणी नसून हरीशच होता. “हरीश!” ती आनंदमिश्रित आश्चर्याने ओरडली आणि त्याच्या दिशेने पळू लागली. ती त्याच्या जवळ पोहचली आणि ती त्याला हात लावणार एवढ्यात तिला काहीतरी गडबड जाणवली. ती मागे सरकली, आणि तिथूनच त्याला हाक मारली. “हरिचंदना….” अशी त्याने क्षीण आवाजात तिला हाक मारली. मग मात्र तिची खात्री पटली, कारण हरीश नेहमी तिला ‘चंदा’ म्हणून हाक मारत असे. तिने तिथे उभे राहून जोरजोरात मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्राचा प्रभाव होऊन हरीशचे रूप घेतलेली चेटकीण तिच्या स्वतःच्या रूपात आली. तिचे पांढरे-राखाडी पिंजारलेले केस, छोट्या-मोठ्या टेंगुळांनी भरलेला चेहरा पाहून हरिचंदना किंचाळली, पण तिने स्वतःला सावरलं.
ती चेटकिणीला स्वतःच्या जवळ येऊ देत नव्हती. चेटकीण जवळ येण्याचा प्रयत्न करू लागताच ती चपळाईने दूर पळत होती. चेटकीण आता चिडली होती, तिने देखील जोरजोरात मंत्र ओरडायला सुरुवात केली, पण हरिचंदना देखील आपला मंत्र पुटपुटत राहिली. अखेर चेटकीण तिच्या चेहऱ्याजवळ येऊन तिला आपल्या पंजात पकडणार तितक्यात तिने आपल्या-जवळचं द्रव्य ‘चित्तरणी’च्या चेहऱ्यावर फेकलं. ती जोरजोरात ओरडू लागली कारण तिचा चेहरा भाजून निघत होता. मग हरिचंदनाने संधी बघून त्या द्रव्यात तिच्याजवळची गुप्ती बुडवली आणि तिच्या पोटात खुपसली. त्या नंतर मात्र चेटकीचं पूर्ण अंग जळू लागलं आणि थोड्याच वेळात ती राख होऊन खाली पडली. ”

“हॉ… ” पोरांच्या तोंडातून एकच उद्गार बाहेर पडला.

“मग हरिचंदनाने जंगलभर शोध घेतला, एके ठिकाणी तिला आपल्या भावाचं पांढरं-फटक शरीर निपचित पडलेलं दिसलं. डोळ्यातले अश्रू पुसत तिने त्याची चिता पेटवली. आणि मग एका पुरचुंडीमध्ये स्वतःच्या भावाची राख आणि दुसऱ्या कापडात चेटकिणीची राख घेऊन ती आपल्या राज्यात परतली. आपल्याच्या विजयाची गाथा तिने राजासमोर सांगितली. गावकऱ्यांनी तिचा जयजयकार केला. राजाने खूश होऊन तिला शहरात एक छोटा महाल बांधून दिला आणि स्वखर्चाने तिचं लग्न लावून दिलं…. आणि हळू हळू जंगलाचे रस्ते सगळ्यांना मोकळे झाले.”

“आई…” मागून एक राग-मिश्रित हाक आली. आज्जीनी मागे वळून पाहिलं. त्यांचा मुलगा आणि सून उभे होते. “कुठे कुठे शोधतोय आम्ही तुला…!” मुलगा रागावला होता.

“अरे काही नाही.. थोडा विरंगुळा म्हणून… पण काय झालं, तू तर उद्या येणार होतास ना?”

“हो, पण मी डॉक्टरना फोन केला, डॉक्टर उद्यादेखील available आहेत. मग आज डॉक्युमेंट वर सही झाली आणि पेमेन्ट झालं की उद्या सर्जरी होऊन जाईल.”

“हो का… बरं झालं बाबा… लवकर सोडवलंस रे परमेश्वरा…”

“आई तुमचं जेवण व्हायचं असेल ना? मी डबा आणलाय. तुम्ही खाऊन घ्या. आम्ही ते कागपत्रांचं काय ते बघून येतो. नर्स, ह्यांना कुठे जेवायला द्यायचं आहे.” सुनेनं नर्सला बोलावलं. आरती नर्स तिथे आली. “मी देते त्यांना जेवण… तुम्हाला डॉक्टर बोलावतायत.”

आरतीने आज्जींना जेवण दिलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या. आज्जीनी तिला अंजनाबाई आणि किरण बद्दल सावध केलं.

“फार आगाऊ आहे हं ती बाई, मला तर वाटतं हे दवाखान्यात काही-बाही चालू आहे त्या मागे त्या दोघांचाच हात आहे.

“मलाही तशी शंका येतेय हो आज्जी” आरती म्हणाली

“तू सावध राहा बाई… तुलाच अडकवायचे नाही तर”

“आजी, कावळ्याच्या शापाने चेटकीण थोडीच मरते…”

“तुला गाय म्हणायचंय का?”

“हाहा… तुम्ही त्या पोरांना चेटकिणीच्या गोष्टी सांगता ना, ती पोरं मला सांगतात सगळं.”

“हो गं… तेवढाच विरंगुळा… पोरांनाही मजा येते. पण खरंतर गोष्ट पूर्ण झालीच नाही…”

“म्हणजे…”

“म्हणजे, त्या हरिचंदनाने सगळ्या गावकऱ्यांना वाचवलेलं तर असतं… आणि लोक आता ये-जा पण करू लागले असतात जंगलातून. पण एक दिवस राजा जंगलात शिकारीला जातो… आणि २ दिवसांनी घोड्यावरून त्याचं प्रेत परत येतं!”

“बापरे…” आरती दचकते.

“असं म्हणतात की अजूनही चित्तरणी मेली नाही… तिने फक्त वेष बदलला आणि हरिचंदना म्हणून गावात फिरू लागली.”

“पण आज्जी हि गोष्ट जरा वेगळीच आहे… मी तरी कधी ऐकली नाही कुणाकडून. तुम्हाला कुठून मिळाली?”

“माझ्या आजीकडून मी ऐकली, तिने तिच्या आज्जीकडून… अशी परंपरेने आली आहे म्हणलीस तरी चालेल..” आज्जी स्वतःशीच हसल्या, “माझ्या आज्जीची तरी ठाम समजूत होती… कि आमचे पूर्वज त्या महानंदनगरी मधेच राहायचे…”

“हाहा… चांगलंय… बरं आज्जी,  पोट भरलं ना?… उद्या ऑपेरेशन आहे. आज निवांत विश्रांती घ्या.”आरती तिथून आवरून निघून गेली.

आजी लवकरच निघायचं ह्या खुशीतच आपल्या बेडवर आडव्या झाल्या. मुलगा आणि सून जाता-जाता भेटून गेले. आपण आपल्या घरी जाऊन आता काय काय करायचं ह्याचा विचार करत त्यांना झोप लागली.

दुसरा दिवस सर्जरीच्या गडबडीत गेला. पण सर्जरी नीट पार पडली. आजी पूर्ण दिवस anesthesia इफेक्ट मधेच होत्या. पण रात्री त्यांना बरं वाटत होतं डॉक्टरनी सांगितलं होतं कि अजून ४-५ दिवसात म्हणजे आज्जी घरी जाऊ शकतात. आजी शांतपणे झोपून गेल्या.

मध्यरात्री अचानक आजींना कुणाची तरी हाक ऐकू आली. आजींनी डोळे किलकिले करून पाहिलं आणि त्यांना असं वाटलं कि निशाच भेटायला आली. “निशा… “म्हणून क्षीण आवाजात त्यांनी त्या आकृतीला हाक मारली. ती आकृती अजून जवळ आली. आजींनी पूर्ण डोळे उघडले. खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात डोळे सरावायला थोडा वेळ लागला पण त्यांना तो चेहरा पूर्ण दिसला. ती निशाच होती.

“निशा… तू कशी इथे? नाही नाही… हे स्वप्न आहे… हे स्वप्न आहे…” त्यांनी स्वतःलाच समजावलं. पण तरी त्यांना आपला हात उचलून तिच्या गालाला लावला. अचानक त्यांना लक्षात आलं कि ती आरती नर्स आहे.

“आरती… तू आहेस होय.” आजी म्हणाल्या, “मला जरा पाणी दे गं… स्वप्न पडलं होतं बघ… असं वाटलं माझी निशाच आली भेटायला.”

आरती तिथे नुसतीच उभी होती. आजींनी तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि आरती पूर्ण तोंड उघडून हसली. त्या चंद्राच्या प्रकाशात तिचं ते हसू अंगावर काटा आणणारं होतं. आज्जी दातखिळी बसल्यासारखी तिच्याकडे बघत राहिल्या आणि आरती गोड आवाजात म्हणाली,

“निर्मला…  कावळ्याच्या शापाने चित्तरणी मरत नाही!”

Leave A Comment