टायर (Tyre)

वर्तमानपत्राची हेडलाईन आणि खाली बंड्याचा फोटो पाहून मी स्तब्ध झालो. डोळ्यासमोर गावातलं मैदान चमकलं. उतारावरून वेगात घरंगळत आलेली ती टायर. सपसप धूळ उडवत पुढे निघून गेली. मी अजून माझ्या टायरीला एका लाईन मध्ये आणायचा प्रयत्न करत होतो. आणि दूर चढावर पाहिलं तर कमरेवर हात ठेऊन बंड्या कौतुकाने आपल्या टायरीकडे बघत होता. टायर बरीच पुढे जाऊन पडली तसा बंड्या धपधप पाय टाकत माझ्याजवळ आला. आणि पाठीत एक गुद्दा हाणून म्हणाला, “काय लेका… अजून तुझी सरळ उभी बी राहीना व्हय? आन हिकडं सरळ करतो तिला”

बंड्या ऊर्फ संजय – माझा लंगोटीयार! बेधडक, निडर, धिप्पाड आणि दणकट. माझ्या बरोब्बर उलट. पण तरी माझा जिगरी दोस्त. स्वभाव, बुद्धिमत्ता, अंगकाठी सगळंच वेगळं असताना सुद्धा आपलं झक्कास पटायचं. मला खरंतर बंड्याचा आधार वाटायचा. मी नेहमी त्याच्यासोबतच शाळेला जायचो. पाटील वस्तीतल्या रंग्या पाटलाची मला जाम भीती वाटायची. रंग्या उगीच सगळ्यांच्या खोड्या काढायचा. एकदा माझ्या शर्टावर शाईची बाटली ओतून हसत बसला होता. तेव्हापासून तो कुठेही दिसला कि मी रस्ता बदलून जायचो. बंड्या सोबत असला कि मात्र मी “कुणाच्या बापाची भीती हाय काय?” अशा अविर्भावात चालायचो.

माझं घर रझाक मोहल्ल्यात आणि बंड्याचं निमकर आळीत. तशी आमची ‘अण्णासाहेब रावसाहेब खोपडे-पाटील प्रशाला’ माझ्या घरापासून जवळ होती पण मी लवकर आवरून बंड्याच्या घरी जायचो. बंड्या बऱ्याचदा दात घासत असायचा. मला बघून “आलो रे आलो मोश्या…” म्हणत मोरीत पळायचा. एकाच मिनटात अंघोळ करून बाहेर यायचा. बंड्याच्या आईनं चहा-चपाती तयार ठेवलेली असायची. बका-बका तोंडात कोंबत बंड्या १० ओळी शुद्धलेखन पूर्ण करायचा. अर्थात ते कधीच शुद्ध नसायचं आणि चहा, आमटी असे डाग पडून वही पण शुद्ध राहिलेली नसायची. “मोश्या मर्दा… आज बी बाई हाणत्या बग… टॉय काय सापडणा…” असं म्हणत शर्ट चड्डीत अर्धवट खोचून बंड्या माझ्याबरोबर चालू लागायचा.

दर शनिवारी न चुकता छडी खायचो. सुरुवातीला मला रडू यायचं पण बंड्यानेच शिकवलं कोडगं व्हायला. बंड्या तरी छड्या खाण्यात expert होता. नुसत्या छड्याच नाही तर कोंबडा होणे, अंगठे धरणे, ग्राउंडच्या १० चकरा मारणे, सगळं अगदी मन लावून करायचा.

तरीदेखील बंड्या मला भारी वाटायचा. मला त्याच्यासारखं व्हावसं वाटे. कशाचीच चिंता नाही, सगळ्यांना मदत करायला पुढे, आमच्या घरचं दळण तोच आणून देई, अब्बांना S. T. stand ला सायकलीवर सोडायला तोच जाई.

अम्मीच्या हातचं मटण आणि ईदची खीर त्याला प्रचंड आवडायचे. ईदच्या दिवशी सकाळी सातलाच हजर असायचा घरी. पठ्ठ्या शनिवारच्या शाळेला कधी उठला नाही लवकर. अम्मी – आपाला जमेल ती सगळी मदत करायचा. मग खीर तयार झाली की वाडगाभर पिऊन आणि किटलीभर घरी घेऊन जायचा. बंड्याची आईदेखील दिवाळीला डब्बाभर चकल्या आणि बेसनाचे लाडू पाठवायची. आमच्या अम्मीला लाडू कधी जमलेच नाहीत. अगदी माझ्या वहीवर रेसिपी लिहून आणून सुद्धा!

शाळा सुटल्या सुटल्या आम्ही दप्तरं टाकायचो ते थेट मैदानावर टायरी घेऊन पळायचो. खूप खूप टायरी फिरवायचो. माझी टायर फिरवण्यापेक्षा बंड्या आणि त्याच्या टायरीच्या मागे पळण्यातच माझा व्यायाम व्हायचा. त्याच्या हातात जादू असावी. “हे बघ, अस्स धरायचं काठीला आनी अस्सा रप्पाटा हाणायचा त्या टायरीवर… आरं… तसं न्हवं मर्दा… आरं लाव की जरा जोर… मोश्या लेका खाऊन येत जा कि जरा” तो मला लाख शिकवायचा प्रयत्न करे आणि मग शेवटी कंटाळून ” बघ आता मी कसं मारतो ते” असं म्हणून अख्खं मैदान पालथं करे.

असा हा रेड्याच्या डोक्याचा माझा मित्र, कधी प्रेमात पडेल असं वाटलं नव्हतं. पण गीता पिसे होतीच तशी सुंदर! सातवीत शाळेच्या ग्यादरिंग ला ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’ वर तिने डान्स केला होता. तेव्हापासून बंड्या पागल झाला होता. मग काय? गाड्याबरोबर नळ्याची यात्रा! वर्गातला सर्वात sincere विद्यार्थी असून सुद्धा गीताच्या नोटस मागायला जायचो, ह्याला तिची एक झलक पाहायला मिळावी म्हणून. शेवटी मनाचा हिय्या करून ‘वैलेन्टाइन्स डे’ दिवशी बंड्याने तिला विचारलंच. पण तिच्या तोंडून “वंगाळ” शब्द ऐकून बंड्या पुरता सपाट झाला. मला तरातरा ओढत मारुतीच्या मंदिरात घेऊन गेला.

“जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली… मारुतराया ह्या मोश्याच्या साक्षीनं शपथ घेतो. पुन्यांदा कुठल्या पोरीकड वळून पण बघनार न्हाई” असा शपथविधी पण झाला. मग मारुती च्या देवळातून आम्ही थेट टायरी घेऊन मैदानावर गेलो होतो. आज बंड्याची टायर अजूनच वेगात पळत होती.

जशी दहावी जवळ आली तशी माझ्या चाकाला गती मिळाली. आणि बंड्याची टायर मैदानावरच राहिली. बोर्डाचा अभ्यास करता करता माझं मैदान सुटलं आणि टायरदेखील. त्यावर्षी “मोहसीन बागवान बोर्डात पाचवा आला होता” आणि पासांच्या लिस्ट मध्ये बंड्याचं नावही नव्हतं. त्यानंतर मी शहरात आलो ते कायमचाच. स्कॉलरशीप मिळवत मिळवत मी engineering ला admission घेतली. आणि वेग-वेगळे मार्ग धुंडाळून भरकटलेल्या बंड्याने अखेर ‘झेंडा’ हाती घेतला.

ह्या सगळ्या प्रवासात बंड्या माझी कमी पूर्ण करत होता. आपाच्या लग्नात माझी परीक्षा चालू होती. आमचं घर हलवताना मला जास्त दिवस सुट्टी मिळत नव्हती. बंड्या मात्र सगळं त्याचंच समजून करत राहिला. इकडे येताना अम्मी बंड्याला धरून सर्वात जास्त रडली होती.

टेम्पोच्या मागे सामानात बसलेलो असताना डोळ्यातला पाण्याचा थेंब परत पाठवणारा बंड्या, मला आज मोठ्या मथळ्याखालच्या फोटोत दिसत होता. तोच बेदरकारपणा, तेच बेफिकीर डोळे, दाढी-मिश्या वाढलेल्या.

“रझाक मोहल्ला जाळून स्वतःला ‘सैनिक’ म्हणवून घेणाऱ्या संजय मिटकरीला तीन साथीदारांसह अटक झाली होती.” एकच प्रश्न डोक्यात घुमत होता, ‘मी तिथे असतो तर… तरीपण बंड्यानं हेच केलं असतं का?”

आणि मग राहून राहून ती धूळ उडवत येणारी टायर दिसत होती आणि कमरेवर हात ठेवलेला बंड्या!

Leave A Comment