पोलका डॉट्स (Polka Dots)

‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं s s…’ पहाटे चारचा अलार्म वाजला तशा हातातलं लाटणं बाजूला ठेऊन अल्काताई पळत बेडरूममध्ये आल्या. पटकन मोबाईलचं बटण दाबून त्यांनी गजर बंद केला. निशिकांतरावांकडे एक नजर टाकून त्यांची झोप चाळवली तरी नाही ना ह्याची खात्री करून त्या पुन्हा स्वैपाकघराकडे वळल्या. खरंतर ३ वाजताच उठून त्यांनी तयारी सुरु केली होती. पुण्याला जायचं होतं ना आज. भाचीच्या लग्नाला. चांगल्या चार दिवस राहणार होत्या त्या. मग सगळं नीट आवरून जायचं तर वेळ लागतोच. “मनिषाताईची तर धांदल उडाली असेल नुसती. आधीच ती वेंधळी. पाहुण्या-रावळ्यांची खातिरदारी करायची म्हणजे कसच लागतो” पोळी तव्यावर टाकत त्या स्वतःशीच म्हणाल्या.

तसं कोल्हापूर- पुणे अंतर काही फार नाही म्हणा. पण अल्काताईना भूक आवारत नाही. शिवाय ते लग्नाचं घर. तिथे जाऊन कुठे म्हनायचा ताट वाढा. त्यापेक्षा आपल्याजवळ आपला डब्बा असलेला बरा. चार घास बसमध्ये खाऊन घेतले की तेवढाच पोटाला आधार. कांदा परतून त्यांनी कढईत बटाटे टाकले आणि गिझर सुरु केला. मग बटाटे परतून गॅस बंद केला आणि अंघोळीला गेल्या. जाता जाता गॅस बंद केलाय ना ह्याची खात्री केली. करपायची नाहीतर सगळी भाजी. अंघोळ करून आल्या आल्या त्यांनी देवासमोर दिवा लावला. उदबत्ती लावली. नंतर जाण्याच्या गडबडीत विसरून नको जायला. “आज देवपूजा मांडणं काही शक्य नाही” असं म्हणून त्यांनी दोन्ही गालाला एकेकदा हात लाऊन देवाची मनोमन माफी मागितली. मग गायत्री मंत्र आणि गणपती मंत्र म्हणून सगळ्या देवांना मनोभावे नमस्कार केला. सगळं सामान काल रात्रीच भरून ठेवलं होतं तरी एकदा सुटकेस उघडून हर्षिताचा तो अनारकली घेतलाय ना ह्याची खात्री त्यांनी केली.

“मम्मा… माझा तो रेड अनारकली आठवणीनं आण येताना” असं तीन वेळा बजावून सांगितलं होतं तिने. हर्षू हॉस्टेलवरून डायरेक्ट तिकडेच गेली. अक्षय पण चार दिवस आधीच गेला. पोरांना काय नुसता धिंगाणा घालायचा असतो. मनिषाताईला फार त्रास दिला नसला म्हणजे झालं. हर्षूने suggest केलेली ती black and white, पोलका डॉट्सची साडी नेसून त्या तयार झाल्या. सीमंत पूजनाला ती हिरवी बेंगाली कॉटन आणि अक्षतांच्या दिवशी हर्षूची फेवरीट मोरपंखी कांचिवरम. ती देखील ठेवलीय ना ह्याची खात्री त्यांनी केलीच.

“अगं बाई! पावणे सहा वाजले की…” घाईघाईत त्या बेडरूममध्ये गेल्या.

“अहो… पावणे सहा झाले. उठताय ना. गाडी चुकली तर प्रॉब्लेम व्हायचा.” निशिकांतरावांना उठवून त्या पुन्हा किचनमध्ये गेल्या. धुतलेली भांडी Rack मध्ये लावून, ओटा पुसून घेत त्यांनी निशिकांतरावांना प्रश्न केला, “अहो, नक्की साडे-सहाच्या एशियाडचं रिझर्वेशन केलंय ना? चुकामुक नको व्हायला.”

“हं” तोंडातला ब्रशही न काढता त्यांनी उत्तर दिलं.

“हे बघा. इथे दुध ठेवलंय. आणि इथे डब्बा ठेवलाय. कपाटाच्या चाव्या ठेवल्या आहेत मुद्दाम इथेच. तुम्ही lock करताय का मी करू? थांबा मीच करते. तुमचा शर्ट-प्यांट  काढून ठेवते आणि करते lock.

“अगं करतो गं मी. आणि डबा कशाला बनवलास? ऑफिस मध्ये खातो म्हणलं होतं ना मी?”

“आणि ते गिफ्ट घेऊन या आठवणीनं”

“हं”

“आणि हो… (आवाज हळू करत) तो बॉक्स ठेवलाय मी पर्समध्ये. म्हणजे गंठण आणि लक्ष्मीहार वाला बॉक्स ओ. पण काही व्हायचं नाही ना? म्हणजे तसं नाहीच व्हायचं काही. मी काय पर्स हातातनं बाजूला ठेवणारच नाही म्हणा”

“अगं कुणाला काय माहित तुझ्या पर्समध्ये काय आहे? जास्त टेन्शन दाखवायचं नाही चेहऱ्यावर. मग काही कुणाला कळत नाही.”

निशिकांतरावांनी Activa बाहेर काढली. झोपाळू डोळ्यांनी त्यांनी सामान गाडीवर चढवलं. आणि बायकोची वाट बघत ते थांबले. तसं ते दोघेही कारनेच पुण्याला जाणार होते. पण आज अर्जंट काम होतं. म्हणून त्यांना सुट्टी नाही मिळाली. सगळं एकदा चेक करून झाल्यावर अल्काताईनी दाराला कडी लावली. पण अचानक काहीतरी आठवून “थांबा हं आले म्हणत त्या पुन्हा आत गेल्या आणि सिलिंडर बंद केलंय का हे पाहून बाहेर आल्या. कुलूप लावून खांद्यावरची पर्स सांभाळत त्या गाडीवर बसल्या.

बस स्टेशनवर गेल्यावर बस लागलेली नाही हे पाहून त्यांना हायसं वाटलं. “५ मिनिटं गाडीची वाट बघायला लागलेली बरी” असं धोरण ठेवल्यामुळे १५-२० मिनिटं त्यांना ताटकळावं लागलं. शेवटी एकदाची गाडी आली. ड्रायव्हर साईड ला पुढून तिसऱ्या सीटवर अल्काताई स्थानस्थ झाल्या. “स्वारगेट आल्यावर त्यांना सांगायला सांगा की अहो” कंडक्टर गाडीत चढल्याबरोबर त्यांनी नवऱ्याला सूचना केली.

“शेवटचा stop आहे… बरं तरी सांगतो. झालं?”

निशिकांतरावांना ‘Bye’ म्हणायच्या आधी सगळ्या पिशव्या, ब्यागा त्यांनी चेक केल्या. मांडीवरची पर्स घट्ट पकडून त्यांनी त्यांना हात केला. “परवा दिवशी या तुम्ही. सकाळीच निघताय ना? रहा नीट हुं. काही लागलं तर फोन कराच. येते मी. निघा तुम्ही आता.” खिडकीतून तोंड बाहेर काढून त्यांनी निशिकांतरावांना निरोप दिला. बसमध्ये माणसं चढायला लागली तशी पलीकडे एक पिशवी ठेवून त्या बसल्या जणू काही ती जागा कोणासाठी तरी रिझर्वड आहे. खिडकीकडे तोंड करून बसल्या. बराच वेळ लोकं पिशवी पाहून मागे जात होते. एका माणसाने शेवटी हटकलं, “ओ मावशी, तुमची पिशवी हाय काय ही?” त्यांनी गर्रकन वळून पाहिलं.

कोळशापरिस जरा बऱ्या वर्णाचा, बरेच दिवस दाढी न केलेला, कानात छोटी बाली घातलेला तो भक्कम बांध्याचा इसम पाहून एक क्षण त्यांना भीतीच वाटली. पण लगेच स्वतःला सावरून त्या ठसक्यात म्हणाल्या, “होय. येणार आहे आमचं माणूस.” मग तो इसम मागे गेला. त्यांच्या diagonally opposite सीटवर बसला. त्याच्याकडे एक नजर टाकून त्या आता दरवाजाकडे टक लाऊन बसल्या. एक बारकेली मुलगी आत शिरलेली पाहून त्यांनी घाई-घाईत तिला बोलवून जवळ बसवून घेतलं.

“आमची नेहा… तुझ्यासारखीच आहे बघ. नाजूक. परवा लग्न आहे तिचं. म्हणूनच चाललेय पुण्याला.” अल्काताईनी संवाद साधायचा प्रयत्न केला पण कानात इअरफोन्स टाकून, दोनदा हसून मुलीने फारसा इंटरेस्ट नाही असं दर्शवलं. मग अल्काताई खिडकीबाहेर बघत बसल्या. कराड कधी येतंय ह्याची वाट बघत बसल्या. कराड आल्यावर अक्षुला सांगायचं होतं फोनवर निघालेय म्हणून. डुलकी लागू नये म्हणून उगाच काहीतरी हालचाल करत. फोन काढून बघत. पलीकडच्या पोरीशी काहीतरी बोलत त्या स्वतःला जागं ठेवायचा प्रयत्न करत होत्या. फार वारं लागतंय म्हणून त्या मुलीला खिडकीकडे बसायला जागा दिली आणि आपण तिच्याजागी बसल्या. शेवटी एक-दीड तासात कराड आल्यावर त्यांनी अक्षय ला फोन लावला. “हां अक्षु, मी निघालेय बघ. कराड मध्ये आहे आत्ता. सामान नाही तसं फार. एक सुटकेस आणि एक पिशवी. अं? काय म्हणालास? आवाज नाही येत आहे…” त्यांनी कानाचा फोन काढून बघितलं तर फोनच बंद झाला होता. चार्जिंग संपलं होतं. त्यांनी परत सुरु करायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग नव्हता. “सगळं करायच्या नादात चार्जिंगच विसरले मी. आता काय करावं?” डोक्याला हात लावत त्या स्वतःशी पुटपुटल्या. “तरी अक्षयला कळलंय म्हणा मी कराड मध्ये आहे. आलाच नाही तर रिक्षाने जाईन. उतरायच्या आधी ह्या मुलीच्या फोनवरून लावीन फारतर फोन” स्वतःची समजूत घालून त्या बसून राहिल्या.

साताऱ्याच्या अलीकडं गाडी थांबल्यावर पोळी-भाजीचे चार घास पोटात ढकलून, घोटभरच पाणी पिऊन त्या सीटवरच बसून राहिल्या. पाय मोकळे करायचे म्हणजे पर्स-बिर्स घेऊन उतरावं लागेल. त्यापेक्षा आता पोचल्यावरच उतरू. असा काहीतर विचार करत त्या दरवाज्याकडे बघत बसल्या.

“हां… हां… बोल की सायेब. व्हय. लक्षात हाय की. असं कसं सायेब. तुमच्याच कृपेनं…” मागचा दाढीवाला फोनवर बोलू लागला तशी अल्काताईची तंद्री भंग पावली. त्यांनी वळून ‘किती जोरात बोलतोय हा’ अशी एक रागीट नजर त्याच्याकडे टाकली. तो त्यांच्याकडेच बघत होता. मग अचानक त्याचा आवाज हळू झाला.

“व्हय गाडीतच हाय.” हळू आवाजात तो बोलू लागला. “होय काळं- पांढरं हाय. हां ठिपक्या-ठिपक्यावालं न्हवे? होय हाय की. तुम्ही बघितलं हुतं का?”

अल्काताई एकदम चपापल्या. अंगावर काळी-पांढरी साडी होती त्यांच्या. ठिपक्या ठिपक्याची. त्यांनी पटकन त्या माणसाकडे बघितलं. त्याने पट्कन नजर फिरवली. म्हणजे हा आपल्याकडेच बघत होता.

“होय की… बांधलय”

(अगबाई, मी कानाला बांधलंय.)

“न्हाई न्हाई. एकदम इज्ही हाय. फक्त तेची किंमत तेवढी जास्त होईल बघा”

(अरे बापरे. ह्याला माहितीय की काय आपल्याकडे दागिने आहेत. इझी आहे म्हणजे काय? हिसकावण सोपं आहे असं म्हणतोय का हा?)

अल्काताई चांगल्याच घाबरल्या. काय खऱ्यातलं राहिलं नाही आजकाल. भर गर्दीत माणसं हात साफ करतात. आता कसं करू मी? कुणाला सांगू का? पण खोटा आळ आणला म्हणून माझ्यावरच उलटला तर? त्या खिडकीकडेला सरकून बसल्या. हातातली पर्स अजूनच घट्ट पकडून. मनातल्या मनात देवाचा धावा सुरु केला. शेजारची मुलगी आली. ‘बाई वेडीये का?सारखी काय जागा बदलते’ असा कटाक्ष टाकून ती बसली. गाडी सुरु झाली.

“अहो न्हाई सायेब. काम झालंच म्हणून समजा.” असं म्हणून त्याने फोन ठेवला. अल्काताईच्या छातीत धस्स झालं. म्हणजे कुणीतरी ह्याला आपल्या मागावर पाठवलाय. हा वाटच बघत असणार आपण एकटं दिसायची. आता काय करायचं? फोन पण बंद पडलाय. गजानना, असं काय रे हे. कपाळावरचा घाम पदाराने पुशीत त्यांनी विचार केला. काही नाही. आपण नाही घाबरायचं. पर्स घट्ट धरायची आणि तो जवळ जरी आला तरी जोरजोरात ओरडायचं. बऱ्याच योजना केल्या त्यांनी. दोन सीटच्या फटीतून, डोळ्याच्या कोपर्यातून त्या माणसाकडे मधेच बघत होत्या. त्यांना वाटत होतं की तोदेखील आपल्याकडे बघतोय.

शेवटी कात्रज घाट संपत आला तसं त्यांनी सगळं सामान गोळा करून घेतलं. कात्रजला शेजारची मुलगी उतरली. त्यांना अजूनच धास्ती वाटू लागली. स्वारगेट आल्यावर गाडी थांबल्या-थांबल्याच गडबडीने सामान घेऊन त्या उतरल्या. आणि झपाझप रिक्षा मिळतेय का बघायला चालू लागल्या. थोडं अंतर चालल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं. तो दिसत नाही म्हणल्यावर त्या थोड्या शांत झाल्या. खांद्यावरची घरंगळणारी पर्स सरळ करून त्या चालू लागल्या तेवढ्यात कोणीतरी मागून येतंय अशी चाहूल त्यांना लागली. त्यांनी पुन्हा वळून पाहिलं तर तोच माणूस.

त्या बिथरल्या. त्यांच्या पायातली शक्तीच गेली. जागीच खिळल्यासारख्या त्या उभ्या राहिल्या. तो फोनवर बोलत त्यांच्याकडेच येत होता. त्यांच्या तोंडातून आवाजच निघेना. त्यांच्याजवळ येताच तो थांबला.

“ओ मावशी… तुमचा रुमाल पडला होता बघा तिथं.” उतरण्याच्या घाईत कानाला बांधलेला रुमाल कुठेतरी पडला. मळका रुमाल अल्काताईच्या हातात कोंबत तो पुढे गेला. “अगं… ऐक ते पाटील सायबास्नी कुत्र्याचं पिल्लं पाइजेल हाय. ते न्हाई का? काळं-पांढरं… ठिपक्यांच. हां तेच. जरा खाऊ-पिऊ घाल तेला दोन दिवस. मी आल्यावर पैशांचं बघतो.” असं काहीसं फोनवर बोलत तो बाहेर पडला.

 अल्काताई तो नजरेआड होईपर्यंत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिल्या.

Leave A Comment