“आणि खूप मोठ्ठा पाळणा होता विनूमामा… तू आहेस बघ… तुझ्या तिब्बल मोठ्ठा. ” चिंगी आपले छोटे हात उंचावून उंचावून आपल्या किनऱ्या आवाजात सांगत होती.
“चिंगे… हात धर बघू… ते बघ रिक्षा आली.”
“तू असतास तर तू घाबरून रडलाच असतास… खरं मी नै घाबरले…” माझ्या कमरेपर्यंत पण उंची नसलेली पोरगी मला भित्रा ठरवून मोकळी झाली होती. तसा मी त्या giant wheelला घाबरतोच म्हणा. वरून खाली येत असताना पोटातले जठर, यकृत जे काही असेल ते अन्न-नलिकेतून बाहेर येईल असा वाटतं.
“अगं ए… थांब…” मी किंचाळलो. चिंगी एकटीच रस्ता क्रॉस करू पाहत होती. मी धावत जाऊन तिला मागे ओढलं. “चिंगे… हात धर म्हणलं ना? का देऊ दोन फटके? तुझी आई मला जिवंत ठेवायची नाही तुला काय झालं तर.” तिला मी कडेवर घेऊ पाहत होतो पण ती येत नव्हती. शेवटी तिचा हात घट्ट धरला आणि मी रस्ता क्रॉस करू लागलो.
“मला काई नाई होत.”
“मोठ्ठी आली… मला काई नाई होत”
“माझा हात सोड…” रस्ता क्रॉस झाला न झाला तोवर पळायची घाई.
ह्या चिंगीच्या घरी जाणं म्हणजे एक टेन्शनच. आमच्या घरातलं कोणीही दिसलं कि मागे लागायची ‘घरी घेऊन चल’. २ वर्षांची असल्यापासून. अगदी लहान होती तेव्हा पासूनच एकदम हरवाळ. एका ठिकाणी थांबायला तिला अजिबात जमत नाही आणि सांभाळता सांभाळता आम्हाला नाकीनऊ येतं. आमच्या घराच्या इथून ट्रेन्स दिसतात, त्याचं तिला फार कौतुक. शिवाय माझ्या आईची लाडकी! गोंडस चेहऱ्याची चिंगी आमच्या घरातल्यांचं एंटरटेनमेंट. तिच्या गोष्टी, तिची सगळ्या कामात पुढे पुढे करायची घाई, सगळंच एकदम गोड.
“पळू नकोस गं बाई… मी नाही बघ उचलणार पडलीस तर. तुझा समोरचा एक दात आधीच पडलाय. अजून एखादा पडला तर बस रडत”
“मी नैच पडत.” तिने पुन्हा एकदा मला धुडकावलं. “विनूमामा… मी तुला जोक सांगूss ?” आपला गुलाबी फ्रॉक हातात धरून डोलत ती म्हणाली.
“सांssग ?” ती पुढे गेल्यामुळं ओरडून बोलावं लागत होतं. तसंही रस्त्यात कोणी नव्हतं, त्यामुळे मलाही तिच्या जोक मध्ये भाग घ्यायला मजा येत होती.
“दोन हत्ती पोहत असतात काय… पण एक हत्ती जातो मग दुसरा बाहेर येतो… दुसरा जातो मग पहिला बाहेर येतो. “
“मगss ?”
“मग त्यांना एक मुंगी विचारतेss… तुम्ही दोघं एकत्र का जात नाई?”
“मगss ?”
“मग… हीहीही… मग तो हत्ती म्हणतो… हीहीही… “तोंडापुढे हात धरून ती आपलं हसू कंट्रोल करू पाहत होती. ते बघून आता मला हसू येऊ लागलं होतं.
“काय म्हणतो हत्ती?” मी पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखं विचारलं.
“तो म्हणतो… आमच्या दोघांच्यात एकच चड्डी आहे…. हीहीहीही…” ती परत पुढे पळू लागली.
प्लॅटफॉर्म जवळ आला तसं मी तिला म्हणालो, “चिंगे… थांब आपल्याला पुढून जायचंय.”
“नक्को विनूमामा… वरून जाऊन प्लिज प्लिज.”
आता हिच्यासाठी रुळावरच्या ब्रिजवरून जावं लागणार. मला अजिबात इच्छा नव्हती ते ३ मजले चढून उतरायची. आमच्या गावचा हा प्लॅटफॉर्म म्हणजे ऐतिहासिक नमुना होता. ब्रिजवर चढून जायच्या पायऱ्यांची शाश्वती नव्हती. ब्रिजवर ३ पेक्षा जास्त माणसं असली तर ब्रिज कोसळेल की काय अशी अवस्था होती, त्यामुळे जास्त कुणी इथून जात नसे. थोडंसं पुढून पायवाट होती तिकडूनच सगळे जायचे. पण ह्या बयोपायी आता हा इंग्रजकालीन ब्रिज चढावा लागणार. “ठीक आहे… पण माझा हात धरून चल. पुढे पळू नको. तिकडे वर कठडा नाहीए. चिंगे…” पण एवढं ऐकायला ती थांबतेय कुठे, ती पळू लागली. तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली देखील.
मला आता तिच्यामागे पळण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला मागून पळत येताना बघून तिने तिचा स्पीड दुप्पट केला.
“फ*!!” मी वेगात पायऱ्या चढायला सुरुवात केली. “थांब गं ए…”
“हीहीही…” ती खिदळत पळत होती.
१ मजला पळत चढूनच मी दमलो. “चिंगे… हळू पळ… मी नाहीए तुझ्यामागे येत.” पण हे ऐकायला ती माझ्या नजरेच्या कक्षात पण नव्हती. थोडासा श्वास घेऊन मी परत पायऱ्या चढू लागलो ,उरलेले दोन मजले चढून मी फायनली वर पोचलो. कठडा नसलेल्या कोपऱ्यालगत ती उभी होती. माझ्याकडे बघून थोडं guilty हसली आणि माझ्याजवळ आली.
“अगं… केवढं पळवलंस मला.” मी धापा टाकत म्हणालो.
“सॉरी सॉरी… मी कोकरू येऊ?”
“बरं… चल बस.” मी खाली बसलो, तिला कोकरू घेतलं आणि ब्रिजवरून चालू लागलो. अंधारून आल्यामुळे पुलावरचे २ मिचमिचे दिवे लागले होते. वारा सुटला होता. मी सावकाशच चालत होतो, “चिंगे… तुझ्या आईला मी तुझं नाव सांगणार आहे. तुला फटके दिले ना तर तुला कळेल मोट्ठ्यांचं ऐकायचं.”
ती एकदम गप्प झाली. “आणि आता घरी गेल्यावर TV वर ते फालतू छोटा भीम बघू देणार नाहीए मी तुला. match आहे आज”
“हां…”
“वाह… आज चक्क हां म्हणालीस? आईला नाव सांगणार म्हणल्याबरोबर?” मी तिला घेऊन ब्रिजच्या खाली उतरलो. “उतरतेस का खाली?”
“नको. तिथे ती बाई आहे”
ब्रिजच्या खालच्या दगडी कमानीत एक म्हातारी राहते. इथून न जाण्याचं अजून एक कारण. दगडी-पांढरे, सोडलेले केस. चेहऱ्यावर आलेले मोठे फोड,पडके दात ह्यामुळे ती जरा भीतीदायकच वाटते. मी तिला कधीच कुणाशी बोलताना बघितलं नाही. रात्री तिथून कोणी जाऊ लागलं कि ती दगड मारते, त्यामुळे रात्री कोणी जात नाही. म्हातारी आपल्या गाठोड्याजवळ मांडीत डोकं खुपसून बसली होती . माझी जरा फाटलीच होती. दगडी कमानीत एकच पिवळा दिवा होता. मी माझ्या मोबाईलचा लाईट लावायचा विचार केला पण त्याने म्हातारी जागी होईल असा विचार करून मोबाईल परत खिशात टाकला आणि सावकाशीने चालू लागलो. पण चालता चालता वाटेत पडलेल्या पत्र्याच्या छोटया कॅन वर माझा पाय पडलाच. तिने झर्र्कन डोकं वर काढलं.
आईचा घो! मी तिचा चेहरा इतक्या जवळून कधीच पाहिला नव्हता. तिची आणि माझी नजरा-नजर झाली. माझ्या छातीत धस्स झालं. मी जरा पटापट चालू लागलो. तेवढ्यात घोगऱ्या आवाजात ती ओरडू लागली.
“ए… कुणाला घिऊन चाल्लास. सोड तिला. लांब सोड. अबाबाबा….” तिने तोंडावर हात ठेऊन बोंबलायला सुरुवात केली. माझी चांगलीच टरकली होती. मी तिथून जोरात पळू लागलो. बराच लांब येऊन मी श्वास घेतला. चिंगीने चिक्कार शब्द काढला नव्हता तोंडातून.
“चिंगे… घाबरलीस काय गं?”
“होय… मला वाटलं तू मला सोडून जाशील.”
“असा कसा सोडून जाईन. पण डेंजरस आहे हं ती म्हातारी…तुला म्हणलेलं ना आपण पुढून जाऊ. तू ऐकत नाहीस, म्हणून असं होतं.”
“मी तुझं सगळं ऐकीन.”
“बरं उतर आता खाली.”
“नको… मी तुला आवडते ना?”
“हो…! आवडतेस तू मला.”
“मला आईकडं घेऊन चल विनूमामा”
“आँ… अचानक काय झालं तुला? आता नाही… आता अंधार झालाय ,गपचूप घरी चल आमच्या. तिकडेच जेऊन मग बाबांना फोन करू तुझ्या. “
ती एकदम गप्प झाली. “काय? जायचं ना घरी”
“हां..” म्हणून चिंगी मला अजून चिकटली.
“चिंगे जोक सांग की…” ती गप्पच होती.
काय झालं हिला? इतरवेळेस हातसुद्धा धरत नाही कधी आणि आता अंगावरून खाली येईना. तोंडाचा पट्टा कधी बंद नसतो आणि आता एकदम गप्प गप्प.
“काय झालं गं? गप्प का बसलीस?”
“विनूमामा… मी छान दिसते ना?”
“होय चिंगे… असं का विचा…” मी प्रश्न विचारता विचारता तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. डोळ्यांच्या खोबण्या मोठ्या वाटत होत्या. माझ्या गळ्याभोवतीचे तिचे हात पण कोरडे पडले होते. अचानक मला वाटलं कि मगाशीची म्हातारी अजून पण मागून बोंबलतेय.
मी आवंढा गिळला आणि तिला विचारलं, “चिंगे… मगाशी पायऱ्या चढून पळत गेलीस तेव्हा काय झालं? तू तिथे कठड्यालगत थांबलीस ना?”
“नाही विनूमामा मी खाली पडले.” ती उत्तरली.
चिंगी चटका लावून गेली.
छान आहे कथा.