“मम्मा, उतू-मातू म्हणजे काय?” ईशानने फरशीवर गाडी फिरवत फिरवत विचारलं.
“काय्य?” मी केस विंचरताना थबकले.
“तू नाहीस का काल म्हणत होतीस, उतू नको, मातू नको…” त्याने मग माझ्याकडे पाहिलं.
“oh… ते… उं… उतू नकोस, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस.”
“हां, म्हणजे काय?”
आता काय सांगायचं ह्याला? इंग्लिश शाळेत शिकणारी ही मुलं. काय अर्थ सांगावा? तसा मला तरी कुठे उतू-मातूचा इंग्लिश शब्द माहित आहे म्हणा…!
तसं फार काही व्रतं-वैकल्य मला जमत नाहीत. पण लॉक-डाऊन मध्ये घरी राहिल्याने, सोसायटीतल्या शेजारणींच्या नादाने मीदेखील सण-वारात इंटरेस्ट घेऊ लागलेय. मग सासूबाईंच्या virtual देखरेखीखाली पूजा मांडतेय ‘महालक्ष्मी’ची. काल दुसरा गुरुवार झाला. लहानपणी ही कथा वाचायला नेहमी मी पुढे असायचे. चांगले आवाजातले चढउतार घेऊन.
आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शुर व प्रजादक्ष होता. देवा-ब्राम्हणांना, साधुसंतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवर्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या, लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला; पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऎश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी.
देवीनं म्हातारीचं रुप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली – “अरे, आहे कां घरात कुणी ? कुणी घास देईल का ?” दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, “कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय ? गाव कोणतं ? तुला हवयं कायं ?” मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “माझं नाव कमला. द्वारकेहून आलेय गं ! राणीला भेटायचंय ! कुठं आहे गं राणी?
सुरतचंद्रिका दासीचा निरोप ऐकून बाहेर आली. ती तावातावाने म्हणाली, “कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ?”
हे ऐकून म्हातारी संतापली. “सुरतचंद्रिके, तुला तुझ्या संपत्तीचा गर्व झाला आहे, तुला तुझ्या भूतकाळाचा विसर पडला आहे. तू जा म्हणण्याआधीच मी निघाले.” असे म्हणून म्हातारी काठी टेकीत चरफडत निघाली. वाटेत तिला राजाची कन्या शामबाला दिसली….
हि गोष्ट वाचता वाचता मला ती म्हातारी दिसायची. सुरतचंद्रिका म्हणजे एखाद्या जुन्या हिंदी सिनेमातील vamp वाटायची. वाचताना कधी असा विचार वगैरे केला नव्हता. कि ह्याचा अर्थ काय? खरंतर कालही वाचताना केला नव्हता.
पण कुठे ना कुठे ती गोष्ट मनात होती. आजकालच्या मुलांसारखं ‘Value education’ वगैरे मिळत नव्हतं आम्हाला शाळेत. ‘मुलांचे संगोपन’ ह्या विषयावर आईनं तरी कधी पुस्तक वाचल्याचं आठवत नाही.
एके काळी कष्टात दिवस काढलेली आम्ही भावंडं आता सामाजिक अर्थाने चांगली सेटल्ड आहोत. पण माझ्या आणि माझ्या भावंडांच्याही मनात कुठेतरी जाणीव आहे, की हे दिवस कुणाच्या तरी कष्टामुळे आलेयत. आणि तेच कष्ट आपणही केले तर कुठे चांगले दिवस टिकून राहतील आणि मुलांच्या वाट्यालाही तेच सुख राहील.
हाच असावा त्या गोष्टीचा अर्थ. व्रत, पूजा, उपास ही सगळी निमित्त आहेत. वडिलधाऱ्यांकडून घेतलेला कष्टाचा वसा टाकून नाही द्यायचा, आणि अहंकाराला बाजूला ठेवायचं.
“मम्मा… मी थोडी कणिक घेऊ खेळायला?” ईशानचा किचनमधून आवाज आला.
“अरे! हा तिकडे कधी गेला” मी बेडवर बसून जो विचार करत होते त्यातून जागी झाले. आणि किचनकडे गेले. त्याने already थोडी कणिक घेऊन त्याचा हत्ती तयार करायला सुरुवात केली होती. उतू-मातू बद्दल तो विसरला होता.
जाऊ दे. काय सांगायचं त्याला. त्याच्या कानावर पडेल गोष्ट आणि कळेल अर्थ जेव्हा कळायचा!