आज पहाटे-पासूनच घरं-दारं दिव्यांच्या रोषणाईत चमकत होती. दारात सुंदर-सुबक रांगोळ्या काढल्या जात होत्या. घराघरात उटणं, बदामतेल आणि मोती साबणाचा सुगंध दरवळत होता. चिल्ल्या-पिल्ल्यांची किलबिल आज लवकरच चालू झाली होती. कुणाच्या घरी घाई-गडबडीत करायच्या राहिलेल्या बेसनाच्या लाडवांची बांधणी चालली होती, कुणाच्या घरी शुचिर्भूत होऊन एखादे आजोबा पूजा मांडत होते, कुणाच्या घरी ७ च्या सूर्याला किलकिल्या डोळ्यांनी नमन करत दिवाळी-पहाट सुरु होत होती.
पण ह्या सगळ्याचं ‘गोजी’ ला काय? ती नेमाप्रमाणे पोलीस-स्टेशनच्या कुंपणाच्या आत एक कोपरा धरून, गाठोडं उशाशी घेऊन झोपली होती. ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ असा त्यांचा बाणा असल्यामुळे की काय त्यांच्यावर विश्वास ठेऊन ती रोज रात्री इथे येऊन झोपत असे. आधी कधीतरी, गावाच्या बस-स्टॅण्डवर झोपायची, तिथं… तिथं काय काय घडलं काय माहित!एकट्या बाईला कोणी कुठे थारा देतं का? ‘गोजी’ असली तरी ‘बाई’ च ती शेवटी.
पण इकडे देखील तो तिला शोधत आलाच. पोलीस-स्टेशन जवळ असून सुद्धा, त्याला ती सापडली. काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा. तो गुरगुरत, भयानक टोकदार दात दाखवत, जीभ बाहेर काढून, लाळ टपकत थोड्या अंतरावर उभा होता. गोजी पळू लागली. जंगलात. झाडांमागे लपत ती पुढे जाऊ लागली. पळून पळून तिच्या पायातली शक्ती गेली होती. तिला तहान लागली होती. पण ती थांबू शकत नव्हती. तो मागेच होता. गोजी घाबरून मागे सुद्धा बघत नव्हती. तिला माहित होतं की त्याच्या लाल भयानक डोळ्यांत पाहिलं तर ती पूर्ण गोठून जाणार आणि तो तिच्यावर झडप घालणार. सगळी ताकद एकवटून ती पळू लागली, मोठ्ठी झाडं आणि त्यांचा खाली पडलेला पाचोळ्याचा ढीग, त्यातून पाय काढत पळता-पळता एका झाडाच्या मुळात ती अडखळली आणि पाचोळ्यात फस्सकन पडली. स्वतःला सावरून उठणार तेवढ्यात, कुत्र्याने झप्पकन तिच्यावर झेप घेतली. गोजीने डोळे गच्च मिटून घेतले.
“ए, उठगोजे.” कुणाची तरी लाथ तिच्या पायाला लागली. थरथरत्या पापण्या हळूच वर करून तिने पाहिलं, हवालदारीण बाई काठी घेऊन उभ्या होत्या.
“उठतीस का नाही? काय पाहिजे एक पेकाटात?” म्हणून त्यांनी काठी दाखवली. “चल, दिवाळीचं आवरायचं आहे आम्हाला इथलं. निघ.”
आज हवालदारीण बाई काठपदरी साडी नेसून आल्या होत्या. पोलीस-स्टेशन समोर रांगोळी काढायची म्हणून लवकर आल्या होत्या. गोजी आपलं गाठोडं घेऊन उठली. आणि पायात झिजलेलं पॅरागॉन चढवून पाय घसटत निघाली. पलटून हवालदारीण बाईकडं बघून ओशाळं हसली. तिच्या मनातआलं होतं, बाईंना सांगावं, “आज लिपिष्टिक लावून झाक दिसलायसा. ” पण ती बोलली नाही. गोजी बोलत नसे, अगदी थोडकं, गरजेपुरतं. १-२ शब्दांची वाक्यं. त्यापेक्षा जास्त बोलायला गेलं, तर तेवढ्या वेळासाठी तिला कोणी जवळ तरी उभं करून घ्यायला पाहिजे.
तिथून थोडं लांब सकाळी छोटा मोठा बाजार भरत असे, तिथे जाऊन ती थांबली. वडापाव – वाल्याची वाट बघत. त्याच्या गाड्याच्या जवळच एक झाड होतं त्याच्या मागे ती बसून राहायची. तो स्कुटीवरून आपल्या सामानाच्या पिशव्या घेऊन यायचा आणि स्टोव्ह पेटवून, तेल उकळलं कि एक छोटा वडा तळायचा तो देवासमोर ठेवायचा. आणि मग दुसरा वडा तळून कागदात घालून गोजीला द्यायचा. आणि आपल्या बसक्या आवाजात तिला सांगायचा, “निघ आता. गिऱ्हाईकाची वेळ झाली.”
आज खूप वेळ झाला वडापाव-वाला आला नाही. हवालदारीण बाई म्हणाल्या ‘दिवाळी आहे’, म्हणून आला नाही वाटतं. हवालदारीण बाईंकडं होती तशी गुलाबी रंगाची, हिरव्या काठापदराची साडी… “आपल्या वर बी चांगली दिसल” गोजीच्या मनात येऊन गेली. ‘त्याने’ आणून दिली होती एकदा, गुलाबी नव्हती, निळी होती. पण गोजीवर छान दिसत होती. उन्हाने रापलेल्या चेहऱ्यामागे कधी काळी एक गोमटा, कोवळा चेहरा होता. आगतिक होऊन स्वतःच कात्रीने कापून बारीक केलेल्या केसांची कधी काळी चोपून वेणी बसत असे. ‘त्या’ वाल्या गोजीवर छान दिसत होती ती निळी साडी. घरी मोठा आरसा नव्हता म्हणून त्याला घेऊन ती देवळात गेली. देवाला नमस्कार करायचं सोडून तिथल्या वर लावलेल्या मोठ्या आरशात ती स्वतःला निरखून पाहत राहिली.
‘फट-फट’ जोरात तिच्या कानाखाली वाजवल्या त्याने. आणि ती भानावरआली. नवीन सुटिंग-शर्टींग चं दुकान उघडलं होतं थोड्या अंतरावर, तिथल्या पोरांनी १००० ची माळ (फटाक्यांची) लावली होती. लांबून कोपऱ्यापासून एक-एक फटाका फुटत मोठा आवाज करत आणि धूर सोडत तिच्यच बाजूला येत होता. घाबरून ती उठली. तिला कुठल्या दिशेला पळून जाऊ कळत नव्हतं. तरुण पोरं जग जिंकल्याच्या अविर्भावात त्या ठिणग्या आणि धूर पाहत थांबली होती. गोजीची उडालेली धांदल त्यांचं अजून मनोरंजन करत होती.
आपलं गाठोडं घेऊन ती तिथून कशीबशी पळाली. पुढे जाऊन देवळापाशी जाऊन बसली. पोटात गलबलत होतं. खूप वेळ वाट पहिल्यानंतर एक कुटुंब दिवाळी-दिवशी देवी चं दर्शन घ्यायला आलं. ते आत गेले आणि देवळातला पुजारी बाहेर आला आणि त्याने गोजीला हाकललं. त्याचंही बरोबरच होतं म्हणा. इतक्या मंगलमयी वेळेस, लोकांनी प्रथमदर्शन देवाचं घ्यायचं की गोजींचं भंगलेलं तोंड पाहायचं? इकडे देवळात कुटुंबातल्या बाईने देवीला कुंकू वाहिलं. अगरबत्ती पेटवून, ओवाळून स्टॅण्डमध्ये खोचली. मनोभावे नमस्कार केला. सोबत आणलेला फराळ – करंजी, लाडू, चकल्या, चिवडा – भक्तिभावाने देवीला अर्पण केला. पोरांना नमस्कार करायला लावला आणि त्यांच्या डोक्याला अंगारा लावला. कुटुंबातल्या पुरुषाने मग नमस्कार केला, स्वतःला अंगारा लावला. कुटुंब बाहेर येऊन स्कूटर वर बसलं आणि देवळाबाहेर थांबलेल्या गोजीला वळसा घालून निघून गेलं.
गोजी धीटपणा करून पुन्हा देवळाच्या आवारात गेली. पोटात पडलेली आग आपसूक धीटपणा शिकवते. “खायला दे!” अशी जोराची हाक तिने दिली. देवीने सद्बुद्धी दिली की काय म्हणून, पुजाऱ्याने एक लाडू आणून तिच्या हातात टाकला. “चल आता चालती हो!” म्हणून हात उगारला. गोजीने तो लाडू झपकन मागे लपवला आणि तिथून पळाली. बाहेर येऊन एक कोपरा पाहून बसली. हातातल्या लाडवाकडं निरखून पाहू लागली. बेसनाचा लाडू! नेहमी फक्त खोबऱ्याचा तुकडा मिळतो देवळात मागितला की, आज देवीच्या घरी पण दिवाळी आहे वाटतं. लाडवाचा छोटा छोटा तुकडा करून गोजी नंबराच वेळ तो लाडूच घळला. मग तिथून उठून दुसरीकडे निघाली.
तिचा दिवस असाच असतो साधारण. एका ठिकाणी बसायचं, थोड्यावेळानं उठायचं आणि चप्पल घसटत दुसरीकडं जायचं. खायला मागण्यासाठी ती कधीघरांच्या गल्ल्यांमध्ये फिरायची नाही. तिथं जोगवा मागणाऱ्या बायका जातात. देवाच्या बायका त्या. गोजीला असं दारात कोणी उभं करून घेणार नाही. तिला कुठल्या देवाने धाडली नव्हती, पैसे/तांदूळ दिले नाही तर शाप देण्याची शक्ती तिला देवाने दिली नव्हती. ती आपली खानावळीबाहेर, मेवाड-प्रेमच्या गाड्या-जवळ अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन थांबत असे. गिऱ्हाईक जाऊ नये म्हणून कोणी तरी पट्कन तिच्या हातात काहीतरी देऊन तिला पिटाळत असे. मग जो काही तुकडा मिळालाय तो घेऊन एखादा निर्मनुष्य कोपरा धरायचा. हातातलं खायचं आणि तिथेच डुलकी काढायची किंवा उठून चालत गावभर प्रदक्षिणा घालायची.
गोजीच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस फारच मोठा असतो. सरता सरत नाही. अजून कसलं देणं बाकी होतं तिचं इथं की काळ पण घेऊन जात नव्हता. तिनं पत्नी-धर्म निभावला नाही बहुतेक, म्हणून असावं असं. की आई-बापाचं निमूटपणे ऐकलं नाही म्हणून असावं? बाईनं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करून संसार ओढायचा असतो, हे गोजीच्या मंद-बुद्धीला कुठून समजणार? आपलं बाई असणंच तिला खूप उशिरा समजलं होतं. घरी येणारा लांबचा चुलता तिला कुठं कुठं हात का लावतो ह्याचा उगम तिला कधी नीट झालाच नाही. रस्त्यानं येता-जाता पोरं शिट्टी का वाजवतात हे तिला कळलं नाही. घरात एक फुटका आरसा भिंतीत बसवलेला होता, त्यात बघण्या इतकी तिची उंची नव्हती. नाही तर ती दिसायला चांगली आहे, म्हणून शेजारचा मुलगा तिच्याकडे बघून हसतो हे तरी तिला कळालं असतं. असंच काही न कळता ती ‘कळत्या वयाची’ झाली. मग एक दिवस कोणीतरी लंगडत्या पायांचा माणूस घरी आला, सोबत ४ बायका – बापडे होते, गोजीला चांगली कापडं घातली होती आणि तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. बायको म्हणून तिची काय कर्तव्य होती हे तिला कोणी कधी सांगितलं नाही, सांगितलं असलं तरी तिच्या अर्धवट मेंदूत ते शिरलंच नसेल. मग तिला आपली जबादारी जमत नाही म्हणून त्याने लाथा घातल्या आणि मुस्कटात लगावल्या तर कुठं चुकलं? हिने लगेच पळून जायचं घरातून? देवाच्यासाक्षीनं गळ्यात बांधलेल्या नवऱ्याला टाकून तिथून सुटली म्हणून तिलाही ‘जगण्याची’ शिक्षा मिळाली असावी.
पण गोजीसाठी आता ते सगळं पुसट झालं आहे. तिच्या मनावरचे सगळे व्रण- ज्यांनी दिले- त्यांच्या चेहऱ्यांसारखेच विरुन चालले आहेत. काही दिवसांपूर्वी आईचा चेहरा आठवत होता तिला, पण आता कधी डोळे बंद केले तर तिची नुसती आकृतीच दिसते तिला. तिची आई जीवंत आहे की नाही माहित नाही, पण गोजीच्या स्मृतीतून ती झिजत चालली आहे.ते एक बरं केलंय देवानं, बुद्धी कमी दिली. जास्त दिवस काही टिकत नाही मेंदूत, म्हणून मागे खाल्लेल्या ठेचांचा हिशेब ठेवून डोकं खराब होत नाही.
फक्त हा काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा! हा काही पाठ सोडत नाही. आता एवढ्या लांब ह्या पडक्या घरात ती येऊन बसली, तरी तिचा माग काढत तो आलाच. तो गुरगुरत उभा राहतो आणि त्याचं ते हिडीस तोंड बघून गोजी एका ठिकाणी गोठून जाते. तिची शक्ती निघून जाते. ती हतबल होऊन तिथे पडून राहिली आणि डोळे गच्च मिटून घेतले. तो तिच्या जवळ आला. त्याचा तोंडातून टपकणारी लाळ गोजीच्या गालावर पडली. एक थेंब, दोन थेंब, तीन थेंब… मोठी धारच लागली.
सपसप पावसाच्या धारा सुरु झाल्या आणि गोजी जागी झाली. देवळापासून चालत चालत ती ह्या कमानी-पाशी कधी येऊन बसली आणि कधी तिचा डोळा लागला तिला आठवतही नव्हतं. जवळचं एक झाड शोधून त्याच्या आडोश्याला ती उभी राहिली. मातीचा सुंदर वास सुटला होता. गुदमरलेल्या ढगांना शेवटी वाटमोकळी झाली होती. पानांच्या आडून पाऊस अधे-मध्ये गोजीला भिजवत होता. टप-टप थेंबांनी झाडा समोर एक छोटं तळं बनवलं. गोजीने उजव्या हाताला पाहिलं, अचानक तिला लहानगी गोजी तिच्याकडे येताना दिसू लागली. लहानी गोजी कागदाची होडी घेऊन आली. त्या तळ्यात तिने ती होडी सोडली. डुलत डुलत जाणारी होडी पाहायला ही मोठी गोजी देखील चवड्यावर बसली. लहान गोजी हसत होती. होडीला वेग देण्यासाठी पाणी ढकलत होती. फस्सकन!! अंगावर मातकट पाण्याचा फवारा उडाला! आणि गोजी पुन्हा ह्या जगात आली. तळ्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवून, धूम-धूम आवाज करत ती बुलेट नजरेआड सुद्धा झाली. आता हा संकेत होता तिथून उठून दुसरीकडे जाण्याचा. आडोसा शोधत शोधत गोजी दुसऱ्यादिशेला निघाली. पाऊस निवळला पण गोजी चालत राहिली. दिवस संपता-संपता ती एका गल्ली पाशी आली.
अंधार होऊ लागला तशा घराबाहेर दिव्यांच्या रांगा उजळू लागल्या. आकाश दिव्यांचारंगी-बेरंगी उजेड अंगणात वाऱ्याबरोबर नाचू लागला. तो झगमगाट पाहत गोजी कधी त्या कॉलनीमध्ये शिरली तिलाही कळलं नाही. एका घराबाहेर लहान मुलं फुलबाजे उडवत होते. त्यांच्याहसण्याचा किलबिलाट आणि फुलबाज्यांच्या सुंदर नक्षीदार ठिणग्या नजरेत भरून घेत ती थांबली. फुलबाजे संपले तशी गोजी त्या मुलांच्या नजरेस पडली, आणि तिचं अंधारातलं रूप पाहून ती पोरं किंचाळत घरात पळाली. “कोण आहे?” असं दरडावत एक पुरुष बाहेर आला. “एचल!” असं म्हणून त्याने हात उगारण्याचा इशारा गोजीला केला. ती मुकाट्याने तिथून निघाली. आता मात्र ती कुठे रेंगाळत थांबली नाही. मध्येच पोटातल्या कावळ्यांनी कलकलाट सुरु केला. सकाळी फक्त एक लाडूच मिळाला होता आज.
थोड्या अंतरावर एक घर दिसत होतं तिथं आकाशकंदील लागला नव्हता की लायटिंगची झगमग नव्हती. नुसता पोर्चवरचा बल्ब लागलेला होता. त्या घराच्या कुंपणा पाशी ती गेली. गोजीला वाचता येत असतं, तर घराबाहेर लावलेली नावाची आणि पुढे असलेल्या PhD, MSc वगैरे पदव्यांची पाटी तिने वाचली असती. पण तिला त्याच्याशी कुठे देणं-घेणं होतं? फाटकातून आत पाहिलं, तर पोर्चमध्ये एकच तेलाची पणती चमकत होती. बारीक आवाजात रेडिओ वर लागलेलं गाणंही ऐकू येत होतं, “मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार… तू वेडा कुंभार…” म्हणजे घरात कोणीतरी आहे.
गोजीने “खायला वाढा” अशी जोरदार हाक दिली. कोणी बाहेर आलं नाही. धाडस करून गोजीने फाटक उघडलं आणि कुंपणाच्या आतल्या बागेत मधोमध उभे राहून अजून एक जोरदार हाक दिली, “खायलावाढा.”
“कोण ए?” असा वैतागलेला एक प्रश्न दारातून आला आणि मग कपाळाला आठ्या घातलेले एक आजोबा बाहेर आले. त्यांनी गोजीला पाहून कानातलं मशीन घातलं आणि विचारलं, “काय पाहिजे?”
“बाईस्नी सांगा. खायला दे.”
“कोण बाई नाही घरात.” असं अजून एक वैतागलेलं वक्तव्य करून काहीतरी पुटपुटत आजोबा घरात गेले.
गोजी मागे वळली. घरात बाई नाही, हा चिडका म्हातारा काय देणार तिला. ती फाटकातून बाहेर पडणार तेवढ्यात मागून आवाज आला. “थांब! हे घेऊन जा.” असं म्हणून एक बॉक्स त्यांनी बाहेर आणून ठेवला. “फराळ पाठवून उपकार करतायत. कशाला? आणतो की माझं मी मला पाहिजेते…” असं काहीसं पुटपुटत आजोबा आत जाऊ लागले. गोजी नं तो बॉक्स उघडला, त्यातली चिवड्याची पिशवी दातांनी फोडली, आणि हातात चिवडा घेऊन ती त्याचा बकाणा भरू लागली.
आजोबांनी मागे वळून पाहिलं आणि हातवारेकरत तिच्याजवळ आले. “अगं, अगं… कसं खाते आहेस? थांब मी ताट घेऊन येतो.”
गोजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बकाणा भरत उभी राहिली. थोड्याच वेळात आजोबा ताट आणि कात्री घेऊन आले. फराळाच्या एक एक पिशव्या कापून ताटात ओतून त्यांनी व्यवस्थित वेगवेगळे वाटे केले. न राहवून एक बुंदीचा लाडू आपण ही खाऊन घेतला. “इथं बस आणि खा. उरलेलं घेऊन जा. थांब पिशवी आणतो.” म्हणून त्यांनी गोजीला पोर्चवर बसायला सांगितलं. काही मिनिटांनी ते एक मोठी पिशवी आणि पाण्याचा तांब्या घेऊन आले.
“जाताना ते फाटक नीट बंद कर.” असं म्हणून ते आत गेले आणि त्यांनी दार बंद करून घेतलं.
कित्येक दिवसांनी गोजीचं पोट तुडुंब भरलं. तांब्यातून थंडपाणी पिऊन तिच्या शरीरातल्या पेशी जणू भिजून स्वच्छ झाल्या. तिने नीट ताट आणि तांब्या दारा जवळ सरकावून ठेवला. बॉक्स एका कोपऱ्यात ठेऊन दिला आणि पिशवीत उरलेल्या गोष्टी घालून ती निघाली. सांगितल्याप्रमाणे फाटक नीट बंद करून बाहेर पडली.
घड्याळाचा काटा पुढे सरकला. हळू-हळू काही घरांच्या बाहेर लागलेल्या लायटिंगच्या माळा बंद झाल्या. पणत्या, मेणबत्त्या, दिवे विजले. आजोबांच्या घरातल्या लाईट्स देखील बंद झाल्या.
गोजी कुठे गेली नव्हती. थोडंसं लांब जाऊन सगळं सामसूम व्हायची वाट बघत होती. ती फाटक उघडून पुन्हा आजोबांच्या बागेत शिरली. थोडं इकडे तिकडे फिरून, आजोबा जागे तर नाहीत ह्याची खात्री केली. मग तिने भिंतीला लावलेला मोठा झाडू घेतला आणि खाली पडलेला झाडांचा पाचोळा गोळा करायला सुरुवात केली. थोडं-थोडं करत बागेच्या एका कोपऱ्यात पाचोळ्याचा मोठा ढीग बनला. एकदा फिरून तिने संपूर्ण बागेकडे पाहून घेतलं, बाग स्वच्छ झाली होती. तिने झाडू भिंतीला टेकवून ठेवला आणि जाण्यासाठी वळली तेवढ्यात फाटका जवळ तिला तो दिसला.
काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा. तो गुरगुरत तिच्याकडे येऊ लागला. गोजी थबकली. पण ह्यावेळेस गोठून नाही गेली. कदाचित पोटभरलेलं असल्यामुळं तिला आज पायात ताकद जाणवत होती. तिने मुठीवळल्या आणि त्याला टक्कर द्यायला ती सज्ज झाली. त्याने आपले भयानक दात दाखवत तिच्यावर झडप घातली, पण जवळच्या झाडूने तिने त्याला उलटं पाडलं. तिथला एक मोठा दगड पूर्ण शक्ती निशी उचलला आणि त्या कुत्र्याच्या अंगावर फेकला. त्याचं डोकं ठेचलं गेलं आणि तो निपचित पडला. गोजी दबक्या पावलाने त्याच्या पाशी गेली, गोल फिरून तिने त्याला तपासलं. तो बेशुद्ध पडला होता. त्याचे पायधरून ओढत आणून त्याला गोजीने पाचोळ्याच्या फेकलं. मग पोर्चवरची पणती आणली आणि तो ढीग पेटवला.
काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा त्या आगीत जळू लागला. गोजीला गगनभर आनंद झाला. हात पसरून आकाशाकडे बघत तिने गोल-गोल गिरक्या घेतल्या. आणि त्या जळणाऱ्या ढीगा जवळ मट्कन बसली. आगीच्या उबीने तिचे डोळे हळू हळू मिटू लागले. मिटता मिटता एक पुसटशी आकृती तिच्या जवळ येताना तिला दिसली. मगाशी ची लहानगी गोजी, कागदाची होडी घेऊन आली. आभाळाकडे नजर लावून जणू पावसाची वाटत पाहत गोजीला खेटून बसली. दूर कुठेतरी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला, एक कळ सरसर करत गोजीच्या पायापासून हृदयापर्यंत गेली. पापण्या जड झाल्या. आणि जळणाऱ्या पाचोळ्याच्या ढीगाजवळ गोजी आडवी झाली.
काही क्षणांत ती तरंगत उठली. आपल्या शरीराकडे तिने पाहिलं. तिने गुलाबी रंगाची – हिरव्याकाठाची साडी नेसली होती. केसांची चोपून वेणी घालून गजरा लावला होता. गळ्यात सुंदर साज चढवला होता. तिच्या नाजूक अंगावर तो शृंगार उठून दिसत होता. वाऱ्याची एक झुळूक आली आणि गोजी तिच्या बरोबर वाहती झाली.
आज कोणी आकाशात बघितलं असतं, तर तिच्याकडे पाहून त्यांना कळालं असतं – तिचं नाव खरं तर ‘गोजिरी’ आहे.