“कसं काय आलं असेल हे आत?”
“एवढ्या पायऱ्या चढून येणं कसं शक्य आहे? केवढंसं आहे आणि! वितभर!”
“पण नेमकं कधी आलं?”
हॉलमध्ये टेबलाखाली बसलेल्या कासवाकडे बघून सगळ्यांची चर्चा चालू होती.
‘What do turtles eat’ असं मोबाईलवर search करत होतो तितक्यात छोट्या भावाने लहान टबमधे पाणी आणलं. त्याला उचलून त्यात ठेवलं. त्याच्यासमोर पालकाची पानं टाकली. आणि त्याने लगेच खायला पण सुरुवात केली.
तेवढ्यात शिंगाडे आज्जी त्यांच्या बागेतली मेथीची जुडी द्यायला आल्या.
“ह्या आशूला काय करावं? कशाला रे बिचाऱ्या कासवाला घरात घेऊन आलास?” टबमधल्या कासवाकडे बघून आज्जीनी सरळ भावाकडे मोर्चा वळवला.
“अहो नाही आज्जी, ते आपोआप आलाय. आम्ही बघितलं तेव्हा टेबलाखाली बसलं होतं!”
“आपोआप आलं? अरे पण इथं आसपास पाण्याचं डबकं सुद्धा नाही.” आज्जी आश्चर्याने बोलल्या.
“तेच म्हणतोय आम्ही पण. आणि ह्या बाहेरच्या पायऱ्या चढून कसं आलं काय माहित. बाकी कुठल्या बाजूनं घरात यायचा मार्गच नाही.” मी म्हणालो.
आज्जीनी इकडं तिकडं बघितलं. बाहेरच्या पायऱ्या बघितल्या.पटकन टबाजवळ येउन बसत म्हणाल्या,
“पोरांनो… तुमची आई आली तुम्हाला भेटायला!”
त्यांच्या या वाक्यावर सगळेच फक्त शांत झालो.
“तुमच्या आईची पुण्याईच तेवढी होती. ती काय कुत्र्या-मांजराच्या जन्माला जाणार नाही. कासव होऊन तिच्या पोरांना भेटायला आली. बघा की, जवळपास पाणी नाही, घर एवढं उंचीवर. आणि दुसऱ्या कुणाच्या दाराला न जाता ते इकडंच आलं.”
बोलता बोलता त्यांनी मेथीची पानं खुडून त्याच्यासमोर टाकली.
डोळ्यातलं पाणी लपवायचा सगळ्यांनीच प्रयत्न केला.
आशुने पटकन टब उचलला. “भैय्या चल, विहिरीत सोडून येऊया ह्याला.”
“का? आपण सांभाळू की. मी बघतो काय काय लागतंय कासव पाळण्यासाठी. आपण आणूया ते ते सगळं” मी आवेगाने म्हणालो.
“नको. कासव असं बाहेरच्या पाण्यात जास्त दिवस राहत नाही. चल.” रस्त्यावर मिळालेलं कसलंही कुत्र्या-मांजराचं पिलू घरी घेऊन येणारा माझा लहानगा भाऊ शांतपणे कासवाला सोडून येऊया म्हणून सांगत होता.
दोघे विहिरीकडे गेलो. खालीपर्यंत उतरलो आणि त्याला शेवटच्या पायरीवर ठेवलं. त्याच्या डोक्यावरून बोट फिरवलं. दोघं तिथेच बसलो. पण ते पाण्यात जात नव्हतं.
“जा, जा पाण्यात…” असं म्हणून आशुने त्याला थोडं पाण्यात ढकललं. पण ते परत चालत पायरीवर येऊ लागलं.
आशुने माझ्याकडे बघितलं. मग त्याच्याकडे बघत म्हणाला, “आहे आम्ही व्यवस्थित, जमतंय हळू हळू आता सगळं करायला. तू काळजी नको करू. आम्ही आहोत ठीक” बोलता बोलता त्याचा आवाज जड झाला. मी त्याच्या पाठीवर हात टाकला. दोघांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.
त्या कासवाला खरंच त्याचे शब्द समजले की काय, ते हळू हळू पाण्यात परत गेलं. कि नुसताच योगायोग?
दोन दिवसांनी परत पुण्याला यायला निघालो. निघायच्या आधी एकटाच विहिरीकडे गेलो. डोकावून बघितलं, कासव कुठे दिसत नव्हतं. दोन मिनिटं थांबलो. थोडं इकडे तिकडे फिरून बघितलं. जायला निघणार तेवढ्यात खालच्या पायरीवर एक छोटं डोकं दिसलं.
ते माझ्याकडे बघत होतं आणि मी त्याच्याकडे. मनोमन नमस्कार करून पाणावलेल्या डोळ्यांनी मागे फिरलो.
टेक्नोलॉजीच्या जगातली माणसं मला खुशाल हसू देत. मला माहितीय माझी आई मला बघायला आली होती. मला “सुखी राहा” म्हणून सांगायला आली होती.