सोनी, बाबा आणि चाळीस पोरं (Soni, Baba Ani Chalis Pora)

“सोनीची गद्देपंचविशी पार झाली आहे. “यंदा कर्तव्य आहे का?” असा प्रश्न आता तिला उठसूट विचारला जातो. ‘अरेन्ज मॅरेज’ असलं तरी बदलत्या काळानुसार वर/वधू फक्त कांदेपोहे खाता खाता पसंत न करता, CCD मध्ये जाऊन कॉफी पिता पिता सिलेक्ट करायची आता मुभा आहे. त्यामुळे “Mr. Right” शोधायच्या प्रोसेस मध्ये काही हौशे, काही नवशे, काही नग, काही नमुने भेटतात. एक वेळ अशी येते की सगळं जग आपल्याभोवती घुमत आहे आणि आपण एकाच ठिकाणी थांबलो आहोत असं तिच्यासारख्या सगळ्यांनाच वाटू लागतं. अशावेळीच अचानक कधीतरी आपला रस्ता मिळून जातो. सोनीला तिचा रस्ता मिळेपर्यंतच्या तिच्या भटकंतीची ही गोष्ट.”

भाग-१

सोनी खडबडून जागी झाली, तिने आसपास पाहिलं तर सात-आठ मुली आडव्या-तिडव्या पसरल्या होत्या. तिला थोडावेळ काही कळलंच नाही. अचानक तिचा खांदा हलू लागला. तिने डाव्या बाजूला झटकन मान वळवली.

“निरू? तू?” डोळे फाकवत तिने विचारलं.

“जागी हो… निघायचंय ना?” निरू बॅग उचलत म्हणाली

टेबलावर पसरलेल्या बाटल्या, केकचा खोका, भिंतीला टांगलेले फुगे हे सगळं बघितल्यानंतर तिला लक्षात आलं की ती काल रात्री श्वेताच्या घरी पार्टीला आली होती.”अं… हो…” डोळे चोळत ती उठली आणि आसपास पसरलेल्या मुलींच्या मधून वाट काढत बाहेर आली.

निरूने तोपर्यंत श्वेताला उठवलं.

“श्वेता… मी आणि सोनी चाललोय गं, कडी लावून घे”

“हं…” ती डोळेही न उघडता म्हणाली.

सकाळचे ७ वाजले होते. श्वेताच्या फ्लॅटवरून सोनी आणि निराली घराकडे निघाल्या. हवेत छान गारवा पसरला होता… सूर्य नुकताच वर आला होता… रविवार असल्यामुळं रस्ता निवांत पडला होता. मधेच वाटेत थांबून त्यांनी टपरीवर चहा प्यायला. मग गाडीवर बसल्यानंतर सोनीने मोठ्ठी जांभई दिली. स्वेटशर्टचं हूड डोक्यावर घेतलं आणि गरम खिशात हात घातले. तिने निरूच्या पाठीवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटले.

“निरू… काल काय काय झालं गं?”

“तू झोपा काढ नुसत्या. येतेस कशाला गं नाईट आऊट ला?”

“अगं, काल एक ग्लास घेतला आणि डोकंच जड झालं. आपोआपच डोळे मिटले माझे.” सोनी डोकं खाजवत म्हणाली.

“नेहमीचं आहे तुझं! तरी पण प्यायची हौस.”

“सांग ना… काय काय केलं तुम्ही? आपण केक वगैरे कापला… मग Champagne फोडली… ग्लास भरले… आणि त्यानंतरचं मला काय आठवत नाही.”

“नंतर सांगते आता. उतर आता… आलं घर तुझं”

“आलं? अरे बापरे… अगं निरू… मला वाटेत च्युईंग गम घ्यायचं होतं. आता आईला माझ्या तोंडाचा वास आला म्हणजे?”

निरूने डोक्यावर हात मारून घेतला, “तुझी आई सकाळी सकाळी तुझ्या तोंडाचा वास घेत बसणाराय का सोने? आणि एका ग्लास नंतर वास नाही येत.”

“बरं बरं… चल बाय. व्हाट्सऍप वर बोलू.”

“हं… तुला आज त्या मुलाला भेटायचंय ना संध्याकाळी?”

“ओह शीट! मी विसरलेच होते. चल झोपते मी पटकन जाऊन. जेवणाच्या वेळेत परत उठायला पाहिजे.”

“बाय…” निरू निघून गेली. सोनी दरवाजा उघडून आत आली आणि पट्कन आपल्या रूम मध्ये जाऊन पांघरुणात शिरली. आज संध्याकाळी काय,काय घालायचं, कसं बोलायचं ह्याचा विचार करत ती गाढ झोपून गेली.

दुपारी आईने किचनमधून जोरदार हाक मारून तिला उठवलं. पट्कन उठून तिने दात घासले आणि टेबलजवळ आली.

“काय गं? काय, काय केलं काल?”

“काही नाही नेहमीचंच… बॅचलरेटला करतात ते. केक कापला. श्वेताला चिडवणं, दंगा-मस्ती…” खरंतर सोनीला फारसं काही आठवत नव्हतं.

“हं… मज्जा केली म्हणजे तुम्ही… सोने तुझी कधी बॅचलरेट करणार गं तुम्ही… मला इतकी इच्छा आहे ना अशी सगळी दंगामस्ती करायची तुमच्याबरोबर”

“आई… कुणाच्या बॅचलर पार्टीला त्यांच्या आया जात नाहीत”

“ठीकेय… मला नका घेऊ पण करा गं लवकरात लवकर”

“लग्न तरी ठरू दे ना आई… का आधीच करू पार्टी?” सोनी आता थोडीशी वैतागली होती.

“मग काय आम्ही हात धरलाय तुझा? ठरव ना… आज त्या निशांतला भेटणारेस ना? चांगला वाटतोय मला तो मुलगा. दिसायला चांगला आहे. बाकी बॅकग्राऊंड तर अगदी तुला सूट होणारं आहे.” आई सोनीच्या वाटीत वरण वाढत म्हणाली.

“हो आई… भेटते आणि मग बोलूया ह्यावर”

“हं… जेवा” आई बाकीची भांडी आवरू लागली.

“तुम्ही नाही जेवणारेय?”

“आम्ही दोघांनी मगाशीच गरम गरम खाऊन घेतलं आणि श्रेयस मित्रांबरोबर गेलाय. ओट्यावर दूध आहे बघ तुला हवं असलं तर” असं म्हणून आई ‘डान्स के बाप’ बघायला गेली.

सोनीने जेवता जेवता मोबाईल उघडून व्हाट्सऍपवर कालच्या पार्टीचे अपडेट्स मागायला सुरुवात केली.

४ वाजले तेव्हा तिला फोन आला.

“हे… हाय”
“हो… हो… हां त्याच रोडवरचं CCD. येस. मी five-fifteen पर्यंत पोहचेन.”

बापरे… तिने फोन ठेवला आणि मोठ्ठा श्वास घेतला. पट्कन केस मागे बांधले. चेहरा धुतला. लाल टॉप आणि ब्लॅक पॅन्ट अंगात चढवली. उजवी प्रोफाइल, डावी प्रोफाइल, समोरून एकदा असं फिरून बघितलं. श्या… हा फारच बॅगी दिसतोय. मग तो काढून तिने डार्क ब्लू वाला टॉप घातला. ह्यावर मॅचिंग आयलायनर छान दिसेल. मग तिने ते ब्लु आयलायनर कपाटात १० मिनिट शोधलं. एक-एक डोळा हाताने झाकून ते डोळ्यांच्या वर लावलं. मग चेहऱ्याची उजवी, डावी, समोरून प्रोफाइल बघितली. फारच भडक वाटतंय हे आयलायनर. साधंच जाऊ आज. मागच्या वेळेस त्या सचिन लुकतुकेला फारच फॉरवर्ड वाटली होती ती.
हा विचार करून तिने ते आयलायनर पुसून टाकलं. थोडी कॉम्पॅक्ट पावडर लावली. रेड लिपस्टिक फक्त लाइटली ओठांवर टेकवली. फारच लाईट झालं म्हणून अजून एकदा टेकवली. केसांवरून ब्रश फिरवला. छोट्या इअररिंग्स घातल्या. एकदा सगळ्या बाजूने प्रोफाइल बघून घेतली. तिने मोबाईलवर बघितलं. ऑलरेडीच पाच वाजले होते.

“आई… मी निघतेय गं” ती चप्पल चढवत म्हणाली.

“अगं अगं… थांब.” आई किचनमधून अक्षरशः पळत बाहेर आली. “बघू काय घातलंय?” असं म्हणून तिने वरून खालपर्यंत बघून घेतलं. मग जरा केस कानामागे सारले. टॉप थोडा वर घेतला. “हं… छान वाटतंय. जा आता. आणि खुशखबर घेऊनच ये” आई कौतुकाने तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली.

“निघू का आता?” सोनी डोळे फिरवत म्हणाली. फटाफट पायऱ्या उतरून ती पार्किंग मध्ये गेली. स्कुटीला टांग मारून CCD कडे निघाली.

भाग-२

“हे बघ… माझा फंडा सिम्पल आहे. कुठलीही गोष्ट पूर्ण पारखून घ्यायची. मग नंतर पश्चाताप होत नाही. म्हणजे गाडी घेताना कसं आपण फुल्ल Specifications वगैरे बघतो. एकीला दुसरीशी कम्पेअर करतो. हिचा रंग मस्त शायनी आहे. तिचा पिकअप स्मूथ आहे. तिचं मायलेज चांगलं आहे म्हणजे लॉन्ग रनला बरी पडते. आणि तसं बघितलंस तर मुली तरी गाडीपेक्षा वेगळ्या काय असतात ना. रंग, मायलेज, पिकअप, स्मूथनेस, फील… यु नो व्हॉट आय मीन!” ह्या शेवटच्या वाक्यावर त्याने डोळा मारला.

सोनीला समोरच्या खुर्चीवर बसून ५ मिनिटंही झाली नव्हती अजून. ती त्याच्या तोंडाकडेच बघत राहिली.

“काय झालं? कसला विचार करतेयस?”

“अं… काही नाही”

“I know, असं होऊ शकतं. मला अनुभव आहे तसा आधीपण” त्याने विकेड स्माईल दिली.

“कसला?” आपण खूप वेळ गप्प बसलोय हे लक्षात येऊन सोनीने त्याला प्रश्न केला.

“असंच… अगं मुली अश्याच बघत राहतात मी बोलायला लागलो की. चार्म असतो असा एकेकाकडे”

“हा मूर्ख काय बरळतोय! असं म्हणून बघत असतात त्या” सोनी मनात म्हणाली. बाहेर तिने फक्त “हेहे” केलं.

“बाय द वे… काय घेणार प्यायला? तुझी वाट बघून बघून मला तहान लागली.”

“सॉरी हं… किती वेळापासून बसलायस तू?”

“१० मिनिटं झाली असतील तरी”

“ओह…”

“Anyway… मी फ्रॅप्पे सांगतोय? तुला?”

“उं… cappuccino चालेल”

तो काउंटर वर गेला. त्याने गडद जांभळ्या रंगाचा पार्टी वेअर शर्ट घातला होता. तसा चांगला दिसत होता त्याला तो शर्ट. सोनी एका हातावर हनुवटी ठेवून त्याला मागून ऑब्सर्व्ह करत होती. तो पटकन मागे वळला आणि सोनीने पट्कन मान फिरवली. आईगं! लचकली… सोनी मानेला एका हाताने धरून पुढे बघत बसली. तो येऊन बसला तसं हळूहळू मानेवरचा हात तिने खाली घेतला.

घरचे काय काय करतात? शिक्षण कुठून झालं? सोनीला बारावीला किती टक्के मिळाले? कॉलेजमध्ये किती टक्के मिळाले? मग सोनीचं तिच्या कंपनीत सिलेक्शन कसं झालं? ह्याआधी बॉयफ्रेंड होता का?… असे सगळे प्रश्न आणि सोनीची त्यावरची उत्तरं झाली. मग त्याने स्वतः ह्या प्रश्नांची उत्तरं सांगायला सुरुवात केली. त्याला दहावी-बारावी-इंजिनीरिंग ला किती टक्के होते. त्याचं कॅम्पस सिलेक्शन कसं झालं. त्याच्याकडे कशा ४ ऑफर्स होत्या. मग त्याने हीच कंपनी कशासाठी निवडली. त्याला ह्याआधी एक गर्लफ्रेंड होती. पण त्याच्यामते करिअरला जास्त महत्व होतं. त्यामुळे ते जास्त सिरिअस नव्हते… आपली कर्म कहाणी सांगून झाल्यावर त्याने कॉफीचा ग्लास तोंडाला लावला. एक मोठ्ठा सिप घेऊन तो खाली ठेवला. टिशू-पेपरने ओठांवरचा फेस पुसला आणि तिच्याकडे बघितलं.

“तुझी कॉफी तू पीतच नाहीयेस अगं. थंड झाली असेल ती आता. कोल्ड कॉफीच झाली ती आता हॅहॅ!” इतका वेळ फक्त त्याच्या चेहऱ्याकडे डोळे फाकवून बघणारी सोनी अचानक भानावर आली.

“मग? तू काय बघतेस मुलांमध्ये?” त्याने प्रश्न केला.

“मी… मी… अं….”

“अगं तू अजून ठरवलं नाहीयेस, तुला कसला मुलगा पाहिजे??” त्याने डोळे फाकवत विचारलं.

पुन्हा तोच प्रश्न… सगळ्यांचा हाच प्रश्न. सोनीला उगाच डोकं जड झाल्यासारखं वाटलं. उचंबळून येतंय असं वाटू लागलं. पण स्वतःला सावरत ती म्हणाली,

“मला असा मुलगा माझा पार्टनर म्हणून हवाय जो मला समजून घेईल”

“कायय?” त्याने एकता कपूर सीरिअल मधला अभिनय केला. मग खूप हसून घेतलं, “अगं काही काय बोलतेस तू? कित्ती व्हेग अपेक्षा आहे ही?? तुला कसं कळणारेय एका भेटीत कोण तुला समजून घेऊ शकतं?”

सोनीला आपण काहीतरीच बोललो असं वाटू लागलं. ती गप्प झाली आणि खाली कॉफीच्या मगमध्ये बघत राहिली.

“तू ना थोडा विचार कर घरी जाऊन. कसं होतं… आपण इतकं unclear असलो की समोरच्या माणसाला त्याची value केल्यासारखं वाटत नाही. I am not saying it is totally wrong. बट यु नो व्हॉट आय मीन!”

“अं… आय एम सॉरी” तिचा चेहरा एकदम पडला.

“Hey… डोन्ट बी… इट्स ऑल राईट. होतं असं कधी कधी. बघ मी माझ्या बाजूने सांगायचं म्हणलं तर यु आर ग्रेट. तू छान दिसतेस. यु आर मेनटेन्ड टू… बस्स व्हॉट यु लॅक इज maturity. सो मला वाटतं आपण नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा तू थोडा विचार केलेला असशील. आत्ता मला जरा डिनरला एका ठिकाणी जायचंय, सो निघावं लागेल”

“Oh… ओके!” तिने कॉफी मगवरून नजर काढून त्याच्याकडे बघितलं.

“इट वॉज नाईस टॉकिंग टू यु मिस सुनहरी” त्याने हात पुढे केला. हॅन्डशेक करता करता म्हणाला, “बाय द वे… तुझं नाव मस्त युनिक आहे हं. त्यामागची स्टोरी आपण पुढच्या भेटीत डिस्कस करू. Bye!”

“Bye!” तिने शक्य तेवढं चेहऱ्यावर हसू आणलं.

कॉफी शॉप मधून बाहेर पडून दोघे आपापल्या गाडीकडे गेले. एकदाही न वळून पाहता सोनीने गाडीचा स्टार्टर मारला आणि विरुद्ध दिशेला निघाली.

तिथून डायरेक्ट ती निरूच्या घरी गेली. बेल वाजवल्यावर मात्र तिला वाटू लागलं, ‘मी फोन तरी करायला हवा होता. ती आता महेशला भेटायला गेली असेल तर?’

पण दार निरालीनेच उघडलं.

भाग ३

“थँक गॉड निरू तू घरी आहेस.” असं म्हणून ती आत शिरली. चप्पल काढून किचनमध्ये जाऊन तिने पाण्याचा ग्लास घटाघट प्यायला.

“हाय सोनी… काय गं कुठनं आलीस एवढ्या गडबडीत?” निरूच्या आईने TVचा आवाज कमी करत विचारलं.

“हाय काकू… निरू चल ना एक मिनिट” काकूंच्या प्रश्नाचं उत्तर न देताच ती निरुला घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेली.

“अगं… काय झालंय काय?” निरालीने बेडवर बसत विचारलं.

“बास झालंय. मला हे सगळंच बास झालंय.” सोनी डोकं धरत म्हणाली.

निरूने डोक्यावर हात मारून घेतला. “आता ह्या मुलाचा काय प्रॉब्लेम झाला?”

“प्रॉब्लेम त्यांच्यात नाहीये गं. माझ्यात आहे. मीच unclear आहे. Confused आहे. काही होणार नाहीए माझं.”

“अगं…”

“हो. हा काय म्हणतो मला, एका भेटीत कसं कळणार तुला… तुला कोण समजून घेऊ शकतं की नाही.”

“बरोबरच आहे ना मग त्याचं!”

“तू त्याला का डिफेन्ड करतेयस, माझी मैत्रीण आहेस कि त्याची??” सोनी चिडून उठून उभी राहिली.

“सॉरी सॉरी… बरं नाव काय होतं ह्याचं?”

“निशांत देशमुख”

“हं… कंट्रीमाऊथ!”

“काही पण फालतू जोक मारू नकोस.” सोनी हसू लपवत म्हणाली.

“दिसतो कसा बघू?” निरूने सोनीचं व्हॉटसऍप उघडून त्याचा dp चेक केला. “बरा आहे तसा! काय म्हणत काय होता?”

“म्हणे मुलगी आणि गाडीमध्ये काय फरक असतो? रंग, मायलेज, पिकअप, स्मूथनेस, फील… यु नो व्हॉट आय मीन!” डोळा मारायचा चुकीचा प्रयत्न करून सोनीने त्याची मिमिक्री केली. ह्यावर निराली जोरजोरात हसत सुटली.

“हसतेयस काय… माझे बारा वाजलेयत आता. परत घरी जाऊन आई- बाबा डोकं खाणारेत. “ह्या मुलात काय वाईट होतं? चांगला जॉब आहे, पुण्यात फ्लॅट आहे, एकुलता एक आहे… वगैरे वगैरे… आता काय सांगू ह्यांना?”

“त्यानेच रिजेक्ट केलं म्हणून सांग ना”

“आणि का रिजेक्ट केलं?”

“मी त्याला unclear वाटले. त्याच्या type ची नाही वाटले”

“का? असं काय बोललीस तू?”

“हं… कळला तुझा मुद्दा” निरू संभाषण तोडत म्हणाली. “म्हणजे तुझ्याकडे काही एक कारण नाहीए ह्या मुलाला रिजेक्ट करण्याचं. पण तरी तुला आगाऊपणा करायचा आहे, तर आता तो निभवायचा कसा?” हनुवटीखाली हात ठेऊन ती विचार करू लागली.

“जाऊ दे. सध्या मी सांगते… त्यानं नेक्स्ट मीटिंग साठी बोलावलंय… तेव्हा डिसाईड करू म्हणाला!” सोनी स्वतःवर खुश होऊन म्हणाली.

“छान…! पण सोनू… तरी हा प्रश्न राहतोच ना गं? तुला कसला मुलगा हवाय?”

“तू आता सुरु नको होऊ गं. मला नाहीए माहिती ही गोष्ट. आणि मला विचार पण नाही करायचाय.” कपाळाला आठ्या घालत सोनी बोलली. “बरं… तुझं काय? कधी डेट ठरली एंगेजमेंट ची?”

“बघू… पुढचे २-३ महिने तरी नको म्हणून सांगितलंय मी महेशला.”

“तुझं बरं आहे बाबा… सगळं रेडी आहे.”

“बरं ऐक ना… तू ते नवीन ‘ट्रिपलिंग’ सिरीयल बघितलंस का?” निरूने पटकन विषय बदलला. मग त्यानंतर पाऊण तास रँडम गोष्टींवर त्यांनी गप्पा मारल्या आणि सोनी तिथून निघाली.

गाडीवरून जाता जाता ती विचार करू लागली. यार खरं तर चांगला आहे कि मुलगा. दिसायला तर स्मार्ट आहे. बॅकग्राऊंड तर एकदम सूट होणारी आहे. त्याच्या घरचे, माझ्या घरचे साधारण एकाच लेवलचे आहेत. इन फॅक्ट त्याचे तर बाबा इंजिनीअर आहेत. मग काय होतंय यार… आवडला का नाही आपल्याला. कसा आवडणार? किती ऍटिट्यूड मारत होता. म्हणे १० मिनिट लेट झाला. मग?? इथे बॉयफ्रेंडला अर्धा अर्धा तास वाट बघायला लावतात मुली. हो… पण तो बॉयफ्रेंड नाहीए ना. लग्नासाठी स्थळ बघायला आलाय. बरोबर आहे मग. पण तरी यार… गाडी आणि बायको ते काय ते… ‘पिक अप, स्मूथनेस आणि फील’ बघून घेणार म्हणे. बायको काय विकतची वस्तू आहे का? आणि मेन्टेनन्स ला आली की काय….? माहेरी रिपेअर करायला सोडणार का? हाहा… सोनीला स्वतःच्याच विनोदावर हसू आलं.

एवढा विचार करेपर्यंत ती घरी पोहचली. तिच्या पोटात खड्डा पडला. बापरे आईबाबांना आता काहीतरी सांगावं लागणार. तिने हळूच दार उघडलं. आई बाबा दोघंही TV बघण्यात गुंग होते. तिने हळूच चप्पल काढली आणि मांजर पावलाने आत जाऊ लागली.

“सोनू… आलीस गं तू?” आई सोफ्यावर बसूनच म्हणाली.

सोनीने सुस्कारा सोडला आणि मागे वळली. “हो… जस्ट आले”

“मग आत कुठे चाललीस. ये कि… सांग काय काय झालं.”

“उं… काही नाही… त्याला थोडी घाई होती तर तो पुन्हा एकदा भेटूया म्हणाला” सोनी नजर चुकवत उगाचच किचनमध्ये गेली.

“हो… पण तुला कसा वाटला ते तरी सांग?”

“मला ओके वाटला…” परत खाली बघत सोनी म्हणाली.

“ओके काय असतं? आवडला की नाही आवडला?” बाबांनी विचारलं.

बाबांनी विचारलं म्हणल्यावर सोनी थोडी चपापली. त्यांच्याकडे बघून लगेच दुसरीकडे बघत म्हणाली, “नाही… म्हणजे मला आवडला… आता त्याचं काय म्हणणं आहे ते दुसऱ्या भेटीत कळणार आहे.”

“ठीक आहे… कधी आहे दुसरी भेट?” बाबांनी पुन्हा आपल्या जड आवाजात विचारलं.

“उं… तो संध्याकाळी मेसेज करतो म्हणाला आहे.”

“चालेल चालेल… ठीकेय नंतर बोलूया जेवणाच्या वेळी. तो गाण्याचा कार्यक्रम सुरु होतोय आता.” एवढं म्हणून आईने डोळे मिचकावून ‘आत जा’ असा इशारा केला.

सोनी पट्कन आपल्या रूममध्ये गेली. तिच्या डेस्कटॉपवर श्रेयस गेम खेळत बसला होता.

“उठ… मला बसायचंय”

श्रेयसने हेडफोन्स लावले होते आणि हिटमॅन खेळण्यात तो गुंग होता. सोनीने त्याचे हेडफोन्स खसकन खाली घेतले. आणि घुश्श्यात म्हणाली, “उठ… मला बसायचंय”

“काय??” वैतागून त्याने विचारलं. “काय करायचंय तुला?”

“मला ते नवीन सिरिअल बघायचंय…”

“मग लॅपटॉप वर बघ ना…”

“मला इथेच बघायचंय”

“You are just too much!” श्रेयस रागाने उठला, त्याने आपला गेम बंद केला. “लवकर लग्न करून जात का नाहीस तू? डोक्याला शॉट लावत असतेस सारखी”

“तुला डोकं आहे का त्याला शॉट लागायला…” उगाचच टेबलावरचं पेन स्टॅन्ड आपटून ठेवत सोनी म्हणाली.

“इर्रिटेटींग आहेस तू…. म्हणूनच तुला कोणी मुलगा पसंद नाही करत”

“तू फार स्वतःला शहाणा समजायला लागलायस… अजून एक शब्द बोललास ना… तर…” हात उगारत सोनी म्हणाली खरं… पण तिचा आवाज जड झाला.

ती पटकन बाथरूम मध्ये निघून गेली. आरशात तिने स्वतःला बघितलं. डोळ्यात थोडंसं पाणी साठलं होतं. काय प्रॉब्लेम आहे आपल्यात. घरचे पण लगेच परकी असल्यासारखं वागू लागलेयत. जाऊ दे, ह्याला आता ‘हो’च म्हणून टाकते. निघून जाते फायनली इथून. तिने आवंढा गिळला. हातावर फेसवॉश पसरवलं आणि तोंडाला खसा खसा लावलं. चेहरा धुवून तिने आरशात बघितलं. अचानक तिला लक्षात आलं की हा आरसा कित्ती जुना आहे. सातवीत असताना आणलेला. त्याच्या वरच्या कोपऱ्याला “लेडी बग”चं चित्र, खाली सामान ठेवायला दोन कप्पे. अर्थात आता ती फक्त त्यात ब्रश ठेवते. बाकी सामान ठेवायला दुसरं कॅबिनेट बनवून घेतलं त्यालाच ८ वर्षं झाली. पण हा आरसा कसा टिकून राहिलाय. तिने बाहेरून पेपर आणला आणि आरसा पाणी मारून साफ केला. स्वतःची स्वच्छ प्रतिमा बघून तिला छान वाटलं.

बाहेर येऊन ती खुर्चीवर बसली. हेडफोन्स लावले आणि युट्यूब उघडलं. “ट्रीपलिंग” असं सर्च केलं. मान तिरकी करून स्क्रीनकडे बघितलं. टॅब बंद करून टाकला आणि हार्डडिस्क मधला “फ्रेंड्स” चा “The one with thanksgiving flashback” एपिसोड लावला. त्यानंतर जवळ जवळ तासभर तिच्या खोलीतून फक्त अधूनमधून खिदळण्याचे आवाज येऊ लागले.

आईने येऊन खांद्याला हलवलं तेव्हा तिला लक्षात आलं की जेवणाची वेळ झालीय.

डायनिंग टेबलवर सगळे तिची वाट बघत बसले होते. आपली खुर्ची ओढून ती बसली आणि खाली बघून तिने पटापट जेवायला सुरुवात केली. आई-बाबांची नजरानजर झाली. बाबांनी ‘तूच विचार’ असा इशारा केला.

“हं… काय काय झालं आज तिकडे मग?”

ह्यावर सोनी बोललीच नाही. ती खाली बघून एका मागोमाग एक घास ठोसत चालली होती.

“सोनू?”

“आँ… मला विचारतेयस होय… मला वाटलं श्रेयसशी बोलतेयस”

“हो त्याच्या फुटबॉल प्रॅक्टिसपेक्षा महत्वाचा विषय ‘हा’ आहे.. किनई?”

“काही नाही… जनरल बॅकग्राऊंड चेक वगैरे. तो बराच हुशार आहे. सातवीत स्कॉलरशिप मिळाली होती त्याला. मग कॅम्पस प्लेसमेंटला पण २-३ ऑफर्स होत्या वगैरे.”

“वाह… मस्तच. आणि शिवाय घर-बीर पण चांगलं सेटल्ड आहे ना?”

“हो त्यानं सांगितलं त्यावरून तरी वाटतंय तसं…”

“रंग, उंची वगैरे? तुला सूट होण्यासारखं आहे ना?”

“हो आहे…” तोंडात भाताचा मोठ्ठा घास कोंबत सोनी म्हणाली.

“होउदे बाबा गजानना…” आईने उगाचच डाव्या हाताने डोक्याला आणि छातीला अनुक्रमे हात लावला.

“आई… तू पण ना… too much आहेस. एका भेटीत कोण कसं ठरवेल पुढे जायचं की नाही? I know… मुलींच्या समोर मुलं एकतर chicken-out होतात नाहीतर उगाच शायनिंग मारतात फर्स्ट मीट मध्ये… त्यामुळं चिल्ल! नेक्स्ट टाइम तो थोडा नॅचरल बोलेल… तेव्हा ठरवू आपण होऊ दे की नाही.” श्रेयस बोलला आणि त्याने सोनीकडे बघितलं. सोनीला बरं वाटलं होतं पण मगाशीच्या भांडणांनंतर तिला लगेच त्याच्याशी चांगलं वागायचं नव्हतं, त्यामुळे तिने नुसतीच छोटी स्माईल दिली आणि पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

“हो रे… आता काय मी लगेच हार-अक्षता घेऊन नाही आलेय. फक्त आपली इच्छा व्यक्त केली.”

“दादा… तुम्ही फार शहाणे होताय… निकाल कधी आहे परीक्षेचा? आहेत का काही चान्सेस पुढं ऍडमिशन मिळण्याचे?” बाबांनी मोर्चा श्रेयसकडे वळवला.

“अरे यार मी गप्प तोंड बंद ठेऊन का जेवत नाही…” श्रेयस डोक्याला हात मारून घेत म्हणाला.
“निकाल काय लागेल… ऍडमिशन काय मिळेल… पण असा फॅमिली टाइम नंतर कधी मिळेल? म्हणून आपण जेवताना चांगल्या विषयावर गप्पा मारल्या पाहिजेत. जसं की जेवणानंतर आपण कुठलं आईस्क्रीम आणूया… हॅहॅहॅ…” असं म्हणत त्याने आईकडं टाळी मागितली. पण आईने ‘फटका देईन’ अशी ऍक्शन करून दाखवली. सोनी फिदीफिदी हसू लागली आणि टेबलावर वातावरण नॉर्मल झालं.

भाग ४

सोनीने फोन उघडला आणि ‘जीवनसाथी.कॉमचं ‘पॉप-अप आलं. ‘महिन्दर सिंग सेंट यू रिक्वेस्ट’. हे मूर्ख जीवनसाथीवाले… ह्यांना कळत नाही का? मी क्रायटेरिया टाकलाय ना तिथे. कोणी पण पंजाबी-बिंजाबी लोकांना कसं काय दिसतं माझं प्रोफाइल. तिने app उघडून रिक्वेस्ट रिजेक्ट करून टाकली. फोन गादीवर फेकला आणि ‘फ्रेंड्स’ चा अर्धा राहिलेला एपिसोड बघायला सुरुवात केली.

आईच्या जोरजोरात हाका ऐकून सोनी सकाळी बेडवर उठून बसली. किलकिले डोळे करून तिने मोबाईलमध्ये बघितलं. ७ वाजले होते. डोळे झाकून ती नुसतीच बसून राहिली. आईची पुन्हा एक हाक आली, ह्यावेळेस तिने पूर्ण नावाने हाक मारली. त्यामुळे सोनीने अंगावरचं पांघरूण फेकलं आणि दार उघडून बाहेर गेली.

“उठलेय मी” म्हणून आईला सांगितलं आणि ब्रश करायला आत आली. ८.३० वाजता ‘रेडी’ होऊन किचनमध्ये आली.

आज मावशींनी परत भेंडी बनवली होती. काय Mondayलाच मावशी मूड खराब करून टाकतात. कढईमधला उपमा सोनीने प्लेटमध्ये वाढून घेतला आणि कॉफीचा कप घेऊन टेबलवर बसली. इंस्टाग्रामवर स्क्रोल करत खाऊ लागली.

“फोन ठेव तो खाली आणि लक्ष देऊन खा” आई अचानकच कुठल्यातरी खोलीतून ओरडली. मग तिने समोरचा उपमा गपागपा गिळला. कॉफी घटाघट प्यायली. खपाखप डब्बा भरला आणि झपाझप बॅग उचलून निघाली.

आज १० वाजता Monday Morning Meet म्हणजेच (अनिमेशच्या भाषेत) M-cube होती. १० वाजून १० मिनिटांनी ती मीटिंगला पोहचली अनिमेश सोडून बाकी कोणीही अजून मीटिंग रूममध्ये पोहचलं नव्हतं.

“सॉरी अनिमेश… आय गॉट स्टक इन ट्रॅफिक”

“गुड मॉर्निंग मॅडमजी… नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम… वैसे भी लोग टाइमपे कहाँ आते हैं! हम मॅनेजर लोगोंका कामही यही है. आप लोगोंका वेट करना…”

सोनी खाली बघत पुढे गेली आणि एक खुर्ची ओढून बसली. तिने बॅगमधून लॅपटॉप बाहेर काढला आणि आऊटलुक उघडलं. फ्रायडेच्या डिलिव्हरीवर जवळ जवळ १० मेल्स आले होते. तिचा हात आपोआपच डोक्याकडे गेला आणि ती डोकं चोळत चोळत मेल्स वाचू लागली.

“क्या हुआsss? सर दुख रहा है क्या?”

“आं… नही नही…” सोनीने पटकन हात खाली घेतला. १०.३० वाजले तसे एकेक करून लोक येऊ लागले. रूम भरली. आणि अनिमेशनं आपला लॅपटॉप प्रोजेक्टरला जोडला. त्यानंतर अर्धा तास तो काय बोलत होता हे तिथल्या कुणालाही विचारलं असतं तर त्यांना उत्तर आलं नसतं.

“सुनहरी… अब आप आपके वो टीम गेम वाले आयडिया का अपडेट दे दो.”

आपलं नाव घेतल्यावर सोनी थोडीशी दचकली. तिने इकडे-तिकडे बघितलं की ते कोणी नोटीस केलं का… तर आकाश तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता.

“येस अनिमेश…” तिने स्वतःला सावरलं आणि ती म्हणाली, “As we know, we have some initiatives going on for team building in other project teams, I and Animesh were thinking की अपने टीम मे भी ऐसे ऍक्टिव्हिटीज स्टार्ट कर दे.”

“या… या… तो हम इस फ्रायडेसे वीकली मीटिंग रखेंगे और कुछ फन ऍक्टिव्हिटी करेंगे. मिता और सुनहरी ये ऍक्टिव्हिटीज तुम लोग डिसाईड करोगे.” अनिमेश बोलला

मीटिंग संपून सगळे डिस्पर्स झाले. सोनी आपल्या जागेवर जाऊन वस्तू मांडू लागली. दोघे-तिघे तिच्या डेस्कजवळ आले,

“यार कौन बोलता है तुम्हे ऐसे फालतूके मीटिंग्स ऍड करनेको”

“हां नही तो क्या… जैसे कुछ काम ही नही है!”

“सुहनरी मॅडम… आधीच इथं कामाचा मूड नसतोय सकाळी… तुम्ही त्यात गेम खेळा…”

“But…. ये मेरा आयडिया नही….” सोनी काही बोलायच्या आत ते निघून गेले.

थोड्यावेळात मिता आणि आकाश तिच्याजवळ आले.

“कितना सोती है तू?” आकाश हसत हसत म्हणाला.

“मैं सो नही रही थी… चूप बैठो” सोनीने डोळे मोठठे करून त्याला दटावलं.

“क्या करना है वो टीम गेम्स का रे? मेरा तो ऐसे किसीमे दिमाग ही नही चलता…” मिता मान चोळत म्हणाली.

“मैं थोडी देरमे आती हूं तुम्हारे डेस्क पे….” असं म्हणून तिने दोघांना पिटाळलं. त्यानंतर तिने जे लॅपटॉपमध्ये डोकं घातलं ते डायरेक्ट जेवणाच्या वेळीच वर काढलं.

सोनीने निरुला सेमटाईमवर मेसेज केला. तिचा बराच वेळ रिप्लाय येईना म्हणल्यावर ती उठली आणि कॅफेटेरियामध्ये डब्बा घेऊन गेली. आकाश, मिता, क्रिश्ना, मोहिनी, शिवीका सगळे जण एक टेबल धरून बसले होते.

“डब्बा मे क्या लाया तुने?” क्रिश्ना आपल्या साऊथ इंडियन हिंदीत बोलला.

“भेंडी लाया है” सोनीने महाराष्ट्रीयन हिंदीत उत्तर दिलं.

“हम्म….” क्रिश्ना सोडून सगळ्यांनी नापसंती दर्शवली. क्रिश्नाने मात्र “जल्दी खोल ना” म्हणून डब्बा हिसकावून घेतला.

पहिला घास घेण्याआधीच सोनीने सांगायला सुरुवात केली, “अरे Saturday को ना हम सब लोग, हमारी एक श्वेता फ्रेंड है ना उसकी बॅचलरेटको गये थे क्या…बहोत मजा किया… रेडिओ लगाया था और वो मिर्ची पे पुराने गाने लगते है ना… उसपे डान्स कर रहे थे…” इतरांनी उगाचच ऐकत असल्याचं दाखवून “हॅहॅहॅ” केलं.

“तू सचमे इंदौरमे पैदा हुई थी?” असं म्हणत आकाशने तिच्या हिंदीची खिल्ली उडवली.

“अरे… हम भी पार्टी के लिये गये थे… सॉल्ट बार मे. One of our friends had her b’day. अँड देअर ना… देअर वॉज धिस गाssय. Who वॉज टोटली मारोफायिंग लाईन ऑन मी हां. तो व्हॉट वी डिड…” मिताने आपल्या लेट नाईट पार्टीचं आणखी एक नवीन प्रकरण सांगायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी तिकडे कान टवकारले. तोपर्यंत निरू टेबलाजवळ आली. “झालं का हिचं सुरु…” अशी दोघींची नजरानजर झाली.

“फिर तो उसकी इतनी ली ना हमने… बेचारा इसके बाद बहोत सोचेगा किसको ड्रिंक ऑफर करना है… ह्ह्ह्ह” असं म्हणत मिताने टाळी साठी हात पुढे केला आणि दोन-तीन हात पुढे आले. सोनीने निरूकडे पाहिलं… निरूने “जाऊ दे. तू खा…” असा इशारा केला.

जेवण संपवून सोनी लगेचच डेस्कवर गेली. तिने लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. ती कॉन्सन्ट्रेट करून एक्सेल शीट मध्ये डेटा भरत होती तितक्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. तिने नोटिफिकेशन्स मध्ये बघितलं. ५ व्हाट्सऍप मेसेजेस आले होते. तिने तिथेच नाव बघितलं. ‘राजेंद्र जोगाईकर.’ तिने फोन पालथा घातला आणि पुन्हा कामाला लागली.

भाग ५

राजेंद्र जोगाईकर ‘शादी.कॉम’वर भेटला. “हाय… आय लाईक युअर प्रोफाइल. वूड लाईक टू नो यु मोअर” असा त्याचा मेसेज आला होता. सोनीच्या आईने TVवरची जाहिरात पाहून नुकतंच तिला ते ऍप्प डाउनलोड करायला लावलं होतं. गॉगल घातलेला त्याचा फोटो बघून सोनीला तो “बऱ्यापैकी बरा” वाटला. तिने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. लगेच त्याचा व्हाट्सऍपवर मेसेज आला.

“हाय…”

“हाय…”

“धिस इज राजेंद्र… हाऊ आर यु?”

असं थोडं इंट्रोडक्शन झाल्यावर “लेट्स मीट सून” ह्यावर त्यादिवशीचं चॅट संपलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा ‘Good Morning Beautiful!’ असा मेसेज आला. सोनीने त्यावर एक ‘स्माईल करणारा स्माईली’ पाठवला. त्या आठवड्यात त्यांचं बरंच चॅटिंग चाललं. राजेंद्रचे बाबा गावाकडच्या एका शिक्षणसंस्थेचे संस्थापक असल्यामुळे त्यांच्या घरात नेहमी शिक्षणाचं महत्व राहिलेलं आहे. त्यामुळे राजेंद्रने चांगल्या कॉलेज मधून MSc आणि मग MBA केलं. आता एका प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत तो मार्केटिंग dept. मध्ये काम करतो. राजेंद्रने स्वतः इकडे सिटीमध्ये फ्लॅट घेतला. बाबा डाउन पेमेंट करतो म्हणाले तरी त्याने ते घेतले नाहीत. कारण त्यांनी इतके वर्ष आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या तर आता अजून कशाला त्रास द्यायचा. त्यामुळे बाबांनी त्याच पैशांची ह्याच्या नावे गावाकडे जमीन घेऊन ठेवली. त्यांचा गावाकडे मोठा वाडा आहे, म्हणून इथे त्याने १ BHKच घेतला. आई खूप काळजी करत असते. ‘आमच्या राजाला लवकर मुलगी मिळू दे’ म्हणून तिने देवाला नवस पण केलाय. म्हणून ती रोज १ किलोमीटर चालत जाऊन गणपतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून येते. खरंतर आईला एक मुलगी हवी होती, पण दुसरा सुद्धा मुलगाच झाला. ‘वीरेंद्र’, राजेंद्रचा छोटा भाऊ. त्यामुळं आता सुनेच्या रूपात मुलगी मिळावी अशी तिची खूप इच्छा आहे.

“तू तर माझ्या आईला खूपच आवडशील” इराणी चहाचा कप खाली ठेवत तो म्हणाला. एक आठवड्याच्या चॅटिंग नंतर ते फायनली भेटले होते.

“का बरं?” असं म्हणून तिने मस्का लावलेल्या जॅम-ब्रेडचा तुकडा तोडला.

“तू परफ़ेक्ट बायको मटेरिअल आहेस रे. सॉरी हं… म्हणजे ते असं आपण मित्रा-मित्रांमध्ये बोलत असतो ना… तेच शब्द निघाले. म्हणजे मला म्हणायचंय की तू छान आहेस. दिसायला तर beautiful आहेसच. प्लस बोलायला पण कित्ती स्वीट आहेस.”

“ऐक ना… पण मला गावाकडे वगैरे राहायची सवय नाहीए हं. आय कान्ट स्टे देअर फॉर मोर दॅन अ वीक”

“होहोहोहो… ते मला वाटलंच होतं. आणि तेच मी तुला सांगतोय. आपण तिकडे फक्त सणाला वगैरे जायचं आहे. आणि असं काही गाव गाव नाहीए रे. माझं घर जिथे आहे तो एरिया तर एकदम फॉरवर्ड आहे. आणि डोन्ट वरी मी आईला ऑलरेडी कल्पना दिली आहे ह्या गोष्टीची. तुझ्या आधीच्या काही मुलींची पण हीच डिमांड होती”

“सॉरी… I didn’t mean to disrespect you. जस्ट एक क्लॅरिफाय केलं”

“नो प्रॉब्स रे… मला तुझी हीच quality आवडते… तू किती स्वीट आहेस. एकदम गुलकंदच!” ह्या त्याच्या वाक्यावर सोनीला खरंखरं हसू आलं. तेवढ्यात वेटरने येऊन बिल दिलं.

ते पार्किंग मध्ये गेले. “तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू?”

“हा कसा प्रश्न असू शकतो???” असा सोनीने डोक्यात विचार केला पण तिने बाहेर नुसतंच “सांग ना” म्हणलं.

“तू फोटोमधल्या पेक्षा रिअल मध्ये खूप सेक्सी दिसतेस रे. आणि आज मला काय झोप येणार नाही असं दिसतंय” त्याने तिला पूर्णपणे न्याहाळून घेतलं आणि मान हलवली. सोनी ह्यावर नुसतंच खाली बघून हसली आणि थोडीशी चलबिचल झाली.

रात्री ११ वाजता त्याचा मेसेज आला.

“बघ ना रे… हे काय आम्ही उशी जवळ घेऊन झोपायचं? अशी नाही झोप लागत आता.”

“व्हॉट्ट?” असा सोनीला रिप्लाय करावा वाटत होता. पण तिने नुसताच ‘स्माईल करणारा स्माईली’ पाठवला.

“मी आता ह्या उशीलाच ‘सुनहरी’ इमॅजिन करतो. आणि…”

“आणि काय?”

“आणि काय… एवढी पण इनोसंट बनू नकोस.”

“मी काहीतरी वेगळंच इमॅजिन करण्याआधी सांग बाबा…”

“काही नाही रे… फक्त जवळ घेऊन झोपतो. घट्ट असं. जरा गाल घासत…”

“काहीही…”

“खरंच अरे… बघ आता मी असं घट्ट धरलंय तुला छातीशी…”

“गप्प बस रे”

“आणि बघ मी उशीला असं कुरवाळतोय…”

“बास…”

“ghasalgas toyu tuls”

“हे काय टाईप केलंयस…?” सोनीच्या ह्या प्रश्नावर बऱ्याच वेळाने त्याचं उत्तर आलं,
“अगं घाम आला होता.” पण सोनी तोपर्यंत झोपून गेली होती.

सकाळी उठून तिने मेसेज पाहिला. पण त्याचा अर्थ तिला दुपारी काम करता करता अचानक लागला. त्यानंतर सोनीने जरा चॅटिंग कमीच केलं. “गुड मॉर्निंग शुगर प्लम” किंवा “मिसिंग यु माय लाईफ” किंवा “आय वॉन्ट यु, राईट हिअर राईट नाऊ” अशा इमेजेस तो पाठवत असायचा. त्याने पुन्हा भेटायला बोलावलं पण सोनीने दरवेळी काहीतरी कारण काढून ते पुढं ढकललं. एक दिवस त्याचा अचानक फोन आला.

“हाय डिअर”

“हे… हाय! कसा काय फोन केलास?”

“काय अरे… तू काय भेटत नाहीस. मग मीच आलो तुला भेटायला”

“म्हणजे?”

“अरे म्हणजे मी तुझ्या कंपनीच्या खाली आलोय…”

“का???”

“का? म्हणजे काय? तुला भेटायला”

“पण माझी मीटिंग आहे १५ मिनीटांनी. आणि ती तासभर चालेल”

“ठीक आहे… मी थांबतो ना इथल्या KFC मध्ये”

“अरे… पण कशासाठी वेळ घालवतोयस? ह्या वीकएंडला भेटूया ना आपण…” आता मात्र सोनी थोडीशी अस्वस्थ व्हायला लागली होती.

“नाही… आज तर मी तुला बघितल्याशिवाय जाणारच नाही. मला खूप दिवसांपासून तुला बघायची इच्छा होतेय. मी थांबलोय इथे KFC मध्ये. ये तुझं झालं की”

ह्यावर मात्र सोनीला फार राग आला. एकतर हा मुलगा न सांगता आला. त्यानंतर आता हिची इच्छा नसतानाही त्याला भेटावं लागणार. काय कॉलेजमध्ये आहे काय? लहान मुलांसारखं. डायरेक्ट येऊन बसायचं म्हणजे काय? नसता गळेपडूपणा. व्हॉट द हेल! अरे… हा काय समजतो स्वतःला. ह्याने ये म्हणलं की मी भेटायला जायचं का? मला नाहीए इच्छा. आणि एखादं माणूस आपल्याला अव्हॉइड करतंय म्हणल्यावर कळायला नको का?

पूर्ण मीटिंगभर सोनी ह्याच गोष्टीचा विचार करत राहिली आणि तिचं डोकं तापत राहिलं.

मीटिंग संपवून ती कंपनी जवळच्या KFC मध्ये गेली. ती आत शिरली तसा तो उठून जवळ आला. त्याने “मी तुला कित्ती मिस केलं यार…” असं म्हणून तिला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला पण ती पटकन मागे झाली. त्यानंतर पुढचा अर्धा-पाऊण तास त्याला “नाही”म्हणून कसं सांगू? ह्याचा विचार करत ती बसून राहिली आणि तो तिची कौतुकं करत राहिला आणि तिच्याशिवाय त्याचं आयुष्य कसं निरर्थक आहे हे हरप्रकारे सांगत राहिला.

सोनी निघताना एवढंच म्हणाली, “हे बघ राजेंद्र… आय डोन्ट थिंक आय एम रेडी फॉर मॅरेज… सो मला तुला ताटकळत ठेवायचं नाहीए. यु कॅन प्लिज मूव्ह ऑन.”

त्या दिवसानंतर जवळ जवळ दोन महिने झाले तरी त्याचा रोज “गुड मॉर्निंग ब्युटीफुल” आणि जास्त इमोशनल झाला असेल तर… “का रे… तू का मला असं त्रास देते आहेस.” किंवा “फक्त एकदा भेट ना” किंवा “आपण फक्त फ्रेंड्स राहूया रे…” किंवा “तू फक्त एकदा हो म्हण…” वगैरे, वगैरे मेसेज येत राहतात.

आज देखील असाच कचरा असणार हे जाणून तिने फोन पालथा घातला आणि कामाला लागली.

भाग ६

निशांत देशमुखला भेटून २ आठवडे झाले. मागच्या वीकेंडला आईने “तो देशमुख का कोण तो… भेटणार होता त्याचं काय झालं” असं विचारल्यावर सोनीने घाईघाईत “त्याला बरं नाहीए म्हणत होता. So may be नेक्स्ट सॅटर्डे भेटू” असं सांगितलं होतं. आणि संध्याकाळी “मला बरं वाटत नाहीए, आपण पुढच्या शनिवारी भेटू” असा निशांतला मेसेज केला होता. त्यामुळे उद्या त्याला भेटणं भाग होतं. व्हाट्सऍप वर संध्याकाळी ४ वाजताची वेळ देखील ठरली होती. “ह्यावेळेस लेट करू नकोस” असा मेसेज त्याने २ वेळा पाठवला होता.

सोनी रात्री पांघरुणात शिरून वरच्या भिंतीवर चमकणाऱ्या ताऱ्यांकडे बघून विचार करत होती. ते तारे तिने कॉलेज मध्ये असताना बाबांना स्टूलवर उभे करून त्यांच्याकडून लावून घेतले होते. आता जरा त्यांची चमक कमी आली होती. पण तरी त्यांच्याकडे बघून तिला छान वाटतं. तिच्या पॅरलल लावलेल्या बेडवर अजून श्रेयस आला नव्हता. तो हॉलमध्ये रात्री वेळपर्यंत कानाला हेडफोन्स लावून काहीतरी करत राहतो. तो आता १२-१ नंतरच येईल. ह्या निशांतचं काय करायचं? काय माहित आपल्याला काय त्याच्या फर्स्ट इम्प्रेशन नंतर सेकंड मीटिंग करावी असं वाटत नाहीए. पण नाहीए इतका काही वाईट. थोडासा ओव्हरस्मार्ट बनायचा प्रयत्न करत होता. पण बाकी सगळं नीट आहे. आणि पहिल्या भेटीत श्रेयस म्हणाला तसं सगळीच मुलं शायनिंग मारायचा प्रयत्न करतात ना. त्यामुळे ह्या भेटीत तो कसा वागतोय ह्यावर ठरवू पुढे काय करायचं.

पण… पण ह्याच्याबद्दल तसं अट्रॅक्शनच वाटत नाही. असं वाटलं पाहिजे ना… ह्याला परत परत भेटावं… सारखं सारखं बोलावं… तसं नाही वाटत. आणि तसं नाही वाटलं तर काय उपयोग आहे. तो ‘मायकल स्कॉफिल्ड’ तर चोर आहे माहित असून ती ‘सारा’ त्याच्यावर लाईन मारायची. का नाही मारणार… बोलण्यात कसला चार्म आहे. आणि उगाच शो ऑफ नाही. असं वाटतं की बोलत राहावं. एकदम क्लोज्ड बुक आहे तो. माझं हे माझं ते… असं नाही. आणि स्वतःचा प्लॅन खड्ड्यात घालून जातो बिचारा तिला वाचवायला. केवढ्या लोकांची जबाबदारी एकट्याने उचलतो. त्याच्यावर कुठली गोष्ट टाकली ना की ती done आहे. असाच कोणीतरी पाहिजे यार. म्हणजे ना बघितल्यावर तर पहिल्या नजरेतच असं एकदम गुदगुल्याच व्हाव्या… आणि बोलू लागला तर नुसतं त्या आवाजाशिवाय दुसरं काही ऐकूच नये. आणि तो जवळ असला की आपल्याला कसलीच चिंता नसावी. त्याने त्याच्या गहिऱ्या डोळ्यांनी नुसतं एकदा प्रेमानं बघावं, आपण हातातलं सगळं काम टाकून त्याच्या मिठीत शिरून एकदम पिल्लू होऊन जावं… हाह…! तिने पांघरूण घट्ट जवळ घेत सुस्कारा सोडला. आणि स्वतःच्या चॉइसवर स्वतःशीच स्माईल करत स्वप्नात गडप झाली.

शनिवारी नेहमीप्रमाणे ८ वाजता डोळे उघडून ९ वाजेपर्यंत लोळून मग उठली. मधल्या वेळेत “Wentworth Miller” ला गूगल वर स्टॉक केलं. “अर्रे यार… हा पण गे! आपल्याला नॉर्मल मुलं कशी काय आवडत नाहीत. त्या Matt Bomer साठी ती “White Collar” बघायला सुरु केली आणि तो पण तसाच निघाला.आपल्यातच फॉल्ट आहे की काय? असा विचार करून ती पटकन उठून स्वतःला आरशात बघू लागली. मान इकडे-तिकडे करून तिने बघितलं. अचानक तिच्या लक्षात आलं की आपण कमरेवर हात ठेऊन स्वतःलाच आरशात बघतोय आणि ते पण आपण स्ट्रेट आहोत की नाही हे चेक करायला… तिला फिस्सकन हसू फुटलं. मग तिने स्वतःचीच समजूत घातली… आपल्याला ते प्ले करतात ते कॅरेक्टर्स आवडतात गं. म्हणजे असा एखादा स्ट्रेट मुलगा मिळाला तर आपण जीव ओवाळून टाकू. स्वतःच्याच कॉउंसेलिंग वर तिने डोकं हलवून अग्रीमेंट केलं आणि आळोखे- पिळोखे देत बाथरूम मध्ये गेली. मग नित्यनेमाचे कार्यक्रम उरकता-उरकता तिने पाणीप्रश्नावर विचार केला, मग आजकाल कसे पाण्यात क्षार वाढले आहेत. त्यामुळे केस फार गळू लागले आहेत. आधी आधी केसांचं टेक्श्चर कसं छान होतं. आता लगेच स्प्लिटएंड्स येतात. शीट यार! ‘हबीब’ कडे जायला हवं आज/उद्या. मस्त सेट करायला लावू ह्यावेळेस…. अशी सगळी चांगली तासभर चर्चा करून शेवटी, “ओ हबीबा… ओ हबीबा… क्यूँ तू इतनी गुमसूम है….” म्हणत कंबर हलवत हलवत बाहेर आली.

आपल्याला सोनू निगम पण चालेल असा एक पुसटसा विचार तिच्या डोक्याला शिवला तोच “ओ श्रेया घोसाळ… झाली का सकाळ? या आता…” अशी एक खणखणीत हाक किचन मधून आली.

“आई अगं… घोसाळ नाही… घो.षा.ल!”

“आता ठो.शा. लागेल. बस पट्कन… मटार सोलू लाग.”

“पण कॉफीsss” सोनीने बारीक तोंड केलं.

“हात आहेत. दूध आहे. कॉफीची बरणी कपाटात आहे.” आई मेथी निवडता निवडता म्हणाली.

“का गं माते… का अशी सकाळी सकाळी उसळली आहेस?” सोनीने उठून आईच्या गळ्यात हात टाकला.

“मी कुठे उसळली आहे? मी तर नॉर्मल बोलतेय…”

“क्या हुआ है हमारी अम्मीजान को?” Mug मध्ये कॉफी beat करत करत सोनीने प्रश्न केला.

“कुछ नही… तुम्हारी विजूआत्या आनेवाली है…”

“आईचा!” असं म्हणून सोनीने पटकन जीभ चावली. “शीट… आता?” ती मटकन खुर्चीवर बसली.

“आता काय… मेथी मटार मलाई करायला घेतलीय ना… स्पेशल डिश!”

पण सोनीला दुसऱ्याच गोष्टीमुळे पोटात गोळा आला. आता विजूआत्या आली की पुन्हा हि चर्चा चालू, काय लग्न कधी करणारे हिचं? किती वर्षं वाट बघणार अजून… झाली की मोठी… वगैरे वगैरे… काहीतरी करून पटकन पळवाट काढायला पाहिजे. आता तर कुठे जाता पण येणार नाही. तरी बरं… संध्याकाळी त्या निशांतला भेटायला जायचंय. आणि तिलाही हे एक स्थळ आहे म्हणून गप्प करता येईल.

“अगं… सोल की… आणि आज तू करायची आहेस मेथी-मटर मलाई.” आईने तंद्री तोडली.

आईचा शेवटचा फुलका डब्ब्यात पडला आणि बेल वाजली. हातातला पेपर ठेवून बाबांनी दार उघडलं.

“दादा….” म्हणून लगेच विजुआत्या लगेच पाया पडायला वाकली. बाबांनी “अगं… नको नको” म्हणत तिला उभं केलं. आत येईपर्यंत म्हणजे तिची नजर सोनीवर पडलीच.

“सोनपरी….” ८० डेसिबल मध्ये ओरडत ती टेबलापाशी आली. “कशी आहे माझी सोना???” असं म्हणून तिने गळामिठी घातली.

“हेहेहे… विजुआत्या… तू कशी आहेस!”

“मी काय गं… आता झालं माझं जुनेरं… करकरीत पैठणी तर तू आहेस!” आपल्या अनुनासिक स्वरात आत्याने जोक मारला.

“आवर्रा!” असं सोनीने मनात म्हणलं बाहेर ती फक्त हसली.

“काय गं सुलु… हिच्या चेहऱ्यावर दिवसेंदिवस ग्लो येऊ लागलाय… काय बॉयफ्रेंड वगैरे आहे वाटतं?” आईला उगाच कोपऱ्याने ढोसलत आत्या म्हणाली.

“कसलं काय हो… आम्ही तर फुल्ल परवानगी दिलीय लव्ह मॅरेजला पण हिचं काही नाहीच ना…” आईने थोडक्यात आटोपतं घेतलं.

“बरं झालं घे… आता मस्त नवरा शोधू आपण हिला. एकदम राजबिंडा… तुला उठून दिसेल असा!”

“तो काय अंगावरचा कपडा आहे? की लिपस्टिकची शेड आहे? उठून दिसायला??” सोनीने मनात जोक मारला आणि मनातच हसून घेतलं.

फुलक्यावर फुलके कोंबता कोंबता आत्याने किती मुलं बघितली, मग हा कोण… तो कोण करत उगाचंच आपल्याला त्यांची कुळी माहित असल्याचा अविर्भाव आणला. “म्हणजे आत्तापर्यंत ४ झाले… कोणीच पसंद नाही पडला का तुला?” तिने डोळे मोट्ठे करत करत विचारलं.

“अगं विजू… आत्ता कुठे सुरुवात केलीय. तिलाही जजमेंट यायला वेळ लागेल. आणि पहिले दोघे तर भेटले पण नाहीत. फोनवरच त्यांनी कुंडली जमत नाही म्हणून सांगितलं” बाबांनी सांभाळून घेतलं.

“हो हो… बरोबर आहे म्हणा. सुरुवातच आहे… पण फार अवाढव्य अपेक्षा ठेवू नकोस गं सोने… आमच्या सोसायटी मधली ती चंदना… दिसायला एकदम देखणी… पण अपेक्षा एवढ्या… वय ३२ झालंय तिचं. पण कुठं काही गाठ बसेना…”

“कशाला ही काहीतरी किडे भरवतेय आई-बाबांच्या डोक्यात आता…” विचार करता करता सोनीचा हात आपोआप डोक्याकडे गेला. तेवढ्यात आई म्हणाली, “असं काही फार अपेक्षा नाहीएत सोनीच्या. आणि आजच एका मुलाला भेटायला चाललीय. छान आहे मुलगा. घरची बॅकग्राऊंड वगैरे तर अगदी सुटेबल आहे.”

आईनं असं बोलल्यावर सोनीला थोडासा धीर आला. ती पटकन म्हणाली, “हो… ३ वाजता भेटायचं ठरलंय. बापरे २ वाजले इथंच… मला आवरून जायचंय…” तिने पटपट भात घशाखाली ढकलला. आणि “मी आवरते माझं…” म्हणून बेडरूम मध्ये निघून आली.

अर्ध्या पाऊण तासात ती बाहेर पडली. सोफ्यावर बसून गप्पा मारणाऱ्या तिघांना झटक्यात ‘बाय’ म्हणून निघाली. तिथून थेट गेली ती मॉलमध्ये. उगाच मॅकडोनाल्डमध्ये जाऊन चॉकोलेट स्मूदी घेतली आणि बसली. ३.३० वाजता निशांतचा मेसेज आला, “प्लेस??”

त्यावर सोनीने रिप्लाय केला… “सॉरी निशांत… I forgot to tell you… माझ्या फ्रेंडच्या एन्गेजमेण्टची शॉपिंग करायची आहे. सो आत्ता नाही जमणार. आपण उद्या भेटूया?” तिने फोन बाजूला ठेवून दिला आणि दोन्ही हातात डोकं धरून डोळ्यांवर हात ठेवले.

जवळ जवळ १५ मिनिटं झाली तरी फोन वाजला नाही म्हणून तिने पुन्हा व्हाट्सऍप चेक केलं. त्यानंतर ५ मिनिटांनी त्याचा मेसेज आला.

“Hi,

If you can’t respect anybody’s time, it tells a lot about your character. If you had different plans, you should have told me beforehand. I have completely lost respect for you now. It’s better if we discontinue right here.

I wish it could have ended on a better note. But this is it.”

हा मेसेज वाचून सोनीच्या पोटात जे कालावलं. शीट आपण काय मूर्खपणा केला असं वाटून तिला एकदम भीती वाटू लागली. आता घरी काय सांगणार. आई तर केवढी आशा लावून बसली होती. आता काय करू… त्याला सॉरी सॉरी मेसेज करू का? पुन्हा असं नाही होणार… लेट्स मीट… तिने टाईप केलं. पण तिला सेंड करवेना. तिने मेसेज इरेझ केला. आणि नुसतंच फोनकडे बघत बसली. थोड्यावेळाने तिने निरुला फोन लावला.

“निरू… यार मी माती खाल्लीय!”

“काय गं? काय झालं?” निरूने काळजीच्या सुरात विचारलं.

“नाही… फोनवर नाही सांगता येणार… कुठे आहेस तू?”

“मी इथे महेश बरोबर आहे गं… क्रॉसवर्ड जवळच्या एका कॅफेत.”

“हं… ठीक आहे नंतर बोलते मग मी” सोनीचा आवाज आता रडवेला झाला होता.

“अगं… थांब… येतेस का इकडे? आम्ही आहोत अजून बराच वेळ. ये पटकन बोलू.”

सोनीने फोन ठेवला आणि स्मूदी तशीच अर्धवट ठेवून कॅफेकडे निघाली.

भाग ७

“हेल्लो….” पलीकडून आवाज आला.

“उं… कोण बोलतंय?” सोनीने विचारलं.

“मी दिनेश बोलतोय.”

“अं… सॉरी मी नाही ओळखलं…”

“अहो शादी.कॉम वरून बोलतोय…”

“अच्छा… अच्छा… हां. दिनेश ऍक्चुअली मला जरा तुमच्याशी बोलायचंच होतं…”

“हो?? अरे वा…”

“तर काय झालंय मी सेटीन्ग्स मध्ये प्रोफेशन बद्दल स्पेसिफिक प्रेफरेन्सेस टाकले आहेत. पण तरी मला खूप वेगळ्या वेगळ्या लोकांचे रिक्वेस्ट येत राहतात… त्याचं काय करताय तुम्ही?”

“अहो नाही नाही…. मी शादी.कॉममध्ये काम नाही करत… मला तुमचा तिथून नंबर मिळाला.”

“ओह… सॉरी हां… पण मला तुमची प्रोफाइल बघितल्याचं आठवत नाही… तुम्ही रिक्वेस्ट पाठवलीय का?”

“नाहीsss… मी शादी.कॉम ची प्रिमिअम सर्विस घेतलीय ना… तर मी तुमचा नंबर बघू शकतो…”

“व्हॉट द हेल!” असा सोनीने मनात म्हणलं. फोनवर तिने, “ठीकेय बोला…” म्हणलं.

“हां… तुम्ही IT सेक्टर मध्ये काम करता ना?”

“हो…”

“पप्पा काय करतात तुमचे?”

“बाबा बँकेत हेड आहेत.”

“हां… काय पगार मिळतो तुम्हाला? इन हॅन्ड?”

“अं…” सोनीने थोडावेळ विचार केला, हा काय प्रश्न आहे असा… मग तिने आहे त्या पगारापेक्षा थोडा कमी सांगितला, “तरी अराऊंड 40K मिळतात.”

“चाळीस हजार…. हां चांगलं आहे की…
हे बघा… तुमचा ४० हजार… माझा २५ हजार.. म्हणजे झालं ६५ हजार… होतंय की तेवढ्यात आपलं.”

सोनीला थोडावेळ कळलंच नाही की त्याने कसला हिशेब केला. त्याची बडबड चालू होती तोपर्यंत सोनी त्याच वाक्यावर विचार करत राहिली. मग तिला कळालं, की पट्ठ्याचा पगार २५ हजार आहे आणि तिच्या पगारात तो घर चालेल म्हणतोय. ती नुसतीच गप्प राहिली. काहीतरी ५-७ मिनिटं त्यानेच बडबड केली… नंतर “हेलो… हेलो… आवाज येत नाही काय??” असं जोर जोरात ओरडून त्यानेच फोन ठेवून दिला.

सोनी मटकन गादीवर बसली आणि त्याच्या धाडसाचं तिला कौतुक वाटून ती स्वतःशीच हसू लागली.

निशांत देशमुखवर पडदा टाकून, तरी पंधरा दिवस होत आले. अजून तरी आई-बाबांचं टुमणं सुरु झालं नव्हतं.

त्यादिवशी सोनी निरू आणि महेशला भेटायला गेली आणि टेन्शनमध्ये तिला रडूच फुटलं. निरूने चांगली तासभर समजूत घातली. “त्याच्या घरच्यांना एक दुसरी मुलगी आवडली आहे असं तो म्हणत होता… त्यामुळे माझे चान्सेस कमी आहेत. तो पुढच्या आठवड्यात काय ते सांगेल” हे आई-बाबांना सांगायची तीनवेळा रिहर्सल करून झाली. रात्री मात्र आईचा चेहरा फारच उतरला होता. तेव्हा बाबाच म्हणाले, “काही नाही बेटा… जो होता है अच्छे के लिए होता है! तसं पण तुला तो ‘ओके’च वाटला होता ना… ओके वाटलेल्यावर कशाला सेटल व्हायचं, आवड्लेल्यावर व्हायचं… हो की नाही सुलु” असं म्हणून त्यांनी जेव्हा आईच्या गळ्यात हात टाकला तेव्हा कुठे आई हसली. आणि सोनीला हायसं वाटलं.

‘दिनेश’च्या एकूणच ‘अप्रोच’वर हसून झाल्यावर सोनीने फेसबुक उघडलं. ‘स्नेहा खरात गॉट एंगेज्ड विथ मिहीर देसाई’ अशी पहिलीच पोस्ट न्यूज फीड मध्ये आली. झालं… हे फेसबुक तरी डिलीटच करून टाकलं पाहिजे असं म्हणून तिने पुढे स्क्रोल केलं. एक “Cute Puppies” चा विडिओ सुरु झाला. ‘ऑ…कित्ती क्युट…ऑ… कसलं गोड आहे हे…’ असं करत करत ती एकावर एक ४-५ व्हिडिओज बघत राहिली.

टुणून!

मेसेज आला. अक्षय विचारत होता, “हे… व्हॉट इज अप?”

“नथिंग”

“अगं… काहीतरी करत जा!”

“बोललास! करतेय काहीतरी… to be specific, क्युट पप्पीज चे व्हिडीओज बघतेय”

“वाह वाह… हे म्हणजे खरंच ‘काहीतरीच’ करतेयस तू”

“तुला काय हवंय? का मेसेज केलास?”

“काही नाही… सहजच मेसेज केला… म्हणलं सोनाबाईंशी बोललो नाही इतक्या दिवसांत…”

“बर्र्र्र!”

“हो गं… बरं… काय पुढचा विचार?”

“कसला???”

“शिक्षण… लग्न…”

“दोन्हीपण नाही करायचंय! झालं?”

“अरे बापरे… ब्रह्मकुमारीच व्हायला चालला तुम्ही”

“का रे बाबा त्रास देतोयस??” सोनीने वैतागून रिप्लाय केला.

हा अक्षय तसा चांगला आहे. मागच्या वर्षी MBA करायला मुंबईला गेला. २ वर्षं नोकरी करता करता अभ्यास पण केला. दिसायला सावळा आहे थोडा… पण स्मार्ट राहतो. कॉलेजमध्ये पण खूप ऍक्टिव्ह होता. निरू -महेश आपल्या बरोबरच सारखे असायचे… पण छुपे रुस्तम निघाले चांगलेच. अक्षय आणि आपल्यात कधीच काय स्पार्क वगैरे कसा काय उडाला नाही? — कसा उडणार!? माझी नुसती खेचत तर असतो कुजकट कुठला.

शी… आजकाल तर आपण म्हणजे जिथे तिथे ‘डोरे डालायला’ बघतोय. असू देत चांगला मित्र आहे. तसाच राहू देत. स्वतःच्याच विचारांवर तिने फडकं फिरवलं. तोपर्यंत त्याचा अजून एक मेसेज आला,
“ऐक ना… तुझ्या त्या फेसबुकमधल्या फोटोत रिसेंटली एक मुलगी सारखी दिसतेय बघ… नाव काय तिचं?”

“कोण?”

“मिता वर्मा…”

“भिकारी…. आलास ना लाईनवर… तिचीच माहिती काढायची होती ना तुला?? म्हणून मला मेसेज केलास ना?? जा बोलू नकोस आता…”

“हाहाहा… अगं ह्या वीकनंतर १५ दिवस सुट्टी आहे… पुण्याला राम्याकडे चार दिवस थांबणार होतो… म्हणलं जरा ओळखी वाढव्यात. wink wink

“खड्ड्यात जा… बाय!”

“अगं… अगं… बरं तिच्याशी नको भेटवू…. तू तर भेटशील?”

“जा मला नाही वेळ….”

असं करत बराच वेळ त्यांची व्हाट्सऍप – वादावादी चालली.

“उद्या मीटिंग आहे मला. सकाळी लवकर… झोपते…” ह्या नंतर सुद्धा ‘ऑफिसमध्ये कसा माकडपणा चालू असतो. दर सेमिस्टरला कशी फाटत असते. वेगळीकडे जॉब बघतेय पण सध्या मंदी चालू आहे असं म्हणतायत. हे वर्ष प्लेसमेंटचं आहे, चांगलीच लागणार आहे. पण पॅकेज चांगलं मिळेल ना रे. लोन पण तेवढंच झालंय गं.’ असं करत करत बराच वेळ गप्पा चालल्या. सोनीचा मधेच कधीतरी डोळा लागला.

भाग ८

“आज जल्दी आ गयी तुम?” आकाश सोनीच्या डेस्कजवळ येऊन म्हणाला.

“हां… यार कल मेरा Tech Review है. मेरी तो लगने वाली है.” सोनी डोकं चोळत म्हणाली.

“क्यूँ? कुछ रह गया है क्या?”

“नही… काम सब हो गया है… लेकिन ये प्रेझेंटेशन का ही मुझे टेन्शन आ रहा है. मुझे लगता है की मै कुछ बोल ही नही पाऊंगी… और वो पॅट्रिक और ये सब लोग मुझपे हंसेंगे. और फिर मुझे अप्रूव्हल भी नही मिलेगा… और मुझे जल्दी ही टर्मिनेशन मिलेगा”

तिची नॉनस्टॉप वाक्यं ऐकून आकाश डोकं हलवत म्हणाला, “शांत गदाधारी भीम शांत…”

त्याच्याकडे बघून टेन्शनमध्ये देखील सोनीला हसू फुटलं. ती म्हणाली, “परत परत…”

“मतलब?”

“म्हणजे फिर से करो…”

“क्या?”

“वो गदाधारी भीम वाला…”

“हाहा…. शांत गदाधारी भीम… शांत” त्याने परत डोकं हलवत हलवत ते वाक्य म्हणलं. त्यावर सोनी पुन्हा हसली.

“कुछ नही होगा… चलो हम देखते हैं तुम्हारा ppt”

“सॉरी… मै तुम्हारा टाइम तो नही ले रही ना… देखो… नही तो मै अनिमेश से करा लुंगी”

“ओय लुंगी… मैने खुदसे बोला ना देखते हैं… तुम्हे मुझसे ज्यादा अनिमेश पे भरोसा है तो कर लो…”

“सॉरी सॉरी… नही नही कर लेते हैं”

मग दोघेजण मीटिंग रूम मध्ये गेले. आकाशने pptचा कायापालट केला. सोनी नुसतीच बघत राहिली.

“ठीक है… तुम अब ये इमेजेस पे एक्सप्लेन करना. स्लाईड मे ज्यादा टेक्स्ट अच्छा नही लगता…”

“आकाश…” सोनी रडवेल्या आवाजात म्हणाली, “मुझे और टेन्शन आ रहा है अब”

आकाश तिला म्हणाला, “लंबी साँस लो…” सोनी नुसतीच बारीक तोंड करून बघत बसली. “लो…” आकाश पुन्हा म्हणाला. तिने मोठ्ठा श्वास घेतला. “और एक बार…” तिने पुन्हा एक मोठा श्वास घेतला.

“अब ऐसे हात रख के बोलो… ऑल इज वेल… ऑल इज वेल” त्याने आमिर खानची ऍक्शन केली. त्याच्याकडे बघून सोनी छोटंसं हसली.

“अब तुम ये मेरे सामने प्रेझेंट करोगी… और जब तक तुम्हे कॉन्फिडन्स नही आता तब तक हम यहांसे बाहर नही जायेंगे… ठीक है?”

त्यावर सोनी काही बोलणार तेवढ्यात तो म्हणाला, “मेरा काम मै मॅनेज कर लुंगा… तुम्हारा जो बाकी है वो तुम शामको स्ट्रेच करके कर लेना.”

“ओके…” म्हणून सोनीने डोकं हलवलं आणि ती ppt उघडून बोलू लागली.

ते त्या मीटिंग रूम मधून दोन तासांनी बाहेर पडले.

“आकाश… थँक यू व्हेरी मच!”

“थँक यू, व्यंक्यू छोडो… कल तुम्हारा review होनेके बाद तुम ट्रीट देना…”

“पक्का…”

दुसऱ्या दिवशी गेल्यावर सोनी review meeting च्या तयारीत लागली. तिने अजून डेटा टाकला. आकाशने सांगितलेल्या फॉरमॅट मध्ये बाकी ppt एडिट केला. मग अनिमेशकडून नावापुरता ppt review करून घेतला. त्याने दिलेल्या सजेशन्सला तिने फक्त डोकं हलवलं. संध्याकाळी मिटींगच्या वेळेस तिने अनिमेश कडे बघून ना बघीतल्यासारखं केलं आणि प्रेझेंटेशन सुरु केलं.

संध्याकाळी जवळ जवळ सगळेजण गेले होते पण आकाश थांबला होता. सोनी ह्या कानापासून त्या कानापर्यन्त हसत हसत मीटिंग रूम मधून बाहेर आली.

“आssकाश… अच्छा हुआ… मुझे अप्रूव्हल भी मिला… पॅट्रिकने praise भी किया…” सोनी जवळ जवळ पळत त्याच्या डेस्कपाशी गेली

“Congratulations!” आकाशने देखील मोठी स्माईल दिली.

“हेहे… अब चलो… कहाँ जाना है?”

“टपरी पे? मुझे तो चाय भी चलेगा…”

“कुछ भी… No way! We are going some place nice… मै घर पे कॉल करके बोलती हूँ के मै डिनर के लिये नही हूँ…”

“अरे वाह… चलो फिर… तुम जहाँ ले चलोगी वहां जायेंगे” आकाश आपली बॅग भरत म्हणाला.

ऑफिसच्या जवळच असलेल्या ‘मोझार्ट’ मध्ये दोघे जाऊन बसले. काय काय ऑर्डर करायची ही चर्चा झाली आणि आकाशने ऑर्डर दिली.

“तो बॉसजी क्या बोले ppt देख के?” आकाशने विचारलं.

“हम्म… वो तो कुछ भी बोलते है यार… यहां ऍनिमेशन डालो… हाहा… एक इमेजको तो उन्होने वो बाऊन्सिंग वाला ऍनिमेशन डाला. मैने वो सारा एडिट बाद मे हटा दिया. उसीमे कितना टाईम चला गया.”

“वो आदमी जरा… खिसकेला है!” त्याने डोक्याला बोट लावून screw फिरवला.

“हाहाहा… ये जब बोलते हैं तब मुझे लगता है, वो US वाले लॉग म्यूट पर रखके हसते होंगे”

“लास्ट इयर वो अपना US टीम के साथ इंट्रोडक्शन था… उसने ‘hobbies & interest’ वाली स्लाईड मे ‘डान्सिंग विथ फॅमिली’ करके फोटो डाला था. इतना चू..” आकाशने मधेच बोलणं थांबवलं.

“हाहाहा… code of conduct आकाश…”

“हाहा… तो वो फोटो देख के मुझे इतनी हसी आ रही थी के मै उठके बाहर चला गया. और उसकी खिचने के लिये, सब कुछ खतम होने के बाद मैने उससे बोला, की सर… वो डान्स वाली फोटो कमाल थी… तो साला १० मिनिट उसने अपना वो डान्स का व्हिडीओ ढुंढा और दिखाया. मेरी तो इतनी वाट लाग रही थी… हंस भी नही सकता था, जा भी नही सकता था…”

“बापरे I can only imagine… मै तो ऐसे मामले मे बहोत खराब हुं. मुझे तो अपनी हसी दबाने ही नही आती. मुझे कॉलेजमे कितनी बार क्लास से निकाला गया है. वो भी निरु के वजह से. वो पागल कुछ भी जोक करती थी.”

“रिअली? मुझे तो लगता था तुम सबसे सिन्सिअर स्टुडंट रही होगी.”

“कुछ भी… मै कौन से अँगलसे सिन्सिअर लगती हूँ? हां काम का टेन्शन आ जाता है मुझे. लेकिन पढाई वगैरे के बारे मे मै तो चिल थी”

“आय डोन्ट बिलिव्ह यू!”

“अरे सचमे… मै और निरू कॉलेज बंक करके महेशके यहां चले जाते थे और मुव्हीज देखते थे, FRIENDS तो हमारा फेवरीट पास-टाईम था”

“FRIENDS तो अभीभी मेरा फेवरीट पास टाईम है. हू डू यू लाईक द मोस्ट?” आकाशने मंचुरियन तोंडात टाकत विचारलं.

“अं… I can’t choose one of them.”

“अरे … there has to be someone you like the most… I am sure you like Joey, you are just not admitting it.”

“नो… आय मीन आय लव्ह जोई. लेकिन किसी एक को मै अपना फेवरीट नही बना सकती. मुझे हमेशा ऐसे लगता है के it wouldn’t be fair to other characters.”

“हेहे… मेरी तो ‘Phoebe’ सबसे फेवरीट है. She is crazy, has weird beliefs, her stories are the funniest. And she is so street-smart. I mean if I was to get lost on an island with one character our of all these series, I wouldn’t at all worry if it’s Phoebe. I even wouldn’t mind if I die because of her stupidity.”

“Wow…” सोनी हसत हसत म्हणाली, “इन दॅट केस, आय विल चूज ‘मायकल स्कॉफील्ड’ फ्रॉम ‘Prison Break’…”

“कुछ भी… छी…”

“हॉ… व्हाय??”

“वो आदमी तो पागल ही लगता है मुझे. वो सिरीजही पागल है… इट’स जस्ट इम्प्रॅक्टिकल!” आकाशने जोरजोरात नापसंती दर्शवली.

“huh! तो फ्रेंड्स प्रॅक्टिकल है क्या?”

“नो… इट्स नॉट! लेकिन उसका genre ही कॉमेडी है ना…”

“हां ना… तो सीरिज, मुव्हीज… इम्प्रॅक्टिकलही होते हैं…”

“नॉट जस्ट द प्रॅक्टिकॅलिटी रे… मुझे वो सबकुछ हजम ही नही होता. एक तो वो अपने भाई को बचाने वहां गया है. उसका भाई कोई दूध का धुला भी नही है. और वो एक एपिसोडमे ‘लिंकन’ के बेटे के माँ और स्टेप-डॅड को brutally मारते हैं ना… उसपे तो इतना गुस्सा आया मुझे. डायरेक्टर की मा-बहन निकली थी मुहसे. तबसे मैने देखना छोड दिया.”

“हं…”सोनीने खाली बघत मान हलवली.

“क्या हं? खतम बात?” आकाश हसत म्हणाला. “ठीक है बाबा… ‘मायकल स्कॉफिल्ड’ अच्छा है, उसका सडू भाई भी अच्छा है… वो बुढा डीन भी… “

“गप्प बस…” सोनी स्वतःशीच हसत म्हणाली.

“मतलब?”

“मतलब चूप हो जाओ.”

“ओके. ठीक है. तुम बोलो. मै सुनता हूँ.” असं म्हणून त्याने हाताची घडी घातली.

“वो खाओ सामनेका. हात मत बांध के बैठो.”

“हेहे… तुम्हारी हिंदी funny है.”

“हां ना… बहोत छोटी थी, तभी इंदौर छोडा था.”

“कितनी छोटी थी?”

“स्कूल भी नही जाती थी…”

“हेहे… तो क्यूँ बताती रहती है सबको… कि इंदौरमे पैदा हुई थी?”

“सबको कहां बताती हूँ… तुम्हे बताया था क्यूँ की तुम नॉर्थ से हो.”

“इंदौर MP मे है!”

“तुम क्यूँ मुझे चिढा रहे हो?” सोनी फुरंगटून म्हणाली. सोनीचा चेहरा बघून आकाश हसू लागला.

वेटरने येऊन टेबल रिकामं केलं आणि Ice-cream bowl सोनीसमोर ठेऊन गेला. सोनीने bowl आकाशकडे सरकवला आणि त्यालाही एक चमचा दिला. थंडगार मँगो आईस्क्रीमचा एक घास तोंडात घालणार तेवढ्यात तिचा फोन वाजला. जीवनसाथी.कॉम चं पॉप-अप आलं होतं. ‘गणेश कीर्तने सेंट यू रिक्वेस्ट.’

“मुझे अभी ये जीवनसाथी से मूड खराब नही करना…” सोनीने फोन पालथा घातला.

“तुम्हारा भी प्रोफाइल है क्या उसपे?”आकाशने विचारलं

“हां… तुम्हारा भी है क्या?”

“हां ना… मेरी बहन ने जबरदस्ती निकलवाया था…” आकाश डोक्यावर हात मारून म्हणाला.

“दिखाओ, दिखाओ…”

“तुम पहले अपना दिखाओ.”

“मेरा कुछ नही… Expectations मे ‘इंजिनीअर चाहिये, हमारी कास्ट का चाहिये, लोकेशन- पुणे प्रिफरेबल’”

“और डिस्क्रिपशन मे कुछ नही लिखा?”

“ना… सोनी नाक मुरडत म्हणाली “Description मे कौन लिखते बैठेगा… लोग description पढते भी है क्या?”

“ऐसा है क्या… तो डिलिट करना पडेगा” आकाशने आपला फोन काढला आणि काहीतरी करू लागला.

“नो…. मुझे पहले दिखाओ…”

“तुम हसोगी मुझपे.” आकाश फोन टेबलाखाली लपवत म्हणाला.

“नही… ऐसे नही कर सकते तुम… मेरा सुन लिया ना… अब तुम्हारा दिखाओ”

“ठीक है… मन मे पढ लेना, कुछ भी मत कहना और चुपचाप वापस देना”

“ओके…” सोनीने त्याचा फोन घेतला आणि वाचू लागली.

‘I come from a simple middle-class family. I am fondly called Chashmish because I have 3 and 3.5 numbers for left and right eyes. Though I wear specs, I have clear views about the girl I want to marry.

First of all, she should be crazy enough to choose me.

Second, when I will crack a stupid joke, she should laugh, because my sense of humour sucks.

And when I see her laughing I should feel like, if this is not life, then what is?’

फोन खाली ठेवून सोनी जोर-जोरात हसत सुटली. तोंडावर हात ठेवून हसत बसली.

“अब बस भी यार… कितना हसोगी मुझपे…” आकाश खाली बघत म्हणाला

“आकाश… ऐसे कौन लिखता है… दॅट वॉज अ नाईस पोएम. But who writes it on Matrimony website??” सोनी आपलं हसू कंट्रोल करत म्हणाली.

आकाशने फोन काढून घेतला, खिशात टाकला आणि वॉलेट बाहेर काढलं.

“अब चुपचाप खाओ और चलो” त्याने तिला दटावलं आणि वेटरकडे बिल मागवलं.

“अरे तुम क्यूँ वॉलेट निकाल रहे हो. चूप बैठो” सोनी घाईघाईत आपली पर्स काढत म्हणाली.

पैसे देऊन, बडीशेप खाऊन ते बाहेर आले. सोनीला खूप दिवसांनी आज फ्रेश वाटलं. तिला आकाशला सांगावं वाटलं, की ‘She had a great time!’ पण मग तिला वाटलं उगाच ‘नसते सिग्नल्स’ नको जायला. गाडीपाशी गेल्यावर सोनीने वेळ बघायला फोन काढला. तेवढ्यात एक G-mail चं नोटिफिकेशन आलं,

‘Nikhil Ballal: Sunahari, I found you on LinkedIn’

“व्हॉट!!! इज इट हिम?” ती स्वतःशीच मोठ्याने बोलली.

आकाशने विचारलं, “क्या हुआ?”

“कुछ नही” तिने फोनमध्येच बघत उत्तर दिलं आणि LinkedIn च्या लिंक वर क्लीक केलं. पण आकाश तिथे आहे हे लक्षात घेऊन फोन खिशात ठेवला. त्याला ‘बाय-बाय’ करून, ती स्कुटीला टांग मारून घराकडे निघाली. तिला आज उगाचच हलकं-हलकं वाटत होतं.

भाग ९

शनिवारच्या मस्त दुपारी सोनी बेडवर लोळत ‘अगाथा ख्रिस्तीचं’ Sleeping Murder वाचत होती. आई बाहेरच्या खोलीत जोरजोरात हसून मीनूमावशी बरोबर काहीतरी बोलत होती. मधेच एकदम खुसफूस करत होती. मग परत हसत होती. शेवटी तिचा फोन बंद झाला. आणि ती सोनीच्या खोलीचं दार ढकलून आत आली. सोनीने पुस्तक ठेवलं आणि उठून बसत विचारलं, “काय आई? मीनूमावशीनं आता कुठलं स्थळ काढलं?”

“अगं… चोरून ऐकत होतीस की काय आमचं बोलणं?”

“चोरून कशाला ऐकावं लागेल… ८० डेसिबल मध्ये बोलत होतीस तू”

“असू दे. बरं ऐक… खरंच चांगलं स्थळ काढलंय गं तिने”

“आई… आपण हे स्थळ- स्थळ म्हणायचं बंद करूया का? असं वाटतं ना… की घर खरेदी साठी चाललोय.” सोनी कपाळाला आठ्या घालत म्हणाली.

“बरं बाई… नको म्हणायला स्थळ. पण खरंच चांगला मुलगा आहे. सिद्धार्थ नाव आहे.”

“आणि आडनाव?”

“मालपेकर”

“खाल्ली माती…”

“आँ?” आईने दटावून बघितलं.

“काही नाही, काही नाही… हा पुढे…”

“मुंबईकर आहे. म्हणजे पुण्यात जॉबला आहे. सिमेन की सिमॅंटेक कुठेतरी.”

“आई, सीमेन्स!”

“हां… तेच ते काहीतरी. इंजिनिअरच आहे. पॅकेज 15 लाख आहे म्हणतात. घरचे मुंबईला असतात. मुंबईत अंधेरी ईस्टला फ्लॅट आहे. आणि पुण्यात पण इकडे वारजेला फ्लॅट आहे. मीनू फोटो पाठवतेय म्हणाली व्हाट्सऍपवर”

“पाठवले की सांग” असं म्हणून सोनी पुस्तक घेऊ लागली तेवढ्यात आईचा आणि तिचा दोघींचाही फोन आळीपाळीने वाजला.

मीनूमावशीने ‘फॅब-फॅमिली’ ग्रुप वर फोटो टाकले होते.

“What the hell!!” सोनी जवळ जवळ किंचाळली, “तू काय सगळ्यांना सांगत सुटलीस का आई?”

“अगं…” आई जरा गडबडली “नाही बाई… मी तिला माझ्या अकाउंटवर पाठवयला सांगितलं होतं. तिने चुकून ग्रुपवर पाठवलं वाटतं.”

“च्… आता सगळेजण शंभर प्रश्न विचारत बसतील. च्… इर्रिटेट!”

“तू शांत हो बघू जरा… मी बोलते सगळ्यांशी. आणि आपलेच लोक आहेत ग्रुपवर. तुझ्या विजुआत्यासारखं नाहीए कोणी.”

“ठीक आहे. झालंय तुझं? वाचू मी आता?”

“चिडचिड नको गं करू. मी सगळ्यांना मेसेज करून सांगते… ग्रुपवर काही चर्चा करू नका म्हणून… हे बघ… मावशीचाच आला ग्रुपवर मेसेज. ‘सॉरी रॉंग ग्रुप’…”

“छान! म्हणजे अजून लोकांचं अटेन्शन मिळू देत!” सोनीने सुस्कारा सोडला, तिचा हात डोक्याकडे गेला.

“ते जाऊ दे गं सोनी. तू त्या ग्रुपकडे लक्षच नको देऊ. चल आपण फोटो बघूया.”

“माझा मूड गेलाय आई. मी नंतर बघते.” सोनी डोकं चोळत म्हणाली.

आई निघून गेल्यावर सोनीने उशीमध्ये तोंड खुपसलं. थोडावेळ तशीच पडून राहिली. तिने फेसबुकवर सर्च केलं. सिद्धार्थ मालपेकर. ४- ५ वेग-वेगळी मुलं आली. एक ‘काका’ पण दिसले. तिने मग व्हाट्सऍप उघडलं, आणि त्याचे फोटो बघितले. त्यानंतर सिमिलर दिसणारा फोटो असलेलं अकाउंट उघडलं.

चांगला दिसतोय की हा… जरा जरा कुणासारखा बरं दिसतोय… हां ‘गणेश हेगडे’. “मैं दिवाना… मैं दिवाना…” सोनीच्या डोक्यात गाणं सुरु झालं. फेसबुक बंद करून तिने YouTube उघडलं. कानात इअरफोन्स टाकले आणि ‘मैं दिवाना’ चा व्हिडीओ लावला. तो बघून झाल्यावर खाली suggestion मध्ये आलेला ‘सोनू निगमचा बिजुरिया’ लावला. मग ‘पालाश सेन’चा ‘कभी आना तू मेरी गली’ असं करत 90’s Pop बघून झालं. त्यानंतर ती झोपून गेली ते आईने चहासाठी उठवलं तेव्हाच उठली.

“आहे का आता मूड चांगला?” आईनं चहाचा कप समोर ठेवत विचारलं.

“हम्मsss आsssहं…” आळोखे-पिळोखे देत तिने जांभई दिली. “थांब मी त्याचं फेसबुक चेक करत होते.”

“हां… कर कर… मला मीनूने बायो-डेटा पण पाठवलाय”

“असा ‘बायो-डेटा’ टाईप का मुलगा आहे हा? जुनाट. आजकाल मुलं ‘आधी मुलगी बघतो’ म्हणतात.”

“चांगले संस्कार आहेत घरात ह्याचा अर्थ. आपण नाही आता लोकांना तुझा बायो-डेटा देत? मग काय तू जुनाट झालीस का?” आई जरा फणकाऱ्यातच म्हणाली.

“हम्म…” सोनीने नाक मुरडलं आणि फेसबुक उघडलं. हो बऱ्यापैकी चांगला होता दिसायला. बिल्ड पण चांगला आहे. “कॉलेज काय लिहलंय गं तुझ्या बायो-डेटात?”

“के. जे. सोमैय्या म्हणून एक आहे आणि एस.पी. जैन म्हणून MBAचं आहे बघ.”

“हो… हाच मग.”

“बघू बघू फोटो?”असं म्हणून आई एकदम सोफ्यावर तिच्यापलीकडे बसली.

“घे. बघ.” सोनीने सरळ तिच्याकडे फोन देऊन टाकला.

“हं… ह्यात चांगला दिसतोय बघ.” आई एक एक करून त्याचे प्रोफाईल पिक्चर्स बघू लागली, “हे बघ ह्यात गॉगल मध्ये तर छानच दिसतोय… हं ह्यात जरा बारीक आहे. जुना आहे वाटतं फोटो.” स्वतःशीच बोलत बोलत ती स्वाईप करत होती. “अगं बाई… हे बघ मित्रांबरोबर दारूच्या बाटल्या घेऊन बसलेला फोटो टाकलाय.” अचानकच डोळे मोठे करून ती सोनीकडे बघू लागली.

“ए आई…” असं म्हणून सोनीने फोन हातातून हिसकावून घेतला.

“अगं हे काय बरोबर वाटतं का? किती जण फेसबुक वर फोटो बघत असतात. काय वाटायचं लोकांना”

“आई… अजून जावई नाही झालाय तो तुझा. आणि हे नॉर्मल असतं आजकाल मुलांमध्ये. बरं झालं अगदीच ममा’ज बॉय नाहीए म्हणजे.”

“तुमचं काही कळतच नाही मला. हे काय… असला दारू-बिरू पिणारा पाहिजे होय तुला नवरा?” आई जरा आता सिरियसली चिडली.

“अगं आई… एकच फोटो आहे ना तसा… म्हणजे काय दारुडा झाला काय लगेच तो. कुठे तरी पार्टी मध्ये वगैरे गेला असेल, तिथला फोटो असेल ना. Not necessary he is heavy drinker!”

“बघा बाई तुमचं तुम्हीच. काय आता?” असं म्हणून आई सोफ्यावरून फणकाऱ्यात उठली.

“शांत हो गं आई… भेटल्यावर मी बोलून घेईन ना त्याच्याशी”

“हो… बोलून घेच तू. विचारून घे, सारखंच पितो का म्हणून. आणि त्याला तो फोटो पण काढायला सांग.” आई चहाचे कप विसळत म्हणाली.

सोनीला आपल्या आईवर हसू आलं. तो दारूच्या बाटल्यांसोबतचा फोटो तिने उघडून बघितला. मग एक एक करत त्याचे फोटो बघून घेतले आणि त्याला बराच वेळ फेसबुक वर स्टॉक करत बसली. सोशिअली बराच ऍक्टिव्ह आहे हा सिद्धार्थ. हं… 90’s इंडिपॉप ह्याला पण आवडतं वाटतं. हा काय निबंध लिहलाय… ओह… पॉलिटिकल मतं-बीतं आहेत ह्याला. बापरे फारच इंग्लिश लिहलंय काहीतरी. हे काय आहे, अच्छा… ‘A Woman brought you into this world, you have no right to Disrespect one.’ चांगलंय की… चांगले विचार आहेत. आईला दाखवूया हे. म्हणावं, दारू पिणारा एक फोटो टाकला म्हणून judge करण्यापेक्षा विचार कसे आहेत ते महत्वाचं.

“कधी ठरलंय मग भेटायचं?” सोनी बऱ्याच वेळानंतर सोफ्यावरून उठत म्हणाली.

“ठरवूया म्हणतेस भेटीचं?” आईचे किचनमधून चमकलेले डोळे सोनीला हॉलमधून पण दिसले.

“हो ठरवा की मग आता…” सोनी उगाचच आईची नजर चुकवत म्हणाली.

आई घाईघाईनं हात पुसत हॉलमध्ये आली. “मी काय करते, आता बाबा आले की त्यांच्याशी बोलते. मग मीनूला फोन करून लगेच कळवून टाकते. आणि डेट पक्कीच करून टाकते.”

आईला सोनीने ‘थंब्स अप’ दाखवलं आणि बेडरूममध्ये गेली.

रात्री जेवणासाठी आईने हाक मारली. ‘Before Sunrise’ पिक्चरला पॉज करून कानातले हेडफोन्स बाजूला करून ती जेवायला गेली. टेबलावर आईनं ‘बाबांशी माझं बोलणं झालं, बाबांना पण स्थळ पसंत आहे, मीनूला कॉल केला… तिने त्याच्या घरी फोन केला. त्यांनी पुढच्या रविवारची डेट पक्की केली आहे.’ अशी सगळी माहिती एका दमात देऊन टाकली.

“मीनू मावशी फोन नंबर पाठवतो म्हणाली त्या मुलाचा. भेटायच्या आधी एकदा बोलून घ्यायचं असेल तर घ्या तुम्ही” आई सोनीला भात वाढत म्हणाली.

“हं… ठीके” सोनी मान हलवत म्हणाली.

“आईनं फोटो दाखवले मला… व्हाट्सऍप वरचे. चांगला वाटतो आहे मुलगा.” बाबा खालीच बघत भातात वरण मिसळत बोलले.

हे जरा जास्तच एक्सपेक्टेशन ठेऊन बसलेत वाटतं, सोनीच्या डोक्यात विचार येऊन गेला. “अगं आई, निरूच्या एंगेजमेंटची तारीख ठरलीय. नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ. १४ तारखेला आहे.” तिने विषय बदलला.

“अरे वाह! छानच झालं की… तुझं पण ठरू दे. दोघींचे हात एकदमच पिवळे होऊ देत.” आई मनापासून म्हणाली. सोनीने नुसतीच स्माईल दिली. तिला उगाच वाईट वाटलं. आपण कधी ह्या सगळ्या गुंत्यातून सुटणार असं वाटलं. अजून एक घास काही तिला जाईना. थोडा उरलेला भात तसाच ठेऊन ती म्हणाली, “आई जात नाहीए. ठेऊ का एवढा भात?”

“का गं?”

“काय माहित, संध्याकाळी ते चहाबरोबर काय काय खाल्लं ना…”

“बरं बरं… ठेव.”

सोनीने ताट उचलून सिंक मध्ये ठेवलं. टेबलावरचा फोन घेऊन तिच्या खोलीत गेली. कानाला हेडफोन्स लावून पिक्चर सुरु करणार इतक्यात फोन वाजला.

“झालं का जेवण?” निखिल विचारात होता.

“हेहे… तुला कसं कळलं?”

“दोन-तीन वेळा ह्या आधी १० मिनिटं मेसेज केला की ‘जेवत आहे’ असा शॉर्ट रिप्लाय यायचा ना तुझा. म्हणून आज लेटच केला.”

“जस्टच झालं. तू काय करतोयस?”

“मी काय मस्त कॉफी पितोय गरम गरम आणि एक ऑनलाईन ट्रेनिंग करतोय.”

“कसलं ट्रेनिंग?”

“तुला खरंच ऐकायचं आहे?” त्याने जीभ दाखवणारा इमोटीकॉन पाठवला.

“नको नको… काहीतरी फार टेक्निकल बोलत बसशील मागच्या वेळेसारखं”

“हाहाहा… म्हणूनच विचारलं”

निखिलची ‘Linked In’ वरची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून तरी २ आठवडे होत आले होते.

त्याला फॉलो बॅक करून तिने मेसेज केला होता, “Are you from K.G. Highschool?”

त्यावर त्याचा ‘येस’ म्हणून रिप्लाय आला तेव्हा सोनीला आश्चर्यमिश्रित आनंद झाला होता.

“डू यू रिमेम्बर मी?” ह्या मेसेजवर त्याने, “Of course I remember you, I am not one of them who keep sending Linked in requests to unknown pretty girls”

असा रिप्लाय दिला होता तेव्हा सोनीने बसल्या जागेवर एक छोटीशी उडी मारली होती. दोनच आठवड्यात ‘लिंक्ड इन’ वरून ‘फेसबुक फ्रेंड्स’, आणि मग ‘व्हाट्सऍप बड्डीज’ कधी झाले ते त्यांना देखील सांगता येणार नाही. सोनीने तिच्या शाळेतल्या मैत्रिणीला – प्रज्ञाला – खास फोन करून ही गोष्ट कळवली होती.

“भारीच गं… काय करतो तो सध्या?” प्रज्ञाच्या ह्या प्रश्नावर सोनीने जवळ जवळ १०-१५ मिनिटं, आपण स्टॉक करून जमा केलेली माहिती सांगितली होती.

“तेव्हाच कसला cute होता दिसायला… आता कसा दिसतो?” ह्यावर तिने त्याच्या ‘डीपी’चा स्क्रीनशॉट देखील पाठवला होता. त्यावर दोघींचं “हॉट दिसतोय ना…” ह्यावर एकमत झालं होतं.

“तुझ्याशी कसा काय बोलायला लागला हा? त्याची स्कूल मधली गर्लफ्रेंड ‘सानिका’ तिचं काय झालं?”

“काय माहीत कसं काय बोलायला लागला… आणि त्यांचं तर स्कूलनंतरच ब्रेक-अप झालं होतं ना. हा मुंबईला गेल्यानंतर…”

“भारी हं सोने… लकी आहेस. आमच्याकडे आहे त्यातले पण ढुंकून बघत नाहीत.”

‘निखिल बल्लाळ’ सोनीच्या शाळेतला ‘Goody Two Shoes’. अभ्यासात पुढे होता त्यामुळं टीचर्सचा लाडका होता, मस्ती करण्यात पुढे होता म्हणून मुलांचा यार होता, दिसायला छान होता त्यामुळं मुलींचा ‘सीक्रेट प्यार’ होता. खूप प्रयत्न करून सानिकाने पटवलं होतं त्याला. पण त्याने नुसतंच टाईमपास ‘हो’ म्हणलं होतं. दहावीनंतर त्याची फॅमिली मुंबईत शिफ्ट झाली आणि हळू हळू सगळ्यांच्याच गप्पांमधून तो नाहीसा झाला.

सानिकाने एक दिवस येऊन “Nikhil said he loves me too” असं जोरात डिक्लेअर केलं होतं, त्या दिवसानंतर सोनीने त्याच्याकडे चोरून बघणं बंद केलं होतं.

“Anyway… it’s a good time of your day. What are you doing?”

“Watching ‘Before Sunrise’…”

“आह! दॅट मूवी इज ब्युटीफुल…”

“तू बघीतली आहेस?”

मग ‘पिक्चर मधली फ्रेंच मुलगी, मग एकूणच फ्रेंच लोक, सोनीला आवडणारा तिचा फ्रेंच क्लायंट, त्याची बोलण्याची पद्धत, निखिल MS करत असतानाची एक इटालियन मुलगी, मग इटालियन फूड, मग पिझ्झा, मग बर्गर, मग मॅकडॉनल्ड’ असं करत गप्पा कुठल्या कुठे गेल्या. आज श्रेयस आत येऊन झोपला तरी सोनीचा फोन चालूच होता.

भाग १०

“लोग कहते होंगे तुम चाँद जैसी दिखती हो…
लेकिन हमें तो आपके अलावा कोई चाँद हि नहीं दिखता”

नवीन लावलेल्या ‘डीपी’ वर ‘निलेश’चा मेसेज आला. सोनी खूप वेळ हसत बसली. हा निलेश एक कार्टूनच आहे. आधीच्या ऑफिसमध्ये जेव्हा बसने जायची त्या बसमध्ये भेटलेला. काहीतरी कारण काढून पठ्ठ्याने नंबर मिळवला होता. थोड्या फॉर्मल चॅट्स नंतर त्याने आपली शायरीची आवड दाखवायला सुरुवात केली. मग जरा कुठे ‘डीपी’ चेंज झाला की त्याच्यातला शायर जागा होतो. सोनीला पहिल्या पहिल्यांदा तो ‘चिपकू, ठ*की, पोरी टापणारा’ वगैरे वाटायचा. तिने एक-दोनदा त्याला इन्डायरेक्टली सांगायचा प्रयत्न केला होता, “की, निलेश… आय एम नॉट अ व्हेरी शायरी फॅन.” किंवा “ह्या फोटोत काही मी ‘गुलाब की कली’ वगैरे दिसत नाहीए” पण त्याने माघार घेतली नाही. त्याने एकदाच क्लिअर केलं,”हे बघ मला एखादी गोष्ट सुंदर दिसली ना… की मी तिला सुंदर म्हणतो. मग ते कोणीही असो. मला तू सुंदर वाटली… मी बोललो.” ह्यावर सोनीकडे काहीच काउंटर आर्ग्युमेंट नव्हती.

आता तिला जड शब्दातील स्तुतीची सवय झाली आहे. त्यामुळे त्याच्या ‘पर्सिस्टंन्स’ ची दाद देऊन ती हसत बसली.

“ए… वेड लागलंय काय तुला? एकटीच काय हसत बसलीयस?” श्रेयस आत शिरत म्हणाला. ह्याला एक सरळ बोलता आलं असतं तर फार बरं झालं असतं. सारखा उंटासारखा तिरकस जातो. वाढलाय पण उंटासारखाच. उंटासारखं अंघोळ पण नाही करत.

“अंघोळ कर जा…” सोनी उगाच म्हणाली.

“डूड… यू आर सिरिअसली गॉन क्रेझी. आत्ता कोण अंघोळ करतंय? थांब आईला सांगतो तुला दाखवून आणायला.”

“व्या…” सोनीने नुसतीच जीभ दाखवली. “शीट! दाखवण्यावरून लक्षात आलं… आईने तो ड्रेस इस्त्री करून आणायला सांगितला होता.” ती पटकन उठून कपाटात ड्रेस शोधू लागली. एकमेकांवर फेकलेल्या कपड्यातून तो ‘पिंक अनारकली’ काही मिळेना. मग अख्ख कपाट तिने उपसलं. श्रेयस ते बघून जोरात ओरडू लागला.

“आई… ताईला खरंच वेड लागलंय… तिला दाखवून आणा… आई…”

सोनीने एक कपडा जोरात त्याच्या तोंडावर फेकला. पण तेवढ्यात आई आत आली. सोनी उपसलेला ढीग झाकायला उगाच वळून बसली.

“काय केलंयस हे?” आई साप दिसल्यागत ओरडली.

सोनीने रागाने श्रेयसकडे बघितलं. मग तोंड पाडून आईकडे बघितलं, “मला तो पिंक अनारकली सापडत नाहीए.”

आई काही न बोलता बाहेर गेली आणि एक पिशवी घेऊन आत आली. “हं… घ्या. करून आणलाय इस्त्री”

“काय!! कधी? तुला कुठे मिळाला? कपाटातच होता?”

“कपाटातच होता. तो शोधायला म्हणून सगळे कपडे मीच उपसले आणि मग तसेच कोंबून ठेवले. म्हणलं तू शोधायच्या निमित्तानं कपाट तरी लावशील”

सोनी आईकडे तोंडाचा आ वासून बघत राहिली. आणि श्रेयस जोरजोरात हसू लागला. सोनीने अजून एक कपडा त्याच्या तोंडावर फेकला.

आई निघता- निघता मोठ्ठी स्माईल देत म्हणाली, “अजून दोनच दिवस…”

सोनी नुसतीच कोऱ्या चेहऱ्याने दाराकडे बघत राहिली. थोड्यावेळाने दोन्ही कपडे श्रेयसने तिच्या तोंडावर फेकले. सोनी मारायला उठणार तेवढ्यात बाहेर पळत जाऊन त्याने दाराला बाहेरून कडी घातली.

“मूर्ख. माकड. हत्ती!!” सोनी बंद दरवाज्यावर ओरडली.

जवळ- जवळ तासभर एक एक कपडा नीट घडी घालून लावून झाल्यावर सोनी बेडवर आडवी पडली.

“Hi” सिद्धार्थचा मेसेज आला, “Sorry I couldn’t pick up your call. I was in a meeting.”

“Hi… Okay”

“You wanted to talk about something”

“Can I not call you just like that?” असा रिप्लाय सोनीने टाईप केला पण परत डिलीट करून “Nothing much important. I just called to talk”

“ओह… ग्रेट! So how was your day?”

शी… रात्री काय आता माझा दिवस कसा होता हे बोलत बसू काय? सोनीने मग, “इट वॉज टायरिंग” असं लिहून पाठवलं.

“Oh… Then get some rest. I wish we could have talked more though. But no problem. I am gonna see you in two days!”

“हेहे” काय बोलायचं हे न सुचून सोनीने सवयीचा एक रिप्लाय पाठवून दिला.

“गुड नाईट! अँड यू लूक ब्युटीफुल इन धिस डीपी”

ह्यावर “थँक यू… अँड स्वीट ड्रीम्स” असा मेसेज टाकून सोनीने फोन बाजूला ठेवला. डोळे मिटणार तेवढ्यात फोन पुन्हा वाजला.

“भेटणार आहेस की नाहीस?” अक्षय विचारत होता.

“कधी येणार आहेस तू?” सोनीने विचारलं.

“शनिवारी.”

“मला वेळ नाही.”

“वेळ काढ.”

खूप वेळ थांबून सोनीने लिहलं, “एक मुलगा येणार आहे बघायला. म्हणजे मुलाची फॅमिली. कांदेपोहे कार्यक्रम आहे.”

खूप वेळाने त्याचा रिप्लाय आला. “ओह… वाह, वाह, वाह! चांगलीच मज्जा आहे की मग!”

“हम्म…” असा तुटक रिप्लाय लिहून सोनीने फोन म्यूट केला. बाजूला फेकला आणि झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन तिने अक्षयला मेसेज केला, “रविवारी भेटूया ना…”

पुन्हा बऱ्याच वेळाने त्याचा रिप्लाय आला, “नाही… मी कॅन्सल केलंय यायचं. राम्या घरी नाहीए.”

“मग नंतर कधी येणार?”

“काही माहित नाही. सांगतो.”

“ठीके” चर्चा संपली.

लॅपटॉप वर निरूचा ‘ping’ आला. “श्वेता इज इन टाऊन. आपण संध्याकाळी भेटतोय.”

“ओह… चालेल की.”

संध्याकाळी ७ वाजता निरूचा व्हाट्सऍप वर मेसेज आला, “अगं ये की ठमे… कधीचं येऊन बसलोय आम्ही. ‘सँडविच प्लेस’ ला ये.”

“हां… ५च मिनिट.” असं म्हणून सोनीने आपली बॅग भरली. आणि ऑफिसजवळच्या ‘सँडविच प्लेस’ ला गेली.

“सोनी…” श्वेता गेल्या गेल्या गळ्यात पडली. “कशीएस गं…”

“माझं काय विचारतेस… तू कशी आहेस सांग… तुझ्याकडे मस्त मस्त स्टोरीज असतील आता.”

“काही नाही गं… काही विशेष नाही. आला दिवस गेला दिवस…”

“हं… पण रात्रींचं काsssय?” निरू श्वेताला खांद्याने ढोसलत भुवया उडवत म्हणाली.

“निरू…” सोनी डोळे मोट्ठे करून म्हणाली, “तुला तर असल्याच गप्पा पाहिजेत… गप्प बस. श्वेता तू तिच्या फालतू प्रश्नांची उत्तरं देऊ नको गं.”

“अगं… तिला काय प्रॉब्लेम नाहीए. तू कशाला मध्ये मध्ये करतेय?”

“तुमचं ‘learn and share’ नंतर करा मग.” सोनी निरुला दटावत म्हणाली. “श्वेता… काय म्हणतो समीर? फार नवरेगिरी करत नाही ना?”

“नाही गं… उलट खूपच लाडावलंय त्याने मला. इतक्या लाडाची सवय नाही ना… इकडच्या घरी काय… चिनू छोटी त्यामुळं तिचे लाड मलाच करावे लागायचे. पण त्यांच्या घरात मीच लहान आहे सगळ्यात. त्यामुळे निवांत असतं सगळं.”

“सासू कशी आहे?”

“अगं आई-बाबा दोघेही निवांत आहेत. पक्के मुंबईकर आहेत. कशाचं जास्त टेन्शन नाहीत घेत…”

मागच्या वर्षी फॅमिली व्हेकेशनला गेली होती तेव्हा एअरपोर्ट वर पत्ता चुकली. त्या टेन्शनमध्ये समोर आलेला पहिला मुलगा म्हणजे समीर. त्याने हिला तिच्या गेटवर सोडलं. मग काय फेसबुक, चॅटिंग, एक-दोनदा भेटणं असं करता करता सहा महिन्यांत त्याने प्रपोज केलं. आणि पुढच्या सहा महिन्यात लग्न झालंदेखील.

आपण पण अशाच एअरपोर्ट वर जाऊन चुकावं, सोनीच्या डोक्यात विचार चमकून गेला.

“काय गं… कसला विचार करतेयस सोनी??” श्वेताने खांदा हलवला.

“अं…”

“येडे… अगं ज्युस कुठला घेणार विचारतोय.”

“वॉटरमिलन” रिफ्लेक्स ऍक्शन सारखं ते सोनीच्या तोंडातून बाहेर आलं. “ठीकेय” म्हणून निरूने भैय्याला जोरात हाक मारून ऑर्डर दिली. पण त्यानंतर सोनीला वाटलं, स्ट्रॉबेरी शेक घेतला असता तर बरं झालं असतं.

“ए.. तुम्ही ‘Dear Zindagi’ बघितला का गं?”

श्वेताने विचारलं.

“हो… बघितला ना… ऑफिसमधलेच सगळे गेलो होतो. शाहरुख माय लव्ह! त्याचा सारखा डॉक्टर असेल ना तर मी नसलेला रोग लावून घ्यायला तयार आहे!” निरू उगाचच ड्रामा करत म्हणाली.

“हो गं… फारच क्युट दिसतो त्यात. मी आणि समीरनी बघितला. सारखी सोनीची आठवण येत होती. सोनी तुझी खुर्ची कधी मिळणार?!”

“काय माहित… कधी मिळणार… मिळणारच नाही बहुतेक. कधी कधी वाटतं… जाऊ देत. राहू एकट्यानेच. लग्न होऊन लगेच विधवा होणाऱ्या बायकादेखील आहेतच की. त्या कुठे करतात दुसरं लग्न. मग माझं झालं नाही तर काय. हां… घरातल्यांना लाज वाटेल माझी. ते ज्या दिवशी तसं म्हणतील त्या दिवशी जाईन बाहेर. एकटीच राहीन. इतकं अवघड पण नसेल खुर्चीशिवाय राहणं” एवढं बोलून सोनी एकदम शांत झाली. काचेतून बाहेर बघत बसली.

त्या दोघीही गप्प झाल्या. थोडावेळ कोणीच कुणाशी बोललं नाही. तेवढ्यात ज्यूसचे ग्लासेस आले. तिघींनी आपापले ग्लास तोंडाला लावले.

“काही दिवसांपूर्वी मी डीपी टाकला होता आठवतंय? त्यातला ड्रेस पाहिजे म्हणून महेशची बहीण -नीता- त्याचं डोकं खात होती. शेवटी मीच ऑर्डर केला गं तिच्यासाठी. आणि आमच्या बरोबर जेवायला आली होती… तुम्हाला माहितीय ना एकूण अंगयष्टी? आणि काय गं… खुर्चीवरून काहीतरी वाकून घ्यायला गेली… आणि काखेत ड्रेसच फाटला…” निरू सिरिअस होऊन सांगू लागली.

श्वेताला जोरात हसू फुटलं. ते बघून सोनीलाही हसू आलं. तिघीही ग्लास खाली ठेऊन हसत बसल्या.

“माझ्या जाऊनं तर नवीन साडीच जाळली सासूची…” श्वेता हातवारे करत म्हणाली.

“काय!!”

“हो… मागच्या आठवड्यात पूजा होती गं… तर समीरचा भाऊ आणि आणि नंदिनी आले होते. तर मी करते मी करते म्हणत आईंची साडी इस्त्रीला घेतली… आणि पाडला मोठ्ठा भसका!”

“हाहाहा… बेस्टच!” निरू श्वेताला टाळी देत म्हणाली.

“आणि माझ्या “होणाऱ्या सासूबाईंची” तर काय मज्जा झाली परवा…” निरू सांगू लागली.

“ए… तुम्ही ते नवीन उघडलेलं ‘मोझार्ट’ ट्राय केलंय का?” सोनी विषय बदलत म्हणाली.

“थांब गं सोनी… हां काय मज्जा झाली गं?”श्वेताने सोनीला गप्प बसवलं. मग पुढचा तासभर त्यांच्या ‘संसारी’ गप्पा ऐकत आणि ज्यूसचे सिप घेत सोनी नुसतीच बसून राहिली.

भाग ११

“उठ, उठ… वेळ झालाय बराच!” आईने सोनीला हलवलं.

“शनिवार आहे आई… झोपू दे ना…” सोनी डोळे मिटूनच कपाळाला आठ्या घालत म्हणाली.

“अगं झोपू दे काय? आज बघायला येणार आहेत तुला… माहितीय ना?” आई जरा आवाज चढवून म्हणाली.

सोनीची झोप खर्र्कन उडाली. ती पटकन बेडवर उठून बसली. “शीट!”

“आवर पटकन. घर सगळं स्वच्छ करून ठेवायचंय. तरी बरं… जेवूनच निघतायत ते. संध्याकाळच्या नाश्त्याचं एक….” आई स्वतःशीच बडबडत बाहेर गेली.

सोनीच्या पोटात गोळा आला. आज खरंच “दाखवायचा” कार्यक्रम होणार आहे ह्या विचाराने तिला एकदम टेन्शन आलं. ती उठून बाथरूम मध्ये गेली आणि गार पाणी तोंडावर तीन-चार वेळा मारलं. आरशात बघितलं, एक छोटा पिंपल कपाळावर आला होता. “शीट! हा कसा काय आला आता?” बाहेर येऊन तिने कपाटात क्रीम शोधलं. छोट्या पिंपल वर क्रीम लावलं. आणि आरशात बघत बेडवर येऊन बसली.

काय काय विचारायचंय? स्मोकिंग, ड्रिंकिंग… आणि कशी मुलगी आवडते… आणि आधी गर्लफ्रेंड वगैरे होती का… नको विचारायला पहिल्याच भेटीत. काय काय सांगायचंय… जेवणाचं खरं तेच सांगते… आईच्या मदतीने जमतो स्वैयंपाक. साडी मला स्वतःहून काही नेसता येत नाही. देवपूजा वगैरे काही केलेलं नाहीए आत्तापर्यंत. जास्त निगेटिव्हच झालं वाटतं. नको… निगेटिव्ह नकोच सांगायला. फक्त स्वैयंपाकाचं सांगूया. बाकी मला कॉफी आवडते. कॉन्फिडन्ट लोक आवडतात. माझा काही बॉयफ्रेंड वगैरे नव्हता. नको बॉयफ्रेंडचं कशाला आपणच बोलायचं. विचारलं तर सांगू. आणि… आणि मी सिम्पल आहे, पण एकदमच काकूबाईसारखं नाही राहता येत.

“अगं… घे आवरायला आता… बाहेरची खोली आणि तुझी खोली नीट करायचीय तुला.” आईनं किचन मधूनच जोरदार सूचना केली.

“हां चाललेय अंघोळीला…” सोनीने ओरडून सांगितलं. तिने कपडे घेतले आणि बाथरूम मध्ये घुसली.

घरी जीन्स वगैरे चालणार नाही म्हणाला तर? नाही तसं कशाला काही म्हणेल. इतके ऑर्थोडॉक्स नाहीत वाटत त्याच्या घरचे. आम्हाला घरचंच खाणं लागतं, किंवा बाईच्या हातचं चालत नाही… असं काहीतरी म्हणले तर? असं कशाला म्हणतील. अरे हो… पण आपण मुंबईला कुठं शिफ्ट होणार आहोत. त्याची कंपनी तर पुण्यातच आहे ना. बरं झालं…

पण त्याचे आई-बाबा इकडं शिफ्ट होणार असतील तर? सुरुवातीचे काही दिवस तरी एकटं राहायला द्यावं त्यांनी. जरा तरी प्रायव्हसी हवी ना पहिले काही दिवस… आता हे कुणाशी बोलायचं पण… त्याच्याशी कसं बोलणार… तुझ्या आई-बाबांना इकडे नको बोलवू म्हणून. हे एक बरं असतं हं ह्या मुलांचं. मी पुण्यातच राहून माझ्या घरी नाही यायचं. आणि त्याने मात्र त्याच्या आई-बाबांना सोडायचं नाही. का आम्हाला पण हवंच की आई-बाबांचं प्रेम. त्यांची काळजी पण घ्यायला कुणी पाहिजे ना. जाऊ दे, आपण आधीच कशाला निगेटिव्ह विचार करायचा? त्याचे आई-बाबा आहेत शिकलेले. एवढं तरी त्यांना कळत असेल की मुलांना आपण जरा प्रायव्हसी द्यावी. त्याची आई कशी आहे कुणास ठाऊक. एकदम तिरसट बोलणारी नसू दे बाबा… मला काय उलटं बोलता येत नाही. टोमणे मारता येत नाहीत. त्यामुळे साधीच असू देत त्याच्या घरची माणसं.

पण मी एकदम एवढं का एक्साईट होतेय. आत्ता फक्त बघायला येणार आहेत ना… अजून आपल्या घरातल्यांना तो आणि त्यांच्या घरातल्यांना मी पसंद पडायचे आहेत. माझं आपलं उगाच इमॅजिनेशन कुठच्या कुठे. पण नाही… प्रिपेअर्ड असलेलं कधीही चांगलं.

“झालंय का पार्वतीदेवीचं स्नान?” आई बाथरूमच्या बाहेर येऊन ओरडली.

“हो झालं झालंच आई…” सोनीने गडबडीत राहिलेले ३-४ मग अंगावर ओतून घेतले आणि केस पुसत बाहेर आली.

“केस कशाला धुतलेस… किती कोरडे होतात…”

“आई त्याशिवाय चांगले फुलत नाहीत केस. एकदम चंपू दिसतात मग ते”

“ह्म्म्म… आता साधाच ड्रेस घाल. २ वाजता बदल”

“हो आई… माहितीय मला…” सोनीला आता जरा वैताग आला.

आई तरा-तरा बाहेर गेली. सोनीने केस ‘ब्लो-ड्राय’ केले. गोल कंगव्याने विंचरून थोडेसे ‘कर्ल’ करून घेतले. १५ मिनिटांनी पुन्हा आईची हाक आली.

“उपमा गार होतोय…”

“आले आले…” सोनी हातातलं सगळं ठेऊन बाहेर पळाली.

तिने कॉफी beat करायला घेतली तर आई म्हणाली, “किती वेळ घालवणार आहेस? आज एखाद्या वेळेस तशीच कॉफी पिली तर चालणार नाही का?”

सोनीने चमचा फिरवणं थांबवलं. गरम दूध त्यात ओतलं. ओतताना ते कपाबाहेर सांडलं.

“अगं.. अगं…”आई टेबलावरून उठून ओट्याजवळ आली. “आत्ताच साफ केलेला ना मी ओटा??” ती चिडून म्हणाली.

“आई…” सोनी देखील चिडली, “काय वैतागतेयस सकाळी सकाळी… पुन्हा जेवण करताना घाण होणारच आहे ना ओटा…”

आई काहीच न बोलता टेबलवर जाऊन खाली बघत उपमा खात बसली. सोनीने तिच्याकडे बघितलं, तिच्याजवळची खुर्ची ओढून ती बसली.

“काय झालंय आई?” सोनीने शांतपणे विचारलं.

“काही नाही गं… जरा टेन्शन येतंय सगळं व्यवस्थित होईल की नाही म्हणून… त्यांना सगळं पसंत येईल की नाही म्हणून. उगाच आपल्याकडून काही कमी नको राहायला.” आई डोकं चोळत म्हणाली.

“खरं सांगू आई… मला पण टेन्शन येतंय. मला पण असंच वाटतंय की बोलताना माझी काही चूक होऊ नये. जास्त मेकअप करावा की नाही, आणि घाण पण दिसून नाही चालणार. सगळं व्यवस्थित पाहिजे.”

“घाण दिसायचा काय संबंध? आमच्या सोनीसारखी देखणी मुलगी आणा म्हणावं शोधून… मिळते का बघू…” आई हातवारे करत म्हणाली.

“मग… आमच्या घरासारखं पण घर आणा म्हणावं शोधून” सोनी हसून म्हणाली. आई देखील छोटंसं हसली.

“होईल का गं सोनू?” गालावर हात ठेऊन तिने विचारलं.

“काय माहीत गं… आपण आपल्याकडून तर सगळं करतोच आहोत. आणि तुला एक सांगू आई. आपलं जे आहे ते आहे, हो ना? म्हणजे कुणीतरी आपल्याला पसंत करावं म्हणून अचानक आपण एक मुखवटा चढवून बसू एखाद्या दिवशी. पण मग तो खोटेपणा होईल ना? त्यामुळं आपलं जे काही आहे, जसं काही आहे तेच त्यांच्या समोर ठेऊया. त्यांना आवडलं तर ठीक, नाहीतर काय… जगात अजून १०० तरी सिंगल मुलं आहेत. हो ना?”

“होय.. आमच्यात खोट काढण्यासारखं काही नाहीच आहे तसंही. त्यातूनही कुणाला आवडलं नाही तर तेच मूर्ख आहेत म्हणायचं.”

“आता कसं बोललीस!” असं म्हणून सोनीने टाळीसाठी हात पुढे केला. आईने देखील टाळी दिली.

“बाबा कुठेयत?”

“बाबा आवरतायत. त्यांचा चहा ठेवायचाय.” आई उठू लागली

“मी ठेवते थांब… तू खाऊन घे.”

सोनीने चहा ठेवला तेवढ्यात बाबा आले.

“मी इकडचं बाथरूम साफ केलंय”

“अगं बाई… कशाला तुम्ही काय करत बसला…” आई तोंडाला हात लावून म्हणाली.

“तुम्हाला पण बरीच कामं आहेत ना… बरं बाहेरून काय काय आणायचंय?” शर्टाची बटणं लावत बाबा म्हणाले.

“तुम्ही आधी खाऊन घ्या. मी लिस्ट करून ठेवते तोपर्यंत.”

आईने लिस्ट केली, बाबा बाजारात गेले, श्रेयस प्रॅक्टिसवरून परत आला. सोनीने मूड लाईट करायला TV वर गाण्यांचं चॅनेल लावलं. तिघांनी मिळून घर आवरायला घेतलं. सोनीने आपल्या आणि श्रेयसच्या बेडवरचं बेडशीट बदललं. छोट्या बुकशेल्फ मधली पुस्तकं पुसून नीट लावली. कपाटाचा आरसा पुसून चकचकीत केला. टेबलवर ठेवलेले फोटो आणि डेस्कटॉप ओल्या कापडाने पुसून घेतले. भिंतीला अडकवलेल्या फ्रेम्स देखील पुसल्या. मग सोनी बाथरूम मध्ये शिरली. आज कसलीही कुरकुर न करता तिने टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ केलं. सगळी सफाई झाल्यावर तिने हीटर लावून गरम पाण्याचे दोन तांबे परत एकदा अंगावर ओतले.

घर आता लखलखीत झालं होतं. बॉक्समध्ये भरून ठेवलेल्या अँटिक गोष्टी वर दिसू लागल्या होत्या. फ्लॉवरपॉट मध्ये आज फ्रेश फुलं आली होती. नवीन प्लेटांचा बॉक्स उघडला गेला होता. सोनीला घरभर एक नजर टाकून मस्त वाटलं. आईने गाजराचा हलवा करायला घेतला होता. जेवणं झाल्यावर आईने सुरळीच्या वड्यांची तयारी सुरु केली. ते आले कि मग फक्त कांदेपोहे परतले की झालं. आपल्या ‘स्पेशल सुरळीच्या वड्या’, गाजर हलवा, पोहे आणि चहा. संध्याकाळच्या ‘स्नॅक्स’चा मस्त बेत होता.

३ वाजायला आले तसं सोनीच्या पोटात कालवायला सुरुवात झाली. आई आणि बाबा अर्धा तास पडतो म्हणून जरावेळ झोपले होते. श्रेयस कानाला हेडफोन्स लावून लॅपटॉवर काहीतरी बघत बसला होता. सोनी उगाच आत-बाहेर करत होती. ती श्रेयसजवळ जाऊन बसली.

“काय बघतोयस?”

“Dexter”

सोनी तिथून उठली. तसं श्रेयसने हेडफोन्स बाजूला केले, “थांब… फ्रेंड्स चा एक एपिसोड बघूया… कुठला लाऊ?”

त्या ‘सहा-जणांना’ बघून सोनीचं भणभणत असलेलं डोकं जरा शांत झालं. काहीच वेळात आई आली.

“सोनू… आपलं आवरायला घेऊया काय गं?”

“झोपली नाहीस तू?”

“झोप कसली लागतेय मला…”

“ठीकेय चल. तू तुझी जांभळी साडी नेसणार आहेस ना? इकडेच घेऊन ये.”

श्रेयस बाहेरच्या खोलीत गेला. दोघी अर्ध्या तासात तयार होऊन बाहेर आल्या. बाबादेखील तयार होऊन TV बघत बसले होते.

“वा… छान दिसताय की दोघी!” बाबा दोघींना बघून म्हणाले.

सोनीने साधीच पण छान हेअर स्टाईल केली होती. थोडासा मेकअप केला होता. मोत्यांचे कानातले घातले होते. मोत्यांचाच नेकलेस घातला होता. गुलाबी रंगात ती अजूनच नाजूक दिसत होती.

दोघीही सोफ्यावर बसल्या तितक्यात बाबांना फोन आला.

“हॅलो… नमस्कार नमस्कार…”

“हो… हो… बरोबर. हां तिथेच.”

“हो… तिसऱ्या मजल्यावर आहे. मी येतोच खाली… ठीक आहे… हां आलो.”

बाबांनी फोन ठेवला आणि “आलेयत ते… मी वर घेऊन येतो त्यांना…” म्हणून बाहेर गेले.

सोनीच्या पोटात पुन्हा गोळा आला. सोनीने आईकडे बघितलं, आई टेन्शनमध्ये असून सुद्धा तिच्याकडे बघून छोटंसं हसली. डोळ्यातूनच ‘काळजी करू नको’ असं सांगितलं. दोघीही किचन मध्ये गेल्या. आईने लिंबू काढून ठेवले.

बेल वाजली तसं श्रेयसने दार उघडलं. “या…” म्हणत बाबांनी त्यांना आत बोलावलं. “हे आमचे धाकटे चिरंजीव. श्रेयस.” बाबांनी श्रेयसला introduce केलं. श्रेयस उगाचच जास्त स्माईल करून ‘नमस्कार, नमस्कार’ म्हणत होता. “जा बाळ… पाणी घेऊन ये.” बाबांनी त्याला किचनमध्ये पिटाळलं. “या… बसा…” सगळेजण सोफ्यावर येऊन बसले.

श्रेयस किचन मध्ये आला. दोन्ही अंगठे वर करून त्याने ‘थंब्स अप’ दिला. पाणी घेऊन बाहेर गेला. आईदेखील त्याच्या पाठोपाठ गेली.

“नमस्कार…” आईदेखील तोंडावर जास्तीचंच हसू ठेऊन म्हणाली. “कसा झाला प्रवास?”

“निवांत झाला… काय ‘कार’ने अडीच तासात पोचून जातो.” सिद्धार्थची आई बोलली.

“थंड लिंबू-सरबत आणू सगळ्यांना?” आईने विचारलं.

“हो चालेल ना…” आईसाहेब म्हणाल्या.

आई आत आली. सोनी सरबतातली साखर हलवत होती. आई कानात खुसफुसली, “छान आहे मुलगा दिसायला, उंच पण वाटतोय.”

तोपर्यंत बाहेर बाबा इकडच्या-तिकडच्या गप्पा करू लागले. बाबांना खरंतर जमत नाहीत ‘small talks’, पण उगाच काहीतरी विषय काढून ते बोलत होते.

आई सरबत घेऊन बाहेर गेली.

“अहो… सुनहरीला पण आणा बाहेर. आमचा सिद्धार्थ कधीपासून तळमळतोय! हॅहॅहॅ” आईसाहेबांनी जोक मारला. सगळेच गरजेपेक्षा जास्त हसले. सिद्धार्थ जरासा लाजला.

“हो… हो… सुनहरी… बाहेर ये बाळ”

“नाव बाकी युनिक ठेवलंय तुम्ही तिचं…” आईसाहेब सरबताचा घोट घेत म्हणाल्या.

“त्याचं काय आहे… आम्ही तिच्या जन्माच्या वेळेस इंदोरला राहायला होतो. तर तिथल्या आमच्या खास मित्राने आणि त्याच्या बायकोने हे नाव ठेवलं.” बाबांनी ही सगळी वाक्यं दातांची वरची फळी दाखवतच बोलली.

सोनी किचनमधून बाहेर आली, येता- येता तिने मोठ्ठा श्वास घेतला. तिला छातीवर हात ठेऊन “ऑल इज वेल” म्हणावं वाटत होतं, पण तिने तसं काही केलं नाही. ती हॉलमध्ये आली. एकदा सगळ्यांवरून तिने पटकन नजर फिरवून घेतली. सिद्धार्थच्या बाबांनी जीन्स आणि टी-शर्ट घातला होता. आईने पंजाबी ड्रेस घातला होता. सिद्धार्थने कॅज्युअल शर्ट आणि जीन्स घातली होती. चला… म्हणजे कपड्यांच्या बाबतीत तरी नॉर्मल आहेत ही लोकं. सोनी आईजवळ येऊन उभी राहिली.

“ये… बस ना बेटा…”त्याचे बाबा म्हणाले.

“हो अगं… बस ना… सिद्धार्थजवळ बसायचय का? थांब मी उठते.” असं म्हणून कुणी काही बोलायच्या आत त्याची आई उठून ऑपोझिट साईडला जाऊन बसली. सोनी खाली मान घालून त्याच्या पलीकडे जाऊन बसली. सिद्धार्थने तिच्याकडे बघून स्माईल केली. सोनीदेखील छोटंसं हसली.

“सो… व्हॉट डू यु डू बेटा?” त्याच्या बाबांनी प्रश्न केला.

“अं…” सोनीला मराठीत बोलू की इंग्लिशमध्ये कळेना. “I work as an Engineer at Diligent” तिने बोलून टाकलं.

“ग्रेट! आय लाईक टुडेज गर्ल्स कॉन्फिडन्स!” सिद्धार्थचे बाबा उगाच कायच्या काय बोलले. “आमची नम्रता पण बँकेत काम करायची, पण आजच्या मुलींसारखा कॉन्फिडन्स तेव्हाच्या मुलींना नव्हता”

“कसा असणार? आजच्या सारखे फ्रीडम देणारे सासू-सासरे तेव्हा नव्हते… काय ओ… हॅहॅहॅ” त्याच्या आईने सोनीच्या आईकडे टाळी मागितली. आईला पटकन काय झालं ते कळलंच नाही. तिने उगाच “हेहे”करून टाळी दिली.

“हे बघ सुनहरी… आमच्या घरी योग्य तेवढा फ्रीडम आहे. आम्हाला काय, सिद्धार्थ एकटाच आहे. उगाच त्याला आणि त्याच्या बायकोला त्रास देऊन आम्हाला काय मिळवायचंय? मला तर मॉडर्नच सून हवीय बाबा. माझ्या एका मैत्रिणीची सून इतकी गावठी आहे. फॅशन सेन्सच नाही तिला. हॅहॅहॅ…”

“बरं… तुमच्या गप्पा चालू द्यात. मी पटकन पोहे टाकते”

“अहो कशाला वहिनी… फक्त चहा घेऊन निघणार आम्ही. पुणेकरांच्या घरी चाललोय हे लक्षात घेऊनच निघालोय आम्ही. हॅहॅहॅ…”

“आमच्याकडे काही तसल्या प्रथा नाहीत हं… आमच्या सुनहरीच्या हातचा ‘गाजराचा हलवा’ तरी खायलाच हवा तुम्ही.” आईच्या वाक्यावर सोनीने खर्र्कन आईकडे बघितलं. पण आई मुद्दाम तिची नजर टाळत होती हे तिला कळलं.

“अरे वा… आणा मग… अजून काय काय येतं तुला बेटा? आमच्या घरात खाण्याचे शौकीन आहेत.”

ते सुटलेल्या पोटांवरून दिसतच आहे, सोनीला वाटलं. “अं… मला खरंतर बेसिक जेवण येतं. हळू हळू शिकतेय नवीन नवीन काहीतरी करायला… पदार्थ.” सोनीने देखील दातांची वरची फळी दाखवत उत्तर दिलं.

आईने सोनीला तिथेच बसायला सांगितलं आणि श्रेयसला आत बोलवून घेतलं.

“हो हो… मी देखील शिकवीन तुला… करायची आवड असली म्हणजे झालं. आमच्या सिद्धार्थला खाण्याची आवड आहे. तो जिमला जातो रोज… त्यामुळं तब्येत छान राहिलीय त्याची. तू करतेस की नाहीस एक्सरसाईज?”

बापरे… हा काय प्रश्न आता? “नाही करत…”

“अगं करायला हवी तुम्ही मुलींनी एक्सरसाईज. पुढे काही त्रास नाही होत. आमच्या वेळी कसं… सगळं काम आम्हीच करायचो. त्यामुळं आमची तब्येत अजून ठणठणीत आहे.”

“हो… मी पण जिम लावणार आहे पुढच्या महिन्यात” सोनी उगाच कायच्या काय बोलून गेली.

“तुझं काही टोपणनाव वगैरे नाही का गं? फार मोठं आहे बाबा नाव. म्हणायला अवघड जातं.”

“आम्ही घरी ‘सोनी’ म्हणतो तिला” सोनीला काही सुचलेलं नाहीए बघून बाबाच म्हणाले.

“हां… बरं झालं… तर भाऊजी… सोनी आणि सिद्धार्थला आपण बोलायला सेपरेट वेळ देऊच. तुम्हाला सिद्धार्थला काय विचारून घ्यायचं असेल तर घ्या.”

“हाहा…” लगेच काही प्रश्न तयार नसल्यामुळे बाबांनी थोडा वेळ हसण्यात घालवला. “बाकी तर सगळं बायो-डेटा वर आहेच. तुमचं नेमकं काय प्रोफाइल आहे सिमेन्स मध्ये?”

“हो… ऍक्चुअली मी मार्केटिंग कन्सल्टन्ट म्हणून तिथे आहे. प्रॉडक्ट्सचं मार्केट कॅप्चर मॅनेज करतो आम्ही.”

“अच्छा… छान छान… खरंतर मी बॅंकेतला माणूस आहे. त्यामुळे फार काही कळत नाही मला. फक्त आपलं माहिती असावं म्हणून विचारलं.”

“तुम्ही कुठल्या ब्रँचला आहात?” त्याच्या बाबांनी सोनीच्या बाबांना प्रश्न केला.

बाबांनी मग आपल्या कामाबद्दल सांगायला सुरुवात केली. मग सिद्धार्थच्या आईने पण आपले बँकेतले अनुभव सांगायला सुरुवात केली. त्याच्या बाबांनी आपले कॉलेजवरचे अनुभव सांगितले. हा पूर्ण वेळ सोनी आणि सिद्धार्थ तोंड फाकवून बसले होते. सोनीला वाटू लागलं आता तिचं तोंड दुखू लागेल.

तेवढ्यात आई आणि श्रेयस ट्रे घेऊन बाहेर आले.

“अरे वाह! सुरळीच्या वड्या? मी म्हणतच होते ह्यांना इकडे आलोच आहोत तर ह्या वड्या खाऊनच जाऊया.” ट्रे खाली ठेवताच त्यांनी दोन-तीन वड्या उचलल्या.

प्लेट्स द्यायला सोनी पुढे आली. प्रत्येकाच्या हातात पोह्याच्या प्लेट्स दिल्या.

“तर मी काय म्हणते… खाऊन झालं की आपण घर बघून घेऊ. आणि ह्या जोडीला जरा प्रायव्हसी देऊ… कॉय?” पोह्याचा तोबरा भरत आईसाहेब म्हणाल्या.

मग पोहे, हलवा, वड्या आणि चहा ह्यांचा फडशा पडेपर्यंत काम, घरकाम, कामवाल्या बायका, मुंबईचा उन्हाळा, मुंबईचा पावसाळा, पुण्याचा हिवाळा, मुंबईची गर्दी, पुण्याचा पाणी-प्रश्न, मोदी-सरकार, अश्या बऱ्याच गप्पा चालल्या. अधे मध्ये सिद्धार्थ आणि सोनी तोंड उघडत होते पण ७०% वेळ आईसाहेबांचंच तोंड चालू होतं. सोनीला लहानपणीचा वाक्प्रचार आठवत होता, ‘तोंड लाकडाचं असतं तर आत्तापर्यंत फुटून गेलं असतं.’

थोड्यावेळाने आईने सोनीला “तुझी खोली दाखव” म्हणून सिध्दार्थसोबत आत पिटाळलं.

“ही माझी आणि श्रेयसची खोली आहे.” सोनीने सिद्धार्थला सांगितलं.

“ओह… ग्रेट. मला कुणी भाऊ-बहीण नाही, त्यामुळे शेअरिंग वगैरे कधी केलंच नाही. इकडे फ्लॅटवर पण मी एकटाच राहतो.”

“बापरे, bore नाही होत?”

“नोप. आय लाईक सॉलीट्युड!”

“हेहे… मला तर माणसं लागतात.”

“माझ्या आईसारखी आहेस म्हणजे”

“नाही… मला बोलायला नाही, ऐकायला आवडतं.” सोनी पटकन बोलून गेली. सिद्धार्थ हसल्यावर तिला लक्षात आलं, की तो त्याच्या आईला मारलेला टोमणा होता.

“आय मीन… मी फार बोलकी नाहीए. पण मला सतत कुणीतरी आसपास असावं असं वाटतं. एकट्याने नाही राहता येत.”

“आय गॉट इट.” सिद्धार्थ मोठी स्माईल करत म्हणाला. तिच्या बेडवर दोघे बसले. सिद्धार्थने २ मिनिट तिच्याकडे बघितलं, “यू नो… तू पहिली मुलगी आहेस, जी फोटोपेक्षा रिअलमध्ये जास्त ब्युटीफुल दिसतेस.” सोनी खाली बघून हसली.

“इट सिम्स यू लाईक टू रीड.” तो बुकशेल्फ कडे बघत म्हणाला.

“हो…”

“हू इज युअर फेवरीट ऑथर?”

“अं… मला ऍक्चुअली तसं डिसाईड नाही करता येत. मला जे आवडतं ते वाचते.”

“रिअली? हाहा… स्ट्रेंज!” सिद्धार्थ मान हलवत म्हणाला. “Anyways… तुला काही विचारायचंय मला?”

“मी थोडे प्रश्न तयार करून ठेवले होते… पण आता विसरलेत.” सोनी बारीक तोंड करून म्हणाली.

“हाहाहाहा…. wow!” सिद्धार्थ खूपच हसू लागला. सोनीला पुढे काही बोलायचं सुचत नव्हतं. थोडावेळ हसून झाल्यावर त्याने विचारलं, “यू वॉन्ट टू टॉक अबाऊट पास्ट?”

“अं… चालेल!” सोनीला पहिल्या भेटीत तसं काही बोलायचं नव्हतं पण त्याला बोलायचं आहे तर बोलूया असा विचार तिने केला.

“So, how many?”

“काय?”

“बॉयफ्रेंड्स… obviously!”

“बापरे… एक पण नव्हता मला… how many कुठून आले”

“रिअली? आय डोन्ट बिलिव्ह यू.”

“खरंच अरे… कोणी कधी विचारलंच नाही.”

“हाहाहा… शक्य नाहीए.”

“मी खोटं कशाला बोलू. जाऊ दे… तुझ्या किती गर्लफ्रेंड्स होत्या?”

“प्लुरल काही नाही… एक होती. बी.टेक.ला असताना.”

“मग?”

“मग काही नाही… बी.टेक. नंतर ती दुसरीकडे गेली. सो वी ब्रोक अप.”

“Do you still miss her?” सोनीने प्रश्न विचारला खरा…. पण त्याचं उत्तर नकारार्थी असावं असं तिला वाटू लागलं.

“आय डोन्ट नो… २-३ वर्षांत खूप काही बदलतं. मी काही करत नसतो तर तिला miss केलं असतं. बट आय हॅव सो मच ऑन माय प्लेट.” त्याने दिलेल्या उत्तराचा सोनीला काही नीट अर्थ लागला नाही.

“But… past is past. And we shouldn’t let it come between the future. Right?”

“हो…”

“Okay… so far so good. मला अजून काही प्रश्न नाहीएत. तुला काही आठवत असेल तर सांग.”

“न… नाही.” सोनीला नेमक्या वेळी काही सुचत नाही.

“चला मग… It was a pleasure meeting you, Miss Sunahari.”

तो सोनीशी हात मिळवत म्हणाला. ‘एवढ्यात झालं पण?’ सोनीने विचार केला.

“बाय द वे… आय लाईक युअर नेम. इट्स युनिक. लाईक यू.” सिद्धार्थने डोळे मिचकावले. सोनीने १८० डिग्री स्माईल दिली. दोघे बाहेर गेले.

“अरे… इतक्यात आलात बाहेर? आम्हाला काही घाई नाहीए…हॅहॅहॅ”

“पहिल्यांदा भेटल्यावर लगेच काय बोलयचं कळलं नसणार त्यांना नम्रता… आता अजून भेटी-गाठी होतीलच… हो ना?

“हाहा… येस बाबा…” सिद्धार्थ म्हणाला.

“बरं… वहिनी… हिची जन्मवेळ, तारीख, स्थळ… हि सगळी माहिती आम्हाला एका पेपरवर द्या. बायो-डेटा वर नव्हती ना ही माहिती.”

आईने एकदम बाबांकडे बघितलं. बाबांनी विचारलं, “कुंडली वगैरे बघताय का?”

“हो… त्याचं काय आहे. आमचे एक ‘म्हैसाळचे बाबा’ आहेत. खूप चांगले आहेत ते. त्यांचा हात डोक्यावर आहे म्हणूनच सगळं छान झालंय बघा आमचं. फक्त त्यांच्या नजरेखालुन एकदा घालून आणायचं. नंतर कसल्या शंका नको. नाही का…”

“हो… म्हणजे आमच्या मुलीला काही मंगळ-दोष वगैरे नाहीए. आम्ही काही वर्षांपूर्वी चेक केलेलं आहे.” आई म्हणाली

“अहो… मंगळ असणे-नसणे हाच एक मोठा दोष नसतो. गुण जुळणे, नाडी जुळणे… बऱ्याच गोष्टी असतात. आपण डोक्यात शंका ठेऊन कशाला शुभ कामाची सुरुवात करायची? म्हणून फक्त एकदा चेक.”

“ठीकेय सुलु… तिची जुनी कुंडली देऊयात. ” बाबा म्हणाले.

“आम्ही काही जुन्या विचारांचे नाही आहोत हं… फक्त माणसाची एक श्रद्धा असते ना… आमच्या ‘बाबाजींवर’ आमची तशी श्रद्धा आहे. इतकंच.”

“बरोबर आहे… काही हरकत नाही.” बाबा उठले आणि त्यांनी कपाटातली कुंडली काढून आणली.

“चला… छान झाला कार्यक्रम!” म्हणत सिद्धार्थचे बाबा उठले. सिद्धार्थच्या आईने त्याला सोनीच्या कुंडलीचा फोटो काढून घ्यायला सांगितलं.

“वहिनी… मस्त होत्या सुरळीच्या वड्या. मी करताना तुम्हाला एकदा रेसिपी विचारून घेईन.” असं म्हणून त्यांनी आईशी हात मिळवला.

आईने खुणेने ‘पाया पड’ अशी सोनीला सूचना केली. सोनी पटकन जाऊन त्याच्या आईच्या पाय पडली. “सुखी राहा…”त्यांनी आशीर्वाद दिला.

त्याच्या बाबांच्या पाय पडायला गेली, पण “अरे… नको बेटा… नमस्कार वगैरे कशाला…” म्हणून त्यांनी तिला उठवलं.

“आम्ही फोन करून कळवतो २-४ दिवसात” त्याचे बाबा म्हणाले.

दारातून बाहेर पडताना सिद्धार्थने सोनीला ‘टाटा’ केला. मंडळी दृष्टीआड झाली तशी चौघंही आत आली आणि सोफ्यावर धपकन बसली. सगळ्यांनीच मोठं कार्य पार पडल्याचा सुस्कारा सोडला. सोनी सोफ्यावरच आडवी झाली.

“हे कुंडलीचं काय मधेच काढलं ह्यांनी.”आई कपाळाला आठ्या घालत म्हणाली.

“अगं असू दे… असते एकेकाची श्रद्धा.”

“हम्म… जाऊ दे… सोनी… मुलगा कसा वाटला तुला? काय काय बोललात तुम्ही?”

“आई कंटाळा आलाय… नंतर बोलूया का?”

“अगं कसा वाटला ते तरी सांग…”

“चांगला वाटला. बोलायला तरी डिसेंट आहे. आई फारच बडबडी आहे पण.”

“असू दे… तसं पण पुण्यातच राहायचंय तुम्हाला.”

“हम्म… मी जरा झोपते जाते आई. डोकं दुखायला लागलंय” असं म्हणून सोनी आत गेली. टेबलवर ठेवलेली जुन्या फॅमिली फोटोची फ्रेम हातात घेऊन बसली. आपण आईसारखेच दिसतो आत्ता. लहानपणीचा चेहरा जरा जरा बाबांसारखा दिसतो. एवढेच का नाही राहिलो… उगीच मोठे झालो.

सोनीने ती छोटी फ्रेम छातीशी धरली आणि डोळे मिटून झोपून गेली.

भाग १२

“दोन दिवस झाले की… त्यांचा अजून कसा काय फोन नाही आला?” आईने न राहवून बाबांना प्रश्न विचारला.

“अगं… त्यांचं काय ते कुंडली वगैरे दाखवून होऊ देत ना. दोन दिवस तरी लागतील ना त्याला. आपण करायचा का स्वतःहून फोन?”

“नको… मग ते असं होईल की आम्हालाच घाई आहे.”

“बरं… आणि आलाच फोन… तर? आपलं उत्तर तयार आहे का?” बाबांनी फोनमध्ये बघत जेवणाऱ्या सोनीकडे बघून विचारलं.

“काय गं सोनू… काय विचारतायत बाबा?”

“अं…?”

“अगं… त्यांचा होकार आला तर आपण काय करणार आहोत? पुढं जायचं का?” आईच्या ह्या प्रश्नावर सोनीला काय बोलावं कळेना. ती नुसतीच आईकडे बघत राहिली.

“अगं काय विचार करतेयस?”

“आई किती प्रेशर टाकताय तिच्यावर? एका भेटीत कसं कळणार?” श्रेयस म्हणाला.

“तू गप्प बस… फार शहाणा होऊ लागलायस.” आईने दटावलं.

“शहाणाचा काय संबंध आहे? कॉमन सेन्स आहे हा.”

“श्रेयस…” बाबांनी नुसतंच त्याचं नाव घेतलं. श्रेयसने सोनीकडे बघून खांदे उडवले आणि खाली बघून जेऊ लागला.

“आई… बाबा…” सोनी खालीच बघून म्हणाली, “मलाही वाटतंय कि अजून एकदा तरी भेटलं पाहिजे… त्या दिवशी खूप कमी बोलणं झालंय आमचं. मला सिद्धार्थला वाईट म्हणायचं नाहीए. पण चांगलं म्हणण्याइतकं इंटरॅक्शनच झालं नाही.”

“ठीक आहे. काय करणार मग त्यासाठी?” बाबांनी विचारलं.

“भेटू का मग?”

“अगं आमचा काही नकार नाही त्यासाठी… तुम्ही ठरवा आणि भेटून घ्या. तोही पुण्यातच आहे.” आई म्हणाली.

“त्याने काही म्हणलं नाहीए तसं”

“मग तू म्हण! नंबर आहे ना तुझ्याकडे त्याचा. कर फोन. मेसेज कर.” आई जरा हायपर झाली.

“हो करते… आत्ताच करते.” म्हणत सोनी उठली.

“भात वाढला नाहीए तुला. उठलीस कशाला?”

“नाही भूक नाहीए मला.” सोनीने ताट उचललं. सिंक मध्ये ठेवलं आणि हात धुवून आत गेली. तिने बेडवर फोन फेकला आणि बाथरूममध्ये गेली.तिने तोंडावर पाण्याचे हबके मारले. तोंड पुसत बाहेर आली आणि भिंतीला टेकून गादीवर बसली.

टुणून!

फोन वाजला. “hey… कुठे गायब झालीस?” निखिलचा मेसेज आला. मेसेज बघून खूप वेळ सोनीने विचार केला मग, “अरे काही नाही. आईने जेवताना फोन वापरू नकोस म्हणून रागावलं” असं टाईप करून पाठवून दिलं.

“हाहाहा… आय थॉट झोपलीस.”

“हम्म…”

“यू नो व्हॉट… कधी कधी मी आईचं रागावणं मिस करतो. फक्त सकाळी आणि रात्री खाण्या-पिण्यावर बोलणं होतं आणि संपतं. आई आजकाल खूप कमी रागावते. व्हेरी रेअरली.”

“हेहे” ‘काहि सुचत नसतानाचा रिप्लाय’ तिने पाठवून दिला.

“काय झालं… एव्हरीथिंग ऑल राईट?”

“उं… काही नाही रे… जरा मूड ऑफ झालाय.”

“काय झालं? कॅन यु शेअर विथ मी?”

“असं काही झालं नाही. असंच छान नाही वाटत आहे.”

“बोल ना…”

“How do you trust someone for life?”

“व्हॉट? एकदम काय झालं?”

“सोड ना… जाऊ दे मी काहीतरी बोलत असते.”

“नाही नाही… सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं” त्याने कान पकडणारा इमोटीकॉन पाठवला, “I think trust is something earned, through actions. Trusting someone for life is a big thing.”

“तुला गर्लफ्रेंड आहे?”

“नाही.” त्याचा पटकन रिप्लाय आला “But how is that relevant?”

“Do you have any plan to get married?”

“Why all of a sudden?”

“Just tell me”

“हो… ऑफ कोर्स! So?”

“मग तुला कसं माहित असणार युअर लाईफ पार्टनर इज फॉर युअर लाईफ, यू कॅन ट्रस्ट देम फॉर एनिथिंग?”

“खरं सांगू… मी हा विचारच नाही केलेला आहे. Right now, I am just focusing on my career.”

“हम्म…”

“पण एक गोष्ट मला माहित आहे. कम्प्लिटली स्ट्रेन्जर मुलीशी मी लग्न नाही करणार आहे. आय हॅव टू नो दॅट पर्सन इन अँड आऊट.”

“किती वेळ लागतो एखाद्या माणसाला पूर्णपणे समजून घ्यायला?”

“बापरे… तू खूपच अवघड प्रश्न विचारतेयस”

“हम्म…”

“हे बघ मला काय वाटतं माहितीय? आपण कधी कधी एखाद्या गोष्टीचा फार विचार करतो आणि ती कॉम्प्लिकेट करतो. मी एखाद्या मुलीला भेटलो, जिचं मला बॅकग्राऊंड माहित आहे. आणि जी मला भेटल्या क्षणी डोक्यात राहिली आहे… आय वूड मीट हर मोअर. मला वाटतं, आपल्याला दुसऱ्या वेळेस ज्याला भेटायची इच्छा नाही होणार, त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात काहीच गरज नसते. आणि ज्या व्यक्तीशी आपल्याला बोलावं वाटतं, भेटावं वाटतं… तिच्याशीच पुढे कोणतंही रिलेशन ठेवण्यात पॉईंट असतो.”

“हम्म… बरोबर आहे.”

“मग अशा वेळेस, ती व्यक्तीही आपल्यात तितकाच इंटरेस्ट घेत असेल… आय मीन, जसा आपला इंटरेस्ट आहे, इट मे बी रोमँटिक, फ्रेंडली, गाईड म्हणून… तर तिच्यावर आपण नक्कीच ट्रस्ट करू शकतो. हो ना?”

“सो… डू यू ट्रस्ट मी?…” असं तिने टाईप केलं पण बॅकस्पेस मारून ते इरेझ केलं आणि नुसतंच “हो…” पाठवून तिने सुस्कारा सोडला.

“मला वाटतंय… जस्ट हँग इन देअर! जास्त विचार नको करुस कसलाच. गो विथ द फ्लो. ओके??”

“ओके…” तिने स्माईली पाठवला.

“दॅट्स इट. स्माईल सूट्स यू… कीप इट ऑन. ऑलवेज.”

“थँक्स निखिल… बरं वाटलं तुझ्याशी बोलून…”

“My pleasure! झोपणार असशील ना आता?”

“हो… थोड्या वेळात झोपीन…”

“मग अजून बोलू शकतो ना?”

“हाहा… काय बोलायचंय?”

“एकदम सिरियस डिस्कशन नंतर काहीतरी लाईट व्हायला पाहिजे ना?”

“मग ‘ब्रिटानिया मारी लाईट’ खा…”

“झोप तू.” त्याने ‘अँग्री इमोटीकॉन’ पाठवला.

“हेहेहे….”

“काय PJ मारतेय सकाळी, सकाळी?”

“रात्री, रात्री…” जीभ दाखवणारा स्माईली.

“काय खाल्लयस आज? नो नो… काय पिलं आहेस आज?”

“हेहे… दारू पिलीय दारू…”

“हाहा… वाईन का व्हिस्की?”

“देशी, देशी…”

“हाहाहा…. कुठला फ्लेवर?”

“संत्रा!” सोनीने डोळा मारणारे स्माईली पाठवले.

“Wow! बरंच नॉलेज आहे की तुला…”

“मग…”

“मग…. बसलं पाहिजे तुझ्याबरोबर… ‘दारू पे चर्चा’ करत.”

“हेहे… नक्कीच.”

“आपण ‘दारू पे स्काईप’ करू मग नेक्स्ट टाईम”

“हो… मग आई-बाबा माझं सामान गुंडाळतील आणि पाठवतील गावाला.”

“चालेल… मग डायरेक्ट फ्लाईट पकडायची आणि इकडे यायचं.”

“तिकीट तुलाच काढावं लागेल मग.”

“काढेन ना…”

सोनीने डोळे मिटून स्माईल करणारा इमोटीकॉन पाठवला.

“कधी येतेस मग?”

सोनीला उगाच गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. ती आडवी झाली आणि पांघरूण घट्ट जवळ घेतलं.

“तूच ये ना…”

“हो… मी येणार आहे नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ.”

“खरंच??”

“हो… कझिनचं लग्न आहे. भेटशील ना तेव्हा…”

“Yes…” सोनी टाईप करता करता स्वतःशीच हसत होती. कोण कुठला शाळेतला क्रश… पण अजूनही बोलताना का गुदगुल्या होतायत काय माहीत. “बाय द वे… तुला खरंच गर्लफ्रेंड नाही… का मी मगाशी एकदम विचारलं म्हणून नाही म्हणालास?”

“अरे….” निखिल टायपिंग…

“काय..?” Still typing….

“इतका वेळ काय टाईप करतोयस?”

“नाहीए गं… मला इथे कोणी तशी मिळालीच नाही, किंवा मी जास्त करिअर फोकस्ड असल्यामुळे मी कधी विचार नाही केला कुणाचा. एका मुलीने प्रपोज पण केलं होतं. काश्मीरची होती. पण ना… असा ‘इमोशनल कनेक्ट’च नाही वाटला कधी तिच्याशी.” फायनली त्याचा मोठ्ठा मेसेज आला.

“म्हणजे On the verge आहे.”

“नाही गं… नाही म्हणून सांगितलं मी तिला. ती पण इतकी सिरियस नव्हती. कारण नेक्स्ट वीक मध्ये ग्रुप मधल्या एका मुलाने तिला प्रपोज केलं आणि They are dating now.”

“बापरे… दॅट वॉज क्विक!”

“हो ना… इकडे असंच असतं सगळं… म्हणून मला कोणी आवडलं नाही… तू जसं म्हणालीस की ट्रस्ट पाहिजे… तसा ट्रस्ट नाही बिल्ड झाला कुणावर.”

“अच्छा…”

“हम्म… बरं चल रात्री मेसेज करतो तुला. मीटिंग आहे आत्ता.”

“हां… सी यू…”

“स्वीट ड्रीम्स!”

सोनीने फोन ठेवला… स्माईल करत डोळे मिटले. अचानक तिच्या लक्षात आलं, तिने सिद्धार्थला मेसेजच नाही केला.

“hi…”तिने मेसेज टाकला. पण ब्लू टीक्स काही आल्या नाहीत.

सकाळी सिद्धार्थचा रिप्लाय आला, “हे… व्हॉट्स अप?”

“Umm… Nothing much. तू काय करतोयस?”

“ऑफिस…”

“अच्छा… ऐक ना…”

“Yes?”

“तुला आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी वेळ आहे का?”

“आय हॅव टू चेक… का?”

“मला वाटत होतं, आपण अजून एकदा भेटूया का… actually त्या दिवशी नीट बोलणं पण झालं नाही… सो…”

“Oh… No problem… मी माझं कॅलेंडर चेक करतो. लेट नाईट मीटिंग नसेल तर वि कॅन मीट. मी संध्याकाळी मेसेज टाकतो.”

“ओके…” म्हणून सोनी कामाला लागली. संध्याकाळ होत आली तसं ती त्याच्या मेसेजची वाट बघू लागली. करत का नाहीए हा मेसेज? मीटिंग मध्ये असेल…! पण इतक्या कसल्या मिटींग्स? आम्ही पण काम करतोच की. साधा एक मेसेज करायला पण वेळ मिळत नाही काय? कॉलच करू का त्याला? नको… खूपच डेस्परेट वाटेल. ऑलरेडी मीच केलाय मेसेज सकाळी. जरा उपकार केल्यासारखेच रिप्लाय करतो नाही हा मेसेजचे? फारच बिझी असतो वाटतं. ऑफिसशीच लग्न कर म्हणावं मग. मुलगी कशाला पाहिजे. वीकेंड्स साठी शोधायचं तात्पुरतं कोणीतरी. बापरे… आपण काय विचार करत बसलोय… असू दे येईल मेसेज. किंवा रात्री मग कॉल करू आपण.

सोनी आपलं काम संपवून घरी गेली. आई आज चक्क TV बघत नव्हती.

“आई… कुठेयस?” सोनीने चप्पल काढत हाक मारली. आई आतल्या खोलीतून बाहेर आली.

“काय गं… आज सिरीयल नाही का तुझी?”

“सोनू…” आईचा आवाज एकदम मलूल झाला होता, “त्यांचा फोन आला होता… एकही गुण जुळत नाही म्हणाले.”

सोनी एकदम सोफ्यावर बसली. तिने बॅगमधून फोन काढला. सिद्धार्थचा मेसेज आला होता, “Hey… I checked my calendar. I am busy this whole week.”

सोनीने फोन सोफ्यावर फेकला. आईकडे नुसतंच कोऱ्या चेहऱ्याने बघितलं. आई तिच्या पलीकडे येऊन बसली.

“काय चुकलं गं?” आईने बारीक तोंड करून विचारलं.

सोनी सुस्कारा सोडत म्हणाली, “काही नाही आई… ‘स्थळ’ चुकलं.”

भाग १३

“जाऊ दे ना सोनू… नको विचार करू इतका… एवढ्यावरून कळतं ना… घराणं कसं आहे. बरं झालं पुढे काही झालं नाही. नाहीतर म्हातारीला रोज सुरळीच्या वड्या घालाव्या लागल्या असत्या तुला. हीहीही…” निरू स्वतःच हसू लागली.

सोनीने बारीक तोंड करून तिच्याकडे बघितलं.

“हस गं जरा…” निरू तिचा उरलेला चेहरा बघून म्हणाली, “सोनी… तसं पण तुला तो खूप मनापासून आवडला होता का? नाही ना… मग बरं झालं त्यानेच नाही म्हणून सांगितलं. उगाच तुझ्यावर प्रेशर आलं असतं नंतर…”

“निरू… तुला आठवतंय ना… आपल्या कॅम्पस सिलेक्शन वेळेस काय झालं होतं? पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर काढलं होतं आपल्याला. काय वाटलं होतं तुला तेव्हा?”

“हम्म…”

“खूप वाईट वाटलं होतं ना? खरंतर आपली कंपनी जास्त चांगली आहे त्या कंपनी पेक्षा… पण इथे सिलेक्शन होईपर्यंत काय हाल झाले होते आपले?” सोनी चालता चालता थांबली आणि कट्ट्यावर बसली. निरू तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. “प्रश्न चांगल्या आणि वाईटाचा नसतो ना दर वेळेस… रिजेक्ट होण्याचा असतो. नाही आवडत कुणालाच आपल्याला रिजेक्ट केलेलं.”

निरू तिच्यापलीकडे बसली. “हो… नाही आवडत. पण म्हणून ऑप्शन्स संपत नाहीत ना… काहीतरी better आपल्यासाठी लिहलंय… म्हणून तर काही ठिकाणी आपल्याला रिजेक्शन मिळतं. ही कंपनी त्या कंपनीपेक्षा 10 times better आहे… हो ना?”

“हम्म…” सोनीने मोठा श्वास घेतला, “चल मीटिंग आहे मला १५ मिनिटांनी” म्हणत फोन मध्ये बघत ती उठली.

मीटिंग मध्ये अनिमेश प्रेझेंट करत होता. सोनी नुसतीच स्क्रीनकडे बघत बसली होती. किती सोपं असतं लोकांना, ‘काहीतरी better लिहलंय म्हणून रिजेक्शन मिळतं ‘ म्हणायला. आणि काय better आहे? काय हातात आहे माझ्या? इतके दिवस झाले… काय better झालंय आत्तापर्यंत. इतकं सगळं चांगलं असून त्याने रिजेक्ट केलं मला. काय माहित खरं… नसेलच माझ्यात काही चांगलं. म्हणूनच कुणाला मी आवडत नाही.

“सुनहरी… सुनहरी…” अनिमेश आपलं नाव घेतोय हे लक्षात येऊन ती दचकली.

“अरे… मैं आपसे पूछ रहा हूँ… इसका due date क्या है?”

“अं…” सोनीला प्रेझेंटेशन वरून नजर फिरवायला १ मिनिट लागला. मग तिने सांगितलं, “16th of next month”

“ओके…” म्हणून त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. सोनीला स्वतःची फारच लाज वाटली. काय नॉन्सेन्स विचार करत बसलोय आपण भर मीटिंग मध्ये. सगळ्यांसमोर कचरा झाला.

मीटिंग संपली आणि सगळे बाहेर निघाले. मिता आणि ती दोघी एकाच वेळेस दारापाशी आल्या. “क्या बात है?? बहोत खयालों में खोई रहती हो तुम आजकल?” असं म्हणून तिने सोनीच्या दंडाला ढोसललं.

हिच्या नाकावर एक बुक्की ठेऊन देऊ का? सोनीच्या डोक्यात एकदम विचार आला. पण ती मिताकडे बघून नुसतंच हसली.

रूम मधून बाहेर पडून ती तरा-तरा डेस्कजवळ गेली. लॅपटॉप उघडून उगाच वाचलेले मेल्स परत वाचू लागली. थोड्यावेळाने तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून मागे पाहिलं, कोणीतरी उभं आहे असं तिला लक्षात आलं.

“क्या हुआ सुनहरी?” आकाश मागे आला होता.

“क्या… कुछ नही…”

“आर यू अपसेट अबाऊट समथिंग?”

“नो… क्यूँ? ऐसा क्यूँ पूछ रहे हो?”

“कुछ नही… You are not talking much… ये २-३ दिन से”

सोनीला लक्षात आलं की आपण फारच सॅड फेस करून बसलो आहोत… मग ती खोटं-खोटं हसली, “हेहे… अरे वो मीटिंगमे मुझे नींद आ रही थी… इसलिये मुझे समझा नही अनिमेश मुझे पूछ रहे थे…”

आकाशने तिच्या डोळ्यात बघितलं, “यू आर अ व्हेरी बॅड लायर.” एवढंच म्हणून तो निघून गेला.

शीट! आपल्या चेहऱ्यावरच लिहून येतंय की काय सगळं? बास झालं आता नाटक… पुरे आता हा सगळा विचार… आणि काय झालंय एवढं मोठं? आपल्याला त्याच्यावर काही प्रेम वगैरे नव्हतं. आई-बाबांना पसंद आहे म्हणून आपणही तयार झालो होतो. इतकं झुरण्याची काही एक गरज नाही. फालतू कुठला. एवढे पण गट्स नाहीत की तोंडावर सांगेल… नाही आवडलं म्हणून. Whole week बिझी आहे म्हणे. आणि काय तर नाटक… इंग्लिश झाडत असतो उठून सुटून. का मराठी बोलायला जिभेला वळसे पडतात काय… हीही… देऊळ बघुयात आज रात्री. ह्या मुर्खाचं काय रडणं घेऊन बसायचंय? आणि आहेत की कितीतरी ऑप्शन्स.

टुणून!

‘श्रीजित शिंत्रे सेंट यू रिक्वेस्ट.’

घ्या अजून एक आला… बघू… दिसायला आहे ठीकठाक. Works at Mahindra Pune. पॅकेज १० लाख. नॉट बॅड! See… आहे ना हा पण चांगला. इतका गोरा नाही. पण रंगाचं काय लोणचं घालायचं? वाव!! आपण म्हणजे आज फुल ऑन वाक्प्रचार वगैरे वापरतोय. करूयात ह्या श्रीजितची रिक्वेस्ट accept. खड्ड्यात गेला सिद्धार्थ मालपेकर.

सोनी जागेवरून उठली आणि आकाशच्या डेस्कजवळ गेली. “चलो… चाय पिने चलते हैं.” आकाशचे फाकलेले डोळे तिला त्या भिंगाच्या चष्म्यातूनदेखील दिसले.

“क्या हुआ?”

“वही मैं भी सोच रहा हूँ… क्या हुआ तुम्हे?”

“कुछ नही हुआ… तुम आ रहे हो के नही…”

“चलो… तुम्हारे मूड का कुछ पता नही होता” म्हणत आकाश पट्कन उठला. दोघेही खाली चहाच्या टपरीवर गेले. एक कॉफी आणि एक चहा घेऊन टपरीपासून थोड्या अंतरावरच्या कट्ट्यावर जाऊन बसले.

“और बताओ आकाश…. क्या चल रहा है तुम्हारी लाईफमे?”

“एकदमसे लाईफ पे क्यूँ चली गयी तुम?”

“ऐसेही पूछ रही हूँ…”

“कुछ खास तो नही… अभी ये प्रोजेक्ट खतम होने के बाद थोडा घुमने के लिये जानेका सोच रहा हूँ.”

“कहाँ जाओगे?”

“साऊथ जानेकी सोच रहा हूँ… चलोगी?”

“मै तो सीधे तीर्थयात्रा पे जाऊंगी…”

“हाहाहा… क्या हो क्या गया है आज तुम्हे? तुम्हारी कॉफी इधर दे दो जरा…” म्हणून तिच्या हातातला कप त्याने घेतला. कॉफीचा वास घेऊन बघितला.

“क्या कर रहे हो??”

“कॉफीमे कुछ मिला है क्या देख रहा हूँ… हाहाहा…”

“हेहे… कुछ मिल भी होता ना… तभी भी मुझपे कोई फरक नही पडता… I am above all this. तुम्हे एक बात बताऊं? मेरा ना… कुछ नही हुआ तो मै सीधे अंटार्क्टिका जाऊंगी… और पेंग्विन्स पालूंगी.”

आकाश जोरजोरात हसू लागला. “अंटार्क्टिका!! Wow… that’s a really nice dream. You know you wouldn’t even have to worry about food or anything. You will anyway die soon.”

“हां क्या… फिर तो मै पक्का वही पे जा रही हूँ…”

“क्यूँ भाई… ऐसा क्या हो गया?” आकाशचं हसणं बंद झालं.

“कुछ नही यार… Life has become so unpredictable… You can never guess what’s going to happen next. And this anxiety and uncertainty is taking so much energy out of me. छोटे बच्चे थे तब सही था… किसी चीझ की चिंता नही करनी पडती थी. इतना ही क्या… कॉलेज तक भी सब ठीक था. पता था की एन्जॉय करना है, पढाई करनी है और कॅम्पस मे सिलेक्ट होना है.”

“राईट… और अभी इस स्टेज पे ऐसे हो गया है ना… अब आगे क्या करना है पता नही.” आकाश आपला आणि तिचा संपलेला कप एकात एक ठेवत म्हणाला.

“हां… बहोत सारी चिझे अभी अपने होने वाले पार्टनर पे डिपेन्ड करती है.”

“और साला… जल्दी कोई मिल भी नही रहा… है ना?

“Correct!”

“और लगता है… इतनी क्या बुराई है हम मे की किसीको हम पसंद ही नही आते…”

“Exactly… यार इसका मतलब हम तो समदुःखी है…”

आकाश खाली बघून स्वतःशीच हसला, मग त्याने डायरेक्ट तिच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाला, “राईट!”

“चलो… हम दुखे-हारे लोग… चलते हैं, काम करने के लिये.” म्हणत सोनी उठली.

“वैसे वो पेंग्विन्स का क्या बोल रही थी तुम?”

“अरे… मुझे ना बचपन से पेंग्विन्स पसंद है. लोग कुत्ते पालते हैं… मुझे बचपन मे पेंग्विन्स पालने थे.” सोनी हसत हसत म्हणाली.

डेस्कवर जाईपर्यंत पेंग्विन्स, पोलार बेअर, व्हाईट टायगर, टायगर बाम, मग झंडू बाम ची ‘जिंगल’ असं करत करत ते ‘निमा रोज, निमा रोज’ वर पोचले. सोनी तिच्या डेस्कवर आली. तिने लॉगिन केलं तेवढ्यात आकाशचा स्काईप वर मेसेज आला, “चलोगे क्या ट्रिप पे?”

“हां… देखते हैं…” सोनीने सोबत स्माईली पाठवला.

संध्याकाळी ६ वाजताच सोनीने दुकान बंद केलं.

“जल्दी जा रही हो आज?”

“हां यार… बोअर हो रहा है! निकलती हूँ… कल जल्दी आ जाऊंगी.” सोनीने आकाशला Bye केलं आणि निघाली.

घराचं दार उघडून सोनी आत आली आणि दरवाज्यातच थबकली. हळूच चप्पल काढून स्वैपाकघरात जाऊ लागली.

“सोनपरी…. आलीस तू??” हॉलभर आवाज घुमला.

“हेहे… तू कधी आलीस आत्या?” सोनीने उगाच तोंडभर हसून विचारलं

“आले ४ वाजताच. तुझीच वाट बघत होते बघ… ये ये बस…” आपल्या पलीकडच्या जागेवर विजुआत्याने दोनदा हात आपटला.

“हो आलेच मी… डबा ठेऊन आले.” सोनी पटकन किचन मध्ये गेली.

“ही कशी काय आली आज?” ती आईच्या कानात खुसफुसली.

“हम्म… आणि कोथिंबीर आणलीय स्वस्त होती म्हणून… वड्या करायला.” आई वड्यांचं सारण ताटात पसरत म्हणाली.

“येतेस का??” विजूआत्याची जोरदार हाळी आली.

“हो हो आले….” सोनीने ओरडून सांगितलं आणि आईला हळूच विचारलं “काय काम काढलंय?”

“तूच विचारून घे आता.”

सोनीने आईकडे डोळे बारीक करून बघितलं. आणि बाहेर गेली.

“काय गं आत्या?” सोनी तिच्यापलीकडे जाऊन बसली. तिचा हात आपोआप डोक्याकडे गेला.

“काय गं झालं… डोकं दुखतंय का? ये बस खाली इथे. मी चेपून देते.” म्हणून आत्याने तिला हाताला धरून खाली बसवलं.

“फारच काम करता गं… सारखं तो कॉम्पुटर बघून त्रास होतो हा…”

“हम्म…”

“आणि डोक्याला ताप काय कमी आहेत…”

“हो…”

“मी म्हणते… बरंच झालं घे… त्यांच्यापेक्षा चांगलं घराणं मिळेल आपल्याला”

अच्छा… म्हणजे ह्यासाठी आलीय तर. जखमेवर मीठ चोळायला… वा! आज आपण फुल ऑन…

“म्हणे गुण जुळले नाहीत… स्पष्ट सांगायचं ना… दुसरं स्थळ पसंत आलं म्हणून. असला खोटेपणा कशाला करायचा…”

“हम्म…” सोनीचं डोकं अजूनच ठणकू लागलं.

“ताई… विषय संपलाय तो आता… परत परत कशाला उगाळायचं?” आई नॅपकिनला हात पुसत बाहेर आली.

थँक गॉड आई… आई म्हणजे आपली बेस्ट रेस्क्युअर आहे!

“हो… तेच म्हणते मी पण… आता तिथेच अडकून राहायची काही गरज नाही. आपल्याकडे दसपट चांगलं स्थळ चालून आलंय.”

सोनीने गर्र्कन मान वळवली… आई गं… लचकली… मानेला हात लावून सोनी वर उठली आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली.

विजूआत्याने बॅगमधून एक कागद काढला, चष्म्याच्या केसमधून चष्मा काढला, डोळ्यांवर चढवला,

“नाव: आदित्य श्रीपाद नवले.

आईचे नाव: सारिका श्रीपाद नवले

भावंडे: १ भाऊ, श्रीकांत श्रीपाद नवले, (लग्न झालेले आहे)

शिक्षण: MTech फ्रॉम IIT राउरकेला.

जॉब: इ… इमर्सन… प्रॉडक्ट मॅनेजर.

जन्मतारीख: १८ मार्च १९८७. म्हणजे ३ वर्षं मोठा

राहणार: धायरी, पुणे.

पॅकेज: १२ L.P.A.

हे घे फोटो बघ.” आत्याने आईकडे फोटो दिला. “हां… तर महत्वाची गोष्ट ही आहे, की मुलाला वडील नाहीत. ४-५ वर्षांपूर्वीच काहीतरी ते वारले आहेत. त्यामुळे घरी फक्त आई आणि मुलगा असतो. मोठा भाऊ आणि त्याची बायको मुंबईला असतात. त्यामुळं सारखा काही संबंध नाही. पगार चांगला आहे. स्वतःचं घर आहे. दिसायला मुलगा एकदम तुला शोभेल असा आहे.”

“हो… चांगलं आहे की स्थळ. नाक जssरा बसकं आहे. आणि अंगाने जरा बारीकच वाटतो. पण ठीक आहे. बाकी सगळं चांगलं वाटतंय.”

“आहेच मुळी… मी काही असलं तसलं स्थळ नाही आणणार आमच्या सोनीला. जाती-कुळी वगैरे सगळं चेक केलेलं आहे मी आधीच. त्यामुळे त्याची चिंता नको.”

सोनीला तो बायो-डेटा आणि तो फोटो आणि तो मुलगा आणि त्याची फॅमिली… ह्यातलं काहीएक बघायची इच्छा होत नव्हती.

“ठीक आहे… ह्यांच्याशी बोललात का तुम्ही?” आई म्हणाली.

“हो दादाशी बोलले मी फोनवरच. येत्या रविवारी ठरलाय आपला भेटायचा कार्यक्रम. कसंय… माझ्या मैत्रिणीच्या ओळखीच्या आहेत त्या… म्हणजे मुलाची आई. तर माझ्या इकडेच भेटू आपण. शितल येईलच आपल्या मदतीला, त्यामुळं पाहुणचाराची काही चिंता नाही.”

“अगं आत्या… एवढ्यात कसं काय ठरवलंस तू… मला विचारायचं तरी एकदा” सोनी जरा वैतागली.

“अगं… त्यात काय एवढं आता… रविवारचे २-३ तास काढता येतील ना तुला… तुझ्या बिझी शेड्युल मधून?” आत्याने टोमणा मारला.

“जरा तरी ब्रेक घेऊ द्या ना…”

“सोनू… ठीक आहे. आलंय स्थळ चालून तर झिडकारायला नको. काय माहित… कधी जुळेल. ह्या गोष्टी अशा सांगून होत नाहीत. आलेली संधी नाकारायला नको.” आई समजावणीच्या सुरात म्हणाली.

“बरोबर बोलतेय तुझी आई…” आत्याने लगेच री ओढली. तेवढ्यात बाबा आले. “दादा… बरं झालं आलास… आत्ताच ह्यांना मुलाचे फोटो दाखवत होते. रविवारी ठरवलाय कार्यक्रम.”

“हो का… बरं बरं… चालेल… सोनाबाई… तुम्हाला चालेल ना?”

“मला कोण विचारतंय” म्हणून सोनी झटक्यात उठली आणि तरा-तरा तिच्या खोलीत गेली. ती सरळ जाऊन गादीवर आडवी झाली आणि उशीत तोंड लपवलं.

थोड्यावेळाने आई आत आली, “सोनू… उठ बाळ जेवायला घेतलंय.”

“मला भूक नाहीए आई. तुम्ही घ्या जेऊन.”

“उठ… नाही ती नाटकं नकोयत. काही झालं नाहीए एवढं. फक्त बघायला जायचं आहे. कोणी लगेच तुला मुंडावळ्या बांधत नाहीए.” आईचा आवाज जरा चढला.

सोनी उठली आणि सरळ जेवणाच्या टेबलवर गेली. आपल्या ताटात तिने अर्धी पोळी आणि भाजी वाढून घेतली. आणि गपा-गपा गिळू लागली.

आई आली आणि तिने बाकी सगळ्यांना जेवण वाढलं. स्वतःच्या ताटातलं संपवून सोनी उठली.

“अगं… वडी खाल्लीच नाहीस की तू.” आई म्हणाली.

सोनीने समोरच्या प्लेटमधली एक वडी उचलली आणि ताट सिंक मध्ये ठेऊन ती सोफ्यावर येऊन बसली. तिने TV लावला आणि AXN वरचा रिऍलिटी शो बघत बसली.

“वहिनी… अगं रागावू नये ह्या वयात मुलांना…”

“हम्म… जेवणाच्या बाबतीत माजोरडेपणा केलेला मला नाही खपत.”

“असू दे… हेच वय असतं आई-बाबांसमोर हट्ट करायचं… अजून काही दिवसांनी सगळंच बंद होतं.”

सोनीने TVचा आवाज वाढवला.

जेवण संपवून आत्या निघाली. “सोना… इकडे ये.” दारापाशी उभे राहून तिने सोनीला हाक मारली. सोनी नाईलाजाने उठून तिच्यापाशी गेली. आत्याने बॅगमधून छोटीशी पुडी काढली. त्यातली कसलीशी पूड होती. त्यातली चिमूटभर पूड तिने सोनीच्या हातावर ठेवली.

“हे खा.”

“शी… हे काय आहे?”

“अगं जिभेला काही हाड!! अंगारा आहे तो. कण्हेरी मठातले जयेंद्र महाराज आहेत त्यांचा. सिद्धी प्राप्त आहे त्यांना. त्यांचा आशीर्वाद लाभला की सगळं छान होतं बघ. खाऊन टाक पटकन.”

सोनीने आईकडे बघितलं. आई नजर चुकवत होती. सोनीने तळहातावरच्या अंगाऱ्याकडे बघितलं आणि तो तोंडात घातला.

“गुड गर्ल.” आत्या म्हणाली. “येते रे दादा… वहिनी… ये गं रविवारी. मी करतेच फोन” म्हणत ती बाहेर पडली.

सोनीने आईकडे कोऱ्या चेहऱ्याने बघितलं आणि काहीच न बोलता सरळ आपल्या खोलीत गेली.

भाग १४

“का डिस्कस करतोय आपण अजून सुद्धा? तुम्हाला खरंच वाटतंय का हे पुढं जावं म्हणून?” सोनी कॉफीचा मग खाली ठेवत म्हणाली.

“अगं… पण आता आत्याला काय सांगायचं तुझ्या?”

“काय सांगायचं म्हणजे काय आई? तिला काय सांगायचं म्हणून मग तू मला तशा फॅमिलीत पाठवणार आहेस का?”

“हो गं… काहीही बोलत होती त्याची आई तरी. काय तर म्हणे, “आज काल मुली शिकल्या तर त्यांना वाटतं की आपण काहीही करू शकतो”… ह्यांना वाटतं, सुनेने ह्यांच्या मुठीत राहावं कायम. गेले ते दिवस म्हणावं आता…” आईने नाक मुरडलं.

“हो ना?? काही माणसं अजून त्या बॅकवर्ड माईंड सेट मधून बाहेरच पडलेली नाहीएत. अशा लोकांशी आयुष्यभर नाही बाबा डील करू शकत”

“मग तूच सांग बाई बाबांना… ते सांगतील मग तुझ्या आत्याला.”

“च्… ढकललंस माझ्यावर” सोनी डोक्याला हात मारून घेत म्हणाली.

“बरं बाई… सांगते मी.”

~Tang dang da dang… So no one told you life was gonna be…

सोनीने फोन उचलला आणि बोललीच नाही. काही सेकंद गेले मग म्हणाली,

“काय बोलू आता?

हो… मग तू पण केला नाहीस ना फोन.

किती थापा मारशील?

हो… आहे फ्री…

किती नाटक करतोयस यार… Genuine issue होता ना त्यावेळेस.

का मी का सांगू तुला?” सोनी हॉलमध्ये फेऱ्या घालत बोलू लागली.

“सोनू… कुणाशी बोलतेयस असं उद्धटपणे?” आईने विचारलं.

सोनीने नुसताच आईला ‘थांब’ असा हात केला.

“हम्म…बरं चल… निघायचंय मला ऑफिसला. व्हाट्सऍप वर बोलते.” म्हणून सोनीने फोन ठेवला.

“कुणाचा फोन होता?” आईने पुन्हा विचारलं.

“अक्षयचा”

“कोण अक्षय?”

“कॉलेजचा मित्र गं… एकदा घरी आलेला बघ…”

“आठवत नाही गं… बघू फोटो बघू…”

सोनीने डोक्यावर हात मारला आणि, “हे बघ हा…” म्हणून त्याचा व्हाट्सऍपचा डीपी तिला दाखवला.

“अच्छा… हा होय…” आईने फोटो निरखून बघितला. तिला अजूनही तो आठवलेला नाहीए हे सोनीला कळलं होतं. “बरं काय करतो हा?” आईने फोन परत देत विचारलं.

“मुंबईला MBA करतोय.”

“अच्छा… म्हणजे जॉब नाहीए अजून.”

“नाही… पण मिळेल… हुशार आहे तो…”

“बर… तसा सावळाच आहे. पण आहे, चांगला आहे…”

सोनीने डोळे वर फिरवले. “आई… “मित्र” आहे तो… कोणीही मुलगा दिसला की तुला फक्त हेच दिसू लागलंय.”

“हम्म… जा जा… वेळ होतोय ऑफिसला” आईने नाक मुरडलं.

“हां… आणि हो आज संध्याकाळी त्या मुलाला भेटायला जायचं आहे. त्यामुळं मी जेवूनच येईन. “

“नाव काय म्हणालीस ह्याचं?”

“सारंग सरंजामे.”

“अच्छा… आपल्यातलाच आहे का हा?”

“आई…” सोनीने नुसतंच डोकं हलवलं.

“अगं नुसतं विचारलं…”

“हम्म…” म्हणत हेल्मेट उचलून सोनी घराबाहेर पडली.

सारंग सरंजामेने ‘जीवनसाथी’ वरून कॉन्टॅक्ट केला होता. “आय थिंक आय हॅव सीन यू समव्हेअर…” असा पहिलाच मेसेज त्याने केला होता. “आय डोन्ट रिअली नो यू” असं सोनीने सांगितल्यावर, “Off course you won’t know me. I am not as beautiful as you to remember, you know…” असा मस्का त्याने मारला होता. जनरल बॅकग्राऊंड चेक वरून तरी ‘सारंग’ सोनीला बरा वाटला होता. शिवाय त्याचे फोटोज! त्याने बाबांच्या बिझिनेस मध्ये मॅनेजिंगची कामं न करता मॉडेलिंग केलं असतं तरी चाललं असतं. Meanwhile तो तिचा फेसबुक फ्रेंड झाला. Instagram follower झाला. त्याच्या फेसबुक आणि इन्स्टा pics वर निरूचं आणि सोनीचं बरंच डिस्कशन पण झालं. फ्रेंडलिस्ट मध्ये निम्म्याच्या वर मुलीच आहेत हे बघून ‘गोकुळातला हरीच आहे हा’ असं conclusion निरूने काढलं. सोनीने घरी फार काही सांगितलं नाही ह्याच्याबद्दल. आईच्या फारच चौकश्या सुरु होतात.

“I am the YOLO kind of guy. I don’t like to linger around things for a long time. So are you free this week? I would be honoured to take you out for dinner or something.” असं म्हणून त्याने लगेचच मीटिंग इन्व्हाईट पण टाकलं होतं.

संध्याकाळचे ६ वाजले आणि त्याचा फोन आला. ७ वाजता Copa Cabanaला भेटायचं ठरलं. जरा एक्सपेन्सिव्हच प्लेस निवडली होती त्याने. सोनीला वाटलं, अगदीच भंगार नको जायला. तिने ऑफिसच्या बाथरूम मध्ये जाऊन थोडा मेकअप केला. केसांना जरा वेगळ्या प्रकारे सेट केलं.

नेमकं बाहेर पडताना तिला आकाश दिसला. त्याला चुकवून पट्कन पुढे जावं म्हणून ती घाईघाईत जाऊ लागली.

“अरे सुनहरी…” त्याने हाक मारलीच. आता मात्र वळून थांबणं भाग होतं.

“निकल रही हो क्या?” म्हणत बॅग खांद्याला अडकवत तो जवळ आला आणि एकदम थबकला. त्याच्या भुवया आपोआप वर गेल्या. सोनीला ऑकवर्ड वाटू लागलं. त्याच्याकडे बघून तिने लगेच मान खाली घातली. शी… आता हा विचारेल, कुठे चाललीस म्हणून. काय सांगू… मैत्रिणीची पार्टी आहे. कशाबद्दल… अं… B’day आहे म्हणून सांगूया. तिने वर बघितलं… आकाशने ऑलरेडी चालायला सुरुवात केली होती.

“हां… अरे वो ना… एक फ्रेंड की पार्टी है….” सोनी उगाच सांगू लागली. आकाश हसला, त्याने अंगठा वर केला आणि म्हणाला, “Looking nice!” ह्यावर सोनी काही बोलायच्या आत तो दृष्टीआड गेलादेखील.

सोनी थोडावेळ तिथेच थांबली. तो लिफ्टमध्ये चढून खाली गेलाय ह्याची खात्री झाल्यावर ती लिफ्टमध्ये चढली.

CopaCabana च्या बाहेर जाऊन तिने सारंगला फोन केला.

“Hey… come inside no!”

मग ती आत गेली. त्याने छान पूल-साईड टेबल निवडलं होतं. सोनीला सगळं बघून ‘ऑकवर्ड-स्क्वेअर’ वाटू लागलं होतं.

“You are looking gorgeous Ma’am!” त्याने उठून तिला ग्रीट केलं.

“सॉरी… मला वेळ नाही ना झाला फार?” त्याच्या ऑपोझिट चेअर वर बसत सोनी म्हणाली.

“No worries! मला सवय आहे मुलींची वाट बघण्याची” त्याने डोळा मिचकावला.

“मुलींची!?” सोनीला डोळे फाकवून हे म्हणायची इच्छा झाली. पण बाहेर ती नुसतंच हसली.

“सो… वूड यू लाईक सम वाईन टू स्टार्ट विथ?

ह्यावर मात्र सोनीचे डोळे रिफ्लेक्स ऍक्शन ने फाकले. “नो… आय डोन्ट ड्रिंक”

“रिअली??” सारंगने भुवया उंचावल्या.

“आय मिन… आय ड्रिंक occasionally…”

“सो धिस इज नॉट द occasion इट सीम्स. नो प्रॉब्लेम. मी घेतलेलं चालेल ना? मला बिअर शिवाय डिनर पचत नाही… हाहाहा”

“हाहाहा…” सोनी उगाच हसली.

“स्टार्टर्स मध्ये काय?”

“अं… काहीही चालेल मला.”

“चिकन?”

“अं… चालेल”

त्याने वेटरला बोलावलं. तो ऑर्डर देत होता आणि सोनी त्याला न्याहाळत होती. खरंच हँडसम आहे हा. त्याच्या तलम शर्ट मधून त्याचे ऍब्स जाणवून येतायत. ह्याने का बरं मला रिक्वेस्ट पाठवलीय? ह्याला तर कोणी पण मिळून जाईल.

“हॅलो…” त्याने तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवला.

“हं…”

“काय विचार करतेय?”

“अं… काही नाही…”

“ओके… लेट्स प्ले अ गेम. मी तुला ऑपशन्स देतो त्यातला एक choose करायचा. जास्त विचार न करता.”

“ओके…”

“डे ऑर नाईट?”

“नाईट”

“ओक्के… जंगल की समुद्र”

“अं… आय डोन्ट नो… समुद्र!”

“फ्रेंच ऑर सुपरमॅन?”

“व्हॉट? How is that relevant?”

“So, you didn’t get what am I asking?”

“नाही…”

“बापरे… फारच इनोसंट आहेस तू!”

“म्हणजे…”

“नथिंग… I got what I wanted to know. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर पुढे जाण्यात काही पॉईंटच नाही… हाहाहा…” त्याने बिअरची बॉटल तोंडाला लावली.

“सॉरी मला खरंच नाही कळलं…” सोनी थोडी अस्वस्थ झाली.

“इट्स ऑल राईट! I adore innocence. I just hope you are not too much innocent. असो. तू घे ना… सुरु कर खायला.”

“अं… हं…” सोनीने समोरच्या प्लेटमधला छोटासा तुकडा उचलला.

“तुला बॉयफ्रेंड वगैरे नव्हता?” त्याने चिकनचा तुकडा कापत विचारलं.

“नाही…”

“स्ट्रेंज… मग any friend with benefits?”

“Whatt?? No…” सोनीने कपाळाला आठ्या घातल्या.

“What’s to be so shocked about it?”

“There’s nothing shocking about it?”

“मला काही नाही वाटत… आय हॅव सम फ्रेंड्स लाईक दॅट.”

“अँड दे आर प्रॅक्टिसिंग धिस रिलेशनशीप?” सोनीला आपला हार्ट रेट वाढल्या सारखं वाटू लागलं.

“Yeah… Even I was… back in the college.”

सोनी एकदम गप्प झाली. तिला काय बोलायचं कळेना. ती नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली.

“हे… आपण 21st century मध्ये आहोत. डोन्ट ऍक्ट सो शॉक्ड. धिस ऑल इज सो कॉमन.”

“हो… पण माझ्यासाठी नाहीएएए!!” सोनीला जोरात ओरडावं वाटलं. पण ती काहीच बोलली नाही.

“अरे… ह्या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत ना यार… See… तुला एखादा मुलगा दिसायला आवडला. बोलायला आवडला. पण देअर इज अ थिंग कॉल्ड फिजिकल कॉम्पॅटिबिलिटी. ती कशी कळणार आहे तुला?”

सोनीचं डोकं भणभणू लागलं होतं. तिला वाटू लागलं उठून जावं.

समोरचं स्टार्टर संपत आलं होतं. त्याने विचारलं, “मेन कोर्स मध्ये काय घेणार?”

“न… नाही… नको… भूक नाहीए.”

“डाएट कॉन्शस अँड ऑल हं…”

“नाही… खरंच भूक नाहीए. Actually मला वेळ पण होतोय… घरी पोचायला उशीर होईल.”

“ओह… ओके… फाईन. मी घरीच जाऊन खाईन मग. लेट मी जस्ट फिनिश धिस बिअर.”

बिअर संपवता संपवता त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. इंडियन्सनी कसं ह्या गोष्टींना openly accept केलं पाहिजे. आपल्या इकडे सेक्स इज सो बिग डील. शेवटी एव्हरीथिंग बॉइल्स डाउन टू फिजिकल. लग्न पण ह्याच गोष्टीसाठी करतात ना. खरंतर ओपन मॅरेज ही कॉन्सेप्ट त्याला पटली आहे. इट्स हेल्दी.

सोनीला आता गरगरायला लागलं होतं. त्याने शेवटी बिअर संपवली आणि बिल मागवलं. सोनीने आपली पर्स काढली.

“डोन्ट बॉदर डिअर… इट्स ऑन मी.” त्याने पैसे काढले. बिलासोबत ठेवले आणि तो उठला. तो उठलेला बघून सोनीदेखील उठली आणि सरळ चालू लागली.

“हे…wait… लेट मी ड्रॉप यू आऊट साईड.”

“नाही… मला उशीर होतोय…” म्हणून सोनी तिथून स्पीडवॉक करत सुटली. बाहेर जाऊन तिने गाडी काढली. स्टार्टर मारला आणि एकदाही मागे वळून न पाहता निघाली. थोडंसं अंतर जाऊन तिने गाडी थांबवली, डोळ्यांवरून हात फिरवला, मोठा श्वास घेतला आणि पुन्हा गाडी सुरु केली ते डायरेक्ट घराच्या पार्किंगमध्येच बंद केली.

पायऱ्या चढून ती वर आली. दार उघडतेय तोच विजुआत्या दिसली. आत्या, बाबा, आई, श्रेयस सगळेच सोफ्यावर बसले होते. श्रेयस पटकन उठला आणि तिच्या जवळ गेला. “जस्ट डोन्ट अग्री विथ देम.” असं काहीसं कानात पुटपुटून तो आतल्या खोलीत गेला.

“कसा होता मुलगा?” बाबांनी विचारलं.

“अं… जरा जास्तच फॉरवर्ड वाटला.” सोनीच्या तोंडातून निघालं.

“कधी फॉरवर्ड म्हणून नाही… कधी बॅकवर्ड म्हणून नाही… काय होणार आहे कुणास ठाऊक” आत्या बोलली. सोनीच्या डोक्यात सणक गेली. ती काहीतरी झणझणीत उत्तर द्यावं म्हणून विचार करू लागली. तेवढ्यात आई बोलली,

“सुनहरी… आमच्या सगळ्यांचं ठरलं आहे. आपण तुझी ग्रहशांती करणार आहोत.”

“म्हणजे?” सोनी स्तब्ध झाली.

आत्या तिरकस आवाजात म्हणाली,”ते तुला कळेलच ह्या रविवारी!”

भाग १५

“१ किलो गहू, कॉपरचा तांब्या, चांदीची अंगठी, रेशमी कापड, तूप २ किलो, कापराच्या पुड्या….” आई लिस्ट मध्ये बघून बघून एक-एक वस्तू टेबलावर ठेवत होती.

“व्हॉट्स अप मॉम… व्हॉट इज धिस शीट?” श्रेयस फुटबॉलला बास्केट बॉल सारखा जमिनीवर आपटत आपटत डायनींग टेबलाजवळ गेला.

“फटके देऊ का?” आईने हात दाखवला, “शीट म्हणे… पूजेचं साहित्य आहे ते… तोंड दिलंय देवानं म्हणून बडबडायचं काहीही…”

“आई… चिल्ल!”

“चिल्ल म्हणे चिल्ल…” आई उरलेल्या वस्तू काढून ठेवू लागली. “राजनंदिनीला म्हणावं सकाळ झाली असली तर उठा…” जोरजोरात ओरडून तिने सोनीला टोमणा मारला.

सोनी खोलीच्या दारात आली आणि त्याच टोनमध्ये ओरडली, “माँसाहेबांना म्हणावं सकाळी सकाळी दंगा कमी करा… उठलीय मी कधीच!”

“मग काय आमंत्रण पाहिजे बाहेर यायचं? आवर आणि ये… बरीच कामं आहेत उद्याची.”

सोनी बाथरूममध्ये गेली. शी… काय चालवलंय हे घरातल्यांनी. असं का अडाणी लोकांसारखं करतायत? त्या आत्याला एक कामं नाहीएत. स्वतःला काही संसार नाही… उगाच दुसऱ्यांच्या मध्ये मध्ये येते लुडबुडायला. च्… काय विचार करतोय आपण. तिच्यावरची वेळ कुणावर येऊ नये. पण तरी यार… मला नाहीए करून घ्यायची ग्रह-शांती आणि फालतू काहीतरी. मी नीट कॉ-ऑपरेटच नाही करणार त्या भटजीसमोर. साधा कधी उपास केला नाही मी आत्तापर्यंत. आणि हा मला व्रत करायला लावणार. मी नाही काही करणार उपास-बिपास आणि रोज उठून पूजा… हे असल्या पूजा करून लग्नं जमत असती ना तर खूप झालं असतं. आणि सगळं जाऊ दे. आई-बाबांना काय झालंय… का नको त्या गोष्टीसाठी मला फोर्स करतायत?

सोनीचं डोकं तापत होतं. बाथरूमच्या दारावर टकटक झाली. सोनीने नळ बंद करून विचारलं, “काय?”

“लवकर आवर… आईचा Volcano फुटायच्या आत!” श्रेयसने बाहेरून वॉर्निंग दिली.

सोनी पटापट आवरून किचनमध्ये गेली. “काय करायचंय?”

“शेपू निवडायला घे.”

“शेपू??” सोनीने तोंड वाकडं केलं.

“मग आण काय हवंय ते मंडईतून… जा…”

“निवडते, निवडते…” सोनीने फुरंगटून फ्रिजमधून शेपूची पेंढी काढली. एक ताट घेऊन त्यात ती पानं निवडून टाकू लागली.

“उद्या सकाळीच येणार आहेत ते पंडित… ७.०२चा मुहूर्त आहे. पूजा सुरु करायचा. सकाळी ६लाच उठायचं आहे. डोक्यावरून अंघोळ करून लाल कपडे घालायचे आहेत. कुर्ता आहे ना तुझा तो लाल?” आई सामान परत गोळा करत सांगत होती.

“हम्म…” सोनीचा हात डोक्याकडे गेला.

“डोकं धरून बसायला काय झालं? तुझ्या भल्याचंच चाललंय ना?” आईचा आवाज जरासा चढला.

“तुम्हाला माहित आहे ना… भल्याचं आहे… मग माझा काय संबंध…” सोनी वैतागून म्हणाली.

“हो… बरोबर आहे… आमच्यासाठीच चालू आहे सगळं. तुझा काही संबंधच कुठे येतोय… तसं पण आयुष्यभर एकटी राहिलीस तर तुला काय फरक पडणार आहे… फरक आम्हालाच पडतोय.”

“हो… मला काहीच फरक पडत नाही. मला माझ्या आयुष्याची काळजीच नाहीए. इन फॅक्ट मला माझ्या आयुष्याची वाट लागलेलंच बघायचंय”

“काय चाललंय दोघींचं?” दोघींचा चढलेला आवाज ऐकून बाबा किचनमध्ये आले.

“विचारा तुमच्या मुलीलाच!” म्हणून आई फणकाऱ्यात जाऊन खुर्चीवर बसली.

“काय झालं सोनी?”

सोनी नुसतीच गप्प बसून शेपू निवडू लागली.

“अहो हिला वाटतंय की आम्ही अन्यायच करतोय हिच्यावर” आई हातवारे करत म्हणाली.

“सुलू… तू शांत हो आधी. ती लहान आहे अजून. काही गोष्टी शांततेत समजावल्या पाहिजेत.”

“काय आता शांततेत सांगायचं? इतकी पण लहान नाहीए ती… तिला सुद्धा कळतंय ना काय परिस्थिती आहे. अशा वेळेस जरा स्वतःहून पुढाकार घेऊन समजुतीनं वागलं तर बिघडतं का?” आईचा आवाज हळू हळू कमी झाला.

“वागेल ना ती… तिच्यावर कसल्या गोष्टीचं प्रेशर नाही आहे. आणि आपण फक्त एक श्रद्धा म्हणून ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यातून काही चांगलं झालं तर झालं… नंतर असं नको ना वाटायला आपल्या बाजूने आपण सगळे प्रयत्न केले नाहीत…”

ह्यावरही सोनी काही बोलली नाही, ती खालीच बघत राहिली. तिला भरून आलं होतं. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. “नको काळजी करू… काही नाही होणार…”

“हं…” सोनी एवढंच म्हणाली.

थोड्यावेळाने आई आणि तिचं बोलणं नॉर्मल झालं पण जेवणाच्या टेबलवर ती मोजकेच शब्द बोलत होती. तिचं जेवण संपवून ती उठली आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन तिने लॅपटॉप उघडला. कानाला हेडफोन्स लावून तिने ‘Prison Break’ चा एपिसोड लावला. त्याचे क्रेडिट्स सुरु झाले, पण तिने तो बंद केला आणि ‘Friends’ चा एक रँडम एपिसोड लावला. हळू हळू तिचा मूड ठीक झाला. तिने YouTube उघडलं आणि त्यावर ‘फ़्रेंड्स ब्लूपर्स’ बघत एकटीच हसत बसली.

संध्याकाळी सगळेजण एकत्र चहा घेत होते. TV वर ‘बजरंगी भाईजान’ चालू होता. सोनीचा फोन वाजला. निरूचा मेसेज आला होता, “अगं… तुला ती ‘शिवानी जयस्वाल’ माहितीय ना?”

“उम्म… ती क्वालिटी हेड आहे ती? आपल्या कॉलेजची alumni?”

“हो तीच.”

“तिचं काय?”

“तिचा किस्सा झाला ते कळलं नाही का तुला?”

“काय?”

“थांब…” असा निरूने मेसेज केला आणि दुसऱ्याच मिनिटाला तिचा कॉल आला.

“काय गं… काय झालं?” सोनीने फोन उचलून विचारलं.

“अगं तिचा डिवोर्स झाला म्हणे…”

“काय??” सोनी जवळ जवळ ओरडली. आजूबाजूच्यांनी दिलेले लूक्स बघून ती आपल्या खोलीत गेली.

“हो अगं….”

“पण तिचं तर लव्ह मॅरेज होतं ना… आपल्याच कॉलेजचा सिनियर होता ना तो पण.”

“हो ना… आणि का डिवोर्स झाला ते कळलं तर तू उडशील.”

“का? काय झालं?”

“सोनी… अगं he cheated on her!” निरूचा आवाज गंभीर झाला होता. “आणि ते पण त्याच्या टीममधल्या एका नवीन मुलीसाठी.”

“काय??”

“हो अगं… शिवानीला कळलं ना हे… तेव्हा तिचं इतकं डोकं फिरलं की तिने त्यांच्या conversation चे स्क्रीनशॉट्स सरळ HRला पाठवले म्हणे… तो आणि ती मुलगी दोघेही fire झालेत.”

“बापरे… असं पण होतं?” सोनी मटकन गादीवर बसली.

“माझं तर डोकंच दुखू लागलंय हे ऐकून… शिवानी कसली फेमस होती अगं कॉलेजमध्ये. आपल्याला पण तिचे किस्से सांगायचे लोक.”

“हो ना… आणि हे दोघे कॉलेजपासून एकत्र होते ना…”

“हो… कशाला असा मूर्खपणा केला असेल त्या माणसाने? कसली सुंदर आहे ती शिवानी… अशा बाईवर कुणाला कसं चीट करावं वाटत असेल गं?”

“शीट… लोक जरासुद्धा सेन्स कसा वापरत नसतील? काय मिळालं त्या मुर्खाला? शी… जरासुद्धा शरम नाही वाटत ह्या लोकांना… एवढीच सेक्स ची हौस आहे तर लग्न कशाला करता… राहायचं तसंच… कोण ना कोण तरी मिळतंच needs पूर्ण करायला.” सोनीला एकदम ‘सारंग सरंजामे’च आठवला.

“सोनू… मला जरा टेन्शनच येऊ लागलंय गं.”

“का गं? काय झालं?”

“हे सगळं ऐकून मला कसतरीच झालं. कुणावर कसा ट्रस्ट करायचा? पुढे जाऊन असंच काहीतरी माझ्या आयुष्यात झालं म्हणजे?”

“असा काय विचार करतेयस निरू?”

“अजून महिन्याभरात एंगेजमेंट आहे माझी. आणि काही महिन्यांनी लग्न. आयुष्यभरासाठी बांधली जाणार मी महेशसोबत. मला तर हा विचारच सहन होत नाहीए कि असं काहीतरी आमच्या बाबतीत होईल.”

“निरू… वेडी आहेस का? महेश किती चांगला आहे. आणि किती वर्षांपासून ओळखताय तुम्ही एकमेकांना? असं कसं होईल?”

“शिवानी आणि तिचा नवरा देखील कॉलेजपासून ओळखत होते ना… काय झालं शेवटी? माणसाचं मन कधी भटकेल हे सांगता येत नाही.”

“निरू… हे बघ, आपल्याला त्यांची पूर्ण स्टोरी माहीत नाही. काहीतरी प्रॉब्लेम्स झाले असतील अगोदरच त्यांच्यात. आणि शेवटी प्रत्येक माणूस वेगळा आहे ना निरू. काही माणसांना सेल्फ-रिस्पेक्ट पेक्षा असला ठरकीपणा चांगला वाटत असेल तर त्याला कोण काय करणार?”

“हो… पण असे काही प्रॉब्लेम्स आमच्यात झाले तर?”

“का निगेटिव्ह गोष्टींना बोलावणं देतेयस? महेश खूप डिपेंडेबल आहे. आणि आपलं रिलेशन चांगलं ठेवायचं शेवटी आपल्या हातात पण आहे ना? तुमच्या दोघांमध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन असेल तर बाकी काही matter नाही करत.”

“हो… बरोबर आहे तू म्हणतेयस ते. दोघांनी टिकवायला लागेल. आणि शेवटी इमोशनल कनेक्ट असेल तर बाकी गोष्टी सेकंडरी असतात. आणि थँकफुली तो देखील ह्याच विचारांचा आहे.”

“Exactly!”

“बरं वाटलं बघ तुझ्याशी बोलून… डोकंच उठलं होतं माझं…”

“आता बसलं ना?”

“हेहेहे… हो… तुझं काय चालू आहे?”

“माझं… माझं रामायण मी Monday ला भेटून सांगते.” म्हणून सोनीने फोन ठेवला.

रात्रीचं जेवण लवकर करून आईने बाबा आणि श्रेयसला झोपायला पिटाळलं. सोनीला उद्याची तयारी करायला लावली. “मनापासून कर उद्या सगळं. फायदाच होतो अशा गोष्टींचा… त्याने वाईट काही नाही होत.” असा एक डोस तिने झोपायच्या आधी सोनीला दिला.

संध्याकाळ नंतर सोनीने आत्ता फोन बघितला. ७-८ मेसेजेस आले होते. तिने नोटिफिकेशन्स क्लिअर केले आणि फोन बाजूला सारला. आज तिला निखिलशी देखील बोलायची इच्छा होत नव्हती. क्षीणपणे चमकणाऱ्या सिलिंगवरच्या ताऱ्यांकडे बघत बेडवर पडली. खरंच, ह्या ताऱ्यांनी ठरवायचं आपलं नशीब? इतके दिवस अंधश्रद्धांवर विश्वास नाही ठेवायचा म्हणून सांगणारे माझेच आई-बाबा आज कुठल्याश्या पंडिताच्या सांगण्यावरून एवढा खर्च करायला उठले. त्या शिवानीचं नशीब पण ह्यांनीच ठरवलं का? करिअरमध्ये लवकर इतक्या पुढे गेलेली शिवानी पर्सनल आयुष्यात अशी मागे कशी पडू शकते. तिला काय वाटत असेल आत्ता? किती राग, किती तगमग, पराकोटीचं दुःख आणि मुळात दुखावलेला सेल्फ-रिस्पेक्ट. त्यातून कसं बाहेर पडायचं कोणीही. आणि आपण तर माहित नसलेल्या खाईत उडी टाकायला चाललोय. काहीच नाही माहित, खाली किती पाणी आहे. का नुसतेच काटे?

बराच वेळ कूस बदलून झाल्यावर सोनीला कधीतरी झोप लागली.

पहाटे ‘पाच’लाच आईच्या खुडबुडीमुळे सोनीला जाग आली. “Ugh!” सोनी उठली आणि बाहेर गेली. आई उगाचच असलेलं सामान परत परत चेक करत होती.

“काय करतेयस आई?”

“उठलीस? बरं झालं… हीटर सुरु कर. मी चाललेय आता अंघोळीला. तू तिकडच्या बाथरूम मध्ये आवरून घे.”

सोनीने हीटर सुरु केला आणि बारीक नळ सोडून परत गादीवर आडवी झाली. १५च मिनिटांत आईची हाक आली, “अगं भरली असेल बादली…”

सोनी डोकं खाजवत उठली. तिने ब्रश करायला घेतला. श्रेयसकडे बघितलं, निवांत झोपला होता पट्ठ्या. एवढ्या आवाजात कशी काय झोप लागते ह्याला कुणास ठाऊक.

सोनी आवरून हॉल मध्ये गेली. बाबदेखील रेडी होऊन बसले होते. आईने तिघांचा चहा ठेवला आणि श्रेयसला उठवायला गेली. झोपाळू डोळ्यांनी श्रेयसचं हळू हळू आटपणं चालू होतं. तेवढ्यात ६.३० च्या ठोक्याला दारावरची बेल वाजली.

बाबांनी दार उघडलं आणि एकेक करून आत्या, एक पांढरं धोतर आणि भगवं उपरणं घेतलेला मनुष्य, त्याच्या नंतर तसाच पण वयाने लहान वाटणारा अजून एक मनुष्य असे आत शिरले.

“हे पंडित पाणिग्रही. आणि हे त्यांचे assistant पं. शास्त्री.” आत्याने आई-बाबांना ओळख करून दिली.

“या ना… बसा बसा… चहा ठेवते” आई आग्रहाने म्हणाली.

“तुमच्या इथे मोकळी जागा आहे ना? टेरेस वगैरे?” पं. पाणिग्रही म्हणाले.

“हो… ताईंनी सांगितल्याप्रमाणे वर टेरेसवरच करणार आहोत सगळं.”

“चला मग. तयारीला घ्या. ह्या बाहेरच्या पायऱ्यांनी जायचं का टेरेस वर?”

“हो… लगेचच सुरु करायचं?” आईचा शेवटचा शब्द ऐकायला ते थांबले देखील नाहीत. ते पायऱ्या चढू लागले.

आई घाई घाईने, “चला चला… सगळेजण एकेक सामान उचला.” म्हणत आतून चांदी,तांब्याची ताटं आणायला गेली.

पिशव्या घेऊन सगळे वर गेले.

त्यांच्याकडचा रेडिमेड यज्ञकुंड बघून सोनीला आश्चर्य वाटलं. पंडितजींनी आपलं सामान मांडायला सुरुवात केली. आई-बाबा पडत्या फळाची आज्ञा लगेचच पूर्ण करीत तिथे उभे होते. १५-२० मिनटात म्हणजे पूजेची सर्व तयारी झाली. वेगवेगळ्या ताटांमध्ये काल आणलेलं सामान मांडलं होतं. यज्ञकुंड हवनाच्या साहित्याने भरला होता. “कन्येला ह्या पाटावर बसायला सांगा” पंडितजींनी आज्ञा दिली. सोनी पाटावर जाऊन बसली.

पंडितजी फार म्हातारे दिसत नव्हते. तिला वाटलं होतं तशी त्यांच्या पोटाची टायरही दिसत नव्हती. इन फॅक्ट एकदम फिटंफाट होते पंडितजी.

“तर पूजा सुरु करायला अजून आठ मिनिटं आहेत. Till then let me give you some background” ते आपल्या अनुनासिक आवाजात म्हणाले.

What the hell…! बाबाजींना तर ‘फाडफाड इंग्रजी’ येतंय. चांगले शिकले-सवरले भटजीबुवा आहेत की.

“तर सुनहरी… तुझ्या कुंडलीचा अभ्यास करता आम्हाला दिसून आले की सूर्याचा प्रभाव जास्त आहे. तर हे आहेत सूर्यदेव!” म्हणून त्यांनी एक लहानशी मूर्ती तिच्यासमोर ठेवली. समोर सात घोडे आणि मागे कमळावर बसलेले सूर्यदेव. अच्छा… सात दिवसांचे सात घोडे.

“तर… सूर्यदेवांना शांत करण्यासाठी आपल्याला आज यज्ञ करायचा आहे. आणि बाकीची procedure मी वेळ येईल तशी सांगतोच.”

सोनीने मान डोलावली. असिस्टंटने पंडितजींच्या जवळ येऊन ७.०२ झाल्याचं सांगितलं. पंडितजींनी काडी ओढली. तुपाची धार कुंडात सोडली. यज्ञ पेटला. “माझ्या मागे म्हणत, तुपाचा एक एक चमचा ह्यात टाकायचा. म्हणा…” असं म्हणून त्यांनी मंत्र सुरु केला.

“ओsssम…” पंडितजींनी इशारा केला.

“ओम.” सोनीने थोडक्यात आवरलं.

“ओsssम” त्यांनी लूक्स दिले.

“ओsssम” ह्यावेळेस सोनीने करेक्ट टोन पकडला.

“ओsssम आदित्याय विद्महे…” ते ८० डेसिबल मध्ये ओरडू लागले

“ओsssम आदित्याय विद्महे…”

“दिवाकराया धीमहि…”

“दिवाकराया धीमहि…”

“तन्नो सूर्यः प्रचोदयात…”

त्याच्या मागोमाग मंत्रपठण करत सोनी कुंडात तूप सोडत होती. वेगवेगळे मंत्र म्हणत त्यांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला लावलं. दान द्यायच्या सगळ्या वस्तूंची पूजा करून त्या आपल्या पिशवीत भरून घेतल्या.

जवळ-जवळ पाऊणतास यथासांग पूजा झाल्यावर त्यांनी सोनीला उठायला सांगितलं. सोनी पाटावरून उठली, खूप वेळ तटवून ठेवलेली जांभई तिने दिली. आईने एक फटका मारला. भटजीबुवांनी बाबांना बसायला सांगितलं. “कन्येच्या पित्यालाही सूर्याचा त्रास आहे. त्यामुळे काही बाधा येतात. पण तिच्याइतका नसल्यामुळे फक्त मंत्रपठण आणि अर्घ्य देऊन प्रॉब्लेम सॉल्व होईल.” मग बाबांचाही डाव झाला.

पूजा संपवून सगळे खाली घरात गेले.

सोफ्यावर बसून बुवांनी आपल्याजवळची वेलवेटची पेटी काढली.

“आता लक्ष देऊन ऐका…” असं त्यांनी म्हणताच सगळेजण भोवती बसले.

“ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला करायच्या आहेत.

पहिली आणि महत्वाची गोष्ट. मुलीने मी ह्या पुस्तकात हायलाईट करून दिलेला मंत्र, येत्या ‘अकरा दिवसांमध्ये’… किती?” बुवांनी सोनीकडे पाहिलं.

“अकरा दिवसांमध्ये”

“अकरा दिवसांमध्ये… ६००० वेळा म्हणून झाला पाहिजे.”

“६०००??” सोनी रिफ्लेक्स मध्ये ओरडली. आईने डोळे मोठे केले. मग तिने मान खाली घातली.

“चुकवून चालणार नाही. दररोज ५०० ते ६०० वेळा मंत्रपठण झालं पाहिजे. शिवाय मी काही पथ्यं लिहून देणार आहे ती देखील हे अकरा दिवस पाळायची आहेत.”

What the hell… काय रोग झालाय काय मला?

“ह्या महिन्याभरात एकदा तरी ब्राह्मण भोजन करा.” त्यांनी आईकडे बघितलं.

“हो हो…” आई तत्परतेने म्हणाली.

“आता राहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा.” म्हणत त्यांनी जवळची ती पेटी उघडली. त्यात कोंदणात बसवलेले ३ खडे होते. “हे आहे माणिक. हा खडा धारण केल्याने सूर्याचा प्रभाव मर्यादित राहतो आणि त्याचा चांगला प्रभावच फक्त दिसू लागतो.”

“तीन कशासाठी?” बाबांनी विचारलं.

“माझं बोलणं पूर्ण करू द्या!”बुवा अनुनासिक दरडावले. “तर ह्या खड्याची तुम्हाला अंगठी बनवून घ्यावी लागेल. पण खडा आम्हीच देतो. बाहेर डुप्लिकेट माल फार खपवला जातो. आता ह्यात ३ प्रकार आहेत. हा इकडचा आहे ५०० रुपयांचा, हा मधला आहे २००० चा आणि हा आहे ८००० चा. ८००० चा खडा खास श्रीलंकेवरून येतो. आणि फार प्रभावी आहे. बाकी तुमची मर्जी.”

“आम्हाला काय प्रभावीच हवाय… ” इतका वेळ गप्प असलेली आत्या मधेच बोलली.

“ठीक आहे. आम्ही ऑनलाईन पेमेंट स्वीकारतो. किंवा कॅश करू शकता. आत्ता नसेल तर आमच्या ऑफिसमध्ये येऊन हा खडा घेऊन जाऊ शकता.” बुवा उठले. दक्षिणा घेतली आणि निघाले. आईने चहाचा आग्रह केला पण दुसरीकडे आणखी एक पूजा असल्याने ते घाईत निघून गेले.

पंडितजी गेल्या नंतर आत्याने उगाच चार शब्द बोलून दाखवले. आता सोनीने कसं सगळं सिरियसली घेतलं पाहिजे. प्रभावी खडाच घेऊ. नंतर पश्चाताप नको . सोनीने आता रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे आणि मंत्रपठण केलं पाहिजे. ती अंगठी रोज रविवारी तांब्याच्या भांड्यात ठेऊन पाण्याने धुवून परत घातली पाहिजे. अशा सूचना दिल्या. सगळ्या सूचना ऐकून सोनीचं डोकं दुखू लागलं. “मी जरा पडू का थोडावेळ” म्हणून ती आपल्या खोलीत येऊन आडवी झाली. काहीही चाललंय घरात. कधीच वाटलं नव्हतं, असं काहीतरी करावं लागेल ह्या लग्नासारख्या गोष्टीसाठी. नेहमी वाटायचं, कुठला तरी चांगला मुलगा आपल्याला प्रपोज करेल. त्याला आपण हो म्हणू आणि मग छान-छोटंसं लग्न करू. मोजक्याच लोकांना बोलवून सेलीब्रेट करू. आणि मस्त World Tour वर जाऊ. पण त्या ऐवजी आता ५०० वेळा मंत्रपठण करायचंय. सूर्यदेवांची पूजा करायचीय. नशीब कुठं चांगलंय म्हणा. ती निरू तर एवढं सगळं चांगलं असून रडतेय. खरंच हे डिवोर्स वगैरे प्रकरण म्हणजे आयुष्यातून उठण्याचंच काम आहे. आणि ते पण अशा काही कारणांमुळं. आपलं तर काहीच नक्की नाही. ना त्या मुलाचं कॅरेक्टर माहिती ना behavior माहिती. सगळा जुगारच! ही एक पूजा केलीय ती कुठेतरी फळाला येऊ दे म्हणजे झालं.

विचार करता करता सोनीचे डोळे आपोआप जड झाले. जेवणासाठी उठवायला श्रेयस आला. “ठीक आहेस ना?” आपला भाऊ इतक्या काळजीनं आपल्याला काही विचारतोय हे बघून सोनीला आश्चर्य वाटलं. “हो… का रे”

“काही नाही… सहज विचारलं. चल जेवायला. आणि डोन्ट वरी… आत्या जेऊन निघणार आहे. मी मगाशीच ऐकलं.”

जेवणाच्या टेबलवर आता वेगळ्याच गप्पा सुरु झाल्या होत्या. सोनीला त्यामुळे जरा relived वाटलं. सोनी तरीही खाली मान घालून जेवत होती. आईने मधेच तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. पण तिने जास्त रिस्पॉन्स दिला नाही. मग आत्याने मोठमोठ्याने आपल्या भिशीतले किस्से सांगायला सुरुवात केली. जेवण संपेपर्यंत म्हणजे सोनीला आपल्या पलीकडे कुणीतरी गिरणी चालू केलीय असं वाटत होतं. थोड्यावेळ्याने आत्या गेली आणि घर एकदम शांत झालं.

“आता तर TV पण नको बघायला असं वाटू लागलंय. केवढ्या गप्पा… पडते मी जरा…” म्हणून आई आत गेली. श्रेयस मित्राकडे जातो म्हणून गेला. बाबा पेपर उघून बसले. सोनी आपल्या खोलीत गेली आणि तिने पुस्तक वाचायला घेतलं. पण तिचं पुस्तकात लक्ष लागेना. ती पुस्तक बंद करून नुसतंच भिंतीकडे बघत बसली. तिच्या डोक्यातून काही केल्या कालचा विषय जात नव्हता. मग तो सारंग आणि ती बीअर ची बाटली आठवत होती. असं कसं काय माणसांना काही वाटत नसेल खुलेआम हे सांगायला की मी एक सेक्स मशीन आहे. मला इतक्या पोरी पटतात. मग हा फालतू माणूस जीवनसाथी वर काय करतोय? Tinder वर जा म्हणावं. त्याला वाटत असेल ह्याच्या लूक्स आणि बॅकग्राऊंड कडे बघून कुठलीही मुलगी भाळत असेल. आणि मग काय ‘One night stand’ करून सोडून द्यायचं. हरामखोर कुठला. जाऊ दे आपण का त्रास करून घेतोय? सुटलो आपण त्या मुर्खाच्या ट्रॅपमधून.

“गोलू…” बाबा दारात येऊन उभे राहिले. “येऊ का आत?”

“या ना बाबा… विचारताय काय?” सोनीने पुस्तक बाजूला ठेवलं. अचानक तिच्या ध्यानात आलं की बाबांनी ‘गोलू’ म्हणून हाक मारली. कित्ती वर्षांनी! लहानपणी सोनू जरा गट्टू होती ना, त्यामुळं बाबा ‘गोलू’ म्हणायचे. त्यांनी नेमकं कधी बंद केलं हे म्हणायचं… आठवत नाही.

“काय झालं? अशी गप्प गप्प का आहेस?”

“काही नाही बाबा…”

“हे पूजेचं वगैरे फार मनाला लावून नको घेऊ बाळा… तुझ्या आईची श्रद्धा म्हणून करायचं. मला माहितीय तुला आवडलेलं नाहीए.”

“नाही बाबा… त्याचं काही नाही…”

“मग काय झालं असं तोंड बारीक करून बसायला? आमची गोलू आम्हाला हसती-खेळती हवी…” बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

“बाबा…” सोनी थोडा पॉज घेऊन म्हणाली, “आमच्या ऑफिसमधल्या एका सिनियरचा डिवोर्स झाला. त्या माणसाने तिच्यावर cheat केलं. हि गोष्ट माझ्या डोक्यातून जात नाहीए. जी लोकं इतके वर्षं एकमेकांना ओळखतात ते सुद्धा फसवू शकतात. आणि इथे मी तरी अनोळखी मुलासोबत गाठ बांधायला चाललीय. सगळीच माणसं तुमच्या सारखी नसतात ना… मला तरी अशक्यच वाटतं. माझा संसार माझ्या आई-बाबांइतका successful होणारच नाही.”

बाबा विचारात पडले. थोडा वेळ नुसताच गेला मग ते सोनीकडं बघून म्हणाले, “तुला मी आज एक सीक्रेट सांगतो. आमचा संसार जो काही आज फळाला आलेला दिसतोय ना? तो तुझ्या आईमुळे.” ते गादीवर मांडी घालून बसले.

“तुझ्या जन्माच्या आधी ना… इंदोरला असताना… आपल्या घरापासून काही अंतरावर एक बॅचलर्सचं घर होतं. तुझी आई… तरुणपणी तर अजूनच सुंदर होती. मला त्या बॅचलर मुलांपैकी कुणीही घरापाशी नये असं वाटायचं. चुकून ती त्यांच्यापैकी कुणाशी बोलली तर मला त्रास व्हायचा. मी तिच्या बाबतीत खूपच possessive झालो होतो आणि मी हे कधी तिला बोलून दाखवलं नाही. फक्त घरी चिडचिड करत राहायचो. तिच्यावर डाफरत राहायचो. तुझा जन्म झाला आणि माझा सगळा राग हळू हळू शांत झाला. पण अजूनही मला ही गोष्ट टोचते… की मी तेव्हा खूप immature वागलो.”

सोनीला विश्वास बसत नव्हता की बाबा आपल्या समोर confession करतायत.

“गोलू… कुठलंही रिलेशन दोघांनी टिकवावं लागतं. तुझी आई त्यावेळेस खूप समजूतदारपणाने वागली म्हणून सगळं चांगलं झालं. पण आता लक्षात येतंय की काही गोष्टी, काही भीती, काही असुरक्षितता ह्या प्रत्येक नात्यात असतात. आणि त्या दोघांनी मोकळेपणानं, समजुतीनं बोलून सोडवल्या पाहिजेत. जो पर्यंत आपण आपल्या मनातली गोष्ट दुसऱ्याला सांगत नाही तोपर्यंत ती त्याला कळणार नाही. होय ना… मग नुसताच दुरावा येऊन जातो.”

सोनीने बाबांच्या डोळ्यात बघितलं आणि ती त्यांना बिलगली. बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,

“आणि तुझं लग्न झालं म्हणजे आमची जबाबदारी संपली असं थोडीच आहे. तुला काही त्रास झालाच तर आम्ही कुठे असशील तिथून तुला घेऊन येऊ. पण मला माहितीय… आमची गोलू फार गुणाची आहे. तिच्याबाबतीत असं काही होणारच नाही.” बाबांनी तिला जवळ घेतलं. सोनीच्या डोळ्यातून टपटप पाणी गळत होतं. थोडावेळ नुसतीच शांतता होती. सोनीला लक्षात आलं दारात कोणीतरी आहे. तिने वर बघितलं.

आई उभी होती. डोळ्यातून गालावर गळलेला अश्रू आईला लपवता आला नाही.

भाग १६

“हा लिंबू कलर की राणी कलर? काय ते फायनल सांग आता.” निरूने दोन लेहंगे बेडवर टाकत विचारलं.

सोनी थोडावेळ विचार करून म्हणाली, “मला तर दोन्ही पण आवडतायत”

“मग एकावर एक घालू?” निरूने कमरेवर हात ठेवले.

“अगं… ठीक आहे, एकेकदा घालून दाखव बरं.”

“मी नुसतं अंगाला लावून दाखवते. हे बघ.”

दोन्ही कपडे एकेकदा बघून झाल्यावर सोनी म्हणाली, “मला नाही कळत आहे. दोन्हीपण छानच दिसतायत.”

“शी बाई सोनी… तुला काही विचारायलाच नको. तुला काहीच डिसाईड नाही करता येत.”

“दोन कशाला शिवून घेतलेस?”

“बाईसाहेब… कापड घ्यायला पण तुमच्याच बरोबर गेले होते. तिथे पण हेच झालं… दोन्ही पण छान वाटतायत!!” निरूने कपाळावर हात मारला.

“हाहाहा… बरं… राणी कलरचा घाल.”

“हं… पण त्या लिंबूवाल्याचं ब्लाऊज जास्त छान दिसतंय ना?” निरूने परत अंगाला लावून आरशात बघितलं.

“हो… राईट! मग तो घाल.”

“पण राणी वाल्याचा ‘घोळ’ मस्त दिसतोय… ना?”

“हे बघ… असं confuse करतेस तू मला… आणि वर म्हणे मलाच डिसाईड नाही करता येत.”

“हेहेहे… खेचतेय तुझी.”

“हम्म… फटके देऊ का?”

“बरं… चल ह्या दोन बोटांपैकी एक पकड!”

सोनीने डोकं हलवत एक बोट पकडलं.

“ओक्केच… राणी कलर.”

“बरं… चल झालं ना… निघते मी.”

“ए… निघते काय? जेवून जायचंयस.”

“अगं मी सांगितलं नाहीए तसं आईला.”

“मी सांगते काकूंना फोन करून. आणि हो तू काय घालणार आहेस त्या दिवशी?”

“मी… ठरवलं नाहीए अजून गं.”

“ठीकेय… तो डार्क निळा आहे ना, वर छान बॉर्डर आहे तो. तो घाल.”

“हां… हो विसरलेच होते मी. तोच घालते.”

पंधरा दिवसांनंतर असणाऱ्या निरूच्या एंगेजमेंटला काय कपडे घालायचे हे ठरलं. मग accessories वर अर्धा तास डिस्कशन झालं. निरूच्या घरून जेवून सोनी निघाली.

सोनी घरात शिरली तसं आई ‘गाडग्याएवढं तोंड’ घेऊन बाहेर आली. “सोनी… एकदम भारी luck लागलंय बघ तुझं. मला वाटलंच नव्हतं एवढ्यात त्या पूजेचा प्रभाव दिसेल. तू मनापासनं केलंस म्हणून झालं बघ…”आईने सोनीला हात धरून सोफ्यावर बसवलं.

“कसला नेमका चमत्कार झालाय आई?” सोनीला आईच्या अविर्भावाकडे बघून हसू आलं.

“अगं… सकाळी बाबा बाहेर गेले होते ना तेव्हा त्यांचा एक जुना मित्र भेटला त्यांना. अचानकच. आणि बोलता बोलता तुझ्या लग्नाचा विषय निघाला वाटतं. तर त्यांच्या ओळखीतून एक स्थळ निघालं. ‘जगताप’ आडनाव आहे. मुलाच्या बाबांची फॅक्टरी आहे बारामतीला. मुलग्याने engineering केलंय पण त्याने काहीतरी – स्टार्टअप का काय ते- काढलंय म्हणे.”

“अच्छा…”

“बघ… पूजा करून दोन आठवडे पण नाही झाले आणि किती चांगलं स्थळ चालून आलं. बाबांच्या मित्राने लगेच तिथल्या तिथं फोन केला आणि त्यांनी सरळ मुलाचा नंबर दिलाय.”

“फोटो?”

“हो… फोटो पण पाठवलेत बाबांच्या व्हाट्सऍप वर.”

“चालेल… बघूया”

“हो बघच… बाबा संध्याकाळी फोन लावतील त्याला.”

नेहमीप्रमाणे फोटो बघण्याची मग फेसबुकवर स्टॉक करण्याची procedure झाली. ‘अधिराज जगताप’ फेसबुकवर इतका ऍक्टिव्ह नव्हता. एखाद दुसरे कॉलेजचे फोटोज, कसल्या तरी inauguration चा फोटो, ‘हॅपी बर्थडे’च्या wishes ह्या शिवाय फार काही दिसत नव्हतं त्याच्या ‘टाईमलाईन’वर. व्हाट्सऍपच्या फोटोंमध्ये तरी ठीकच दिसत होता.

संध्याकाळी बाबांनी त्याला फोन केला, ‘तुमची परवानगी असली तर आम्ही आधी भेटून घेऊ का?’ असं त्याने विचारलं. बाबांनी ‘हो… हो… आमची काहीच हरकत नाही. मी सुनहरीला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगतो’ असा गरजेपेक्षा जास्त हसून हसून होकार दिला. सोनीने त्याला फोन केला आणि Weekdays मधेच भेटायचा त्यांचा प्लॅन ठरला.

आता हा तरी चांगला असू देत. आणि ह्याला आपण कुंडली वगैरे आधीच बघून घ्यायला सांगूयात. उगाच नंतर नाटक नको. आणि आपणच भेटतोय आता तर व्यवस्थित सगळं विचारून घेऊया. मागच्या वेळेसारखं ब्लँक नको व्हायला. काय काय विचारायचं आहे? हां… कुंडली वगैरे वर विश्वास आहे का? थांब. लिहूनच काढूया. मोबाईल मधेच नोट्स लिहून ठेऊया. मधेच विसरलं तर पटकन फोनमध्ये बघता येतं.

१. कुंडली/ राहू -केतू/ मंगळ अश्या गोष्टींवर किती विश्वास आहे?

२. दारू/ स्मोकिंग– कसलं व्यसन आहे का?

३. Umm… बायको कडून काय अपेक्षा आहेत? General कूकिंग, वॉशिंग बद्दल?

४. गर्लफ्रेंड्स?

५. अजून काय…. हां… कपडे कसे घालावे लागतील लग्नानंतर.

आधीच क्लिअर करून घेतलेलं बरं, नंतर म्हणतील साडी घाल बाई आमच्या घरात. मला नाही जमणार ते. Actually… ते कुंडलीचं आत्ताच विचारून घेऊया. भेटायच्या आधीच बघून घ्या म्हणावं. नंतर नाहीतर सगळी प्रोसिजर करणार, फुकट आमच्या घरी खाऊन-पिऊन जाणार आणि नंतर ‘गुण जुळत नाहीत’ म्हणून सांगणार.

सोनीने अधिराजला मेसेज केला, “hi”

“hi… how are you?” प्रॉम्प्ट रिप्लाय आला.

“आय एम फाईन. कॅन आय आस्क यु वन थिंग?”

“हो… बोल ना…”

“म्हणजे… डोन्ट गेट मी रॉंग. पण तुमच्या घरी कुंडल्या/ पूजा वगैरेचं जास्त प्रस्थ आहे का?”

“इतका जास्त काही नाही. म्हणजे आम्ही सगळे देव तर मानतोच. नास्तिक नाही आहोत.”

“नाही नाही… तसं नाही. फक्त मला म्हणायचं होतं की तुमचा कुंडलीवर विश्वास असेल तर आपण भेटायच्या आधीच ते सगळं करून घ्यायचं का?”

“हे बघ डिअर…” अधिराज टायपिंग….

डिअर!!! प्च!

“आम्ही माणसांवर जास्त विश्वास ठेवतो कुंडली पेक्षा. कुंडली match झाली आणि माणूसच नाही आवडला तर. बरोबर आहे ना?”

“राईट.”

“हां… आता तू अशी डीपी मध्ये इतकी ब्युटीफुल दिसतेस. तू actual मध्ये कशी आहेस हे पण बघावं लागेल ना. बोलणं-चालणं सगळंच बघावं लागेल.”

“हो…”

“सो… लेट्स मीट फर्स्ट.”

वा! म्हणजे त्या सिद्धार्थ सारखा खोटा मॉडर्न नाहीए हा. And did he just call me beautiful? ओह… Smooth…!

‘Mondayलाच भेटूया’ असं दोघांचं ठरलं. ऑफिस ते घराच्या वाटेवर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये डिनरलाच भेटायचा प्लॅन झाला.

“हाय… अधिराज!” असं म्हणून त्याने हात पुढे केला.

“हाय… आय एम सुनहरी”

“Yeah… तुला तिथून येतानाच ओळखलं मी” तो अजूनही हॅन्डशेक करतच होता.

“हेहे…” सोनीने हात सोडवून घेतला.

“Wow… तुझे हात किती नाजूक आहेत!” त्याने स्वतःच्या बोटांवरून अंगठा फिरवला जणू काही तिच्या हाताचे traces त्याने चेक केले.

“हेहे…” पुन्हा एकदा सोनीला काय बोलायचं कळलं नाही.

“तुमच्या मुलींचं असंच असतं नाही? मस्त मस्त क्रीम्स लावायच्या. छान छान कपडे घालायचे” तो आत जाता-जाता बोलला.

“Whatt!?” सोनी मनात म्हणाली.

“थंड/गरम?”

“तुला काय हवंय ते घे.”

त्याने एक हॉट कॉफी मागवली. “You know… आय लाईक टू रीड पीपल! आणि तू म्हणजे तर ओपन बुक आहेस.”

“रिअली?”

“हो… बघ माझा analysis बरोबर आहे का?”

“ओके….”

“तू shy मुलगी आहेस. तुला दुसऱ्यांना दुखवायला आवडत नाही. तु अशी गर्ली गर्ली आहेस.”

“अच्छा…”

“बरोबर आहे ना?” त्याने भुवया उडवत विचारलं.

“ह्यात काय… हे तर कोणी पण सांगू शकतं. किती जनरिक!” सोनी मनात म्हणाली. बाहेर ती फक्त, “राईट!” म्हणाली.

“बाय द वे… तुम्ही ऑफिसला असे कपडे घालून जाता?”

सोनीने स्वतःच्या कपड्यांकडे बघितलं. कालच waxing केलं असल्यामुळे तिने sleeveless टॉप घातला होता. पण तोही डिसेंटच होता. “म्हणजे?” खूप वेळ पॉज घेऊन ती म्हणाली, “हो नॉर्मलच आहे हे!”

“मजा आहे बाबा ऑफिसमधल्या लोकांची!”

“कसली मजा?”

“काही नाही…” तो उगाच सोनीकडे बघून स्माईल करत होता. “ए… मी तुला माझ्या ऑफिसचे फोटो दाखवले का?”

“कसं दाखवशील?? आपण आज पहिल्यांदा भेटतोय ना?” सोनी पुन्हा एकदा मनात म्हणाली.

“थांब दाखवतो.” असं म्हणून अधिराज उठला आणि डायरेक्ट तिच्यापलीकडे येऊन बसला. “हे बघ…” तो फोनमध्ये फोटो स्वाईप करू लागला.

सोनीला त्याच्या ‘ऑफिसचे’ फोटो बघायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण तरी ती प्रत्येक फोटोला “ओह, वा!, नाईस, गुड’ अशी काहीतरी कॉम्प्लिमेंट देत होती. त्याने फोटो स्वाईप करता करता एक हात तिच्यामागे सोफ्यावर ठेवला. सोनी थोडीशी सावरून बसली. १० एक मिनिटं फोटो दाखवून झाल्यावर त्याने हात काढला. सोनीच्या कानांना त्याचा हात ‘ब्रश’ झाला.

त्याची कॉफी आली. ती पीत पीत त्याने मेनूकार्ड उघडलं. एक स्टार्टर मागवलं आणि परत तिच्याकडे वळला.

“तुझ्याकडे बघून ना मला कोणाची तरी आठवण येतेय” तो तिच्याकडे निरखून बघू लागला.

“कोणाची?”

“उं… एक मिनिट.” असं म्हणून त्याने तिच्या केसांची बट कानामागे सारली. सोनीला एका मिनिटासाठी कळलंच नाही काय झालं. “हं… माझ्या future बायकोची… हॅहॅ…” त्याने दात दाखवले.

“फारच गोड दिसतेस गं तू…” त्याने तिच्या गालाचा चिमटा घेतला. सोनीने खर्र्कन त्याच्याकडे वळून बघितलं. “काय झालं?” त्याने पुन्हा दात विचकत विचारलं.

सोनीला आपल्याला सध्या काय वाटलं पाहिजे तेच कळेना. ती अजून अंग चोरून बसली.

“मी भविष्य बघायला शिकलोय. जरा हात दे बघू तुझा.”

सोनी हात द्यायला धजावत नव्हती. त्याने स्वतःच तिचा हात हातात घेतला. एका हातात तिचा हात पकडून तिच्या तळव्यावरून तो आपला हात फिरवू लागला. मग त्याने तोच हात तिच्या दंडापर्यंत झट्कन फिरवून आणला.

शीट! काय करतोय हा असं. सोनीला अस्वस्थ वाटू लागलं.

“काही फील होतंय तुला? गुदगुल्या होतायत का पोटात?” त्याने भुवया उडवल्या. सोनीने हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला पण त्याने अजूनच घट्ट धरला. तिचा हार्ट-रेट वाढला होता. उचंबळून येत होतं. तिने पुन्हा हाताला हिसका दिला. मग त्याने हात सोडला. सोनी खाली बघू लागली, तिचा श्वास थरथरू लागला होता.

“काय झालं?” असं म्हणून त्याने तिच्या मांडीवर हात ठेवला आणि हळू हळू मागे-पुढे करू लागला.

आता मात्र सोनीची सहनशक्ती संपली. ती ताड्कन जागेवर उठली, तिने आपली बॅग घेतली आणि त्याला सरकायला सांगितलं.

“अरे… अचानक काय झालं?”

सोनीला काही कळेना. थोडावेळ विचार करून ती म्हणाली, “मला वॉशरूमला जायचंय”

“बरं… जा जा” म्हणून त्याने सरकून थोडीशी जागा दिली. सोनी टेबलाच्या बाहेर आली. आणि वॉशरूम कडे गेली. कोणीतरी वॉशरूममध्ये गेलं होतं. तिने हळूच बाहेर येऊन बघितलं. अधिराज मेनूकार्ड मध्ये काहीतरी बघत होता. त्याचं लक्ष नाहीए हे बघून ती सरळ दाराकडे पळाली. रेस्टॉरंट च्या बाहेर जाऊन ती आपली गाडी शोधू लागली. दोन- तीन वेळा सेम ठिकाणी फिरून झाल्यावर तिला तिची गाडी दिसली. गाडीजवळ जाऊन तिने फोन काढला. निरूचं नाव type करून तिने तिला फोन लावला. पण निरूचा फोन बिझी येत होता. तिने निखिलला व्हाट्सऍप कॉल लावला. पण त्याने कट केला आणि त्याचा मेसेज आला, ‘सॉरी. इन मीटिंग’

तिला काय करावं सुचेना. तिने मग आकाशला फोन लावला.

“हां सुनहरी… बोलो?”

“आकाश…” तिचा आवाज थरथरत होता. “तुम ऑफिस मे हो क्या?”

“हां… बस निकलही रहा था. क्यूँ क्या हुआ?”

“मै ऑफिसके यहाँ आती हूँ तुम रुकोगे क्या?”

“क्या हो गया सुनहरी… तुम्हारी आवाज घबराईसी लग रही है. कहाँ पे हो? रुको मै वही पे आ जाता हूँ.”

“नही… मै यहाँ नही रुक सकती. मै वहींपे आ रही हूँ.” म्हणून तिने फोन कट केला. अधिराज रेस्टॉरंट मधून बाहेर पडताना तिला दिसला, तिने घाईने गाडीला किल्ली लावली आणि तिथून ती पुन्हा ऑफिसच्या रस्त्याला लागली.

त्या रेस्टॉरंट पासून ऑफिस पर्यंत पोहचेतोवर तिचं डोकं गरगरायला लागलं होतं. शेवटी तिने ऑफिस गेटवर गाडी थांबवली, आकाश तिथेच थांबला होता.

“तुम ठीक तो हो ना?” आकाश तिच्याकडे चालत आला.

“हं…” भरलेल्या आवाजात तिने उत्तर दिलं.

“गाडी इधर दो, मै पार्क करता हूँ.” त्याने गाडी रोड क्रॉस करून पार्क केली आणि पुन्हा तिच्याजवळ आला. “चलो उधर बैठते हैं” त्यानं गेटपासून थोड्या अंतरावर असलेल्या कट्ट्याकडे हात केला. सोनी हाताची घडी घालून खाली बघत चालू लागली. स्ट्रीट-लाईटचा पिवळसर प्रकाश पडला होता. थोड्या अंतरावर असलेल्या टपरीवर एक-दोनच माणसं उभी होती. गाड्यांची frequency देखील विरळ झाली होती.

“क्या हुआ?”

“कुछ नही…” सोनी कट्ट्यावर बसली, ती खालीच बघत होती.

“इधर देखो… बोलो क्या हुआ?” आकाशने पुन्हा एकदा विचारलं.

सोनीने त्याच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं.

“अरे… आंसू क्यूँ निकल रहे हैं?” आकाशने तिच्या चेहऱ्याजवळ हात नेला पण पुन्हा मागे घेतला.

“आकाश… मै इतनी बुरी हूँ क्या?” तिच्या डोळ्यांतून पाणी गळू लागलं.

“किसीने कुछ बोला क्या तुम्हे?” आकाशने काळजीत विचारलं.

“नही… मेरे साथ इतना बुरा क्यूँ हो रहा है फिर?” तिने तोंडावर हात झाकला आणि ती अजूनच रडू लागली.

“Shhh… shhh…” आकाशने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवला.

“वो शादी के लिये देखने आया था मुझे.” आकाशने दिलेल्या रुमालाला सोनीने डोळे पुसले. “और वो रेस्टॉरंटमे…” तिला अजून रडू आलं.

“क्या हुआ सोनी? I am worried now…”

“वो बार बार मेरे हात को, गाल को टच कर रहा था…” तिच्या डोळ्यातून थेंब गळाला आणि ती मुसमुसू लागली.
“भेन्चो…” आकाशच्या मुठी वळल्या आणि त्याच्या तोंडून अर्धवट शब्द बाहेर पडला. सोनीने त्याच्याकडे बघितलं.

तिच्या डोळ्यातून थेंब गळाला आणि ती मुसमुसू लागली.
“भेन्चो…” आकाशच्या मुठी वळल्या आणि त्याच्या तोंडून अर्धवट शब्द बाहेर पडला. सोनीने त्याच्याकडे बघितलं.
“सॉरी…” आकाश खाली बघत म्हणाला.
“इट्स ओके…” सोनीने डोळे पुसले.
“नो … आय एम रिअली सॉरी … गाली देने के लिये नही… तुम्हारे साथ ऐसा हुआ इसलिये”

“तुम क्यूँ सॉरी बोल रहे हो…” सोनीला काही अर्थ लागला नाही पण तिचं रडू थांबलं.

“क्यूँकी लडके ऐसे behave करते हैं. आय एम सॉरी… क्यूँकी कितना भी advertisement करो, कितनी भी peace march करो, कॅन्डल्स जलाओ, मोर्चा निकालो, लेकिन हम जैसे कुत्तोंपर कुछ फरक नही पडता.”

सोनीच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं.

“मुझे एक बात याद आ गयी. मैं ना स्कूल के बाद आस-पडोस के दोस्तोके साथ कभी कभी चौराहे पे खडे रह कर लडकियोंको ताड़ता था. उन्हे देखकर कुछ कहने की हिम्मत तो नाही थी मुझमे… लेकिन बाकी लडके कंमेंट्स पास करते थे.. और मै भी दात दिखाता था. एक बार मेरी माँ ने शायद मुझे उनके साथ देख लिया था या फिर किसीने तो उनको बताया था. उस शाम मैं घर चला गया. माँ दरवाजेपे खडी थी. उसने जोरसे एक कान के नीचे खिंच दी. मुझे exact words याद है,

‘तेरी माँ भी एक लडकी है. तेरी चाचाकी बेटीयां भी लडकीयां है. तू अगर हमारी कदर करता है तो कलसे तू उन लोगोंके साथ नही रहेगा.’ हर एक माँ ने ऐसे चमाट लगानी चाहिये… हैं ना?”

सोनी त्याची गोष्ट ऐकून शांत झाली.

“और पता है सोनी… इसमें तुम्हारी कोई गलती नहीं हैं. तुममे कोई बुराई नहीं है. बुरी तो हमारी आदमीयोंकी जात है”

“कुछ आदमी अच्छे भी होते हैं” सोनीने छोटीशी स्माईल केली. आणि मोठा श्वास घेतला. आकाश देखील तिच्याकडे बघून हसला.

“चलो… आईसक्रीम खातें हैं…” आकाश टुणकन उठला.

दोघांनी जवळच्या सोडा-शॉप मधून ‘सॉफ्टी’ घेतली. “आईस्क्रीम इज द सोल्युशन टू एव्हरी damn प्रॉब्लेम. चिअर्स!” म्हणून आकाशने तिच्यासमोर आपला कोण धरला. सोनीने छानसं हसून “चिअर्स” केलं.

आईस्क्रीम संपवून ती थंड डोक्याने घरी निघाली.

भाग १७

बाहेर स्पिकर्सवर ट्रेडिशनल म्युझिक चालू होतं. निरूची मेकअप-वाली तिचा फायनल टच-अप करत होती. शेवटी लिंबू कलरचाच लेहंगा घातला निरूने. आपल्याच मनाचं करते, तरी मला विचारत बसते. सुंदरच दिसतेय ह्यातही! स्किन कशी ग्लो करतीय तिची.

सोनी तिच्याकडे एकटक बघत होती. निरूने इशाऱ्यात विचारलं, “काय झालं?” सोनीने नुसतीच स्माईल देत डोकं हलवलं.

निरूची आई घाईघाईत चेंजिंग रूम मध्ये आली. “चला चला… पंडित बोलावतायत.”

निरू आपला घोळदार लेहेंगा सांभाळत उठली. मेकअप वालीने तिच्या चेहऱ्यावर रोज-स्प्रे मारला. निघता, निघता सोनीने देखील आरशात बघून घेतलं. केस हाताने थोडेसे पसरवले. आणि निरूच्या मागून ती निघाली.

स्टेजच्या पायऱ्यांच्या जवळ अक्षय उभा होता. सोनीकडे बघून त्याने ‘वा! क्या बात.’ असे हातवारे केले. सोनीने उगाचच त्याच्याकडे बघून नाक मुरडलं.

निरू स्टेजवर गेली, काही मिनिटानंतर भटजीबुवांनी माईक वर काहीतरी मंत्र म्हणायला सुरुवात केले. स्टेजच्या पायऱ्यांपाशी उभे राहून सोनीला bore होऊ लागलं. तिने मागे बघितलं, अक्षय आणि बाकी गॅंग गायब झाली होती. तिने इकडं तिकडं बघितलं तर बाहेरच्या बाजूला सगळ्यांचं फोटोसेशन सुरु झालं होतं. ती देखील त्यांच्यात जॉईन झाली. निरू-महेश चे क्लोज फ्रेंड्स जमले होते. पहिले काही मिनिटं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये फोटो सेशन चाललं पण हळू हळू सगळ्यांची तोंडओळख झाली. सेल्फीला पोज करता करता सोनीला लक्षात आलं की तिला कोणीतरी बोलावतंय. आई बोलवत होती. ती मोठ्मोठ्यांदा हातवारे करत होती. सोनी घाईत तिच्याजवळ गेली.

“काय आई?”

“अगं हे गुलाबाचं सरबत घेतलंय तुझ्यासाठी. घे.”

सोनीने कपाळावर हात मारून घेतला. तिने पटा-पटा सरबत पिलं आणि पुन्हा फोटो काढायला पळाली. अक्षयसोबत एक सेल्फी काढावी म्हणून ती अक्षयला शोधू लागली, तर तिला एका कोपऱ्यात तो एका मुलीशी बोलताना दिसला. तिने मुद्दामहून त्याला हाक मारली. त्याने तिच्याकडे बघितलं आणि त्या मुलीला ‘एक मिनिट हं’ असा इशारा करून तो हिच्याकडे आला.

“काय गं?”

“काय… इतक्या दिवसांनी भेटतोय. आहे का वेळ आमच्याशी बोलायला?”

“अगं… ती निरूची स्कूल-फ्रेंड आहे. छान आहे ना? जरा बॅकग्राऊंड सांग ना तिचं… मला वाटतंय चान्स आहे…”

“हाड!” सोनीने नाक मुरडलं.

“काय चायला… एवढी पण मदत करणार नाही होय तू मला?”

“जा रे… ते बघ गेली ती तिकडे सरबत घ्यायला” सोनी कपाळाला आठ्या घालत म्हणाली.

“ओह… थांब थांब!” म्हणून अक्षय तिच्यामागे पळाला.

‘What the hell…! हा अक्षय पण ना… प्या प्या… गुलाबाचं सरबत प्या. एकमेकांना गुलाब द्या. सगळं गुलाबी गुलाबी होऊन जाऊ दे.’ सोनी सरबताच्या स्टॅन्डजवळ उभ्या असलेल्या दोघांना बघून विचार करत होती. ‘हम्म… चांगली आहे तशी ती चिन्मयी. पटणार आहे का पण ह्याला. धोंडोबा… तिच्या पण खोड्या काढू नये म्हणजे झालं.’

तिचं लक्ष स्टेजवर गेलं. पिवळ्या लाईट्स मध्ये निरू लखलखत होती. महेश पण सुटात भारी दिसत होता…! यार… आपलं कधी होणार?

“Excuse me…” मागून आवाज आला.

“Yes?” सोनी मागे वळाली.

“सॉरी… पण तू अशी विचार करत स्टेजकडे बघत होतीस ना, तेव्हा मी तुझा फोटो काढलाय.” कॅमेरा गळ्यातून काढत तो म्हणाला.

“ओह…”

“सॉरी… माझं काही चुकीचं इंटेंशन नव्हतं. जस्ट दॅट, तुझी प्रोफाइल खूप छान दिसत होती. बघ.” त्याने कॅमेऱ्यात फोटो दाखवला.

ओह… actually चांगला आलाय हा फोटो. कोण आहे हा? आणि एकदम एकेरीवरच बोलतोय.

“छान आहे फोटो.”

“आय कॅन डिलीट इट इफ यू वॉन्ट! पण असा चांगला फोटो लूज करावा वाटत नाही.”

“ओह… नो नो…प्लीज मला शेअर करून मग डिलीट करा.”

“ग्रेट! बाय द वे, I am Sagar! सागर वाघ.”

“हाय… सुनहरी”

“ओह… व्हॉट अ युनिक नेम!”

“हेहे…”

“काय आहे मग तुझा ई-मेल id?”

“अं?”

“फोटो शेअर करायला.”

“ओह हां…”

“दोन-तीन दिवस लागतील हं मला तुला द्यायला.”

“ओह ओके…” हा मुलगा जरा ऍनिमेटेडच आहे. किती हातवारे!

“तू… निरालीची मैत्रीण का?”

“हो…”

“अच्छा… तुला कधी पाहिलं नाही कारण आधी.”

“अच्छा…”

“तू कुठल्याच ट्रेकला आली नाहीयेस का त्या दोघांबरोबर?”

“नाही… actually मी फार ट्रेकिंग नाही करत. आय मीन आय एम नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ…”

“का? का नाही आवडत तुला ट्रेकिंग?” त्याने एकदम काहीतरी धर्माविरुद्ध ऐकल्याचा अभिनय केला.

“आवडत नाही असं नाही… पण फार कधी केलंच नाहीए.”

“त्याचमुळे… अरे… तू २-३ वेळा चल ट्रेकला. म्हणजे बघ… You will love it!”

“तू ट्रेकिंग करतोस का?”

“हाडाचे डॉक्टर असतात तसा मी हाडाचा ट्रेकर आहे. डोंगर, किल्ले म्हणजे जीवन आहे माझ्यासाठी”

“ओह… ग्रेट!”

“अरे तू चलच एकदा. तुझ्यासाठी तिकोणा चांगला राहील. फर्स्ट टाइमर्सनी फार अवघड ट्रेक करू नयेत. नाहीतर मग इंटरेस्ट येत नाही नंतर.”

“अच्छा…”

“ग्रेट! नेक्स्ट टू नेक्स्ट वीकएंड फ्री आहेस का? आपण जाऊ शकतो.”

“मी सांगते…”

“मग तिकोण्या नंतर आपण तुंग मारू.”

तुंग मारू??

“मग त्यानंतर तुला रांगण्याला घेऊन जातो. रांगणा म्हणजे राजा आहे राजा…”

“हां…” सोनीचा इंटरेस्ट कधीच संपला होता पण बिचारीला काही तिथून निघण्याचं काही कारण मिळत नव्हतं.

“तुझ्याकडे shoes आहेत का ट्रेकिंग चे?”

“अं… नाहीयेत वाटतं.”

“घे घे… A good trekker knows his shoes.”

“हो… घ्यावे लागतील.”

“अरे… मी परवा Buffaloचे shoes घेतले. म्हणजे मी ह्या आधी Puma, Adidas वगैरे वापरून बघितले. पण Buffalo जसा घातला ना… बस्स! I was like where were you all my life?!”

“रिंग सेरीमनी सुरु होईल आता… मला तिकडे जायला हवं” म्हणून सोनी तिकडून सुटली.

बापरे… काय नमुना होता हा… जाता जाता तिचं लक्ष ऑडियन्स मध्ये गेलं. अक्षय आणि चिन्मयी एकत्र बसले होते.

भटजीबुवांची announcement झाली. महेश आणि निरूने एकमेकांना रिंग्स घातल्या. लगेच फोटोग्राफरसाठी पोझेस सुरु झाल्या. मग हळू हळू करून सगळ्यांबरोबर फोटो काढून झाले. ग्रुप्स बरोबर मस्ती झाली. जेवणं झाली. रात्र होता होता सोनी घराकडे निघाली.

घरी येऊन तिने खसा-खसा तोंड धुतलं. मेकअपचा थर धुवून काढला. अंगात मोकळे ढाकळे कपडे चढवले आणि सरळ येऊन बेडवर पडली.

फोन घेतला आणि निखिलला मेसेज केला.

“Hi… “

“अरे वा! आठवण आहे तुम्हाला आमची!”

“उम्म…”

“आणि sad स्माईली का?”

“मला ना वाईट वाटतंय”

“का? काय झालं?”

“मी नाही सांगणार…”

“छान… मी पण तुला नाही सांगणार…”

“काय?”

“काय माहीत!”

“”

“बोलणार आता??”

“तू judge करायचं नाहीस मग… मला ना वाईट वाटतंय कारण आज निरूची एंगेजमेंट झाली.”

“ओह… दॅट्स व्हाय… म्हणजे You are 80% happy and 20% sad. #F.R.I.E.N.D.S”

“More like 50% happy 50% sad”

“हाहा… सो तुला वाटतंय की सगळेजण life मध्ये पुढे चालले आहेत आणि आपण मागे राहिलो आहोत.”

“हो…”

“आणि यू आर डेस्परेट टू फाईंड पार्टनर पण You ain’t gettin one!”

“You are reading my mind!”

“हाहाहा… खरं सांगू… हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. मी पण माझ्या आजूबाजूला इतके couples बघतो, आणि इथे तर तुला माहित आहे गोष्टी किती लवकर escalate होतात! wink, wink…”

“ओह… तसं escalation!! हाहाहा…”

“हो… आणि मग त्यावेळेस वाटतं आपल्याला पण कोणीतरी असावं. इनफॅक्ट, फार काही नको… पण असं काम करून आल्यावर जेव्हा काही energy नसते तेव्हा at least जिच्या मिठीत जाता येईल असं तरी कोणीतरी असावं असं वाटतं.”

“Ooo…”

“हे बघ… आता तू मला judge करतेयस!”

“हाहा… नाही करत आहे उलट! खूप दिवसांनी आज मला वाटतंय की तुला पण रिअल इमोशन्स आहेत… 😛 :P”

“काहीही… आणि ह्या आधी काय मी रोबॉट होतो?”

“नाही… पण सारखं सारखं आपलं करिअर…”

“हो… मी म्हणतो मी करिअर फोकस्ड वगैरे आहे. पण रिकामा वेळ असला की मी काय विचार करतो माहितीय?”

“काय?”

“इट मे साऊंड silly… पण मी विचार करत असतो माझी future पार्टनर आत्ता काय करत असेल?”

“हाहा…”

“झोपली असेल, काम करत असेल, पार्टीला गेली असेल… काय माहित”

“मी आधी आधी रिकामा वेळ मिळाला की विचार करायचे, मी लग्न झाल्यावर माझं घर डेकोरेट करीन, आणि खूप ट्रॅव्हल करीन, we will have amazing relationship… etc. पण आता ना फक्त वाटतं, की कोणीतरी मिळावं आणि एकदाचं ह्यातून बाहेर पडावं.”

“Why so negative?”

“निगेटिव्ह नाही… पण थोडंसं जे flowery version होतं ना… ते आता कमी झालंय!”

“आय कॅन अंडरस्टॅंड… especially जेव्हा तुला इतके disturbing experiences येतायत. मागच्या वेळेस तू सांगितलेलंस तेव्हा तर I wanted to beat the shit out of that guy”

“जाऊ देत… मला ते परत आठवायचं पण नाहीए”

“राईट… सॉरी…”

“हम्म… बरं flight कन्फर्म झाली ना?”

“Yess… And once I get there I am gonna find you…”

“And what?? Kill me? हाहाहा”

“ते मी भेटून ठरवणार. Kill की आणखी काही…”

“काय आणखी काही?” सोनी उगाच मोबाईलमध्ये बघून स्माईल करत होती”

“तिकडे आल्यावर बोलायला काही ठेवणार आहेस का?”

“हीही…”

“झोप आता… गुड नाईट.”

“ओक्के… गुड नाईट.”

“बाय द वे… आज घातलास का तुझा तो ‘फ्लॅशी-फ्लॅशी’ ड्रेस?”

“हो… खूप कॉम्प्लिमेंट्स पण मिळाल्या…”

“क्या बात! काय होतं एवढं ‘कॉम्प्लिमेंट्स’ मिळण्यासारखं?”

सोनी स्वतःशीच हसू लागली… तिने थेट फोटो-गॅलरी उघडली.

“झोपलीस काय गं?”

सगळ्यांमधला कुठला जास्त छान दिसतोय… तो फोटो तिने उघडला, ‘शेअर’ वर क्लिक केलं आणि ‘निखिल’चं नाव सिलेक्ट केलं.

“झोप.. झो-…. अरे… काहीतरी पाठवलंस वाटतं”

“हे होतं…”

“ओह… now I know why all the compliments!!”

“हम्म…”

“चांगला आलाय फोटो!”

“अच्छा… फोटो चांगला आलाय… सांगते हां, ज्या मैत्रिणीनं काढलाय तिला सांगते, फोटो चांगला काढलायस म्हणून…” सोनीने अँग्री इमोटीकॉन पाठवला.

“हाहाहा… Ms Sarcasm!! ओके… Here you go… नंतर म्हणायचं नाही किती चीझी बोलतोय… Anyway… You are looking gorgeous. So beautiful, that if I was a stranger, I would have skipped a heartbeat looking at this picture!”

सोनीने नुसतेच लाजलेले इमोटीकॉन्स पाठवले.

“And now forget all I said, because I know it was damn cheezy.”

“हीही”

“आता मला दुसऱ्या काहीतरी विषयावर बोलायला पाहिजे. पटकन काहीतरी सांग…”

“काहीतरी…”

“मारलास PJ?”

“नाही मी तर तुंग मारला…”

“व्हॉट??”

“अरे… मी आज एका हाडाच्या ट्रेकरला भेटलीय…” सोनीने गप्पा सुरु केल्या आणि मग १.३०- २ वाजता कधीतरी डोळे जड होऊंन तिचा फोन हातातून घरंगळला.

भाग १८

“हॅपी बड्डे माईआज्जी…” सोनी फोन आईकडून घेत high-pitch मध्ये ओरडली.

“राणू… फोनवर कसला हॅप्पी बड्डे… इकडे येऊन जा… किती दिवस आला नाहीए तुम्ही कोणीच”

“तूच ये ना आज्जी…”

“मला म्हातारीला नाही बाई सोसवत तुमच्या पुण्याचं प्रदूषण. साधं एक आंब्याचं झाड नाही तुमच्या सोसायटीत!”

“हेहे… आज्जी… तू आणि तुझी आंब्याची बाग…”

“अगं येऊन बघ तू नुसतं… कैऱ्या लगडल्या आहेत नुसत्या… तुझ्या आवडीचं कैरीचं पन्हं करून देते.”

“तोंडाला पाणी सुटतंय माझ्या…”

“मग तर येच… शुक्रवारी सुट्टी आहे ना?”

“उं…” सोनीला आठवलं की त्यादिवशीचा आपला वेगळाच प्लॅन बनलाय. “बघावं लागेल आज्जी… मोस्टली काम असेल माझं.”

“बरं बरं… काम चुकवू नका बाई… कंपनीत बरं आहे का सगळं? जास्त काम लागत नाही ना… तब्येत सांभाळून करा बाई… तुम्ही आजकालच्या पोरी, खाणं कमी आणि अभ्यासच जास्त, ह्या चिनूला सांगून दमले मी…”

“हाहा… करू दे गं… ह्यावेळेस दहावी ना तिची?”

“हो… येते आमच्याकडेच अभ्यासाला मध्ये मध्ये. म्हणे बागेत बसून छान अभ्यास होतो…”

“आजोबा कुठायत?”

“आजोबा गेलेयत बंड्याला फिरायला घेऊन…”

“आज्जी… मी येते पुढच्या महिन्यात वगैरे… तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप इच्छा होतेय.”

“ये गं… मला पण तुम्हाला बघायची इच्छा होतेय… बरं चल, तुझी कामावर जायची वेळ झाली असणार…”

“हां आज्जी… देते मी आईकडे”

आज्जीचं किती भारी लाईफ आहे यार. शी! आपणच असे शेंबडे कसे झालो कुणास ठाऊक. त्या काळात माईआज्जी आणि आजोबांनी लव्ह मॅरेज केलंय. आणि आम्ही बघा… एवढं सगळं असून आमच्या नशिबात काय प्रेम नाही की आंब्या-केळीची बाग नाही. आमच्या आयुष्यात फक्त ‘M-Cubes’!! सोनीने हेल्मेट उचललं आणि ऑफिसला निघाली.

“यार… हे जेटलॅग मुळे डोकं दुखतंय!” दुपारी निखिलचा मेसेज आला.

“झाली का सकाळ?”

“हो… आताच ब्रेकफास्टला भाजी-पोळी खाल्ली”

“हाहा… परवा पर्यंत थांबेल ना दुखायचं?”

“म्हणजे काय…. थांबलंच पाहिजे…”

“बरं कुठे भेटायचं…”

“वाह! म्हणजे मी एवढ्या लांबून यायचं, मग मी झोमॅटो वर प्लेस सर्च करायची, रेटिंग बघायचं आणि तुला सांगायचं…”

“शी बाबा… किती ड्रामा! ठीकेय… मी सांगते संध्याकाळी.”

नॉन व्हेज चालेल, बार – मोस्ट वेलकम असेल, ambiance चांगला पाहिजे असं करत करत एक ‘Funky’ जागा ठरली.

फायनली शुक्रवार आला. “आज संध्याकाळी मी डिनरला नाहीए, निरुसोबत जाणार आहे” असं घाईघाईत सोनीने सकाळीच सांगून टाकलं होतं.

5.30 वाजता तिने आपली ठेवणीची बॅग कपाटातून काढली.

त्यातला एक knee-length ‘वन-पीस’ तिने काढला. अंगात घालून मग आरशासमोर उभी राहीली. केस थोडेसे हातांनी फुलवले. हम्म… छान दिसतोय हा. तिने केस वर घेतले, high-ponytail सारखे धरले. हम्म… असं पण छान वाटतंय. पण जरा जास्तच होईल ना पहिल्या भेटीसाठी? इतके पण डायरेक्ट सिग्नल्स नकोत द्यायला. हाहा…! ह्या भेटीत कसं वाटतंय बघू, मग नेक्स्टवाली मध्ये ‘वन-पीस’ घालू. पण आता काय घालूया मग. एकदम पण गाव-की-छोरी वगैरे नको. त्याला पण कळू दे, It’s not only him that looks good!

शेवटी तिने क्रॉप-टॉप आणि palazzo घातला. केसांवरून ब्रश फिरवला, मॅचिंग इअररिंग्ज घातल्या, ठेवणीतलं परफ्युम मारलं, थोडीशी लिपस्टिक ओठांवर डॅब केली. उजवी, डावी, समोरून, मागून, चौमितीत प्रोफाइल बघून घेतली. तासभर आवरून झाल्यावर ती छोटी स्लिंग-बॅग घेऊन ती बाहेर निघाली.

“अगं बाई… एवढं आवरून कुठे चाललाय तुम्ही?” आईने वाटेत पकडलंच.

“अं… ते निरूची… म्हणजे महेशची पार्टी आहे. म्हणजे निरूनेच सांगितलंय चांगलं आवरून यायला.” खाली बघत तिने उत्तर दिलं, पायात सँडल्स अडकवून ती बाहेर पडली.

सूर्य पश्चिमेकडे कलला होता. रस्त्यावर छान तांबूस उजेड पडला होता. सोनीला खूपच फ्रेश वाटत होतं. गाडी चालवता चालवता आज ती गाणं म्हणत होती. अर्ध्या तासात ती भेटायच्या ठिकाणी पोचली. तिने बाहेरच गाडी थांबवली.

आत जाऊया की नको? आलाय का हा? आला नसला तर… इकडे बाहेरच थांबू. पण तो गार्ड बघतोय… थांब कॉलच करूया. तिने बॅगमधून फोन काढला. निखिलचाच मेसेज आला होता. “I have reached!” १० मिनिटापूर्वीच पोचलाय हा. सोनीने गाडीची किल्ली काढून घेतली आणि घाईने आतमध्ये गेली. आत जाऊन थोडंसं स्कॅन केल्यावर एका मुलाने हात केला. दोघांसाठीच्या एका टेबलवर तो बसला होता.

कॅज्युअल चेक्सचा शर्ट, वरची दोन बटणं मोकळी, आतमध्ये व्हाईट T-shirt, आणि ती चेहऱ्यावरची बारीकशी stubble… Wow! चांगलाच fashion सेन्स आहे ह्याला. बापरे… मला बिलीव्हच होत नाहीए मी ह्याला भेटतेय. आज न विसरता सेल्फी घेणारेय मी ह्याच्याबरोबर. काही नाही तरी स्कूल फ्रेंड्स ना जळवता येईल… हेहे!

“हाय…”

“हाय…” म्हणताना सोनीचा श्वास फिस्सकन सुटला.

“लूकिंग नाईस… as usual!”

“You too… as forever!” असं सोनीला म्हणावंसं वाटलं पण ती नुसतंच ऑकवर्ड हसली.

“तुझी चॉईस चांगली आहे…”

“अं… म्हणजे?”

“म्हणजे छान रेस्टॉरंट pick केलंयस तू!”

“ओह… मला वाटलं स्वतःबद्दल बोलतोयस…” असं देखील सोनीला म्हणायचं होतं पण ती नुसतंच “थँक्यू” म्हणाली.

“बरं… ऑर्डर डिसाईड कर.”

“ए… मी नाही हं… मला नाही जमत ऑर्डर वगैरे द्यायचं!”

“सिरियसली?”

“हो… मी कधीच नाही ऑर्डर करत.”

“अगं पण मग तुला काय आवडतं ते तरी सांग!”

“श्रेयसने मागच्या वेळेस इथे ‘चिकन पेरिपेरी’ घेतलं होतं ते छान होतं!”

“ओक्के… सो चिकन पेरी-पेरी इट इज! आणि प्यायला?”

“उम्म… मला ना…”

“हं?”

“म्हणजे तुला weird नाही वाटणार ना?”

“काय weird?”

“मला इथले cocktails ट्राय करायचे आहेत!”

“त्यात काय weird आहे मग?”

“नाही म्हणजे, तू म्हणशील नाहीतर… काय मुलगी आहे… पहिल्यांदाच भेटतोय आणि ही काय दारुड्यासारखं करतेय.”

“हाहाहा…. बापरे… हाहाहा” निखिल खूपच वेळ हसत होता, “अगं, माझ्या कॉलेजमध्ये मुलं-मुली सकाळी-सकाळी सुद्धा high होऊन आलेले असायचे. ते weird आहे म्हणू शकतेस तू फारतर…”

“बापरे… तू नाहीस ना उठून सुटून बाटली घेऊन बसत?”

“हाहाहा… तू आज खूपच हसवतेयस मला. म्हणजे इतके दिवस मी चॅटवर तुला हे असं काहीतरी बोलताना इमॅजिन करायचो. पण आता तू समोर आहेस आणि तुझे expressions +तुझे words… खूपच मजा येतेय मला”

“हेहे… बरं, कसा झाला मग लग्नाचा कार्यक्रम?”

“छान होता… खूप दिवसांनी सगळे कझिन्स भेटलो होतो त्यामुळे इट वॉज फन!”

“नाईस… मग तुला नाही का चिडवलं कोणी, आता लग्न कधी करणार विचारून? मी त्यामुळंच कुठल्या कार्यक्रमालाच जायचं टाळते.”

“I know… बापरे, relativeनी मला torture केलंय ह्या २-३ दिवसांत.”

“हो ना…” म्हणत सोनीने समोर आलेल्या चिकनचा तुकडा तोडला.

एक-एक ऑर्डर देत देत आणि गप्पा मारत ९ वाजले, पण सोनीला तिथून अजिबात हलावसं वाटत नव्हतं.

“ऐक ना… मी तुला एक सीक्रेट सांगू…?” समोर आलेल्या सळसळत्या ब्राऊनी मध्ये फोर्क घुसवत सोनी म्हणाली.

“ओह… सांग ना… मी नाही सांगणार कुणाला” तो हसला.

“पण तू मला चिडवशील आणि मला judge करशील” सोनी एक ओठ बाहेर काढून म्हणाली.

“पुन्हा तेच… आता सांग नाहीतर सगळी ब्राऊनी मी एकटा खाऊन टाकीन”

“बरं…” सोनी खाली बघू लागली आणि स्वतःशीच हसू लागली, “शाळेत असताना ना…”

“हं..?”

“You were my crush!” सोनीने पटकन तोंड लपवलं

“हाहाहा… रिअली??”

सोनीने नुसतीच मान हलवली.

“Oh my god… हे नवीन आहे माझ्यासाठी… बापरे… हाहाहा आणि थँक्यू बाय द वे… माझी self esteem वाढली.”

“माझाच नाही… बऱ्याच मुलींचा क्रश होतास तू…”

“आय कान्ट बिलिव्ह इट…!”

“हो अरे…”

ह्यावर निखिल खूप वेळ हसत राहिला, मग शाळेतल्या गमती-जमतींमध्ये दोघेही रंगले.

निघताना “धिस वॉज रिअल फन!” असं म्हणत त्याने हात पुढे केला. सोनीने त्याच्या हातात हात दिल्यावर तो हलकेच जवळ आला आणि त्याने तिला hug केला. सोनीला काही कळलं नई आणि ती नुसतीच स्तब्ध उभी राहिली.

“सो निघायच्या आधी एकदा भेटूया…” असं म्हणत तो चालू लागला. ती अजून तिथेच उभी होती.

“चल ना…”त्याने मागे वळून पाहिलं.

सोनी स्वतःशीच हसत त्याच्या मागे चालू लागली.

निखिल पुढच्या रविवारी तो जाणार होता त्यामुळे, पुढच्या Saturdayला brunch ला भेटू असं ठरलं.

पुढचा वीक सुरु झाला नाही तोच सोनीला शनिवारची फार उत्सुकता लागली होती. ह्या आठवड्यात तिच्यात energy चढली होती. ती गेले ३-४ दिवस लवकर उठत होती, आईने काही बोलायच्या आत आवरून तयार होत होती. लवकर ऑफिसला जात होती. घरात सगळ्यांशी नीट बोलत होती. आईने एकदोनदा ‘ताप आलाय का?’ म्हणून चेकही केलं.

ऑफिसमध्ये मात्र तिचं म्हणावं तितकं कामात लक्ष लागत नव्हतं. अधे-मध्ये ती Myntra किंवा Stalk-Buy-Love वर टाईमपास करत होती. हा ड्रेस छान दिसेल का? ही डंगरी cool वाटतेय वगैरे वगैरे…! मध्ये मध्ये अनिमेश Skype वर मेसेज करून अपडेट्स मागायचा, मग ती गडबडीने कामाला लागायची.

आज तर फ्रायडे असून ती ऑफिसला लवकर आली. संध्याकाळी जाऊन तिला जरा ब्युटी-स्लीप घ्यायची होती. आणि त्या वन-पीस ला match होणारं आयलायनर घ्यायचं होतं.

“आकाश… चलो. जल्दीसे ब्रेकफास्ट करके आते है!”

“तुम… इटने जल्दी ऑफिस?? मैं तो मेरा काम है इसलिये आया हूँ! तुम क्यूँ…?”

“अब बातही करोगे या चलोगे?”

“ठीक है चलो चलो…”

सोनीने एक डोश्याचं कुपन घेतलं आणि आकाशने सँडविच घेतलं. काचेजवळच्या एका टेबलावर दोघे जाऊन बसले.

“आकाश… एक बात बताओ…”

“हां बोलो?” आकाश आपल्या सॅन्डविचचा तुकडा तोडला.

“तुम्हे लगता है के कुछ लोग एकदम परफेक्ट होते हैं?”

“Umm… I don’t really believe in perfection. मुझे लगता है के we are all imperfect but that makes us unique!”

“Actually, I was asking from a Partner’s perspective. Do you think it’s possible to get Mr Right?”

“हाहा… that ways! वो डिपेंड करता है… तुम्हारा देखा तो तुम्हे तो ‘Mr. Right’ मिल जायेगा. हमें तो कोई ‘Ms. left’ भी नही मिल रही…”

“कुछ भी…” सोनी हसत म्हणाली.

“सच मे… पता है, लास्ट मंथ मै घर गया था…”

“हां…”

“Actually तब एक लडकीवाले आये थे हमारे घर.”

“ओह… बताया नही तुमने.”

“तो उन्होने मुझे रिजेक्ट किया… और पता है क्यूँ?”

“क्यूँ??”

“क्यूँकी मुझे चष्मा है!”

“व्हॉटट्ट!” सोनीचे डोळे मोठे झाले.

“जी हां!”

“बापरे… ये भी कोई criteria है रिजेक्ट करने का? पागल थे क्या वो लोग?”

“पता नही क्या थे…”

“छोडो यार अच्छा ही हुआ… ऐसे लोगोंसे रिश्ता जोडनाही नही है…”

“हां… तो मै इसीलिये कह रहा था… हमे कोई नही मिलेगी… हम तुम्हारे जैसे परफेक्ट थोडीही हैं?” आकाश हसला आणि त्याने उठत रिकाम्या प्लेट्स उचलल्या.

“कुछ भी… अभी तो तुमने कहा था ना, कोई परफेक्ट नही होता?” सोनी कमरेवर हात ठेऊन म्हणाली.

“हाहाहा… Every theory has some loopholes, you know!” त्याने डोळे मिचकावले.

दोघेही चालत लिफ्टजवळ आले. लिफ्ट मध्ये गेल्यावर सोनी त्याच्याकडे निरखून बघू लागली.

“क्या हुआ, कुछ लगा है क्या?”

“तुम्हारा चष्मा उतारो जरा …”

आकाशने चष्मा काढला.

“अच्छे ही तो दिखते हो यार… वैसे तुम लेन्सेस क्यूँ नही पेहनते?”

“पता नही… कभी सोचा ही नही इस बारे में!”

“मंद!! हाहाहा…”

“अरे…”

“और नही तो क्या…”

ते लिफ्ट मधून हसत बाहेर पडले. सोनी डेस्कवर गेली. तिने लॉगिन केलं आणि ती नुसतीच स्क्रीनकडे बघत राहिली. तिच्या डोक्यात एक वाक्य उगाच घोळत होतं – ‘तुम्हे तो ‘Mr. Right’ मिल जायेगा’!

भाग १९

सोनी शनिवार असून सकाळी सहालाच उठून बसली होती. चक्क आज तिने आपल्या खिडकीतून सूर्योदय बघितला. नारिंगी-जांभळं आभाळ बघून तिने ते मोठ्ठ्या श्वासात भरून घेतलं. खूप वेळ खिडकीतून रंगलेल्या नभाकडे बघून ती विचार करत होती.

आपण वेडेपणा तर नाही करत आहोत ना? म्हणजे आपण काहीतरी assume करून चाललोय, माहीत नाही ते खरं आहे की नाही. पण निखिल पॅकेज आहे यार. बापरे… कोणी काही महिन्यांपूर्वी सांगितलं असतं की तो अशाप्रकारे आयुष्यात येणार आहे तर आपण त्याच्यावर पोट धरून हसलो असतो. पण हे खरं झालंय. कदाचित हे signsच असतील. किती छान टाईम स्पेंड झाला मागच्या आठवड्यात. That must have SOME meaning to it! खरंच होईल का पण आपली इच्छा पूर्ण? ते म्हणतात ना ‘किसी चीझ को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात’ वगैरे… ते होईल का खरं? आणि तसं माझ्यात काय वाईट आहे, हो ना? दिसायला मी बऱ्यापैकी above average आहे. माझा फॅशन सेन्स चांगला आहे. ऑफिसमध्ये I have good image. I can get things done!

कूकिंग वगैरे काय जमेल हळू हळू… पण आय थिंक आय कॅन मॅनेज एव्हरीथिंग व्हेरी वेल! आणि मला मुळात कुजकट बोलायला जमतच नाही त्यामुळे समोरच्याला हर्ट करण्याचा प्रश्नच नाही. आणि… आणि… मी understanding पण आहे. आकाश म्हणत होता तसं मी जरा कमी ‘परफेक्ट’ च आहे. हेहे… थोडीशी मंद पण आहे, कुणावरही पटकन विश्वास ठेवते, पटकन कशाला नाही म्हणू शकत नाही. पण ठीक आहे ना… तेवढं चालतं. आपल्याच विचारांवर ती खुश झाली.

तिने हीटर ऑन केला आणि बाथरूम मध्ये गेली. बादलीत पाणी सोडलं आणि पाण्याकडे बघत राहिली.

पण कसं डिफाईन करू ह्या फीलिंग्स ना? Love is such a strong word! No… Not love! मग काय? Infatuation? नाह… मी तितकी immature नाहीए आता. आय मीन आता मला उगाच ‘कुठल्याही’ गोष्टी आवडत नाहीत. I am above that flowery phase now. आता जे काही आहे ते पूर्ण विचार करून, प्रोज-कॉन्स compare करून मग! Umm…किती calculated होतंय ना.

पण आता जे काही आहे ते कॅल्क्युलेटेडच असेल ना. प्रत्येकाला आपल्यासाठी बेस्ट काय आहे तेच हवं असतं.

बापरे! आपण किती वेळ नुसतंच विचार करत बसलोय… चला आवरायला घ्या. सोनी बाहेर आली आणि अंघोळीचे कपडे घेऊन पुन्हा बाथरूममध्ये गेली. आज १० वाजता brunch साठी भेटायचं ठरलं होतं पण सोनी ९ वाजताच रेडी होऊन बसली होती. आणि सकाळी लवकर उठल्यामुळं तिला भूक पण लागली होती. ती किचनमध्ये गेली आणि तिने कॉफी बनवायला घेतली.

“ए… शुक शुक…” आई जोरात किचनमध्ये येत ओरडली. सोनीने दचकून मागे पाहिलं.

“तू आहेस होय… मला वाटलं मांजर आलं!” आई म्हणाली.

सोनीने कपाळावर हात मारला, “आई घाबरले ना मी… बघायचं तरी आत येऊन”

“अगं… आत येईपर्यंत ते चट्ट करून जातं दूध! आणि एक मिनिट… तू… इथे कशी काय? आणि ते पण एकदम आवरून सावरून?”

“ते मी तुला सांगितलं होतं ना, आमच्या ऑफिसमधल्या मुलींचं ठरलंय भेटायचं…” सोनी कॉफीच्या कपात बघत म्हणाली.

“पण तुला तर ती मिता का कोण… आवडत नाही ना? मग त्यांच्याबरोबर कशाला जायचं?” आईने फ्रिजमधून मिरच्या-कोथिंबीर काढत विचारलं

“अं…” आईच्या प्रश्नावर सोनीची विकेट पडली. “म्हणजे, ती नाहीए येणार… दुसऱ्या मुली आहेत.”

“बर बर…”

आईने पुढे काही बोलायच्या आत सोनी तिथून बाहेर आली. तिने सोफ्यावर बसून पेपर उघडला, हळूच हॉरोस्कोपचं पान उघडलं.

You’re in a daredevil mood today, so what are you planning to do? You might decide to do something that would normally make you feel scared or nervous, or you may simply rush into a decision without thinking it through carefully. Pay attention to all subtle signals today, especially if they seem to be arriving in little groups. The universe is trying to make a point to direct your attention to the centre ring, where your prize is waiting.

बापरे… हे खरंच बरोबर ओळखतात की काय? ओके. सो, मला जरा subtle signals कडे नीट लक्ष द्यायला पाहिजे आज. सोनीने पेपर ठेवला. कॉफीचा मग आत जाऊन विसळून ठेवला.

“काय नाव म्हणालीस ह्याचं?”

“नि…” सोनीने जीभ चावली, “क… कुणाचं?”

“हे आत्ता कंपनीवाले भेटताय ना…?” आई लसूण सोलत म्हणाली.

“हां… ते आम्ही फक्त मुलीच भेटतोय. निरू, मोहिनी, मिता… अं म्हणजे मिताचं कॅन्सल झालंय खरं…”

“बरं जा… एन्जॉय! आणि लवकर ये…” आई उगाचच तिरकस हसली.

अजून काही प्रश्न यायच्या आत पळावं म्हणून सोनी झटकन बाहेर गेली. “येते गं” म्हणून तिने पटापट पायऱ्या उतरल्या.

—–

नेहमीप्रमाणे ती गाडी पार्क करून कॅफेच्या दारात थांबली. तो आत येऊन बसलाय का हे चेक करायला तिने त्याला फोन लावला. त्याने फोन उचलला नाही. आलाय वाटतं इथेच कुठेतरी सोनीने जरा आसपास नजर टाकून बघितलं. थोडा वेळ थांबून तिने पुन्हा कॉल लावला.

“हॅलो… हां अगं पोचतोय ५च मिनिटांत” म्हणून त्याने फोन ठेवला.

सोनी नुसतीच awkwardly तिथे उभी राहिली. फोनमध्ये उगाच फेसबुक स्क्रोल करत एका कडेला थांबली. पाच-एक मिनिटात त्या कॅफेसमोर एक स्कुटी थांबली. मागच्या सीटवरून निखिल उतरला. समोरच्या सीटवरच्या मुलीशी थोडावेळ गप्पा मारून त्याने तिला “बाय” केलं.

“हाय… अगं बाहेरच काय थांबलीयस? आत जाऊन बसायचं ना…”

“अं… हो…”

ती निखिलच्या मागोमाग आत कॅफेमध्ये गेली. एक जागा रिकामी बघून ते तिथे बसले.

“खूप वेळ थांबली होतीस का तू?”

“नाही नाही… ५ च मिनिटं झाली”

“अच्छा… अगं ती कॉलेजची फ्रेंड होती, ती इकडे पुण्यात जॉब करते, म्हणलं तिला पण भेटून घेऊ जाता-जाता…”

“अरे… मग इकडे बोलवायचं ना…”

“नाही… आम्ही सकाळीच भेटलो होतो… आता तिला पण बाहेर जायचंय कुठेतरी”

“अच्छा…”

“बरं… काय घेणार? मला एक मस्त लेमनेड प्यावंसं वाटतंय.”

“मला पण तेच चालेल.”

निखिलने वेटरला बोलवून दोन लेमनेड सांगितले.

“झाली पॅकिंग वगैरे…” सोनीने उगाच काहीतरी विचारलं.

“हो झाली ना… आईने काय काय दिलंय, त्याचंच weight आता जास्त होणार.”

“ओह… हाहा” हे पण उगाच!

लेमनेड आलं, निखिल मेनू चाळत होता पण सोनीच्या डोक्यात एकच विचार घिरट्या घालत होता.

“काय विचार करतेयस?”

“हं?” सोनी एकदम भानावर आली. “अं… काही नाही…”

“काही नाही काय… मी विचारतोय पास्ता घेऊया का? पण तुझं लक्षच नाहीए”

“पास्ता ना… पास्ता चालेल… चालेल मला पास्ता…”

“हाहाहा… Something is up with you Today!” निखिलने हसत हसत मेनू साईडला ठेवला, “बोल… काय झालं?”

“काही नाही… असंच काहीतरी विचार करतेय…”

“तेच मी विचारतोय… कसला?”

“ओके… I don’t know how to say this… Umm…”

तेवढ्यात वेटर आला आणि सोनीने श्वास सोडला. निखिलने व्हाईट सॉस मधला एक पास्ता मागावला, “मी मगाशी पण थोडं खाल्लंय, सो वाटल्यास नंतर अजून काहीतरी मागवू!”

“हां चालेल” सोनीने मान डोलावली.

“ओके… where were we?”

“अं… काही नाही…”

“अगं तू काहीतरी म्हणत होतीस ना आय डोन्ट नो हाऊ टू से वगैरे…”

“मला नाही आठवत आता…”

“ओये गजनी!”

“हेहे…” सोनी आपल्या ‘नर्व्हस-लाफ-मोड’ मध्ये गेली.

“बोल गं… डोन्ट वरी! मी तुला काहीही judge वगैरे करणार नाहीए”

बापरे… आय कान्ट डू धिस! पण सोनी… आत्ता नाही तर कधीच नाही… तुझ्याकडे इतका वेळ नाहीए. किंवा जाऊ दे ना असं समोरा-समोर बोलण्यापेक्षा नंतर मेसेज वर विचारू. शी… ह्या गोष्टी मेसेजवर बोलायच्या असतात? तूच अशांना मूर्ख म्हणतेस ना? नको आता आलेली संधी घालवायला. आणि काय आहे ते होऊन जाईल ना इथेच. ओह गॉड! फाटलीय माझी चांगलीच. काय करू?

“ठीकेय तुझा विचार करून झाला की बोलू!” निखिल हातांची घडी घालत म्हणाला.

सोनीने त्याच्याकडे बघितलं. तिला वाटत होतं तिच्या पायातली शक्ती गेलीय. तो तिच्याकडे बघून स्माईल करत होता. सोनीने पट्कन खाली बघितलं.

“Do you see our future together?” सोनीने एका श्वासात आपलं वाक्य संपवलं.

काहीवेळ कोणीच काही बोललं नाही. मग तिने वर बघितलं.

“सॉरी… मला कळलं नाही… म्हणजे?”

“म्हणजे… आपलं काही future आहे का. एकत्र.” सोनीने पुन्हा सगळा धीर एकवटला.

“एकत्र? As in… as in like in a relationship?” आता निखिलही गडबडला होता.

“हम्म…”

“म्हणजे… आपण गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असं?”

“आय एम सॉरी… मी चुकीचं स्टार्ट केलं” सोनी डोकं हलवत म्हणाली, “निखिल… आय थिंक आय लाईक यू! म्हणजे आधीपासून तसं काही नव्हतं, पण आपण recently जास्त बोलतोय ना… तर तेव्हा हळूहळू I started liking you. आणि मला वाटलं की…”

“सुनहरी” सोनीला मध्येच थांबवत तो म्हणाला, “थोडंसं थांब. See, आय लाईक यू टू! पण मी तश्या way ने कधी विचार नाही केलाय गं!”

“म्हणजे?” सोनीच्या पोटात कालवू लागलं.

“म्हणजे…”

वेटरने तेवढ्यात पास्ता आणून ठेवला.

“आय मीन… धिस इज जस्ट huge! I am so sorry मी तुला कुठेही lead on केलं असेल तर. मला तुला हर्ट नाही करायचं आहे. But I don’t want to lie to you. मी तुझ्या बाबतीत ‘एक खूप चांगली फ्रेंड’ इथपर्यंतच विचार केलाय आत्तापर्यंत. आय एम रिअली सॉरी… माझ्याकडून काही चुकलं असेल तर!”

सोनी पूर्णवेळ खाली बघत होती.

“सुनहरी?”

“हाहाहा…” सोनीने त्याच्याकडे बघितलं आणि ती हसू लागली.

“What’s so funny?”

“हाहाहा… अरे काही नाही… मी मजा करत होते.” ती अजूनच हसू लागली.

“सिरियसली??”

“हो… खरंच…”

“किती वाईट आहेस अगं तू? असा कोण जोक करतात?” त्याने चमचा उगारला.

“हेहेहे… मी म्हणलं बघू मासा गळाला लागतोय का?” बोलता बोलता तिचा आवाज जाड झाला. तिने पटकन समोरच्या ग्लास मधलं पाणी पिलं.

“मी खरंच घाबरलो होतो… हे काय झालं म्हणलं. ओके आहोत ना आपण?”

“Yes. Totally!” सोनीने पुन्हा ग्लास तोंडाला लावला.

“हुश्श… चल खा आता पास्ता.”

“अं…” तिने फोनमध्ये बघितलं, “Actually मला ना वेळ होतोय… आईने लवकर बोलावलं होतं. कधी वेळ गेला कळलंच नाही.”

सोनी खुर्चीवरून उठली.

“अगं… एवढं मागवलंय तर खाऊन तरी जा…”

“न… नको…” ती काउंटरवर गेली.

“काय करतेयस?” म्हणून निखिल देखील उठला.

सोनीने काउंटरवर ५००ची नोट ठेवली आणि ती दरवाज्याकडे निघाली.

“ऑल द बेस्ट निखिल… हॅपी जर्नी!” तिने त्याच्याशी हात मिळवला. डायरेक्ट बाहेर पडली आणि रस्त्याला चालू लागली. ती गाडी शोधत शोधत पुढे गेली आणि मधेच थांबली. डोक्यावर सूर्य तापला होता. तिला लक्षात आलं की ती बरीच पुढे आली आहे आणि तिची गाडी मागेच राहिलीय. ती तिथेच थांबली. तिने कपाळावरून सगळे केस मागे सारले, केसांना घट्ट धरून ती तशीच उभी राहिली. फक्त आजूबाजूला माणसं फिरतायत, काहीतरी बोलतायत, गाड्यांचे आवाज येतायत. तिला थोडावेळ गरगरल्या सारखं झालं. तिने तोंडावरून हात फिरवला आणि परत मागे फिरली. गाडीच्या इथे पोचली. तोपर्यंत तिथे निखिल पण आला होता.

“हाहा… घाईमध्ये गाडी कुठे आहे तेच विसरले” असं म्हणून तिने पटकन स्कार्फ तोंडाला बांधला. गाडीला स्टार्टर मारून ती निखिलपासून लांब निघाली.

भाग २०-१

“सुनहरी, वो आपने जो फाईल दी है उसमे फिरसे error आ रहा है!” अनिमेशचं हे वाक्य ऐकून सोनीने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर काढली. अनिमेश आणि मिताला बघून ती एकदम खुर्चीवरून उठून उभी राहिली.

“क्यूँ… क्या हुआ उसमे?”

“Actually वही देखने के लिये मैने मिता को बोला था. आपको पता चला क्या मिता, क्या हुआ है?”

“कुछ नही अनिमेश इट्स अ सिम्पल error. आय थिंक सोनीसे overlook हुआ होगा. I have corrected it.”

“ओके… गुड गुड… सो व्हॉट आय वॉज थिंकिंग, सुनहरी… ये प्रोजेक्ट थोडा अर्जंट है. और मिताने इस tool पे पहले भी काम किया है. तो मिताको ये हम हॅन्डओव्हर करते हैं. और हमारा वो प्रोजेक्ट है ना… जिसपे आप काम कर रहे थे, वो आप कंटिन्यू कर लो.” अनिमेश एवढं बोलून ‘मीटिंग है’ म्हणून तिथून घाईत गेला.

“सोनी वो तुमने कॉमन ड्राईव्ह पे रखा है ना? नही होगा तो रख लो प्लिझ” एवढं म्हणून मिता पण निघून गेली.

सोनी खुर्चीवर मट्कन बसली. शीट! काय करतोय आपण? कसल्या फालतू चुका करतोय? इतकं काय झालंय असं… की आपल्या कामात अश्या चुका होतायत?

ती उठली आणि बाथरूम मध्ये गेली. बाथरूममधल्या मोठ्ठया आरशात तिने स्वतःला बघितलं. काय होतंय सोनी? का असं वागतेयस? का एका छोट्या गोष्टीसाठी इतका त्रास करून करून घेतेयस. छोटी गोष्ट? छोटी आहे ही गोष्ट…? का मी असा मूर्खपणा केलाय? मी का थांबले नाही… केवढं humiliating होतं ते. खूप मूर्खासारखं वागलेय मी. सोनी… पण rejection पचवायला शिकलं पाहिजेस ना तू? आत्तापर्यंत काही सगळं एकदम भारी आहे आणि आत्ता पहिल्यांदा rejection मिळतंय असं आहे का? पण… पण तो मला आवडतोय… कसं विसरू मी त्याला. आणि कसं विसरू ह्या फॅक्टला कि त्याला मी आवडत नाही.

सोनीच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं. तिने पटकन बॉक्समधून तीन-चार tissue पेपर काढले, डोळे पुसले, पातळ झालेलं नाक पुसलं.

बास! नाही आता… जा आणि काम कर. चांगला प्रोजेक्ट हातातून निसटलाय. आहे त्यात पण गोंधळ करू नकोस. तिने पाण्याने खळखळा तोंड धुतलं. लाल झालेलं नाक घेऊन ती जागेवर येऊन बसली.

लॅपटॉप वर थोडावेळ खिटखिट करून ती ५ वाजताच उठली. तिने बॅग भरली आणि कुणालाच ‘टाटा-बाय बाय’ न करता घरी निघाली.

“सोनू… लवकर घरी आलीस?”आई सिरीयल बघत बसली होती

“हम्म…” सोनीने टेबलच्या कोपऱ्यात हेल्मेट ठेवलं. ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली. बॅग बेडवर टाकून ती तिथेच बसली. तिचा हात डोक्याकडे गेला.

का नाही आवडले मी त्याला? आणि मग तसं असेल तर तो कशाला आला माझ्या आयुष्यात? झालं असतं माझं नॉर्मल लग्न. असते मी कुठेतरी खितपत पडलेली. का देवा? का त्याला माझ्या आयुष्यात आणलंस? मला मोठी स्वप्नं बघायचा अधिकारच नाहीए. माझ्या नशिबात नाहीए प्रेम वगैरे. मी इथेच कुठेतरी संध्याकाळच्या पोळ्या आणि भाजी करणार. भाताबरोबर वरण लावणार. तेच करायचंय मला. मी कसली ‘वर्ल्ड टूर’ वर जातेय. मी इथेच सडणार आहे. आयुष्यभरासाठी. कुठल्यातरी अनोळखी मुलाच्या बेडमध्ये रात्री झोपणार. त्याच्यासाठी डब्बा बनवून देणार. उसनं प्रेम आणणार. त्याला माझ्या शरीराचा उपभोग घेऊ देणार.

तिने दोन्ही हातात डोकं घट्ट पकडलं, तिचे दात एकमेकांवर करकर करू लागले. बास!! हेच आहे माझ्या आयुष्यात. ती ताडकन बेडवरुन उठली. आणि खोलीत फेऱ्या मारू लागली.

हाहाहा… किती फालतू आहे मी. मला वाटलं होतं माझं लाईफ खूप भारी असणार आहे. पण ते नशिबात असावं लागतं! पण हे कळून घ्यायला मला तेवढी अक्कल कुठे आहे. पण आता आली ना… आता चांगलीच अक्कल आली. काय करूया… निखिलला मेसेज करूया… “थँक्स फॉर द lesson!” म्हणून.

तिने फोन उचलला. निखिलचे सगळे चॅट डिलिट केले होते त्यामुळे कॉन्टॅक्ट लिस्ट मधून तो सर्च केला.

“Hi Nikhil. Hope you are doing fine. I am fine too. Just wanted to thank you for the biggest lesson of my life….” तिने टाईप केलं.

का पण? त्याचं काय चुकलंय? त्याला असा मेसेज करायला? त्याने जे आहे ते खरं सांगितलं ना. तू आता असा फालतू विचार करत होतीस त्याला तो काय करणार.

तिने तो मेसेज इरेझ करून टाकला.

टुणून!

“hi there!” निखिलचाच मेसेज आला होता.

शीट! ह्याने का मेसेज केलाय आता? तिने फोन गादीवर फेकला. नाही…! नाही मला बोलायचं तुझ्याशी. अजून अपमान नाही करून घ्यायचाय.

पण आता ब्लू टिक्स गेल्या असतील त्याला. आपण रिप्लाय नाही केला तर त्याला कन्फर्मच होईल की आपण नुसतीच मजा नव्हतो करत.

“hi…” तिने फोन घेऊन मेसेज केला.

“कशी आहेस?”

“ठीक आहे.”

“नक्की?”

“हो… मला काय झालंय?”

“थँक गॉड!”

“का?”

“काही नाही… I was a little worried after you stormed out of that café!”

“हाहाहा… अरे मला खरंच उशीर झाला होता त्या दिवशी”

“ओक्के… बाकी कसं चालू आहे. माझं सुरु झालं आता रुटीन”

“ऐक ना… आई जेवायला बोलावतेय. TTYL.”

सोनीने फोन लॉक करून गादीवर ठेवला. ती बाहेरच्या खोलीत गेली. तिने TV वर Zing चॅनेल लावलं. त्यावर लेटेस्ट गाणी चालू होती. तिने आवाज वाढवला आणि स्क्रीनकडे बघत बसली.

थोड्यावेळाने आई हॉलमध्ये आली, तिने खस्स्कन सोनीच्या हातातून रिमोट घेतला आणि आवाज कमी केला. “अगं… कधीपासून किचनमध्ये बोलावतेय मी तुला? काय हे, कसली गाणी लावून बसलेयस मोठ्या आवाजात?”

सोनीने एकदा आईकडे बघितलं आणि खाली बघितलं. तिने रिमोट घेऊन TV बंद केला. “काय करायचंय किचनमध्ये?”

“जरा हाताखाली देऊ लाग.”

सोनी आईबरोबर किचन मध्ये गेली. ‘जरा मिरच्या बारीक करून दे, दोन लसणाच्या पाकळ्या सोल बरं, वरणाला फोडणी घाल बघू…’ अश्या ऑर्डरी सुटत होत्या. सोनी तोंड बंद करून सांगेल ती सूचना ऐकत होती.

“सोने… काही झालंय का गं?”

“अं… काही नाही…”

“मग अजिबात न कुरकुरता कसं काय काम करतेयस?”

“हम्म…”

“काय झालं?”

“काही नाही आई. मी काम करतेय तरी तुला प्रॉब्लेम आहे. करत नसते तेव्हा पण ओरडत असतेस. काय करू मी नेमकं??”

“अगं अगं… चुकलं बाई… नाही काही बोलत.”

“आई माझ्या पोळ्या करू नकोस. मी जेवणार नाहीए.”

“एवढ्या तेवढ्या गोष्टीवर चिडून अन्न नाकारू नये सोनी…”

“मी चिडलेली नाही आहे. मला भूक नाहीए”

“बरं एकच पोळी खा मग.”

“मला काही नकोय म्हणलं ना??” सोनी तिथून फणकाऱ्यात निघाली आणि आपल्या बेडरूम मध्ये जाऊन ती सरळ गादीवर आडवी झाली.

उशीत डोकं खुपसून ती तशीच पडून राहिली. थोड्या वेळाने तिच्या डोक्यावरून हात फिरतोय अशी तिला जाणीव झाली. तिने उशीतलं डोकं काढलं आणि वर बघितलं.

“कंपनीमध्ये काही झालं का बाळा?” आई डोक्यावरून हात फिरवत होती.

सोनीच्या डोळ्यांतून पाणी गळू लागलं.

“अरे देवा… काय झालं डोळ्यात पाणी यायला?”

काय सांगू आता… मी ज्या दिवशी आवरून-सावरून गेले होते त्या दिवशी मला एका मुलाने रिजेक्ट केलं म्हणून…

“शांत हो बाळा… कोणी काही बोललं का?”

“आई… आज कंपनीत मी एका कामात चुका केल्या म्हणून तो प्रोजेक्ट त्या मिताला दिलाय आता.” सोनीने कंपनीचं कारण सांगितलं.

“हात्तिच्या… एवढंच होय… एवढं मनाला लावून घेतात अश्या छोट्या गोष्टी?”

“हम्म…” तिच्या डोळ्यातून अजूनच पाणी गळू लागलं.

“शांत हो बघू…”

“व्हॉट्स अप गर्ल्स?” श्रेयस आत आला.

“तुझी ताई बघ मुळूमुळू रडतेय.” आईने त्याच्याकडे बघितलं.

“व्हाय ओ व्हाय? क्या हुआ? काय झालं?”

“कंपनीत कसला तरी प्रोजेक्ट दुसऱ्या मुलीला दिला म्हणे!”

“श्या… मग रडायचं काय त्यात? चिल्ल! मी तुला आयडिया देऊ का? तू ना सरळ सुट्टी टाक आणि गोव्याला जा.”

“आं…” आई आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली.

“नाही तर काय… उलट बेस्ट opportunity मिळालीय तुला. नाहीतर मला बघ. अभ्यास करत बसावं लागतंय! मी तुझ्या जागी असतो तर कधीच गेलो असतो.”

“लाडोबा… घ्या पुस्तक. चालले गोव्याला!! सोनू… पण तुझा भाऊ म्हणतोय ते बरोबर आहे. गोवा वगैरे राहू दे, पण २-३ दिवस सुट्टी टाक तू. निवांत घरी राहा. गेले ३-४ दिवस जरा बिथरल्यासारखीच करतेयस. शांत होशील जरा.”

सोनीने डोळे पुसले, “हां… तसंच करते.”

“झालं तर मग… चला आता जेवायला.” आई उठली.

सोनीने एक पोळी कशीबशी पोटात ढकलली आणि विचारांनी जड झालेलं डोकं उशीवर ठेऊन ती झोपून गेली.

उद्यापासून सुट्टी घेणार आहे असं सांगायच्या इराद्यानेच ती आज ऑफिसला गेली.

गाडी पार्क करून लिफ्टमधून ती तिच्या फ्लोअर वर आली. अचानकच तिला लोकं ग्रुप- ग्रुपने काहीतरी करत उभी असलेली दिसत होती. ती डेस्कवर गेली आणि तिचे डोळे फाकले. शीट! आज ‘थँक्यू डे’ होता. तिच्या डेस्कवर ‘थँक्यू कार्ड्स’ येऊन पडले होते. एक पुस्तक होतं, एक wrapped बॉक्स होता.

सोनीने कपाळाला हात लावला. विसरलेच मी हे. पण करावंच लागेल नाहीतर लोक म्हणतील काय घमेंडी मुलगी आहे. तिने आपले कार्ड्स, ते पुस्तक, तो बॉक्स सगळं डेस्क-ड्रॉवर मध्ये आत टाकलं. आणि ती HR कडे गेली. तिकडून जाऊन तिने ७-८ कार्ड्स आणले. अनिमेश, मिता, आकाश, हार्डवेअर टीम मधला जितेंद्र, टीम-लीडर सुनील असं करत एक एक नावं लिहली. “थँक्यू फॉर युअर हेल्प अँड सपोर्ट” असा प्रत्येक कार्डवर मेसेज लिहून एक एक कार्ड ती प्रत्येकाच्या डेस्कवर ठेऊन आली.

आज तिला कुठल्याही अवांतर गोष्टीत इंटरेस्ट नव्हता. तिने लॅपटॉप उचलला आणि सरळ एका मीटिंग रूममध्ये जाऊन बसली. आलेल्या ४-५ मेल्सना तिने रिप्लाय केले. आज नेहमीच्या टीमबरोबर ती जेवायलाहि गेली नाही. आकाशचा skype मेसेज आला, “किधर हो?”

“काम है” असा तुटक रिप्लाय देऊन तिने ‘बिझी’ स्टेटस लावलं.

दिवसभराचं काम तिने ४च तासात संपवलं आणि ५ वाजता ती अनिमेशकडे गेली.

“अनिमेश… आपसे मुझे बात करनी थी” तिचे हार्टबीट्स वाढले होते.

“हां बोलो सुनहरी…”

“मुझे कलसे १० दिन की छुट्टी चाहिये”

“१० दिन? क्यूँ क्या हुआ?” अनिमेशने डोळे फाकवले.

“मेरी नानी बिमार है.” शाळेत देतात ते कारण तिच्या तोंडातून निघालं.

“अच्छा… वर्क फ्रॉम होम करलो फिर…”

“वहां नेटवर्क नही रहेगा.”

“ठीक है ठीक है… वो प्रोजेक्ट भी वैसे ‘लो प्रायॉरीटी’पे चल रहा है. बस एक बार आकाशको अपडेट कर देना अगर कोई अर्जंट काम है तो आपके अबसेन्स मे किसीको पता होना चाहिये.”

“ओके…”

“ओके… चलो, Take care!”

“थँक्यू अनिमेश!” म्हणून ती तिथून निघाली. इतक्या सहजतेनं आपण खोटं बोलून आलो ह्याचं तिला आश्चर्य वाटत होतं.

तिने आपल्या खुर्चीवर बसून निरुला ping केलं. “मी चाललेय सुट्टीवर!”

“व्हॉट!?!”

“हो. १० दिवस.”

“काय झालं गं?”

“काही नाही मला नको झालंय ऑफिसला यायला”

“थांब! आले खाली.”

निरू सोनीच्या फ्लोअरवर आली, दोघीजणी वॉशरूम मध्ये गेल्या.

“का? काय झालं?”

“काही नाही… असंच bore होतंय.”

“अगं… काय करणार मग १० दिवस सुट्टीचं?”

“अजून ठरवलं नाहीए.”

“सोनी… काय झालंय तुला? Are you okay?”

“का? सुट्टी घ्यायला काही व्हायलाच पाहिजे? I can take as many leaves as I have!” सोनी डाफरली.

“बरं बाई… घे घे… निवांत फिरून ये कुठेतरी.”

“हम्म… आणि मी नेट बंद ठेवणार आहे.”

“आता हे काय नवीन?”

सोनी काहीच बोलली नाही. ती स्वतःचा चेहरा आरशात बघत उभी राहिली.

“तू माझ्यापासून काहीतरी लपवतेयस. सांग काय झालंय… कोण काही बोललं का तुला? तो मागच्या वेळचा मुलगा त्रास वगैरे देतोय का?”

“काही नाही… आणि काही असेल तर मी ते माझं डोकं शांत झाल्यावर सांगीन. आता मला काही विचारू नकोस.”

“बरं… ठीक आहे. सांग तुझं काय ठरतंय. आणि फोन बंद नको करू. फोन तरी करता येईल. नेट आणि व्हाट्सऍप राहू देत.” निरू डोकं हलवत म्हणाली.

“हम्म… चल. निघतेय मी २० मिनिटात. एक काम संपवून जाते. Bye!”

“बाय…” निरू तिच्या फ्लोअरला गेली आणि सोनी डेस्कवर आली.

“Hi आकाश” सोनीने skype मेसेज केला.

“Hi… बोलो”

“आय हॅव टू अपडेट यू ऑन वन ऑफ माय प्रोजेक्ट्स”

“ओह… I’ll come to your desk” आकाश ५ मिनीटांनी तिच्या इथे आला. “क्या हुआ?”

“अरे मै छुट्टीपे जा रही हूँ. तो अनिमेश ने बोला के तुम्हे बस बॅकग्राऊंड बता के जाओ.”

“High priority है क्या?”

“नो!”

“तो क्यूँ?”

“मै १० दिन जा रही हूँ”

आकाशचेही डोळे फाकले, “क्यूँ क्या हुआ? घुमने जा रही हो क्या?”

“नही.”

“ओह… ओके.” सोनीचं एका शब्दातलं उत्तर ऐकून आकाश वरमला.

“तो इसका सब डेटा इस फोल्डर मे रखा है” सोनीने डायरेक्ट विषयाला हात घातला. आकाशला प्रोजेक्टवर ब्रीफ करून सोनीने बॅग पॅक केली आणि ती घरी निघाली.

घरात शिरून तिने आईला हाका मारल्या. आई घाईघाईत हॉलमध्ये आली.

“काय गं… काय झालं?”

“मी उद्या माईआज्जीकडे चाललीय” सोनीने announcement केली.

भाग २०-२

“तुला एक विचारू?” निखिलने सोनीचा हात हातात घेतला.

“हं?”

“May I kiss you?”

सोनी लाजली. निखिलने तिच्या केसांत हात घातला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. खालच्या लाल मातीत सोनीचा अंगठा रुतला. मावळत्या सूर्याची लाली सोनीच्या चेहऱ्यावरही चढली होती. नारळाच्या फडफडत्या झावळ्या श्वासांचे आवाज मिटवत होत्या. निखिल बाजूला झाला पण सोनी अजून डोळे मिटूनच बसली होती. गार वारा सोनीच्या खुश गालांना कुरवाळून जात होता. सोनीने एकदम डोळे उघडले.

“निखिल, आई-बाबांना सांगायला हवं”

“काय?”

“हेच. आपलं.”

“काय आपलं?” तो जागेवरून उठला.

“आपलं रिलेशन…”

“सुनहरी… we are not in a relationship!”

“पण… पण… You just kissed me!” सोनी पण उठून त्याच्याजवळ गेली.

“Yeah. So what? It was just a kiss!”

“ठीक आहे. तुला नाहीए करायचं ना… मीच संपवते” सोनी कड्याच्या टोकावर गेली.

“स्टॉप इट.”

“That’s what I am going to do!” असं म्हणून तिने त्याच्याकडे वळून बघितलं. अचानक त्याचा चेहरा बदलल्या सारखा वाटला.

तो तिच्या जवळ येऊ लागला तशी सोनी मागे सरकू लागली. तिचा पाय निसटला. “आई!!”

ती दचकून उठून बसली. तिने आजूबाजूला पाहिलं. ती कुठे आहे ते तिला कळत नव्हतं. हा बेड पण तिचा नाहीए. हे घर पण तिचं नाहीए.

“राणू… उठलीस का गं?” स्वैपाकघरातून आवाज आला.

“माईआज्जी??” सोनीने confused आवाजात विचारलं.

“काय गं?” आज्जीचा रिप्लाय आला. सोनीने पुन्हा इकडं तिकडं बघितलं, तिला कन्फर्म झालं की ती आजोळच्या घरी आलीय. ती उठून स्वैपाकघरात गेली.

“आवरून घे बघू… आणि बागेतून आजोबांकडून कच्चा फणस आण शोधून, त्या मागच्या बाजूच्या २-३ झाडांना परवा-परवा लागायला सुरु झाल्येत.”

आज्जीचं परवा म्हणजे १० दिवस ते २ महिने ह्यातलं काहीही असू शकतं.

“हां…”

“बरं… तुझी कॉफी आणली बघ काल मी अनाजेच्या दुकानातून.”

“Yayy… थँक्यू आज्जी!”

सोनी परसदारच्या बाथरूम मध्ये गेली. आजोबांनी बाथरूम नवीन बनवून घेतलं होतं, त्यामुळे आता सोनीला एकटीने जायला भीती वाटत नव्हती. आधी-आधी तिला शू-शी/अंघोळ करायची असेल तर आईने तिला तिथपर्यंत सोडायला यावं लागायचं. मग सगळं चेक करून झालं तरच सोनी आतमध्ये जायची. आता तर सोनी एकटीच आली होती. त्यामुळे एकदा आत ‘पाली/झुरळं’ आहेत का चेक करावं ह्या इराद्याने ती वाकून इकडे-तिकडे बघू लागली.

“जा… जा… पॅकबंद केलंय मी सगळं. मुंगीसुद्धा जायला जागा नाही आत.” आजोबा कुठूनतरी ओरडले.

सोनीने आवरून छान कुर्ता घातला, मोकळी-ढाकळी पॅन्ट घातली आणि अंगणात अडकवलेल्या झुल्यावर आपला कॉफीचा कप घेऊन बसली. माईआज्जीचं अंगण फुलझाडांनी भरलं होतं. तिच्या हातात जादू असावी, तिने लावलेलं एकही झाड जगलं नाही अस होत नाही. नारिंगी गुलाब सूर्यकिरणांसोबत छान चमकत होता. पांढरी आणि लाल-जर्द जास्वंद वाऱ्याच्या झुळकेसोबत डोलत होती. सोनचाफ्याचा मंद सुवास सुटला होता. चिऱ्याच्या कुंपणातला तो टुमदार वाडा बघून सोनीला खूपच फ्रेश वाटलं.

सोनीने कॉफी संपवून कप विसळून ठेवला आणि आजोबांना शोधत मागच्या बागेत गेली. आजोबा खराट्याने पाचोळा एका ठिकाणी गोळा करत होते. सोनीला बघून बंड्या शेपूट हलवत जवळ येऊ लागला.

“शू शू बंड्या… शू…” सोनी तिरकी तिरकी चालू लागली

“काही नाही करत तो… तुझ्याशी मैत्री करायचीय त्याला” आजोबा पाचोळ्याच्या मोठ्या ढिगावर अजून एक ढीग टाकत म्हणाले.

“मला भीती वाटते कुत्र्यांची…”

“हाहा बरं बरं… “आजोबा खर्जात हसले, “बंड्या… ये बाबा… तुझी गादी झाली बघ तयार”

आज्ञाधारक बंडया ढिगावर जाऊन मुरकटुन बसला.

“माईआज्जीने फणस आणायला सांगितलाय.”

“हो… सकाळीच सांगितलंय मला… घे ती काठी…”

“कुठली?”

“ते बघ… कोयता लावलाय त्याला”

सोनीने ती काठी प्रयत्न करून उचलली.

“सरळ रेषेत दिसतंय बघ झाड तिसऱ्या नंबरचं, त्यातला खालून दुसरा फणस आहे बघ. तो काढ.”

“मी?”

“हो… तुला आणायला सांगितलंय ना?”

“हां…” सोनी डोकं हलवत म्हणाली. कोयता लावलेली काठी घेऊन ती तिसऱ्या झाडापाशी गेली. दोन्ही हातांनी काठी उचलली, खालून दुसऱ्या फणसाच्या देठावर पिचके वार करू लागली. तिचे प्रयत्न पाच मिनिट बघून झाल्यावर आजोबा तिथे आले, त्यांनी तिच्या हातातून काठी घेतली आणि एक मोठं फडकं तिच्या हातात दिलं. “हे धर खाली… catch तरी करता येईल ना?”

“हां…” सोनी मान चोळत म्हणाली.

आजोबांनी एका वारात फणस खाली पाडला, सोनीने कापडात catch केला.

“असाच कापडातून घेऊन जा ‘हिच्याकडे’. चिक लागेल हाताला नाहीतर” आजोबा आज्जीला ‘ही’ म्हणतात त्याची सोनीला अजूनही गंमत वाटते.

“किती क्युट!” सोनी स्वैपाकघरात शिरून म्हणाली, “तुला आजोबा कसं ‘ही’ म्हणतात… हाहा!”

“त्यात कसलं मेलं क्युट? बायकोचं नाव घ्यायला लाजायचं सगळ्यांसमोर” आज्जी सुरीला तेल लावत म्हणाली.

“हाहा… मग प्रायव्हेट मध्ये काय म्हणतात तुला आजोबा?”

“सांगू नकोस हं कुणाला…” आज्जी सोनीकडे वळून म्हणाली.

“प्रॉमिस!” सोनीने गळ्याला चिमटी काढली.

“मधुबाला!” असं म्हणून आज्जीने तोंडाला हात लावला आणि खुद्कन हसली.

सोनीला आज्जीकडे बघून खूपच कौतुक वाटलं.

“माईआज्जी… तुला कसं विचारलं होतं आजोबांनी?”

“म्हणजे?” आज्जीने फणस टाकून कुकर चढवला.

“म्हणजे त्यांनी कसं प्रपोज केलं तुला? लग्न करायला कशी मागणी घातली?”

“असं होय…! छे. ते कसले प्रपोज करतायत… मीच विचारलं होतं त्यांना.”

“बापरे… खरंच??” सोनीचे डोळे फाकले.

“नाहीतर काय… तुझे आजोबा म्हणजे ‘पुस्तकी-किडा’ होते नुसते. एवढी भाषणं वगैरे द्यायचे, पण कोणी मुली अभिनंदन करायला गेल्या की हे तिथून पसार.”

“हाहाहा… Wow! मग?”

“मग काय… मी देखील एकदा ह्यांच्या विरुद्ध भाग घेतला होता स्पर्धेत. नेहमीप्रमाणे हेच जिंकले. मग मी अभिनंदन करायला गेले तर मला म्हणे, “खरं तर तुमचा विषय जास्त चांगला होता. फक्त जरा प्रेझेंटेशन कमी पडलं.”

“मग?”

“मग मी आगाऊपणे म्हणलं, ‘तुम्ही शिकवा ना?’…”

“हाहाहा… आज्जी!”

“हो… आणि मग ते लाजले आणि म्हणाले, सोमवारी लायब्ररीत जातो मी २ ते ३ मध्ये.”

“Aww…”

“अशी झाली आमची पहिली भेट.”

“मग? घरी वगैरे कसं सांगितलं?”

“काही नाही… मी आपलं माझ्या माहेरी सरळ सांगून टाकलं, असे असे माझे सिनियर आहेत, आणि मला ते आवडले आहेत. आपण रीतसर स्थळ घेऊन जाऊ शकतो.”

“Wow आज्जी… डेअरिंगबाझ होतीस की तू”

“तशी मी लहानपणीपासून आगाऊ होते. तुझी आई मात्र बाबांच्या वळणावर गेलीय बघ.”

“हेहे… हो!”

“आणि तुला तर अजूनच जपून ठेवलंय त्या दोघांनी.”

“हो ना… मी काहीच आगाऊपणा नाही केला कधी”

“चल… गप्पा ग्वाड काम द्वाड! फणस सोलायला घेऊ चल.” आज्जीने कुकर उतरवला.

“हाहा… ही कसली म्हण?”

“ही आपल्या सरू कडून शिकलेय मी. बागेत काम करता करता, कधीतरी कमरेवर हात ठेऊन गप्पा मारत बसते आणि मग थोड्यावेळाने कपाळावर हात मारून म्हणते, ‘गप्पा ग्वाड काम द्वाड’.”

“हेहे…”

दोघींनी फणस सोलायला घेतला आणि त्यांच्या गप्पा कंटिन्यू झाल्या. आज्जीने सोनीला फणसाची भाजी करायला शिकवलं.

तांदळाची भाकरी, फणसाची भाजी, गुरगुट्टया भात आणि वरण खाऊन सोनीने दुपारी मस्त ताणून दिली. संध्याकाळी ‘जरा फेरफटका मारून येते’ म्हणून ती घराबाहेर पडली. सूर्य नारिंगी झाला होता. गवतांवर, शेतांमध्ये तांबूस उन्हं पसरलं होतं. सोनीला उगाच उदास वाटू लागलं. तिने हातातला फोन बघितला, फोनला रेंजच नव्हती. ती पुढे चालू लागली.

“I am going to my grandma’s. My phone will not catch range there.”

निखिलला असा मेसेज करून तिने मोबाईल डेटा ऑफ केला होता. श्रेयसने चिपळूणच्या गाडीत बसवून दिलं होतं तेव्हा खिडकीशेजारी बसून तिने निर्धार केला होता, आता काही केल्या परत निखिलला कॉन्टॅक्ट करायचा नाही. पण आता उगाच तिला त्याच्याशी बोलावं वाटत होतं. त्याला विचारावं वाटत होतं, ‘माझ्यात काय कमी आहे?’

आल्यापासून ३-४ दिवस स्वप्नंच पडतायत. विचित्र. कधी निखिल दिसतो, कधी तो घाणेरडा अधिराज दिसतो. कधी तो राजेंद्र तिच्यावर हसतोय, कधी गणेश तिच्या मागे लागलाय. कधी आईच बोलायचं बंद करतेय, कधी बाबा ओरडतायत, कधी श्रेयस तिला ignore करतोय. काय होतंय आपल्या मेंदूला? काय असतात ह्या स्वप्नांचे अर्थ. एकतर अर्थ नक्की आहे, आपल्या डोक्यातून हा निखिल जात नाहीए. का? का पण? तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं.

टुणून! टुणून! टुणून!

फोन वाजला. “आँ!” सोनीने फोन बघितला. रेंज आली होती. अच्छा, एवढ्या लांब येऊन रेंज येते.

२-३ SMS आले होते. एक वोडाफोनचा, एक डॉमिनोजचा आणि एक आकाशचा.

“Hi, let me know when can I call you”

ह्याला काय झालं आता? प्रोजेक्टचं काम आलं की काय? मरायला तिथे असताना कधी मेलला पण रिप्लाय करायचा नाही तो ‘स्टिव्हन’. आता लगेच कामाचं सुचलं ह्याला.

सोनीने आकाशला कॉल लावला. तिसऱ्या रिंगला त्याने उचलला.

“Hi आकाश, बोलो”

“Hey hi… कैसी हो?”

“आय एम फाईन. कुछ प्रोजेक्टका काम आया है क्या?”

“नही…”

“तुम्हारा SMS आया था.”

“हां… जस्ट पूछने के लिये किया था if everything’s alright. मुझे अनिमेशने बताया तुम्हारी नानी बिमार है इसलिये तुम गये हो.”

“ओह… अरे वो तो मैने ऐसेही टाईमपास reason दिया था.”

“ओह… ओके ओके… चलो फिर, एन्जॉय युअर व्हेकेशन!”

“हां… थँक्स!” म्हणून तिने फोन ठेवला. तिने आईला फोन लावला. आईने उचलला नाही. आई नेहमी असं करते, जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटत असतं तेव्हा नसते. इतरवेळेस डोकं खात असते.

सूर्य डोंगराआड गेला. सोनी परत फिरली. आज्जीने अंगणात चक्का घोटायला घेतला होता. “आज सुधीरला बोलावलंय फॅमिली सोबत!”

“ओह… मामा-मामी येणारेत?”

“हो…”

“म्हणून विशेष पदार्थ चाल्लेयत होय.”

“चिनूला आवडतो फार…”

“अच्छा… हे कसं बनवायचं?” एवढं म्हणल्यावर आज्जीने पानभर कृती लिहून घ्यायला सांगितली.

थोड्या वेळातच मामा-मामी, चिनू आणि ऋषी आले. सगळ्यांना खूप दिवसांनी बघून सोनीला छान वाटलं. चिनू तर येऊन तिला बिलगलीच. ऋषी उगाचच ऑकवर्ड वागत होता. ‘कशी आहेस?’ वगैरे जनरल चौकशी करून मामी आज्जीला स्वैपाकात मदत करायला गेली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सगळे जेवायला बसले.

“मग…? सोनी… लाडू कधी?” चक्क्याचं बोट चाटत मामीने प्रश्न केला. “आम्ही तर नवीन कपडे घेऊन बसलोय बाई… कधीही निमंत्रण येईल म्हणून.”

इतका वेळ सोनी प्रार्थना करत होती की हा विषय निघू नये. पण निघालाच.

“लाडू खायला लग्न कशाला करायला हवं?” आज्जीने सावरलं, “अजून आहे वेळ तिच्याकडे. तुम्ही एवढ्या लवकर तयारी करून बसू नका… हो ना गं राणू?”

“हेहे” नर्व्हस लाफ, “बघायला सुरु आहे तसं… बघू आता.”

“त्यापेक्षा मी म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास सुरु करा. सुधीरला मी सांगून दमलो. आता तुमच्या पिढीमध्ये कोणीतरी घ्या मनावर. आमचे ऋषिराज तरी चित्रं काढत बसतात नुसते”

“आजोबा… आजकाल सगळीकडे इतकी गर्दी झालीय ना, हे असे चित्रकारच असतील जे जास्त फेमस असतील.” सोनी म्हणाली. ऋषी तिच्याकडे बघून हसला.

“ज्याला जे करायचं ते करू द्या हो…” आज्जी मसालेभात आजोबांना वाढत म्हणाली, “सारखं मेलं हे करा, ते करा…”

सोनीला आज्जीचा अविर्भाव बघून हसू फुटलं. मग तिच्या बरोबर सगळेच हसू लागले. जाताना चिनूला दहावीच्या परीक्षेच्या थोड्या टिप्स तिने दिल्या. ऋषीला त्याची चित्रं ई-मेल करायला सांगितली. मामा-मामींच्या पाया पडली, मामीने त्यातनंसुद्धा ‘लवकर हात पिवळे होऊ देत बाई’ असा आशीर्वाद दिला.

आज रात्री झोपताना सोनीने प्रार्थना केली की कसलंही वाईट स्वप्न पडू नये.

दुसऱ्या दिवशी देखील सोनी डोकं धरूनच उठली. ती रात्रभर तळमळत होती. डोळ्यात झोप होती पण डोक्यात विचार. तिला अधेमधेच जाग येत होती.

“माईआज्जी… डोकं दुखतंय गं”

“इकडे ये जरा घासून देते.”

आज्जीने एका वाटीत घाण वासाचं म्हाक्याचं तेल ओतलं आणि सोनीला अंगणातल्या पायरीवर घेऊन बसली. थोडंसं तेल तिने माथ्यावर सोडलं, सोनीला थंड वाटलं. घसा-घसा मालिश केल्यावर सोनीला बरं वाटलं पण तिला वाटलं, निम्मे तरी केस जाऊन आपलं टक्कल दिसू लागलं असेल.

“राणू… कसला विचार करतेयस एवढा?”

“मी? नाही…”

“अगं, आम्हाला म्हाताऱ्यांना एका नजरेत कळतं. तेवढे पावसाळे बघितलेयत आम्ही!” आज्जी हसत म्हणाली.

“माईआज्जी, तू खूप लकी आहेस माहितीय?”

“का बरं?”

“तुझं लाईफ सेट आहे. तुझं मनासारखं लग्न झालंय. आजोबा तुझ्यावर किती प्रेम करतात. आणि किती छान वेगळे राहताय तुम्ही दोघेच. कसलीच चिंता नाही.”

“आता म्हातारपणात चिंता फक्त कधी मरण येतंय ह्याची असते राणू… आणि प्रेमाचं म्हणशील तर हो, आहे मी नशीबवान. सगळ्यांचं अमाप प्रेम आहे बघ. वेगळं राहिलेय म्हणूनच जास्त टिकलंय.”

“हे सगळं नशिबातच असतं का आज्जी?”

“काय?”

“प्रेम, चांगला पार्टनर…”

“सोनी… खरं सांगू तुला? प्रेम ही अशी गोष्ट आहे ना… आपण देऊ तितकी आपल्याला परत मिळते.”

“आणि कधी कधी नाहीच मिळाली तर?”

“मग काय? नाही मिळालं तर नाही. आयुष्य संपलंय थोडीच. तुझ्या आजोबांच्या घरी काही कमी विरोध झाला नव्हता… समज, त्यांनी किंवा मी, घरातल्या दबावाला घाबरून प्रयत्न सोडले असते तर? मग काय एकदम आत्महत्या वगैरे करायला जाणार होते मी? नाही. कधीच नाही. उलट मला PhD करायची होती, ती केली असती. बघ… उलट ह्या फंदात पडले आणि माझं शिक्षण राहिलं. असं काही नुकसान नाही झालं त्याने, पण अधे मध्ये वाटतं, आपण तेव्हाच जरा हातपाय मारायला हवे होते. त्यामुळं, एक लक्षात ठेव नेहमी. हे प्रेम, लग्न वगैरे गोष्टी होत राहतात. आपल्याला इतर देखील आयुष्य आहे. आणि आपल्या आवडी-निवडी जपणं, शिक्षण घेणं, हे सगळं तितकंच महत्वाचं आहे.”

“पण बऱ्याचदा कळत नाही मला काय हवंय…”

“मग… डोळ्यांवरचा चष्मा काढायचा, तो पुसायचा, आणि मग बघायचं… सगळं स्पष्ट दिसतं.”

“हाहा… ओक्के आज्जीसाहेब!”

“चल. आज तुला कैरीचं पन्हं शिकवते.” असं म्हणून आज्जी उठली.

“माईआजी… तू ना आंब्यावर PhD कर.” दोघीही हसत आत गेल्या.

दुपारी तुडुंब जेवणानंतर सोनीने वामकुक्षी घेतली. ४ वाजता आज्जीने ३-४ कैऱ्या आणल्या. त्या उकडायला घातल्या. मग ‘साल काढून गर काढ तपेलीत, गूळ घाल, सुंठ दोन-तीन चिमट, जायफळाची पूड चिमूटभर, घुसळ अजून, अगदी जरा मीठ’ अश्या सूचना देत तपेलीभर पन्हं बनवून झालं. आज्जीने चाखून बघितलं, “छानच झालंय” म्हणून तिने तपेली उचलली. ओट्यावर ठेऊन तिने २ चमचे पिठीसाखर घातलेली सोनीच्या नजरेतून सुटलं नाही. मग थंडगार पन्हं आजीने आजोबा, सरू, धोंडिबा, त्यांची मुलगी शिमा… ह्यांना बोलवून बोलवून, “सोनीनं केलंय बघा…” म्हणून ग्लास-ग्लास भर दिलं.

सगळ्यांकडून आपलं कौतुक ऐकून सोनी खुश झाली.

रात्री झोपताना ती आज्जीला म्हणाली, “माईआजी, निघते मी उद्या…”

“का गं?”

“काही नाही… आज मी पण चष्मा पुसला. तू म्हणालीस ते बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. करिअर आणि hobbies ना पण तितकंच महत्व दिलं पाहिजे. आयती सुट्टी घेतली आहे, तर दोन-तीन classes ची चौकशी करते जाऊन.”

“हां… कर कर…”

सोनीने मनात कसलासा निर्धार केला आणि शांतपणे झोपून गेली.

भाग २१

आजोळच्या घरून सोनी निघाली तेव्हा माईआजीचे डोळे पाणावले होते. सोनीच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. ती दोघांच्या पाया पडली तेव्हा दोघांनीही ‘सुखी राहा’ असा आशीर्वाद दिला होता. बंड्या देखील बस-स्टॅण्डवर पोचवायला आला होता. बसमध्ये चढायच्या आधी, घाबरत घाबरत तिने बंड्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बंड्या खुश होऊन जोरजोरात शेपूट हलवत होता.

आज्जीकडून आल्यापासून सोनी ‘कानात वारं शिरल्यासारखं’ वागत होती. आईला माहित असूनसुद्धा फणसाची भाजी कशी करायची, चक्का कसा बांधायचा अशा गोष्टींवर तिने lectures दिले. श्रेयसच्या गेममधे इंटरेस्ट घेऊन तीदेखील दरवेळेस हरत खेळू लागली. श्रेयसच्या कानी-कपाळी ओरडून आईला नाकीनऊ येत होतं, त्यात हिची भर झाली होती. सोनी आता सकाळी ६लाच उठत होती. सूर्यनमस्कार घालत होती. बाबांच्या आधी ती पेपर घेऊन बसत होती. आई-बाबा confuse झाले होते. आईने आज्जीला फोन करून विचारलं देखील, “काय खायला घालून पाठवलंयस गं हिला?”

२-३ दिवस एकूण अवतार बघून आईने जेवणाच्या टेबलावर हळूच लग्नाचा विषय काढायचा प्रयत्न केला.

“आई चिल्ल!”

“काय?”

“लग्न, प्रेम ये सब तो होता ही रहता है. मी MS करायला जाणार आहे.”

“काय??” उरलेल्या तिघांचेही डोळे फाकले.

“येस्स… अँड डोन्ट वरी… We will manage for Money. मी आता चांगला स्कोर काढण्यावर फोकस करणार आहे.”

“हे काय नवीन?” आई अजूनही पापणी मिटत नव्हती.

“त्याचं काय आहे आई, सध्या आपली मार्केट value डाउन आहे. मी तिकडे गेले की बघ काय भाव वधारतात. मग असल्या फालतू लोकांसाठी रडत बसायची जरापण गरज नाही!” सोनी टिचकी वाजवत म्हणाली.

“कशाचे भाव? अहो काय बोलतेय ही?”

“सोनी… तुला खरंच पुढचं शिक्षण घ्यायचंय का?” बाबांनी नेहमीच्या सिरीयस सुरात विचारलं.

“हो बाबा…” सोनीने कॉन्फिडन्टली उत्तर दिलं.

“ठीक आहे, कर अभ्यास!”

“अहो पण लग्नाचं काय?”

“सुलू!” बाबा म्हणले, “ती आहे मोठी, तिला घेऊ देत तिचे decisions.”

“बघा बाई करा तुम्ही बाप-लेक काय ते…”

“अगं… अजून अभ्यास तरी करू देत. बाकी प्रोसेसला अजून वेळ आहे. तोपर्यंत बघू काय काय होतंय.” बाबा आईला समजावत म्हणाले.

बाबांची परमिशन मिळाल्यामुळे सोनी खुश झाली. तिने आपल्या खोलीत जाऊन सगळी पुस्तकं गोळा केली. वेगवेगळ्या परीक्षांचे टाइमिंग्स नेटवर सर्च करत बसली.

दुसऱ्या दिवशी ती जरा निवांतच ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये तिला वेगळंच वाटत होतं. आपण नवीनच जॉईन झालोय अशी फीलिंग तिला येत होती. तिने जाऊन लॅपटॉप उघडला आणि outlook ओपन केलं. धडाधड 40 भर ई-मेल्स आले होते. स्टिव्हन च्या नावाने काही ‘Urgent’ आणि ‘High importance’ वाले मेल्स होते. ते बघून तिला एकदम टेन्शन आलं. पण दुसऱ्याच मिनिटाला तिने मोठा श्वास घेतला आणि मनातल्या मनात ‘फ* इट!’ म्हणाली. तिने डेस्क ड्रॉवर उघडला. सुट्टीवर जायच्या आधी आलेले ‘थँक्यू कार्ड्स’ बाहेर काढले. पहिल्या पानावर ‘ऑल द बेस्ट’ आणि खाली अनिमेशची सही असलेलं पुस्तक तिने चाळून बघितलं. फूटभर उंचीच्या बॉक्सचं wrapper तिने फाडलं आणि बॉक्स उघडला. त्यात stuffed पेंग्विन होता.

Aww… किती क्युट आहे हे! कुणी दिलंय? श्या… त्या दिवशी नीट काही बघितलंच नाही. सगळं तसंच कोंबलं ड्रॉवरमध्ये.

टुणून!टुणून!टुणून!टुणून!टुणून! मोबाईल ठणाणा करू लागला. सोनीने घाई-घाईत सायलेंट केला. मोबाईल Wi-fi ला कनेक्ट झाल्यामुळे इंटरनेट आणि पर्यायाने सगळे ऍप्स सुरु झाले होते. तिने व्हाट्सऍप उघडलं. कसल्याशा ग्रुपवर २१७ मेसेजेस. पर्सनल चॅट वर १०-१२ लोकांचे मेसेजेस. पण त्यात निखिलच्या नावावरच तिचं लक्ष गेलं. उघडू की नको, उघडू की नको म्हणत शेवटी तिने त्याच्या नावावर क्लिक केलं. त्याचे १४ मेसेजेस आले होते. तिने स्क्रोल अप केलं.

“का? काय झालं?” हा निखिलचा सोनीच्या लास्ट मेसेजला रिप्लाय.

“Hey… You there?”

“Hey… आज एक मज्जा झाली माझ्या मॅनेजरची.”

“Where are you? असल्या कुठल्या ओसाड ठिकाणी गेलीयस?”

“आय मिस टॉकिंग टू यू…”

“सुनहरी… I tried calling you. तुझा फोन लागत नाहीए.”

“Hey… मला वाटतंय लेट्स गिव्ह इट अ शॉट. Let’s behave like we are boyfriend and girlfriend, let’s see if we start loving each other or annoying each other. What say?”

त्याचा हा लास्ट मेसेज वाचून सोनीच्या पोटात खड्डा पडला. बापरे… हा असा काय मेसेज केलाय ह्याने? तिने मेसेज पुन्हा एकदा वाचला. तिचे हार्टबीट्स वाढले.
आता अचानक काय झालं? मी लांब गेल्यावर माझी किंमत कळली का? का माझ्यावर दया म्हणून? लेट’स गिव्ह इट अ शॉट म्हणायला. का? मी annoying आहे काय? पण खरंच त्याला आठवण येत असेल तर. त्याला पण वाटत असेल तर… पण मग तसा मेसेज नाहीए त्याचा. की मला पण तुझ्याबद्दल सेम वाटतंय. त्याला अजून पण हे टेस्ट करायचंय की मी loving आहे की annoying! किंवा मीच जास्त विचार करतेय. तसं नसेल म्हणायचं त्याला. त्याला सिम्पली हेच म्हणायचं असेल की मी पण त्याला आवडते. पण मग तसं का नाही म्हणलंय त्याने? आणि आता अचानक कसं realize झालं ह्याला. आणि गिव्ह इट अ शॉट म्हणजे काय? अजून २ महिन्यांनी नाही चांगलं वाटलं तर सोडून द्यायचं?

तिचा हात आपोआप डोक्याकडे गेला. ती लॅपटॉपवर इमेल्स बघत स्क्रीनवर स्क्रोल करत राहिली. Skype वर मेसेज आला.

“फायनली….” आकाश.

“क्या हुआ?”

“कुछ नही… चलो खाना खाने चलते हैं”

बास! जेवून येऊन कामाला लागायला हवं. सोनी डबा आणि फोन घेऊन उठली. ती नेहमीच्या लंच टेबलवर गेली. सगळ्यांनी तिला, “कैसी हो?”, “नानी कैसी है?” वगैरे प्रश्न विचारले. “ठीक हूँ, ठीक है” अशी उत्तरं तिने दिली.

जेवताना देखील त्या व्हाट्सऍप मेसेजचाच ती विचार करत होती. तिने फोन उघडला आणि टाईप केलं, ‘आता का आठवण झाली तुला? आणि कसली टेस्ट घ्यायचीय तुला? मी आवडते किंवा नाही आवडत, एक काहीतरी उत्तर असेल ना? ह्यात try काय करायचं आहे? इतर वेळेस तर इतकं सरळ-मार्गी असतं ना तुझं सगळं काही…’ पण तिने सगळा मेसेज पुन्हा इरेझ केला.

“अगं… इतके दिवसांनी आलीयस. आमच्याशी बोल ना… सारखं फोन मधेच काय?” निरूने दटावलं.

“हम्म…” सोनीने फोन पालथा ठेवला.

“कहाँ पे गयी थी वैसे तुम?” आकाशने विचारलं.

“चिपळूण.”

“ओह… कोकन साईड!”

“हां… तुम्हे पता है?”

“मतलब कभी गया तो नही… लेकिन Google मॅपपे देखा था.”

“अच्छा… बहोत सही जागा है वो…”

“कोकण तो बेस्ट ही होता है…” निरू म्हणाली.

“इज इट निअर गोआ?” मिताने उगाच ज्ञान पाजळायचा प्रयत्न केला.

“नो… नो… निअर रत्नागिरी.”

“सो डिफिकल्ट नेम्स!” मिताने नाक मुरडलं

मग महाराष्ट्रातल्या कोकणावर थोडावेळ गप्पा चालल्या. जेवण संपवून सगळे आपपल्या फ्लोअरवर गेले. सोनीने पुन्हा फोन बघितला. तिने टाईप करायला सुरुवात केली, ‘I have decided to take my education seriously. So even I don’t think I have time for any trial and error method. Let’s just leave it to the destiny.’ नको… फारच हार्श झालं. पण मग काय करू आता? This is not fair. मी जेव्हा तुझ्याकडे आले होते तेव्हा तू का नाकारलंस मला निखिल. आणि आता सुद्धा हे रिलेशन तुला ट्रायल बेसिस वर हवंय… काय करू मी?

सोनी… जाऊ देत. ह्याचा नंतर विचार कर. एवढे ई-मेल्स येऊन पडलेयत. काम करायचं आहे, जर्मन क्लासेसची चौकशी करायची आहे. आता त्या सगळ्यावर फोकस करूया.

तिने इनबॉक्स मधला स्टिव्हनचा Urgent वाला मेल उघडला. त्याच्या दोन मेल्स वर आकाशचा रिप्लाय देखील होता. ह्या बिचाऱ्याला काम करावं लागलंय माझं.

बास! ड्रामा नको. काम करूया. तिने आकाशला ping केलं.

“Hi Aakash, shall we discuss project updates, when you are free?”

“Yes… मैं दस मिनिट मे आता हूँ!”

“ओके…” सोनीने रिप्लाय केला, पाण्याची बॉटल उघडली, पाणी पिता-पिता तिने बॉक्समधला पेंग्विन बाहेर काढला. आणि डेस्कवर वॉलला टेकवून ठेवला. ‘थँक्यू कार्ड्स ‘देखील आपल्या वॉलला पिन केले. बाकी कचरा साफ केला. बॅग ड्रॉवर मध्ये टाकली. आणि त्या पेंग्विन कडे कौतुकाने बघत बसली. तेवढ्यात आकाश तिथे आला.

“हां… बोलो…”

“मै क्या बोलूं? तुम बोलो.”

“हां… तो वो क्या हुआ था… उसको ये फाईल अपडेट करके चाहिये था. तो डेटा तुम्हारे वो ‘टेस्टिंग’ फोल्डरमे था ना? तो स्टिव्हनसे मैने कन्फर्म किया था… वही लेटेस्ट है…”

सोनी इतका वेळ त्याच्याकडे निरखून बघत होती.

“क्या हुआ? कुछ लगा है क्या?” आकाशने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.

“तुम्हारा चष्मा किधर गया?”

“अरे… वो मैने लेन्सेस लगाये है.”

सोनीला अचानक तिचंच वाक्य आठवलं, “… वैसे तुम लेन्सेस क्यूँ नही पेहनते?”

ती त्याला अजूनच निरखून पाहू लागली, अचानक तिला काहीतरी आठवलं आणि तिने डेस्कवरच्या छोट्या पेंग्विनकडे बघितलं.

“मेरा ना… कुछ नही हुआ तो मै सीधे अंटार्क्टिका जाऊंगी… और पेंग्विन्स पालूंगी” तिचे डोळे मोठे झाले. तिने परत आकाशकडे बघितलं,

“when I will crack a stupid joke, she should laugh, because my sense of humor sucks. And when I see her laughing I should feel like, if this is not life, then what is?” तिच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. तिने डोळ्यांवर हात ठेवला.

“आय एम सॉरी… क्यूँकी लडके ऐसे behave करते हैं” त्यांच्या गप्पा तिला आठवू लागल्या.

“सुनहरी… आय थिंक अभी you need some time to settle down. मैं थोडी देर बाद आ जाता हूँ. या फिर कल भी कर सकते हैं.”

ती त्याच्याकडे नुसतीच बघत होती. आकाशने तिच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवला, “बाय!!” म्हणून तो खुर्चीवरून उठला आणि खुर्ची त्याने बाजूच्या रिकाम्या डेस्कजवळ लावली. तो त्याच्या डेस्ककडे जाऊ लागला, पण फोन वाजला म्हणून घाईघाईत त्याने फोन काढला आणि सायलेंट वर केला. पण फोनवरचं नोटिफिकेशन बघून तो थबकला आणि मागे वळला.

तो सोनीच्या डेस्कजवळ गेला. सोनी हातात फोन घेऊन त्याच्याचकडे बघत होती.

त्याने सोनीला आपला फोन दाखवला, “ये शायद गलतीसे आया है”

सोनीने नकारार्थी मान हलवली.

आकाशचे डोळे मोठे झाले. त्याने बाजूच्या डेस्कजवळची खुर्ची पट्कन ओढली आणि त्यावर मटकन बसला. त्याने सोनीच्या डोळ्यांत बघितलं आणि लगेच खाली बघितलं. तो स्वतःशीच हसू लागला. डोळे मिटून तो अजूनच स्माईल करू लागला. त्याने पुन्हा सोनीकडे बघितलं.

सोनी गालात हसत होती. तिने आपला फोन त्याच्यासमोर धरला आणि म्हणाली, “काय?”

आकाशने व्हिझिबली मोठा श्वास घेतला. आपल्या फोनवर जीवनसाथीचं app उघडलं. आणि “सुनहरी सेंट यू रिक्वेस्ट” च्या खाली असलेल्या ‘Accept’ वर क्लिक केलं.

वर्षभरानंतर…

“देखो… मैने बोला था ना आपको आकाश भी मुंडावळ्यामे अच्छा लगेगा” सोनीची आई, आकाशच्या आईला सांगत होती.

“हां… और सोनीके हात में भी लाल चुडा जच रहा है.” श्रीमती निगम पण आपलं मत मांडत होत्या.

बुफे जवळ गोलात थांबून अनिमेश जोरजोरात हार्डवेअरवाल्या जितेंद्रला सांगत होता, “अरे मुझे तो पहले से ही पता था… कॅन्टीनमे देखता था ना इन दोनोंको”

निरू श्वेताला म्हणत होती, “अगं असली छुपी रुस्तम निघाली ही… मला कसलाच सुगावा लागू दिला नाही. हो-की-नाही रे महेश?” महेश कुल्फी खात फक्त हो ला हो देत होता.

माईआज्जी ‘केटरर’ला आमरसात सुधारणा सुचवत होती आणि आजोबा ऑकवर्डली पलीकडे उभे होते.

विजुआत्या आपल्या NGOच्या मैत्रिणींना सांगत होती, “आम्ही तर पहिल्यापासूनच इतके ओपन माईंडेड आहोत ना…”

बाबा आणि श्रेयस दमून पंख्याजवळच्या खुर्चीवर बसून गुलाबपाणी पीत होते.

सोनी कौतुकाने स्टेजवरून खाली सगळ्यांकडे बघत होती आणि तेवढ्याच कौतुकाने आकाश तिच्याकडे बघत होता.

1 Comments सोनी, बाबा आणि चाळीस पोरं (Soni, Baba Ani Chalis Pora)

  1. techfinsec 23/10/2020 at 3:20 AM

    खुपच छान… वाचताना खरंच डोळ्यासमोर चित्र उभं केलं…मस्तच..असेच छान छान लिहित रहा…खूप खूप शुभेच्छा…

Comments are closed.