एखादी कविता वाचताना डोळे पाणावतात
तेव्हा नेमकं काय होतं?
कोऱ्या कागदावर उमटलेल्या जगात जेव्हा
आपण पाय ठेवतो तेव्हा काय होतं?
दिसते कवीची चंद्रमौळी झोपडी
संकोचून हात हलवताना त्याचा
काखेत फाटलेला शर्ट
किंवा कवियित्रीची चार भिंतीच्या आत
चुलीच्या धुरासमवेतची घुसमट
पण ह्यामुळे हळवे होणारे अगदीच
कोवळ्या हृदयाचे असावेत
पण जेव्हा दिसतात
कोळशात माखूनही
डोळ्यांत पेटलेले निखारे
शब्दांच्या पुडीत बांधताना
कोपऱ्यातून थोडेसे दुःख सांडलेले
अभिमानी जाहिरातीच्या पत्रकांमागे
लपवलेले पत्रे
तेव्हा जागी होणारी कळ
शब्दांत कुठे मांडता येते
आणि करायचे तरी काय तिचे?
आपण आपल्या गादीवर बसून
फक्त उघडायचे पुस्तक
फारतर लिहायची टीका किंवा कौतुक
तसेही आपले डोळे पाणवल्याने
कुठे काय होतं?
सुंदर कविता
मस्तच👌👌