Posts tagged kanosa story

गुरु ब्रह्मा…(Guru Brahma…)

आपल्या “घडण्या”त जन्मदात्यानंतर ‘शिक्षक’ ह्या व्यक्तीचा खूप मोठा वाटा असतो. आईबाबा जेव्हा आपलं लहानगं बोट अंगणवाडी बाईंच्या (आजकाल काय नर्सरी का किंडरगार्टन म्हणतात वाटतं – शेवटी मुले ही देवाघरची फुले आहेत म्हणा, so, हरकत नाही) हातात सोडून जातात त्या दिवसापासून आपलं आणि शिक्षकांचं “लव्ह-हेट” रिलेशन सुरु होतं.

काही शिक्षक अगदी कार्यानुभव सुद्धा मनापासून शिकवतात तर काहींना “वाचिक” अभिनयात पहिला नंबर मिळू शकतो. काहींना छडी लागे छमछम प्रकार आवडतो, काहींना शाब्दिक मार पुरेसा असतो. काही शिक्षक नुसताच ढीगभर होमवर्क देतात, तर काहींना प्रयोगातून शिकवायला आवडतं. एकाच शाळेत वेगवेगळे नमुने असतात, शिक्षकांचे आणि शिकणाऱ्यांचेही. पण शिक्षक कसेही असले तरी कुठे ना कुठे आपल्या समोर बसलेल्या पोरांचं भलं व्हावं हीच एक इच्छा त्यांच्या मनात असते. सुदैवाने आमच्या मुलींच्या शाळेत, “शिकून काय करायचं तुम्हाला, नवऱ्याच्या घरी पोळ्याच लाटायच्या” असं सांगणारे कोणीही महाभाग भेटले नाहीत.

शिक्षक/ गुरु ह्या व्यक्तीने असल्या घातक विचारांपासून दूर राहिलेलंच योग्य. आणि ते तसेच असतात देखील. हे “unbiased” राहण्याचं प्रशिक्षण त्यांना कोण देतं माहित नाही. शिक्षकाला ना समोरच्या व्यक्तीचं जेन्डर दिसतं, ना जात-धर्म. त्यांचं काम फक्त शिकवायचं, समोर बसलेल्या जमावातून एखादा चमकणारा खडा शोधायचा आणि त्याला पैलू पाडायचे.

अशाच एका प्रामाणिक शिक्षिकेची लहानशी गोष्ट काही दिवसांपूर्वी पाहण्यात आली. ही छोटी documentary खरंतर एका ऐतिहासिक अशा घटनेबद्दल आहे. सहा वर्षांच्या कृष्णवर्णीय “Ruby Bridges” च्या शौर्याबद्दल आहे. पण तिच्याबरोबरच तिची सडपातळ छोटेखानी शिक्षिकादेखील भावून जाते.

१९६० मध्ये, ६ वर्षांच्या ‘आफ्रिकन-अमेरिकन’ “Ruby Bridges”ने जेव्हा पहिल्यांदा शाळेची पायरी चढली, तेव्हा अनेक विवाद झाले. U.S. Supreme Court ने “Racial segregation in public schools is unconstitutional” असं जाहीर केल्यावर काही व्हाईट लोकांना ते आवडलं नाही. अशा प्रकारच्या “एकत्रीकरणा”विरोधात काही लोकांनी निदर्शनं केली. १४ नोव्हेंबर १९६० रोजी छोट्याशी “रुबी” चार ‘फेडरल मार्शल्सच्या’ संरक्षणाखाली शाळेत गेली. काही ‘गोऱ्या पालकांनी’ आपल्या मुलांना शाळेतून काढून घेतलं. काही शिक्षकांनी तिला शिकवायला नाकारलं. आणि अशातच एक शिक्षिका पुढे आली. ‘Barbara Henry’ ने रुबीला शिकवण्याची जबाबदारी उचलली. आणि पुढचं एक वर्ष तिने ‘रुबी’ला एकटीला class मध्ये शिकवलं.

हा law पास करण्यात आला तेव्हा पॉलिटिशियन्सनी दोन्ही बाजूंनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. आणि राजकारणी हे करतच राहतील.

पण ‘बार्बरा’ने जे केलं ते फक्त एक गुरूच करू शकतो.

आपल्या शिक्षण-व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. शिक्षणपद्धती बदलल्या पाहिजेत, वगैरे खरं आहे. पण शिक्षकांची मुलांना ‘घडवण्या’ची आत्मीयता कायम राहिली पाहिजे.
आई-बापांची जबाबदारी त्यांच्या मुलांपर्यंत सीमित असते. ही समोर बसलेली मुलं खरंतर त्या शिक्षकांची कोणी नसतात. ह्या मुलांना घडवण्याचं क्रेडिट देखील त्यांना कोणी देत नसतं. तरीही निरपेक्ष हेतूने ते आपलं काम करत असतात.

फक्त पिरियॉडिक टेबल घोकून न घेता त्यातल्या शास्त्रज्ञांच्या गमती सांगणाऱ्या माझ्या बाबांना, लॉकडाऊन मध्ये पोरांनी शिकावं म्हणून ह्या वयात Powerpoint आणि Youtube विडिओ बनवायला शिकणाऱ्या माझ्या आईला, इंग्लिश सुधारावं म्हणून उन्हाळाच्या सुट्टीत आपल्या घरी बोलवून गोठ्यात काम करत माझ्या मित्राची उजळणी घेणाऱ्या त्याच्या शिक्षकांना, आणि कुठल्या-ना-कुठल्या स्वरूपात भेटून आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या अशा तमाम गुरूंना ‘गुरुपौर्णिमे’निमित्त कृतज्ञतापूर्वक प्रणाम!

कहाणी ठमाकाकूंची(Kahani Thmakakunchi)

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.

ठमाकाकू केस-बीस विंचरून, कॉटनचा पंजाबी ड्रेस घालून, थोडीशी लिपस्टिक लावून तयार झाल्या, निघता-निघता त्यांनी तोंडावर मास्क चढवला, नाकावरून थोडा खाली ओढून लिफ्टमध्ये चढल्या.  खाली ठकुमावशी त्यांची वाट पाहत होत्या. सोसायटीमधल्या ह्या दोन मैत्रिणी नेहमी संध्याकाळी आपलं मॉर्निंग वॉक करतात. तसं त्यांनी आपलं वॉक सुरु केलं.

“अगं? पाहिलंस का त्या विराटने काय केलं?” ठमाकाकू डोळे मोठे-मोठे करत म्हणाल्या.

“काय गं?” ठकुमावशींनी विचारलं.

“अगं तिकडे मॅच सोडून भारतात परत आला. काय तर म्हणे पॅटर्निटी लिव्ह! कशाला असल्या माणसाला कॅप्टन करायचं? देशासाठी खेळायचं सोडून बायकोशी गुलुगुलु करायला आला इकडे.”

“हो का? असं अर्ध्यात सोडून आला… खरंच एवढी काय गरज होती!”

“ह्याच्यापेक्षा धोनीच बरा होता. मागे म्हणे कुठल्या तरी वर्ल्ड-कपच्या वेळी त्याला पण झाली होती मुलगी. पण तो नाही आला असं सगळं टाकून. देशासाठी खेळायचा तो. आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगला कॅप्टन होता… ” क्रिकेटर्सच्या आयुष्यावरचं आपलं अगाध ज्ञान पाजळत त्या पुढे म्हणाल्या, “थांब तुला ती पोस्ट पाठवते.”

“हो पाठव.”

“थांब आपल्या सोसायटीच्या ग्रुप वरच टाकते ना…” असं म्हणत ठमाकाकूंनी घाईने सेंड बटण दाबलं.

पॅटर्निटी लिव्ह वर खेळ सोडून आल्याबद्दल कोहलीची नाचक्की करणारे २-३ फॉर्वर्डस त्यांनी पुढे फॉरवर्ड केले.

त्यानंतर मग ‘सुनेच्या आणि सासूच्या’ सिरिअलीवर हलकी-फुलकी चर्चा केली. त्या दिवशी रविवार होता म्हणून स्पेशल मेनू बद्दल डिस्कशन केलं. बोलता बोलता निघालेल्या विषयावरुन, “अगं तिच्या रेसिप्या बघू नकोस, तू “हि” वाली बघ!”, असं म्हणून ठकुमावशींनी “चुंद्याची रेसिपी” ठमाकाकूंना फॉरवर्ड केली.

रविवारचं चमचमीत जेवून, छान झोप काढून सोमवारी सकाळी ठमाकाकू उठल्या. आज उपवास म्हणून खिचडी बनवली. देवपूजा करताना महादेवाची कथा वाचली.

कहाणी सोमवारची, खुलभर दुधाची—”

आटपाटनगराचा एक राजा होता, तो मोठा शिवभक्त होता. एके दिवशी त्याने ठरवले, येत्या सोमवारी आपल्या गावातल्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा. मंदिराचा गाभारा पूर्णपणे दुधाने भरून टाकायचा. त्याने गावात दवंडी पिटवली, ‘ज्याने त्याने आपल्या घरातील दूध आणून महादेवाला वाहायचे आहे हो sss…’

तशी नागरिक निघाले हंडे, कळश्या घेऊन… घरातलं सगळं दूध त्यांनी रिकामं केलं, गायीचं काढलेलं दूध सरळ नेऊन महादेवाला अर्पण केलं.  राजानेही आपल्याकडचं सगळं दूध देवाला वाह्यलं. पण एवढं करून मंदिराचा गाभारा काही भरेना!

राजा काळजीत पडला, देवाचा काही कोप वगैरे तर होणार नाही अशी भीती त्याला वाटू लागली.

इकडे तोवर संध्याकाळी एक म्हातारी वाटीभर दूध हातात घेऊन मंदिराजवळ आली. तिची वाटी बघून मंदिराचा पहारेकरी तिच्यावर हसला, पण त्याने तिला आत जाऊ दिलं.

म्हातारीने देवासमोर हात जोडले, बेलपत्र वाह्यलं आणि ती वाटी गाभाऱ्यात रिकामी केली. तशी गाभारा पूर्ण भरला आणि दूध बाहेर वाहू लागले. हे पाहताच पहारेकऱ्याने म्हातारीला राजासमोर नेले.

राजाने विचारले, “काय गं म्हातारे, तू काय असा चमत्कार केलास?”

“महाराज…” म्हातारी डोक्यावरचा पदर सांभाळत म्हणाली, “मी काही चमत्कार केला नाही… मी तर सकाळी माझ्या गायीचं दूध काढलं, घरी नातवंडांना दिलं, सून पोटुशी आहे तिला दिलं, नवऱ्याला थोडं काढून ठेवलं, गायीच्या बछड्याला थोडं घातलं.. एवढं करून खुलभरच दूध उरलं, ते घेऊन मी आले आणि मनोभावे देवाला वाह्यलं. तुम्ही सर्वांनी बछड्याचा हक्काचा घास काढून घेतला, तान्ह्या बाळाला उपाशी ठेवलं आणि दूध देवाला दिलं. त्याला ते कसं बरं गोड लागेल?”

राजाला स्वतःची चूक कळाली.

अशारितीने कहाणी सुफळ संपूर्ण!”

कहाणी संपवून, पूजा आटोपून ठमाकाकूंनी देवाला नैवेद्य दाखवला.

गम्मत म्हणजे, आपण काल केलेल्या फॉर्वर्डस मधला आणि आज आपल्यावर देवकृपा असावी म्हणून वाचलेल्या गोष्टीतला विरोधाभास त्यांना कळला नाही आणि कदाचित कधी कळणारही नाही.

नागरिकशास्त्र (Nagarikshastr)

सातवीचा वर्ग, एक तास संपून दुसरा तास सुरु व्हायची मधली वेळ. त्या वेळात वर्गात किलकिलाट सुरु. मुलींची शाळा तर साहजिकच बोलायला विषय खूप असायचे.  वर्गाची “Class Representative” असूनही मी आणि माझ्या मैत्रिणीच्या गप्पांनाच ऊत आलेला. तशा वर्गातल्या सगळ्या मुली मैत्रिणीच. पण त्यात हि माझी खास मैत्रीण. आमच्या गप्पांना खंड नसायचा. शिक्षक वर्गावर आले तरी वहीवर लिहून गप्पा continue व्हायच्या.

असा साधारण scene असताना नागरिकशास्त्राचे सर वर्गात शिरले. “Goooood Afternoooon Siiiir!” असं उठून आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि बेंचवर बसलो.  काही शिक्षकांना तुकडी अ आणि तुकडी ब ह्यांना एकत्र करून syllabus संपवायचा होता. त्यामुळे एका बेंचवर तीन मुली बसल्या होत्या.

सरांनी नवीन धडा उघडायला सांगितलं आणि ते पुढे वाचू लागले. अचानक ते थांबले. आणि आम्हाला आडनावाने हाक मारून उभं केलं.

सर म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं. तुम्ही चांगल्या घरातून येता म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना कसंही वागवायचा अधिकार आहे?”

आम्हाला दोघींना काही कळेना. मग सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. माझं आणि ह्या सरांचं फार पटायचं नाही. शाळेत असताना ‘खेळा’त सोडून सगळ्या गोष्टींत मी पुढे असायचे, तर ते त्यांना फारसं आवडायचं नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल कि माझ्यामुळे बाकीच्यांना संधी मिळत नाही. त्या दिवशी देखील ते अशाच अर्थाचं काहीतरी म्हणाले, “काय महाजन, काय वाटतं तुला? की तू नंबर काढतेस तर तू दुसऱ्यांशी कशीही वागू शकतेस?”

माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी त्यांना विचारलं, “सर काय झालं? मी काय केलं?”

सर मैत्रिणीला म्हणाले, “तू तिथेच थांब आहेस त्या ठिकाणी.” आणि मला पुढे फळ्याजवळ  बोलवलं. मग ते म्हणाले, “आता इथून बघ काय दिसतंय, ती हणबरवाडीची मुलगी, ती कुठे बसलीय, आणि तुम्ही दोघींनी किती जागा घेतली आहे.”

मी बघितलं तर ती तिसरी मुलगी बेंचच्या एका कोपऱ्यावर बसली होती, आणि आमच्या गप्पांमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणीने कधी २/३rd पेक्षा जास्त जागा घेतली होती ते आम्हाला कळलं नव्हतं.

मी डोळ्यातून गळणारं पाणी कसंबसं थांबवण्याचा प्रयत्न करून सरांना म्हणाले, “आम्ही मुद्दाम केलं नाही सर… आम्हाला कळलं नाही. तिने सांगितलं असतं तर आम्ही सरकून बसलो असतो.”

“हो… पण ती सांगणार कशी? वर्गातल्या फार शहाण्या मुली ना तुम्ही”

मी बाकावर कोपऱ्यात जाऊन बसले. तिसऱ्या मुलीला नीट जागा करून दिली आणि तो क्लास व त्यानंतरचे उरलेले क्लास खाली मान घालून नोट्स घेत संपवले.

घरी जाऊन हे सांगितलं तर आई म्हणाली, “उद्यापासून तू नीट बघून बसत जा.”

खूप वर्षांनी तो प्रसंग पुन्हा आठवला.

मला तेव्हा सरांचा राग आला होता खरा, आणि कदाचित सरांची सांगण्याची पद्धत चुकीची होती. किंवा बरोबरच असेल. काही अनुभव कडू लागल्याशिवाय मनावर कोरले जात नाहीत.

पण ते सांगत होते त्यात तथ्य होतं. आमच्या बाकावर बसलेली ती मुलगी एस.टी पकडून शाळेला येत असे. एवढंच नाही तर घरी भांडी-धुणी अशी कामं करत असे. ती स्वतःहून बहुधा आम्हाला बेंचवरच्या अडचणीबद्दल बोलली नसती.

आता लक्षात येतं की, बऱ्याचदा आपल्या bubble मध्ये राहून आपण दुसऱ्याला समजून घेण्यात कमी पडतो. स्वतःच्या जगात गुरफटून जाऊन दुसऱ्याबद्दल अनास्था कधी निर्माण होऊन जाते कळत नाही.
आणि आता त्या अनास्थेला सोशल मीडियाने छान फोडणी देऊन सजवलं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, विषयाबद्दल खोल माहिती नसताना त्यावर ‘कमेंट’ करण्याचं शस्त्र लोकांना मिळालं आहे. स्मार्टफोन व स्वस्त इंटरनेट वापरून अनेक ‘इंटरनेटवीर’ दर मिनिटाला जगाशी ‘विसंवाद’ साधत असतात. दुसऱ्याला समजून घेण्याची किंवा एखाद्या विषयाबद्दल पूर्णतः जाणून घेण्याची गरज उरली नाहीए. कुठल्याही व्यक्तीविषयी assumptions करून गरळ ओकण्याची मुभा मिळाली आहे.

दुसऱ्याला काय वाटेल ह्याचा तिळमात्र विचार न करणारी ही लोकं बघून असे काही स्वानुभव आठवतात.

असे अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतीलच असे नाही. पण दुसऱ्याच्या बूटात चालून कसं वाटतं हे आपल्याला माहित नाही, ह्याची फक्त जाणीव असणं पुरेसं आहे.
आपण बसलेल्या बाकावर स्वतः किती जागा घेऊन बसलोय हे पाहिलं तरी पुरेसं आहे.