Posts tagged Rasta

रस्ता (Rasta)

मनात एक रस्ता जातो
पायवाटे इतका चिंचोळा नाही
थोडासा रूंद, दुतर्फा झाडांची रांग
गडद अंधार, कधी लख्ख प्रकाश
हया रस्त्यावर आठवणी फिरतात
एकलकोंडया कधी, कधी एकमेकींचा
धरतात हात

एखाद्या वासागणिक कुठेतरी लपलेली
अल्लड आठवण धावत पळत येते
परकराचा घेर धरत गिरकी घेऊन सांगते
“तेव्हा नाही का सोनचाफयाच्या
झाडाखाली होतीस खेळत
तोच की हा वास
हिच माझी ओळख”

कधी एखाद्या गाण्यासरशी
कोपरयातलया काहीजणी भराभर
येतात वाट काढत
रस्ता संपतो त्या कडयापाशी बसतात
आणि घळाघळा रडतात
इवल्या इवल्या आठवणींच्या
अश्रूंचा बनतो तेव्हा प्रपात
कडयावरून खाली उतरतो
डोळ्यातील पाण्याचा एक टिपूस होऊन

आठवणी वेड्या,  मधेच कधी फेर धरतात
रंगीत संगीत कपडे घालून गाणी म्हणतात
कधी काळे कपडे घालून काढतात मोर्चा
पेटून उठतात कधीकाळी खुपलेल्या काटयावर
डोळ्यात रक्ताच्या साखळ्या बनतात
मग त्यांना आवरणं कठीण होऊन जातं

थोड्या वेळात परंतु हात चालू लागतो
साखळ्या विरू लागतात
काम सुरू होते
मग आठवणी शांत होतात
हळूच परततात झाडांमधल्या आपल्या झोपडीत
शांतपणे झोपी जातात
पांघरूणात शिरून