Posts tagged Marathi poem

चित्र (Chitra)

कोणे काळी एक चित्रकार एका राज्यात आला
त्या राजाचा म्हणे होता बोलबाला
कलावंतांवर आहे राजा मेहेरबान
म्हणून चित्रकाराने त्याच्यासमोर मांडला प्रस्ताव
“उत्तरेकडे तुमच्या वेशीजवळ पाहिले एक मंदिर,
प्रशस्त दिसते बाहेरून पण आतून बेरंग
परंतु दिसली माझ्या दृष्टीला त्या भिंतीवर
चित्रं, रंग आणि राधा, श्यामच्या प्रेमात दंग”
राजाज्ञा मिळताच चित्रकाराने बांधली पेटी
रंग, कुंचला आणि रंगफळी घेऊन चालला चित्रांच्या भेटी

भव्य अशा द्वारातून प्रवेश करत तो पायरीवरच थांबला
दगडांचा काळा रंग त्याने डोळेभरून पाहिला
आवाराच्या मधोमध छोटेसे मंदिर सुबक
समोरच्या तळ्यात एक मुकाट कासव
चमकणारी कृष्णाची मूर्ती एक संधीप्रकाशात
ना पुजारी ना तेलवात

जवळच्या वृक्षावर पक्ष्यांचा कळप
त्यांच्या किलबिलाटात मिसळलेले कसलेसे सूर
आवाजाच्या दिशेने तो चालत गेला
कोपऱ्यात एक ‘फकिर’ गाण्यात गुंग झालेला
सुरावटीत त्याच्या चित्रकाराला गवसली प्रेरणा
लयीत सुरु केलं चालवण्यास कुंचला

निळा-सावळा श्याम, हाती घेऊन बासरी
त्याच्या शेजारी उमटली राधिका लाजरी
रात्री उलटल्या दिवस उपजले
रासलीला, नंदलाला, गोपिका
सारे नंदनवन फुलून आले
गोपिकेची एका सुंदर टुमदार झोपडी
त्याच्या बाहेरच उभी तिची लोण्याची मडकी
फकिराच्या गाण्यावर गोपिका डोलते
ताक घुसळते, पाणी आणते, गायीला गोंजारते
सुरांच्या तालात तिच्या परकरावर उमटली नक्षी
भिंतीवर अवतरली कुंचल्यातून
गोमट्या-नाकेल्या गोपिकेची कहाणी

मंदिर न्हाऊन निघाले रंगात
चित्रकाराने फकिराचा हातात घेतला हात
“परत येतो भेटीस” म्हणाला, राजास निमंत्रण द्यायला निघाला
रंगाच्या सुवासात, तारे मोजत फकीराची संपली रात

दुसरे दिवशी नेमलेला एक पुजारी आला
उगाच दाखवून राग, त्याने फकीरास पिटाळला
म्हणे “राजेसाहेब येणार उद्घाटनास,
त्यांच्या नजरेस नको तुझे हे बस्तान”

त्या संध्याकाळी चित्रातली गोपिका सैरभैर झाली,
रोज येणारी सुरावट का नाही ऐकू आली
तिने आपल्या गायीला गोंजारलं
लोणी काढलं, मटक्यातून पाणीही आणलं
पण तिचं कशातच मन रमेना
गोमट्या गालावर रंग काही चढेना
रेखीव ओठांवरचं हसू झालं गायब
टोकदार नाकावर उगाच उतरला डोळ्यातून ओघळ
मंदिर पूर्ण झाल्याची राजास खबर मिळाली
मुहूर्त ठरला, हत्ती, घोडे आणि पालख्या उठल्या
हत्तीवर राजा, घोडयावर चित्रकार स्वारी निघाली
दारातली सेविका आरती घेऊन आली
नाम ओढून राजाच्या कपाळी बाजूला झाली

‘हरे कृष्ण हरे राम’ झाला नामाचा गजर
राजाने उंबरठयावर केले श्रीफळाने उद्घाटन
रंगात न्हालेले मंदिर पाहून राजा झाला आनंदित
चित्रकाराकडे पाहून दिली मानेनेच पसंती
थांबा म्हणाला इथेच, “मी येतो सैर करून,
तुमचे कौशल्य बारकाईने पाहून”

सर्वप्रथम राजाने मूर्तीपुढे हात जोडले
पुजाऱ्याने पंचामृत हाती दिले
प्रदक्षिणेला राजा निघाला,
स्वतःशीच ‘वाहवा’ उद्गारीत चित्रे न्याहाळू लागला
चालता चालता मात्र एके ठिकाणी थबकला
चेहरा त्याचा किंचित हिरमुसला

प्रदक्षिणा पूर्ण करून तो द्वारापाशी आला
काहीच न बोलता त्याने सुवर्णमुद्रा उचलल्या
चित्रकाराने समोर केले उपरणे
पण राजाचा हात देता देता थांबला
आढ्यतेने त्याने चित्रकाराला प्रश्न केला
“तुमचा रंग होता का संपला?”

तत्क्षणी चित्रकाराने उपरणे केले खाली
त्वेषाने म्हणाला, “देऊ नका मुद्रा, परंतु कलेची हेटाळणी का केली?”
राजा त्याला म्हणाला “चला दाखवतो तुम्हाला”
तिथे घेऊन गेला जिथे तो आधी होता थबकला,
“सांगा आता याचा अर्थ काय झाला”

भिंतीकडे बघून क्षणभर चित्रकाराला भोवळ आली
“माधवा! हि काय रे कथा?”
नुसतीच मडकी, झोपडी, गाय आणि गोठा
भिंतीभर काळ्या आकृत्या पाहून त्याला खात्री झाली
नाकेली गोपिका अदृश्य झाली,
चित्रातून उतरून फकीरामागे निघाली!