Posts tagged Marathi love story

चाफा (Chafa)

‘बाग छान नव्हती, आम्ही छान होतो. आम्हाला काय बागच पाहिजे होय रे आडदांडा? आम्ही जिथे बसू तिथे आमची बाग. अरे, एवढ्या मोठ्या मातीत मरायला चार वाव जागा कशीही मिळते, मग चार वाव जागा जगायला मिळणार नाही होय?’ जी. ए. कुलकर्णींच्या गोष्टीतलं हे वाक्य वाचून राधाचे डोळे अचानक पाणावले. त्यांच्या आत्तापर्यत वाचलेल्या गोष्टींमधली, हीच काय ती थोडासा दिलासा देणारी गोष्ट. नाहीतर, छापलेल्या शब्दागणिक आर्त भावनांच्या काळोख्या डोहात कथांमधल्याच नागासारखं सळसळत खेचून घेण्याची ताकद त्यांच्या गोष्टींमध्ये आहे. राधाने डोळे मिटले आणि मोठा श्वास घेतला, कथेतली ती पेरवांची बाग, कमळीच्या हातावरचं गोंदण, वेंधळा दामू… हलकेच तिच्या नजरेसमोरून फिरून गेले.
आपल्याला असं कधी काही जमेल का उभं करायला, ह्या विचारात दुसरी गोष्ट वाचायला तिने पान पालटलं, तर तिथे तिला एक छोटी चिट्ठी दिसली.
“काय वाटतंय तुला?” चिट्ठीतलं पहिलंच वाक्य बघून तिच्या भुवया उंचावल्या.
“काय वाटतंय तुला हि गोष्ट वाचून? आत्तापर्यंत ठेवलेला छातीवरचा दगड कोणीतरी क्षणभरासाठी उचलला असं वाटतंय ना?”
बापरे कोण आहे हे? आणि कुणासाठी लिहलंय? राधाने चिट्ठी आलटून पालटून बघितली. एका कोपऱ्यात Initials लिहले होते – R.P.
हँ !? माझेच initials! Strange! राधाचे मोठे डोळे अजूनच मोठे झाले. स्वाभाविकपणे तिची डावी करंगळी दाताखाली गेली आणि तिने पुढे वाचायला सुरुवात केली.

“खरं सांगू, मला बाकी गोष्टी वाचताना फार त्रास झाला… जी. ए. देतातच तो! पण हि गोष्ट वाचून डोळ्यांतून एक थेंब ओघळला आणि त्या मातीत पडला, जिथे मरायला जागा आहे आणि जगायलाही. त्या शेतातल्या काळ्या मातीच्या ढेकळांमध्ये विरून गेला. शेताच्या शेजारी वाहणाऱ्या झऱ्यातून वाहत गेला. तो लहानसा झरा, काठाला सोनचाफ्याचं झाड. आणि झऱ्यासारखीच शांत आणि काय तो शब्द आहे? हां आल्हाददायक! सोनचाफ्यासारखी आल्हाददायक, ती! त्या पाण्यासारखे निखळ डोळे आणि चोरटं हसू. काठाला उभा राहून तिला पाहायचो. ते शेत, ते गाव आणि ती, सगळंच काही दिवसांपुरतं. ती गेली आणि मीही गाव बदललं. पण ते झऱ्याचं मंद हसू आणि तिच्या डोळ्यातलं पाणी नजरेसमोरून जात नाही. शेवटच्या दिवशी हातात चिट्ठी ठेवून जात असताना तो हात मी धरला नाही. हात लुळे होते कि मूठ लहान होती… ती निसटून गेली, मुठीत धरलेल्या पाण्यासारखी.

.
तू डोळे बंद कर. आणि सांग मला तुला काय वाटतंय?”

राधाचे डोळे आपोआप बंद झाले. तिलाही दिसलं तिचं गाव, नदी, नदीवरचं दत्ताचं देऊळ. भरलेलं पात्र, कोसळणारा पाऊस, पावसात चिंब भिजणारी अंगणातली झाडं. रेनकोट घालून सायकलवरून शाळेला जाणारी ती. शाळेकडे जाणारा तो चढ चढण्यासाठी उभी राहून जोरात पेडल मारणारी. चढाच्या वर कोपऱ्यात उभा असलेला तो. राधाचे डोळे पट्कन उघडले. Oh my god! तो कसाकाय डोळ्यांसमोर आला? हाह! विसरलेच होते मी. बापरे, काय तर प्रेम होतं. अभ्यासाचा बहाणा करून बोलायचो. हाहा… एकमेकांकडे चोरून बघायचो. काहीही वेडेपणा! तो पोरकटपणा आठवताच, तिला आठवले त्याचे डोळे.  तिच्या डोळ्यांत बघणारे, एकटक. डोळ्यांत बघतच वही देताना तिच्या हाताला केलेला स्पर्श.  आणि मग तिच्या तळव्यांवरून हलक्या बोटांनी फिरवून मागे घेतलेला हात. त्याने त्या वहीत घालून दिलेला गुलाब राधाने बरेच दिवस जपला होता. तो आठवीत शहरातल्या शाळेत गेला तरीही, त्याची आठवण म्हणून.
राधा स्वतःशीच हसली. ‘What a typical 90’s teenage drama!’ Thank god… जन्माच्या आणाभाका घेतल्या नाहीत. बघतेच ह्याला फेसबुकवर… Rishabh Patil तिने FB च्या सर्च विंडो मध्ये type केलं. अरे! हा पण R.P च… म्हणून तर बावळट मैत्रिणी चिडवायच्या. Same-same initials म्हणून. मला लग्नानंतर सही बदलायची गरज नाही वगैरे. अडाणी -बिनडोक. सगळेच बिनडोक होतो म्हणा.

पण हा R.P. कोण आहे? तिने पुस्तकाचं मागचं पान उघडलं. लायब्ररीच्या लॉग मध्ये काहीतरी सापडेल म्हणून. पण मागच्या पानावर तिचंच नाव पहिलं होतं. तिच्याच नावासमोर पहिला स्टॅम्प होता. कोणी donate केलंय वाटतं हे लायब्ररीला. Anyways… let’s stalk Rishabh, तिने त्याचं प्रोफाईल उघडलं. Wah! डीपी तरी बाहेरचा कुठला तरी दिसतोय. Eurotrip and all. पप्पाकडे बराच पैसा आहेच म्हणा. त्यात मुलगा एकुलता एक! तिने फोटोज वर क्लिक केलं. एक एक करत पुढे स्वाईप करू लागली. oooh! पोरगीबरोबर फोटो. चांगलंय की. एवढे फॉरवर्ड होते आईबाबा तर तेव्हा का लाजायचा मग? आता नाहीत का दिसत ही थेरं जगाला. तेवढ्यात screen काळी झाली.

‘Abhimanyu Calling’, तिने फोन उचलला.
– “फोन हातातच आहे वाटतं? जेवण झालं का?” तिकडून अभिमन्यूने विचारलं.
“हो झालं… यार तू लकी आहेस. तुला रोज घरचं जेवण मिळतं. बकवास Yellow-day होता आज मेस मध्ये”
– मगाशी whatsapp वर एक मेसेज केला होता, बघितलास का?”
“नाही अजून.. अरे वाचत बसले होते. फोन नाही बघितला आणि जस्ट हातात घेतला तोवर तुझा फोन आला. बरं तुला ना उद्या एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते.”
-“आत्ता सांग.”
“नको फोनवर. तू घरी असलास कि नुसतं हं- हं करतोस. उद्या मानकरच्या रूमवर भेटू ना. माझा तो handwriting analysis चा क्लास पण आहे दुपारी, मग मला इकडे जा तिकडे जा करावं लागणार नाही.
-“यार तिथे नको… तुझ्या रूमवर भेटू”
“तुला सांगितलं ना.. माझी रूम-मेट फार चोमडी आहे. I wish मी इथे रेन्टवर राहणं afford करू शकले असते. किंवा तू आई-बाबांसोबत राहत नसतास. किंवा आपण..”
-“बरं, बरं… झोपतो मी आता. चल बाय!” अभिमन्यू तिकडून जांभई देत म्हणाला.
“इतक्यात?”
-“अगं टमाटे… १२ वाजलेयत. कुठे ध्यान असतं? चल गुडनाईट!”
“बरं गुडनाईट…” राधाने फोन ठेवला आणि whatsapp उघडलं. अभिमन्यूने एका विडिओ ची लिंक पाठवली होती. खाली नुसतंच “Must Watch” असं लिहलं होतं. राधाने whatsapp ची विंडो बंद केली आणि पुन्हा फेसबुक उघडलं आणि रिषभ पाटीलचं प्रोफाईल चाळत बसली.


“यार किती गर्दी आहे. आपला नंबर कधी येणार म्हणाले ते काका?” राधाला भूक लागली होती. कॅफेच्या दारातल्या चाफ्याच्या बोडक्या झाडाखाली दोघे जागा व्हायची वाट बघत होते.
“अजून १५ मिनटं लागतील” अभिमन्यूने नुकतीच विचारणा केली होती.
“आईचा घो!” राधाच्या तोंडून जोरात उद्गार निघाला.
समोर उभ्या असलेल्या काका-काकूंनी गर्रकन मान फिरवली. ‘Uncultured!’ असा एक लूक काकूंनी दिला. राधाने मान वळवली. स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायला म्हणून तिने उगाच त्या कॅफेलाच प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. कॉलेजजवळचं हे कॅफे बरंच फेमस होतं. आज रविवार असल्यामुळं कॉलेजवयीन लोकं सोडून इतरांचीही गर्दी होती.

फिरता फिरता तिला एक चिठ्ठया-चपाट्यांनी भरलेला एक मोठा बोर्ड दिसला. मागे २-३ वर्षांपूर्वी जेव्हा कॅफेचं नूतनीकरण झालं, तेव्हा ‘रूस्तमचाचां’च्या नातवाने हि आयडिया काढली होती. तिथे येणाऱ्या पोरा-पोरींना “तुम्हाला ह्या कॅफेबद्दल काय आवडतं?”च्या धर्तीवर काहीतरी लिहून रंगीबेरंगी चिठ्ठया चिकटवायला सांगितलं होतं. आणि मग ह्या बोर्डला छान पैकी काच चढवून ती आठवण त्याने ठेवली होती. राधा त्या चिठ्ठ्या, Post-its वाचू लागली. कोणी रुस्तम चाचांचं कौतुक केलं होतं. कोणी आपल्या ‘लव्ह ऑफ लाईफ’ ला इथेच भेटलं होतं (कॉलेजजवळची हँगआऊट प्लेस!). कोणी इथल्या मस्कापावचं फॅन होतं तर कोणी इथल्या चीज-लोडेड ऑम्लेट साठी मरायलाही तयार होतं. राधा ते वाचण्यात गुंग होऊन गेली होती. तेवढ्यात तिच्या समोर काहीतरी पडलं. बोडक्या चाफ्याच्या झाडावरचं फूल! तिने ते उचललं आणि नाकाशी लावून खोलवर श्वास घेतला. ती तिथून निघणार तेवढ्यात त्या बोर्डवर तिला आणखी एक पोस्ट दिसली. ‘इथे येऊन मला घरची आठवण झाली’ असं मोठ्या अक्षरात लिहलं होतं आणि खाली छोट्या अक्षरात काहीतरी खरडलं होतं. अक्षर ओळखीचं वाटलं म्हणून तिने तो कागद जवळून पहिला. ‘घरची आठवण झाली’च्या पुढे लहान अक्षरात लिहलं होतं, “कारण माझी आई पण इतक्याच वाईट भजी बनवते.” राधाला हसू आलं. नीटसं पाहता तिला तिथे छोटे initials दिसले. R.P. राधाचे डोळे विस्फारले. तिने अभिमन्यूला हाक मारली.
“अभी… इकडे ये ना..”
लांब उभा असलेला अभी नाईलाजाने तिच्याजवळ आला. “अगं नंबर जाईल आपला”
“तुला मी हे सांगायचंच विसरले. तुला हि पोस्ट दिसतेय.”
“इथे येऊन घरची आठवण झाली..भजी..”अभीने पुटपुटत ती नोट वाचली, “इथे येऊन भजी कोण खातं?”
“ते जाऊ दे… पण Same handwriting आणि Same initials असलेली चिठ्ठी मला मागच्या आठवड्यात ‘जीएं’च्या पुस्तकात सापडली. ह्या मुलाने ना.. असा एक छान पॅरा लिहला होता, थोडा वाचकाशी संवाद साधल्यासारखा आणि थोडा असा स्वतःशीच बोलल्यासारखा. आणि मजा बघ इथे पण दिसला. He seems witty too!”
“More like, attention-seeking freak!”अभी खांदे उडवत म्हणाला.
“What do you mean?”राधाला अभीच्या रिऍक्शनचं आश्चर्य वाटलं.
“मग काय तर… Poor efforts for seeking the attention of random people.”
“I don’t think, तो त्या चिठ्ठीतून attention वगैरे मागत होता. In fact, I liked the way he wrote and tried to connect with a stranger, without even knowing if anyone’s going to read the book or the चिठ्ठी”
“That’s what I am saying…”
“Attention seekingचा काय संबंध मग?”
“He got your attention, didn’t he?”
“How mean!”
“These are simple psychological tricks… आणि तुला तरी मी सांगायला नको हे. Handwriting Analysis शिकतेस ना.. मग ह्याच्या अक्षरावरून कळलं नाही का तुला, त्याचा स्वभाव वगैरे?” अभी किंचित उपहासाने म्हणाला.
“नाही… कारण उठसूट जगाला analyze करत बसत नाही मी. आणि तसं बघायचंच झालं ना, तर He seems more mature and non judgmental!”
“सोड ना… कशाला वाद घालून सकाळ खराब करायचीय. चल नंबर आला असेल आपला.”
“नको. पोट भरलं माझं.” राधा आपली स्लिंग बॅग काखेला मारून फणकाऱ्यात निघून गेली.


“Radha Pathak… Who is Radha Pathak here?” KV मध्ये शिकलीय असं वाटणाऱ्या, आवाजात मूळचाच एक Husk असणाऱ्या, Straight केसांच्या, उंच, गोऱ्या मुलीने डायस जवळ उभी राहून खाली बसलेल्या पोरा-पोरींच्या ग्रुप कडे बघून विचारलं.
“हो.. मी.” राधा उभी राहिली.
“Okay, you have said, you will write an article in Marathi section of our Magazine?”
“Yes!”
“Okay! Send out a delineation to our Marathi editor Meghana? She will require it by Tuesday.”
“Sure Ma’am!” ‘Ma’am! बावळट आहेस का राधा!’ कॉलेजमधल्या सिनियरला मॅम म्हणाल्या बद्दल तिला नंतर embarrassing वाटलं. तिथून निघता-निघता तिने delineation चा अर्थ गूगल करून पाहिला.
मंगळवारपर्यंत आर्टिकल लिहून द्यायचं आहे म्हणल्यावर जरा तिच्या पोटात गुडगुडू व्हायला लागलं होतं. अजून विषय नीट ठरला नव्हता… कधी लिहायला घेणार, कधी पूर्ण होणार.. तिला जरा टेन्शन आलं होतं. (कॉलेज मॅगझीन कोण वाचतं म्हणा.. पण कॉलेजमध्ये असताना असं वाटत नाही.) थोडा रेफरन्स मिळतोय काय बघायला ती कॉलेजच्या लायब्ररीमध्ये शिरली. रेजिस्टरमध्ये घाई-घाईनं नाव रखडून सरळ Storybooks च्या section मध्ये गेली. तिथे कॉलेजच्या मॅगझिन्सच्या धूळ खात पडलेल्या कप्प्यातून २-४ मासिकं तिने उचलली. धूळ झटकून, लायब्ररीच्याच टेबलवर वाचत बसली. मराठी section चाळता-चाळता तिला एक लेख दिसला. सुरवातीलाच, लक्ष वेधून घेणारा एक फोटो होता. काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा. समुद्रकिनारी पालथ्या पडलेल्या त्या ‘सिरियन’ बाळाचा. तिने तो लेख वाचायला घेतला.

“परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्‌”, असं देव म्हणून गेलाय खरं… पण कोण साधू आणि कोण राक्षस ह्यातला फरक आता देवाला तरी करता येतोय का? आयुष्यभरात कितीतरी पापं केली असतील. सगळ्यांनीच. म्हणजे कोणी खून केला, कोणी चोरी, कोणी दुसऱ्याचा छळ केला, कोणी नुसतंच वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोललं तर कोणी समाजाच्या विरोधात जाऊन एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं. मग डेफिनेशन नुसार हे सगळेच पापी, दुष्कृत्य करणारे. मग उरलं कोण? आणि वाईट कर्म करणाऱ्यांचा खरंच विनाश होणार आहे का? झाला आहे का? कारण देश च्या देश लुटून सगळ्यांना देशोधडीला लावणारे महाभाग अजूनही पोस्टर्सवर, ठराविक वर्गाच्या लोकांमध्ये, आंधळ्या भक्तांमध्ये महान बनून फिरतच आहेत. त्यांचा विनाश नाहीच पण आपल्यासारख्या मध्ये अडकलेल्यांचा, ज्यांना बुद्धी आहे पण हात लुळे आहेत त्यांचा ऱ्हास होतो आहे. कुणी हात उचललाच किंवा आवाज उठवलाच तर त्याचे हात कापून, गळा चिरणारेच पुढे जातात.

मग ह्यातून जन्माला येते उदासीनता. माणूस दगड बनत जातो. अप्पलपोटी बनत जातो. माझ्या घरात डाळ-भात शिजतोय, बाहेर रस्त्यावर उपाशी कोण का झोपेना. शेजारच्या घरात भांडण चालू आहे, माझं दार बंद करून मी TV चा आवाज वाढवायचा. कारण मला ऐकायचं नाही. बाहेर काय चालू आहे. मी कान-डोळे-तोंड सगळं बंद करून टाकलंय. गांधींच्या तीन माकडांचा अर्थ आत्ता नीट समजला. “वाईट काही बघू नये, वाईट काही ऐकू नये, वाईट काही बोलू नये, उं-हूं, उं-हूं. ” चूक! काहीच बघू नये, ऐकू नये, आणि बोलू नये — ज्याने तुम्हाला त्रास होईल.

म्हणून लेको… वर्तमानपत्रातल्या त्या समुद्र-काठाला पडलेल्या बाळाला बघून झाकून टाका डोळे… जाळून टाका तो पेपर. कलबुर्गी, दाभोळकरांच्या रक्ताचे ठसे पुसून काढा तुमच्या धुवट वृत्तीने. आणि तुम्ही-तुम्ही म्हणून बोट दाखवणारा मी तरी कोण उरलेली पाच बोटं माझ्याकडे बघून हसतायत माझ्या नाकर्तेपणावर. हे संत-बिंत वेडे होते, ‘दुष्टांचा दुष्टपणा जाऊन ते सत्कर्मी लागावेत’ अशी अगदीच भाबडी अपेक्षा करत होते. ‘Spread Love everywhere you go…’ वगैरे. सगळा वेडेपणाच. कारण बिचाऱ्यांना समजलंच नाही, परस्परांमध्ये मैत्र घडण्यासाठी लागते ती लायकी आमच्यात नाही.

जय हिंद!

तो पॅराग्राफ वाचून राधा अवाक झाली. तिने खाली लेखकाचं नाव बघितलं, ‘रॉनी परेरा’. Oh my god! Completely unexpected! एक ख्रिश्चन मुलगा, इतकं सुंदर मराठी लिहू शकतो, आणि संतांचे वगैरे रेफेरन्सेस. तिने ते नाव आपोआपच एकदोनदा मनात घोळवलं, रॉनी परेरा– रॉनी परेरा… — R.P.!! Shit. हाच आहे आर.पी.! हाच असायला हवा. इथे अक्षर कळत नसलं तरी.. हे विचार त्याचेच असतील. दोन मिनिटं त्या धुळीच्या कपाटाकडे टक लावून बघून ती कसल्याश्या उत्साहाने उठली. ते मॅगझीन घेऊन, परत रेजिस्टर मध्ये नाव वगैरे रखडून हॉस्टेलकडे निघाली.
“पिंट्या… मला ना सुचलंय काय लिहायचं!” मैत्रिणीच्या रूमचं दार उघडून ती मोठ्या आवाजात म्हणाली.
“अगं केवढी ओरडत्येस, मेट्रनच्या रूम पर्यंत जाईल आवाज.” पिंट्या-उर्फ-प्रियांका बऱ्याच हळू आवाजात म्हणाली.
“असू दे… मला काय वाटतंय माहितीय का? मी आमच्याच बद्दल लिहावं.. म्हणजे अगदी असं नाही.. पण थोडी मिस्टेरीअस लव्ह-स्टोरी… आणि ना थोडा आधीचा काळ घेईन… आता काय whatsapp- फेसबुक वर सगळं सहज कळून जातं. जेव्हा लोकं पत्रं वगैरे पाठवायची तो काळ. चुकून कुणाच्या तरी हाती अनोळखी पत्रं लागतं.. असं काहीतरी.. अजून नीट कळलेलं नाहीए मला कसं होईल.. पण तुला काय वाटतं लिहावं का आमच्याबद्दल की खूप पर्सनल होईल?” राधा पाचव्या dimension मध्ये जाता-जाता परत आली.
प्रियांकाच्या चेहऱ्यावर व्हिझिबल प्रश्नचिन्ह होतं, “तुझ्या आणि अभी-बद्दल लिहणार आहेस तू?”
“ढ! नाही… माझ्या आणि R.P. बद्दल” राधाने पिंट्याला करेक्ट केलं.
“तू अजून त्या आर.पी. वरच आहेस.”
“अगं… मिळाला मला तो.”
“कुठे? आपल्या कॉलेजमध्ये आहे का?”
“नाही… इथे… मॅगझीन मध्ये.” राधा उत्साहाने ते मॅगझीन पिंट्यासमोर धरत म्हणाली.
“रॉनी परेरा.. हे कसलं नाव?” (पिंट्याचं ‘पिंट्या’ हे नाव स्वाभावितकेमुळं होतं.)
“हे कसलं नाव म्हणजे… नाव आहे त्या मुलाचं. बघ ना ख्रिश्चन असून किती सुंदर मराठी लिहतो. घरात पण मराठीतच बोलत असतील. पण हे अगदी पसायदानाबद्दल माहित असणं म्हणजे जरा वेगळंच वाटतंय. आणि मला वाटतंय की मी हे त्याला सांगावं.. की I am feeling very inspired because of you.”
“अभीला सांगितलंस का हा मिळाला म्हणून?”
“ह्या!! अभीला नाही सांगणार मी. मागच्या वेळेस बघितलंस ना उगाच इर्रिटेट केलं त्याने.”
“हं… लिहा मग… चांगली होईल स्टोरी… पण मला एक सांग राधेश्वरी… तू हे fiction म्हणूनच लिहणार आहेस ना? की खरंच ‘कुछ कुछ होता है?” पिंटूने राधाला उगाच कोपराने ढोसललं.
“माकडे… तसं काही नाहीए. स्टोरी आहे ही.” पिंटूशी वाद घालायला नको म्हणून राधा उठली आणि आपल्या रूममध्ये गेली. गेल्या गेल्या तिने सरळ लॅपटॉप उघडला आणि लॅपटॉपवर फेसबुक उघडलं. (स्मार्टफोनच्या जमान्यात लॅपटॉपवर फेसबुक उघडणं म्हणजे सिरिअस असण्याचं लक्षण आहे.)

तिने ‘रॉनी परेरा’ टाईप केलं. एकतर खूप सारे रॉनी परेरा आले. पण एकाचीही प्रोफाइल मॅच होईना, मग तिने ‘परेरा’चे वेगळे स्पेलिंग्स टाकून बघितले. एका प्रोफाइल मध्ये कॉलेजचं नाव वगैरे दिसलं. तिने ती प्रोफाईल उघडली आणि डीपी वर क्लिक केलं. डीपीवरून कळेना तो कसा दिसतोय. समुद्र काठाला उभा राहून सूर्य मावळतानाचा फोटो होता. आणि तोही सेल्फी. तिने अजून फोटोज वर क्लिक केलं. काहीच नाही. त्याला टॅग केलेल्या नुसत्याच कसल्या तरी पोस्ट्सचे फोटो. एक ग्रुप फोटो दिसला पण त्याचा चेहराच माहित नसल्यामुळं त्या ग्रुपमधला आर.पी. कोण हे कळणं अवघड होतं.
शी! असा काय आहे हा… फोटोज का नाही टाकले! फेसबुक फार वापरत नाही वाटतं. काहीतरी अजून क्लू मिळतोय का बघूया.. नाहीतर कुणाला तरी दुसऱ्यालाच मेसेज जायचा. ती त्या टॅग केलेल्या पोस्ट्स बघू लागली. स्वाईप करता करता काही कॉलेज इव्हेंट, कॉलेज ग्रुप ऍक्टिव्हिटी related पोस्ट्स दिसल्या. म्हणजे हा इथलाच आहे. पोस्ट्सच्या तारखा बघितल्या.. ३-४ वर्षांपूर्वीच्या. म्हणजे सिनियर आहे. पास-आउट झाला असणार आधीच. ह्याच्या स्वतःच्या टाइमलाईन वर काय दिसतंय… ओह उर्दू शायऱ्या share केल्या आहेत. बराच व्हर्सटाईल आहे साहित्यिक आवडींमध्ये! करू का ह्याला मेसेज? काय माहित रिप्लाय तरी करेल की नाही. श्या! कसंतरी वाटतंय आता… जसं एक्सपेक्ट केलेलं तसं काही दिसत नाहीए ह्याचं प्रोफाईल. पण असू शकतं ना.. एक तर तू त्याच्या friend-list मध्ये नाहीयेस. काय माहित त्याचे काही फोटोज प्रायव्हेट असतील. तू त्याचं पब्लिक प्रोफाईल बघतेयस. आणि नाही आवडत एकेकाला फेसबुक. नाहीतरी ‘कचरा’च असतो Facebookवर. पण तरी फ्रेंड-रिक्वेस्ट टाकू आणि मेसेज टाकून ठेऊ.

“Hey, I don’t know why… But I wanted to message you this. मला माहित नाही हा मेसेज तुझ्यापर्यंत पोहचेल कि नाही. पण गेल्या महिन्यापासून थोड्या विचित्र गोष्टी घडतायत. म्हणजे जीएंच्या पुस्तकात तुझी चिठ्ठी सापडणे, तुझी ती कॅफेमधली पोस्ट सापडणे आणि आज हा लेख सापडणे. आणि मला असं एक कनेक्शन झाल्यासारखं वाटतंय… And you have inspired me to write today. Ok.. that’s it.  If you don’t find this weird. Then please accept my friend request.”

And Send! हुश्श… केला सेंड. आता रिप्लाय ची वाट बघायची. तोपर्यंत आपली स्टोरी लिहायला घेऊया.  राधाने लॅपटॉप बंद केला आणि आपली वही-पेन बाहेर काढलं आणि पेनाचं मागचं टोक चावत, सुरवात कशी करावी ह्याचा विचार करत बसली.


“ठरलं का?”
राधा अजून मेन्यूकार्डकडेच बघत होती. पण ती मेन्यू बघतच नव्हती. टेबलावरच्या त्या कार्डावर डोळे लावून भलत्याच विचारात होती. अभिमन्यूच्या प्रश्नामुळे तिने एकदम भानावर आल्यासारखं त्याच्याकडे बघितलं.
“ठरलं का काय घ्यायचं?” अभीने परत प्रश्न केला.
“उं.. तू घेणारयस तेच घे.”
“नक्की?”
“हो” अभीने नेमकं काय घ्यायचं ठरवलंय हे न विचारताच तिने हो म्हणलं. कारण मगाशी जेव्हा ती भलत्याच विचारांत होती तेव्हा कदाचित त्याने सांगितलं असेल असं तिला वाटलं.
अभी ऑर्डर द्यायला गेला.
राधाने कपाळावर टपली मारून घेतली. ‘अगं बाई… करेल तो रिप्लाय. आणि नाही केला तर राहीना. तुझं काय अडलंय.’ एक आठवडा झाला तरी अजून त्याचा रिप्लाय आला नव्हता. मेसेज केल्यानंतर दोन-तीन दिवस तिने स्वतःला ‘बिझी असेल तो, लोक आता जास्त FB वापरत नाहीत.’ असं सांगून समजावलं होतं. पण आता, ‘माझा मेसेज other messages फोल्डर मध्ये गेला असला तर… त्याला डायरेक्ट वॉल वर लिहावं का? की ‘इंस्टा’वर फॉलो ची रिक्वेस्ट टाकावी’ ह्या विचारापर्यंत ती आली होती. ‘पण तुला एवढं काय लागलंय त्याला कॉन्टॅक्ट करायचं. तुला तर फक्त त्याला एवढं सांगायचं होतं ना की तुला त्याच्या चिठ्ठया वाचून चांगलं वाटलं, inspired वाटलं. मग?’ असंदेखील एक मन म्हणत होतं. (हे एक मन, दुसरं मन हा जो काही प्रकार आहे ना!)
‘आता बास तो विचार… इनफ इज इनफ!’ असं स्वतःला सांगून तिने अभिकडे उगाच काहीतरी विषय काढला.
“ह्या आलिया भटला खूप पिक्चर्स मिळतायत नई?”
अभीने तिच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं मग खांदे उडवत म्हणाला, “मग? मिळू देत की.”
“पण कंगना म्हणतेय ते बरोबर आहे ना… आऊट-साईडर्सना तितक्या opportunities मिळत नाहीत.”
“मग? हे सगळ्या फिल्ड्स मध्ये आहे. फेस इट. सारखं कंप्लेंट्स करून काय होणार आहे.” अभी तावातावाने बोलू लागला. पण त्याने सुरु केलंय आणि आता आपल्याला बोलायची जास्त गरज नाही म्हणून राधाला हुश्श झालं. मध्येच कॅफेमधल्या ताईंनी ट्रे मधून दोन गोल कप टेबलवर ठेवले. ‘अरे यार ह्याने दोन कॅपॅचिनो सांगितले. मला कोल्ड कॉफी प्यायची होती. शी… आता ही गरम कॉफी प्या. हे असं होतं, लक्ष नसलं की, आणि फालतू विचार करत बसलं की.’ राधाने तो कॉफीचा कप उचलला आणि अभीकडे बघून मान डोलवू लागली.
“पी ना… थंड होतेय ती” अभी अचानकच वर्तमानात आला.
“हो.. फारच गरम आहे ना.”
“इतकी पण नाहीए. आणि तू साखर नाही घातलीस त्या… ” एवढं म्हणेपर्यंत राधाने तो कडूझार घोट घेतला होता.
“काय होतंय तुला?” अभीने स्वतःचा कप खाली ठेऊन विचारलं.
“काय.. कुठं काय? अरे मी विसरलेच हे साखर घालून देत नाहीत.”
“त्या-बद्दल नाही… जनरलच. हरवल्यासारखी असतेस, काही दिवस बघतोय मी. ते मॅगझिनचं फार टेन्शन घेतलंयस का? की वेगळं काही आहे?”
“अं… हो.” राधाने उगाच सारवायचा प्रयत्न केला. “माझी स्टोरी अजून पूर्ण नाही झालीय ना… तर मला जरा टेन्शनच आलंय.”
“वेडी आहेस का? कशाचंही काय टेन्शन घेतेस. एवढं काही नाही… लिहून पाठवून दे. मला पाठव हवं तर आधी, मी proofread करून देतो तुला. आणि त्यांनी सिलेक्ट केलं तर केलं नाही तर नाही.. फेसबुक वर टाक. जास्त लाईक्स येतील.”
“हं… बरोबर आहे तुझं… मी उगीच टेन्शन घेतेय.”
“बरं… संपव ती कॉफी. मला डान्स प्रॅक्टिसला जायचंय.” अभी फोनमध्ये बघत म्हणाला.
“ओह.. हां हां… कुठली-कुठली गाणी फायनल झाली?”
“कसलं काय… सम्या आणि पांडेमध्ये एकमत होईल तेव्हा.”
“ओह… ऐक ना… मला हे संपत नाहीए.. आपण निघूया. तुलाही लेट होतोय.”

कॉलेजचं गेट-टू-गेदर- ‘स्पंदन’ जवळ आलं होतं. प्रत्येक ब्रांचची जय्यत तयारी सुरु होती. आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमात, दुसऱ्या दिवशी मॅगझिन लाँच होतं. राधाची स्टोरी सिलेक्ट झाली तर स्टेजवर सगळ्या लेखक-लेखिकांसोबत उभी राहून तिचाही फोटो येणार होता. मागच्या आठवड्यात थोडंसं काहीतरी लिहून तिने draft पाठवला होता. पण त्यावर मेघनाचा काही रिप्लाय आला नव्हता. पण ह्या आठड्यात तिची स्टोरी बऱ्यापैकी रंगात आली होती. आता अचानक हॉस्टेलमध्ये जाऊन कधी एकदा ती पूर्ण करतेय असं तिला झालं होतं.

अभी कॅफेमधून सरळ प्रॅक्टिसला गेला त्यामुळं राधा शेअर-रिक्षातून हॉस्टेलला आली. रूममध्ये येऊन तिने लॅपटॉप उघडला, आपली वर्ड-फाईल उघडली. चिठ्ठ्या-पत्रं पाठवून झाल्यानंतर शेवट त्यांच्या भेटीवर करायचा असं तिने ठरवलं. नुसतीच भेट नाही तर कन्फेशन!

‘आपल्या गोष्टीतल्या नायिकेला तिने सुंदर साडी चढवली, तिच्या लांबसडक केसांची वेणी घालून सोनचाफ्याची दोन फुलं माळली. भिंतीवरच्या छोट्या आरशात पाहून तिने कपाळावर लहानशी टिकली लावली. कपाटातलं बाबांचं अत्तर थोडंसं मनगटावर चोळलं. “सीमाकडे चालले”, म्हणून आईला खोटं बोलून ती बाहेर पडली. तिच्या मनात थोडीशी भीती होती, पण खूप जास्त उत्सुकता आणि उत्साह. तो दुसऱ्या गावावरून येणार होता, त्यामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं इकडे-तिकडे होईलच ह्याची तयारी तिने ठेवली होती. खूप काही बोलायचं होतं, खूप काही ऐकायचं होतं. पत्रातून त्याने एक फोटो पाठवला होता त्यामुळं ओळखणं तरी थोडं सोपं होतं. बस-स्टॅन्ड पासून थोड्या दूर असणाऱ्या हॉटेलात ती जाऊन बसली. कोणी ओळखीचं नाही ना ह्याची एकदा तिने खात्री करून घेतली. दोन टेबल सोडून बसलेली एक व्यक्ती एकटक आपल्याकडे बघतेय हे तिला जाणवलं. उगाच पर्स मध्ये काहीतरी शोधायचं नाटक करून तिनेही दोन कटाक्ष त्याच्याकडे टाकून घेतले. तो उठला आणि सरळ येऊन तिच्या समोरच्या खुर्चीत बसला. “सुंदर!” त्याच्या तोंडून नुसताच एक शब्द बाहेर पडला. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, आणि लगेच नजर खाली वळवली….’

लिहिता लिहिता राधाला कळलं नाही की कधी नायिकेच्या जागी ती स्वतःला इमॅजिन करत होती आणि त्याच्या जागी आर.पीला, जणू तीच साडी नेसून त्या हॉटेलात गेली होती आणि आर.पी स्वतःच्या प्रेमाची कबुली देणार होता. इतक्यात फोन वाजला. आई पण ना! नको त्या वेळी फोन करते. आणि कधी मी आठवण येतेय म्हणून फोन केला तर उचलत नाही.
आईशी फोनवरचं बोलणं थोडक्यात आवरुन तिने फोन कट केला. फोन बाजूला ठेवता ठेवता, फेसबुकचं नोटिफिकेशन दिसलं.
Omg! Omg! त्याचा रिप्लाय आला होता.
‘Hey, sorry for the late reply, I am not a frequent user. It’s amazing to know that you got my silly chits and I somehow inspired you! Would like to hear more from you, if you are not already angry and given upon me.’
थोडावेळ स्वतःतच खुश होऊन तिने त्याला रिप्लाय केला, “If you are not really frequent Facebook  user then how will you hear more from me?”
प्रश्नाचा रोख समजून त्याने एक फोन नंबर पाठवला, आणि खाली लिहलं, “Whenever you feel ready, ping me on Whatsapp!”
राधाने नंबर सेव्ह केला, पण डेस्परेट वाटू नये म्हणून लगेच मेसेज नाही केला. आज लवकर झोप लागणार नाही हे तिला आत्ताच लक्षात आलं होतं, पण ती आज त्याला मेसेज करणार नव्हती. खुश होऊन तिने पुढची स्टोरी पूर्ण केली.
स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायला म्हणून ती पिंट्याशी गप्पा मारायला गेली. तिथे पिंट्याची बडबड ऐकून झाल्यानंतर दोघी मेसमध्ये जेवायला गेल्या. आज उत्साहात राधा नेहमीपेक्षा थोडं जास्त आणि अजिबात कुरकूर न करता जेवली. रूममध्ये येऊन दुसऱ्या ब्रांचच्या आपल्या रूममेटशी देखील गप्पा मारल्या. रात्री आडवी होऊन फेसबुकवर त्याला अजून थोडं स्टॉक केलं. शेवटी न राहवून WhatsApp उघडलं आणि मेसेज केला.
“Hi, Radha here!”


राधाची छाती धडधडत होती. त्या दारासमोर जवळ जवळ मिनिटभर उभी राहून तिने विचार केला आणि बेल दाबली.
“हाय!” एका मध्यम उंचीच्या, मध्यम बांध्याच्या, रणबीर कपूरसारखी दाढी ठेवलेल्या, पहिल्या लुक मध्ये attractive वाटणाऱ्या मुलाने दरवाजा उघडला. घरातल्याच बर्मुडा-आणि-T-शर्ट वरून तरी तो म्हणत होता ते अगदीच कळून येत होतं. “He doesn’t at all like to go out”
राधाला खरंतर असं येण्याबद्दल जरा शंका येत होती. पण तिचं अस्वस्थ मन तिला बसू देत नव्हतं. पिंट्याला सांगितलं असतं तर तिने रूमच डोक्यावर घेतली होती. पण तिला रॉनीला भेटायचं होतं. आपल्याला वाटणाऱ्या फीलिंग्स त्याला भेटल्यानंतरही सेमच राहतात का हे तिला बघायचं होतं. कारण तसं असतं तर तिच्या आत्ताच्या आयुष्यात खूप सारे बदल होणार होते. काही गोष्टी विस्कटणार होत्या. काही गोष्टींची घडी बसणार आहे की नाही हे काही माहित नव्हतं. नुसतीच uncertainty. पण तीच गोष्ट आत्ता excite करत होती. ती अनिश्चितता, ती उत्सुकता.
आणि तो समोर उभा होता, हसऱ्या चेहऱ्याने. तिची धडधड अजून वाढली. त्याला प्रत्युत्तर म्हणून “हाय” करायचं पण ती विसरली.
“तू राधिका ना?”
“um.. राधा”
“ओह येस, येस… राधा! सॉरी आय एम बॅड विथ नेम्स! आत ये ना.”
“अं.. हो…”
घर बऱ्याच वर्षांपूर्वीचं वाटत होतं. पावसाळ्यात भितींना ओल येऊन गेल्यानंतर येतो तसा वास पसरला होता. रूममध्ये सगळीकडे पुस्तकं पडली होती.  कोपऱ्यात सिगारेटची थोटकं पडली होती. टेबलजवळ painting स्टॅन्ड होता, आणि त्याला लावलेल्या Canvas वर चित्र-विचित्र रंगीत शेप्स काढले होते.
“तू painting पण करतोस?”
“ओह… ते… इट्स जस्ट ए टाईमपास हॉबी. कधी काही सुचत नसलं की रंग घेतो आणि काहीतरी करत बसतो.”
खूपच आर्टिस्टिक मुलगा वाटतोय हा!
जुनाट एका सोफ्याकडे हात करून “बस ना” असं त्यानं सांगितलं. राधा थोडीशी अंग चोरून बसली.
“Something to drink? Beer?” त्याने ऑफर केलं.
“बिअर?” राधाने डोळे विस्फारले.
“ओह.. ओके सॉरी… मी विसरलो तू अजून कॉलेजमध्ये आहेस. बरं कॉफी-चहा? मी कॉफी चांगली बनवतो.”
“आत्ता नको काही…”
भिंतीला टेकून उभा राहत तो तिच्याकडे बघून म्हणाला, “मला अजूनही बिलिव्ह होत नाहीए की त्या चिट्ठी वरून तू मला शोधून काढलंस. You are truly genius!”
राधा हसून म्हणाली,”मला पण बिलिव्ह नाही होत आहे कि त्या चिट्ठीवरून मी अगदी इथपर्यंत आले. इट्स रिअली स्ट्रेंज!”
“मी गेल्या काही वर्षांत नवीन फ्रेंड्स नाही बनवलेयत, but look at the turn of events, I got such a pretty friend!”
कॉम्प्लिमेंटला कसं रिऍक्ट करायचं न कळल्यामुळं, राधा थोडीशी ओशाळून हसली.
“No… I mean it! You look beautiful! मी खरंच चांगला चित्रकार असतो तर मी तुझं पोर्ट्रेट काढलं असतं. That curly hair, and button nose… really…”
राधाने खाली बघून स्माईल करत उगाच एक बट कानामागे सारली.

“बरं…” त्याने प्लास्टिकची एक खुर्ची तिच्यासमोर ओढली आणि त्यावर बसला. “बोल मग… तर तुला Writer व्हायचं आहे का?”
“नाही… असं काही नाही… म्हणजे मला लिहायला आवडतं… वाचायला आवडतं?”
“अच्छा… काय काय वाचलंयस?”
“बापरे… अवघड प्रश्न आहे हा…”
“इतकं वाचलंयस का?”
“नाही.. पण अगदी ‘Viva’ ला बसल्यासारखं वाटलं. ”
“हाहा…नाही नाही मी सहज विचारलं…” हसताना त्याला छोटीशी खळी पडली. Omg! Is he gonna kill me or what! राधा मनात म्हणाली.
“But you are funny.. I like that!”
असं म्हणत तो जागेवरून उठला. आणि टेबलजवळ जाऊन त्याने एक पुस्तक उचललं. “कुणाची पुस्तकं वाचलीयस तू?”
“मी मोस्टली मराठी मधेच वाचलंय.. थोडंफार इंग्लिश वाचलंय… म्हणजे ‘हॅरी पॉटर’ वगैरे..”
“ओह… म्हणजे मग तर तू अजून लहान आहेस… क्युट आहेस पण लहान आहेस…”टेबलजवळ घुटमळत तो म्हणाला. थोडं सर्च केल्यासारखं करून त्याने दुसरं एक पुस्तक उचललं.
आणि तो येऊन तिच्या पलीकडे बसला. पुस्तक चाळून त्याने एक पेज उघडलं. ते तिच्यासमोर धरून म्हणाला, “हे वाच.”
राधाने त्या पेजवरून नजर फिरवली. साधारण तिला कळलं कि त्यात काय लिहलं होतं… तिच्या तोंडून निघालं, “बापरे!”
“बापरे?, ही काय रिऍक्शन आहे? तू वाचलंस..”
“सगळं नाही… पण मला कळलं कशाबद्दल आहे हे..”
“हाहा.. You are so innocent!” असं म्हणत त्याने तिच्या मांडीवर हात ठेवला. “This is also writing… and you should read this too… to open your mind!”
“हो… पण मला असलं वाचायला आवडत नाही…” ती थोडी बाजूला सरकून बसली.
त्याने तिच्या चेहऱ्याकडे वळून पाहिलं. आणि तिच्या डोळ्यांत आपली नजर स्थिर करून म्हणाला, “बॉयफ्रेंड आहे?”
अडखळत राधाने उत्तर दिलं, “हो!”
“Kiss करतो तो तुला?”
“What?”
“म्हणजे करतो… हो ना?”
“त.. त्याचा काय संबंध?”
“करतेस तेच लिहायचं… थोडं अजून इमॅजिनेशन टाकायचं त्यात…” त्याने मांडीवरचा हात काढून सोफ्यावर मागे टाकला आणि तिच्या बाजूला झुकून तो म्हणाला, “हेच वय आहे… हे सगळं करायचं…” त्याने दुसरा हात तिच्या गालांवर फिरवला.
राधा आता घाबरली होती. तिला काय करावं कळत नव्हतं. काहीतरी विचार करून ती ताड्कन उठून उभी राहिली.
“काय झालं?”
“अं… बाथरूम? मला बाथरूमला जायचं आहे. तू तोपर्यंत कॉफी करतोस?” वाक्य संपवून तिने त्याच्याकडे हसत पाहिलं.
“हो.. आणि बाथरूम तिकडे आहे.” तो देखील थोडासा खुश झाल्यासारखा वाटला.
ती बाथरूममध्ये घुसली. तिथे लावलेल्या प्लॅटिकमधल्या छोट्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघून तिला जोराचा हुंदका आला. पण तिने तो दाबला. थँक गॉड फोन खिशातच होता. पण तिला कळत नव्हतं कि तिने कुणालाही फोन करावा कि नाही. तिने चेहऱ्यावर थोडं पाणी मारलं. त्या छोट्या आरशात बघत मनाशी काहीतरी ठरवलं… आणि फोन कानाला लावून ती बाथरूम मधून बाहेर पडली. तो अजून किचन मध्ये होता, ती पटकन बाहेरच्या खोलीत आणि दार उघडू लागली. लाकडी दार उघडताना आवाज झाला, तसं तिने फोनवर बोलायला सुरुवात केली.
“अरे… तू आलायस का? हो हो.. अरे येतेय मी. नाही तिथून थोडं आत यायचं आहे.. डाव्या साईडला.”
दाराचा आवाज होताच रॉनी बाहेर आला. “काय झालं?”
“हो आलेच..” फोनवर बोलून फोन बंद केल्याचं नाटक करत राधाने फोन खिशात ठेवला. “Actually, माझा बॉयफ्रेंड लवकरच आला न्यायला… त्यामुळं मला जावं लागेल.” त्याच्याकडे पाठ न फिरवता राधा पटकन दारातून बाहेर गेली. तशीच मागे मागे पायऱ्यांपर्यंत गेली आणि त्यांनतर मागेही न वळून बघता पटापट पायऱ्या उतरत तिथून पळाली.
रस्त्याने चालता चालता तिच्या डोळयांत पाणी येत होतं. तिला जोरात ओरडून रडायचं होतं. तिला स्वतःचा राग येत होता. तिला त्याचा राग येत होता. खूप वेळ दिशाहीन चालल्यानंतर तिला एक बेंच दिसला. पायातली सगळी शक्ती गेल्यासारखी ती त्यावर मट्कन बसली. स्कार्फमध्ये तोंड दाबून तिने रडून घेतलं.

अखेर राधाला वाटलं होतं तसंच झालं, काही क्षणांतच तिच्या आयुष्यात खरंच बदल झाला होता… काही गोष्टी विस्कटल्या होत्या… काहींची घडी कधीच बसणार नव्हती.

मोठा श्वास घेऊन तिने स्वतःला सावरलं. थोडावेळ बसून शांत झाल्यानंतर ती उठणार इतक्यात, तिच्या डोक्यावर काहीतरी पडलं… बेंचच्या मागच्या झाडावरचं ‘चाफ्याचं फूल.’