Posts by Dureghi

गोजिरी

आज पहाटे-पासूनच घरं-दारं दिव्यांच्या रोषणाईत चमकत होती. दारात सुंदर-सुबक रांगोळ्या काढल्या जात होत्या. घराघरात उटणं, बदामतेल आणि मोती साबणाचा सुगंध दरवळत होता. चिल्ल्या-पिल्ल्यांची किलबिल आज लवकरच चालू झाली होती. कुणाच्या घरी घाई-गडबडीत करायच्या राहिलेल्या बेसनाच्या लाडवांची बांधणी चालली होती, कुणाच्या घरी शुचिर्भूत होऊन एखादे आजोबा पूजा मांडत होते, कुणाच्या घरी ७ च्या सूर्याला किलकिल्या डोळ्यांनी नमन करत दिवाळी-पहाट सुरु होत होती.

पण ह्या सगळ्याचं ‘गोजी’ ला काय? ती नेमाप्रमाणे पोलीस-स्टेशनच्या कुंपणाच्या आत एक कोपरा धरून, गाठोडं उशाशी घेऊन झोपली होती. ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’ असा त्यांचा बाणा असल्यामुळे की काय त्यांच्यावर विश्वास ठेऊन ती रोज रात्री इथे येऊन झोपत असे. आधी कधीतरी, गावाच्या बस-स्टॅण्डवर झोपायची, तिथं… तिथं काय काय घडलं काय माहित!एकट्या बाईला कोणी कुठे थारा देतं का? ‘गोजी’ असली तरी ‘बाई’ च ती शेवटी.

पण इकडे देखील तो तिला शोधत आलाच. पोलीस-स्टेशन जवळ असून सुद्धा, त्याला ती सापडली. काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा. तो गुरगुरत, भयानक टोकदार दात दाखवत, जीभ बाहेर काढून, लाळ टपकत थोड्या अंतरावर उभा होता. गोजी पळू लागली. जंगलात. झाडांमागे लपत ती पुढे जाऊ लागली. पळून पळून तिच्या पायातली शक्ती गेली होती. तिला तहान लागली होती. पण ती थांबू शकत नव्हती. तो मागेच होता. गोजी घाबरून मागे सुद्धा बघत नव्हती. तिला माहित होतं की त्याच्या लाल भयानक डोळ्यांत पाहिलं तर ती पूर्ण गोठून जाणार आणि तो तिच्यावर झडप घालणार. सगळी ताकद एकवटून ती पळू लागली, मोठ्ठी झाडं आणि त्यांचा खाली पडलेला पाचोळ्याचा ढीग, त्यातून पाय काढत पळता-पळता एका झाडाच्या मुळात ती अडखळली आणि पाचोळ्यात फस्सकन पडली. स्वतःला सावरून उठणार तेवढ्यात, कुत्र्याने झप्पकन तिच्यावर झेप घेतली. गोजीने डोळे गच्च मिटून घेतले.

“ए, उठगोजे.” कुणाची तरी लाथ तिच्या पायाला लागली. थरथरत्या पापण्या हळूच वर करून तिने पाहिलं, हवालदारीण बाई काठी घेऊन उभ्या होत्या.

“उठतीस का नाही? काय पाहिजे एक पेकाटात?” म्हणून त्यांनी काठी दाखवली. “चल, दिवाळीचं आवरायचं आहे आम्हाला इथलं. निघ.”

आज हवालदारीण बाई काठपदरी साडी नेसून आल्या होत्या. पोलीस-स्टेशन समोर रांगोळी काढायची म्हणून लवकर आल्या होत्या. गोजी आपलं गाठोडं घेऊन उठली. आणि पायात झिजलेलं पॅरागॉन चढवून पाय घसटत निघाली. पलटून हवालदारीण बाईकडं बघून ओशाळं हसली. तिच्या मनातआलं होतं, बाईंना सांगावं, “आज लिपिष्टिक लावून झाक दिसलायसा. ” पण ती बोलली नाही. गोजी बोलत नसे, अगदी थोडकं, गरजेपुरतं. १-२ शब्दांची वाक्यं. त्यापेक्षा जास्त बोलायला गेलं, तर तेवढ्या वेळासाठी तिला कोणी जवळ तरी उभं करून घ्यायला पाहिजे.

तिथून थोडं लांब सकाळी छोटा मोठा बाजार भरत असे, तिथे जाऊन ती थांबली. वडापाव – वाल्याची वाट बघत. त्याच्या गाड्याच्या जवळच एक झाड होतं त्याच्या मागे ती बसून राहायची. तो स्कुटीवरून आपल्या सामानाच्या पिशव्या घेऊन यायचा आणि स्टोव्ह पेटवून, तेल उकळलं कि एक छोटा वडा तळायचा तो देवासमोर ठेवायचा. आणि मग दुसरा वडा तळून कागदात घालून गोजीला द्यायचा. आणि आपल्या बसक्या आवाजात तिला सांगायचा, “निघ आता. गिऱ्हाईकाची वेळ झाली.”

आज खूप वेळ झाला वडापाव-वाला आला नाही. हवालदारीण बाई म्हणाल्या ‘दिवाळी आहे’, म्हणून आला नाही वाटतं. हवालदारीण बाईंकडं होती तशी गुलाबी रंगाची, हिरव्या काठापदराची साडी… “आपल्या वर बी चांगली दिसल” गोजीच्या मनात येऊन गेली. ‘त्याने’ आणून दिली होती एकदा, गुलाबी नव्हती, निळी होती. पण गोजीवर छान दिसत होती. उन्हाने रापलेल्या चेहऱ्यामागे कधी काळी एक गोमटा, कोवळा चेहरा होता. आगतिक होऊन स्वतःच कात्रीने कापून बारीक केलेल्या केसांची कधी काळी चोपून वेणी बसत असे. ‘त्या’ वाल्या गोजीवर छान दिसत होती ती निळी साडी. घरी मोठा आरसा नव्हता म्हणून त्याला घेऊन ती देवळात गेली. देवाला नमस्कार करायचं सोडून तिथल्या वर लावलेल्या मोठ्या आरशात ती स्वतःला निरखून पाहत राहिली.

‘फट-फट’ जोरात तिच्या कानाखाली वाजवल्या त्याने. आणि ती भानावरआली. नवीन सुटिंग-शर्टींग चं दुकान उघडलं होतं थोड्या अंतरावर, तिथल्या पोरांनी १००० ची माळ (फटाक्यांची) लावली होती. लांबून कोपऱ्यापासून एक-एक फटाका फुटत मोठा आवाज करत आणि धूर सोडत तिच्यच बाजूला येत होता. घाबरून ती उठली. तिला कुठल्या दिशेला पळून जाऊ कळत नव्हतं. तरुण पोरं जग जिंकल्याच्या अविर्भावात त्या ठिणग्या आणि धूर पाहत थांबली होती. गोजीची उडालेली धांदल त्यांचं अजून मनोरंजन करत होती.

आपलं गाठोडं घेऊन ती तिथून कशीबशी पळाली. पुढे जाऊन देवळापाशी जाऊन बसली. पोटात गलबलत होतं. खूप वेळ वाट पहिल्यानंतर एक कुटुंब दिवाळी-दिवशी देवी चं दर्शन घ्यायला आलं. ते आत गेले आणि देवळातला पुजारी बाहेर आला आणि त्याने गोजीला हाकललं. त्याचंही बरोबरच होतं म्हणा. इतक्या मंगलमयी वेळेस, लोकांनी प्रथमदर्शन देवाचं घ्यायचं की गोजींचं भंगलेलं तोंड पाहायचं? इकडे देवळात कुटुंबातल्या बाईने देवीला कुंकू वाहिलं. अगरबत्ती पेटवून, ओवाळून स्टॅण्डमध्ये खोचली. मनोभावे नमस्कार केला. सोबत आणलेला फराळ – करंजी, लाडू, चकल्या, चिवडा – भक्तिभावाने देवीला अर्पण केला. पोरांना नमस्कार करायला लावला आणि त्यांच्या डोक्याला अंगारा लावला. कुटुंबातल्या पुरुषाने मग नमस्कार केला, स्वतःला अंगारा लावला. कुटुंब बाहेर येऊन स्कूटर वर बसलं आणि देवळाबाहेर थांबलेल्या गोजीला वळसा घालून निघून गेलं.

गोजी धीटपणा करून पुन्हा देवळाच्या आवारात गेली. पोटात पडलेली आग आपसूक धीटपणा शिकवते. “खायला दे!” अशी जोराची हाक तिने दिली. देवीने सद्बुद्धी दिली की काय म्हणून, पुजाऱ्याने एक लाडू आणून तिच्या हातात टाकला. “चल आता चालती हो!” म्हणून हात उगारला. गोजीने तो लाडू झपकन मागे लपवला आणि तिथून पळाली. बाहेर येऊन एक कोपरा पाहून बसली. हातातल्या लाडवाकडं निरखून पाहू लागली. बेसनाचा लाडू! नेहमी फक्त खोबऱ्याचा तुकडा मिळतो देवळात मागितला की, आज देवीच्या घरी पण दिवाळी आहे वाटतं. लाडवाचा छोटा छोटा तुकडा करून गोजी नंबराच वेळ तो लाडूच घळला. मग तिथून उठून दुसरीकडे निघाली.

तिचा दिवस असाच असतो साधारण. एका ठिकाणी बसायचं, थोड्यावेळानं उठायचं आणि चप्पल घसटत दुसरीकडं जायचं. खायला मागण्यासाठी ती कधीघरांच्या गल्ल्यांमध्ये फिरायची नाही. तिथं जोगवा मागणाऱ्या बायका जातात. देवाच्या बायका त्या. गोजीला असं दारात कोणी उभं करून घेणार नाही. तिला कुठल्या देवाने धाडली नव्हती, पैसे/तांदूळ दिले नाही तर शाप देण्याची शक्ती तिला देवाने दिली नव्हती.  ती आपली खानावळीबाहेर, मेवाड-प्रेमच्या गाड्या-जवळ अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन थांबत असे. गिऱ्हाईक जाऊ नये म्हणून कोणी तरी पट्कन तिच्या हातात काहीतरी देऊन तिला पिटाळत असे. मग जो काही तुकडा मिळालाय तो घेऊन एखादा निर्मनुष्य कोपरा धरायचा. हातातलं खायचं आणि तिथेच डुलकी काढायची किंवा उठून चालत गावभर प्रदक्षिणा घालायची.

गोजीच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस फारच मोठा असतो. सरता सरत नाही. अजून कसलं देणं बाकी होतं तिचं इथं की काळ पण घेऊन जात नव्हता. तिनं पत्नी-धर्म निभावला नाही बहुतेक, म्हणून असावं असं. की आई-बापाचं निमूटपणे ऐकलं नाही म्हणून असावं? बाईनं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करून संसार ओढायचा असतो, हे गोजीच्या मंद-बुद्धीला कुठून समजणार? आपलं बाई असणंच तिला खूप उशिरा समजलं होतं. घरी येणारा लांबचा चुलता तिला कुठं कुठं हात का लावतो ह्याचा उगम तिला कधी नीट झालाच नाही. रस्त्यानं येता-जाता पोरं शिट्टी का वाजवतात हे तिला कळलं नाही. घरात एक फुटका आरसा भिंतीत बसवलेला होता, त्यात बघण्या इतकी तिची उंची नव्हती. नाही तर ती दिसायला चांगली आहे, म्हणून शेजारचा मुलगा तिच्याकडे बघून हसतो हे तरी तिला कळालं असतं. असंच काही न कळता ती ‘कळत्या वयाची’ झाली. मग एक दिवस कोणीतरी लंगडत्या पायांचा माणूस घरी आला, सोबत ४ बायका – बापडे होते, गोजीला चांगली कापडं घातली होती आणि तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. बायको म्हणून तिची काय कर्तव्य होती हे तिला कोणी कधी सांगितलं नाही, सांगितलं असलं तरी तिच्या अर्धवट मेंदूत ते शिरलंच नसेल. मग तिला आपली जबादारी जमत नाही म्हणून त्याने लाथा घातल्या आणि मुस्कटात लगावल्या तर कुठं चुकलं? हिने लगेच पळून जायचं घरातून? देवाच्यासाक्षीनं गळ्यात बांधलेल्या नवऱ्याला टाकून तिथून सुटली म्हणून तिलाही ‘जगण्याची’ शिक्षा मिळाली असावी.

पण गोजीसाठी आता ते सगळं पुसट झालं आहे. तिच्या मनावरचे सगळे व्रण- ज्यांनी दिले- त्यांच्या चेहऱ्यांसारखेच विरुन चालले आहेत. काही दिवसांपूर्वी आईचा चेहरा आठवत होता तिला, पण आता कधी डोळे बंद केले तर तिची नुसती आकृतीच दिसते तिला. तिची आई जीवंत आहे की नाही माहित नाही, पण गोजीच्या स्मृतीतून ती झिजत चालली आहे.ते एक बरं केलंय देवानं, बुद्धी कमी दिली. जास्त दिवस काही टिकत नाही मेंदूत, म्हणून मागे खाल्लेल्या ठेचांचा हिशेब ठेवून डोकं खराब होत नाही.
फक्त हा काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा! हा काही पाठ सोडत नाही. आता एवढ्या लांब ह्या पडक्या घरात ती येऊन बसली, तरी तिचा माग काढत तो आलाच. तो गुरगुरत उभा राहतो आणि त्याचं ते हिडीस तोंड बघून गोजी एका ठिकाणी गोठून जाते. तिची शक्ती निघून जाते. ती हतबल होऊन तिथे पडून राहिली आणि डोळे गच्च मिटून घेतले. तो तिच्या जवळ आला. त्याचा तोंडातून टपकणारी लाळ गोजीच्या गालावर पडली. एक थेंब, दोन थेंब, तीन थेंब… मोठी धारच लागली.

सपसप पावसाच्या धारा सुरु झाल्या आणि गोजी जागी झाली. देवळापासून चालत चालत ती ह्या कमानी-पाशी कधी येऊन बसली आणि कधी तिचा डोळा लागला तिला आठवतही नव्हतं. जवळचं एक झाड शोधून त्याच्या आडोश्याला ती उभी राहिली. मातीचा सुंदर वास सुटला होता. गुदमरलेल्या ढगांना शेवटी वाटमोकळी झाली होती. पानांच्या आडून पाऊस अधे-मध्ये गोजीला भिजवत होता. टप-टप थेंबांनी झाडा समोर एक छोटं तळं बनवलं. गोजीने उजव्या हाताला पाहिलं, अचानक तिला लहानगी गोजी तिच्याकडे येताना दिसू लागली. लहानी गोजी कागदाची होडी घेऊन आली. त्या तळ्यात तिने ती होडी सोडली. डुलत डुलत जाणारी होडी पाहायला ही मोठी गोजी देखील चवड्यावर बसली. लहान गोजी हसत होती. होडीला वेग देण्यासाठी पाणी ढकलत होती. फस्सकन!! अंगावर मातकट पाण्याचा फवारा उडाला! आणि गोजी पुन्हा ह्या जगात आली. तळ्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवून, धूम-धूम आवाज करत ती बुलेट नजरेआड सुद्धा झाली. आता हा संकेत होता तिथून उठून दुसरीकडे जाण्याचा. आडोसा शोधत शोधत गोजी दुसऱ्यादिशेला निघाली. पाऊस निवळला पण गोजी चालत राहिली. दिवस संपता-संपता ती एका गल्ली पाशी आली.

अंधार होऊ लागला तशा घराबाहेर दिव्यांच्या रांगा उजळू लागल्या. आकाश दिव्यांचारंगी-बेरंगी उजेड अंगणात वाऱ्याबरोबर नाचू लागला. तो झगमगाट पाहत गोजी कधी त्या कॉलनीमध्ये शिरली तिलाही कळलं नाही. एका घराबाहेर लहान मुलं फुलबाजे उडवत होते. त्यांच्याहसण्याचा किलबिलाट आणि फुलबाज्यांच्या सुंदर नक्षीदार ठिणग्या नजरेत भरून घेत ती थांबली. फुलबाजे संपले तशी गोजी त्या मुलांच्या नजरेस पडली, आणि तिचं अंधारातलं रूप पाहून ती पोरं किंचाळत घरात पळाली. “कोण आहे?” असं दरडावत एक पुरुष बाहेर आला. “एचल!” असं म्हणून त्याने हात उगारण्याचा इशारा गोजीला केला. ती मुकाट्याने तिथून निघाली. आता मात्र ती कुठे रेंगाळत थांबली नाही. मध्येच पोटातल्या कावळ्यांनी कलकलाट सुरु केला. सकाळी फक्त एक लाडूच मिळाला होता आज.

थोड्या अंतरावर एक घर दिसत होतं तिथं आकाशकंदील लागला नव्हता की लायटिंगची झगमग नव्हती. नुसता पोर्चवरचा बल्ब लागलेला होता.  त्या घराच्या कुंपणा पाशी ती गेली. गोजीला वाचता येत असतं, तर घराबाहेर लावलेली नावाची आणि पुढे असलेल्या PhD, MSc वगैरे पदव्यांची पाटी तिने वाचली असती. पण तिला त्याच्याशी कुठे देणं-घेणं होतं? फाटकातून आत पाहिलं, तर पोर्चमध्ये एकच तेलाची पणती चमकत होती. बारीक आवाजात रेडिओ वर लागलेलं गाणंही ऐकू येत होतं, “मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार… तू वेडा कुंभार…” म्हणजे घरात कोणीतरी आहे.

गोजीने “खायला वाढा” अशी जोरदार हाक दिली. कोणी बाहेर आलं नाही. धाडस करून गोजीने फाटक उघडलं आणि कुंपणाच्या आतल्या बागेत मधोमध उभे राहून अजून एक जोरदार हाक दिली, “खायलावाढा.”

“कोण ए?” असा वैतागलेला एक प्रश्न दारातून आला आणि मग कपाळाला आठ्या घातलेले एक आजोबा बाहेर आले. त्यांनी गोजीला पाहून कानातलं मशीन घातलं आणि विचारलं, “काय पाहिजे?”

“बाईस्नी सांगा. खायला दे.”

“कोण बाई नाही घरात.” असं अजून एक वैतागलेलं वक्तव्य करून काहीतरी पुटपुटत आजोबा घरात गेले.

गोजी मागे वळली. घरात बाई नाही, हा चिडका म्हातारा काय देणार तिला. ती फाटकातून बाहेर पडणार तेवढ्यात मागून आवाज आला. “थांब! हे घेऊन जा.” असं म्हणून एक बॉक्स त्यांनी बाहेर आणून ठेवला. “फराळ पाठवून उपकार करतायत. कशाला? आणतो की माझं मी मला पाहिजेते…” असं काहीसं पुटपुटत आजोबा आत जाऊ लागले. गोजी नं तो बॉक्स उघडला, त्यातली चिवड्याची पिशवी दातांनी फोडली, आणि हातात चिवडा घेऊन ती त्याचा बकाणा भरू लागली.

आजोबांनी मागे वळून पाहिलं आणि हातवारेकरत तिच्याजवळ आले. “अगं, अगं… कसं खाते आहेस? थांब मी ताट घेऊन येतो.”

गोजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बकाणा भरत उभी राहिली. थोड्याच वेळात आजोबा ताट आणि कात्री घेऊन आले. फराळाच्या एक एक पिशव्या कापून ताटात ओतून त्यांनी व्यवस्थित वेगवेगळे वाटे केले. न राहवून एक बुंदीचा लाडू आपण ही खाऊन घेतला. “इथं बस आणि खा. उरलेलं घेऊन जा. थांब पिशवी आणतो.” म्हणून त्यांनी गोजीला पोर्चवर बसायला सांगितलं. काही मिनिटांनी ते एक मोठी पिशवी आणि पाण्याचा तांब्या घेऊन आले.

“जाताना ते फाटक नीट बंद कर.” असं म्हणून ते आत गेले आणि त्यांनी दार बंद करून घेतलं.

कित्येक दिवसांनी गोजीचं पोट तुडुंब भरलं. तांब्यातून थंडपाणी पिऊन तिच्या शरीरातल्या पेशी जणू भिजून स्वच्छ झाल्या. तिने नीट ताट आणि तांब्या दारा जवळ सरकावून ठेवला. बॉक्स एका कोपऱ्यात ठेऊन दिला आणि पिशवीत उरलेल्या गोष्टी घालून ती निघाली. सांगितल्याप्रमाणे फाटक नीट बंद करून बाहेर पडली.

घड्याळाचा काटा पुढे सरकला. हळू-हळू काही घरांच्या बाहेर लागलेल्या लायटिंगच्या माळा बंद झाल्या. पणत्या, मेणबत्त्या, दिवे विजले. आजोबांच्या घरातल्या लाईट्स देखील बंद झाल्या.

गोजी कुठे गेली नव्हती. थोडंसं लांब जाऊन सगळं सामसूम व्हायची वाट बघत होती. ती फाटक उघडून पुन्हा आजोबांच्या बागेत शिरली. थोडं इकडे तिकडे फिरून, आजोबा जागे तर नाहीत ह्याची खात्री केली. मग तिने भिंतीला लावलेला मोठा झाडू घेतला आणि खाली पडलेला झाडांचा पाचोळा गोळा करायला सुरुवात केली. थोडं-थोडं करत बागेच्या एका कोपऱ्यात पाचोळ्याचा मोठा ढीग बनला. एकदा फिरून तिने संपूर्ण बागेकडे पाहून घेतलं, बाग स्वच्छ झाली होती. तिने झाडू भिंतीला टेकवून ठेवला आणि जाण्यासाठी वळली तेवढ्यात फाटका जवळ तिला तो दिसला.
काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा. तो गुरगुरत तिच्याकडे येऊ लागला. गोजी थबकली. पण ह्यावेळेस गोठून नाही गेली. कदाचित पोटभरलेलं असल्यामुळं तिला आज पायात ताकद जाणवत होती. तिने मुठीवळल्या आणि त्याला टक्कर द्यायला ती सज्ज झाली. त्याने आपले भयानक दात दाखवत तिच्यावर झडप घातली, पण जवळच्या झाडूने तिने त्याला उलटं पाडलं. तिथला एक मोठा दगड पूर्ण शक्ती निशी उचलला आणि त्या कुत्र्याच्या अंगावर फेकला. त्याचं डोकं ठेचलं गेलं आणि तो निपचित पडला. गोजी दबक्या पावलाने त्याच्या पाशी गेली, गोल फिरून तिने त्याला तपासलं. तो बेशुद्ध पडला होता. त्याचे पायधरून ओढत आणून त्याला गोजीने पाचोळ्याच्या फेकलं. मग पोर्चवरची पणती आणली आणि तो ढीग पेटवला.

काळ्या रंगाचा, लाल डोळ्यांचा कुत्रा त्या आगीत जळू लागला. गोजीला गगनभर आनंद झाला. हात पसरून आकाशाकडे बघत तिने गोल-गोल गिरक्या घेतल्या. आणि त्या जळणाऱ्या ढीगा जवळ मट्कन बसली. आगीच्या उबीने तिचे डोळे हळू हळू मिटू लागले. मिटता मिटता एक पुसटशी आकृती तिच्या जवळ येताना तिला दिसली. मगाशी ची लहानगी गोजी, कागदाची होडी घेऊन आली. आभाळाकडे नजर लावून जणू पावसाची वाटत पाहत गोजीला खेटून बसली. दूर कुठेतरी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला, एक कळ सरसर करत गोजीच्या पायापासून हृदयापर्यंत गेली. पापण्या जड झाल्या. आणि जळणाऱ्या पाचोळ्याच्या ढीगाजवळ गोजी आडवी झाली.

काही क्षणांत ती तरंगत उठली. आपल्या शरीराकडे तिने पाहिलं. तिने गुलाबी रंगाची – हिरव्याकाठाची साडी नेसली होती. केसांची चोपून वेणी घालून गजरा लावला होता. गळ्यात सुंदर साज चढवला होता. तिच्या नाजूक अंगावर तो शृंगार उठून दिसत होता. वाऱ्याची एक झुळूक आली आणि गोजी तिच्या बरोबर वाहती झाली.

आज कोणी आकाशात बघितलं असतं, तर तिच्याकडे पाहून त्यांना कळालं असतं – तिचं नाव खरं तर ‘गोजिरी’ आहे. 

Golmej

 

 

एक माणूस त्याच्या आयुष्यात अनेक चर्चांमधून जातो. कट्ट्यावरच्या चर्चा, घरातल्या चर्चा, राजकारणाच्या चर्चा, क्रिकेटच्या गेमवर चर्चा, Interview मधले ग्रुप डिस्कशन्स, लग्नाच्या याद्या वगैरे वगैरे… कॉर्पोरेट ऑफिसमधल्या मिटींग्स, त्यानंतरची कॅन्टीनमधली गॉसिप ते बॉलीवूडच्या “ऍक्टर्स-राऊंडटेबल”पर्यंत सगळ्या चर्चा एकसारख्याच. त्या गोलमेजसारख्या गोल गोल, endless!

अशा अनेक चर्चांचं आपल्याभोवती आयुष्यभर जाळं विणलं जात असतं. नाईलाजाने का होईना आपण त्यांचा भाग असतो. माझ्यासारख्या काही जणांना ह्या चर्चांचा वीट येतो, एखाद्या गोष्टीचा कीस पाडत बसणं जीवावर येतं. काही लोकांना चर्चेत नुसतंच आपलं मत नोंदवायला आवडतं आणि माझ्यासारख्यांना त्यातून पळ काढावासा वाटतो. ह्या दोन्ही मध्ये संवाद साधण्याचा विसर कधी पडतो, लक्षात येत नाही. आणि संवाद हरवला की वेगळाच गुंता निर्माण होतो. त्याच गुंत्यातून स्वतःला सोडवून घेण्याचा मी प्रयत्न करतेय…

सत्र-पहिले

“तुम्हाला एक लहान भाऊ आहे आणि तुमची आज्जी त्याला वंशाचा दिवा समजते, पण तुम्हीही बंडखोर आहात आणि तिची खोड काढण्यासाठीच्या आयडिया शोधत असता, असा तुम्हाला अनुभव आहे? नाही? जाऊ दे, Only 90’s kids will get that! हीहीही…” गेले दोन सेशन्स काहीतरी तुटक उत्तरं देऊन झाल्यावर आज ‘शोभा’ने वेगळाच विषय काढला होता. त्यामुळे मीही एक फालतू जोक मारून दिला. तेवढंच टेन्शन “ease” करायला. पण जोक शोभाला फार आवडला नाही बहुतेक.

“Was that a joke Anjali?” ‘शोभा’ने माझ्याकडे थंड चेहऱ्याने पाहिलं.

मी सोफ्यावर थोडी पसरून बसले होते ती सरळ बसले. “ahem… सॉरी”

“It’s okay… जोक हा बऱ्याचदा defence mechanism असतो. मी तुला तुझ्या लहानपणाबद्दल विचारत होते. So, तुझं आणि तुझ्या आजीचं पटत नव्हतं?” शोभा जजमेंटल लुक देऊन म्हणाली. किंवा मला तसं वाटलं.

मला खरंतर असलं ‘counselling -बिनसेलिंग’ काही करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीए. ही तिसरी बाई कोण मला शिकवणार…

पण आता ‘पाणी गळ्याशी वगैरे’ म्हणतात तसं झालं होतं. मला खूप इच्छा होत असताना सुद्धा, मी निर्णय नाही घेणार आहे. कारण परत परत मला पश्चाताप नाही करत बसायचा. म्हणून मग महिन्याभरापूर्वी मी त्याला- म्हणजे माझ्या नवऱ्याला- सांगितलं, “की नाहीए आता हे शक्य होत आणि तू निर्णय घे आता.”
तर त्याने मला ह्या बाईकडे चिकटवलं. हे असले counselingचे ८-१० सेशन्स करून खरंच काय फायदा होणार आहे माहित नाही. मला तर इथं आल्याचा पण रिग्रेट वाटतोय आता. पण त्याने sort of डील केलीय, की हे सेशन्स करून जर काहीच बदललं नाही तर तो निर्णय घेईल.  माझ्यासारखाच तोही येतोय ‘शोभा’कडे, पण वेगळ्या वेळी. पैसे असे नको तिथे वाया घालवायची सवयच आहे म्हणा… जाऊ दे!

“So, तुझं आणि तुझ्या आजीचं पटत नव्हतं?” मी नुसतीच शून्यात बघत असलेली पाहून शोभाने पुन्हा विचारलं.

“अं… नाही म्हणजे तसं पटत नाही वगैरे नाही… पण ती माझ्या भावाला नेहमी favour करते. करायची I mean… आता तसा काही फार कॉन्टॅक्ट नाही… पण अगदी माझ्या जन्मापासूनच थोडासा प्रॉब्लेम आहेच. पण सध्या माझा प्रॉब्लेम तो नाहीच आहे, इन फॅक्ट तेव्हाही नव्हता… माझा प्रॉब्लेम हा आहे कि ह्या सगळ्याची चर्चा करणे.  होता प्रॉब्लेम मान्य करा आणि पुढे जा. म्हणूनच मी लहानपणीच residential school ला जायचा निर्णय घेतला होता.
घरी माझी आणि माझ्या लहान भावाची सतत भांडणं व्हायची, आणि आज्जी नेहमी त्याची बाजू घ्यायची. बाबा मलाच समजवायचे कि मी मोठी आहे, मी सांभाळून घेतलं पाहिजे. आई कधी-मध्ये एखादा धपाटा द्यायची भावाला, पण घरातल्या चर्चेचं टारगेट नेहमी मीच असायचे.” मी खांदे उडवत म्हणाले.

“तुझ्या जन्मापासून प्रॉब्लेम होता म्हणजे?” शोभाने तरीही पुढचा प्रश्न विचारला.

“म्हणजे…” मी बोलू की नको ह्यावर थोडावेळ विचार केला, पण जाऊ दे बोलून टाकू असं स्वतःशी म्हणत पुढे म्हणाले, “म्हणजे आता माझ्या बारश्याची गोष्ट बघा –”

“आल्या होत्या का त्या दवाखान्यात बघायला? मग कशाला आता एवढा मानपान करायचा?” चाळिशीला आलेली एक स्त्री तावातावाने बोलत होती.

“ह्या तुमच्या असल्या वागण्यामुळंच तिकडची माणसं चिडून आहेत.” तेवढ्याच तावाने पंचविशीतली एक स्त्री उलटून बोलली.

“काय चुकीचं वागलो आम्ही? काय नेसूचं फेडून द्यायचं होतं मग? चांगली शिकली-सवरली दुभती गाय दिली आहे.”

“अप्पा… तुम्ही काही बोलत का नाही? किती वेळा तेच तेच. तिकडं जाऊन मलाच तोंड द्यावं लागतं ह्या सगळ्याच्या परिणामांना” पंचविशीतल्या स्त्रीने साधारण ४५ वयाच्या पुरुषाकडे केविलवाणे पाहिलं.

“आता मी काय बोलणार? तुझ्या बाजूनं काय बोलायचं म्हणलं की  सारखं मी शेपूट घालून बसलो म्हणून ऐकायला मोकळा” ४५ वयाचे गृहस्थ हातातलं मासिक बाजूला ठेऊन म्हणाले.

“म्हणजे मलाच पापी ठरवा. सगळ्यांची ढुंगणं धुण्यातच आयुष्य गेलं आहे… आता तरी काय वेगळं करायचंय.” पुन्हा चाळिशीतली स्त्री.

आता ह्या चर्चेमध्ये चाळीशीची स्त्री म्हणजे मालती, माझी आज्जी. केविलवाणी स्त्री- माझी आई वनिता, आणि गृहस्थ माझे आजोबा. आणि ह्यांची हि तापलेली चर्चा ऐकत, दोन्ही हाताच्या मुठी वळून, दोन्ही पायांचा साधारण त्रिकोण करून, वर लावलेल्या घुंगुरवाळ्याकडे बघत पाळण्यात पडलेली मी. माझ्या आयुष्यात पुढे घडणार असलेल्या अनेक चर्चांपैकी एका चर्चेला अशारितीने सुरुवात झाली होती. मी जन्मल्यानंतर माझी आज्जी म्हणजे बाबांची आई, मला बघायला आली नव्हती. आता कारणं काहीही असोत, पण सगळ्यांनी माझं ‘मुलगी’ असणं हेच असणार, असं पक्कं केलं होतं. माझ्या आजोळी-म्हणजे आईच्या माहेरी, खूप वर्षांनी घरात लहान मूल जन्माला आल्याचा आनंद होताच, पण आता सासरकडच्यांना “दाखवायचं” म्हणून माझं बारसं खाजगी न ठेवता, कार्यक्रम करायचा ठरला होता. पण त्यामध्ये माई- मालती आज्जी-ला, माझ्या आज्जीचा मानपान – म्हणजेच आहेर करणे, एखादी वस्तू भेट देणे वगैरे, करायची अजिबात इच्छा नव्हती. घरातल्या काही लोकांचा ह्या गोष्टीला पाठिंबा होता, जसं कि माझा मामा. पण माऊ-म्हणजे माझी मावशी, ती मध्ये पडली.

“अगं आई, कशाला त्रागा करून घेतेयस? वर्षा-काकूने मागे नेसवलेली साडी देऊ आपण ओटीत.”

“हं… कल्पना, तुला काय वाटतं तेवढ्यावर भागणार ह्यांचं? आणि वर असलीच साडी दिली, तसलीच दिली म्हणून मापं काढायला बरं!”

“पण काहीच नाही दिलं तर कसं वाटेल ते सगळ्यांसमोर?” माऊने परत समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

“रिकाम्या हाती कुठं, ब्लाऊजपीस आणि नारळ देणार की ओटीत. सगळ्या बायकांना तेच करणार.”

“बघितलंस कल्पे… नको तिथं असा हात मागं घ्यायचा.” आई म्हणाली

“पण मी काय म्हणतो…” आजोबांनी मध्ये काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण ही चर्चा अशीच लांबणार हे मला कळलं, आणि सगळ्यांची तोंडं थोडावेळ तरी गप्प व्हावीत ह्या हेतूने मी बेंबीच्या देठापासून टाहो फोडला. फायनली सगळे गप्प झाले, माई माझ्याकडे आली, तिने मला उचललं. “काय झालं माझ्या राणूला? उगी उगी…” म्हणत माझं ढुंगण चेक केलं, आणि गरम पाण्यात फडकं बुडवून ते पुसायला घेतलं.

अखेर बारशाचा दिवस उजाडला.

बाबा लवकर आले आणि त्यांनी आनंदाने मला उचलून घेतलं, मग मी शुभ-शकुन म्हणून त्यांना अभिषेक घातला आणि ट्ट्यां करून भोंगा पसरला.

“अगं, बाप आहे मी तुझा… काही खाणार नाही तुला” असं म्हणत त्यांनी मला आईकडे दिलं.

“हुशार आहे पोर तुमची जावईबापू… आत्तापासूनच ओळखायला लागलीय ती आपली माणसं” माईने स्वयंपाकघरातून उगाच टोला हाणला.

“ही असली हुशारी तिच्या आईकडून आली असणार” बाबाही मागे हटणाऱ्यातले नव्हते.

“असलं काही नाही.. भूक लागली असेल म्हणून रडत असेल” आईने विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

हळू-हळू करून शेजार-पाजारच्या बायका जमू लागल्या. घरातले पुरुष एका खोलीत ऑकवर्ड होऊन बसले.

बाहेरच्या खोलीत बसून मला मांडीवर घेऊन बसलेली आई, येणाऱ्या बायकांना माझं मुख-दर्शन करवत होती, “सासू आली नाही होय गं?” ह्या हळूच विचारलेल्या प्रश्नाला “येतायत कि. येतीलच इतक्यात” अशी उत्तरं देत होती. आजूबाजूला होणाऱ्या गप्पा ऐकत होती. पण डोक्यात सतत कसला विचार करत होती. मी हात मारून तिचं मंगळसूत्र हातात पकडलं त्यामुळं तिचं  लक्ष माझ्याकडे गेलं. तिने आपल्या थकलेल्या डोळ्यांनी माझ्याकडं बघितलं, श्वासातच हसली, आणि हळूच म्हणाली, “तुला नाही बाई ह्या सगळ्यातून जाऊ देणार”

त्या सगळ्यांतून म्हणजे काय हे वयानुसार नंतर कळत गेलं, आणि तिनेदेखील आपला शब्द जपायचा पुरेपूर प्रयत्न केला., पण आता मात्र नुसतंच बोळकं पसरून मी हसले.

थोड्यावेळाने आज्जी आणि काकू आल्या, आत्यादेखील आली. आई मला पाळण्यात ठेऊन सासूबाईंच्या पाय पडायला गेली. सोपस्कार झाल्यावर आत्या कौतुकाने मला बघायला आली. ” अगं…  कसलं गोड आहे… चेहरा अगदी दादाच्या वळणावर गेलाय नई!”

माई आणि माऊ बाहेर आल्या. सगळ्यांनी खोटं-खोटं हसून एकमेकांना भेटून आनंद व्यक्त केला. शेवटी आज्जीला नवीन साडी नेसवली गेली, काकू आणि आत्यालाही आहेर करण्यात आला, जावईबापूंचा देखील यथासांग मानपान झाला. आणि इतके दिवस त्यांच्या नावाने खडे फोडणाऱ्या माईनेच पुढे होऊन हे सगळं केलं. कार्यक्रम सुरु झाला. मग पाळणा कुठला म्हणायचा, वरवंटा कापडात गुंडाळायचा कि साडीत, गोंविंद घ्या-गोपाळ घ्या म्हणताना उजवीकडून डावीकडे कि, पूवेकडून पश्चिमेकडे वरवंटा पाळण्यावरून कसा फिरवायचा, अशा अनेक चर्चा झाल्या. मला एकच भीती होती कि तो वरवंटा बहुतेक माझ्या डोक्यात पडणार, पण कुणाचं त्यावर दुमत न होता मला पाळण्या-बाहेर ठेवून रिकाम्या पाळण्यात हा प्रकार केला हे माझं नशीब.  शेवटी आत्त्याने कानात कुर्र्रर्र करून नाव ठेवलं – अंजली!

माझ्या नावाबद्दल अजून थोडी चर्चा केली असती तर चाललं असतं!”

“Anjali is not a bad name!” इतकं सगळं ऐकून शोभा तितक्याच थंड चेहऱ्याने म्हणाली. 

“तुम्ही ते गाणं ऐकलं असेलच ‘अंजली अंजली अंजली… प्यारी अंजली अंजली अंजली…  गल्लीतल्या पोरांचा मला चिडवण्याचा तो सोर्स होता”

“माझ्या एका मैत्रिणीचं नाव ‘फॅनीव्हेनेला निमगड्डा’ आहे” शोभा म्हणाली.

“व्हॉट! हाहाहाहा” मी फारच हसले. आता परत हि म्हणेल ‘defence mechanism’!

“पण तुला हे सगळं कसं आठवतं? म्हणजे पाळण्यातलं वगैरे?” शोभाने विचारलं

“छे, आठवत नाही… पण मी आजोळी गेल्यानंतर ह्या किस्स्याची पारायणं ऐकलेली आहेत. आणि बघा ना… माझ्या आज्जीने, घरातल्यांनी इतकी चर्चा केली आणि पुढे काय झालं, शेवटी त्यांचीच सरबराई केली ना…”

शोभाने मधेच मला तोडत विचारलं, “म्हणजे, तुझ्या आजोळच्या लोकांनी असं सांगितलं की ‘तू मुलगी आहेस म्हणून’, आज्जी बघायला आली नाही… तू विचारलंस कधी आज्जीला?”

“Umm..” एकदम कोणीतरी चपराक मारल्यासारखी मी बंद पडले.

मी काही बोलत नाही हे बघून शोभाने परत प्रश्न केला, “And when you went to the Boarding school, do you think it solved the problem between you and her?”

“I don’t know. Interaction कमी झाल्यामुळे नक्कीच थोडाफार कमी झाला, पण मी माझ्यासमोर प्रॉब्लेम वाढवून ठेवला होता.”

“म्हणजे?”

“जितक्या उत्साहाने मी बोर्डिंग शाळेत गेले तो सगळा उत्साह दुसऱ्या दिवशीच मावळला.”

“का?”

“तिथे स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतात!” मी पुन्हा एक फालतू जोक मारला. ‘Tension ease!!’

“हाहा…” शोभा थोडकं हसली.

(Phew!) पण ती पुढे काही बोलणार इतक्यात मी घाईने बोलले, “वेळ संपली वाटतं… ६.१५ झाले.” 

“Ok…” एवढंच म्हणून शोभाने वही बंद केली.


मी उठून खोलीबाहेर आले. नेक्स्ट appointment आता पुढच्या शनिवारी. परत इथे. थंड चेहऱ्याच्या शोभासमोर!

सत्र-दुसरे

“रिक्षावाल्यांच्या संप आहे कि काय?” फोन सोफ्यावर टाकून आणि माझ्या अन-मॅनेजेबल केसांत अडकलेला कंगवा काढायचा प्रयत्न करत मी म्हणाले.

“कॅब पण नाही मिळत आहे का?” त्याने पुस्तकातून डोकं काढून विचारलं.

“मला कॅबमधे मळमळ होते.”

“कार घेऊन जा मग.” त्याने चष्मा नीट करून पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. एवढं काय वाचत असतो काय माहित!

“अं… नको”

“का? भरलंय मी पेट्रोल, आणि हवा पण परवाच चेक केलीय”

“नाही… नको!”

“काय झालंय? Oh! ही माझी कार आहे, मी emi भरून घेतलीय तर आता तू ती चालवायची नाहीस असं काहीतरी ठरवलं आहेस का?” त्याने चष्म्यातून माझ्याकडे बघत विचारलं.

“कशाला वाकड्यात शिरतोयस? मी म्हणाले का तसं तुला?”

“सॉरी…! घेऊन जा… १५ दिवसांपूर्वीच सर्व्हिसिंग केलंय.”

“मला नाही जायचं तुझ्या त्या मूर्ख बाईकडे” मी थोडीशी वैतागून म्हणाले.

“अंजली… किती वेळा आपण ह्यावर बोलणार आहोत. ह्यातून काहीतरी बरोबर मार्ग सापडेल म्हणून करतोय ना आपण हे…”

ह्यावर मी काहीच बोलले नाही. तो उठून Key-holder जवळ गेला आणि गाडीची किल्ली आणून माझ्या समोर कॉफी-टेबल वर ठेवली. आणि परत आपल्या ठिकाणी जाऊन पुस्तक हातात घेतलं. काही सेकंद दोघांपैकी कोणीच बोललं नाही.

“मला आजकाल जरा anxious होतंय कार चालवताना.” मी तोंडातल्या तोंडात बोलले. काही सेकंद पुन्हा कोणी काही बोललं नाही.

तो उठला, “मी सोडतो. माझी अपॉइंटमेंट शिफ्ट करून घेता येतेय का बघतो.”

त्याने आत जाऊन आवरलं आणि शोभाकडे पोहचेपर्यंत दोघांनीही तोंडातून एक शब्द नाही काढला. हे असंच होतं निर्णय चुकतात तेव्हा…

“हे असंच होतं, निर्णय चुकतात तेव्हा.” मी गेल्या गेल्या लगेच हा इन्सिडन्स शोभाला सांगून मोकळी झाले (अर्थात,तिला मूर्ख म्हणल्याचं मी वगळलं). “आता कार, emi वगैरे काढायची काही गरज होती का?”

“बरोबर आहे. नको काढायला पाहिजे होता तो विषय. पण लगेच निर्णय चुकतात असं होत नाही. बऱ्याचदा आपण काही गोष्टी बघत नाही, म्हणून तसं वाटत.” शोभाने डोस दिला.

हे असलं ज्ञान आम्हीही पाजळत असतो, आमच्या एम्प्लॉईज समोर. कुणाला इन्क्रिमेंट मध्ये प्रॉब्लेम असतो, कुणाला प्रमोशन हवं असतं, कुणाचं कुणाच्या बॉसशी पटत नाही… ह्यावर एकच ठोकून द्यायचं, Look at bigger picture. HR च्या नावाने उगाच शिव्या नाहीत घालत लोक, आत्ता मला कळतंय हे. आणि तरीही मी देखील एखाद्या एम्प्लॉयी सारखं पुढे बरळले, “पण कधी कधी असं वाटतं की माझ्याकडे चान्स होता आणि मी तो ब्लो केला.”

“म्हणजे?”

मी MBA करत असताना घरी लग्नाचं टुमणं सुरु झालं होतं. दरवेळेस माझी बाजू घेणारी आई पण बाकीच्यांमध्ये सामील झाली होती.

“अनू, किती चांगली स्थळं येतायत. उगाच नाही म्हणून काय सांगायचं? आपल्याला विचारणारी लोकं भरपूर आहेत माहितीय ना. आणि सगळं बाजूला ठेवलं तरी तुझं वय होत चाललंय.” कोथिंबीर निवडता निवडता आई म्हणाली.

“अगं आई, वयाचा काय प्रश्न आहे? माझ्या पेक्षा मोठ्या मुलींची पण लग्नं व्हायची आहेत अजून.” मी कांदा कापून देत होते.

“दुसऱ्यांशी आता तुलना केलेली चालते तुला? इथं गावातल्या तुझ्या वयाच्या मुलींना पोरं झालीत.” बेसनाचं पीठ कालवता-कालवता मधेच थांबून आई हात हलवत म्हणाली.

“आई जाऊ दे ना नको चर्चा. बघू आपण. कधी करायचा कार्यक्रम? मी आता सुट्टी घेतलीच आहे तर बघा ह्या वेळेत जमतंय का?”

“एवढं जुलमाचा राम-राम करायची काही गरज नाही.” आईने कढईत चरचरित भजी सोडली. एका पातेल्यात कोथिंबीर आणि दुसऱ्यात कांदा मिसळला होता. मला आवडतात म्हणून कोथिंबिरीच्या वड्या आणि ‘इन्या’ला म्हणजे माझा भाऊ ‘इंद्रजित’ला आवडतात म्हणून कांदाभजी. मला स्वतःच्या नावापेक्षा त्याच्या नावाबद्दल जास्त embarrassment वाटते. असो.

“दोन्ही बाजूने काय बोलतेस?” मी वैतागून विचारलं.

“काय गं वनिता काय झालं?” आज्जी आलीच आतमध्ये. आता पुन्हा चर्चेला तोंड फुटणार.

“काही नाही… होतायत भजी आणि वड्या.” आईने सावरून घेतलं.

“अगं, अगं… कोथिंबिरीचं पीठ किती पातळ केलंस? आता खुसखुशीत व्हायच्या नाहीत वड्या… सोडा घातलास का?”

उसासा सोडून आई म्हणाली, “हो”

“चिमूटभरच घालायचा होता, नाहीतर घातला असशील चमचा घेऊन” भांड्यात बघत आज्जी म्हणाली. मग तिने माझ्याकडे मोर्चा वळवला, “नुसतं बसून कसं व्हायचं, शिकून घ्यायचं. लवकरच करावं लागणार सगळं. उद्या नवऱ्याने मागितली कांदाभजी तर येईल का करता?”

“त्याला करायला येत असेल तरच मी लग्न करेन. आधी विचारूनच घेऊ आपण”

“हं, असलं उलटं बोलण्यात तर तू पटाईतच… सासूला छळू नकोस अशी म्हणजे झालं!” आज्जी आता डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत म्हणाली.

“कोणीतरी सासूला छळणारं पाहिजे की… सूनांनी किती दिवस सहन करायचं?” मीही टोला हाणला. ही character trait बहुतेक माई कडून आलीय.

“हे असलं उलटून बोलणं आमच्यावेळी नव्हतं बाई… डोळे वर करून बघितलं तरी मार बसायचा. म्हणूनच सांगितलं होतं, पोरगीला बाहेर ठेऊ नका.  घरात राहिली असती तर चार चांगले संस्कार झाले असते. वृंदाच्या पोरी बघ कशा ऑल-राऊंडर आहेत. थोरली अमृता तरी असला स्वैपाक मस्त करते, तुझ्यापेक्षा लहान आहे ती . मागे गेले होते तेव्हा असलं मस्त भरलं वांगं केलं होतं. ‘वनिता’ला सुद्धा जमत नाही. वनिताकडून मीठ एकतर जास्त होतं नाहीतर मसाला इतका बरबटून टाकायचा की… पण वृंदाच्या पोरी घरी राहून आईच्या हाताखाली शिकल्या. इथे आईनंच जबाबदारी झटकली म्हणल्यावर आम्ही काय बोलणार. बापाला पण लेकीच्या हुशारीचं कौतुक. आता डोक्यावर मिरे वाटतेय ते बघा.”

“अहो आई! लग्नाची झाली ती आता. हॉस्टेलचा विषय होऊन १५ वर्षं झाली असतील” आई न राहवून म्हणाली.

“हो बाई… मला काय करायचं… माय-लेकी गोंधळ घाला… ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं! मला काय कळतंय म्हणा… माझं झालं जुनेरं… कोण कशाला विचारतंय मला…”

“आता कुठला विषय कुठे घेऊन जातेयस आज्जी?” मी डोक्याला हात लावून म्हणाले.

“काय दिदीला दाखवले का फोटो?” ‘इन्या’ आत येत म्हणाला.

“अगं बाई राहिलंच ते… विजूचा फोन आण रे इंद्रू” आज्जी हरखून म्हणाली. तिचा अचानक मूड बदलला.

“कसले फोटो?” मी आईकडे बघत विचारलं.

आईने माझ्यासमोर कोथिंबिरीच्या वड्यांची प्लेट ठेवली. “स्थळ पाठवलंय. माईने चौकशी केलीय. काल बायोडेटा आणि फोटो पाठवलेयत बाबांच्या मोबाईलवर.”

“बापरे! असा बायोडेटा वगैरे बघून वगैरे लग्न करायचंय का?” मी तावाने उठले. बाहेरच्या खोलीत बाबा बसले होते. “हा काय प्रकार आहे बाबा… कुठल्या जमान्यात राहतोय आपण?”

“काय झालं?” बाबांनी एकदम धक्का बसल्यासारखं पाहून विचारलं. पण मी पुढचं बोलायला थांबलेच नाही. सरळ गच्चीवर गेले. मी मला बॉयफ्रेंड असल्याचं घरी सांगितलं नव्हतं.

आदित्य मेसेजवर मेसेजेस करत होता. त्याला काळजी लागली होती कि मी सांगितल्यानंतर घरचे काय रिऍक्ट करतील. कास्ट वेगळी होती, त्यामुळं रीतसरपणे घरी स्थळ पाठवून काहीतरी जुगाड करता येणार नव्हतं, जसा ‘पल्ली’ने (माझी गल्लीतली मैत्रीण) केला होता. काय माहित.. थोडं अजून डोकं लढवलं असतं तर काही झालं पण असतं कदाचित.

पण माझ्याच मनात शंका होत्या. कोणी जवळ नाही हे बघून मी त्याला कॉल लावला.

“अगं काय मेसेज वर रिप्लाय तरी करत जा… काय झालं? काय म्हणाले?” आदित्यने विचारलं.

“काही नाही… मी सांगितलं नाहीए अजून.”

“का? ठरलं होतं ना आपलं की तू ह्यावेळेस सांगशील… काय प्रॉब्लेम होतोय?”

“काय प्रॉब्लेम होतोय म्हणजे काय? तुझ्या घरच्यांसारखं सोपं नाहीए. घरातला लाडका एकुलता एक आहेस तू. तू जे म्हणशील, तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत तुझ्या हातात मिळालं आहे. माझ्यासारखं सतत वाद-चर्चा कराव्या नाही लागत तुला”

“मला पण बरंच समजवावं लागलंय माझ्या आई-बाबांना”

“एवढं समजवावं लागलं असेल तर कशाला करायचं मग त्यांच्या मनाविरुद्ध? राहू दे अरे!”

“मी काय बोलतोय अंजली, तू कुठे विषय घेऊन जातेयस? मी तुला सांगतोय कि ऐकतील तुझ्या पण घरचे.. पण सांगावं लागेल. तुला माहितीय मी किती प्लॅन करतोय. आपण इकडे घर पण घेणार आहोत…”

“सगळे प्लॅन्स तूच कर आदित्य! माझी होती ती नोकरी सोडून MBA कर… का कारण शहरात एकत्र राहता येईल. घाईनं स्वतःच्या घरच्यांना सांगितलंस… मी रेडी नसताना…”

“तू रेडी नसताना म्हणजे? तू.. तू भेटलीयस माझ्या घरच्यांना.. माझी गर्लफ्रेंड म्हणून… ते पण मी जबरदस्ती घेऊन आलो होतो का तुला? काय बोलतेयस तू हे आता?”

“हो नव्हते मी ready. तुला बरं वाटावं म्हणून आले होते मी. “

“काय? का असलं बोलतेयस तू? तुला काहीच वाटत नव्हतं जेव्हा तू माझ्या घरच्यांना भेटलीस? मी.. मी तुला विचारलं होतं.. तुला खरंच यायचं आहे का म्हणून… कारण मला खूप इच्छा होती त्यांनी तुला भेटावं.. आईची इच्छा होती इन फॅक्ट! असं बोलू नकोस आता”

मी गप्प बसले.

“अंजली… मी एकट्याने नाही प्लॅन केलंय हे सगळं. आपण दोघांनी केलंय ना… मग आता काय झालंय तुला? हे बघ… आता सांगितलंस तर अजून थोडा वेळ घेतील ते समजून घ्यायला… आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी होतील… आपण हे पुढं ढकलत राहिलो तर…” तो पुन्हा तेच सांगू लागला

“मला खाली जायचंय आदित्य. मी नाही सांगू शकत आत्ता. मला थोडा वेळ लागेल.” मी फोन ठेवला.

आदित्यशी सारखीच भांडणं होत होती. आधी Long-distance होतो, तर त्यावरून खटके. नंतर मी MBA साठी शिकायला गेले म्हणून एका शहरात आलो, तर थोडे दिवस चांगलं चाललं, पण ह्याचं लग्नाचं टुमणं सुरु झालं. मला नव्हतं लग्न करायचं एवढ्या लवकर. अजून नोकरी करायची होती. थोडं इंडिपेन्डन्ट जगायचं होतं. किंवा माहित नाही मला काय करायचं होतं. रिलेशनशिप मध्ये असून सुद्धा एकटं वाटू लागलं होतं.

आई हाक मारतच होती. मी खाली आले तोवर ताटं मांडलीच होती. कोथिंबीर वड्या तयार झाल्या होत्या. पुरणपोळ्या पण तयार झाल्या होत्या. आज्जीने तिची खास येळवणीची आमटी केली होती. तिचा कधी कधी मूड झाला कि करायची. पुण्याला गेल्यापासून खूप वर्षं झाली खाल्ली नव्हती. सगळे एकत्र जेवायला बसलो होतो.

बाबांनी डोक्यावर थोपटून विचारलं, “वनिता म्हणाली मला.. तू तयार आहेस म्हणून… नक्की ना? कि कुणी आहे मनात… असलं तर सांगून टाक!”

“होय… आपल्या जातीतला किंवा अगदी पोटजातीतला देखील चालेल की… शेवटी संसार दोघांना करायचा” आज्जी म्हणाली.

मी पाण्याचा घोट घेतला आणि सांगितलं, “नाहीए तसं कोणी.”

सगळ्यांच्याच चेहऱ्यावर मला आनंद दिसत होता. जेवण झाल्यावर सगळे काचा-कवड्यांचा खेळ मांडून बसले. आईने खुशीत माईला फोन केला. माईने सुचवलेल्या स्थळांपैकी ‘समीर बेळगावे’ सगळयांनाच पसंद पडला होता. माझाच होकार बाकी होता. एकदा त्याच्याशी स्वतंत्रपणे भेटते असं सांगून मी विषय थांबावला.

पुण्याला आल्यानंतर मी आदित्यला आमच्या नेहमीच्या गार्डन मध्ये बोलावलं.

“नाही होणार माझ्याकडून हे आदित्य.”

“काय?”

“नाही सांगितलं मी घरी. आणि, कारण हे नाहीए- कि मला घरच्यांची भीती वाटतेय.. मला गरज नाही वाटत आहे, त्यांना सगळ्या वाद-विवाद आणि त्रासातून नेण्याची. Especially माझ्या आईला. कारण… कारण… मला नाही वाटत, मला तुझ्याशी जुळवून घेणं जमेल. ना हि तुझ्या घरच्यांशी. आत्ताच जाणवतं कि त्यांच्या खूप अपेक्षा आहेत त्यांच्या सुनेकडून.” मी खाली बघूनच बोलत होते.

“काय म्हणाले ते? माझी आई काही बोलली का तुला?” त्याने शांतपणे विचारलं.

“नाही… पण मला जाणवतं, ज्या प्रकारे त्या तुला घेऊन possessive आहेत.”

ह्यावर तो काहीच बोलला नाही.

“हे बघ असं सगळं निगेटिव्ह वाटत असताना काय अर्थ आहे हे रिलेशन ठेवण्यात? आणि.. आणि..” मला शब्द सापडत नव्हते, “मला एक स्थळ आलंय. चांगला आहे तो मुलगा… घरी आवडलाय सगळ्यांना.” मी डोकं दोन्ही हातात धरून पायाच्या बोटांकडे बघून बोलत होते.

त्याने माझे हात बाजूला केले. माझे गाल त्याच्या दोन्ही हातात धरले. मला वाटलं कि तो एकदम निर्विकारपणे माझ्याकडे बघतोय.

त्याच्या तोंडून एवढंच बाहेर पडलं, “ठीक आहे.” त्याने माझा चेहरा जवळ ओढून kiss केलं, आणि तो तिथून उठून मागेही वळून न बघता निघून गेला. मला वाटत होतं कि त्या रात्री त्याचा फोन येईल. पण नाही आला.

मी दुसऱ्या दिवशी सकाळीच आईला फोन लावला आणि सांगितलं, “मी तयार आहे. त्याला भेटायची काही गरज नाही. तुम्ही घरचेच भेटायचा कार्यक्रम ठरवा.”

अशाप्रकारे माझी ‘समीर’शी एंगेजमेंट ठरली… पण…”

“अंजली…” शोभाने मला थांबवलं. “आपली वेळ संपतेय… पण मला एक प्रश्न विचारायचा आहे… So, you said की तुला आईला दुखवायचं नव्हतं, आणि आदित्यच्या आईशी तुला issues होते, but were you not in love with him anymore?”

“I didn’t know at that time…” मी तिला सांगितलं. वेळ संपली होती त्यामुळे बाहेर निघाले. तो निघून गेला होता, मला मेसेज आला होता, ‘Couldn’t get my appointment rescheduled, please come by auto.’

मी घरी जाण्यासाठी रिक्षात बसले पण रिक्षा त्या गार्डनकडे घेऊन गेले.

ब्रेकअपच्या सगळ्या आठवणी परत येत होत्या. स्वतःचाच राग येत होता. का असं करते मी? त्या दिवशी मी त्याला खूप दुखावलं होतं. त्याच्या घरच्यांना फक्त एकदाच भेटून मी त्यांच्याबद्दल मतं बनवली होती. मला शोभाचा प्रश्न आठवत होता. खरंच, मला घरच्यांना त्रास नव्हता द्यायचा की माझ्याच मनात नव्हतं आदित्यशी लग्न करायचं?

गार्डनमध्ये चालता चालता, मला ते आमचं झाड दिसलं. अचानक आठवलं, काही वर्षांपूर्वी कसे आम्ही कसे त्या झाडाचा आडोसा घेऊन फास्ट kiss करायचो! Heh! शी! फारच बावळट होतो. मी आणि आदित्य इथे खूप गप्पा मारायचो, भांडायचो, चिझी स्वप्नं रंगवायचो. लहान होतो.

सूर्य मावळतीला आला होता. खरंतर मावळतीला मन थोडं हळवं होतंच, म्हणून की काय पण त्या पार्कमध्ये आदित्यला बोलवावंसं वाटल. त्याला ते सगळं सांगावसं वाटलं.
त्या झाडाचा मी फोटो घेतला आणि आदित्यला पाठवण्यासाठी WhatsApp उघडलं. पण अचानक काहीतरी वाटून  attach केलेला फोटो delete केला. आणि मेसेज टाईप करून सेंड केला,
“I have left from Shobha, will reach home in an hour.”

सत्र-तिसरे

“ए टवळे… बाहेर ये… ऐश्वर्या राय पण इतका वेळ घेत नाही अंघोळीला… ” मीनल-“दिदी”ने बाथरूमचा दरवाजा जोरजोरात खटखटावला.

तिला एक काय प्रॉब्लेम होता माझ्याशी काय कळलं नाही. पण उगीच कुजकटपणे वागायची. मी सातवीला आणि ती नववीला. आमच्या हॉस्टेलमध्ये एकाच डॉर्ममध्ये आम्ही राहायचो. शाळेची होस्टेल्स फॅन्सी नसतात… एक मोठा हॉल त्यातच कप्पे पाडलेल्या रूम्स. लाकडाच्या मोठ्या फळ्याने सेपरेट केलेल्या. माझ्या पलीकडच्या कप्प्यात ती राहायची. चिनू – माझी रूममेट, नमू- माझी बंकबेड-मेट, आणि मी आम्हाला तिघींना हसायला फार आवडायचं. चिनू फालतू जोक्स करायची आणि मग आम्ही खिदळायचो. तर अर्थात मीनल’दिदी’ ला त्रास व्हायचा. आमच्या कप्प्यात येऊन तणतण करून जायची.  कधी वॉर्डनबाईंकडे तक्रार करायची. पण चिनूचं किंवा नमूचं नाव न सांगता नेहमी माझं नाव सांगायची.

आम्ही ज्युनिअर मुली तशा लवकर झोपायचो. सिनिअर्स अभ्यासाच्या नावाखाली कुजबुजत असायच्या. एके रात्री मात्र त्यांच्या गप्पा मला कानावर आल्या. म्हणजे मीच कान देऊन त्या ऐकल्या.

“दिल चाहता है मध्ये ‘प्रीती’ कसली छान दिसते… मला पण गालावर खळी पाहिजे होती” नेत्रादिदी म्हणाली.

“पण मला तर ती नवीन ‘दिया मिर्झा’ जास्त आवडते… RHTDM बघितलास? आर. माधवन पण आवडतो मला… असं पाहिजे कोणीतरी… खऱ्या आयुष्यात पण!” मीनल स्वप्न बघत असल्यासारखी म्हणाली.

(Yuck! मी मनात)

“आदित्यचं काय झालं… ” नेत्रादिदीने अचानक एक नाव घेतलं तसे मी कान टवकारले.

“आदि… अगं फारच भाव खातो तो… काल annual function साठी बोलायला गेले तर बघत पण नव्हता माझ्याकडं.”

“अगं लाजत असेल तुला बघून… तो तसा फार बोलतच नाही कुणाशी.” नेत्रा उगाच मीनलला हरभऱ्याच्या झाडावर चढवत होती.

“हम्म… पण तुझं चांगलं चालू आहे स्वप्नील बरोबर…” मीनल चिडवण्याच्या स्वरात म्हणाली, “म्हणजे तुमचं मागच्या ऑफ-पिरियडला ‘कहींपे निगाहें, कहींपे निशाना’ चालू होतं ते सगळ्यांना कळलं बरं का!” 

नेत्राने मीनलला ‘श्श्श!’ केलं आणि दोघी खिदळत झोपल्या.

“शी! कसल्या मूर्ख आहेत ह्या…”मी मनाशी विचार केला, “सारखं आपलं मुलांबद्दल बोलत असतात… काही होणार नाही ह्यांचं! मी कद्धीच अशी होणार नाही!” असा मी निश्चय केला.

दुसऱ्या दिवशी रात्री जेवण करून आल्यानंतर, मी आणि चिनू काहीतरी नॉन्सेन्स गप्पा मारत कॉरिडॉर मधून चाल्लो होतो, जसजसा मीनलचा कप्पा जवळ आला तसा मी विषय बदलला आणि दुपारच्या ‘व्हॉलीबॉल’ च्या match चा विषय काढला. आणि तिच्या जवळून जाताना मुद्दाम “आदित्यने कसला मस्त उचलला बॉल! खूपच भारी खेळतो ‘आदित्य’!” असं जोरजोराने म्हणलं. मला अपेक्षित होतं तेच झालं.

“ए टवळे! थांब!” मीनलने  मला थांबवलं, “आदित्य कोणाला म्हणतेस गं? काय पाव्हणा आहे काय तुझा? दादा म्हणायचं!”

“पण मी कशाला दादा म्हणू? त्याने मला सांगितलंय दादा म्हणून नकोस म्हणून!” मी साळसूदपणाचा आव आणला होता.

“काय!!??” मीनलचे डोळे विस्फारले. “तो तुझ्याशी बोलला? कधी बोलला? आणि तुला सांगितलं असं? तू कधी गेली होतीस त्याच्याकडे बोलायला. निर्लज्जच आहेस कि?”

तिच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या, पण मी दीडशहाणपणा केला, आणि माझ्या दप्तरातून एक कागद काढून आणून तो तिच्यासमोर नाचवला.

“ही चिट्ठी त्याने दिली मला आज सकाळी.” त्या चिट्ठीवर ‘मला तू आवडतेस’ असं एक वाक्य कागदावर रखडलं होतं आणि खाली ‘आदित्य कारखानीस’ असं पूर्ण नाव पण लिहलं होतं. शेजारी उभी असलेली चिनू डोळे फाडून बघत होती.

मीनलने तो कागद माझ्या हातातून हिसकावून घेतला आणि “थांब तुला दाखवते” असं म्हणून तरातरा चालत सुटली. चिनू डोक्याला हात लावून बसली होती पण मला मीनलला डिवचल्याचा आनंद होत होता.

मीनलची जिरवल्याच्या आनंदात मी दुसऱ्या दिवशी माझा बॉबकट छान विंचरून त्यावर मस्त बेल्ट लावून, पिनाफोर च्या प्लिट्स सारख्या करून, खुशीत रेडी होऊन डॉर्मच्या बाहेर निघाले तेवढ्यात, समोर मेट्रन-बाई आल्या आणि त्यांनी माझा कान पिळला. मला आमच्या टीचर्सच्या रूम मध्ये नेण्यात आलं. काहीच मिनिटात आदित्य पण आला. आम्ही दोघे दाराजवळ थांबलो. माझ्या क्लास-टीचर ‘शिंत्रे मॅडम’ आल्या

“काय थेरं चालवलीयत ही  ‘कारखानीस’?” असं त्या ओरडल्या. “नावाजलेला गुरु… अरे तुझं उदाहरण देतो आम्ही खालच्या वर्गांना… आणि तू हे असले प्रकार..”

“काय झालं मॅडम… मला कळत नाहीए तुम्ही कशाबद्दल बोलताय…” आदित्यने प्रश्न केला.

“ह्या कसल्या चिठ्ठया पाठवतोस लहान मुलींना? लाज नाही वाटत?”

आदित्य दचकला, त्याने कागदाकडे निरखून पाहिलं आणि माझ्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. “मी नाही लिहलं हे मॅडम, हे माझं अक्षर नाहीए.”

“खोटं बोलतोस?” मॅडम अजूनच रागावल्या.

“अहो मॅडम मी खरं सांगतोय… कोणीतरी मुद्दाम केलंय..”

तो कबुल करत नाही म्हणल्यावर मॅडमनी त्याच्या कानशिलात वाजवली.  हे दृश्य बघून मी घाबरले आणि सरळ रडायला लागले.

“मॅडम… त्याची काही चूक नाहीए. मी… मी मुद्दाम… मीनलदीदीला चिडवायला म्हणून… म्हणून मी खोटी खोटी चिट्ठी ब-बनवली… सॉरी मॅडम…”

मॅडमनी मग माझ्याकडे मोर्चा वळवला. पण आदित्यला मारून त्यांचा हात बहुतेक दुखला असावा म्हणून, “तोंड वर करून सांगतेस हे सगळं? थांब तुला छडीने मार दिल्याशिवाय तुला समजणार नाही.” असं म्हणत मॅडम छडी आणायला वळल्या.

सगळे टीचर्स हा तमाशा आपापल्या खुर्चीवरून बघत होते

“काय ह्या आजकालच्या पोरी… भीती म्हणून नाही कशाची… आमच्यावेळी नव्हतं बाई असं…”असं म्हणत त्या आपल्या खुर्चीकडे गेल्या.

“तुमच्या वेळी कबुतरं पाठवायचा काय ओ मग शिंत्रे मॅडम” नाळे बाईंनी डोळे मिचकावत विचारलं.

“म्हणजे?”

“एकाच कॉलेजला होता ना तुम्ही आणि सर… ऐकलंय आम्ही” नाळे बाई चिडवण्याच्या सुरात म्हणाल्या.

“अहो कसलं काय?” शिंत्रे मॅडम थोड्याश्या खुलल्या, “नुसत्या चिठ्ठया चपाट्यांनी लग्नं होतात होय… ह्यांची काय हिंमत होती का अप्पांसमोर बोलायची. गपचूप स्थळ पाठवलं होतं घरी…”

“हं… भारीच छुप्या रुस्तम निघाला की तुम्ही” मराठीच्या मेंगाणे बाई बोलल्या.

“अहो, घरी बघायला आले तेव्हा पण काही बोलले नाहीत हे.”

“तुमच्या मातोश्री कुणाला बोलायची संधी देतात का कधी?” शिंत्रे सर उगाच रजिस्टर चाळत म्हणाले.

“हो… तुमच्या जणू काय सती अनसूयाच!” शिंत्रे मॅडम सरांवर डाफरल्या.

“जाऊ द्या हो मॅडम… काय घरोघरी मातीच्या चुली…” देसाई सर उगाच कायपण बोलले.

“पण तुमचं तर तेव्हा तरुणपणी जुळलं ओ… ते एक समजू शकतो! पण आपल्या राजा-राणींचं कसं काय जुळलं?” नाळे मॅडमनी अजून काहीतरी उकरून काढलं.

“कोण?”

“आपल्या ‘कळमकर’ बाई आणि माननीय प्रिन्सिपॉल सरांचं ओ… मागं २-३ वर्षांपूर्वी झालं नव्हे त्यांचं लग्न?” नाळे-बाई खुसफुसत बोलल्या. पण त्यांचं खुसफूसणंही इतकं मोठं होतं की स्टाफरूममधले सगळेच हसले. प्रिन्सिपॉल आणि कळमकर बाईंची कॅबिन वेगळीकडे होती.

शिंत्रे बाई त्यावर म्हणाल्या, “नाहीतर काय, आता ह्या वयात काय स्थळ सांगून, कुंडल्या बघून लग्नं होतात की काय?”

ह्यावर नाळे बाई फिदीफिदी हसल्या.

“आणि लगेच मागच्या वर्षी ते M.Phil करून Vice प्रिंसिपल साठीचा नंबर पण लावून घेतला. हे असले नियम आम्हाला सांगितले असते तर आम्हाला काय अवघड होतं का करायला.” देसाई सर सगळ्यांकडे दाद मागत म्हणाले.

“हो… मी मॅथ्स मध्ये M. Ed केलेलं आहे. आणि सिनियॉरिटी वगैरे काही प्रकार ठेवला नाही का? बरोबर नियम बदलले तेव्हा ह्यांची सगळी तयारी होती.” माने सरांनी खंत व्यक्त केली.

“नाहीतर काय? म्हणजे ह्यांनी पोळ्या भाजून घेतल्याचं वर तूपही ओढून घेतलं” मराठीच्या मेंगाणे बाई म्हणाल्या.

“त्यांची पोरं आहेत ना आधीच्या लग्नाची?” पाटील सरांनी विचारलं.

“माहेरी असतात त्यांच्या. त्यांचं माहेर म्हणजे आमचंच गाव. चांगलं नाव होतं त्यांच्या वडिलांचं.” शिंदे सर म्हणाले.

“सासर सोडून आल्या होत्या म्हणे…” नाळे बाई.

आमच्या शिक्षकांचं काहीतरी वेगळंच सुरु झालं होतो. मी आणि आदित्य ऑकवर्डली उभे होतो आणि टीचर्सकडे बघत होतो. रडल्यामुळे नाकातून आलेलं पाणी मी माझ्या शाळेच्या फ्रॉकच्या बाहीला पुसलं. नेमकं ते आदित्यने बघितलं. आधीच भेकडासारखं रडून आणि आता हे करून  त्याच्यासमोर मी माझा पार पचका करून घेतला होता.

तिकडे शिक्षकांच्या गोलमेज परिषदेत गप्पा रंगल्या होत्या…. अचानक शिंत्रे बाईंना लक्षात आलं कि आम्ही दोघे तिथेच उभे आहोत. त्या एकदम बावरल्यासारख्या झाल्या.

“ए निघा इथून… निर्लाज्जासारखे उभे आहेत.” असं जोरात ओरडून त्यांनी हकललं.

माझ्या छोट्या आणि त्यानंतरच्या मोठ्या आयुष्यातली ही  पहिली चर्चा होती जिने मला वाचवलं. आम्ही दोघे तिथून पटकन निघालो. मी गपचूप खाली बघून चालत होते इतक्यात आदित्य म्हणाला,, “जरा डोक्यावर पडल्यायेत वाटतं मॅडम! मुलींना असं मारतात. तुला लागलं नाही ना?”

आदित्य पुढे चालत होता आणि मी मागे… मला त्याला बोलावून सॉरी म्हणावसं वाटत होतं पण धाडस होत नव्हतं. चालता चालता मान मागे वाळवून त्याने माझ्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि पुढे निघून गेला.

शाळेच्या कॉरिडॉरमधून जाताना मीनल दिसली… ती माझ्याकडे बघून कुत्सित हसत होती. दिवसभर तो चर्चेचा विषय झाला होता. मला कशासाठी फेमस व्हायचं होतं आणि मी शाळेत कशासाठी चर्चेत आले होते!! लंचच्या वेळी ‘मेस’ मध्ये गेल्यावर असं वाटत होतं की सगळे त्याबद्दलच बोलतायत आणि माझ्यावर हसतायत. मीनल आणि तिच्या मैत्रिणी तर नक्कीच. मी गपागपा गिळून ५ मिनिटात जेवण संपवलं आणि निघाले. मी फक्त प्रार्थना करत होते कि हे प्रकरण मेट्रन किंवा शिंत्रे मॅडमनी घरी नको सांगायला. मला आदित्यबद्दल पण वाईट वाटत होतं. माझ्यामुळे तो पण ह्या फालतू प्रकरणात आला. मला त्याला एकदा नीट सॉरी म्हणावसं वाटत होतं.

डिनरच्या वेळेपर्यंत थोडंसं वातावरण निवळल्यासारखं वाटत होतं. मी हातात प्लेट घेऊन मेसभर नजर फिरवली, आदित्य कुठे दिसतोय बघायला. मग माझ्या लक्षात आलं कि आपण मीनलला आधी शोधू, तिच्या आसपासच आदित्य आणि त्याच्या मित्रांची जागा असणार. आणि तसंच झालं. मुलींच्या लाईन मध्ये जिथे मीनलची गॅंग होती त्याच्या opposite आदित्य आणि मित्र बसले होते.

मी, चिनू आणि नमु थोड्या लांब जाऊन बसलो पण अशारितीने कि आदित्य प्लेट ठेवायला उठला कि काही सेकंदांनी मला उठता आलं असतं आणि मग मधल्या रस्त्यात त्याला गाठून मला सॉरी म्हणता आलं असतं.

माझी बुद्धी तेव्हा लहान होती त्यामुळे ‘मी त्याला त्याच्या मित्रांसमोर हाक मारणे– त्यानंतर त्याने थांबणे— मित्रांनी पुढे जाणे— मग मी त्याला सॉरी म्हणणे— त्यानंतर मित्रांनी त्याला अजून चिडवायला सुरु करणे’ हा बॉलिवूड scene आहे हे मला तेव्हा जाणवलं नव्हतं.

तो उठल्यानंतर ठरवल्याप्रमाणे जेवण अर्ध्यात टाकून मी त्याच्या मागे गेले.  थोडं अंतर मागे चालून मी ऑकवर्डली ‘आदित्यदादा’ अशी हाक मारली. तो थांबला. त्याचे मित्र आपापल्यात इशारे करून पुढे गेले. मी थोडीशी पळतच त्याच्यापाशी गेले.

“आदित्यदादा सॉरी… माझ्यामुळे तुम्हाला उगाच… म्हणजे मी तुमचं नाकच कापलं. असं काही मला करायचं नव्हतं… चुकून झालं..” मी खाली बघत सांगितलं.

“अगं असू दे असू दे… मला कोणी काही बोललं नाही…” तो म्हणाला.

“खरंच?” मी वर मान करून त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. तेव्हा तो नुसताच हसला. ते बघून मला बरं वाटलं पण थोडंसं संकोचल्यासारखं पण वाटलं.

“काळजी करू नकोस…” असं म्हणून तो २ पावलं मागे सरकला “आणि मला दादा म्हणू नकोस… आदित्यच म्हण.” असं म्हणून गालाच्या कोपऱ्यात हसला आणि मागे वळून चालता झाला.

माझ्या दोन दिवसांपूर्वी  ‘मी कद्धीच अशी होणार नाही!’ ह्या केलेल्या निश्चयावर पाणी फिरलं होतं!

अशारितीने आमच्या “प्रेमाची” सुरुवात झाली होती… Now that I think of it… It was just a childish prank. माझं रिलेशन एका ‘जोक’च्या आधारावर सुरु झालं होतं. काय कळतं इतक्या लहानपणी. पण तरी मी आणि त्यानेही ते खेचत आणलं इथपर्यंत. तेव्हा अक्कल नव्हती… पण मोठं झाल्यावरही कसं  कळलं नाही. आमचं सगळंच वेगळं. खाण्याच्या सवयीपासून ते beliefs पर्यंत… त्याचं त्याच्या घरच्यांशी फारच जवळ असणं, माझं जवळ असतानाही स्वतःच्या स्पेस मध्ये राहणं… गावी गेल्यावर देवाचे रीतिरिवाज असे पाळतो कि एखाद्या देवळात पुजारी म्हणून शोभेल. मी ‘खूप वर्षं घराबाहेरच राहिले’ असं कारण लावून कधी त्यात रस घेतलाच नाही.

ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लग्नाआधी बोललो होतो का? आठवतही नाही आता.

बापरे… ह्या शोभाने माझ्या डोक्यात एक भुंगा सोडलाय. काहीतरी प्रश्न विचारते दरवेळी आणि मी हे असे विचार करत राहते. मला खरंतर स्वतःशी सुद्धा इतकी चर्चा करायला आवडत नाही.

दारावरची बेल वाजली. बाल्कनीत उभी राहून एवढा विचार करत संध्याकाळ कधी होऊन गेली कळलं नाही. आज त्याची ‘अपॉइंटमेंट’ होती. ती संपवून तो आला होता. मी दार उघडलं तसं त्याने एक वर्तमानपत्राचा पुडा हातात दिला. उघडून बघितलं तर निशिगंधाची फुलं. त्यात नाक खुपसून खोलवर वास घेतला. एका बौल मध्ये पाणी घेऊन त्यात ती फुलं सोडली. मेंदू म्हणत होता गप्प बस्स… पण तोंडाने काही ऐकलं नाही,

“डॉक्टर शोभाने सांगितलं का फुलं द्यायला?” मी उगाच कळ काढली. चर्चा, वाद वगैरे आवडत नसले तरी ते उकरायची माझ्यात फार खुमखुमी आहे.

“काय बोलू आता?” असं म्हणत तो आवरायला आत गेला.

थोडयावेळाने मीच बोलले, “जेवणाचं काय? मी पिझ्झा ऑर्डर करतेय… तुला बघ काय हवंय. फारतर माझ्याच app  मधून दोन्ही ऑर्डर्स करून टाकीन.”

“मला पण पिझ्झा चालेल. तुला जो ऑर्डर करशील तसलाच मला कर.”

“तुला आवडत नाही ना पण पिझ्झा!”

“चालेल मला आज.”

मी भुवया उंचावून त्याच्याकडे बघितलं पण तो मोबाईल मध्ये बघत होता.

“कायतरी लाव TV वर…” त्याने वर बघून मला सांगितलं.

“मला ते न्यूज वगैरे नाहीए बघायचं.”

“हो.. तुला हवं ते लाव.”

“मी माझ्या लॅपटॉप वर बघते…”

“नको… इथेच लाव ना.”

“मी FRIENDS लावणारेय…”

“हां चालेल… ” तो म्हणाला.

बापरे आज आमची anniversary वगैरे आहे कि काय? नाहीए पण… काय झालंय ह्याला? शोभाने संमोहन उपचार वगैरे करून पाठवलंय कि काय?

थोड्यावेळाने पिझ्झा आला आणि खाऊन संपला. दोघेही FRIENDS बघत होतो. आज थोडं वेगळंच वाटत होतं. चांगलं वाटत होतं. एका सीन मध्ये Joeyच्या मूर्खपणावर मी खूपच हसत होते. तेव्हा त्याने अचानक माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, “खूप दिवसांनी तुझ्या हसण्याचा आवाज ऐकला!”

त्याच्याकडे बघून मला त्याच्या कुशीत शिरावंसं वाटलं, पण मी गेले नाही आणि त्यानेही घेतलं नाही. मला अचानक जाणवलं दोन उशांचं अंतर मध्ये ठेऊन आम्ही बसलो होतो. हे अंतर कधी वाढलं ते कळलं नाही आणि पुन्हा कधी कमी होईल का तेही माहित नाही.

सत्र चौथे

“अंजली… Ok, now I am going to ask you a blunt question — तुझ्या करिअरसाठी तू आदित्यला अजूनही blame करतेस का?”

“Blame? What blame… नाही! मी कशाला ब्लेम करू… अर्थात त्याने माझ्याशी बोलण्याआधी आमच्या future चं प्लॅनिंग करून ठेवलं होतं… मला MBA कर म्हणून तोच मागे लागला होता… पण ठीक आहे…  मग केलं मी पण MBA… But I am not complaining”

“नो.. it seems you didn’t have much say in choosing your career… तू त्यावेळेस त्याचं ऐकण्यामागे काय कारण होतं? तू pressure मध्ये येऊन करिअर चेंज करण्याचा निर्णय घेतलास का? की तुला clarity नव्हती and you just went with the flow… मला हे जाणून घ्यायचं आहे की, आदित्य नेहमी तुमच्या दोघांचे डिसिजन्स एकटा घेतो का?”

शोभाच्या अचानक प्रश्नांच्या सरबत्तीमुळे मला उत्तर द्यायचं सुचत नव्हतं… आता पहिल्यासारखं मी प्रश्न अव्हॉइड पण करू शकत नव्हते. म्हणजे असं असतं ना एखादा माणूस तुमच्या ओळखीचा झाला की त्याने काहीही बोललं तरी तुम्ही त्याला रिस्पॉन्ड करता. हिला उत्तर द्यायचं माझ्यावर काहीच प्रेशर नव्हतं, पण तरी उगाच एक बंधन वाटत होतं.

“अं… म्हणजे… असं..”

माझं तत्-पप होताना बघून तिने पुढचा प्रश्न विचारला, “ओके… तुझा ह्याआधीचा जॉब काय होता exactly?”

“मी बँक मध्ये होते… असिस्टंट मॅनेजर म्हणून…”

“मग तिथून इथे HR मध्ये कशी काय… I mean, तुला दोन्हीपैकी कुठला जॉब प्रेफेरबल होता… I am assuming की तू हा आत्ताचा जॉब आदित्यमुळे घेतलास… is it so? पण हे असं transition…”

“OK… मी खरंतर सिव्हिल सर्व्हिसेस साठी prepare करत होते. आणि त्यासाठी classes वगैरे चालू होते… आणि तेव्हा आदित्य नुकताच जॉबला लागला होता. सो मग आम्ही भेटायचो, किंवा बाहेर जायचो तर तो नेहमी सगळीकडे खर्च करायचा. आणि ह्या सगळ्यात २ वर्षं गेली. पण माझे results काही चांगले येत नव्हते. आणि मला त्याच्याकडून सारखं खर्च करवून घेणं चांगलं वाटत नव्हतं. नंतर नंतर मला असं वाटू लागलं की तो खर्च करतोय म्हणून मग तो म्हणेल त्याच गोष्टी आम्ही करायचो. मी माझं स्वतःचं फार मत व्यक्त करणं हळू हळू कमी केलं होतं. म्हणजे कुठे जेवायचं, कुठला पिक्चर बघायचा, अगदी काय खायचं इथपर्यंत सगळं त्यानेच ठरवायचं. आणि आदित्यला हे कळत नव्हतं. उलट नंतर नंतर तर त्याने मला मत विचारायचंच बंद केलं होतं. Weekdays मध्ये त्याच्याकडे फार वेळ नसायचा, आणि मग वीकएंडला तो काहीतरी प्लॅन करून ठेवायचा. आणि मग त्यानुसार ट्रेकला जायचं तर मी ६ ला उठायचं, किंवा त्याचं Fridayला काम असलं की शनिवारी डायरेक्ट लंच ला भेटायचं… मी खूपच डिपेन्डन्ट झाले होते. आणि त्याचा मला त्रास होत होता. सतत वाटायचं कि माझा निर्णय चुकला, मी देखील इतरांसारखं इंजिनीरिंग करून जॉब घ्यायला हवा होता. मिळाला असता मला. केवळ १०-१२ वी मध्ये काहीतरी खूळ डोक्यात घेऊन ह्यामध्ये पडले होते. वाईट ह्याबद्दल वाटायचं की आदित्यला ह्या गोष्टी बोलण्यात इंटरेस्ट नसायचा. म्हणजे मी माझं रडगाणं सुरु केलं की तो एकतर सोडून MBA कर म्हणायचा, नाहीतर “जमेल तुला तू करशील” असं काहीसं pep-talk देऊन रिकामं व्हायचा…”

“तू बोलली होतीस ह्याबद्दल?”

“काय बोलणार, दोघेही वेगळ्या जगात होतो. त्याला नवीन जॉब होता. ऑफिसमध्ये कूल फ्रेंड्स होते, पार्ट्या असायच्या, टीमचे Outings असायचे…. मला नव्हतं वाटत की तेव्हा तो समजून घेऊ शकत होता, इन फॅक्ट मला तरी काय बोलायचं काय माहित होतं? त्यामुळं मी त्याच्यापासून थोडी लांब राहू लागले… त्याने कुठे जायचा विषय काढला की मी अभ्यासाचं कारण सांगायचे… अभ्यास तरी काही व्हायचा नाही… मग एक दिवस मी ठरवलं की जॉब शोधायचा. वेगवेगळ्या परीक्षा द्यायला सुरु केलं आणि त्यातून हा जॉब लागला. पोस्टिंग एका छोट्या शहरात झालं होतं, मला आता इथून बाहेर पडायचं होतं, आदित्यापासून लांब जावं लागणार होतं. But I was happy की मला जॉब लागला होता आणि good thing was ते छोटं शहर ‘माई’च्या गावापासून जवळ होतं. सो मग वीकएंडला तिच्याकडे जायचे. पहिले काही दिवस माईने खूप कौतुकही केलं. actually मला ते घर आणि गाव फार आवडतं. उन्हाळा, दिवाळीच्या सुट्ट्या फार एन्जॉय केल्या आहेत तिथे लहानपणी. माईच्या हातच्या गरम-गरम पुरणपोळ्या म्हणजे सुख! सणावारांना माझी चंगळ झाली होती…”

“But…?” शोभाने तिथे एक किंतु-पंरतु आहे हे ओळखलं.

“If you don’t mind Shobha… can I ask you something?”

अचानक मी प्रश्न विचारणार म्हणल्यावर शोभा थोडीशी मागे सरकली. “Sure, go ahead!”

“I assume that you like you job… so what do you do in a typical day of your job?”

“Sure, हो मला माझं काम आवडतं, मी जनरली १० वाजता Clinic उघडते, आणि दिवसभर I listen to my counselees आणि शक्य होईल तशी त्यांना मी हेल्प करते. काही वेळा काही guests फार stubborn असतात. तेव्हा थोडा मलाही त्रास होतो… पण मोस्टली ते cooperating असतात…. but… how is this relevant if I may ask?”

“तुमचं ऑफिस छान आहे. nice comfortable chairs, decor, AC वगैरे! माझं तिथल्या ऑफिस मध्ये Gray मोझॅक टाईल्स होत्या. भिंतींना पिवळा डिस्टेम्पर लावला होता. हाहा… माझं जे ऑफिस होतं, तिथे waiting साठी एक बेंच टाकला होता, बिचाऱ्या कस्टमर्स च्या शर्टांना, कपड्यांना तो डिस्टेम्पर नेहमी लागायचा. तिथे आमचे मॅनेजर होते नाईक सर. ते ४९ वर्षांचे होते. माझे colleagues – निशांत सर, जाधव सर… निशांत साधारण आदित्यच्या वयाचा होता, पण आम्ही सगळेच एकमेकांना ‘मॅडम आणि सर’ म्हणायचो, वयानुसार. Teller आणि अकाउंटन्सी मधल्या म्हात्रे मॅडम आणि इंदूरकर मॅडम मात्र मला एकेरी बोलवायच्या.

मी सकाळी १० वाजता ऑफिसमध्ये जायचे तिथे पांडुमामा बसलेले असायचे, त्यांच्याजवळच्या मस्टरवर सही करायची. मग कॅबिनमध्ये जायचं, बॅग ठेवायची, आणि हो.. आमचा ड्रेसकोड होता हं! सो NO Western Wear, ओन्ली सलवार- कुर्ता आणि ओढणी.”

“हाहा… मी एक दिवस कुर्ता आणि खाली जीन्स घालून गेले होते,

High-neck कुर्ता असल्यामुळं मी ओढणी घेतली नव्हती. पांडुमामांनी एकदा चोरून वरून खालपर्यंत नजर फिरवली. मी माझ्या केबिन मध्ये जाऊन बसेपर्यंत मला पाहून म्हात्रे आणि इंदूरकर बाईंमध्ये काहीतरी खुसफूस झाल्याचं मला जाणवलं.

निशांतचं क्युबिकल माझ्याच पलीकडे होतं, तिकडे जाता-जाता तो थांबला आणि म्हणाला, “आज बर्थडे वगैरे नाही ना?”

“नाही.. का?”

“सहजच विचारलं, मला आठवत होतं की आता रिसेंटलीच झाला.. म्हणलं एवढ्यात वर्ष संपलं?”

“नाही… अजून संपायचं आहे. मार्च-एन्ड नाही आलाय अजून आपला” मला त्याच्या बोलण्याचा रोख कळला होता पण मी दुर्लक्ष केलं.

पण तरीही त्याने विषय सोडला नाही, “आज नवीन ड्रेस घातलाय म्हणून विचारलं…” असं म्हणून तो थोडीशी बत्तीशी दाखवून हसला.  हे बोलायच्या आधी त्याने आसपास कोणी आहे का ह्याची खात्री केली होती हेहि मी पाहिलं होतं.

“नाही.. सहजच.” असं म्हणून समोरच्या फाईल मध्ये मान घातली. असा का आहे हा? माझ्याच वयातला. पण बोलायला बिचकणारा. पुण्या-मुंबईत असतो तर कदाचित मित्र असतो आम्ही.  इथे अगदीच घरगुती आहे सगळं. कोणी मित्र म्हणून बोलावं असं नाही. मी फाईलमध्ये नुसतीच बघत होते पण डोक्यात हे असं काहीतरी चालू होतं. तितक्यात एक किनरा आवाज कानावर आला.

“म्याडम, झालं का ओ ते आमच्या सुजयचं काम?”

“काय?” मी एकदम दचकले.

“सुजयचं काम झालं का?” बाईंनी अजून एकदा विचारलं.

“कोण सुजय?”

“सुजय.. सुजय व्हनाळे”

“कसलं काम होतं त्यांचं?”

“कर्जाचं होतं ना ओ? तुम्हालाच म्हाईत नाई होय?”

“बसा तुम्ही… फाईल बघते मी.”

“आता बसायला कुटं वेळ हाय… बाजारला आले होते. मग आले विचारायला. बरं बघा. बसते जरावेळ.” असं म्हणून त्या बाकड्यावर बसल्या. मंगळवारच्या बाजारातून फ्रेश मासे घेऊन आल्या होत्या तर त्या छोट्याशा खोलीत “सुगंध” दरवळत होता.

मी घाई-घाईने फाईल्स चाळल्या. मला फाईल काही मिळेना. तो वास आता सहन होत नव्हता.  मी त्यांना सांगितलं, “नाही दिसत आहे फाईल, मी बघून सांगते.”

“होय बघा की. ए मंजू….!” बाई एकदम दाराकडे बघून मोठ्या आवाजात ओरडल्या. दोन क्षण मला छातीत धडधडलं. “ये बाई आतच. ह्या बघतायत फाईल का काय ते.” असं त्यांनी म्हणल्यानंतर अजून एक बाई आली, त्या बेंचवर बसली.

“बाई… आता सासू कोकलत्या बघ माझी. वेळ का केलीस म्हणून.” इति मंजू.

“असू दे गं. बघत्यात ह्या मॅडम फाईल. बस. काय जीव जातोय का तिचा.” इति सुजयच्या मातोश्री.

“कसला जातोय… बरं ते ऐकलंस का… देसायांच्या गल्लीतली बोंब?”

“काय?” सुजयच्या आईचे कान टवकारले.

“अगं ती सुतारांची सून नाही का? त्या बहिणी बहिणी दिल्यात बघ एकाच घरात… तिघी-जणी…”

“होय… एक हिथं असत्या. दुसऱ्या दोघी मुंबईला का पुण्याला हैत न्हवे?”

“हां.. ती थोरली आली न्हवे पर्वा… गाडी घुमवत. धाकटीला दारातनं ओरडून बोलवायला लागली. लई आवाज करायला लागली म्हणून धाकटी बाहेर आली तर हिनं धरल्या तिच्या झिंज्या!”

“आता गं! मग?”

“आणि काय काय बोलायला लागली तिला. तू वाट लावलीस असं कायतर म्हणत होती… गल्ली गोळा झाली आपापल्या दारातनं सगळी बघत होती म्हणे.. मला सुषमी म्हणाली… धाकटी काय बोलत नव्हती. तिची सासू ओरडत होती खिडकीतनंच ‘ए.. सोड तिला… कशाला आलीस…’ थोरलीनं तिला पण दोन शिव्या हासडल्या…!”

“तमाशाच की.. म्हणून म्हणत्यात बघ… एका घरात ३ बहिणी देऊ नयेत. दोघी दिल्या तर चालत्यात पण ३ देऊ नयेत… तीन तिघाडा अन काम बिघाडा…”

जरी हे conversation इंटरेस्टिंग वाटत असलं तरी त्यावेळेस तो वास, त्या दोघींचा आजूबाजूला कोण आहे हे ना पाहता लागलेला टिपेचा स्वर… ह्या सगळ्याने डोकं भणभणायला लागलं होतं. उलटी होईल असं वाटून मी तिथून पटकन उठले आणि लेडीज रूम कडे तरातरा चालत गेले.

मी वॉशरूम मध्ये असतानाच बाहेरचा आवाज आला.

“काय हो अनिता मॅडम… काय म्हणत होता मगाशी?” म्हात्रे बाईंनी इंदूरकर बाईंना विचारलं. (मला सोडून अजून दोनच बायका होत्या.)

“मला वाटतंय ते खरंच आहे असं मला वाटतंय.” (What!)

“काय? निशांतचं का?”

“ह्हा! मगाशी तिच्या नवीन ड्रेसचं कौतुक करत होता, ऐकलंस ना?” (शीट! हि बाई तर माझ्या बद्दल बोलतेय. आणि हिने कधी ऐकलं हे? हिचे कान आहेत कि व्हॉइस बग्स?)

“नाही ओ… काय म्हणे?”

“म्हणे नवीन ड्रेस घातलाय आज… काय विशेष?” (स्वतःचा मसाला?)

“मग… घातला असेल त्याच्याचसाठी! हीहीही…” (शी! ह्या तर माझी जोडी जुळवतायत.)

“बरोबर आहे… आता एवढा सगळा ड्रेसकोड सांगितलाय आपण, मग त्यातून सुद्धा असले कपडे का घालतो माणूस… चर्चा व्हावी… लक्ष वेधून घ्यावं… ह्यासाठीच ना?” (What the F!! चायला ही चाळिशीला आलेली बाई Sleeveless ब्लॉऊज घालून मोठाले दंड दाखवत फिरते तेव्हा? कुणाचं लक्ष वेधून घ्यायचं असतं? नाईक सरांचं?)

मला आता ती फालतू चर्चा ऐकायची नव्हती. मी जोरात दार उघडून बाहेर आले तर दोघी एकदम चपापल्या. एकदम चिडीचूप झाल्या. मी त्यांच्याकडे न बघता हात धुवून बाहेर आले. घाईनं माझ्या क्युबिकल मध्ये जाऊन माझ्या बॅगमधून माझा कळकटलेला स्टोल काढला आणि तो दोन्ही खांद्यावर टाकून धुसमुसत खुर्चीवर बसले. थोडावेळ काहीच सुचत नव्हतं मला. खरंतर एवढं काही मनाला लावून घेण्यासारखं नव्हतं कदाचित, पण मला खूप राग-राग होत होता. त्या दोन बायका निघून गेल्या होत्या, पण तरी तो वास पूर्णपणे गेला नव्हता. मला अचानक ते cubical छोटं वाटू लागलं. भिंतीला लावलेल्या त्या tubes चा कोंदट प्रकाश, डिस्टेम्पर लावलेल्या त्या अंगावर येणाऱ्या भिंती… नको वाटू लागलं. कसंतरी वाटत होतं. मी फोन घेऊन बाहेर गेले आणि आदित्यला फोन लावला. त्याने फोन कट केला आणि त्याचा मेसेज आला “In a meeting.” मी सुस्कारा सोडून पुन्हा आत गेले. दोन्ही बायकांनी माझ्याकडे चोरून बघितल्याचं मला लक्षात आलं.

थोड्या वेळाने निशांत जेवणासाठी बोलवायला आला, मी सांगितलं माझं डोकं दुखतंय.

सगळे जेवायला गेले आणि मी तिथेच टेबलवर डबा उघडून दोन घास कोंबले आणि कोणी नव्हतं तर कॉम्प्युटरवर फेसबूक उघडलं. पहिलाच फोटो तोंडासमोर आला त्यात आदित्य, त्याला चिकटून असलेली एक पार्टीवेअर घातलेली मुलगी, तिच्या पलीकडे अजून २ तशाच मुली आणि त्यांच्या पलीकडे अजून २ मुलं. सगळे कॅमेरा बघून मोठी स्माईल देत होते. मागे रंगीबेरंगी lights होते, थोड्या दूर लोकं नाचतायत. चिकटून उभ्या असलेल्या ताईंच्या हातात वाईनचा ग्लास आहे आणि त्या उंचावून दाखवतायत कि “They are having fun!” मी फोटो टाकल्याची वेळ-काळ बघितली. टॅग केलेल्या पोरींची नावं बघितली. मी actually बराच वेळ तो फोटो पाहिला. बारकाईने पाहिला. मग whatsapp उघडून त्याला मेसेज केला – “रात्री पार्टी सकाळी मिटिंग. छान चालू आहे की.” Sad म्हणजे तो मेसेज त्या क्षणाला गेलाही नाही कारण मी जिथे बसायचे तिथे नेटवर्क चा प्रॉब्लेम होता. तो मेसेज त्याला जावा म्हणून मी उठून बाहेर जाऊन उभं राहिले. मेसेज सेंड झाल्यावर, आत येऊन फोन स्विच-ऑफ करून बॅग मध्ये ठेऊन दिला.

थोड्याच वेळात निशांत आणि जाधव सर आले. निशांतने पुन्हा चौकशी केली, “बरं वाटतंय का आता?”

मी “हम्म” असं उत्तर देऊन समोरच्या एक्सेल-फाईल मध्ये बघत बसले. मी शून्यात नजर लावून बसले होते. पांडुमामा सगळ्यांना दुपारचा चहा घेऊन आले. थोड्या वेळात मागे जोरजोरात हसण्याचा आवाज आला – ‘जनता माफ नही करेगी’ वरचे जोक्स एकमेकांना दाखवून निशांत, जाधव सर आणि पांडुमामा हसत होते. थोड्याचवेळात जोक्सनी चर्चेचं रूप घेतलं. मग कुणी कसं देशाचं नुकसान केलंय, कुणी कसं महाराष्ट्राला वाळीत टाकलंय, कुणी किती ह्या शहरासाठी झटलंय असे बरेच विषय बाहेर आले. अर्थात मला त्यात इंटरेस्ट नव्हता आणि मला कोणी त्यात सहभागी करून घेणारेही नव्हते. मी फोन काढला आणि स्विच-ऑन केला. थोड्या वेळात नेटवर्क आल्यावर आदित्यचे स्वतःला एक्सप्लेन करणारे ३-४ मेसेजेस आले होते. मी वाचून रिप्लाय न करता फोन डेस्कवर ठेवला. तेवढ्यात ‘माई’चा फोन आला. माई मला शुक्रवारच्या पूजेला तिच्याकडे बोलवत होती, तिसऱ्या शनिवारची सुट्टी धरून ये म्हणत होती. मी “बघते” म्हणून फोन ठेवला.

सुरुवातीला जितकं कौतुक होतं तितकं राहिलं नव्हतं आता. ह्याआधी कशावर बंधन न घालणारी माई मला थोड्या ‘वळण लावण्याच्या’ गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत होती. मला आता कसं सगळं जेवण जमलं पाहिजे, कसं सगळ्या गोष्टींचं शास्त्र माहित असलं पाहिजे, आमच्याकडे कुठले सण कशा पद्धतीने करतात, कुठला उपवास धरायचा, अगदी पुराणपोळ्या कशा लाटायच्या वगैरे… अर्थात त्यामागे तिची मायाच होती. पण त्या वेळेला ते कळत नसतं.

फोन ठेवल्यानंतर मला अजूनच एकटं वाटू लागलं. काम तर आवडण्यासारखं काही नव्हतंच, कि त्यात मन गुंतवून घ्यावं. घड्याळात ५ कधी वाचतायत ह्याची वाट मी बघत बसले.

And this was just another Thursday!

“Oh! Interesting…” शोभा माझी रामकहाणी ऐकून म्हणाली. “So, from what I understand तुला तिथलं काम आणि लोकं आवडत नव्हती… तू त्या सगळ्या premiseला bore झाली होतीस… right?”

“Yes… Sort of!”

“Hmm… I see… अंजली… तू ना बोलता बोलता एक म्हणालीस, something like  तुझ्या माईंच्या तसं वागण्यामागे… अं… त्यांची माया होती.. पण त्यावेळेस ती कळली नाही… right?”

“हो. पण त्या त्या वेळेत वाटणाऱ्या स्ट्रॉंग फीलिंग्स पण महत्वाच्या नाहीत का?” तिच्या प्रश्नाचा रोख समजून मी म्हणाले.

“नक्कीच आहेत. पण मला असं वाटतंय की हि करिअर change ची गोष्ट केवळ त्या वेळापुरती राहिली नाहीए. You are still carrying those feelings towards Aditya. थोड्याफार प्रमाणात! You vividly remember how you felt alone, आदित्य कसा त्याच्या आयुष्यात रमला होता etc… मग आताच्या कसल्याही inconvenience मध्ये तुला त्या feelings परत जाणवतात…”

“हं.”

“तुझं माईंबरोबर आता कसं पटतं?”

“म्हणजे?”

“म्हणजे… तुमचं रिलेशन आता आधी सारखं आहे? का अजूनही तुला त्यांच्याकडे जायला नको वाटतं?”

“नाही नाही… उलट आता आमच्या फोनवर पण मस्त गप्पा होतात… ते त्या थोड्या काळापुरतंच होतं…”

“Exactly… So, तुझ्याकडे लक्ष न देणं, तुला एकटं वाटवून देणं, तुला नीट समजून न घेणं… हे देखील थोड्या काळापुरतंच होतं ना?” वही बंद करत शोभा म्हणाली.

मी खिडकीकडे बघत नुसतीच मान हलवली.

सत्र पाचवे

रात्रीचे ११.०० वाजले होते, आमच्या कंपनीतल्या एका टीमच्या मॅनेजरचा – ‘प्रवीण’चा अर्जंट कॉल आला, HR ला येणारे कॉल तसे अर्जंटच असतात. अर्जंट काही नसलं की आम्ही अस्तित्वात आहोत की नाही ह्याने फार फरक पडत नाही… रांगोळीचा जोक मारायला मोकळे! (HR Rangoli Memes असं सर्च करून बघा.)
तर ‘प्रवीण’ना त्यांच्या असोसिएटचा अचानक resignation चा email आला होता. आता लगेच कसं करायचं, प्रोजेक्ट प्रायॉरिटीज कशा manage करणार, तो मुलगा आधीपासूनच cooperating नव्हता, त्यांचं कसं चुकलं नाही हे त्यातून आडा-आडाने सांगायचा ते प्रयत्न करत होते. मीदेखील जॉबमध्ये तशी नवीनच होते. हा एम्प्लॉयी मागे एकदा माझ्याशी भांडायला आला होता, त्याच्या ‘Year-end परफॉर्मन्स रेटिंग’ वरून, ते मला आठवलं. पण त्यावर मी काय actions घेतल्या होत्या त्याच आठवेनात. काही सुधरेना म्हणून मी त्यांना ‘सकाळी बोलू’ असं सांगून फोन ठेवला.  एवढया रात्री फोन आला म्हणून घरातले सगळेच माझ्या तोंडाकडे बघत होते. आदित्यकडे बघून मी थोड्या टेन्शन मधेच सगळं कॉन्व्हर्सेशन सांगितलं. त्याने मला सोफ्यावर बसवून नीट समजावलं… There is no shame in getting help from a Senior… वगैरे सांगितलं. — ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट.

तेच मागच्या वर्षी जेव्हा appraisal च्या काळात फार थांबावं लागत होतं. वेळी-अवेळी फोन चालत होते, तेव्हा मी इर्रिटेट झाल्यावर तो म्हणाला होता. “It’s your job!” मग त्यावरून कडाक्याचं भांडण झालं होतं रात्री १२ वाजता. ३ वाजेपर्यंत ना काम झालं ना झोप. दोन दिवस रुसून फुगून काढल्यावर तिसऱ्या दिवशी सॉरी वर गाडी घसरली होती…

काल मी १.३० वाजेपर्यंत कॉल मध्ये बसले होते. एक मॅनेजर ऑन-साईट गेला होता तर त्याच्या सगळ्या टीमची वाताहातच झाली होती. appraisal च्या वेळी आम्हाला फारच तर होत होता. कारण तो नॉर्मल वेळच्या मिटींग्सना नसायचा. आणि मग आता त्याच्या वेळेनुसार मला adjust करावं लागत होतं. अर्थात ही काही complaint करण्याची गोष्ट नाहीए. It IS my job! पण खटकलं ते त्याचं दार लावून आत झोपून टाकणं. माझ्या अश्या अचानक लेट थांबण्याबद्दल concern तर नव्हताच, पण आता तर भांडण्यासाठी सुद्धा संवाद करायची गरज वाटत नव्हती त्याला.

“शोभा, I don’t think it’s working out! ‘तो’ पूर्णच चेंज झालाय असं वाटतंय मला. असं कसं शक्य आहे continue करणं. उगाच ओढून ताणून दिवसातून ४ शब्द बोलून कसं निघू शकतं आयुष्य?? It’s not… It’s not going to…”

मी डोकं हातात धरून म्हणाले.

“अंजली… calm down… it’s OK …” तिने माझ्यासमोर पाण्याचा ग्लास पुढे केला. “Don’t over-analyze it. कदाचित त्याला तुला डिस्टर्ब करायचं नसेल. तू बोललीस का त्याच्याशी कि तुला कामाचा त्रास होतोय?”

“मी काय बोलणार? माझं काम वर्षातून २-३ वेळा जास्त असतं. त्याचं काम नेहमीच जास्त असतं. पुन्हा इट्स युअर जॉब वगैरे कशाला?”

“पण तू बोलली असतीस तर आपल्याला त्याचा रिस्पॉन्स कळाला असता… तू assume का केलास?”

“ते नाही होत माझ्याकडून… पण म्हणून त्याने काहीच कसा काय कन्सर्न नाही दाखवयचा?? गेले तीन-चार महिने तर तो फारच असा विचित्र वागतोय… कधी कधी अचानक चांगला वागतो आणि कधी कधी काहीच फरक पडत नसल्यासारखा. आणि मला नाही माहित काय करायचं ह्यावर… “

“त्याचं पण काहीतरी confusion चालू असेल डोक्यात… पण, आपण मागे बोललो होतो, की कॉन्व्हर्सेशन तुही सुरु केलं पाहिजेस….”

मी दुसरीकडे बघत काहीच बोलले नाही.

“तुम्ही थोडंसं ‘distancing’ ट्राय करून बघू शकता का? म्हणजे I can see कि तुम्ही खूप दिवस सतत एकत्र आहात… थोडंसं वेगळ्या लोकांशी भेटून त्यांच्यात राहून तुला स्वतःला पण better वाटेल.”

“मग काय? माझ्या घरी जाऊ? माहेरी? की awkward solo ट्रिप?”

“तुझ्या घरी? किंवा माईंकडे?”

“नाही जाऊ शकत.”

“May I ask why?”

“काय करू जाऊन? काय सांगू? आमची भांडणं होतायत, आम्हाला एकत्र राहायचं नाही?”

“ते सांगायची काही गरज नाहीए ना… you can just visit your parents. I think so…”

“मी तुम्हाला सांगितलं होतं ना… घरातल्या सर्वांना पसंत असलेल्या, माझ्या लक्ष्मीला नारायण शोभून दिसेल अशा ‘समीर बेळगावे’ बरोबर माझी एंगेजमेंट झाली होती…”

“तू ठरली होती असं सांगितलं होतंस… I think so…”

“झाली होती.”

“oh…”

एंगेजमेंट झाल्यानंतर काही दिवसांनी मी माझ्या मैत्रिणींना – २-कॉलेजच्या आणि शाळेतल्या दोघी अजूनही close friends आहेत – त्यांना बोलावलं होतं. एकमेकींना भेटून खूप दिवस झाले होते आणि मी announcement म्हणून “I said Yes!” चा अचानक फोटो टाकला तेव्हा सगळ्या उतावळ्या झाल्या. ब्रेक-अप बद्दल त्यांना माहित होतं. सो ही गोष्ट सेलिब्रेट करायची म्हणून सगळ्याजणी एकत्र आल्या होत्या… नाईट-आऊट की स्लीप-ओव्हर ठरला. केक वगैरे घेऊन आल्या होत्या… congratulations वाला!

नमूचं लग्न झालं होतं, कॉलेजवाल्या सायली, निकिता, इशा ह्यांचे बॉयफ्रेंड्स होते.. लवकरच लग्नाचा विचारही होता… चिनू आमची नर्डू-बाई राहिली… मग माझं आणि माझ्या “fiancé” चं कौतुक करून झालं… मग हळू हळू सगळ्या कंफर्टेबल झाल्या… आणि १-ग्लास झाल्यानंतर चिनू मात्र जरा पेटलीच.

यार… तुमचं भारी आहे सगळ्यांचं… माझे आई-बाबा मला कसलेही Bio-data आणून देतात. म्हणजे हिचं तर बघा… ब्रेक-अप झालं नाही तोवर अजून भारी मुलगा मिळाला… नशीब आहे हं तुझं अन्ने!”

मी काहीच बोलले नाही, मग ‘नमू’ने तिच्याकडे डोळे वटारून पाहिलं आणि म्हणाली, “चिने… तुला ना कुठं न्यायला नको बघ…”

सगळेच शांत झाले आणि awkwardly आपापल्या ग्लास मधून सिप घेतला.

“Hey!” शांततेत निकिता एकदम ओरडली. “मी एक गेम प्लॅन केलाय… आणि ‘सायी’ने पण… पण आपण आधी माझा खेळू… Never have I ever!”

गेम तसा boreअसतो. पण काहीतरी विषय काढून गप्पा होतात. इतरवेळेस चर्चेला उबगलेल्या मला आज मात्र गप्पा मारायच्या होत्या, काहीही फालतू विषयावर… गेले सहा महिने मी कुणाशी काय बोललेय हे आठवत नव्हतं.

चला!” म्हणून गेम सुरु झाला आणि चिनुने पहिलीच सोंगटी टाकली, “I have never kissed a boy.” (बिचारी!) आणि तिला माहीतच होतं की we all have…  मग ‘किस्से’ सांगा म्हणून मागे लागली.

आणि ना… त्याचा प्लॅन ठरला होता मित्र-मैत्रिणींचा लोणावळ्याला जायचा. मग मी अंकिताला माझ्या तेव्हाच्या रूममेटला पटवून ठेऊन गेले होते. घरचा फोन आला तर काय सांगायचं वगैरे…” नमू आपला किस्सा अगदी रंगवून सांगत होती.

पण तुमची एंगेजमेंट तर झाली होती ना तेव्हा…” सायलीने प्रश्न केला.

हो… पण तू आमच्या पप्पांना भेटली नाहीयेस. लग्नाआधी असं आम्ही भेटतो वगैरे कळालं असतं तर झालंच असतं… मग तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे कसं मुलींना एक रूम घेतली होती आणि मुलांना एक, जास्त नव्हतो मुली आणि मुलं! मग मुली-मुली गेलो रूम मध्ये आवरायला आणि मी बाथरूम मधून बाहेर आले तर रूम मध्ये सगळा अंधार! मी त्यांना हाक मारतेय.. मग चाचपडत light लावली तर स्वप्नील तिथे. ह्या सगळ्यांना बाहेर पाठवून बसला होता. मग पुढचं समजून घ्या आता…” शेवटच्या वाक्याला नमू अगदीच लाजली!

मग एक एक करून निकिताचं कॉलेजच्या फेअरवेल पार्टीनंतर, सायलीचं कोणी घरी नसताना, इशा तर एकटीच फ्लॅटमध्ये राहायची… असे सगळ्यांचे लाजत-बीजत किस्से सांगून झाले. मग सगळ्या माझ्या तोंडाकडे बघू लागल्या.

तुमचं सगळ्यांचं छान छान रोमँटिक आहे गं… मी तर रडत होते!” मी सांगितलं.

काय?” सगळ्यांनीच एकदम आश्चर्याने विचारलं.

तो जाणार होता, आणि अजून वर्षभर तरी आमची भेट होणार नव्हती. खूप कष्ट करून बिल्डिंगच्या मागच्या झाडांमध्ये भेटलो. त्याने माझ्यासाठी छोटा टेडी-बेअर आणला होता. तो बघून मी रडायलाच लागले. कधी भेटणार आपण! म्हणून… हाहा… त्याआधी जणू काय रोज भेटत होतो! पण जवळ होतो हे माहीत होतं. मी रडताना बघून तो जवळ आला आणि माझे डोळे पुसले. हळूच एक kiss करून बाजूला झाला. मी थोडावेळ हँग झाले. “अजून एकच वर्ष मग.. आपलं ठरलंय, हो ना?” मी मान डोलावली. मग कुठून तरी कुणाच्यातरी चालण्याचा आवाज आला तर आम्ही चट्कन तिकडून पळालो… तो टेडी बेअर बरेच वर्षं होता माझ्याकडे… कुठे हरवला नंतर… खूप ठिकाणं बदलली राहण्याची…”

बरेच वर्षं? कुणाबद्दल बोलतेयस तू?” निकिता म्हणाली.

आदित्यबद्दल!”

“oh… अं… आम्ही तुला समीरचं विचारत होतो.” ईशा म्हणाली.

“Oh! … नाही… we haven’t kissed…”

अच्छा…” पुन्हा सगळे awkward silence मध्ये गेले.

अगं म्हणजे आम्ही फार भेटलोच नाही आहोत. ” मी उठून रूम मध्येच चालायला लागले.

का?” नमू

का…? असंच.” मी तिच्याकडे बघताच सांगितलं.

तो इथेच राहतो ना.. म्हणजे पुण्यातच ना…?” नमू

मग काय भेटणं गरजेचं आहे का दर वीकेंडला?” मी थोडीशी इर्रिटेट होऊन म्हणाले.

ऐक ना अनू… तू का करतेयस लग्न?” चिनुने विचारलं.

का करतेस म्हणजे? करायचं असतं म्हणून करतेय?”

हे बघ अन्ने… इतके वर्षं सगळं मनाचं करत आली आहेस ना? मग हि गोष्ट अशी का करतेयस?” तिने आपला ग्लास खाली ठेऊन एकदम सिरियस चेहरा करून विचारलं.

का? तूच म्हणत होतीस ना मगाशी मी किती lucky आहे वगैरे… लगेच इतका भारी मुलगा मिळाला…”

मी गम्मत करत होते.”

मी पण गंमत म्हणूनच लग्न करणारेय मग!”

“Don’t be Silly Anjali…” ईशा म्हणाली, “This is a lifetime decision.”

“SO? नमू… तू केलंस ना arranged मॅरेज? तू झालीस की settle.  चिने तू पण तेच करणारेस…”

हो पण आम्ही आधीपासूनच त्या गोष्टीसाठी रेडी होतो ना… तुझं तसं नाहीए…” नमू म्हणाली.

हो… म्हणजे we know, it’s not out place to say anything… पण तू एकदा विचार कर.” सायली म्हणाली, “Actually आम्ही गाडीतून येताना हेच बोलत होतो की किती चांगलं झालं की, you moved on so early… which is good… पण असं नाहीए वाटत. Don’t do something like this out of spite.”

काय करू मग?” मी एकदम खाली बसले. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्या बोलत होत्या ते सगळंच खरं होतं. मला नव्हतं माहित मी हे का करतेय. रडत रडत मी त्यांना आदित्यबरोबरच्या abrupt ब्रेकअप बद्दल  सांगितलं. मी घरी काहीच कल्पना दिली नव्हती आणि सरळ हो म्हणाले हे सांगितलं.. त्यांनीही मला मुर्खात काढता मला समजावलं. माझा डिसीजन काहीही असला तरी त्या कधीच judge करणार नाहीत वगैरे सांगितलं.

थोड्या वेळाने शांत होऊन मी मोबाईल हातात घेतला. आदित्यचा नंबर type केला, आणि save केला. सरळ SMS केला. “Hi, कसा आहेस?” रात्रीचे वाजले होते. उद्या सकाळी रिप्लाय येईल म्हणून फोन बाजूला ठेवला तर थोड्याच वेळात रिप्लाय आला. “hi, तू कशी आहेस?”

मी… मी मूर्ख आहे.” मी रिप्लाय केला. तर त्याचा अचानक कॉलच आला.

मी उचलून बेडरूम मध्ये गेले. तासभर बडबड करून झाल्यावर मी बाहेर आले तर जणी पेंगत होत्या. बाकी आपापल्या मोबाईल वर होत्या. मी चिनूला खेटून बसले आणि म्हणाले, “चिने… घरी तमाशा होणारेय बघ!”

का?” तिने डोळे मोट्ठे करून विचारलं.

मी आदित्यला प्रपोज केलं…”

“Whaatttt!!” म्हणून चिनू ओरडली तेव्हा सगळ्याच टक्क जाग्या झाल्या.

“He said yes!” असं म्हणताच सगळ्यांनी एकच गलका केला.

मगाशी औपचारिकपणे खाऊन उरलेला केक नमू घेऊन आली. “आत्ता खरं congratulations!!” असं तिने म्हणताच सगळ्यांनी केकवर सरळ आडवा हात मारला.

तोबरा भरून चिनू म्हणाली, ” मगाशी उगाच खोटं खोटं कौतुक केलं मी त्या समीर-फिमीरचं… तसा मला आदित्यच आवडतो!”

मग त्यानंतर घरच्यांची बरीच बोलणी खाल्ली. पुढचे ६ महिने त्यांना convince करण्यात गेले.  माई रडली, आई रडली, आज्जी रुसली, बाबा रागावले… शेवटी आदित्यच्या आई-बाबांनी मध्ये पडून माझ्या घरच्यांना समजावलं. तरी बरं माझी आणि समीरची एंगेजमेंट फार गाजावाजा करून केली नव्हती. पण ते सहा महिने घरातल्यांना फारच त्रास झाला माझ्यामुळं.

मग आता कशी जाऊ एकटी? मला मी आनंदी आहे हे दाखवलंच पाहिजे. आणि ते समोरासमोर नाही जमणार. फोनवर खोटं बोलू शकते… समोर नाही.”

शोभाने वहीत काहीतरी लिहून घेतलं.

पुन्हा थोड्यावेळाने मीच म्हणाले, “मी म्हणलं होतं ना… निर्णय चुकले की असं होतं? आणि मला अशी घाण सवयच लागली आहे. घाईत काहीतरी ठरवून टाकायचं, करून टाकायचं आणि नंतर पश्चाताप करायचा.

कधी कधी वाटतं, तो चान्स घ्यायला हवा होता. समीरशी लग्न करायला हवं होतं. आज माझं घरच्यांशी चांगलं असतं. सांभाळायचं तर आदित्यच्या पण घरच्यांना होतं, so तेही काही वेगळं नव्हतं. पण इथं आधीच सगळं माहित होतं.  तिथे एकप्रकारचं नावीन्य असलं असतं. त्या रात्री मी तो फोन केला तो माझा मूर्खपणा होता.”

हलकीशी मान डोलावून शोभा म्हणाली, “So अंजली, तू आत्ता मला जे सांगितलंस त्यावरून I could see that, त्या काही महिन्यांमध्ये तू त्याला विसरली नव्हतीस, थोडा वेळ गेल्यानंतर तुला तुमच्या चांगल्या आठवणी येत होत्या. तोदेखील तुला विसरला नव्हता, move on झाला नव्हता. And what happened that night was a moment of clarity for both of you. पण त्यानंतर ते आत्ता ह्या मोमेन्टला तुला त्यावर परत question करावं वाटतंय. I think we should take some more time to discuss it.”

सेशनची वेळ संपली होती.

तिथून परत जाताना रिक्षात बसून मला का कोण जाणे रडू फुटत होतं. काही वर्षांपूर्वी मी इतकं विचित्र, मूर्खासारखं वागूनही तो माझ्यावर प्रेम करत होता, आता काय झालंय नेमकं की सगळं संपतंय असं वाटतंय?

सत्र सहावे

“तू Visa साठी अप्लाय केलंयस?” बाहेरच्या खोलीत येत मी विचारलं.

‘गरम-पेया’चा ग्लास हातात घेऊन, लॅपटॉपला हेडफोन्स लावून काहीतरी बघण्यात तो मग्न होता.

मी प्रश्न विचारल्याचं त्याला कळलंही नव्हतं. मी सोफ्याजवळ जाऊन त्याचा खांदा हलवला. मग त्याने हेडफोन्स काढले आणि माझ्याकडे बघितलं.

“अजून गेले नाहीए मी… दुःखात एकट्याने दारू पीत बसायला!” मला विचारायचं होतं एक, पण जीभेला आधी टोमणा मारून घ्यायचा होता.

“आहे ते दुःख पचवायला म्हणून पितोय.” तोदेखील शिकला होता आता. माझ्याच संगतीचा परिणाम!

“एवढंच दुःख होतंय ना…? म्हणून तर सांगितलं होतं, decision घेऊन टाक. वेगळे झालो असतो, तर आता तुला पिताना थांबवणारंही कोणी नसतं आणि कुठे चाल्लायस वगैरे विचारणारंही कोणी नसतं.”

“ऐक ना… तुझं झालं असलं तर मी माझं सिरीयल बघू का?” त्याने माझ्याकडे थंड चेहऱ्याने बघितलं.

“का? इतर वेळेस तर कॉन्व्हर्सेशन महत्वाचं असतं की तुझ्यासाठी.”

“बोलायचं आहे का तुला… चल बोलूया.” त्याने गळ्यातले हेडफोन्स खेचून काढले आणि लॅपटॉप ढकलून तो माझ्याकडे बघत म्हणाला. त्याच्या टोनवरून तो चिडलाय हे मला कळलं होतं. पण मलाही आता पडती बाजू घेऊन गप्प बसायचं नव्हतं… काय व्हायचं ते होऊ दे!

“तू visa ला अप्लाय केलंयस? चांगलं आहे की… स्वतःची सगळी जोडणा करून घेतोयस तू, आणि मी मुर्खासारखी त्या “सेशन्स”ना जात बसलीय. स्वतःच्या करिअरची तर मी वाट आधीच लावून घेतली आहे.”

“कुणी सांगितलं तुला?”

“माझ्या बाबांनी! आणि हो! हेही छान आहे तुझं. मला सांगणं गरजेचं नाहीए. माझ्या घरच्यांना सांगून मोकळा झालास.  हे पुढचं पण सांगितलंस का? कि आपण ‘वेगळे’ होणार आहोत? oh…! नाही नाही… आत्ता मला कळालं. हा पण प्लॅन तू आधीच करून ठेवलायस. मला अचानक सांगायचं कि आता मी चाललो USला आणि मग माझं करिअर धाब्यावर बसवून मी यायचं तुझ्यामागे. पण तसं असेल ना तर तो तुझा गैरसमज आहे. मी नाहीए येणार कुठेही.”

“मी नाही चाललोय.” तो उठला आणि किचन मध्ये गेला.

“काय?” मी अर्धवट ऐकल्यासारखं विचारलं आणि त्याच्या मागोमाग गेले.

“मला तिकडचा एक प्रोजेक्ट मिळाला आहे आणि ६ महिन्यांसाठी तिकडे जायचं होतं. पण मी नाही म्हणून सांगितलं.”

“का?”

“नाही माहित मला” त्याने ग्लास मधली व्हिस्की सरळ सिंक मध्ये ओतली.

“का?”

“मला नव्हतं जायचं.” असं म्हणून त्याने नळ चालू करून ग्लास मध्ये फस्सकन पाणी सोडलं ते त्याच्या शर्टावर उडालं. चिडून एक तोंडातल्या तोंडात एक ‘Fuck!’ म्हणून तो बाहेर गेला.

मी मागे मागे जात विचारलं, “तुझ्यासाठी हे वर्ष महत्वाचं होतं ना पण… मॅनेजर व्हायचं. मग? माझ्यासाठी? आपल्या रिलेशनसाठी? एवढे उपकार केलेस तू?” माझा राग काही उतरत नव्हता.

“नाही. तुझ्यासाठी नाही. स्वतःला एवढी राणी समजू नकोस, कि सगळं तुझ्यासाठी करतील लोक.” नॅपकिन घेऊन त्याने ते शर्टावरचं पाणी पुसायचा प्रयत्न केला पण ते अजूनच पसरत होतं. इर्रिटेट होऊन त्याने तो नॅपकिन खाली फेकला आणि तसाच ओला शर्ट घेऊन सोफ्यावर बसला, आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, “आणि तुला ही गोष्ट नाही सांगितल्याचा राग येतोय? तुला?? तू अजिबात काही लपवत नाहीस ना माझ्यापासून. सगळं खरं खरं चालू असतं तुझं. नाही का?”

“काय लपवलंय तुझ्यापासून मी? मला असले उद्योग करायची काही एक गरज नाहीए”

“एवढा परका झालोय मी? काय केलंय काय गं मी असं?? की तू अशी वागतेस माझ्याशी? मी visaचं सांगितलं नाही म्हणून विचारतेस मला? साधं आपल्याला बाळ हवंय की नाही ह्यावर माझं मत पण नको आहे तुला?”

“काय?? बाळाचा विषय कुठून आला मध्येच?”

“का? तू नव्हतीस गेली अबॉर्शन करायला?”

मी डोळे फाकून त्याच्याकडे थोडावेळ बघत राहिले. “कसलं अबॉर्शन? What the f**k are you accusing me of?”

“तू 3 महिन्यांपूर्वी gynae कडे का गेली होतीस मग?”

मी डोकं चोळत म्हणाले, “तुला कसं कळालं?”

“त्या हॉस्पिटल मध्ये माझा ई-मेल id आहे. इतकं सगळं चोरून करायचं होतं तर ती पण काळजी घ्यायची ना अंजली”

“मी काही चोरून करत नव्हते. माझे पिरीयड्स लेट झाले होते, आणि I was sure की असं काही नाहीए, पण कुठल्या गोळ्या घेण्याआधी I just wanted to confirm.”

“आणि ही गोष्ट मला सांगण्याच्या लायकीची नाहीए? की तू फार इंडिपेन्डन्ट आहेस आता तर माझी गरज नाही?”

“हे बघ आपल्यात आधीच खूप प्रॉब्लेम्स चालू होते… हे आणि नवीन त्यात add करायचं नव्हतं मला?”

“प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स…  तुझं हे असलं वागणं प्रोब्लेमचं रूट आहे असं नाही वाटत तुला?” तो सोफ्यावरून ताड्कन उठला आणि रागात त्याने अंगातला ओला शर्ट काढून फेकला टीपॉयवर फेकला.

“कसलं वागणं, आदित्य? नाही मला पण कळू देत, कशी काय हि सगळी चूक माझीच आहे” मी एकाच ठिकाणी, कमरेवर हात ठेऊन उभी होते.

कसलासा विचार करत तो त्या फेकलेल्या शर्टकडे बघत होता. माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याने मलाच प्रश्न केला, “जर त्या दिवशी तुला कळालं असतं की बाळ आहे तर काय केलं असतंस?”

“नाही माहित मला!” मी चिडूनच बोलले.

तो अजून खालीच बघत होता, “म्हणजे तुला नको होतं… हो ना?”

“तो विषयच नाहीए चालू आता….”

“मग कशावर बोलायचं अंजली?” आता त्याने माझ्याकडे बघितलं, “काय खुपतंय त्यावर बोलायचंच नाही म्हणून इतके दिवस गप्प बसलोय ना. तुला अजूनही असंच वाटतंय ना की मी माझ्या हातात steering ठेऊन आपलं सगळं चालवतोय?”

“हो वाटतं मला तसं…”

“पण नाहीए तसं… कारण मला दोष देणं सोपं आहे. तोंडावर, मनातल्या मनात… आणि स्वतःच्या गोष्टींना काणाडोळा करून तू खुश आहेस”

“मी खुश आहे… मला हे सगळं आवडतंय… वाह! म्हणजे तुझ्या आयुष्यातली डायन आहे म्हण की मी”

“कशाला तिरके शब्द वापरतेस…”

“मी तिरके शब्द वापरतेय? तू मला दोन महिने हि गोष्ट पोटात ठेऊन आज विचारतोयस, मला accuse करतोयस की मी अबॉर्शन करायला गेले होते, माझ्या चुका मला दिसत नाहीत आणि मी फक्त तुला दोष देऊन खुश राहते… आणि तुझं काय आहे? तू मला कशासाठीच दोष देत नाहीस?”

“नाही… कारण सगळ्या चुका माझ्याच असतात ना अंजली… मी तुला करिअर बदल म्हणलं ही चूक, का कारण मला वाटत होतं की आपल्याला एकत्र राहता येईल. मी इथे घर घेतलं हि चूक, आई-बाबांना इथे आणलं ही चूक…

“आणि त्यांना इथून घालवलं ही माझी चूक!”

तो डोकं हातात धरून बसला आणि म्हणाला, “कधी कधी वाटतंय हे लग्न करून चूक केली!!”

“बोललास ना मनातलं… थँक्स!”

“तुला जो विचार करायचा तो कर… मला नाही अजून विनवण्या करायच्या” तो पुन्हा लॅपटॉप कडे वळला.

मी बेडरूम मध्ये गेले आणि दरवाजा खाड्कन लावून आतून कडी लावली.  झोप तर लागणार नव्हतीच. पण तोंड नव्हतं बघायचं एकमेकांचं. झोपेल तो गेस्ट बेडरूम मध्ये.

ठकठक! दरवाज्यावर त्याने बोट आपटलं. “अनु… उघड दरवाजा. मला बाथरूमला जायचंय.”

“दुसऱ्या बाथरूम मध्ये जा.”

“माझा साबण त्या बाथरूम मध्ये आहे.”

“दुसरा साबण वापर मग…”

“जोरात आलीय मला… उघड प्लिज!”

मी दरवाजा उघडला आणि न बघता बेडकडे जाऊ लागले तेवढ्यात त्याने तसंच मला मागे खेचलं. मागूनच मिठीत घेतलं, मी सोडवायचा प्रयत्न केला पण तशी ताकद जास्त आहे त्याला. माझ्या खांद्यावर हनुवटी टेकवून तो म्हणाला “सॉरी!”

“मग तसं का म्हणालास मला?”

“मला पण राग आला… तू कधी कधी फार तिरकं बोलतेस…”

“Hmm… सॉरी!” माझा पारा देखील वितळला आणि मी उलट फिरून त्याच्या कुशीत शिरले.

मागे कधीतरी झालेल्या भांडणाचं aftermath मला आठवत होतं.

आज मी परत दाराकडे बघत बसले. पण काही हालचाल झाली नाही. थोड्यावेळाने उठून मीच दरवाज्याची कडी काढली. पण बराच वेळ तो आला नाही. तासाभराने उठून, मधल्या खोलीत मी डोकावून पाहिलं. तो तिथे झोपला होता.

नव्हता फरक पडत आता त्यालाही… कितीही भांडलो तरी रात्री एकमेकांना जवळ घेऊन झोपायचं हा नियम बनवला होता आम्ही लग्नानंतर काही दिवसांनी. घरात त्याचे आई-बाबा असल्यामुळं नीट भांडता यायचं नाही. बाहेर फिरायला जायचं निमित्त करून वाद घालून परत यायचो. पण रात्री एकमेकांच्या जवळ गेल्याशिवाय चुकल्यासारखं वाटायचं. म्हणून असा नियम केला होता. वीकएंडला दोघांना आवडतील अशा काही गोष्टी आठवणीने करायच्या, असाही नियम बनवला होता. हे सगळे नियम कधीच विसरून गेले, विरून गेले. आज दुसऱ्या खोलीत झोपायला त्यालाही काही वाटत नाही. आणि मलाही माघार घेऊन त्याला जाऊन चिकटायची इच्छा होत नाही.

का असं घाण विस्कटून ठेवलंय आम्ही सगळं.

लग्नानंतरचे सहा महिने नीट गेले. पण माझ्या डोक्यातले पूर्वग्रह अधे-मध्ये डोकं वर काढत असायचे. कदाचित आदित्यच्या आईचंदेखील तसंच होत असेल. मुलावरच्या प्रेमापोटी त्यांनी लग्नात मदत केली होती. पण त्याला त्या आधी वर्षभर दुखावल्याचं दुःख त्यांनाही सलत असेल, त्याने ब्रेकअप नंतर काय सांगितलं होतं माहित नाही. पण मला त्यांच्या मुलावरच्या अति-प्रेमाबद्दल जरा रागच होता. त्यामुळं असेल कदाचित, पण मला वाटायचं की माझी घुसमट होतेय. ‘स्पष्ट पण सौम्य’ शब्दांत बोलणं जमायचं नाही तेव्हा. (Huh! आणि माझं प्रोफेशन HR आहे!) मग नुसतेच डोक्यात विचार आणि मग जास्त झालं की खट्कन तोंडातून काहीतरी निघून जायचं.

साधारण वर्षभर चाललं हे असं, मग एक दिवशी त्याच्या आई-बाबांनी “एक गोष्ट बोलायची आहे…” असं म्हणून आम्हाला बोलावलं आणि ‘ते गावी राहायला जातायत’ असं सांगितलं. आदित्यने फार विनवण्या केल्या. मी कदाचित तितक्या केल्या नाहीत. करायला हव्या होत्या का?

कदाचित त्यांच्याशी हक्काने बोलले असते तर… सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून…  तो हक्क दाखवण्यासारखं आपण सासरच्यांना जवळचं का मानत नाही कुणास ठाऊक. कदाचित लहानपणापासून घरी तेच बघितलेलं असतं. सासूच्या सासूने देखील तेच केलेलं असतं.
वेळ उलटून गेली होती. डोक्यावरुन पाणी की काय म्हणतात तो प्रकार होता आता.

झोप लागलीच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी बॅग भरली. जेवण बनवत असताना आदित्यच्या बाबांचा फोन येत होता. मी उचलला नाही. हा अजून उठलाच नव्हता. मी मधल्या खोलीत जाऊन ओरडून सांगितलं, “तुझ्या घरच्यांचा फोन येतोय!” तसा तो खडबडून उठला. तोंड खळबळून येऊन सोफ्यावर बसत त्याने घरी फोन लावला.

“हो… जरा लेट झाला झोपायला…”

“ती काहीतरी कामात आहे…”

“अं… हो त्याबद्दल तुम्हाला सांगायचं राहिलं पप्पा… नाही जमणारेय आम्हाला यायला.”

अचानक मला आठवलं, उद्या माझ्या ‘in-laws’ ची anniversary होती, गेल्या आठवड्यातच फोन करून त्यांनी सुट्टी काढून या म्हणून सांगितलं होतं. आदित्यदेखील एक्सायटेड होता. कालचं भांडण झालं नसतं तर कदाचित जाऊन खोटं-खोटं नाटक करून आलो असतो कि आम्ही कसे खुश आहोत.

पण आज त्यानेच नाही म्हणून सांगितलं.

“नाही… माझंच जरा अर्जंट काम आलंय. त्यामुळं जमणार नाही यायला.तुम्ही करून घ्या सगळं नीट, जमल्यास बघतो पुढच्या आठवड्यात येऊन जाईन मी.”

त्याने तुटक सांगून फोन बंद केला.

मी किचन-कट्टा आवरून जेवण टेबलवर ठेऊन, आत कपडे बदलायला गेले. तो अचानक बेडरूम मध्ये शिरला, माझ्याकडे न बघताच बाथरूम मध्ये जाऊन त्याने स्वतःचा ब्रश आणला आणि बेडरूमचं दार लावून बाहेर गेला.

मी आरशात स्वतःला बघितलं. एक निसटतं हसू स्वतःवरच्याच दयेच्या रूपात सुटलं. आधी मी कपडे बदलायला आले, की मुद्दाम काही कारण काढून आतमध्ये यायचा. बरोबर कुर्ता, किंवा टॉप काढत असतानाची वेळ त्याला कशी कळायची नाही माहित. माझं तोंड आणि हात विचित्र अडकलेले असताना ह्याला मस्ती करायची संधी चांगलीच मिळायची. आधी घरचे इकडे होते तेव्हा तर नीट तोंड उघडून मला हसताही यायचं नाही. आणि साळसूदपणे दाराबाहेर जाऊन ‘कितीवेळ लावतेयस आवरायला?’ असं म्हणून चिडवायला त्याला मजा यायची.

मी कपडे आवरले, बॅग घेतली आणि बाहेर गेले. तो सोफ्यावर बसला होता.

“जेवण ठेवलंय टेबलवर, मी गावी चाललीय. आठवड्याभराची सुट्टी घेतलीय… परत येताना फोन करेन.” एवढं सांगून मी निघाले. त्याने काहीच reaction दिली नाही. मी दरवाज्याजवळ २ क्षण थांबून वाट पाहिली कि तो काही बोलेल. मागे वळून बघितलं तर कोऱ्या चेहऱ्याने तो माझ्याकडे बघत होता. जश्या कोऱ्या चेहऱ्याने मागे ब्रेक-अप झाल्यानंतर उठून गेला होता. माझं डोकं भणभणत होतं. मी निघाले.

बस-स्टॅण्डवर एकटीनेच ती बॅग ओढत नेताना, कुठली बस कुठे लागते हे बघताना, मला जाणवत होतं की गेल्या २-३ वर्षांत मी हे असले खटाटोप विसरून गेलीय. कशीबशी तिकीट काढून मी बसमध्ये बसले. त्याचा कोरा चेहराच डोळ्यांसमोर दिसत होता. सगळं पुन्हा पाहिल्यासारखं होईल असं अजिबात वाटत नव्हतं. कदाचित ते होतच नसतं, आपण सतत बदलत राहतो, आपलं जवळच्या माणसांसोबतचं नातंदेखील बदलत राहतं. काहीवेळा ते अजून घट्ट बनतं आणि काही वेळा नुसतंच आहे म्हणून मानायचं. माझं आणि आदित्यचं असं व्हायला नको होतं. कळत नाही कसं सावरायचं सगळं. बाहेरच्या माणसाचे कितीही उपदेश घ्या. जोपर्यंत मनातलं निघून जात नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. शोभाकडे अजून कितीही भेटी दिल्या असत्या तरी कालच्या भांडणात जे निघून आलं ते कदाचित आलं नसतं. त्याच्या मनात आत माझ्यासाठी एक बारीकसा द्वेष आहे, प्रेमापोटी तो लपवायचा प्रयत्न करत होता. असं करून काही उपयोग नाही ना. खुपणारे काटे उखडून काढलेच पाहिजेत. आणि मी एक काटाच आहे त्याच्या आयुष्यातला!

डोकं जड झालं होतं, खिडकीशेजारी बसून वाऱ्यात मला झोप लागली, ते जेव्हा गाव आलं तेव्हाच उघडली.

दरवाजात मला एकटीला बघून पप्पा थोडे दचकलेच. थोडा-वेळ कोणीच काही बोललं नाही. मीच किचनमध्ये जाऊन डब्यातलं जेवण गरम करून पोटात ढकललं.

मग मीच विषय काढला. मम्मी आणि मी खूप बोललो. मी त्या दोघांना माझ्या चुका सांगितल्या. आदित्यचं आणि माझं बिनसलेलं सांगितलं. दोघांनीही शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी देखील सांगितलं की काही गोष्टी त्यांनाही खटकल्या होत्या, पण नंतर सगळं ठीक होईल असं त्यांना वाटत होतं. त्यांनी म्हणूनच मध्ये-मध्ये लुडबूड केली नाही. खूप दिवसांनी मनातलं बोलून आम्हा तिघांनाही बरं वाटत होतं. माझी हक्काची माणसं आहेत अजूनही हे पाहून मला सतत गहिवरून येत होतं.

“आदित्य नाही आला म्हणून काय झालं? लेकीचं कौतुक करायचं नाही असं थोडीच आहे” असं म्हणून रात्री मम्मीनी पुरण-पोळीचा घाट घातला.

जेवून झाल्यानंतर पप्पांनी आदित्यला फोन लावला, “मम्मीची तब्येत बिघडलीय आणि उद्या सकाळी ताबडतोब ये” असा निरोप दिला.

बिचारा रात्रभर काळजी करेल, पण त्याशिवाय तो देखील जागचा हलायचा नाही, हे पप्पांनाही माहित होतं. सकाळी आठलाच बेल वाजली आणि मी दार उघडलं तर आदित्य दोन मिनिटं तिथेच उभा राहिला.

“मीच आहे, अजून भूत नाही झालंय माझं…” मी दार उघडं ठेऊन आत येत म्हणाले.

“तू… मम्मी कुठाय?” मागोमाग आत येत त्याने विचारलं. त्या आपल्या सोफ्यावर चष्मा लावून निवांत पेपर वाचत बसल्या होत्या.

तो त्यांच्याजवळ जाऊन बसला आणि थोड्याश्या impatient स्वरात त्याने विचारलं, “काय झालं मम्मी तुला?”

“काय? अरे आलास तू? मला कुठे काय झालंय?”

“मग पप्पांनी असा काय फोन केला? पप्पा…” त्याने हाक मारली. “रात्री मला पप्पांचा फोन आला… तुझी तब्येत… पप्पा…?”

“आलो, आलो…” पप्पा पूजा संपवून बाहेर आले.

“हा काय प्रकार आहे पप्पा… तुम्ही खोटं काय सांगितलंत?”

“मग… त्याशिवाय तू आला असतास का?” पप्पा शांत स्वरात म्हणाले.

“मी काल रात्रभर काळजीत…” आदित्य चिडला होता. “आणि ही… तू इकडे कधी आलीस?” त्याने माझ्याकडे पाहून विचारलं. “हिला पण असंच काही सांगून बोलावलं नाही ना?” हा प्रश्न पप्पांना उद्देशून होता.

“नाही, काल रात्री फोन लावताना मी इथेच होते.” मी हाताची घडी घालून उभी राहिले.

“का आली आहेस इथे?” तो थोडासा चिडला

“अरे आदित्य… तिचं घर आहे हे…” मम्मी म्हणाल्या.

“मम्मी मला हे असलं अजिबात नाही पटलंय. का असं करताय तुम्ही? मी तुमच्याकडे लक्ष देत नाही असं म्हणायचंय काय तुम्हाला?” आदित्य मम्मीकडे बघून म्हणाला.

“असं काही नाही वाटत आम्हाला ‘आदू’… काल गमतीत पप्पांनी केला तुला फोन…  बरं बाबा चुकलं आमचं… पण तुला त्रास व्हावा म्हणून नाही करत रे आम्ही हे सगळं. तिकडून निघून आलो तेही आम्हाला एकांत हवा होता म्हणून. तुला दुखवायचं म्हणून नाही… बघ मी ह्यांच्या आईची फार सेवा केली, तुझ्या मामीने माझ्या आईचं सगळं बघितलं…  पण म्हणून आमच्या सुनेनं तेच करावं असं नाही ना. उलट आता दोघं निवांत आहोत इथं. आणि हात-पाय ओट्यात येतील तेव्हा आहोतच की तुमच्या अंगावर ओझं… आतापासूनच कशाला…”

मम्मीचं बोलणं ऐकून, आदित्य अचानक उठून माझ्यापाशी आला, मला खांद्याला पकडून त्याने थोडं बाजूला खेचलं, “काय बोलतेय मम्मी? काय सांगितलंस त्यांना?? तू इकडे का आलीस? तू घरी जाणार होतीस ना? “

मी माझा हात सोडवून घेतला, “घरी जाणार म्हणाले होते, तू विचारलं नाहीस कुणाच्या ते. आणि त्यांना मी सगळं खरं सांगितलंय. “

“काय? आपण वेगळे होणार आहोत ते?”

“आपण वेगळे होणार आहोत? हे कोण म्हणालं?”

“what!! तूच तर म्हणत हो… what did you tell them?”

“की आपली भांडणं होतायत आणि आपण ते सायकॉलॉजिस्टचे सेशन्सही केले… मग आम्ही थोडा वेळ तुला नावंही ठेवलीत. की तूदेखील कसा कुढत राहतोस लहानपणापासून, एखादी गोष्ट बोलायला चांगलाच वेळ घेतोस, मीही सांगितलं की मला खरोखर तुझ्या फीलिंग्स सांगायला तू ३-४ वर्षं घेतली होतीस शाळेत. मज्जा आली तुझ्याबद्दल गॉसिप करायला, मम्मी आणि मी आधीच हे सगळं का बोललो नाही काय माहित.”

माझ्याकडे इर्रिटेटेड नजरेने बघून डोकं हलवत तो बाहेर गेला.

थोड्यावेळाने मी प्लेटमध्ये गरम पोळीवर तूप घालून घेऊन बाहेर गेले. पोर्चमधल्या झोपाळयावर हातात डोकं धरून तो बसला होता. मी पलीकडे जाऊन बसले.

“काय करतेयस तू नेमकं? मम्मी-पप्पांसमोर खोटं नाटक करायचं आहे का? कारण मला आता जमणार नाहीए हे.” डोकं हातातच ठेऊन तो म्हणाला.

“नाटक करायचं असतं तर सगळं सांगितलं नसतं ना मी… पण तू अजूनही सगळं सांगत नाहीएस मला…”

“काय सांगायचं आहे मी?”

“की तुला मम्मी-पप्पा इकडे येऊन राहिले ते आवडलं नव्हतं. आणि त्याचं कारण मी आहे असं तुला वाटतंय…”

“काय फरक पडतो ते सांगितल्याने, ते आलेच ना इकडे, आणि काय फायदा झाला? तुझ्या-माझ्यातला प्रॉब्लेम संपेल असं वाटत होतं, तो तर अजूनच वाढला ना?”

“हो बरोबर आहे… I am sorry…”

त्याने माझ्याकडे बघितलं.

“I am sorry, की मी मुर्खासारखी वागले. मी मम्मी-पपांना पण काल सांगितलं की मी जे फटकळपणे वागत होते, ते सगळं ह्यामुळं होतं की मला माझं सगळं आयुष्य तू ड्राईव्ह करतोयस, असं वाटत राहिलं, लग्नाआधीपासूनच. मीही सांगितल्या नाहीत बऱ्याच गोष्टी. कारण मीही स्वतःशी भांडत होते, माझ्या मनाप्रमाणे लग्न केलंय तर आता हे सगळं ऍडजस्ट करावं लागेल. आणि संवाद साधायला जायचं माझ्या जीवावर येतं, माहीतच आहे तुला… आपले आई-बाबा आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात हे मला तेव्हा कळलं जेव्हा त्यांनी इकडे यायचा निर्णय घेतला. पण कुठेतरी मलाही वाटत होतं की ही मिळालेली स्पेस आपल्यातले issues संपवेल. पण त्यानंतर तू अडून बसलास, बोलून न दाखवता मनात कुढत बसलास…”

“hmm… काय करायचं मग आता… पूर्वीसारखं तरी काही होणार नाही सगळं. मला खूप जाणवतंय हे.”

“म्हणजे… do you not love me anymore?”

“I do. म्हणून तर मी हा सगळा खटाटोप करत होतो. मी तुझ्यावर कितीही चिडून असलो तरी तू नसलीस तर नाही इंटरेस्ट वाटत कशात.”

“मग झालं तर… पूर्वीसारखं नकोच आहे आपल्याला. काय होतं धड? भांडतच होतो सतत…” मी झोपाळ्यावरून उठून त्याच्यासमोर उभी राहिले.

“तू करतेस माझ्यावर प्रेम?” त्याने माझ्याकडे बघत विचारलं.

“इथे का आले मग? आणि विशेष म्हणजे दोन वाजेपर्यंत मम्मी-पप्पांशी ह्या विषयावर चर्चाही केली… बघ ना किती सोपं होतं… हक्काने इथे घरी येऊन बोलले असते तेव्हाच तर… पण ते समजायलाच वेळ लागला. काही म्हण हां… ‘शोभा’मुळे माझं डोकं थोडं ठिकाणावर यायला मदत झाली. पण तू माझ्यापेक्षा सव्वाशेर निघालास. खूप खोदून विचारलं तरी शोभा तू तिला काय सांगतोयस हे सांगायची नाही… मला आधी वाटलं कि ते काय ते Patient-doctor privilege मुळे असेल. पण नंतर कळालं की तू माझ्यापेक्षा हट्टी निघालास आणि तिला काहीच नीटसं सांगितलं नाहीस.”

” काय सांगणार होतो… माझ्या बायकोला माझ्यावर विश्वास नाही?” त्याने माझ्या डोळ्यांत बघितलं.

” हं…” मी त्याच्या डोळ्यांत बघून म्हणाले, “अं… ते मी actually… Gynaeबद्दल मी सांगितलं नव्हतं, कारण कुठेतरी मला एक पुसटशी आशा होती… टेस्ट positive आली असती तर मी तुला सरप्राईझ द्यायचा विचार केला होता… पण तसं काही नव्हतं, जस्ट stress मुळे पिरियड्स…”

त्याने झटकन उठून मला मिठीत घेतलं. खूप दिवसांनी ती ऊब जाणवली. दाराकडे लक्ष गेलं, तर मम्मी लगबगीनं आत जाताना दिसल्या.

थोडावेळ झोपाळयावर एकमेकांच्या कुशीत शांतपणे बसलो. आणि तो म्हणाला, “आठवतंय का… काय काय नियम बनवायचीस आपल्यात?”

“हो.. आठवतंय ना…”

“मग एक नियम बनवायचा आज?”

“काय?”

“कसलीही साधी किंवा कितीही मोठी गोष्ट असेल आणि टोचत असेल तर ती एकमेकांना सांगायची… अगदी तुला माझा कधी कंटाळा जरी आला तरी तो सांग… मी  जाईन थोडावेळ लांब… जोपर्यंत तुला यावंसं वाटत नाही”

“Deal!” म्हणून मी हात पुढे केला.

काहीवेळाने दोघे आत गेलो. पप्पांनी सुगंधी अगरबत्त्या लावल्या होत्या, त्याचा सुवास दरवळत होता, मम्मी आतल्या आत खुश होत्या, पप्पा समाधानाने न्यूज बघत होते. उगाचच ते घर असं स्माईल करतंय असं वाटत होतं.

लेकासाठी म्हणून मम्मीनी काहीही घाई-घाईने स्पेशल बनवलं नाही. दुपारच्या जेवणाला काल रात्रीच्या पुरणपोळ्या मस्त गरम करून तूप ओढून संपवल्या.

पुराणपोळ्यांची एक निराळी मजा आहे नई? ताज्या असतात त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी मुरलेल्या जास्त चांगल्या लागतात, आणि उन्हात वाळवून करकरीत झालेल्या त्याहून बेस्ट! रिलेशन्सचंही तसंच असतं.

——————————————–The End—————————————————-