हवेत विरून जाणाऱ्या कडवट वासाच्या धुराकडे बघत त्याने मान हलवली. “काही समजत नाही रे… खूप ठिकाणी दाखवून आलोय. काही फरक पडत नाही. तू म्हणतोयस तर तिकडे जाऊन येतो. पण नानूच्या आईला आधी पटायला पाहिजे.. त्यात किती वेळ जाणार माहित नाही. एकतर हा विषय मला काढायलाच नको वाटतो. नुसती डोक्याला कटकट!”
“हम्म…” मित्राने नुसतीच मान हलवली आणि सिगरेटचा एक ड्रॅग घेतला.
आपण मोठ्या आवाजात बोलतोय असं वाटून त्यानेही स्वतःला आवरायला म्हणून सिगरेट तोंडाशी लावली.
शुभमचं तन्वीशी लग्न होऊन आता १३ वर्षं झालीत. त्यांची मुलगी मनस्वी म्हणजे नानू – तिलाच आता १० वर्षं पूर्ण होतील, उद्याच. वीकडेच आहे, नानूचा वाढदिवस म्हणून त्याने सुट्टी घेतली असती, पण कंपनीमध्ये काम खूप असल्याने त्याने उद्या सकाळी लवकर येऊन ४ वाजता घरी जायचं ठरवलंय.
बाकी दिवशी तो फार लवकर पण घरी जात नाही. २-३ वर्षांपासून घरात एक प्रकारे उदासिनता असते, नानूला जेव्हापासून हा प्रॉब्लेम सुरु झाला. तन्वीने तेव्हापासून जो पाढा चालू केलाय तो अजून काही संपला नाहीए. नानू सोडल्यास घरी कोणी प्रेमानं जवळ घेणारं नाही. मम्मी-पप्पांना खूप आधीच घराबाहेर काढलं, म्हणजे शुभमच्या मनात ते तसं आहे.
मम्मी-पप्पांची आठवण येताच शुभम काही काळ मागे गेला. तन्वी वाटली होती तशी साधी नाही निघाली. दोन भेटीमध्ये तसंही काय कळतं म्हणा… शेतवाडी, बंगला, जमीन-जुमला असलं कि मम्मी-पप्पा खुश. त्यांचा पण रागच येतो कधी कधी. किती मटेरियल गोष्टींच्या मागं लागलेली असते ह्यांची पिढी. जरा पैसे आलं की सोनं घेऊन ठेवायचं. जरा स्वतःसाठी म्हणून जगायला काय होतं? पैशाकडे बघायचं, मनाला काय वाटेल ह्याचा विचार… जाऊ दे… त्यांना काय बोलायचं, गोरा रंग, दिसायला देखणी म्हणून मीदेखील खुशच होतो कि. गाडी चालवता चालवता स्वगत चालूच असतं. कधी त्याची बाजू बरोबर, कधी घरच्यांची बाजू बरोबर, कधी नानूकडे बघून सहन करायचं… असे अनेक संवाद करत त्याचा कंपनी ते घर आणि घर ते कंपनी असा प्रवास चालू असतो. संवादात तन्वीची बाजू मात्र कधी बरोबर नसते. असो!
शुभमने गाडी पार्क केली. लिफ्टचं बटण दाबलं. लिफ्ट दुसऱ्या मजल्यावरून खूप वेळ हलत नव्हती. साली लिफ्ट! चेअरमनच्या आईचा! मनातून फटाफट शिव्या निघून गेल्या आणि त्याने पायऱ्या चढायला सुरुवात केली. दुसऱ्या मजल्यावर जाईपर्यंत दम लागला. व्यायाम सुरु करायला पाहिजे. च्यायला सगळ्या चांगल्या सवयी सुटल्या. लग्नाआधी रोज जिम करायचो. टीममध्ये ‘डंबेल’ म्हणून फेमस झालेलो. ती ‘पूजा’ पण नोटीस करायची मला. लग्न करून तिची नोकरी सुटली आणि लग्न करून माझी ढेरी सुटली. ह्यावर तो स्वतःच हसला. ‘पूजा’ नोटीस करायची ते दिवस काही क्षणांसाठी डोळ्यासमोर तरळून गेले. त्यामुळे शुभमचा मूड थोडासा हलका झाला.
खांद्यावरची बॅग आणि हातावर डबा सांभाळत त्याने किल्लीने दरवाजा उघडला. हॉलमधेच तन्वी खुर्चीवर बसून नानूच्या तोंडाला लेप फासत होती. नानू वळवळ करते म्हणून तिने एका हाताने तिला घट्ट धरलं होतं. दरवाज्याचा आवाज झाला तशी, नानूने झटका देऊन आईची पकड सोडवली आणि बाबाला बिलगली. निम्मा लेप शर्टाला लागला. ‘अगं अगं..’ म्हणून शुभम आणि तन्वीने दोघांनी घडून गेलेलं सावरायचा प्रयत्न केला आणि गालाचा मोठा ठसा शर्टावर बघून तन्वीने शेवटी प्च! केलं.
“बाबा सांग ना तू आईला… ती मला हा सारखा लेप लावते. मला नको. मला खाजवतं.”
“अगं बाई, ते बरं व्हावं म्हणून लावतेय ना मी!” तन्वी लेपात बुडलेला हात नाचवत म्हणाली.
“काय लावत असतेस गं? तिला खाजवतंय म्हणजे… अजून ऍलर्जी झाली तर…”
“मला काय अक्कल नाहीए का? बघून, शोधून आणलंय मी औषध. त्या लेडीज ग्रुपवर खूप चांगले रिझल्ट्स आल्येत एकेकींना.”
“पण प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सूट होईल अशी नाही…”
“हे बघा.. माझ्याच्यानं होईल ते मी करतेय.” तन्वीने तो लेपाचा हात वाटीला पुसला आणि तिथून उठली.
“जरा जास्तीचंच करतेस असं वाटत नाही तुला?” शुभम खांद्यावरची बॅग खुर्चीत टाकत म्हणाला.
“जास्तीचं करते म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला?” तन्वीने किचनमध्ये जाऊन ती वाटी सिंकमध्ये फेकली आणि हात पाण्याखाली धरला.
“काय समजायचं ते समज आता… तसं पण मी काही सांगितलं तरी तुला जे ऐकायचं तेच तू ऐकणार” शर्टाची बटणं काढत तो म्हणाला.
“एकतर तुमच्या कर्माची फळं.. मी भोगायची. वर मला शहाणपण शिकवायला बरं. एकतर खोटारडेपणा केला लग्नावेळी.. आता आहे ते भोगलं जातंय का?” तिने पुटपुटायला सुरुवात केली.
“काय भोगायला लागतंय तुला? दिवसभर तिकडे कामाची कटकट आणि घरी आल्यावर एक दिवस चांगला नसतो, दिवसभर घरी बसून तुला काय नेमकं भोगायला लागतंय?” शुभमने आहे त्या फाटक्यात अजून आपला मोठा पाय घातला.
त्याच्या ह्या वाक्यावर तन्वी झर्र्कन वळून त्याच्याकडे नुसतीच बघत राहिली. तिच्या डोळ्यांत राग होताच पण अपमानाचा घाव घेऊन मऊ झालेले थोडे अश्रू जमा होऊ पाहत होते.
आता काय बोलायचं न समजून शुभम जवळच्या खुर्चीवर बसला. तेवढ्यात नानूने बाबाचा शर्ट खेचला.
“धुवून आले मी.. आता नाहीए खाजवत” जिच्यासाठी भांडत होतो ती केव्हाच तोंड धुवून आली, शुभमने नानूच्या चेहऱ्याकडे पाहिलं, लेप निघून गेला तसे तसे लहान शुभ्र आकार चेहऱ्यावर पुन्हा उमटले. काही क्षण त्यांच्याकडे शुभम नुसताच बघत राहिला.
आपली आहे ती परिस्थिती बदलायचा अट्टाहास कुठल्या लेव्हल पर्यंत योग्य असतो आणि त्याचं कधी obsession मध्ये रूपांतर होत असतं? ह्या दोघांमधली लाईन नेमकी कुठे आखलेली असते?
“बाबा तुझ्या तोंडाला परत तसला वास येतोय… तू पुन्हा स्मोकिंग पिलंस ना?” नानूने कपाळाला आठ्या घालत विचारलं.
“नाही गं.. नाही केलं. चल तोंड पूस.”
“पण तू म्हणलेलास ना आईला मागे, कि तू परत तसं करणार नाहीस. ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं तुला झालं तर?” नानूच्या ओठांचा एकदम थरथरता चंबू झाला आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं.
“नाही बेटा… तसं काही होणार नाही… मी स्ट्रॉंग आहे, हे बघ” म्हणून त्याने उगाच नसलेले biceps दाखवले. नानूने ते दाबून बघितले आणि गोडसं हसली.
शुभम उठून बाथरूम मध्ये गेला. बराच वेळ सिंकवरच्या आरशात बघत बसला. कुठल्या अर्थाने नेमका मी स्ट्रॉंग आहे? लहान मुलांना काहीतरी सांगून पिटाळणं किती सोपं असतं.
“जेवण वाढलंय!” अशी बाहेरून “प्रेमळ” हाक आली. तोंड खसाखसा धुवून नॅपकिनने पुसत तो बाहेर आला.
ताटात बघत दोघांनी खाणं आटोपलं. तन्वीने जोशात आदळ-आपट करत भांडी घासली. तिचा सिरीयलचा टाइम होईपर्यंत शुभमने सोफ्यावर आरामात बसून बातम्या-स्पोर्ट्सचे चॅनेल्स चाळून घेतले. ती कमरेवर हात ठेऊन पलीकडे उभी राहिलेली जाणीव झाल्यानंतर सोफ्याच्या हॅण्डलवर गुपचूप रिमोट ठेऊन तो तिथून उठला.
नानूचा अभ्यास झाला का विचारायला तो रूममध्ये गेला.
“मी घरी आल्या आल्याच होमवर्क संपवते बाबा…”
” गुणी बाळ आहेस तू” त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. “मग… उद्या बड्डे आहे कुणाचा तरी…”
“हीही… माहितीय का? स्कूल मध्ये उद्या मला नवीन ड्रेस घालायला अलाऊड आहे… मग मी उद्या तो ब्लु फ्रॉक घालणार. म्हणजे तो दिवाळीला घेतला होता ना. तर सुट्टी मध्ये घातला होता तर कुणी पहिला नाहीए… आणि संध्याकाळी तो पिंकवाला फ्रॉक… आपण घेतलेला. तो संध्याकाळी मायरा-तान्या बरोबर जाताना घालणार.. आणि मागच्या वेळेस अनया ने ना ते जेली वाले मोठे gummy-bears आणले होते. तिच्या बड्डेच्या दिवशी. सगळ्यांना द्यायला… पण ना.. ते इतके काही चांगले नव्हते. मग आम्ही ठरवलंय कि मी Choco-pie घेऊन जाणार. आणि स्पेशल फ्रेंड्स ना..”
अचानक शुभमचा उजवा खांदा जोरजोरात हलू लागला. शुभमने डोळे उघडले. “बाबा… तू झोपलास..” नानू त्याला हलवत होती.
“अरे.. नाही नाही.. मी ऐकत होतो.. बरं आता झोप हं तू..” त्याने खोलीतली लाईट बंद केली आणि बाहेर येऊन पुन्हा तोंड धुतलं. मग फोन घेऊन गादीवर पडून रील्स बघत बसला.
थोड्यावेळाने तन्वी आत आली. “उद्या काय करायचं आहे?” तिने घुश्श्यातच विचारलं.
आता आपणही उगाच वाकड्यात जाणं योग्य नाही हे लक्षात येऊन तो शांतपणे म्हणाला, “मला वाटतं संध्याकाळी बर्थडे-पार्टी करू. सोसायटीच्या तुझ्या मैत्रिणी, नानूच्या मैत्रिणी सगळ्यांना बोलवू. मी येताना पावभाजी आणतो. लवकरच येईन. ५ पर्यंत येतो. तू तोपर्यंत बाहेर डेकोरेशन करून ठेव.”
“मला वाटतंय एवढं काही नको करायला. त्या बायका आल्या कि पुन्हा तिच्या कोडाबद्दल बोलत बसतात. केक कापू, आणि सोसायटीतल्या तिच्या ४-५ मैत्रीणीना बोलवायला सांगते तिला.”
“तन्वी… बाकी लोकं काय बोलतील म्हणून आपण तिचा वाढदिवस नीट साजरा करायचा नाही का?”
“न करायला काय झालं? इतके वर्षं करतोयच कि. सोसायटीतल्या कोणी दुसऱ्या कधी मला बोलावतात का. मनस्वीला सुद्धा कधी कधी बोलवत नाहीत. मागचं वर्षं लॉकडाऊन चं कारण सांगून बऱ्याचजणींनी आपलं-आपलं करून घेतलं. मला नाही तसल्यांना एवढी किंमत द्यायची.”
“तन्वी… तुझं डोकं कसं चालेल ते तुलाच माहिती.”
“हे बघा तुम्हाला एवढं वाटतंय तर तुम्ही घ्या सुट्टी आणि करा काय तो गोंधळ!”
“मला शक्य असतं तर घेतली असती.”
“उद्या तुम्ही केक आणा येताना.. पाव-भाजी घरीच बनवते ७-८ पोरांसाठी. बाकी तुम्हाला काय घेऊन यायचं असलं तर घेऊन या.” असं म्हणून ती बेडवर बसली आणि तिनेही आपला फोन उघडला. कोपऱ्यातून त्याला दिसलं, फेसबूक वर ती बराच वेळ काहीतरी type करत होती. थोड्यावेळाने फोन ठेऊन ती झोपून गेली.
शुभम ने उठून दारं-खिडक्या चेक केल्या, लाईट्स बंद केल्या आणि बेडवर झोपला. त्याला झोप लागत नव्हती. बाल्कनी मध्ये जाऊन त्याने एक सिगारेट संपवली. अचानक त्याने फोन उघडला आणि browser वर गेला. मागे कधीतरी तिचं फेसबुक लॉगिन तिथे save केलं होतं. त्याने ते उघडलं. पोस्ट्स बघितल्या मग मेसेंजर चेक केला. काहीच नवीन मेसेजेस नव्हते. कुठल्यातरी ‘The Loom Affair’ नावाच्या अकाऊंटला साडीची किंमत विचारली होती, बस्स!
हिस्टरी डिलीट करायला बरोब्बर शिकली कि! मग ऍक्टिव्हिटी लॉग मध्ये जाऊन बघितलं, कुठल्या तरी ग्रुप वर पोस्ट पेंडिंग असं दाखवत होतं. ती पोस्ट तो उघडणार एवढ्यात त्याला काय वाटलं, आणि त्याने बॅकचं button दाबून फोन बंद केला.
काही वर्षांपूर्वीची घटना परत ताजी झाली.
सारखी फोनवर असते म्हणून एका दिवशी काहीतरी कारण काढून, त्याने तिच्या फेसबूक अकाउंटचं लॉगिन मिळवलं होतं. त्यानंतर अधे-मध्ये तो तिचे मेसेजेस चेक करायचा. एक दिवस मेसेंजर वर कुठल्या शाळेतल्या मित्राला तिने फोन नंबर दिलेला त्याला दिसला.
“मी एकटा पुरत नाही का तुला” वगैरे गचाळ बोलत त्याने तोंड सोडलं होतं. “तुम्ही माझे मेसेज चेकच कसे केले” म्हणून तिनेही आदळआपट केली होती. आणि वर काही झालं की तन्वीचं ‘लग्नात फसवलं’ हे पालुपद असतंच. शुभमच्या पप्पांना कोड आहे हि गोष्ट लपवून ठेवली. ती लग्नाच्या पहिल्याच वर्षी उघडकीला आली. आणि ती म्हणते तशी कर्माची फळं, म्हणून पोटच्या पोरीला ते उठलं. स्वतः सगळं भामट्यांचं खानदान आणि माझ्या चारित्र्यावर संशय घेतोय म्हणून तन्वीनेही अजिबात माघार घेतली नव्हती. प्रकरण नेहमी प्रमाणे दोघांच्या आई-बापाकडे गेलं होतं. त्यांनीही नेहमीप्रमाणे पाठीवर टाकण्याचा सल्ला दिला होता. ह्या भांडणाचे परिणाम खूप महिने राहिले होते.
खरंतर ते तसेच राहत असतात.. आयुष्यभरासाठी.
तसं म्हणायला २-३ वर्षांपासून उदासीनता वाटते घरात. पण सुरुवात १० वर्षांपूर्वीच झाली होती. मीच पहिली कुदळ मारली होती.
घडून गेलेल्या पैकी काही गोष्टी आपण मुद्दाम विसरायच्या असतात. पण काही खूणा अशा राहतात कि तुम्ही विसरता विसरू शकत नाही. संध्याकाळी तोंड धुवून समोर उभ्या राहिलेल्या मनस्वीचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरारला. तो लेप लावल्याने काही मिनिटांसाठी जणू त्या खुणा पुसल्या गेल्या होत्या. आत येऊन, एकदा नानूच्या खोलीत त्याने वाकून पाहिलं आणि बेडवर पडला.
आडवं झाल्या-झाल्या पश्चातापाची कळ डोक्यात उठून गेली. तिला नोटिफिकेशन तरी जाणार नाही ना दुसऱ्या ठिकाणाहून लॉगिन झाल्याचं? उद्या आता परत त्यामुळे काही प्रॉब्लेम नको. तिचं फेसबूक असं चोरून उघडल्याबद्दल त्याला स्वतःची कीव आली. आपलं वागणं स्वतःशीच जस्टीफाय करत त्याला झोप लागली.
नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी वेळाने जाग आली. संध्याकाळी लवकर येण्यासाठी आज ऑफिसला लवकर जायचं होतं. त्यानं घाई-घाईत आपलं आवरलं. नानू आवरून सकाळी शाळेला गेली होती. सकाळी उठून आपण तिला बर्थडे विश केलं नाही ह्याचं त्याला खूप वाईट वाटलं. “मला उठवायचं नाही होय?” असं त्याने तन्वीला म्हणून पाहिलं. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
“नानू शाळेत काय घेऊन गेली? काल रात्री काहीतरी म्हणत होती..”
“काहीतरी नाही… choco-pie, तुम्हाला सांगितलं होतं काल सकाळी, येताना घेऊन या. पण तुमच्या लक्षात राहणार नाही माहित होतं. मी आणून ठेवलं होतं पॅकेट.” तिने त्याच्याकडे न बघत उत्तर दिलं.
“आज डबा राहू देत. मला वेळ झालाय. मी येताना केक घेऊन येतो. तू डेकोरेशन आणि बाकी खाण्याचं बघ.” असं म्हणून shoes चढवून तो ऑफिसला गेला.
ऑफिसमध्ये त्याचं फार लक्ष लागत नव्हतं. टीममधल्या एका मुलीला विचारून त्याने २-३ चांगल्या बेकर्सच्या वेबसाइट्स मिळवल्या. छान थिम-केक्स चे फोटोज बघून त्याने फोन लावले, पण इतक्या शॉर्ट नोटीस वर कोणी तसे केक देणार नव्हतं. शेवटी चांगला दिसतो म्हणून त्याने ब्लूबेरी केक न्यायचं फायनल केलं.
मागच्या वीकएंडला नानूला तिच्या पसंतीचे कपडे घ्यावेत म्हणून ते तिघे मॉल मध्ये गेले होते. तिथेही ती नको नको म्हणत होती. घरात आई-बाबामधलं भांडण दरवाजा लावून होत असलं तरी लेकरांना ते आपसूक कळत असतं. शेवटी एक फ्रॉक घेतला. जाता-जाता मेकअपच्या स्टॉल कडे बोट दाखवून तिने पिंक लिपस्टिक मागितली. “तुला काय करायची?” म्हणून आईनं दटावलं आणि ते परत आले. ती लिपस्टिक तरी घेऊन द्यायला पाहिजे होती असं त्याला आता वाटू लागलं.
वाटेतल्या दुकानातून ब्लूबेरी केक आणि ते music लागणारं कमळ घेऊन तो पाच वाजता घरी पोचला. घरी काहीच गडबड नाही. डेकोरेशन नाही. तो किचनमध्ये गेला. तन्वी काहीतरी निवडत बसली होती.
केक फ्रिज मध्ये ठेवत त्याने तन्वीला विचारलं, “काय गं, काय टाईमिंग बदललं का सगळ्यांना बोलवायचं? तू पावभाजी करणार होतीस.. काय झालं त्याचं? असं काय?”
“हं.. लेकीला विचारा तुमच्या.” एवढंच म्हणून ती फोनमध्ये बघत बघत भाजी निवडू लागली.
“म्हणजे? काय झालं? काही हट्ट केला का तिने? काल लेप लावत होतीस, त्यावरून काही झालं का?”
“काही नाही झालंय.”
“मग? अगं काय तू ते कोडाचं घेऊन बसलीयस. कशाला लोक काय म्हणतील ह्याचा विचार करायचा?”
“हो कारण लोक मला येऊन बोलतात, तुम्हाला नाही…”
“तिच्या वाढ-दिवसाला तरी तू जरा स्वतःचा विचार करणं बंद कर.”
तन्वीने डोळे मिटून मोठा श्वास घेतला आणि कोऱ्या चेहऱ्याने म्हणाली, “तुमच्या लेकीला विचारा.. तिला नव्हती खायची पाव-भाजी, मैत्रिणी आहेत तिच्या, त्यांच्याबरोबर काहीतरी प्लॅन आहे.” एवढं बोलून ती ताटातल्या घेवड्याकडे बघत पुटपुटू लागली, “अचानक काहीतरी ठरवायचं, ह्यांना सगळं मनासारखं करू द्यायचं, वर मी स्वतःचा विचार करते…!”
तिचं पुढचं ऐकायला नको म्हणून तो बाहेर आला. नानूच्या खोलीचा दरवाजा पुढे केला होता, आतून पोरींचे बडबडीचे आवाज येत होते. त्याने थोडी फट उघडून बघितलं. नानू आरशा-समोर बसली होती, तिची मैत्रीण काहीतरी केसांचं करत होती. त्यांना डिस्टर्ब न करता तो तिथून बाल्कनीमध्ये गेला. बाल्कनीमध्ये एकाच कारणासाठी तो येतो.
हे कधी संपणार? नानूच्या चेहऱ्यावरचे डाग जात नाहीत तोपर्यंत तन्वी अशीच वागत राहणार. नानूच्या लहान मनावर किती परिणाम होतात ह्याचे, हे तिला कळत नाही का? काही बोललं की दोष शेवटी माझ्यावर येऊन ठपकणार. किती उपाय झाले. मॅग्नेट लावून झाले, स्किन स्पेशालिस्ट झाले… विजय म्हणत होता त्या एका माणसाला दाखवून बघतोच आता. काल नंबर घ्यायचं विसरलो. विजयला फोन करून आताच नंबर घेऊन टाकतो, असा विचार करून त्याने खिशातून फोन काढला.
फोन डायल केला तेवढयात नानूची “बाबा…” म्हणून जोरदार हाक आली. हातातली सिगारेट पटकन पायात दाबून. तोंडावरून रुमाल फिरवून तो आत आला. तिला वास आला तर चुकून रडायला लागायची म्हणून त्याने दाराजवळच उभं राहून “काय गं?” विचारलं.
“बाबा आम्ही सोसायटीच्या बाहेरच्या चॅट कॉर्नरला चाललोय. माझ्या बर्थडेची ट्रीट आहे. तुम्ही मागे दिलेले पैसे पुरणार नाहीत. मला अजून २०० रुपये द्या.”
ती काय बोलतेय हे ऐकण्याऐवजी तो तिच्याकडे नुसताच बघत होता. त्या मॉलमधून घेतलेल्या फ्रॉकवर तिने कसलासा मॅचिंग झालरवाला स्कार्फ घातला होता. केसात दोन्हीकडे एकेक रंगीत बटा लावल्या होत्या आणि छान फुलांच्या क्लिप्स लावल्या होत्या. हातात मण्यांचं कडं घातलं होतं. डोळ्यांवर ग्लिटर लावलं होतं आणि ओठांना पिंक लिपस्टिक. बाहुलीसारखी दिसत होती नानू. तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदात आणि त्या ग्लिटरच्या चमकमध्ये ते शुभ्र डाग जणू कुठे गायब झाले होते. शुभमला तीव्र इच्छा झाली तिला उचलून घेण्याची, पण स्वतःच्या तोंडाला येणाऱ्या कडवट वासाने त्याला नानूचा मूड खराब करण्याची चूक करायची नव्हती.
“ती लिपस्टिक…” एवढेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले.
“मला, तवीशी, खनक, मायरा आणि तान्याने मिळून दिली. मायराच्या घरी त्यांनी अमेझॉन वरून मागवली.”
“हॅलो अंकल!” असं म्हणून सगळ्यांनी “अंकल” ना ग्रीट केलं.
“हॅलो…” नवीन नवीन माहितीने शुभम अजून गडबडत होता.
“बाबा.. पैसे?” नानूने हात पुढे केला.
भानावर येऊन शुभमने वॉलेटला हात घातला. १०० च्या ३ नोटा काढल्या आणि नानूच्या हातात दिल्या. “सगळ्यांना माझ्याकडून कॅडबरी दे” असं सांगितलं.
तन्वी किचन-हॉल च्या दाराशी उभी होती. शुभमने तिच्याकडे पाहिलं, पण ती नानूकडे एकटक पाहत होती.
“बाय आई, बाय बाबा…” म्हणत नानू मैत्रिणींबरोबर निघाली.
“एक मिनिट थांबा गं…” म्हणत तन्वी आतल्या खोलीत गेली.
‘काय झालं हिला आता?’ असा विचार करत शुभम खोलीच्या दिशेने बघत राहिला.
तन्वी बाहेर आली, नानू समोर उकिडवं बसली, काजळाच्या स्टिकला बोट घासून तिच्या कानाजवळ एक ठिपका लावला. अजून एक डाग, नजर लागू नये म्हणून.
ते बोट केसांत पुसत ती उठली, “लवकर या…” म्हणून त्यांना पाठवलं.
नानू आणि मैत्रिणी गेल्या. शुभम तन्वीकडे बघत होता, तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत अभिमान होता आणि तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या त्याने पाहिलं. त्याने एक निःश्वास सोडला आणि म्हणाला, “मोठी झाली ना आपली नानू…”
“हो.. कळलंच नाही” तन्वी स्वतःशीच हसत खाली पाहत म्हणाली.
शुभमला मित्राचा फोन आला. “अरे.. हां त्या डॉक्टरचा कॉन्टॅक्ट मागायला कॉल केला होता.. हां तोच.. हां बरं, चल बोलतो उद्या ऑफिसमध्ये” असं म्हणून शुभमने फोन ठेवला.
“कसला डॉक्टर?” तन्वीने विचारलं.
“विजय म्हणत होता.. एका आहे स्किन स्पेशालिस्ट…”
“हं… मला वाटतं राहू दे… सारखं ट्रीटमेंट… ह्या लहान वयात तिला एवढी औषधं… बरं नाही…”
“हो.. मला पण तेच…” शुभमला पुढचं फार बोलायची काही गरज वाटली नाही. तो नुसताच तिच्याकडे बघत होता. तन्वी त्याच्या कोऱ्या चेहऱ्याकडे पाहून हलकंसं हसली. किचनकडे वळत म्हणाली, “बाय-द-वे… बरं झालं घरी पार्टी ठेवली नाही. तो ब्लूबेरी केक तुमच्या लेकीला अजिबात आवडत नाही…”