रखरखीत जमिनीवर अचानक कोसळणाऱ्या पावसाबरोबर येणारा मातीचा सुगंध, आपसूकच गावाकडं घेऊन जातो. वय वीस-एक वर्षांनी कमी होतं, पाण्याबरोबर वाहणारे रस्ते आठवतात. मातीत पडणाऱ्या गारा गोळा करून खाण्यातली मजा आठवते.
दप्तर भिजू नये म्हणून ढगळा रेनकोट दप्तरावरून चढवून बागुलबुवाचा अवतार करून शाळेला जाण्यात एक वेगळीच गम्मत होती. घरी परत येताना पायाला पाणी लागू नये म्हणून घातलेल्या ‘गमबूटात’ एखाद्या डबक्याजवळ थांबून पाणी भरायचं आणि मग त्यात पाय घालून ‘पचपच’ आवाज करत चालत जायचं – ह्याला एक वेगळी बुद्धिमत्ता लागते. असो!
पावसाचा तसा त्रास कधी वाटला नाही. गावी असताना तरी नाही. पण शहरात कधी कधी पाऊस देखील ९ ते ५ करून वैतागल्या सारखा वागतो. रस्ते निसरडे करून accidents करून ठेवतो, ट्रॅफिक ला ‘जॅम’ करून ठेवतो. ‘कोरडेपणा’ची सवय झालेल्या नद्यांना कळत नाही आता पाण्याचं काय करायचं. रस्त्यांचं bladder तर लगेच फुल्ल होऊन जातं.
तरीही ह्या सगळ्या पांढरपेशी अडचणी.
मध्ये एकदा ‘नागराज मंजुळे’ ह्यांची ‘पावसाचा निबंध’ ही शॉर्टफिल्म पाहण्यात आली. धो-धो कोसळणारा पाऊस, शाळेत ‘पावसावर निबंध’ लिहून आणायला सांगितलेला मुलगा, त्याची छोटी बहीण, दारुडा बाप आणि घराला हातभार लावता लावता वैतागलेली आई ह्यांची ती गोष्ट आहे.
ती फिल्म आता पाऊस बघताना हमखास आठवते.
त्यांनतर, काही वर्षांपूर्वी जेव्हा कामवाल्या मावशींनी ‘घराचा पत्रा उडाला’ म्हणून सुट्टी मारली होती, ते सहानुभूतीने ऐकून घेतलं नव्हतं, ते आठवून लाज वाटते.
पाऊस प्रत्येकासाठी वेगळा आहे. कुणाला त्याची टिपटिप धुंद करून टाकते तर कोणी त्याच्या रिपरिपीला त्रासलेला असतो. एखाद्या प्रेमात पडलेल्याला रोमांचक तर दुसऱ्यासाठी विध्वंसक. कुणासाठी सुंदर आठवणींचा पूर आणि कोणाला पाण्याखाली गेलेलं शेत बघताना डोळ्यातलं पाणी लपवायला आधार.
हा पाऊस एखाद्यासाठी बाष्पीभवनाची प्रक्रिया असेल, तर दुसऱ्यासाठी इंद्रदेवाची कृपा.
ज्याच्यासाठी जसा आहे तसा आहे. आपण गरम चहाचा कप हातात धरून फक्त इतकंच करू शकतो, खाली येणारा थेंब प्रत्येकासाठी सुख घेऊन येवो अशी प्रार्थना!