fbpx

गेल्या काही दिवसांपासून वसंतीचाहूल लागायला सुरुवात झाली आहेच. सगळ्या वृक्षवेलींचं निस्तेजपण जाऊन ती टवटवीत दिसू लागली आहेत, अंगोपांगी बहरून येत वेगवेगळ्या रंगांची उधळण करू लागली आहेत. आमच्या गॅलरीतून, खिडकीतून गेले काही दिवस हा सगळा बहर दृष्टीस पडतो आहेच. गॅलरीसमोरच्या एका आंब्याच्या झाडावर ह्यावेळी आलेला प्रचंड मोहोर हा काही दिवसांपासून आमच्या कुतूहलाचा विषय होऊन बसला होता. पानांचं हिरवेपण लपून जावं इतका हा तांबुससर मोहोर फुलून आला होता. कालपर्यंत हे दृश्य असंच होतं. आज सकाळी मात्र त्या झाडाकडं नजर गेली आणि अक्षरश: झाडभर पोपटी चांदण्या लगडल्यासरख्या दृश्यामुळं ती कितीतरीवेळ मोहवल्यासारखी तिथंच खिळून राहिली. आपल्या बोटाच्या पेर-दीडपेरभर उंचीच्या नुकत्याच जन्मलेल्या त्या असंख्य  बाळकैऱ्या वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत अलगद पण डौलात डुलत होत्या. काही क्षण मी ते देखणेपण मनात साठवत राहिले आणि एकाक्षणी मनात विचारांची एक झुळूक वाहू लागल्याच जाणवलं.

लहानपणी आपण प्रत्येकानं एक गोष्ट अनुभवली असेल कि, आपली काही वस्तू, आपल्यातला खाऊ आपल्या वडिलधाऱ्यांनी कुणाला द्यायला लावला कि आपली खूप चिडचिड व्हायची. अगदी जिवावर आल्यासारखं वक्रतुंड होऊनच ते काम आपल्याकडूनच पार पाडलं जायचं. त्यावेळी आपले वडिलधारे कधी समजुतीनं तर वेळप्रसंगी रागानंही आपल्याला म्हणायचे कि, ‘ असं कद्रूपणे वागू नये.. चांगलं नाही ते.. कुणाला काही दिलं म्हणून आपल्याला काही कमी पडत नाही.. उलट दिल्यानं नेहमी वाढतंच!’ आणि ‘दिल्यानं किती वाढतं’ हे आज साक्षात निसर्गदेवतेनं माझ्या नजरेसमोर ठेवलं आणि मला एक वैचारिक कानोसा घ्यायला भाग पाडलं. कुणीतरी एक बी भूमातेला देऊ केली तर तिनं अशी असंख्य बीजं असलेला विशाल वृक्ष त्याला बहाल केला. ते इवलंसं एक बी देण्याची दानत त्या देणाऱ्याला किती समृद्ध करून गेली. मी खरंच विचारात पडले कि, अगदी रोजच्या रोज जगताना छोट्याछोट्या घटनांतून ‘दिल्यानं वाढतं’ ह्या शाश्वत सत्याचे पुरावे आपल्याला मिळत असतात… फक्त आपल्या जाणिवेत ते ह्या विचाराने प्रवेशतातच असं नाही. अगदी कालच्याच दिवसातल्या चार-दोन घटना मला आठवल्या आणि खरंच वाटलं कि, ‘अगदी खरं आहे… दिल्यानं वाढतंच’ आणि म्हणून ‘काय द्यायचं’ हाही विचार इथून पुढं जाणीवपूर्वक करायला हवा आपण!

काल सकाळी कॉलेजच्या मीटिंगमधे कसं कोण जाणे विषय जरा भरकटत गेला आणि सगळ्यांचीच कुरबुर सुरू झाली. निमित्तास कारण व्हावं तसा कुणाचातरी आवाज चढला आणि हळूहळू कुरबुर वाढत मीटिंगची परिणती बऱ्यापैकी गंभीर म्हणावा अशा वादंगात झाली. कुणीकुणी कुणाकुणाला देत असलेली दूषणं ‘देता देता’ आणखी ‘वाढत’ राहिली. धुसफुसीचं एक बी कुणाकडून तरी पेरलं गेलं आणि मग त्यातून तशाच अनेक बीजांची उत्पत्ती होऊन ती वाढतच राहिली. तिथली अस्वस्थता सोबत घेऊनच मी लेक्चर घ्यायला गेले. त्यामुळंच कि काय पण एरवीसारखं आवाज न चढवताही मुलांच्या चुकांची त्यांना जाणीव करून देणं आणि कुठंतरी एखाद्या जबाबदार विचाराची पेरणी त्यांच्या मनात करणं हे जमलंच नाही मला! माझा आवाज चढला तसे कावरेबावरे झालेले विद्यार्थी लेक्चर संपल्यावर नेहमीसारखे खेळीमेळीत माझ्याशी न बोलताच निघून गेले. नेहमी मी त्यांच्याप्रती दाखवत असलेली आस्थाच मला वाढीव दरानं परत मिळते, ते आज घडलं नाही… कारण मुळात मी द्यायलाच कमी पडले होते!

संध्याकाळी येतायेता भाजी घेऊन मग आमच्या नेहमीच्या फुलवालीजवळ आले. खूप दिवसांनी आज ती दिसली म्हणून जरा दोन शब्द बोलत थांबले. विषय निघत गेला आणि लॉकडाऊनमधे सगळं कसं निभावलं वगैरे चौकशी केली. मग देवासाठी फुलं, गजरा वगैरे घेतलं आणि पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवली. फुलांचे झालेले चाळीस रुपये ठेवून घेऊन दहा रुपये ती मला परत करू लागली, तर अगदी सहज मी तिला म्हटलं, ‘राहुदेत गं!’ खरंतर काय मोठी लाखातली मदत नव्हती कि फार भारी काहीच केलं नव्हतं मी! कदाचित झालेल्या गप्पांचा परिणाम असेल… मला जराशी आस्था वाटली आणि त्याचंच नकळत मी देऊ केलेलं ते छोटंसं प्रतीक असावं. पण ही ‘दिलेली’ किरकोळ आस्था, प्रेमही ‘वाढतं’ होऊन माझ्याकडं परत आलंच. तिथून जरासं पुढं येत माझी स्कूटी सुरू करून चार-पाच फूट पुढं नेली आणि ती चांगलीच लटपटली. नशिबानं फार स्पीड नव्हता म्हणून मी पडतापडता वाचले. उतरून बघितलं तर मागचं टायर पूर्ण खाली बसलेलं दिसलं. मी ढकलत स्कूटी बाजूला घेतली तोवर फुलवाली, ‘काय झालं, अम्मा?’ म्हणून ओरडून विचारत होती. मी टायरकडं बोट दाखवलं तसं तिच्याशेजारी बसून फुलांचे गजरे, हार करत असलेला तिचा नवरा हातातलं काम ठेवून पळत आला.

‘पाच मिनिटं थांबा, मी आणतो पंक्चर काढून’ म्हणत तो समोरच्या छोट्या गल्लीत माझी स्कूटी घेऊन गेला. दहा मिनिटांनी मेकॅनिकसोबतच एका गाडीवर बसून परतलेला तो म्हणाला, ‘टायरच गेलंय पार. फाटलंय एकाजागी पूर्ण. ते बदलायला लागेल, अम्मा!’ जवळपासच्या दोन-तीन दुकानांची नावं सांगत मेकॅनिक म्हणाला, ‘नवीन टायर आणून द्या, मॅडम!’… मात्र ती दुकानं अगदी जवळपास नव्हती. शेवटी फुलवालीच्या नवऱ्यानं त्याच्याशी बोलून मग ‘मेकॅनिकनंच नवं टायर आणून, बदलून गाडी तासाभरात तयार करून दिली तर चालेल का’ असं मला विचारलं. माझी यातायात वाचवणारा हा पर्याय खरंच उत्तम होता! मी टायरचे पैसे मेकॅनिककडं सुपूर्द केले आणि मेकॅनिक निघाल्यावर फुलवालीच्या नवऱ्याला ‘ऱ्होम्ब थॅंक्स’ म्हणजे ‘खूप खूप धन्यवाद’ म्हणाले. तर तोच उलट मला म्हणाला, ‘काय काळजी करू नका. चांगला मेकनिक आहे. एकदम नीट काम करून देईल. तुम्ही आरामात घरी जा. बायकोकडं नंबर देऊन जा तुमचा, गाडी आली कि फोन करतो तुम्हाला!’ प्रश्न निर्माण झाला होता पण मला तापत्रय न होता तो सहजी सुटला होता… केवळ मी ‘दिलेल्या’ किंचितशा आस्थेमुळं!

तिथून रिक्षा करून घरी आले. तर पार्किंग एरियात खेळत असलेलं, आमच्या अपार्टमेंटमधे राहाणारं एक अडीच वर्षांचं पिल्लू हात पसरून धावत येत ‘आsssssन्टी’ म्हणत मला बिलगलं. लॉकडाऊनमधे टेरेसवर वरचेवर होणाऱ्या गाठीभेटींमुळं आमच्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि मी त्याच्याशी पकडापकडी, छोटुशा बॅटबॉलनं क्रिकेट खेळणं, कधी त्याच्यासोबत जोरजोरात ऱ्हाईम्स म्हणणं असले प्रकार केल्यानं ती फारच पक्की झाली होती. अलीकडं रोज भेट होत नव्हती. म्हणूनच आज खूप दिवसांनी मी त्याला दिसल्यावर त्याला प्रेमाचं अगदी भरतं आलं होतं. त्या बाळमिठीनं मला जो आनंद दिला तो शब्दांत मांडता येणार नाही. मी त्याला थोडीशी गट्टी काय ‘देऊ केली’ त्यानं हात पसरून त्याच्या विश्वात मला अतीव प्रेमानं सामावून घेण्याइतकी त्यात ‘वाढ’ झाली. खरंच ‘दिल्यानं वाढतं’ ह्यावर विश्वास ठेवायलाच हवा… मात्र ‘देऊ तेच वाढतं’ हेही लक्षात ठेवायला हवं.                

तसाही प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीनं आपली लढाई लढत असतोच, त्यात आता सध्याच्या विचित्र परिस्थितीनं एक वेगळंच गांभीर्य आणि अस्वस्थता आणली आहे. काही अगदी सहजी होणरी कामं ‘ऑनलाईन’ प्रकरणामुळं गोलगोल फिरून चक्रावून गेल्यावरही होताहेतच असं नाही. काही बाबतीत काम सोपं झालंय हे नाकारता येत नसलं तरी त्यापेक्षा अवघड झालेल्या गोष्टींचं प्रमाण हे फार मोठं आहे हेही तितकंच खरं आहे. त्याचमुळं कामांच्या बदललेल्या पद्धती, एकमेकांशी समन्वय साधताना येणारे अडथळे, वाढत्या बिकटतेची आणि जबाबदारीचीही कधीकधी हादरवून टाकणारी जाणीव, इच्छा नसतानाही संकुचित विचारांना झुकतं माप देण्याकडे वाढलेला कल, म्हणूनच मग कधी आपल्या प्रत्यक्ष वागण्यातही नकळत कद्रूपणा उतरला कि नंतरचा कुरतडत राहाणारा अपराधभाव, चूक-बरोबर, योग्य-अयोग्याचे मापदंडच ठरवता येऊ नयेत अशी विचित्र मनोवस्था ह्या सगळ्यांतून अपरिहार्यपणे आत्ता आपण सगळेच जातोय आणि त्याचे पडसाद आपल्या जगण्यात उमटताहेत. मात्र, ह्या सगळ्या निरर्थक वावटळींना दाद न देता आपण आस्था, प्रेम, सद्भाव, मदतीचा हात ‘देत’ राहूया… तेच मग ‘वाढतं’ होऊन आपल्याकडं परतेल ह्यात शंका नाही!

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments
Need Help? Chat with us