‘किती आले आणि किती गेले ??
कुणी आलं हसू घेऊन तर
कुणी पसाभर दु:ख घेऊन
उरलं कोण ??
कणभर माणसं आणि मणभर अनुभव..!’
यापुढे काय लिहावं ते तिला सुचेना. ती बराच वेळ अक्षरांभोवती घुटमळत राहिली. शेवटी तिने डायरी बंद केली. दीर्घ श्वास घेऊन ती खिडकीबाहेर बघत राहिली. रात्रीच्या अंधारात हे शहर किती वेगळं दिसत नाही.. फिकट पिवळा मंद मंद उजेड, आवाज गोंगाट नाही की माणसांची गर्दी नाही. फक्त मिणमिणते दिवे.. कितीतरी आशांचे, स्वप्नांचे, ध्येयाचे, कष्टाचे आणि कितीतरी तळमळणाऱ्या जीवांचे ..फक्त लुकलुकणारे दिवे!! हे शहर किती भयाण वास्तव पोटात घेऊन झोपते नाही.? किती भुकेले, किती चिंताग्रस्त चेहरे या अंधारात लुप्त होतात. चालू राहते ती फक्त धावपळ जगण्यासाठीची.!
खरं तर शहरं प्रतिनिधित्व करतात एखाद्या मानसिकतेचं..एखाद्या व्यक्तीवैशिष्ट्याचं. शहरं सुखी असतात, दुःखी असतात. मदोन्मत्त असतात ;त्याचं वेळी भुकेने व्याकूळही. शहर मुळी असतातच संमिश्र भावनांचं कोंदण..! धगधगत्या लाव्हासारखं..व्यक्तही होत नाही आणि धुसमुसत राहतात आतल्या आत.!
थंडगार वाऱ्याचा बोचरा स्पर्श तिच्या शरीरावर झाला. ती शहारली. तंद्री भंग झाली. विचारांचा भुंगा मात्र डोक्यात चालूच होता. तिने कॉफी बनवायला घेतली.आज हे विचार कुठल्या कुठे नेणार याचा थांग तिला लागेना. गरम कॉफी घेत घेत ती खिडकीबाहेर बघत राहिली.
पंधरा वर्ष झाली इथे येऊन. पण हे शहर नेहमी वेगवेगळ्या रुपात पहायला मिळालं.आपलसं वाटलच नाही कधी ! या वर्षांत किती अशक्य गोष्टी घडून गेलेल्या. किती नवीन कलाटणी मिळाली. आणि आता या टप्प्यावर आयुष्य उभं.! येण्यापूर्वी किती उत्सुकता होती नाही..आता मात्र एक उदासिनता! आता ती धडाडी नाही; ते सळसळत रक्त नाही की विचाराभावी निर्णय घेणं नाही. प्रत्येक पाऊल टाकताना ते घसरू नये यावर कटाक्ष!
एका विशिष्ट वयानंतर आयुष्य किती जबाबदारीने वागायला शिकवत नाही!!
भूतकाळाची चित्रफीत तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली.आयुष्य पंधरा वर्ष मागे गेलं..
इथं मुलींची सुरक्षितता जास्त आणि शिक्षण उत्तम म्हणून घरुन परवानगी मिळाली. ती ॲक्टिव होतीच. लवकरच तिची मैत्री जमली. मोठा ग्रुप तयार झाला. पहिल्या वर्षीही ती चांगल्या मार्कांनी पास झाली. आता कॉलेजमध्ये, शहरात रुळायला लागली होती. राहणीमानातही प्रचंड बदल झाला होता. वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि खेळांच्या स्पर्धांतही ती भाग घेत होती.. इथंच नजरानजर झाली.डोळ्यांतून प्रेमाची भाषा कळली.
ट्रेकिंगला गेल्यावर केलेला पहिला स्पर्श, घट्ट मिठीत दोघांचे गुंतलेले श्र्वास..आणि लाजून गुलाबी झालेले तिचे गाल..! याचं शहराने तारूण्याला बहर आणला होता. प्रेम फुललेलं होतं.
सुमीत सोबत सगळं नात संपून कितीतरी वर्ष लोटली होती. त्याच त्याच पणाला कंटाळून, भांडणाला कंटाळून तिनेच निर्णय घेतला होता. सुमीतने मनधरणी करूनही तिने नकार कायमच ठेवला होता. नंतर कधीतरी पुन्हा तो भेटला होता बायकोसोबत. आनंदात होता. चांगला बोललासुद्धा. पण ती मात्र उदास झाली. घाईघाईत निर्णय घेतल्याचा पश्र्चाताप तिला होत होता. पण तेव्हा अहंकार आडवा आलाच होता.!
कॉलेज संपून मास्टर्स करून तिने चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली. तिथेही तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. असिस्टंट मॅनेजर पोस्ट मिळाली. प्रत्येक पायरीवर ती यश मिळवत होती. टीममध्ये असणाऱ्या हर्षद ने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा तर तिला आभाळच ठेंगणं झालं होतं. देखणा, गोरापान आणि श्रीमंत ! याच तर तिच्या अपेक्षा होत्या.घरून कडाडून विरोध असतानासुद्धा बाबांना दुखवून तिनं लग्न केले. हट्टी तर होतीच ती. लग्न झालं संसार सुरू झाला. तिची महात्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देईना. तिची घोडदौड सुरू होती. करीअरवर ती केंद्रीत झाली होती. नव्या संसाराला वेळ द्यायला तिला जमत नव्हतं. कधीकधी ती उशीरा घरी यायची तेव्हा तो दमून झोपलेला असायचा. कधीकधी तो चिडायचा. ती घट्ट मिठी मारायची. एकमेकांच्या स्पर्शात राग निवळून जायचा.
शेवटचा कॉफीचा घोट संपला. घड्याळात एकचा ठोका पडला. तिने भूतकाळ झटकला. दाराकडे नजर टाकली. हर्षद अजून घरी आला नव्हता. तिने फोन हातात घेऊन डायल केला. मोबाईल स्वीच ऑफ होता. ती काळजीत पडली. पुन्हा येऊन खिडकीबाहेर बघत राहिली. सहा महिन्यांपूर्वी तो आणि श्रुतीच्या मैत्रीबद्दल तिला समजलं होतं.मेसेज तर चालूच असायचे. श्रुतीचं कौतुक तिला आवडायचं नाही. कोणीही वरचढ झालं की ती वेडीपीशी व्हायची.एकदा तिने किती आकांत तांडव केला होता. रडून थैमाण घातलं होतं. त्याच्याकडून नाक घासून पुन्हा असं करणार नाही हे हजारदा वदवून घेतलं होतं. तेव्हापासून दोघांचे संबंध ताणले गेले होते. तिचं मन शंकांनी घेरून जायचं.परस्री आपल्या पुरूषाजवळं आलेली कोणत्याच बाईला खपत नाही म्हणा!
महिनाभरापासून ती घरातचं होती. नव्या जॉबची मॅनेजर पदासाठी ऑफर आली होती.बक्कळ पगार आणि बढती.पुढच्या महिन्यात जॉईन व्हायचं होतं पण त्या आधी अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग घ्यायचं होतं. बुकींग झालं होतं. परवा तर निघायचं होतं. तिचा हा निर्णय हर्षदला मान्यच नव्हता पण ती हट्टाला पेटली होती. तिने एखादी गोष्ट मनात आणली तर ती करायचीच. तिच्या या हट्टापुढे हर्षदला कायमच नमतं घ्यावं लागतं होतं. या शहराने तिला मानसन्मान दिला होता. गगनाला गवसणी घालण्याचं बळ दिलं होतं. ते शहर सोडून ती नव्या शहराकडे निघाली होती जिथं स्वप्न साकार होतात असं शहर..!
दारावरची बेल वाजली.
तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. हर्षद दरवाजात उभा होता.
“किती उशीर रे?”
“तू अजून जागीच?”
“हो रे..झोप नाही लागली. तुला फोन करत होते पण लागलाच नाही.”
“हो मीटींगमध्ये होतो.” बुट काढत तो म्हणाला
“काही खाणार?”
“नको. खाऊन आलोय. थोडं पाणी दे ना. मी फ्रेश होतो.”
ती बेडरूममध्ये पाणी घेऊन आली.
पाणी घेत त्याने विचारलं,
“तयारी झाली?? काही राहिलं नाही ना??”
“नाही रे. झालयं फक्त एकदा चेक करून घेईल.”
“छान…मग खूश आहेस ना?”
“हो..मला तुझी फार आठवण येईल..”त्याच्या गळ्यात हात टाकून ती म्हणाली.
त्याचा चेहरा पडला. डोळ्यात पाणी तराळलं.
“मलासुद्धा..!”
तिने त्याच्या बाहूपाशात स्वतःला लोटून दिलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा डोळा उघडला तेव्हा तो आधीच निघून गेला होता. आळसाने कितीतरी वेळ ती तशीच पडून राहिली. सगळ्या सोशल मीडीया चेक करून झाल्या. ती उठली आवरून तिने बॅग चेक करायला घेतली. अपाईंटमेंट लेटर तिला काही केल्या सापडेना. हॉलमधले सगळे ड्रॉवर चेक करून झाले. ती काळजीत पडली. ह्रदयाचे ठोके जलद पडत होते. तिने सांभाळून इथेच ठेवला होता. ती वारंवार आठवत होती. हर्षदने तर नसेल ना ते फेकून दिलं, तिच्या मनात विचार चमकून गेला. रागाने नाकाचा शेंडा लाल झाला. हो त्यानेच फेकून दिलं असणारं, तसंही त्याला माझी प्रगती बघवते कुठे? बायकोला कायम हाताखाली ठेवणारी ही पुरुषी जमात?? खरं वागायला जमतचं कुठे यांना? शरीराची भूक भागली की झालं! ती तणतणत स्वतःशी म्हणाली. रागाचा , शंकेचा, द्वेषाचा पारा चढला होता. तिचा स्वाभिमान दुखावला होता.
ती बेडरूममध्ये आली. एकेक ड्रॉवर नीट चेक करत होती. एका कप्प्यात एका फाईलकडे तिचं लक्ष गेलं. तिने ती उघडली
‘घटस्फोट अर्ज’
अर्जदार- हर्षद
ती मटकन खाली बसली.शेवटी याने केलचं असं. तिच्या डोळ्यांत पाणी आलं.त्याने वरवर नाटक तर केलं होतं श्रुतीसोबत काही नाही दाखवायला. आणि पाठीमागे असं विश्वासघात केला, तिच्या डोक्यांत शंकाकुशंका तयार झालेल्या. तारीख दोन महिन्यांपूर्वी होती. ती फाईल अधाशीपणे उलगडत होती एक एक पेपर पहात होती. एक हॉस्पिटलची पावती तिला दिसली. तिला जबरदस्त धक्का बसला. हे हर्षद ला कुठून मिळालं?? ती घामाने डबडबली..तिच्या घशाला कोरड पडली.
आपण गर्भपात करून घेतल्याचं हर्षद ला कळालं?
प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याला न सांगताच तिने गर्भपात करून घेतला होता. करीअरची आता कुठे सुरुवात झाली होती. आणि ही मॅनेजर पदासाठी ऑफर तिला गमवायचीच नव्हती. त्यासाठी तिने न जन्मलेला मांसाचा गोळा भावना गुंतायच्या आधीच स्वतःपासून तोडून टाकला होता. त्याच्या पासून हे सगळं तिनं शिताफीने लपवलं होतं..पण त्याला कळलंच शेवटी.
पलंगाला टेकून ती सुन्न बसली. त्याचं तरी काय चुकलं म्हणा.. आपल्यापेक्षा कमी पदावर आपल्या दबावाखाली तो राहिलं म्हणून स्वार्थापोटी लग्न केलं. नवरा सपोर्ट करतो म्हणून किती करीअर वर लक्ष दिलं. कधीकधी उशीरा आले तर स्वयंपाक करून जेवणासाठी वाट पाहणारा नवरा कधी दिसलाच नाही. प्रेमाने जवळ आला तर थांब रे महत्त्वाचं काम करतेय म्हणून त्याच्या भावना कधी समजून घेतल्याचं नाही. श्रुती सोबत त्याची वाढती मैत्री पाहून आपण कुठे चुकलो किंवा त्याचा एकाकीपणाला समजून न घेता आकांताने त्यालाच चुकीचं ठरवलं. पण आपल्यासुद्धा बरेच मित्र होते. सुमीत नंतरही बरीच मुलं आयुष्यात आली.तरी आपण हर्षदची मैत्री समजावून घेऊ शकलो नाही. तो मात्र कायम तसाच होता. प्रेमळ, काळजी घेणारा सपोर्ट करणारा. दोघांचं पोटात वाढणारं लेकरू आपण जन्मदात्याला माहिती न पडता झिडकारून दिलं.इतकी कशी आपण अप्पलपोटी ,स्वार्थी महत्त्वाकांक्षी झालो?? आजपर्यंत स्वतःभोवती फिरत आलोय..मर्जीने..त्यात किती नाती गमावली..आणि आता हा..अर्ज दोन महिन्यांपासून पडून आहे पण तो अजूनही सगळं ठीक होईल आशा करतोय.?? आपण त्याच्या जागी असतो तर?? सगळं लाथाडून क्षणात निघून गेलो असतो हे शहर सोडून..आता दोन पर्याय आहेत..हे शहर ही माणसं इथचं सोडून जायची.. किंवा याच शहरात पुन्हा एकदा नव्या आयुष्याची सुरुवात करायची..शहर वाढलं होतं तशीच तिची महत्त्वाकांक्षा .आणि महत्त्वाकांक्षी आयुष्याची ही अशी ससेहोलपट!
फोनची रिंग वाजली तिची तंद्री भंग पावली. तो फोनवर होता
” ऐक ना..बेडरूममध्ये माझ्या कप्प्यात वरच्या बाजूला तुझं लेटर ठेवलं आहे. गडबडीत कुठेतरी टाकशील म्हणून मीच ठेवलं होतं. आता आठवलं म्हणून फोन केला. बरं ऐक मीटिंगला जातोय. रात्री बाहेर जायचा प्लॅन आहे. तयार रहा.” त्याने फोन ठेवून दिला. तिच्या हातातून फोन गळून पडला.
ती धडपडत उठली. डोकं सुन्न झाले होते. ती खिडकीबाहेर बघत राहिली. गाड्या धावत होत्या.डोळ्यांतलं पाणी केव्हाचं आटलं होतं. पळणारी झाडं, गडबडीत असणारी माणसं डोळ्यांसमोर दिसत होती. शहर पुन्हा वेगळ्या रुपात दिसत होतं. .. एकीकडे हर्षद आणि एकीकडे महत्त्वाकांक्षा..!. मदोधुंद व्हावं तसं असूया, मत्सर, द्वेष, महत्त्वाकांक्षा यांनी तिला घेरून टाकलं होतं..इथं भावना आपली माणसं यांच्यापासून ती दूर दूर होत चालली होती. नियतीने नवा फासा टाकला होता.निर्णय तिच्या हातात होता..शहरातच रहायचं की शहरचं सोडायचं..!
समाप्त
Mastach 💯🤩👍