fbpx

आज जरा उशीरानंच जाग आली. शलाका सगळं आवरून पटकन किचनमधे गेली तर विजुताई म्हणाल्या, ‘हा बघ उपमा होत आलाय आणि दुपारी मुगाची खिचडीही मी करते. तू स्वयंपाकघराकडं बघूच नको आज. स्वस्थतेनं पुढच्या आठवड्याची मुलांची, तुझी कायकाय तयारी करून ठेवायची असेल ती ठेव. फार दगदग होते गं जिवाची नाहीतर!’

‘अहो आई कशाला?’ असं म्हणाली तरी शलाकाचं मन त्या कल्पनेनं सुखावलं होतं. 

‘अगं, असूदे जा तू. इतर कामांचं बघ’ असं त्यांनी म्हटल्यावर ती खुशीत स्वयंपाकघरातून बाहेर पडली होती. 

दुपारी जेवायच्यावेळी सगळे टेबलाशी जमले तेव्हां ‘आज संध्याकाळी आपण बीचवर जाऊया… मस्त मजा करू… बीचसेट घ्या रे सोबत आणि शैलू, तू बॅडमिंटन सेट घे. किती दिवस झाले आपली मॅच नाही झाली…’ असं प्रसन्न सुरांतलं शलाकाचं वाक्य आलं तसं शैलेश अणि मुलं आश्चर्यानं तिच्याकडं बघू लागली. तिनं हसत ‘येस… आय ऍम सिरियस’ असं म्हटलं आणि पोरांनी एकमेकांना टाळ्या देतानाचा आनंदी क्षण विजुताईंना तृप्त करून गेला. 

‘हो रहा है… असर हो रहा है’ असं कुठल्याशा हिंदी सिरियलमधलं वाक्य त्यांनी त्या पात्राच्या टोनमधे मनातल्या मनात उच्चारलं आणि त्या स्वत:शीच लाजल्या. आनंदाच्या भरात कुकरचं हॅंडल धरताना बोटं कुकरला लागून त्यांना चांगलाच चटका बसला तरी त्याचं फारसं काही वाटून न घेता त्यांनी उत्साहानं कुकर बाहेर डायनिंग टेबलवर आणला. सगळ्यांची पानं वाढून झाल्यावर शेजारीच बसलेली शलाका खिचडीचा घास घेताघेता ‘ऑसम खिचडी आई…’ म्हणाली आणि विजुताईंना अगदीच धन्य झालं. 

एरवी थकून ‘मला जर कुणाचा आवाज आला आणि झोप डिस्टर्ब झाली तर गाठ माझ्याशी आहे’ असं मुलांना धमकावून तासभर आडवी होणारी शलाका आज खुशीत लेकाच्या एका प्रोजेक्टला मदत करतकरत आधी टीव्हीसमोर बसली होती. त्यानंतर ‘आज झोपत नाही, नाहीतर आळस भरेल आणि मग बीचचं राहून जाईल परत… ’ असं म्हणत चक्क एक पुस्तक वाचत सोफ्यावर पाय पसरून बसली. विजुताई आज जरा जास्तच निरीक्षण करत असल्यानं त्यांना तिचं आनंदी असणं जाणवत होतं आणि त्यांच्या मनातल्या विचाराला बळकटी मिळत होती. 

उन्हं उतरायच्या आत सगळे तयार झाले आणि जरा ऊन कमी व्हायला लागताच बाहेर पडलेही!  बीचवर पोहोचले तसं मुलांनी बीचसेट घेऊन आपापला संसार मांडला… मनसोक्त खेळण्यात ती गुंतली होती. ‘आई, जरा आज मॅच खेळायचा प्रयत्न करते, म्हणजे बघते जमतंय का ते… किती दिवस झाले खेळून’ असं म्हणत शलाका शैलेशसोबत लाटांपासून जरा लांब जाऊन बॅडमिंटनची मॅच खेळू लागली आणि विजुताई निवांत वारं खात स्वस्थतेनं समुद्र निरखत बसल्या. मधेच त्यांची नजर शेजारीच सुरू असलेल्या मुलांच्या खेळाकडंही वळत होती. 

अर्धा-पऊण तास गेला असेल आणि शलाका एकदम त्यांच्याशेजारी येऊन बसत म्हणाली, ‘आई, वय जाणवायला लागलंय आता. पंधरा-सोळा वर्षांपूर्वीची एनर्जी लेव्हल राहिली नाही!’ 

विजुताई म्हणाल्या, `अगं, कशी राहील? इतक्या वर्षांत व्याप किती वाढले, त्यात किती ताकद खर्ची पडली हाही विचार कर.’ 

शलाकानं  चमकून त्यांच्याकडं पाहात म्हटलं, ‘सिरीयसली आई, हा विचार मनात येण्याइतकाही स्वस्थ वेळ मिळाला नाही. टाईम जस्ट फ्लाइज… केवढं कायकाय घडून गेलं इतक्या वर्षांत.. इवलीशी दुपट्यातली  मुलं माझ्या उंचीला आली… शैलेशचे कामानिमित्तानं दहा देश फिरून झाले आणि त्यावेळी मुलांसोबत एकटीनं माझी कसरत झाली.. मग तुम्ही गावाकडून इकडं शिफ्ट झालात तेव्हा थोडा आधार आला. पण परत बाबांच्या आजारपणात तुमचीच केवढी दगदग झाली.. आमच्या व्यापात आम्ही फार काही वेळ देऊ शकलो अशातला भाग नाही.. पण सगळे सोबत होतो म्हणून हेल्पर ठेवून का होईना निभलं सगळं म्हणायचं… पण काय कि, आई… आता मात्र  एकेकदा सगळं रेटत नाही असं वाटायला लागतं, मधेच अंगात काही त्राणच नसल्यासारखं होतं.’

‘अगं, रेस्टिंग पिरियड हवा आहे तुला आता थोडा… म्हणजे गरजेचाच आहे तो…’ विजुताई ठामपणे म्हणल्या.

‘इतक्यात कुठं रेस्ट, आई? आता तर मुलांची अभ्यासाची महत्त्वाची वर्षं सुरू होतील!’

‘अगं, रेस्ट म्हणजे सगळं सोडून देत नुसतं लोळायचं असं नाही गं! पण पुढची झेप घेण्याआधी जरा काही क्षणांची विश्रांती घ्यायची निदान. तेवढ्यानंही थोडी का होईना टवटवी येते… आजच जाणवलं मला ते’ 

‘म्हणजे?’

‘पोरांना साधं बीचवर आणण्यासारखी गोष्ट… पण तुला एनर्जी नसते एरवी तेवढी… आज बघ बरं कशी आपणहोऊन म्हणालीस त्यांना जाऊया म्हणून… किती आनंदली ती’

‘त्याचं क्रेडिट मात्र तुम्हाला आहे हं, आई! आज नाश्ता, लंच सगळं तुम्ही केल्यानं माझा इतका वेळ वाचला… त्यामुळं संध्याकाळी सहज वेळ काढता आला.’ 

‘अगं, हा इवलासाच रेस्टिंग पिरियड दिला मी तुला तर केवढा फरक पडला बघ!’ 

‘काय आई, ह्या वयात तुम्ही करायचं आणि आम्ही बसून खायचं का?… कधीतरी गरजेला केलंत तर ठीक आहे… पण तुम्ही आता तब्येत सांभाळणं गरजेचं आहे. तीच सगळ्यांत मोठी मदत होईल आम्हाला… वेळीच ट्रीटमेंट झाल्यानं बाबांच्या नंतर तुमचं मोठं आजारपण होताहोता राहिलंय… आता तुम्ही काही रिस्क न घेता तब्येतीला जपा फक्त… नो दगदग!’

‘अगदी मान्य… दगदग करणारच नाहीये मी! उपमा, पोहे आणि खिचडीला कितीसे कष्ट असतात? तेवढंच करीन मी! काही पुरणा-वरणाचा घाट घालणार नाहीये. पण तुला तेवढासा वेळ जरी स्वयंपाकघरातून पूर्ण मोकळीक मिळाली तरी डोक्यावरचं ओझं उतरून बाकी कामं किती पटापट होतात बघ. म्हणून इथून पुढं रविवारी नाश्ता, दुपारचं जेवण माझ्याकडं लागलं.’

‘हे कुठून काय नवीन काढलं आहे आई तुम्ही?’

‘अगं, आपल्या कृष्णाची आयडिया आहे ही!’

‘कोण आपलं बागकाम बघायला येतो तो, कृष्णा? त्यानं तुम्हाला स्वयंपाकघर सांभाळायला आणि मला रेस्टिंग पिरियड द्यायला सांगितलं आहे?’

‘छे गं! ऐक तर गंमत… अगं, बऱ्याच झाडांचासुद्धा असा रेस्टिंग पिरियड असतो म्हणे. कृष्णा म्हणाला, त्या वेळात त्यांना ना खत घालायचं, ना जास्त पाणी घालायचं… उलट त्यांची छाटाछाटी करून भार हलका करायचा आणि त्याचा परिणाम म्हणून मग काही दिवसांनी ते झाड दुप्पट वेगानं अगदी जोमानं बहरून येतं…’

‘तो गप्पादास तिकडं शेतकी कॉलेजमधे शिकतो ते येऊन तुम्हाला सांगत बसतो वाटतं…’

‘अगं नाही… आपल्या पण पाच-सहा कुंड्यांतली रोपं मरगळल्यासारखी झाली आहेत… पालवीच फुटेना त्याला… म्हणून कृष्णाला म्हटलं कि काही वेगळं खत लागणार असेल तर आणून घाल… तेव्हां मला त्यानं सांगितलं हे रेस्टिंग पीरियडचं!…’

‘ओह ओके….’ 

‘ते ऐकल्यावर माझ्या मनात आलं गं कि, एरवी स्वत:ला प्रफुल्लित ठेवून स्वत:ची नोकरी सांभाळूनही सगळा गाडा तूच हाकत असतेस…. शैलूची मदत म्हणजे मुळात तो गावात असायला हवा, माझी मदत मला झेपेल तशी वरवरची किरकोळ, पोरांना त्यांचा अभ्यासाचा व्याप आहे…. त्यामुळं कसरत तुझीच… पण तुझ्यातली ही सगळं सांभाळण्याची टवटवी कायम राहाण्यासाठी तुलाही रेस्टिंग पीरियड हवाच कि…. मग दुप्पट जोमानं पुन्हा आठवडाभर सगळं करु शकशील… म्हणून आपला माझा म्हातारीचा हा जमेल तसा छोटासा प्रयत्न!’

गहिवरून आलेलं मन डोळ्यांतून बाहेर येतायेता थोपवून धरत शलाका म्हणाली, ‘तुमची ऑसम खिचडी मिळणार असेल तर त्यासाठी रेस्टिंग पिरियड मंजूर आहे मला, आई!’  

‘म्हणजे तुम्ही म्हणता तसा माझा प्लॅन ‘डन’ झाला म्हण कि’ असं म्हणत विजुताई लाजल्या आणि नवीन पिढीची भाषाही आत्मसात करू पाहाणाऱ्या आपल्या गोंडस सासूकडं पाहाताना शलाकाच्या ओठांवरही हसू उमटलं. 

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments