महाराष्ट्रात राहणारे व इथल्या संस्कृतीशी नाळ जोडलेले मराठा व अठरा पगड जातीतील लोकांचे,म्हणजेच मराठ्यांचे राज्य शिवछत्रपतीनी स्थापित केले. त्याची प्रेरणा मालोजीराजे,शहाजीराजे, व जिजाऊ पासून घेतली.
तद्नंतर छ.संभाजी महाराजांची कारकीर्द, इथपर्यंत सर्वजण भिज्ञ आहोत.
खरेतर स्वराज्यासाठी कसं जगावं हे छ.शिवाजी महाराजांनी तर स्वराज्यासाठी कसं मरावं याची शिकवण छ.संभाजी राजेंनी दिली.
भाग-१
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध १- छ.राजाराम महाराज
महाराष्ट्रात राहणारे व इथल्या संस्कृतीशी नाळ जोडलेले मराठा व अठरा पगड जातीतील लोकांचे,म्हणजेच मराठ्यांचे राज्य शिवछत्रपतीनी स्थापित केले. त्याची प्रेरणा मालोजीराजे,शहाजीराजे, व जिजाऊ पासून घेतली.
तद्नंतर छ.संभाजी महाराजांची कारकीर्द, इथपर्यंत सर्वजण भिज्ञ आहोत.
खरेतर स्वराज्यासाठी कसं जगावं हे छ.शिवाजी महाराजांनी तर स्वराज्यासाठी कसं मरावं याची शिकवण छ.संभाजी राजेंनी दिली.
मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा व टप्प्याटप्प्याने सर्व दक्षिणच नव्हे तर दिल्लीसह उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची महत्वकांक्षा बाळगणारे राजाराम महाराज आमच्या इतिहासकाराणी पुढे आणले असते तर आज छ.शिवाजी व छ.संभाजी यांच्या खालोखाल छ.राजाराम महाराजांस मराठी जनतेच्या हृदयात स्थान मिळाले असते!
त्याचसाठी हा लेखनप्रपंच!पुढील काही प्रकरणात आपण या सर्व गाळीव इतिहासाची दखल घेतो आहोत!
सुरुवात स्वराज्याचे तिसरे छ.राजाराम महाराज यांपासून करू👍🏼🚩🙏🏼
राजाराम महाराज यांचा जन्म महाराणी सोयराबाई पोटी २४फेब्रुवारी १६७०साली (छ.संभाजी,१४मे१६५७)किल्ले रायगडावर झाला.
शिवरायांच्या हयातीत (१६८०)त्यांचा विवाह सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या जानकीबाईशी झाला.
संभाजीराजेनी सरसेनापती हंबीरराव यांच्या कन्येचा,ताराबाई चा व कागलकर घाटगे घराण्याची राजसबाई यांच्याशी राजारामांचा विवाह लावून दिला.
अत्यंत मुत्सद्दीपणाने व निकराने औरंगजेबशी लढा देऊन बहुदा देवीच्या साथीमध्ये ३मार्च १७००साली त्यांचा मृत्यू किल्ले सिंहगडावर झाला.(जाणकार तिथे जाऊन आले असावेत)💐
१) ११मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांच्या दुर्दैवी अंतानंतर ५एप्रिल ला वाघ दरवाज्यातून राजाराम राजे गडउतार झाले.त्यावेळी त्यांचे वय होते अवघे १९वर्षे!
२) तिथून प्रतापगड-सातारा-वासोटा-वसंतगड करत ते पन्हाळ्यावर आले व तिथून जिंजीकडे(त्यावेळी कर्नाटक प्रांत व सध्या तामिळनाडू) प्रयाण!
संभाजी महाराज पकडले गेल्यावर ८महिने राजाराम स्वराज्यातच होते.
पण ते जिथे जातील तिथे मुगल आक्रमण व पर्यायाने रयतेस व स्वराज्यास त्रास होऊ लागल्याने जिंजी चा मार्ग!
३) जिंजीचा किल्ला बळकट.राजगिरी, कृष्णगिरी व चांद्रयनदुर्ग या तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला.
किल्ल्याचे त्रिकोनाकार क्षेत्रफळ ३ मैलांचे .
येथे ८ वर्षे राजधानी हलविली आणि येथूनच कर्नाटक व स्वराज्यातील लष्करी, प्रशासकीय नियंत्रण चालू ठेवले.
४)जिंजीचा प्रवास सोप्या नव्हता.खूप धोकादायक कारण सगळीकडे मुगलसैन्य.
अशा स्थितीत शिमोगा-बंगळूर-वेल्लोर मार्गे जिंजीला ३३दिवसात पोहोचले.
केशव पंडित लिखित ‘राजारामचरितम’ मध्ये याचा सादयन्त वृत्तांत आहे.
मार्गामध्ये बेदनूरची राणी चन्नमा यांचे सहाय्य झाले.
एक रोचक किस्सा म्हणजे तुंगभद्रेच्या किनारी शत्रू ने घाला घातला तेव्हा शिवरायांच्या प्रमाणे तोतया राजाराम उभे करून मराठ्यांनी पळ काढला.
५) झुल्फिकारखानाचा १६९० मध्ये जिंजी ला वेढा पडला.
हा मुगलांचा सेनापती.
राजेंचा मुत्सद्दीपणा म्हणजे बादशहा मेल्यानंतर दक्षिण सुभा(गोवळकोंडा व विजापूर बादशहा ने पूर्वीच सम्पवले होते) याचा गुप्त करार खानाच्या बाजूने.
खानाला फक्त वेढा चालू ठेवायचा होता.
पुढे जाऊन १६९७ ला जिंजीतून निसटून महाराष्ट्रात येन्यासाठी पण मदत झाली.
६) शहजादा कामबक्ष व वजीर असदखान याना बादशहा ने जिंजी कडे पाठवले त्यावेळी शहजादा शी राजेंनी संधान साधून त्याला गाफील ठेवले व शहजादा आणि वजीर व सेनापती यांच्यात दुफळी पाडली.
७) संताजी घोरपडे व धनाजी जाधव या सरसेनापती नी मुगलांचे अतोनात हाल केले.कोरेगाव मुक्कामी संताजीने तर ब्रह्मपुरी(मंगळवेढाजवळ)मुक्कामी धनाजी ने थेट बादशाही छावणी वर हल्ला करून मुगलांचे कम्बरडे मोडले.
या दोन्ही सेनानी व गनिमी काव्याबद्दल पुढे विस्ताराने लिहू.
८) राजाराम महाराज -जिंजी प्रस्थान का गरजेचे?
a)बादशहास छ.घराण्यातील सर्वाना एकाचवेळी कैद करण्यापासून रोखणे.
b)मराठे व मुगल याना तापी ते तंजावर हा विस्तीर्ण battlefield लागणार होता म्हणजे स्वराज्यावरील ताण कमी होणार होता.
c)हिंदू नायक व पाळेगार यांच्या मदतीने बादशहा विरुद्ध हिंदू सत्ताधीशांची एक संयुक्त आघाडी तयार करणे
९) महाराष्ट्र ची आघाडी रामचंद्र पंत अमात्य(हुकूमतपन्हा),शनकराजी नारायण ,हे प्रमुख प्रशासक व संताजी ,धनाजी हे प्रमुख सेनानी यांचे एक Regency Council निर्माण करून लढत ठेवली.
१०) अष्टप्रधान मध्ये प्रतिनिधी हे नवीन पद निर्माण करून ते प्रल्हादपंतास दिले(हेच पद पुढे जाऊन पेशवा मध्ये बदलले गेलेव्ही तो एक वेगळा इतिहास झाला)
११) राजाराम महाराज कसलेले सेनानी नव्हते पण तरी काही ठिकाणी त्यांनी नेतृत्व केले.
त्यांची प्रकृती नाजूक असावी .
राज्यकर्ता व सेनानी याचे रीतसर प्रशिक्षण रायगडावरील राजकारनामुळे मिळाले नव्हते. त्यांच्या १०व्या वर्षी वडील,१२ व्या वर्षी आई व १९ व्या वर्षी थोरले बंधू गेले,हे पोरकेपन देखील मोठे होते.
१२) लष्करी डावपेच व संयोजनामध्ये राजाराम महाराजाणी स्पृहणीय यश संपादन केले होते.
१३) मुत्सद्दी पणात शिवरायांच्या तोडीस तोड –
a)कर्नाटक मध्ये दुसरी आघाडी तयार करणे
b)शत्रू सेनापती झुल्फिकारखान यास आमीश देऊन झुलवत ठेवणे व कार्यभाग साधने
c)शहजादा काम्बक्ष ला गळाला लावणे
d)तोतया राजा तयार करून शत्रूस हूल देणे
e)हिंदू नायक व पाळेगारांची कर्नाटक मध्ये जाऊन मोट बांधणे
f)दिल्ली जिंकण्याची महत्वकांक्षा
e)इनाम,वतन,व सरंजाम देण्याची प्रथा सुरू करून मराठयांनी मुगलांवर दबदबा- यातूनच पुढे -कृष्णा सावंत -माळव्यात धडक-तापी पार करणारा पहिला मराठा सेनानी
h) कर्नाटक मधुन परतल्यावर किल्लोकिल्ली जाऊन तेथील संरक्षण व्यवस्था मजबूत करून शिबंदीचा उत्साह वाढविला
i) मोगलांशी तहाची चार वेळा बोलणी केली कारण बादशहा येथून जावा व परत स्वराज्य तयार करणे पण बादशाह हे जाणून होता व त्याने बोलनीच केली नाही
१४) मराठ्यांचे नितीधैर्य वाढवण्यासाठी हरएक प्रयत्न हा उपलब्ध पत्र व्यवहारातून दिसून येतो.
१५) इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच व डच यांच्याशी संबंध – निश्चितच ते संधीसाधू लोक त्यांचा तसाच वापर करून घेतला.
राजाराम महाराज मुळे मुंबई इंग्रजांना व पौंडीचेरी फ्रेंचांना राखता याली पण या उपकाराची जाण ठेवतील ते युरोपीय कसले नंतर गरजेवेळी त्यांनी आपल्याला मदत केली नाही.
१६) मराठा आरमार- मजबुतीकरण- कान्होजी आंग्रे यांचा उदय ,त्यांना युरोपियन पण घाबरत.
चौल ते कारवार या किनारपट्टीवर एकछत्री अंमल.
राजाराम महाराज यांच्या नंतर हा स्वातंत्र्य संग्राम महाराणी ताराराणी यांनी चालू ठेवला .
हे सर्व आपल्याला शत्रू इतिहासलेखक खफिखान,भीमसेन सक्ससेना,साकी मुसत्येदखान, इत्यादी तसेच युरोपियन डायरी व किरकोळ एतद्देशीय इतिहासकार यांच्या माहिती वरून कळते.
मराठ्यांचा पूर्ण इतिहास ग्रँड डफ या ब्रिटिश रेसिडेंट ने लिहिला.
खर म्हणजे इतिहासाबद्दल प्रचंड अनास्था ही गोष्ट आमच्या रक्तातच शेकडो वर्षे भिनली आहे.
आपले पण त्यावेळी कारकून होते. प्रशासन चालवणे व पत्रलेखन करणारे म्हणजे ‘पढे-लिखे’ , पण एकाने पण काहीच लिहून ठेवले नाही?
आता तरी आपण सजग होऊ व निदान आपला सम्पूर्ण इतिहास ज्ञात करायचा यत्न करून भावी पिढीपर्यंत नेवू!
(क्रमशः)
भाग-2
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध २- सेनानी संताजी व धनाजी
‘महाराष्ट्राचे महाभारत’ म्हणून ज्या कालखंडाचा इतिहासकार गौरव करतात तो हा कालखंड आहे. मराठयांच्या या स्वातंत्र्ययुद्धाचा (१६८१-१७०७) ज्वर टिपेला नेण्याचे काम या दोन महान सेनानींनी केले.👍🚩🙏🏼
‘मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत. त्यास मोगली लोकांनी म्हणजे की पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय?रात्री दिवसा कोणीकडून येतील,काय करतील ,असे केले.मोगलाई फौजेत आठही प्रहर भय बाळगीत.’ असे बखरकार मल्हार रामराव लिहितात.
धनाजी जाधव (१६५०-१७०८) यांचे वडीलादी देखील स्वराज्याची सेवा करीत होते.जिजाऊनी सिंदखेड वरून या जाधव मंडळींना स्वराज्यात आणले.
हा सेनानी मृदुभाषी,हाताखालच्या लोकांना सांभाळून घेणारा, मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशीही शिष्टाचाराने वागणारा ,राजकारणाच्या वाऱ्याची दिशा पाहून आपले धोरण ठरवणारा मुत्सद्दी होता.
संताजी च्या हत्येनंतर धनाजी जाधवांनी स्वतः पुढाकार घेऊन राणोजीकडे(संताजी पुत्र)तडजोडीचे व स्नेहाचे बोलणे लावले होते.
धनाजी राजारामांच्या निधनानंतर ताराराणींच्या नेतृत्वाखाली मुघलांशी लढत होते.
धनाजी जाधव यांची कारकीर्द प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, म्हालोजी घोरपडे व संताजी घोरपडे या महान सेनापतींच्या नेतृत्वात बहरली व ते स्वतः १६९६ ते १७०८ पर्यंत मराठ्यांचे सेनापती होते.
ऑक्टोबर १६९९ ते जून १७०० पर्यंत गनिमी काव्याने मुगल सेनापती झुल्फिकारखानास धनाजीने जवळजवळ २००० कोसांच्यावर(६२४०किमी) पळविले होते.
कित्येक मुगल सरदारांना पाणी पाजले होते.
१७०३ साली स्वतः औरंगजेब ने धनाजी सोबत तहाच्या बोलणीसाठी मोर्चेबांधणी केली होती.
सन १७०५ मध्ये सुरतेसह भरुच पर्यंत सर्व गुजरात धनाजीने लुटला होता.
१७०८मध्ये बाळाजी विश्वनाथच्या(नंतर हा प्रथम पेशवा झाला)मध्यस्थीने ताराबाईंचा पक्ष सोडून शाहू च्या बाजूने उभे राहिले.
पण लवकरच पायाला झालेल्या दुखापतीमुळे पेठवडगाव मुक्कामी त्यांचा मृत्यू झाला.
नगर प्रशासनाने धनाजी जाधव समाधी स्मारक विकसित करून जनतेस खुले केले आहे,तरी जाणकारांनी भेट देऊन महान सेनानीस अभिवादन करावे👍🏼🙏🏼🚩💐😊
●गनिमी काव्याचा महान सेनानी:संताजी घोरपडे●
सेनापती संताजी घोरपडे(१६६०-१६९६)हे सेनापती म्हालोजी घोरपडे(जे छ.संभाजी संगमेश्वरी पकडले तेव्हा शहिद झाले)यांचे चिरंजीव.
प्रचंड पराक्रमी संताजीने आपल्या बहिर्जी व मालोजी या भावांसोबत दस्तुरखुद्द औरंगजेबच्या तुळापूर छावणीवर हल्ला केला होता.
तो आपल्या मुलीच्या शामियान्यात असल्याने बचावला पण ही घटना मराठ्यांना खूप उभारी देऊन गेली होती.
हे खरे की शिवाजी महाराजांच्या काळात मराठे अनेक गनिमी लढाया खेळले,परंतु या गनिमी युद्धतंत्राचा खरा विकास केला तो संताजी घोरपडे यांनी.
त्याकाळी तापी ते कावेरी अश्या मराठ्यांच्या लष्करी हालचाली वाढल्या. या विस्तृत क्षेत्रात विद्युत वेगाने हालचाली करून मोठया मुगल सेनानींना त्याने धूळ चारली व खुद्द बादशहाला दहशत लावली.
संताजीपुढे मोगली फौजा हतवीर्य व असहाय बनत.
इतिहासकार खफिखान म्हणतो ,”ज्याला संताजी शी लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशीबी तीनपैकी एक परिणाम ठरलेला असे-
१)एक तर तो मारला जाई वा,
२)जखमी होऊन संताजी च्या कैदेत सापडे,किंवा
३)त्याचा पराजय होई व त्याचे सैन्य आणि बाजारबुणगे गारद होत.”
वानगीदाखल बोलायचे झाल्यास,बादशहाने कासीमखान,खानजादखान,सफाशीकतखान,इ.अनेक उमराव सरदारांची फौज संताजी चा पाडाव करण्यास धाडली.पण संताजीने चित्रदुर्गजवळ(कर्नाटक) दोड्डेरीच्या गढीच्या हा रणसंग्राम असा काही गाजवला की हे एक Best Guerilla War होऊ शकते.मुख्य सरदार कासीमखान ने आत्महत्या केली व सैन्य जिवाची याचना करू लागले.
अशा या महान सेनानीचा भ्याड खून स्वकीयनेच केला व त्याचा शेवट झाला,हे कसे ते पाहू.
१)संताजी चा राजराम महाराजांशी बिघाड-
असे बिघाड २-३ वेळा झाले होते. स्थिरबुद्धि राजाराम व रामचंद्रपंतांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.या बिघाडाचे कारण इतिहासास ज्ञात नाही.पण,बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन तडजोड करणे हे छ.राजारामाचे धोरण आणी स्पष्टवक्तेपणा व थेट भिडणे हे संताजी चे धोरण यामुळे हा बिघाड असावा असा अंदाज.
२)प्रसंगी वेल्लोर जवळ छ.राजाराम व धनाजी, संताजीवर चालून गेले.या लढाईत संताजीने मात करून त्यांस परत जिंजीला पाठवले होते.( पण नाराज असूनही कधीही संताजी ने स्वराज्य विरोध केला नाही.)
३)संताजी-धनाजी बिघाड
४)संताजी हा शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेला म्हणजे राजकीय तत्वज्ञानाच्या मुशीत तयार झालेला सेनानी.त्यांची दण्डनीती त्याच्या ठिकाणी बानली होती.संताजी लष्करी शिस्तीचे भोक्ते होते.म्हणून राजाराम कालीन बदलत्या परिस्थितीत स्वतः बदलून घेणे अवघड गेले असावे.
५)संताजी च्या पतनास तोच जबाबदार. स्वाभिमान चा अतिरेक झाला की त्याचे गर्वात रूपांतर होते . छत्रपतीशी उद्दाम वर्तन संताजीस भोवले असणार.
६)या कालखंडात अनेक मराठे सरदार कल पाहून तळ्यात-मळ्यात करत.कधी मुगल तर कधी स्वराज्य. अशा लोकांचा संताजीस खूप राग.अशाच अमृतराव निंबाळकरास लढाईत पराभूत करून हत्ती च्या पायी दिले गेले.
७)गाजीउद्दीन खान मोगल सरदार,धनाजी जाधव व हंबीरराव निंबाळकर इ. हे सर्व संताजी च्या मागावर होते.सातारच्या शम्भू महादेव डोंगरावर संताजीचा मुक्काम होता.वरील प्रकरणातील अमृतराव ची बहीण राधाबाई व तिचा नवरा म्हसवड चा देशमुख नागोजी माने यांनी सापळा रचला.
८)गाफील परिस्थितीत संताजी ओढ्यावर स्नानादी कर्म आटोपताना नागोजी माने याने त्यांचा खून केला(जुलै१६९६).
डोंगराच्या पायथ्याशी ‘कारखाळे’ गावाजवळ ही घटना घडली. नागोजी माने हा ‘मुगल-स्वराज्य’असे राजकारण करीत असे.खुनादरम्यान हा स्वराज्यात असून मुगलांशी पत्रव्यवहार करत होता.
शत्रूपक्षीयांच्या भल्या भल्या नामांकित सेनानींची हृदये कँपायमान करणाऱ्या मराठ्यांच्या या महान सेनानीचा शेवट असा दुःखांत व्हावा ,यापरी दुर्दैव कोणते?
संताजी सारखा प्रतिसंभाजी मराठयांना निर्माण करता आला नाही.!
कृष्णा – पंचगंगा संगमावर नृसिंहवाडीला पुढील पिढीने संताजी चे समाधी स्मारक नंतर विकसित केले.
🚩🚩💐💐🙏🏼🙏🏼
क्रमशः
भाग 3
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध ३: महाराणी ताराबाई
आऊसाहेब जिजाऊ यांच्या संकल्पनेतून व शिवछत्रपतींच्या असीम त्यागातून आणी धुंरधर व्यक्तिमत्वातून स्वराज्य स्थापुन ते या महाराष्ट्राच्या मातीत रुजले गेले.
छ.संभाजी महाराजांसारखा शूर पराक्रमी,धाडसी,चारित्र्यवान,व तरी कवी मनाचा राजा या भूमिला लाभला. स्वराज्यावरील भयाण संकटाला त्यांनी अंगावर घेतले.आपले दुर्दैव की स्वकीयांनीच घात केला व उमदा राजा अकाली गेला.
तदनंतर मुत्सद्दी राजाराम महाराजानी स्वातंत्रलढा चालू ठेवला.शिवदण्डनीतीच्या विरोधात जाऊन अगतिकतेने त्यांनी इनाम,वतन,व सरंजाम चालू केले.पण मराठे माघार न घेता लढत राहिले.
हाच धगधगता अग्निकुंड पेटता ठेवण्याचे काम शिवस्नुषा महाराणी ताराबाई नी केले.
🚩🚩🚩🚩
महाराणी ताराबाईंचा जन्म १६७५ साली मोहिते कुळात झाला. त्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या तर शिवभार्या महाराणी सोयराबाई या त्यांच्या आत्या.
राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह होऊन ताराबाई पोटी दुसरे शिवाजी (मराठ्यांचे ४ थे छत्रपती) यांचा जन्म झाला.
आयुष्यात अनेक मोठे चढउतार होऊन शेवटी ९ डिसेंबर १७६१ला सातारा येथे त्यांचे निधन झाले.
मराठ्यांच्या या रणरागिणी चे कृष्णा-वेण्णा संगमावर क्षेत्र माहुली येथे समाधीस्थळ आहे.
🚩🚩🚩🚩🚩
मोगली इतिहासकार खाफिखान म्हणतो,”ताराबाई ही राजारामाची थोरली बायको होय.ती बुद्धीमान आणी शहाणी होती.सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक होता.”
मागे उल्लेख केल्याप्रमाणे राजरामानी जिंजीतून कारभार करताना महाराष्ट्रातील व्यवस्था रामचंद्रपंत,शंकराजी नारायण,संताजी व धनाजी यांचे एक Regency Council करून सोपविले होते व त्याचे प्रमुख पद ताराबाई भूषवित होत्या.
१७००साली राजारामाच्या मृत्यूनंतर आपला पुत्र शिवाजी(दुसरे) याना गादिवर बसवून राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.
अनेक आघाडीवर महाराणी स्वतः बेधडक जात.
बादशहा मराठ्यांचे किल्ले घेण्यात गुंतला असता तिकडे मोगली मुलखात मराठ्यांच्या मोहीमा चालू होत्या.
१७०३ साली ताराबाईंच्या आदेशाने ३०,००० मराठी लष्कर गुजरातेत घुसले होते.
शत्रू इतिहासकार खाफिखान पुढे म्हणतो,”राजरामाची राणी ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. तीत तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले .त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली.”
पुढे बादशहा च्या मृत्यूनंतर (१७०७)अवघ्या दोन-तीन महिन्यात ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा,व परळी हे महत्त्वाचे किल्ले परत जिंकून घेतले.
औरंगजेब (याच्या बद्दल नंतर सविस्तर लिहीतो)नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी १७०७ साली मरण पावला व मराठ्यांच्या स्वातंत्र्यद्धाचा शेवट झाला.सत्तेच्या मोहापायी इतर मुगल शहजादे दिल्लीस गेले पण जाताना शाहू ची सुटका करून गेले.
ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी दुसरे याना गादीवर बसवून १७००-१७०७ व १७१०-१७१४ असे राज्य केले.
महारानी ताराबाई या कठोर प्रशासक होत्या .करारी स्वभावाने त्यांच्या सरदारांवर वचक होता.त्यांच्या या वर्चस्वातून सुटण्याची व नव्या राजाकडून हवे ते पदरात पाडून घेण्याची मोठी संधी मराठा सरदारांना मिळाली.
वतन,इनाम,सरंजाम साठी परत एकदा मराठे सरदार आसुसलेले येथे दिसतात.
पुढे जाऊन राजसबाई(राजारामांची तिसरी बायको)हिने बंड करून आपला मुलगा संभाजी (दुसरा )यास कोल्हापूरच्या गादीवर बसविले होते.
मार्च १७३१ ला मराठयांच्यात तह होऊन सातारा व कोल्हापूर या दोन गादी तयार झाल्या.
नंतरच्या काळात ताराबाई सातारा येथे छ.शाहू कडे राहू लागल्या.आपला नातू राजाराम(दुसरा) यास त्यांनी छ.शाहू ला दत्तक दिला(तो एक वेगळा किस्सा आहे).
पुढे पुण्याच्या पेशव्याशी पण ताराबाईंनी सेनापती उमाबाई दाभाडे यांची मदत घेऊन युद्ध केले.पेशव्यांचे मनमानी कारभार व वर्चस्व त्यांना रुचले नव्हते.पुढे जेजुरीला समेट झाला.
मराठ्यांच्या या महाराणीने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत छ शिवाजी, छ संभाजी, छ राजाराम यांची कारकीर्द अनुभवली.
अख्खे स्वातंत्र्ययुद्ध अनुभवणारी राजघराण्यातील ती एकमेव शासक.
छ शिवाजी(दुसरे),छ संभाजी(दुसरे),छ शाहू याना वडीलकीच्या नात्याने आधार दिला , त्यांची कारकीर्द सावरली.
१७३१ साली कठीण व कडू असा ‘ वारणेचा तह ‘ साकारला गेला व अंतर्गत धुसफूस थांबवली.
पेशव्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी वयाच्या साठीतही ही रणरागिणी सरसावली होती.
पेशव्यांशी समेट करून नंतर झालेल्या जानेवारी१७६१ च्या तिसऱ्या पानिपत च्या युद्धानंतर , ९ डिसेंबर १७६१ साली त्यांचे देहावसान झाले.
देवदत्त नावाच्या एका समकालीन कवीने लिहिले आहे,
“दिल्ली झाली दीनवाणी।दिल्लीशाचे गेले पाणी।।
ताराबाई रामराणी।
भद्रकाली कोपली।।”
मराठ्यांच्या या भद्रकाली महाराणीस शतशः नमन🙏🏼🚩
भाग ४
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध ४: एक सुवर्ण कालखंड
मराठे व मोगल बादशहा औरंगजेब यांच्यामध्ये २५-२६ वर्षे जे युद्ध दख्खनच्या भूमीत लढले गेले ते ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ या नावाने ओळखले जाते,हे आपण पाहिले.🚩🚩
छ संभाजी, छ राजाराम, महाराणी ताराबाई या तिन्ही मराठी राज्यकर्त्यांच्या चरित्रांनीच या स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास रचला गेला.
मोगली सत्तेचा ऱ्हास व १८व्या शतकातील मराठ्यांचे दिल्लीवर वर्चस्व या घटनांचा पाया या स्वातंत्र्ययुद्धाने रचला गेला.
🚩🚩🚩🚩🚩
१】स्वातंत्र्ययुद्धाचे स्वरूप:-
अ) साम्राज्यवादी मोगल व स्वातंत्र्यवादी मराठे यांच्यातील हा संघर्ष होता.
ब) दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही या दोन सत्ता जिंकून औरंगजेबने साम्राज्याची हद्द रामेश्वर-कन्याकुमारीपर्यत पोहोचवली.अकबराचे स्वप्न त्याच्या पणतु ने साकार केले. पण,मराठ्यांमुळे दक्षिणेतील हे विजय अस्थिर होते.
मराठे नसते तर काबुल ते कन्याकुमारी पर्यंत साम्राज्य उभारणारा औरंगजेब बादशहा हा सम्राट अशोक नंतरचा महान राज्यकर्ता बनला असता.
क) औरंगजेब ची इस्लामवर अचल श्रद्धा होती व तो कडवा अनुयायी होता.
‘जिहाद’ची भाषा तर तो निरंतर करत असे.
‘जिझिया’सारखे कर हिंदूवर लादण्यात त्याने आनंद मानला आणि म्हणून या युद्धाला त्याने धर्मयुद्धाचा रंग दिला.
पण वरून जिहादची भाषा व आतून साम्राज्यतृष्णा अशी त्याची फसवी राजनीती होती.
मराठ्यांच्या बाजूवर हे युद्ध प्रामुख्याने राजकीय असले तरी औरंगजेबच्या धोरणांमुळे नकळत त्याला धार्मिक व सांस्कृतिक संघर्षाचे रंग मिसळले.
ड) हे युद्ध सुरवातीला औरंगजेब च्या साम्राज्यतृष्णेसाठी व नंतर शेवटी त्याच्या प्रतिष्ठेसाठी लढले गेले.
मराठ्यांचे बाजूवर हे केवळ छत्रपतीचे युद्ध नव्हते तर हे साम्राज्यवादी सत्तेविरुद्ध लोकांचे युद्ध होते.(people’s war).
२】स्वातंत्र्ययुद्धातील उभयपक्षीयांचे नेतृत्व:-
अ) मोगलांच्या बाजूने एकट्या औरंगजेबनेच लढ्याचे नेतृत्व केले.तर मराठ्यांच्या बाजूवर संभाजी राजे, राजाराम राजे,महाराणी ताराबाई यांनी नेतृत्व केले.
संभाजी राजे गादीवर आले तेव्हा औरंगजेब६२ वर्षांचा , राजाराम महाराज यांच्या वेळी ७१वर्षांचा व महाराणी ताराबाईच्या वेळी ८२वर्षांचा , म्हणजे त्याच्याशी तुलना करता मराठ्यांचे नेतृत्व फारच तरुण व अननुभवी होते.
जेव्हा औरंगजेब ने दक्खनच्या युद्धासाठी नर्मदा ओलांडली तेव्हा त्याचा राज्यकारभार व युद्धक्षेत्र यामधील अनुभवच ४६ वर्षांचा होता!
ब) औरंगजेबच्या स्वारीचे संकट प्रथम छ संभाजीनी आपल्या शिरावर घेतले.तेव्हा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज इ.अशा परकीय शत्रूबरोबर स्वकीय शत्रूशी देखील महाराजांना लढावे लागले.
संगमेश्वरी झालेली त्यांची दुर्दैवी कैद शिवरायांचा ‘अखंड सावधान’ राहण्याचा गुण कमी पडण्याचे निदर्शक होती.
क) छ राजारामांची शिवछत्रपती चे पुत्र म्हणून नैतिक व राजनैतिक बाजू बळकट होती.औरंगजेबसारख्या बलाढ्य शत्रूवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या सेनानींना पूर्ण कृतीस्वातंत्र्य दिले.
ड) छ राजारामानंतर अवघ्या २५ वर्षांच्या तरुण विधवा राणीने बलाढ्य औरंगजेब चे आव्हान स्वीकारले व ७ वर्षे लष्करी लढा दिला.
३】स्वातंत्र्ययुद्धातील उभयपक्षीयांचे बलाबल:-
अ) औरंगजेबच्या कारकिर्दीत मोगल साम्राज्यात २१ सुभे मोडत.
त्यांचा जमीन महसूलच ३३ कोटी २५लाख रुपये होता!
मराठा राज्याची तुलना करता ते त्यांच्या एका सुभ्या एवढे पण नव्हते!
ब) मोगलांच्या लष्करी बळाचा विचार करता ते तत्कालीन आशिया खंडातील सर्वात बलाढ्य लष्कर होते.
४】स्वातंत्र्ययुद्धातील उभयपक्षीयांची युद्धनीती:-
अ) मोगल आमने- सामनेच्या लढाईत (pitched battle) कोणाला हार जात नसत.
पण,मराठे अशी लढाईच टाळत असत.
गनिमी काव्याने आपले सैन्य जायबंदी न होता, लढून,शत्रू हैराण होत असेल,हतबल होत असेल तर मराठे तो धोका का पत्करतील?
ब) मोगली सैन्याबरोबर समानसुमानाचे ओझे,तोफखान्याचे गाडे,बाजारबूनगे,बायकामुले इ.असत .
जेवढा सरदार मोठा तेवढी त्याची छावणी मोठी.
जेव्हा अशा छावणीतील सैन्य संकटात सापडे तेव्हा त्याची त्रेधा होत असे.
म्हणून तर औरंगजेब च्या सैन्याला विशाळगड ते पन्हाळा हे ३५मैलांचे अंतर पार करण्यास ३०दिवस लागले होते.
क) मोगलांप्रमाणे मराठ्यांना छानछोकीत राहण्याची सवय नव्हती.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते तग धरू शकत.
अवजड सामानसुमान नाही,तोफखाना नाही,बायकपोरांचे लटांबर नाही,अशी मराठी फौज विजेच्या चपळाईने हालचाल करत असे.
५】दक्खनच्या युद्धातील औरंगजेबच्या अपयशाची मीमांसा:-
अ) औरंगजेबने आदिलशाही व कुतुबशाही या सुल्तानशाह्या २-३वर्षांत जिंकल्या. पण,निर्माण झालेल्या त्या पोकळीत त्याने आपली शासनयंत्रणा उभी करून स्थिर केली नाही. ते काम आपल्या काही सेनानीवर सोपवून घाईने तो मराठ्यांवर उठला. या घाईमुळे सर्व दक्षिणच अस्थीर झाले.
ब) शिवाजीराजेंना आग्ऱ्यात ठार केले नाही ही फार मोठी चूक होती असे आपल्या मृत्युपत्रात म्हणणारा औरंगजेब मात्र संभाजी राजेंना निर्घृण ठार करून घोडचुकेचा धनी ठरला.
त्याने एक संभाजी राजा मारला पण असे हजारो संभाजी तयार झाले.
त्याने मराठ्यांच्या अस्मितेवरच हल्ला चढवला होता त्यामुळे घराघरातून शिलेदार व सेनानी उदयास आले.
क) औरंगजेबच्या अपयशात व मराठ्यांच्या यशात सह्याद्रीचा फार मोठा वाटा आहे.
ड) गनिमी काव्याने लढणाऱ्या मराठ्यांशी लढणे मोगलांना प्रथम अवघड व नंतर अशक्य होऊन गेले.
इ) मराठ्यांच्या बाजूवर हे युद्ध सर्व लोकांचे होते(people’s war) तर मोगलांच्या बाजूवर हे युद्ध केवळ औरंगजेब चे होते.
बादशहा च्या अट्टाहासामुळे ते खेळले जात होते.
ई) दक्खनचे युद्ध बादशहा ने आपल्या प्रतिष्ठेचे केले होते.
यायुद्धात ना त्याच्या अधिकाऱ्यांना रस ना पुत्रांना!
ताराबाई काळात त्याला कळून चुकले की हे युद्ध आपण हरलो आहोत.पण,आता मराठेच तहास तयार नव्हते.
अशात मरेपर्यंत युध्द लढत राहणे हाच पर्याय समोर होता.
ए) बाबर रचीत मोगली साम्राज्याला स्थिरत्व मिळाले ते सम्राट अकबरामुळे कारण त्याची ‘सुलहकुल निती’!
औरंगजेब बद्दल म्हटले जाते की,’He was not Akbar!औरंगजेब हा कट्टर इस्लाम मानणारा होता.
ऐ) संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर मराठे काही काळ बिथरले पण त्यांनी स्वतः ला सावरून आपले स्वातंत्र्ययुद्ध चालू ठेवले.असे आदिलशाही व कुतुबशाही बाबत घडले नाही.त्यांच्या प्रजेने लढा अथवा बंड काही केले नाही,कारण त्या प्रजाजनांना या शाह्या आपल्या वाटत नव्हत्या.म्हणून तर हे लोकांचे युद्ध होते!🚩👍🏼
पुढील लेखात आपण स्वातंत्र्ययुद्धानंतर लगेच काय काय झाले याचा धावताआढावा घेऊ👍
क्रमशः
भाग ५
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध ५: मोगल बादशहा औरंगजेब
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा (१६८१-१७०७)धांडोळा घेताना औरंगजेब बादशहाबाबत लिहीले नाही तर हा लेखनप्रपंच पूर्ण होणार नाही.
मोगल-मराठा संघर्षाचा खरा केंद्रबिंदू औरंगजेब बादशहा हाच होता.
औरंगजेबची हयात छ.शिवाजी, छ.संभाजी, छ.राजाराम, महाराणी ताराबाई यांच्याशी लढण्यातच गेली.
तरी औरंगजेबचे कार्य,व्यक्तित्व आणि त्याची छाप पूर्ण भारतीय उपखंडावर होती.त्या सर्वांचा धावता आढावा आपण इथे घेतो आहोत.
औरंगजेबचा जन्म ३नोव्हेंबर१६१८ साली गुजरातमधील दाहोद येथे झाला.
बादशहा शहाजहान व मुमताज महल या त्याच्या लाडक्या बेगमेपोटी औरंगजेबचा जन्म झाला.
मुही-उद-दिन मुहम्मद उर्फ औरंगजेब उर्फ आलमगीर हा ६ वा मुगल बादशहा ठरला व त्याने ४९वर्षे राज्य केले.
असे असले तरी तो शेवटचा कर्तबगार मुगल बादशहा ठरला.
त्याच्या मृत्यूनंतर २वर्षातच नवीन बादशहाला दिल्लीबाहेर किंमत ही राहिली नाही व १७ वर्षात सगळे साम्राज्य असंख्य तुकड्यात विखुरले गेले.
म्हणून तर औरंगजेब चा मृत्यू हा इतिहासकारांच्या मते मध्ययुगाचा अंत होता.
औरंगजेब सुन्नी इस्लामपंथाचा अनुयायी होता.सुन्नी इस्लामच्या चार शाखांपैकी हनाफी गटाचे संकलन त्याने ‘फतवा-ऐ-आलमगिरी’ या पुस्तकाद्वारे केले.
शरिया कायदा व इस्लामी अर्थशास्त्र (जे अर्थशास्त्र इस्लामच्या शिकवणीवर अवलंबून असते आणि भांडवलशाही व मार्क्सवादाच्या सुवर्णमध्यात असते)याचा खंदा पुरस्कार व अवलंब त्याने भारतवर्षात केला.
या बादशहाच्या चार बायका व दहा मुले इतिहासात ज्ञात आहेत(अज्ञातांचा विचारही न केलेला बरे!).
दिलारस बानू बेगम,उदयपुरी महल,औरंगाबादी महल,नवाब बाई या चार बायका.त्यातील दिलारस बानू आवडती व तिचे संतान-मुहम्मद आजमशाह(हा पुढे बादशहा झाला),झेब्बूनीसा,शहजादा अकबर.औरंगाबाद ला ‘बीबी का मकबरा’आहे तो म्हणजे या दिलारस बानू चे थडगे.
वयाच्या अवघ्या१८व्या वर्षी १६३६साली औरंगजेब ची नियुक्ती दक्खनचा सुभेदार म्हणून निजामशाही चा बंदोबस्त करण्यासाठी केली.
त्यानंतर १६४५ साली गुजरात प्रांतात स्थिरता आणण्यासाठी नियुक्ती झाली.
त्यानंतर मुलतान व सिंध चा प्रांत सांभाळून परत दख्खन चा प्रमुख म्हणून औरंगजेब रुजू झाला .
औरंगजेबचे राज्यारोहण सन १६५९ ला शालिमार बाग,दिल्ली येथे झाले खरे पण तो बादशहा होण्यासाठी रक्तरंजीत इतिहास घडवून आणला.
औरंगजेबचा वडील बादशहा शाहजहान ला ४ मुले पैकी दाराशुकोह त्याचा आवडता,व तो दिल्लीत असे.
इतर तीन मध्ये औरंगजेब दक्षिण प्रांतात,मुरादबक्ष गुजरातेत,तर शाहशुजा बंगाल प्रांतात.
शाहजहान च्या मृत्यूच्या अफवेनेच हे तिघे दिल्लीच्या रोखाने निघाले.
सुरवातीला मुराद व औरंगजेब ने भागीदारी करायचे ठरवून शाहशुजा ला दूर म्यानमार ला पिटाळले,पुढे त्याचा खून झाला. नंतर औरंगजेब ने दारा शुकोह व मुराद चा वध केला.
खुद्द शाहजहान ला आग्रा किल्ल्यावर८वर्षे कैदेत ठेवले.
दारा शुकोह चा अंत ही मध्ययुगीन भारतीय संस्कृतीची शोकांतिका होती.तो स्वतः बुद्धीमान व धार्मिक उदारमतवादी होता.
औरंगजेब कट्टर इस्लामी तर होताच पण साम्राज्यवादी सुद्धा होता.मुगल इतिहासात सर्वात जास्त प्रदेशावर सत्ता गाजवणारा तो एकमेव शासक.
त्याच्या कारकिर्दीत तत्कालीन जगात भारताची अर्थव्यवस्था परमोच्च होती.
हिंदुस्थान सर्वात मोठे उत्पादक केंद्र होते.
Francois Bernier हा एक फ्रेंच फिजिशियन,१२वर्षे औरंगजेब चा वैयक्तिक फिजिशियन होता.त्याने मुगल साम्राज्यात खुप ठिकाणी जाऊन भेटी दिल्या, त्याच्या मते,”कापड उद्योग खूप वेगाने उदयास आला.कलाकुसर खूप झपाट्याने नवीन तंत्राने विकसित होत होती. कलमकारी, पैठणी तसेच काश्मीरमधील पष्मीना शाली याना पुनर्जीवन मिळाले”.
बिबी का मकबरा, मोती मस्जिद(लाल किल्ला, दिल्ली),बादशाही मस्जिद(लाहोर),श्रीनगर मधील मस्जिद इ.ही काही औरंगजेब कालीन स्थापत्यशास्त्र नमुने.
बादशहा खूप कंजूस होता.इतका की स्वतःवरील खर्च सुद्धा टोप्या विणणे व कुराणाच्या स्वहस्तलिखिताच्या विक्रीतून भागवत असे.
इस्लाम ला न आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे सट्टा, संगीत, दारू,नशा,विवाहपूर्व संबंध याला स्पष्ट विरोध केला गेला. त्याचबरोबर नाण्यांवर कुराण बंदी,पंचांगबंदी,तुलाबंदी इ.असे काही निर्णय घेण्यात आले.
काटकसरी च्या नावाखाली इतिहास विभाग बंदी,चित्रकारांना रजा,नवीन मंदिर निर्मिती बंदी यागोष्टी औरंगजेब च्या काळात चालत.
धार्मिक असहिष्णुता औरंगजेब च्या काळात टिपेला पोहोचली होती.
हिंदू मंदिरे पाडणे, जिझिया कर(हा कर बिगरमुस्लिम लोकांना भरावा लागे)लादणे,त्यासोबत शिखांचे ९वे गुरू तेगबहादूर ,छ.संभाजी, दारा शुकोह, दाऊदी बोहरा समाजाचे सय्यद कुतुबुद्दीन यांना ठार मारून औरंगजेबाने धर्मान्ध मुस्लिम शासक हे बिरुद मिरवले.धर्मांधतेमुळे तो गोत्यात आला हे खरे.
त्याचे पूर्वसुरी बादशहा अकबर अत्यन्त सहिष्णू शासक त्यानंतर जहांगीर च्या काळात कौर्य वाढले,पुढे शाहजहान च्या काळात अपव्यय(ताजमहल)वाढले व औरंगजेबच्या काळात असहिष्णुता वाढली.
हत्तीखाना व सैन्यबळ वाढवणारा औरंगजेब तोफखान्याबाबतीत देखील तितकाच उत्साही होता.जगातील अत्यंत जालीम तोफा मुगल सैन्यात होत्या.
या सर्वांबरोबर औरंगजेबचे शत्रू निर्माण करण्याचे कौशल्य पण वादातीत.अगदी खोलात न जाता फक्त औरंगजेब च्या शत्रूंची नावे व प्रदेश पाहू:-
१) जाट- आग्रा व मथुरा येथील दोआबातील शेतकरी वर्ग. यांनी नेहमी उठावातून विरोध चालू ठेवला.पुढे भरतपूर चे राज्य राजा सुरजमल जाट ने उदयास आणलें.
२) अहोम- आसामचा भाग काबीज करण्यासाठी मुगल नेहमी व्याकूळ असत.अहोम साम्राज्याचा सेनापती लचित बुरफुकण याने कमालीची टक्कर दिली.त्यांना Shivaji Of Aasam पण म्हटले जाते. अजूनही लचित बुरफुकण अवॉर्ड देऊन NDA मधील Best Cadet गौरविण्यात येतो.
३) शिख- गुरु तेगबहादूर यांचा वध व त्यामुळे शिखांचे शत्रुत्व.पूढे गुरू गोविंदसिंग व बंदा बहादूर यांनी लढा चालू ठेवला.
४) सतनामी- या अहिंसक लोकांनी पण करवाढ मुळे उठाव केल्याची नोंद आहे.
५) अफगाण- हा मुस्लिमांचाच उठाव होता. अकबर पैसे देऊन हे बंड शमवत असे पण,औरंगजेब च्या कंजूष पणामुळे हा उठाव झाला.
६) बुंदेलखंड- पराक्रमी छत्रसाल बुंदेला राजाने उठाव केला होता.
७) राजपूत- दुर्गादास राठोड या राजाने आयुष्यभर औरंगजेब शी वैर ठेवले,छत्रपती संभाजी काळात शहजादा अकबर बरोबर मराठा मदतीसाठी आलेले ते हेच.
८) मराठा- सतत २५-२६ वर्षे प्रत्यक्ष येऊन लढून औरंगजेब चा शेवट इथेच महाराष्ट्रात झाला.
९) ब्रिटीश- १६८६ साली बंडाची घोषणा केली पण औरंगजेबाने सर्व ब्रिटिशांना पकडले व जबर खंडणी घेऊन सोडून दिले.
१०) पोर्तुगीज- या युरोपियनांशी पण झगडा.
दक्खनच्या युद्धाला ४६ वर्षांचा अनुभव असलेला बादशहा आला पण इथल्या युद्धाने,दुष्काळाने,व प्लेग आदी साथीमुळे दरवर्षी १लाख सैनिक-माणसे मृत्युमुखी पडत.
मुगलांची एक पूर्ण पिढी इथे कामास आली. सर्व खजिना व द्रव्य इथेच रिते झाले.
दिल्लीवरून बुऱ्हाणपूर मग औरंगाबाद मग बहादूरगड, पुढे तुळापूर ,ब्रह्मगिरी, मिरज,कराड,पन्हाळा,सातारा करत शेवटी नगरजवळ भिंगार या गावी त्याचे निधन झाले,साल होते १७०७.
मृत्यूसमयी त्याच्याकडे फक्त ३०० रुपये उरले होते.ते सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे दान केले गेले.तसेच गाजावाजा न करता दफनविधी केले.
पुढे औरंगाबाद जवळ खुलताबाद येथे मकबऱ्यात रीतसर विधी करून कबर हलविली गेली.
त्याचे शेवटचे उदगार काहिसे असे होते,”मी इथे एकटा आलो आणि अनोळखी राहिलो,मलाच माहिती नाही की मी कोण आहे व काय करत आहे…”
बादशहा मध्ये धैर्य, जिद्द, हाती घेतलेल्या कामावर प्रचंड विश्वास, कुशल सेनानी इ.चांगले गुण होते.
मराठा राज्य बुडविण्यास हरएक प्रयत्न करून बादशहा दमला होता.
एकट्या औरंगजेब ने या लढ्याचे पूर्ण नेतृत्व केले होते.पण त्याचा आपल्या सेनानी वर व पुत्रावरही विश्वास नव्हता.
शेवटी शेवटी तर मुल्ला मौलवी शिवाय इतर कुणालाही बादशहा ने आणखी काही वर्षे जगावं असे वाटत नव्हते.
तब्बल ४९ वर्षे राज्य करणाऱ्या औरंगजेब या शासकाची ही शोकांतिका!!!
अजूनही कुठल्यातरी(दिल्ली)रस्त्याच्या नावाने (बदलावा म्हणून)औरंगजेब आपल्या सामाजिक जीवनात डोकावत असतो तर कधी इतिहास संशोधनात त्याचे नाव येऊन जाते!
पुढील शेवटच्या प्रकरणात मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर लगेच काय घडले ते पाहू👍😊
क्रमशः