fbpx

‘म्याडम… म्याडम…’ असा थोडासा मोठाच आवाज आल्यानं नी दचकून मोबाईलमधून मान वर केली आणि अनोळखी नजरेनं समोर उभ्या असलेल्या जानकीकडं पाहिलं. ती ओढणीचं टोक दोन्ही हातात घट्ट ताणून धरून घाबरल्या चेहऱ्यानं त्यांच्याकडं बघत होती. त्यांनी कोऱ्या नजरेनं आणि चेहऱ्यानं ‘अं?’ म्हणत तिच्याकडं पाहिलं पण त्यांच्या मेंदूत अजून काही उमटलं नसावं. ‘कामात हुता काय? चार हाका दिल्या… कामं झाल्याती… येते मी… तुमी दार वडून घेताय न्हवं?’ असं विचारताना थकल्या चेहऱ्याची जानकी शुभदाताईंच्याकडं आशाळभूत नजरेनं पाहात होती. तिचा आवाजही काहीतरी वेगळं सांगत होता, पण त्याक्षणी तिला ‘बरं, ये’ असं म्हणणाऱ्या त्यांना काही ते उमगलं नाही.

त्याचवेळी त्यांच्या हातातला मोबाईल चारवेळा तरी व्हायब्रेट झाला होता. त्यांचा कान आणि मेंदू ती नोंद घेण्यात व्यस्त होता. निघताना जानकी परत एकदा आशाळभूतपणे त्यांच्याकडं पाहात म्हणाली, ‘म्याडम, काल पोरं लै खुशीनं ज्येवली. असं घट वरन किती दिवसांनी पानात पडलं पोरांच्या. एका चपातीनंबी तृप्तीची ढेकर दिली पोरांनी!’ शुभदाताईंच्या कानांनी नुसतेच तिचे ते शब्द ऐकले मात्र मनानं त्यामागचे भाव काही जाणवले नाहीत, कालचं स्वत:चंच वाक्यही त्यांना आठवलं नाही कि त्यानुसार आज त्यांनी केलेली तयारीही त्यांना स्मरली नाही. त्या नुसत्याच चेहऱ्यावर हसरे भाव आणत, ‘हो का?… वा वा… बरं वाटलं बघ ऐकून…’ असं घाईतच म्हणाल्या.

जानकी जिन्याकडं वळली तसा त्यांनी झटकन फ्लॅटचा दरवाजा ओढून घेतला आणि अक्षरश: पळतच सोफ्यापर्यंत येत त्यांनी मोबाईल हातात घेतला. मगाचच्या आपल्या पोस्टच्या चौऱ्याहत्तर हिट्सचा आकडा ब्याऐशी झालेला दिसताच त्यांचा जीव अगदी धन्य झाला. तीन नवीन कॉमेंट्सही आल्या होत्या. एकाने लिहिले होते ‘हॅट्स ऑफ मॅम’, दुसरीनं ‘डोळे भरून आले वाचून… खरंच अशी संवेदनशीलता ह्या परिस्थितीत प्रत्येकानं जपली तर ह्यातून तरून जाणं सोपं होईल’ असं लिहिलं होतं. तिसरी कॉमेंट होती, ‘तुमच्या मनाच्या मोठेपणाला सलाम, मॅडम!’ सगळं वाचतावाचता शुभदाताईंचा जीव अगदी आभाळाला शिवून येत होता.

फेसबुकवरून बाहेर येत त्यांनी व्हॉट्स ऍपकडं मोर्चा वळवला. नातेवाईकांच्या गृपमधे मावशीनं लिहिलं होतं, ‘शुभू, लहानपणापासूनच तुझं मन असं हळवं आहे. पण अजूनपर्यंत सगळं चांगुलपण तू जपून ठेवलं आहेस ह्याचं फार कौतुक वाटतं.’ तिला उत्तरादाखल ‘लव्ह यू, मावशी’ असं म्हणून शुभदाताईंनी एक बदामही सोबत डकवला. नव्यानं फोन वापरायला लागल्यावरची भीड आता राहिली नव्हती. काही आवडलं किंवा कुणाचे आभार मानायचे असले कि कुणालाही सहज बदाम, किस, लव्ह यू वगैरेंचा प्रेमळ आहेर देणं त्या अगदीच सराईतपणे करू लागल्या होत्या.

मैत्रिणींच्या गृपवर तर ह्या प्रेमळ देवाण-घेवाणीला अगदी ऊतच आला होता. ‘हा विषय तू इतक्या संवेदनशीलतेनं काळजाला हात घालणाऱ्या शब्दांत मांडला आहेस कि कौतुकासाठी शब्दच सापडत नाहीयेत’ अशाच तऱ्हेची प्रत्येकीची प्रतिक्रिया आणि बदामांच्या उधळणीसहित शुभदाताईंचं कौतुक चाललं होतं. महिलामंडळाच्या गृपवरही नुसता शुभदाताईंचा उदोउदो सुरू होता. त्यातल्या एकीनं प्रश्न विचारला होता की, ‘शुभदाताई, ही कथेतली घटना खरी आहे कि कल्पनाविस्तार?’ शुभदाताईंनी लगेच खुशीत लिहिलं कि, ‘अगदी खरी… कालचीच अनुभूती आहे माझी… म्हणूनच कदाचित ते जास्त जिवंत वाटत असेल’ आणि त्यांच्या डोळ्यांसमोर अचानक जानकीची कृश मूर्ती उभी राहिली.

काल भांडी विसळत असताना अचानक कट्ट्याला घट्ट धरून डोळे गच्च मिटून ती उभी राहिली. तिथंच भाजी चिरत असल्यानं आपण घाबरून लगेच विचारलं, ‘काय होतंय गं जानकी? तब्येत बरी नाही का?’ त्यावर ती म्हणाली, ‘म्याडम, दोन दिवस कशी तरी तांदळाच्या चार दाण्यांची पेज करून त्यावरच दिवस काढले… पोटात अन्न नाही म्हणून चक्कर आल्यासारखं झालं जरा…’ त्याक्षणी ती येण्यापूर्वीच भिजवून ठेवलेला दोनवेळच्या कणकेचा गोळा त्यांच्या डोळ्यांपुढं आला आणि मनात आलं कि, इतकी का दरी असावी दोन माणसांच्या जगण्यात!? मनभर कणव दाटून येत त्या म्हणाल्या, ‘खाली बैस जानकी… दूध-बिस्कीटं देते ती खाऊन घे. मग आवर बाकीचं.’

पुढच्या वेळच्या जेवणाची भ्रांत असताना जगण्यासाठी कुठून बळ गोळा करत असतील हे लोक? अशी विचारांची वावटळ सोबत घेतच शुभदाताईंनी आधी पोळ्या लाटायला घेतल्या. काल रात्रीचं मोठी वाटीभर घट्ट फोडणीचं वरण शिल्लक होतं ते फ्रीजमधून काढलं आणि प्लॅस्टिकच्या डब्यात ते ओतलं. जानकी निघतानिघता तिच्या हातात तो वरणाचा डबा आणि गरम पोळ्या घातलेली प्लॅस्टिकची पिशवी देत म्हणाल्या, ‘गेल्यागेल्या वरण गरम कर आणि खाऊन घ्या सगळे.’ प्लॅस्टिकच्या पिशवीबाहेरून हाताला जाणवणारा पोळ्यांचा लुसलुशीत स्पर्श तिला किती सुखावतोय हे शुभदाताईंना तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं. पुढं त्या म्हणाल्या, ‘आणि हे बघ, जसं जमेल तसं दोन घास उद्यापासून देत जाईन मी तुला, निदान तुझी सगळी कामं सुरू होईतोवर तरी! तू स्वयंपाकात थोडीशी जरी मदत केलीस तर झेपेल मला तेवढं.’ ‘करीन म्याडम… ठेवत जावा कामं माज्यासाटी…’ असं म्हणत खुशीत ती निघाली.

घडल्या घटनेचे त्यांच्या मनावरचे पडसाद मात्र फार खोलवर असावेत. त्यांनी झटकन आपला छोटासा लॅपटॉप उघडला आणि झरझर लिहायला सुरुवात केली. छोटुकली कथा लिहून झाल्यावरच मग त्यांनी शेजारी मित्राकडं गेलेल्या त्यांच्या यजमानांना हाक मारत पानं घेतली. रात्री मग स्वस्थतेनं पुन्हा आपलं लेखन वाचताना त्यांनी कथेला आणखी छान आकार दिला…. अर्थातच त्यात घडलेल्या घटनेचाच आणखी थोड्या वाढीसहित अंतर्भाव होता. त्याच अनुषंगाने, आत्ताच्या परिस्थितीत एक वर्ग असाही आहे कि, बाकी छानछोकी राहूदे पण त्यांच्या मुखी दोन घास पडणंही मुश्कील झालंय. आपणही फार मोठं काही करू शकतो अशातला भाग नाही, पण प्रत्येकानं चार घासांची मदत करायची ठरवली तर ते सधन कुटुंबांना अगदीच अशक्य नाहीये. तितक्यानं कितीतरी जिवांची कळकळ थांबेल. असे सगळे विचार त्यांनी त्या कथेच्या एका पात्राच्या माध्यमातून मांडले.

आजवर मासिकांमधे लिहित राहिलेल्या शुभदाताईंना वाचकांचा थेट अभिप्राय मिळायला लागल्यावर सोशल मीडियावर लेखनाचं वेडच लागलं म्हणायला हरकत नाही. आज सकाळी ही कथा पोस्ट केल्यावर तर लाईक्स, कमेंट्सचा नुसता पाऊस पडला होता. अजूनही सुरू असलेला तो ओघ पाहाताना त्या अगदीच हरखून गेल्या होत्या. एका क्षणी पाठीला किंचित रग लागल्यानं सोफ्यावर हात टेकत जरा नीट टेकून बसताबसता त्यांच्या हाताला प्लॅस्टिकचा डबा लागला आणि त्या डोळे विस्फारून त्या डब्याकडं पाहू लागल्या.

डोळ्यांवरची सगळी धुंदी क्षणार्धात उतरली आणि ‘हे आपण काय करतोय?’ अशा विचारानं त्यांना स्वत:चीच लाज वाटू लागली. घड्याळाकडं नजर टाकल्यावर त्यांच्या लक्षात आलं कि जानकीला जाऊन दोन तास होत आले. हिट्स आणि हार्टस मोजण्याच्या नादात आपल्याला ते कळलंच नाही. तिलाच देण्यासाठी भरलेला आणि विसरू नये म्हणून आपल्याजवळच इथं ठेवलेला उपम्याचा डबा तसाच इथं सोफ्यावर राहिला. काल आपण तिला जमेल ते रोज देत जाईन म्हटल्यानंच बहुधा ती आशाळभूतपणे आज ह्याच डब्याकडं चारवेळा बघत होती. पण आपलं मन आणि मेंदू तेव्हां वाचकांच्या काळजाला हात घालणाऱ्या भाषेत तिच्यावरच लिहिलेल्या कथेवरच्या मनाला गुदगुल्या करणाऱ्या कमेंट्समधे गुंतला होता.

वाचकांच्या मनाला स्पर्शून येणं फार सोपं आहे, मात्र स्वत:च्या मनाला काबूत ठेवणं, त्याचं भान जागृत ठेवणं, जे लिहितो तीच संवेदनशीलता जगण्यात प्रत्येक क्षणी उतरवणं हे फारफार कठीण आहे असं त्यांना तेव्हां मनोमन वाटू लागलं. आभासी जगातला तो नुसत्या शब्दांचा पोकळ उदोउदो त्यांना नकोसा झाला. आभासी जगातल्या लाईक्स आणि हार्ट्सच्या धुंदीत आपण प्रत्यक्षात हार्टलेस होऊन माणूस म्हणवून घ्यायला लायक न ठरण्याइतक्या खालच्या पातळीला तर पोहोचत नाहीये ना, हा विचार त्यांचं मन पोखरू लागला. किंचित पाणावलेल्या डोळ्यांनी मनातला कुरतडणारा अपराधी भाव सोबत घेऊन त्यांनी मोबाईलचं नेट बंद केलं आणि कॉन्टक्ट्समधे जात जानकीचा नंबर डायल करू लागल्या, ती इथंच आसपास कुठं कामावर असेल तर तिला डबा घेऊन जा असा निरोप देण्यासाठी!

Contributor
>

Login

Welcome to Typer

Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
Join Typer

Welcome.

Join 'Dureghi' family

We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

Dureghi

Login to write your comments