fbpx
Table Of Contents

भाग १

मोबाईलवर नाव आलं,

‘father calling.’

त्याने हळूचं स्क्रीन लॉकच बटन टाकलं. पुन्हा तो मित्रांच्या गप्पांमध्ये तल्लीन झाला.

“काय वो, लागला का फोन?” चंद्रकलेनं चुलीसमोरून बाजूला होत विचारलं.

“नाय. लागला पण उचलला नाय. कामात आसलं. उद्या करू.” गणपतराव काळजी लपवत म्हणाला.

” काय वो पोरं, आठवडा झालं बोलणं नाही. काळजी लागून राहती.” चंद्रकला पीठ भरलेला हात धुवतं म्हणाली.

“जेवायला वाढ.” गणपतरावांनी विषय बंद केला.

मध्यरात्र होत होती. मित्रांचा घोळका उठला. आपापल्या रुमवर जायला निघाले. महेश चालत चालत निघाला. रस्त्यावर नीरव शांतता होती. मधून एखादी गाडी भर्रकन जवळून जात होती. पदपथावर मुटकुळे करून झोपलेली बेघर मजूर लोक, भिकारी बघून त्याच्या अंगावर काटा आला. दूर कुठतरी कुत्री मोठमोठ्याने भुंकत होती. विचारांच्या तंद्रीत महेशची पावलं झपाझप पडत होती. उद्या पुन्हा फोन आला तर काय उत्तर द्यायचं, याचा विचार तो करत होता.

“श्या…सुखाने काही क्षण राहून देणार नाहीत. पिच्छा पुरवत राहतील. लहान राहिलो का मी आता ? निर्णय घेऊ देत नाहीत. निर्णय घेतला तर संयम ठेवत नाहीत.” त्रागा करत तो उत्तरला.

उघड्यावरच्या गटाराला ओलांडून तो जिना चढत वर आला. दरवाजा उघडला. खोलीच्या कुबट वासाने त्याला शिसारी आली. लाईट लावून तो आत गेला. अस्ताव्यस्त पडलेले कपडे, उष्टं खरकटं सांडलेलं. पुस्तकांचे ढीग, कागदाचे तुकडे….बघून त्याने तोंड वाकडं केलं.कसंबसं लोटून त्याने झाडू कोपऱ्यात सारला. कपडे दुसऱ्या खाटेवर टाकून त्याने गादीवर अंग टाकलं. उद्या काय काय करायचं, याचं नियोजन तो मनात करायला लागला. सुम्या आणि अन्या आठवड्यानंतर गावावरून येणार होते. तोवर खोलीत हा एकटाच. त्यालासुद्धा त्यांनी जायला सांगितले पण हा तयार झाला नाही. मायेची ऊब कधीच विकत घेता येत नाही एवढं खरं..बाकी सारं पोक्त, तटस्थ आणि परकचं..आपलेपणाची उणीव मात्र जाणवतं राहते. ती फक्त आपल्याच माणसांकडून मिळते.

दोन खोल्यांचं टुमदार कौलारू घरं, मागे पुढे ऐसपैस पडवी लागूनच असणारा गोठा आणि झाडांची रेलचेल…त्याच्या डोळ्यांसमोरून घरं तरळून गेलं. आईची आठवण येऊन तो कासावीस झाला. उद्या सकाळी सकाळी फोन करून बोलून घेतो, त्याने ठरवलं. आठवणींमध्ये व्याकूळ होत निद्रेने त्यावर पांघरून घातले.

कौलारू घराच्या पडवीमध्ये खाटेवर पासष्टीचा थकलेला देह कूस बदलत आकाशाकडे पाहत होता. रात्र गडद होत चालली होती. आपण चुकलोचं, त्याचं मन पश्चात्तापाने आक्रंदत होतं. पोराला कधी छातीशी कवटाळेलं, असं त्याला झालं होत.

नीरव भयाण शांतता पसरली होती. चांदण्या स्तब्धपणे लुकलूकत होत्या. त्यांचा प्रकाश फक्त आशा दाखवत होता उद्याच्या नव्या पहाटेची पण त्यांचा प्रकाशात नवी वाट शोधणार तरी कशी ?? हजारो मैल दूर असलेल्या फसव्या प्रकाशात आपण आशेचा किरण शोधतो आणि चालत राहतो कित्येक दिवस त्याचं अभासी वाटेवर…एका संधीची वाट पाहत…!!

क्रमशः

भाग २

” आमचा नंबर हाये पाण्याचा आज. सकाळधरनं मी हंडा लावलाय हितं.” भांडणाच्या आवाजाने महेशला जाग आली. अभंगानं आणि आरतीनं जाग यायला हे त्याचं घरं थोडीचं होतं. डोळ्यांवर येणारी उन्हाची तिरीप चुकवत तो उठला. चाळीतलं रोजचं ते भांडणं, शिवीगाळं, मारामारी आता अंगवळणी पडली होती. ब्रश करत करत तो दाराबाहेर आला. नळासमोरची गर्दी पाहून आपला नंबर आज लागणार नाही, हे त्याला कळलं. न्हाणीतल्या अर्ध्या भरलेल्या थंड पाण्याने त्यानं अंघोळ उरकली. तेलाचा डबा काही सापडेना. सुम्याने ढापला असणार, असा विचार करत तो आरशासमोर उभा राहिला. गावठी दिसत असला तरी त्याचं गोरेपान रांगडी रुप कोणाच्याही नजरेत भरेल असचं होतं. आरशात पाहून त्याला आपल्या वडिलांची आठवण झाली. अण्णा त्यांच्या मिशीला पीळ देताना काय रुबाबदार दिसतात नाही.

अभ्यासाची बँग घेऊन तो निघाला. आज काही करुन एक विषय चा अभ्यास पूर्ण करायचा. वेळ वाया घालवायला नको. नेहमीच्या चहा टपरीवर मित्र वाट पहात होते. फुल कप चहा आणि पाव सांगून तो त्यांच्यात बसला.

“घे रे.” पेटलेली सिगारेट त्याच्यासमोर धरत नव्या म्हणाला.

“नाही रे. मी सिगारेट ओढत नाही.” महेश आग्रह मोडत म्हणाला.

“अरे घे रे, एकदा घेतली की सारखं मागत राहशील. बहोत काम की चीझ.है ये. घे.”

“नको सांगितलं ना.” चिडून महेश म्हणाला.

“बापाला घाबरतो काय रे.?? बापाला काय कळणार तू काय करतोय. ऐश कर. बाप असेचं असतात.”

“बापावर जाऊ नको तू.” आक्रमक पवित्रा घेत महेश तिथून उठला. स्वतः वर ताबा मिळवत तो तिथून निघाला.

“जाऊ दे नव्या. बिनसलेलं असतयं त्याचं आजकाल. काही बोलू नको. येईल संध्याकाळी परत तो.” दुसरा मित्र समझोता करत म्हणाला.

ऊन चटकत होतं. महेश अजूनही रागातचं होता. पण राग कशाचा आला.होता नक्की ? त्याला तो दिवस आठवला.

धाकटा चुलता दारु पिऊन चुलतीवर आणि पोरांवर हात टाकत होता. अण्णाने साटकन् त्याच्या मुस्काटात मारली.

“तुझ्या नाकर्तैपणाचा राग बायकापोरांवर का काढतो. ?? काय करता येतं नसलं तर गप गुमान बसून खा. मी पोसतो तुला. पण माझ्या हयातीत कुणी दारू विड्याला हात लावला तर माझ्या सारखा वाईट कुणी.नाही.” हे बोलता बोलता लालभडक चेहऱ्याने अण्णांनी महेशकडं जळजळीत कटाक्ष टाकला होता. अण्णाची ती भेदक आणि दाहक नजर पाहून महेशने धास्तीचं घेतली होती. दोघ बोलत नसली तरी त्यांच्या काही विधानांच्या पुढे जाण्याची हिंमत त्याने कधीच केली नव्हती.

अभ्यासिकेत जाऊन त्याने एक टेबल निवडला. खिडकीशेजारी बसून दूरवर नजर टाकत अभ्यास करायला आवडायचा. मोबाईलवर त्याने १२ चा गजर लावला.तो अभ्यासात मग्न झाला. भारताचे संविधान, संसद, संसदीय कामकाज यावरची पुस्तक वाचत त्याने टिप्पणी काढायला सुरुवात केली. बघता बघता तो अभ्यासात तल्लीन झाला. दीड दोन तासांनंतर त्याच्या पाठीवर थाप पडली. तो दचकला.

“मह्या, तू मला दहा वाजता भेटणार होतास. एक तास वाट बघून कंटाळून इथे आलेय.” त्याच्या शेजारच्या खुर्चीत बसत स्वाती म्हणाली.

“मी विसरून गेलो गं, खरचं..सॉरी..” आशाळभूत पणे तो म्हणाला.

“बरं चल, चहा घेऊ. ”

दोघजण कँटीनकडे जायला निघाली. स्वाती होस्टेलला रहायची. दोघांची वर्षापूर्वी अभ्यासिकेत ओळख झाली. मैत्रीतून दोघ एकमेकांच्या प्रेमात कधी पडली कळलचं नाही. स्वाती बिनधास्त, धाडसी, स्पष्टोक्ती आणि महेश शांत हळवा, बुजरा. दोघही काहीतरी स्वप्न पूर्ण करायला शहरात आलेली.

“दोन फुल चहा आणि क्रीमरोल.”

“तू सकाळी आलासं ना लवकर ? मी रात्री तुला फोन केला होता तुझा फोन लागला नाही. ”

“हं…सकाळी आलो लवकर. रात्री दमून झोपलो लवकर. म्हणून फोन नाही केला.”

” पोरांच्यात किती वेळ होतास?”

“झालं का सुरू तुझं ?? सकाळी कशाला वाद घालतेस.?”

“चिडतोस कशाला ? मी फक्त विचारलं.”

“हं…”

चहा पीत पीत तिने विषयाला हात घातला.

“अप्पांचा फोन आला होता काल.”

“मग?”

“लग्नाचा विषय निघाला होता.” दबकत दबकत ती म्हणाली.

महेशने चहाचा ग्लास टेबलावर आपटला.

“आयुष्यात एकचं विषय आहे का..? मला थोडा वेळ हवाय. काहीतरी करायचं मला..तुला घाई असेल तर तू जाऊ शकतेस.” चिडून महेश निघून गेला.

“महेश.।.अरे…ऐक…” महेश केव्हाच अभ्यासिकेबाहेर पडला होता.

सूर्य तापलेला होता. पण आयुष्य सावरण्याचा प्रयत्नात लागणारा दाह कितीतरी पट अधिक होता. लहानपणी पाय भाजू नये म्हणून कडेवर बसवून अनवाणी चालणारा बाप त्याला आठवला. बारा वाजून गेले. तो ऑफिसात आला. अर्धवेळ पगारी नोकरी कशीबशी मिळाली होती. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार. कागदपत्रांच्या नोंदी करून घेणं ,इतकच त्याचं काम. तोंडावर पाण्याचा शिंतोडे मारून तो कामाला लागला.

उन्हाळ्यात तसं फार विशेष काम रहायचं नाही. मध्ये मध्ये महेश अवांतर वाचान करायचा. आज सकाळपासूनच कटकट सुरु झाली होती. मन बैचेन होतं. वाचनात काही लक्ष लागेना. त्याने कागदावर लिहायला सुरुवात केली. तसही काही व्यथा आपल्यालाचं आपणचं सांगाव्या लागतात नव्याने.

‘ केवळ भयप्रद..कल्पनापेक्षाही वास्तव अतिशय भयाण आणि रौद्र असतं. वास्तवाचा विस्तव चटके देत राहतो आणि आपण निमूटपणे सहन करत राहतो. रस्ता बदलला तरी फोडांनी भरलेला आणि रक्तांनी माखलेला पाय ठसा उमटवतचं राहतो आयुष्यपटलावर..! मग हे वास्तव रस्ता निवडण्याआधीच खरं रुप का दाखवत नाही.. की आपणचं असतो अवास्तव स्वप्नांच्या धुंदीत..!!’

क्रमशः

भाग ३

‘ आणि सुरु होतो प्रवास…अनिश्चिततेचा.’

मनातली गरळ कागदावर ओकत त्याने सुस्कारा सोडला. आईचा आवाज ऐकल्यावर थोडं बरं वाटेल म्हणून त्याने फोन केला. आतातरी आण्णा बरे बोलतील, प्रश्न विचारणार नाहीत, असं स्वतः समजूत काढतं त्याने फोन केला. पलिकडून आवाज आला,

“ह्यालो, कोण भावड्या..?”

“……..”

“ह्यालो, आवाज येत नाय…कोण हाय?”

“आप्पा…मी…”

“भावड्या, कारं लेका?? काय झालं ? आवाज का असा ?”

प्रश्न.. प्रश्न..प्रश्न महेशची चिडचिड सुरू झाली.

“आईकडं फोन द्या.”

“आरं पण..?”

“आईकडं द्या”

त्याच्या तटस्थ बोलण्याने आण्णांचा नाईलाज झाला.

“ऐकला का..भावड्या बघ काय म्हणतो??”

आतल्या घरातून लगबगीनं चंद्रकला बाहेर आली.

“भावड्या, आरं सोन्या किती दिस फोन नाय. ..बरा हाय ना?”

आईच्या काळजीपूर्वक आवाजाने त्याला गहिवरून आलं. वात्सल्यसिंधूच ती..तिची सर कुणाला येणार??

“जप पोरा…ह्यांला तुझी काळजी लागून राहती..तुमी दोघ काय नीट बोलत नाई..कसनुसं वाटतं..बाप हाय तो तुझा..एकदा बोलून बघ..आभाळाएवढ मोठ्ठ मन हाये.” फोन ठेवत चंद्रकला बोलली.तिचे शब्द त्याच्या कानी घुमत राहिले. बोलावसं तर वाटतं पण बोलणार काय ??

मागच्या गोष्टी अडथळा देत राहतात. एकदा तयार झालेली काळाची पोकळी कधीच भरून येत नाही.. कितीही वेळा आल्या तरी. मनाचा ताबा स्वाभिमानाऐवजी अहंकार आणि हेकेखोरपणाने घेतला तर ते स्वैर बनते, घोंगावणाऱ्या वाऱ्यासारखं.. प्रबळ, तालेवार, आकार नसणारा, स्वतः भोवतीच घुमत राहतं…ओसरून गेल्यानंतर प्रलयाचा अंदाज येतो अगदी तसचं.

महेश क्षणात भूतकाळात जाऊन पोहोचला.त्याचं गावं, त्याची माणसं,त्याचं कौलारु घरं आणि त्याचं कोकरू.

त्याचं जग किती छोटं आणि सुखी होत..मर्यादा आखलेलं..पण प्रचंड अडचणींनी भरलेलं. गरिबी वाईट असते.परिस्थितीतला माणूस कसा दलदलीत सापडल्यासारखा असतो..कितीही वर यायचा प्रयत्न करो अजून रुतत जाणार.लहानपणापासून महेशला अशा जगण्याचा राग यायचा..भुर्रकन जाणारी फटफटी पाहिजे, रंगीत चित्राचा टीव्ही पाहिजे, मऊ मऊ बिछाना पाहिजे, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ पाहिजे.. किती ती त्याची स्वप्न.!

पण रात्रीच्या जेवणात कोरड्याबरोबर जवसाची चटणी ताटात आली की त्याला आपण स्वप्नापासून किती कोस दूर आहेत याची जाणीव व्हायची. “मोठे सायेब, सायेब म्हणाला कि हुईल काम, सायबाच्या मनात काय असलं तस हुईल.”

असे संवाद ऐकून हा सायेब कोणीतरी मोठा ताकदवर माणूस असं त्याला कळलं तेव्हा त्याने निश्चय केला मी मोठा सायेब होणार.

बारावी नंतर जेव्हा कॉलेजमध्ये जायची वेळ आली तेव्हा मात्र महेश म्हणाला,

“मी तालुक्याला जातो. अभ्यास करून साहेब होईल.”

“कुणी खूळ भरलं हे?? आपल्या सारख्याचं काम नाई ते.”

“मी मेहनत करेल…”

“आरं..कालेजात जा शिक शिक्षक हो..पगार मिळवं..बास की.”

“नाही. मी ठरवलयं.यात बदल होणार नाही.”

” एव्हढा मोठा झालास व्हयं ..बापाम्होर बोलतो..काय दुनिया पाहिली तू?? चार बुक शिकला म्हंजी समदी जगरहाट कळली व्हयं. कशाला नाद करतो..वंगाळ काम ते..आपल्यासारख्यानी झेपत तेवढ करावं.” चिडूनही समजुतीच्या स्वरात आण्णा म्हणाले.

“मी हेच करणार..बाप म्हणून मला आधार द्यायचा सोडून कीड्यामुंगीसारखं जग म्हणून सांगता..तुम्हाला जमेल ते मला नाही जमणार..” महेश ठाम होता.

“भावड्या, गपगुमान कालेजात जा.उगं तरास देऊ नगं.”

“शेवटचं सांगतो..मी निघालो.. बसा तुम्ही आणि तुमची गरिबी कवटाळून.”

“भावड्या…..परत घरात पाऊल टाकशील तर याद राखं..”

“नाही येणार…तुमच्या सारख्या हुकमी लोकांची गरज पण नाही.” तावातावाने महेश बाहेर पडला. आई हातापायख पडून दोघांची समजूत घालत होती…पण व्यर्थच..! दोन ध्रुव दोन टोक..मीलन केवळ अशक्य..

महेश त्या दिवसापासून गावी फिरकलाच नव्हता. आण्णा झुकती बाजू घेऊन बोलायला लागले. पण सळसळणारं तरुण रक्त…एवढ्यात विसरणार कसा??

कैक वेळा अंधाराच्या कुबड्या घेऊन वाट निवडली जाते..खाचखळग्यांचा अंदाज येत नाही वाट भरकटली का तेही कळत नाही.. उजेड होईपर्यंत बऱ्याच लांबवर पोहोचलो जातो तेव्हा वाटतं, कंदील हातात घेऊन वाट दाखवणारा बापमाणूस हवा होता.

क्रमशः

भाग ४

विचारांचं गलबत किनाऱ्यावर कधी लागेल माहिती नव्हतं…परिस्थिती नुसार घालमेल वाढतं होती. चार वर्षे झाली महेश घर सोडून आला होता. यश सारखी हुलकावणी देत होतं. अभ्यास करुनही अपेक्षित पदरात पडत नव्हतं. निराशेचं माप मात्र वरचढ होतं होतं. आशा तुटत चालली होती. आपण कुठे चुकलो, याचा अंदाज महेश घेत होता.

या वर्षी शेवटची परीक्षा देऊन पाहू, असा निर्णय त्याने घेतला. पोरांची संगत कमी होतं होती. महेश अभ्यासात मग्न असे अथवा दूर कुठेतरी एकांतात जाऊन बसे. मनाचा हळवेपणा एकटेपणात प्रखरपणे जाणवतो. आपण किती फोल आहोत, त्याला उमजायचं. स्वाती त्याचा मागे खंबीरपणे उभी रहायची . त्याला उमेद द्यायची. त्यावेळी कदाचित एकच खांदा त्याला साथ देत होता.

अण्णांनी महेश परत येईल, ही आशा सोडली होती. म्हातारपणी आपल्या स्वाभिमानापुढे पोरगं दूर लोटलं ही टोचणी त्यांना लागली होती. दिवसेंदिवस अण्णा हळवे होत होते. बाप आणि पोरातला समंजस दुवा व्हायला आई कमी पडली होती.

वाईट दिवस सरायला वर्षानुवर्षे लागतात. दुःख मुळी अलवार आणि समंजसपणे भोगावं लागतं. दुःख अनुभवी..चार धडे दिल्याशिवाय सरत नाही. सुख मात्र क्षणभंगुर.. माझं माझं म्हणता संपून जातं. आयुष्याची रीतचं न्यारी..हवं ते मिळत नाही..मिळतं ते जुळत नाही आणि जुळत ते सरत नाही.

शेवटची पेपर देऊन महेश रुमवर आला. बराचसा भार कमी झाला होता. डोक हलकं आणि शांत झालं. बिछान्यावर पडताक्षणी त्याला गाढ झोप लागली. स्वप्नात किती मनोरथ पूर्ण झालेली दिसत होती. चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं.चार पाच तासानंतर त्याला जाग आली. बरेच दिवस स्वातीशी बोलणं झालं नव्हतं.आज निवांत गप्पा मारता येतील, म्हणून त्याने तिला भेटायला बोलावलं.नेहमीच्या जागी ती दोघ भेटली. स्वाती सावळी असली तरी तिचा चेहरा आकर्षक होता. महेशला मनमिळाऊ स्वाती फार आवडायची.

” आज बाईसाहेब म्हणतील ती शिक्षा आम्ही भोगणारं. महिन्यानंतर भेटतोय.” महेश चिडवायच्या स्वरात म्हणाला.

स्वातीच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. ती शून्यात नजर लावून बसली होती. डोळे जड आणि रडलेले दिसत होते. महेश गडबडला. तिचा हात हातात घेत चेहरा न्याहाळत म्हणाला,

“स्वाती, काय झालयं?? तू गप्प का?? बोल ना..”

स्वाती महेशला मिठी मारुन रडू लागली. महेश गोंधळून गेला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत म्हणाला,

” मला नीट सांग काय झालयं..”

हुंदके देत देत स्वाती बोलू लागली,

“आप्पांनी लग्न ठरवलयं माझं. काही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांची शपथ घातली. दोन महिन्यांत लग्न आहे. मी विरोध केला तर माझ्यावर हात उगारला. आता कशीबशी मैत्रिणीकडे जाते म्हणून आलेय. महेश, मला तू सोडून कुणीच नकोय. तू मला घेऊन चल.”

महेशच्या काळजात चर्रर् झालं. स्वातीला शांत करत तो म्हणाला,

“तू घरी जा. मी उद्या अप्पांना भेटतो.”

” पण महेश…ते तुझं ऐकून तरी घेतील का…नको आपण पळून जाऊ..”

” नाही स्वाती.. मला बोलू देत.तू काळजी करू नको.”

भरल्या डोळ्यानी स्वातीने त्याला निरोप दिला. महेश घराकडे निघाला. भूक केव्हाच मेली होती. पावलं जड होत होती. पुढे भविष्य गडद झाले होते.चहुबाजूंनी घेरल्याप्रमाणे त्याची अवस्था झाली. प्रत्येक परीक्षा त्याचा अंत पहात होती आता नियतीने त्याला कठड्यावर आणून ठेवले होते जिथून त्याला कदाचित भावनांचा कडेलोट करावा लागणार होता. श्वासांची गती वाढली होती. मती गुंग झाली होती. फासे पडले होते. उद्याची पहाट काय दिशा देणार ही धाकधूक होती.

आतापर्यंत सगळ्या परिस्थितीला एकटेच सामोरे गेल्याने महेश आता तरबेज झाला होता. व्यवस्थित आवरुन काय बोलायचे ते उजळणी करुन तो निघाला. छोटी चूक सुद्धा महागात पडणार होती. फाटक उघडून तो आत आला, त्याने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला अण्णांचा स्पष्ट चेहरा त्याला दिसला. आधार वाटू लागला. त्याने हलकेच दारावर टकटक केले. स्वातीच्या लहान बहिणीने दरवाजा उघडला. तो आत आला. अप्पा पेपर वाचत बसले होते. त्यांनी तिरकेच चष्म्यातून पाहिले आणि त्याला बसायची खूण केली.

” मी महेश..महेश यादव..” स्वर भेदरलेला

” हमम्..पुढे..” पेपरात डोक घालूनच अप्पा बोलले.

” अप्पा ….मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मला पाच मिनीटे वेळ द्या .” दरवाज्याआड स्वातीला पाहून त्याला आधार आला.

रागाने पहात अप्पांनी पेपर बाजूला ठेवला. महेश पुढे बोलू लागला.

” अप्पा आपण एकमेकांना ओळखत नाही. भेटलेलो नाही. मी आणि स्वाती पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. ओळखीतून आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. ”

“अस्सं.” महेशचं बोलणं तोडतं आप्पा म्हणाले,” करतो काय तू?”

“मी स्पर्धा परीक्षा देतोय.”

“ते दे तू. पोटापाण्यासाठी काय करतो ?”

“सध्या एका कंपनीत अर्धवेळ नोकरी करतोय. बाहेरून बी.ए. पूर्ण केलयं. आता एम्. ए ला प्रवेश घेईन.”

“म्हणजे स्थिरस्थावर असं काही नाही. कशाच्या जोरावर पोरगी तुला द्यायची.”

“आज ना उद्या होईल सगळ ठीक. मी शब्द देतो. स्वाती दुसऱ्या सोबत सुखी राहू शकणार नाही.”

“आत्ता बोललास परत बोलू नकोस. आधी स्वतः च्या आयुष्यात काय करायचं ठरवं मग माझ्या पोरीच्या आयुष्याचा निर्णय घे. निघ आता.” अप्पांच्या डोळ्यात निखार पेटलेला. स्वाती आतून बाहेर आली. पाठोपाठ आई अप्पांना शांत करत होती.

“महेश मी तुला सांगितलं होतं..अप्पा ऐकणार नाहीत.. आपण पळून जाऊ.” स्वातीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

“स्वाती..बाप काय असतो कळायला बापापासून दूर व्हाव लागतं. मी भोगलयं. तुला तुझ्या बापापासून वेगळ करायची चूक मी करणार नाही. होईल लग्न तर त्यांच्या संमतीने. अथवा नाही . अप्पा हात जोडून विनंती करतो..दोन महिने द्या.. सिद्ध करुन दाखवतो. पण दोघांना वेगळ करु नका.” बोलून महेश बाहेर पडला. गालांवरून अश्रू ओघळले. पहिल्यांदा त्याला आपल्या पोरकेपणाची प्रकर्षाने जाणीव झाली. मन आक्रंदत होतं. कदाचित सगळ्या प्रश्नांची उत्तर अण्णा देऊ शकतील. त्याचा विचार झाला. घाईघाईने बँग भरुन त्याने गावची बस पकडली. पाच वर्षांनंतर तो गावी जात होता. गाडी पळत होती.त्याचं मन घरापाशी पोहोचलं होत.

संध्याकाळ झाली होती. अण्णा बाजावर बसून चहा पीत होती. महेश अंगणात पोहोचला. वय झालं तरी अण्णांची द्रुष्टी शाबूत होती. त्यांना क्षणभर विश्वास बसेना. हातातला कप ठेवून ते लगबगीने उठले.

“भावड्या…आरं तू…इरवाळी कसं काय..? ” त्याला मिठीत घेत अण्णा बोलले. त्यांच्या अंगाचा शेणामातीचा वास आज महेश ला हवाहवासा वाटला. मिठीत ऊब होती…मायेची..पाच वर्षे या मायेला तो पारखा झालेला. त्याची बँग खांद्यावर घेत हाताला धरून ते पडवीत आले. महेशला दुडूदुडु चालताशा आधार देणाऱ्या बोटांची आठवण झाली.

” चंद्रकले..बघ कोण आलयं..भावड्या…आपला भावड्या..”

धुरकटलेले डोळे चोळत ती बाहेर आली. तोंडावर बोट फिरवून ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. भेटीगाठी झाल्या..तिघांचे ऊर भरुन आले होते. अण्णांचं काळीज आत्ता कुठं शांत झालं.काहीतरी झाल्याशिवाय भावड्या अचानक घरी यायचा नाही, न्याहाळत त्यांनी विचार केला. रात्रीच्या जेवणात सगळं त्याच्या आवडीचे पदार्थ होते. कित्येक दिवसांनी इतकं पोटभर जेवण झालं होतं.

आकाश शांत होतं. चांदण्यांची सुंदर आरास पसरली होती. महेश बाजावर पडून आकाशाकडे पहात होता. मनातून तो स्थिर झाला होता. इतकी शांतता आणि समाधान त्याने गेल्या चार पाच वर्षांत अनुभवलं नव्हतं. आपल्या माणसांत दुःखाची तीव्रता किती कमी होते नाही.. त्याच्या पायांना गार खरबडीत स्पर्श झाला. त्याने चटकन पाय बाजूला घेतला.

” अण्णा काय करताय ?”

“दमला असशील. पाय चेपून देतो. लहान असताना शाळेतून आला की पाय दुखत्यात म्हणून चेपून घ्यायचा की रं.”

अप्पांचा स्वर हळवा झाला..महेशने हुंदका गिळला आणि डोळे गच्च मिटून पडला. तो निद्रिस्त झाला.

‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार…विठ्ठला तू वेडा कुंभार..’ मधूर अभंगाने त्याला जाग आली. रात्री अंधारात बरचं काही नीट दिसलं नव्हतं. कोवळी उन्हं दाराशी पडली होती. दवबिंदूंनी पानांवर रांगोळी मांडली होती. उन्हात पिकं सोन्यासारख्यी सुंदर दिसत होती. हिरवीगार..अल्हाददायक..नयनरम्य..! बिल्डिंगीच्या गजबजाटात तो ही हिरवी किमया विसरलाच होता. लहानपणी लावलेला आंबा किती डेदेदार दिसत होता. क्रुष्णकमळ तर छप्परावरून मागच्या अंगणापर्यंत पसरला होता. तो मनोमन सुखावला. न्हाणीत जाऊन त्याने प्रातःविधी उरकले. स्वयंपाक घरात ऊब जाणवत होती. खरपूस उकळलेल दूध आईने त्याच्यासमोर मांडलं..स्वर्गसुख म्हणतात ते दुसर काय.!

अण्णा मळ्यात जायला निघाले. महेशही त्यांच्या सोबत निघाला. अण्णांनी माळवं केलं होतं..एकरभर शेतीत काकडी, टोमॅटो, भोपळा, दोडकी, कारली, वांगी यांचे वाफे दिसत होती. काळ्या आईला स्पर्श करताच महेश शहारुन गेला. निसर्ग शेवटी आपल्याला भरभरून देतो..कशातूनही न मिळणार आत्मिक समाधान देतो. आण्णा पाणी धरु लागले. महेशही पाण्यात उतरला. चाचपडत महेशने विषय काढला,

” अण्णा , संचालक साहेबांना भेटता येईल का हायस्कूल च्या?”

“व्हयं..कारं?”

” शाळेत जागा आहेत तर शिक्षकासाठी भरती होतो म्हणलं.”

अण्णांना विश्वासच बसेना. शंकेने त्यांनी विचारलं,

” आरं पण ते तू सायेबची परीक्षा देत हुता ना..? भावड्या माह्या मुळं तू तसं काय करत आसशिल तर माझं चुकलं..तू बळजबरी असं करु नगं..माझं काय बी म्हणणं नायं. म्हातारपणी उगं रागाच्या भरात बोलणं टाकू नगं माझ्यासंगं.” अण्णांच्या पापणीच्या कडा ओलावल्या.

“अण्णा, मीच चुकलो. हट्टापायी तुमचं ऐकलं नाही. मनाला वाटलं तसं वागतं गेलो..पण अनुभव नव्हता..भरकटलो..आता पुन्हा वळणावर यायला बघतोय..तुम्ही असं बोलता?.” महेश हुंदके देत म्हणला..अण्णांनी घट्ट मिठी मारली. महेश ओक्साबोक्शी रडू लागला. हेवेदावे, राग लोभ सगळ वाहून गेलं.

बऱ्याच खटपटीनंतर त्याला नोकरी मिळाली. महेश शाळा, शेती सांभाळत होता. अण्णांचा महेशबद्दल चार लोकांना सांगताना अभिमानाने ऊर भरून यायचा.सारं काही सुरळीत चाललं होतं.अप्पांनी समजावूनसुद्धा लग्नाला नकार कायमच ठेवला. स्वाती हळूहळू आठवणींपल्याड गेली. गाडी रुळावर आली होती. हेव्यादाव्यांचे, कलहाचे आवाज थंड झाले होते.

अण्णांचे अनुभवकथन ऐकून महेश थक्क व्हायचा. त्यांच्या कडून नव्या गोष्टी शिकत होता. गबाळ्या, गावंढळ बापाची जागा एका अनुभवी, प्रयोगशील बापाने घेतली होती. पै पै करून साठविलेल्या पैशातून अण्णांनी एक दुचाकी महेशला दिली, तेव्हा महेश आनंदाश्रूंत न्हाऊन निघाला होता.त्याने अण्णांकडे कटाक्ष टाकला. अण्णा त्याला आधारवड भासले.क्रुतज्ञता व्यक्त करायला आज शब्द थिटे पडले..महेशच्या मनात ओळी फेर धरू.लागल्या.

बाप हेच नातंच मुळी भन्नाट आहे. त्याला शब्दांत मांडता येणार नाही. मांडलचं तरी तो विरुद्ध अर्थाने कधी वागेल तर कधी अगदीच समांतर. बाप समजत नाही. बापाला समजून घ्यायला लागतं. बाप किनारा असतो आयुष्याचा..बेभान लाट अंगावर घेणारा, गलबतांना विसावा देणारा..कित्येक संकट येवोत तो स्थिर असतो. त्याचा तोल सहजासहजी ढळत नाही. तो सहस्र हातांनी देत राहतो.तो कठोर असतो.जगाची रित परोपरी त्याच्या वागण्यातून समजून सांगतो. बापाची चप्पल पायाला आली तरी कित्येक उन्हाळे पावसाळे अनवाणी फिरणाऱ्या बापाची सर यायला आपण बाप व्हायला लागतं. वयात आल्यावर बाप आपला बाप आपल्याला मळका, कुजका, बुरसटलेला वाटतो पण आपल्याला मोठं करताना त्याच्या चेहऱ्यावर येणाऱ्या वार्धक्याच्या खुणांचा हिशोब आपण मांडायला विसरतो. बाप आधार असतो..ज्याच्या आधारावर आपण धडपडलो तरी सावरतो, चुकलो तरी शिकतो..मुळात बाप झिजत जातो त्यावेळी दुसरा वंशव्रुक्ष तो सम्रुद्ध करुन जातो.

Contributor
 • >

  Login

  Welcome to Typer

  Brief and amiable onboarding is the first thing a new user sees in the theme.
  Join Typer

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments

  Welcome.

  Join 'Dureghi' family

  We connect you to the world of beautiful stories and poems. You can add comments to stories and poems you like. You can also write review comments for popular books.

  Dureghi

  Login to write your comments
  Need Help? Chat with us